दिवाळी अंक २०२५ - शेअर बाजार आणि एआय - लेख

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in दिवाळी अंक
21 Oct 2025 - 12:00 am

चॅट जीपीटी हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मदतनीस २२ नोव्हेंबर २०२२ रोजी वापरकर्त्यांसाठी खुला करण्यात आला आणि संगणक क्षेत्रातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. विश्वास बसत नाही, पण येत्या काही दिवसांत या मदतनीसाला तीन वर्षे पूर्ण होतील. आज तीन वर्षांनंतर थोडे मागे वळून पाहिले, तर असे दिसते की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सगळ्या जगाला दिलेला धक्का आता बराचसा ओसरला आहे आणि चॅट जीपीटी आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता मदतनिसांनी उडवलेला धुरळा आता बराचसा खाली बसला आहे. मी म्हणेन, आज तीन वर्षांनंतर, हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, ते काय करू शकते, काय करू शकत नाही आणि त्यातले धोके कोणते याबाबत पुरेशी स्पष्टता आता आली आहे. एक गंमत म्हणून, नवीन आलेले तंत्रज्ञान वापरून पाहायचे म्हणून या साधनाचा वापर करणारे बरेचसे लोक आता त्यापासून दूर गेले आहेत आणि ज्यांना खरोखरच या मदतनिसाकडून काही काम करून घ्यायचे आहे, तेच लोक आता त्याचा वापर करताना दिसतात. मात्र म्हणून नव्याची नवलाई आता संपली आहे असे जर कोणी म्हटले तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल, कारण आज चॅट जीपीटी हे संकेतस्थळ जगातील पहिल्या पाच प्रमुख संकेतस्थळांपैकी एक बनले आहे, जी एक अतिशय अवघड आणि त्यामुळेच कौतुकास्पद गोष्ट आहे.

कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की ते बनवणाऱ्यांना अपेक्षित, ते बनवणाऱ्यांना पूर्णपणे अनपेक्षित, चांगला, वाईट अशा अनेक प्रकारे त्याचा वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान तरी याला अपवाद कसे असेल? कर्करोग अर्थात कॅन्सर शोधण्यासाठी, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी, फसवणुकीचे प्रकार शोधण्यासाठी, नवीन औषधे शोधण्यासाठी आणि हवामानाचे अचूक अंदाज बांधण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, त्याचबरोबर लष्करी उपकरणांची मारकक्षमता वाढवण्यासाठी, अतिधोकादायक ड्रोन बनवण्यासाठी, सायबर हल्ले करण्यासाठी, दिशाभूल करणारी, खोटी माहिती पसरवण्यासाठी, बनावट छायाचित्रे, चित्रफिती बनवून लोकांना फसवण्यासाठीही होत आहे.

अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी चर्चा करणे हा या लेखाचा उद्देश नाही. मी स्वतः एक संगणक अभियंता आहे, तसेच मला प्रवासाचीही प्रचंड आवड आहे. या दोन्ही ठिकाणी मी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करतो. मात्र या दोन क्षेत्रांविषयीही मी बोलणार नाही. मी बोलणार आहे ते एका तिसऱ्याच क्षेत्राविषयी - शेअर बाजाराविषयी. मी शेअर बाजारात माहिती मिळवण्यासाठी आणि त्या माहितीतून निष्कर्ष काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करतो, हा या लेखाचा विषय आहे.

शेअर बाजारात मी प्रवेश केला तो साधारण वर्षभरापूर्वी. नोकरीला लागल्यापासून मी कर वाचवण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून काही म्युच्युअल फंड विकत घेत होतो, एखाद्या कंपनीचे शेअर मात्र मी कधीही विकत घेतले नव्हते. पण सुमारे चार वर्षांपूर्वी मी ते सगळे म्युच्युअल फंड तडकाफडकी विकून टाकण्याचा आणि आलेले पैसे जमिनींमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करावी या विचाराने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि मी शेअर बाजारात पुन:प्रवेश करण्याचे ठरवले. मी शेअर बाजाराविषयी माहिती मिळवत असताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय होत होता, तेव्हा साहजिकच आपल्याला शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी या नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल, याचा विचार मी सुरू केला आणि त्यातून चुकतमाकत, काही प्रयोग करत शेवटी एका निश्चित अशा योजनेपर्यंत मी पोहोचलो. शेअर बाजारात, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात मी साधारणतः १४% परतावा मिळवला आहे आणि या यशाचा मोठा वाटा मी एआयला देतो.

आज ढोबळमानाने मी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर शेअर बाजारात खालील प्रकारे करतो -

शेअर बाजाराचे ज्ञान वाढवण्यासाठी

बाजाराचा लघुकालीन, दीर्घकालीन कल जाणून घेण्यासाठी

एका विशिष्ट कंपनीत गुंतवणूक करावी की नाही, हे जाणून घेण्यासाठी

पुढे जाण्याआधी या एआय मदतनीसांचा वापर नेमका कसा करावा याबाबत चार गोष्टी सांगणे मला गरजेचे वाटते. माझा अनुभव आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखादा निष्कर्ष काढत असताना, ती माहिती एआयला स्वतः शोधायला सांगण्यापेक्षा ती माहिती एआयला पुरवणे अधिक परिणामकारक, अधिक चांगला निकाल देणारे असते. तसेच एआयकडून माहितीचे पृथक्करण करून घेत असताना त्या माहितीचा दर्जा तपासणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही एआयला जेवढी अचूक, नेमकी माहिती द्याल तेवढी चांगली उत्तरे तुम्हाला मिळतील! आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा - बाजारात एवढे सारे एआय मदतनीस उपलब्ध असताना त्यातला नेमका मदतनीस निवडायचा कसा? ओपन एआयचा चॅट जीपीटी, डीपसीक कंपनीचा आर वन, क्लॉडचा सॉनेट आणि गूगलचा जेमिनी हे सारे एआय मदतनीस वापरल्यानंतर, गूगलचा जेमिनी हा सर्वात अचूक, सविस्तर आणि तपशीलवार उत्तरे देतो, या निष्कर्षाप्रत मी आलो आहे.

आता मी वर उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्द्याकडे जरा विस्ताराने पाहू.

शेअर बाजाराचे ज्ञान वाढवण्यासाठी

मी म्हणेन की शेअर बाजारात कोणताही व्यवहार करण्याआधी शेअर बाजार कसे काम करतो, त्यातील गुंतवणुकीचे प्रकार कोणते, त्यात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक संज्ञेचा अर्थ काय हे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्विंग ट्रेडिंग आणि लाँग टर्म ट्रेडिंग यातील फरक तुम्हाला माहीत नसेल, Price per earning ratio, Current ratio किंवा Earnings per share या संज्ञांचा अर्थ तुम्ही जाणत नसाल, किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्स या गुंतवणूक प्रकारांमधल्या धोक्यांचे ज्ञान तुम्हाला नसेल, तर शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा शुद्ध वेडेपणा होय. शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एआयचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो. अवघड संकल्पना सोदाहरण सोप्या करून सांगणे ही एआयची खासियत आहे. मी काम करत असलेल्या संगणक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या संकल्पना समजून घ्यायलाही मी एआयचा वापर करतो. एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे या संकल्पना तुमच्या मातृभाषेत अर्थात मराठीत समजावून देण्याची विनंती तुम्ही एआयला करू शकता. एआय वापरत असलेली मराठी अगदी मराठी पुस्तकांइतकी नैसर्गिक, प्रवाही नसली, तरी ती निर्दोष आणि अचूक आहे, असा माझा अनुभव आहे.

'शेअर बाजारातील सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पना मला मराठीत समजावून दे' असा आदेश एआयला दिल्यावर त्याने दिलेले उत्तर पाहा -

https://ibb.co/yBnvdtpB

बाजाराचा लघुकालीन, दीर्घकालीन कल जाणून घेण्यासाठी

शेअर बाजारात उद्या, पुढच्या आठवड्यात, पुढच्या सहा महिन्यांत काय घडेल हे आपण एआयला विचारू शकतो. उदा., आज दिवसभरात घडलेल्या घटना पाहता, उद्या बाजाराचा कल काय असेल हे जाणून घेण्यासाठी आपण एआयचा वापर करू शकतो. मी हा लेख लिहीत असलेल्या तारखेचे - म्हणजे २१ सप्टेंबरचे उदाहरण घेऊ. आज रविवार आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाचे शुल्क १००० अमेरिकी डॉलर्सवरून थेट एक लाख अमेरिकी डॉलर्सवर नेण्याची घोषणा केली आहे. तेव्हा, या बातमीची प्रतिक्रिया उद्या बाजार कशी देईल असा प्रश्न आपण चॅटजीपीटीला विचारल्यास, त्याचे उत्तर काहीसे असे मिळते.

https://ibb.co/NnbXkqPK

एकूण जागतिक परिस्थिती पाहता किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात घडत असलेल्या घडामोडी पाहता, पुढचे काही महिने या क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी कशी असेल, समभागांच्या किमती खाली जातील की वाढतील, वाढ किंवा घट झाली तर ती किती टक्के होईल? असे प्रश्नही आपण एआयला विचारू शकतो.

पुढील सहा महिन्यांत औषधनिर्मिती करणार्‍या भारतीय कंपन्यांची कामगिरी शेअर बाजारात कशी असेल? असे विचारल्यास त्याचे उत्तर काहीसे असे मिळते -

https://ibb.co/3mX5wXrm

एका विशिष्ट कंपनीत गुंतवणूक करावी की नाही, हे जाणून घेण्यासाठी

प्रत्येक गुंतवणूकदार शेअर बाजारातील चांगल्या कंपन्या निवडण्यासाठी काही विशिष्ट निकष लावतो, काही चाळण्या लावतो. मात्र आपण निवडलेली कंपनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे की नाही याची खातरी आपण एखाद्या एआय मदतनीसाकडून करून घेऊ शकतो. काही वेळा असेही घडते की आपण निवडलेल्या कंपनीची एकूण कामगिरी चांगली असली, तरी तिच्यात गुंतवणूक करण्यासाठी सध्याची वेळ योग्य नसते. तर काही वेळा, कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य असते, थोड्या वेळात झटपट नफा मिळवून देण्यासाठी तिचा फारसा उपयोग नसतो. त्यामुळे आपण कष्टाने कमावलेला पैसा एखाद्या कंपनीत गुंतवण्याआधी, एखाद्या एआय मदतनीसाकडून त्या कंपनीची शहानिशा करून घेणे महत्त्वाचे आहे.

एखाद्या कंपनीत गुंतवणूक करावी की नाही? हा प्रश्न विचारण्याआधी मी त्या कंपनीची सगळी माहिती गोळा करतो. मी Screener (https://www.screener.in/) व Google Finance (https://www.google.com/finance/) या संकेतस्थळांवरून (Websitesवरून) ही माहिती मिळवतो. त्यानंतर ही माहिती मी स्वतः बनवलेल्या एका टेम्प्लेटमध्ये भरतो. या टेम्प्लेटमध्ये मी कंपनीचा आर्थिक ताळेबंद (उत्पन्न व नफा), कंपनीची एकूण मालमत्ता व तिच्यावरील कर्जे, कंपनीकडे असलेल्या रोख रकमेची माहिती (कॅश फ्लो) इत्यादी भरतो. त्याबरोबरच कंपनीची माहिती संक्षिप्तपणे दिल्यास (ती कोणत्या क्षेत्रात आहे, तिचा विस्तार केवढा आहे, ती किती वर्षे व्यवसायात आहे), एआय त्या कंपनीचे मूल्यमापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, असा माझा अनुभव आहे.

मी वापरत असलेले टेम्प्लेट असे आहे -

OK, now let's analyse the financial data of a company that is <<>> All statements are annual and all numbers are in Indian rupees.

Here is some basic information about company’s stock:
<<>>
Here are the financial details:
Income statement
<<>>
Balance sheet
<<>>
Cash flow
<<>>
Based on this info, would you recommend buying this stock?

या टेम्प्लेटमधील <<< अबक >>> अशा पद्धतीने दर्शवलेली माहिती आपण screener.in व google.com/finance या संकेतस्थळांवरून (Websitesवरून) कशी भरायची, ते आता पाहू.

सगळ्यात प्रथम आपण screener.in ही वेबसाइट उघडू आणि तिथे आपल्याला हवी ती कंपनी शोधू, उदा. TCS.

image1

https://ibb.co/0kf2VTz

इथे 1 या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे कंपनीची थोडक्यात करून दिलेली ओळख आहे. ही माहिती कॉपी करून आपण <<>> इथे चिकटवू. नंतर 2 ह्या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे कंपनीच्या स्टॉकची सद्यस्थिती दर्शवणारी माहिती आहे. ती आपण कॉपी करून <<>> इथे चिकटवू.

नंतर आपण जाऊ google.com/finance/ ह्या वेबसाइटवर आणि हीच कंपनी तिथे शोधू.

image2

https://ibb.co/tPnFfL43

इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण (1 या आकड्याने दर्शवलेल्या) Annual ह्या टॅबवर क्लिक करू. याचे कारण असे की आपल्याला मागच्या पाच वर्षांची आर्थिक कामगिरी पाहायची आहे, मागच्या पाच तिमाहींची नव्हे. नंतर 2 या आकड्याने दर्शवलेली माहिती (कंपनीचा मागील आर्थिक वर्षातील ताळेबंद) कॉपी करून आपण <<>> इथे चिकटवू. 3 ह्या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे कंपनीची एकूण मालमत्ता व तिच्यावरील कर्जे यांची माहिती आहे. ती आपण कॉपी करून <<>> इथे चिकटवू. 4 ह्या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे मागील आर्थिक वर्षात कंपनीने कमवलेल्या व तिने खर्च केलेल्या रोख रकमेची माहिती देणारा तक्ता आहे. तो आपण कॉपी करून <<>> इथे चिकटवू.

हे टेम्प्लेट वापरून 'सिप्ला' कंपनीत गुंतवणूक करावी की नाही, हे एआयला विचारायचे झाले, तर तो प्रश्न काहीसा असा बनेल -

file4

https://ibb.co/Lzc9206x

या प्रश्नाला ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी गूगलच्या जेमिनीने दिलेले उत्तर पाहा -

file5

https://ibb.co/RW7kN3q

हे फक्त एक उदाहरण झाले. मला असे वाटते की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात, तरी तुमचे काम अधिक वेगवान, अधिक परिणामकारक, अधिक अचूक होण्यासाठी तुम्ही एआयचा वापर करू शकता. अर्थात हे करताना फक्त खातरीशीर एआय साधनांचाच वापर करणे, एआय मदतनिसाने दिलेली उत्तरे इतर भरवशाच्या माहितीस्रोतांशी ताडून पाहणे आणि एआय मदतनीस चुका करू शकतात हे नेहमी ध्यानात ठेवणे ही काळजी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी आणि ती वापरून आपले आयुष्य अधिक सोपे, अधिक संपन्न, अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

प्रतिक्रिया

एक_वात्रट's picture

20 Oct 2025 - 1:10 pm | एक_वात्रट

लेखात अनेक चुका आहेत. मी पाठवला तसा लेख दिसत नाही. मी संपादन करायचा प्रयत्न केला, पण मला परवानगी नाही. संपादक मला परवानगी देतील काय?

प्रशांत's picture

20 Oct 2025 - 1:25 pm | प्रशांत

लेख संपादन करुन येथे टाका, सा स मुळ लेखात बदल करतील

चॅट जीपीटी हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मदतनीस २२ नोव्हेंबर २०२२ रोजी वापरकर्त्यांसाठी खुला करण्यात आला आणि संगणक क्षेत्रातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. विश्वास बसत नाही, पण येत्या काही दिवसांत या मदतनीसाला तीन वर्षे पूर्ण होतील. आज तीन वर्षांनंतर थोडे मागे वळून पाहिले तर असे दिसते की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सगळ्या जगाला दिलेला धक्का आता बराचसा ओसरला आहे आणि चॅट जीपीटी आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता मदतनिसांनी उडवलेला धुरळा आता बराचसा खाली बसला आहे. मी म्हणेन, आज तीन वर्षांनंतर, हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, ते काय करू शकते, काय करू शकत नाही आणि त्यातले धोके कोणते याबाबत पुरेशी स्पष्टता आता आली आहे. एक गंमत म्हणून, नवीन आलेले तंत्रज्ञान वापरून पाहायचे म्हणून या साधनाचा वापर करणारे बरेचसे लोक आता त्यापासून दूर गेले आहेत आणि ज्यांना खरोखरच या मदतनिसाकडून काही काम करून घ्यायचे आहे, तेच लोक आता त्याचा वापर करताना दिसतात. मात्र म्हणून नव्याची नवलाई आता संपली आहे असे जर कोणी म्हटले तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल, कारण आज चॅट जीपीटी हे संकेतस्थळ जगातील पहिल्या पाच प्रमुख संकेतस्थळांपैकी एक बनले आहे, जी एक अतिशय अवघड आणि त्यामुळेच कौतुकास्पद गोष्ट आहे.

कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की त्याचा ते बनवणाऱ्यांना अपेक्षित, ते बनवणाऱ्यांना पूर्णपणे अनपेक्षित, चांगला, वाईट अशा अनेक प्रकारे वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान तरी याला अपवाद कसे असेल? या तंत्रज्ञानाचा वापर कर्करोग अर्थात कॅन्सर शोधण्यासाठी, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी, फसवणुकीचे प्रकार शोधण्यासाठी, नवीन औषधे शोधण्यासाठी आणि हवामानाचे अचूक अंदाज बांधण्यासाठी होत आहे, त्याचबरोबर, लष्करी उपकरणांची मारकक्षमता वाढवण्यासाठी, अतिधोकादायक ड्रोन बनवण्यासाठी, सायबर हल्ले करण्यासाठी, दिशाभूल करणारी, खोटी, माहिती पसरवण्यासाठी, बनावट छायाचित्रे, चित्रफिती बनवून लोकांना फसवण्यासाठीही होत आहे.

अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी चर्चा करणे हा या लेखाचा उद्देश नाही. मी स्वतः एक संगणक अभियंता आहे, तसेच मला प्रवासाचीही प्रचंड आवड आहे. या दोन्ही ठिकाणी मी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करतो. मात्र या दोन क्षेत्रांविषयीही मी बोलणार नाही. मी बोलणार आहे ते एका तिसऱ्याच क्षेत्राविषयी, शेअर बाजाराविषयी. मी शेअर बाजारात माहिती मिळवण्यासाठी आणि त्या माहितीतून निष्कर्ष काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करतो, हा या लेखाचा विषय आहे.

शेअर बाजारात मी प्रवेश केला तो साधारण वर्षभरापूर्वी. नोकरीला लागल्यापासून मी कर वाचवण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून काही म्युच्युअल फंड विकत घेत होतो, एखाद्या कंपनीचे शेअर मात्र मी कधीही विकत घेतले नव्हते. पण सुमारे चार वर्षांपूर्वी मी ते सगळे म्युच्युअल फंड तडकाफडकी विकून टाकण्याचा आणि आलेले पैसे जमिनींमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करावी या विचाराने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि मी शेअर बाजारात पुनर्प्रवेश करण्याचे ठरवले. मी शेअर बाजाराविषयी माहिती मिळवत असताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय होत होता, तेव्हा साहजिकच या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी कसा वापर करता येईल याचा विचार मी सुरू केला आणि त्यातून चुकतमाकत, काही प्रयोग करत शेवटी एका निश्चित अशा योजनेपर्यंत मी पोहोचलो. शेअर बाजारात, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात मी साधारणतः १४% परतावा मिळवला आहे आणि या यशाचा मोठा वाटा मी एआयला देतो.

आज ढोबळमानाने मी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर शेअर बाजारात खालील प्रकारे करतो:

  • शेअर बाजाराचे ज्ञान वाढवण्यासाठी
  • बाजाराचा लघुकालीन, दीर्घकालीन कल जाणून घेण्यासाठी
  • एका विशिष्ट कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हे जाणून घेण्यासाठी

पुढे जाण्याआधी या एआय मदतनीसांचा वापर नेमका कसा करावा याबाबत चार गोष्टी सांगणे मला गरजेचे वाटते. माझा अनुभव आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखादा निष्कर्ष काढत असताना, ती माहिती एआयला स्वतः शोधायला सांगण्यापेक्षा ती माहिती एआयला पुरवणे अधिक परिणामकारक, अधिक चांगला निकाल देणारे असते. तसेच एआयकडून माहितीचे पृथक्करण करून घेत असताना त्या माहितीचा दर्जा तपासणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही एआयला जेवढी अचूक, नेमकी माहिती द्याल तेवढी चांगली उत्तरे तुम्हाला मिळतील! आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा: बाजारात एवढे सारे एआय मदतनीस उपलब्ध असताना त्यातला नेमका मदतनीस निवडायचा कसा? ओपन एआयचा चॅट जी पी टी, डीपसीक कंपनीचा आर वन, क्लॉडचा सॉनेट आणि गुगलचा जेमिनी हे सारे एआय मदतनीस वापरल्यानंतर, गुगलचा जेमिनी हा सर्वात अचूक, सविस्तर आणि तपशीलवार उत्तरे देतो, या निष्कर्षाप्रत मी आलो आहे.

आता मी वर उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्याकडे जरा विस्ताराने पाहू.

शेअर बाजाराचे ज्ञान वाढवण्यासाठी

मी म्हणेन की शेअर बाजारात कोणताही व्यवहार करण्याआधी शेअर बाजार कसा काम करतो, त्यातील गुंतवणुकीचे प्रकार कोणते, त्यात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक संज्ञेचा अर्थ काय हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्विंग ट्रेडिंग आणि लॉन्ग टर्म ट्रेडिंग यातील फरक तुम्हाला माहीत नसेल, Price per earning ratio, Current ratio किंवा Earnings per share या संज्ञांचा अर्थ तुम्ही जाणत नसाल, किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्स या गुंतवणूक प्रकारांमधल्या धोक्यांचे ज्ञान तुम्हाला नसेल, तर शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा शुद्ध वेडेपणा होय. शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एआयचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो. अवघड संकल्पना सोदाहरण सोप्या करून सांगणे ही एआयची खासियत आहे; मी काम करत असलेल्या संगणक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या संकल्पना समजून घ्यायलाही मी एआयचा वापर करतो. एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे या संकल्पना तुमच्या मातृभाषेत अर्थात मराठीत समजून देण्याची विनंती तुम्ही एआयला करू शकता. एआय वापरत असलेली मराठी अगदी मराठी पुस्तकांइतकी नैसर्गिक, प्रवाही नसली तरी ती निर्दोष आणि अचूक आहे, असा माझा अनुभव आहे.

'शेअर बाजारातील सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पना मला मराठीत समजावून दे' असा आदेश एआयला दिल्यावर त्याने दिलेले उत्तर पहा:

https://ibb.co/yBnvdtpB

बाजाराचा लघुकालीन, दीर्घकालीन कल जाणून घेण्यासाठी

शेअर बाजारात उद्या, पुढच्या आठवड्यात, पुढच्या सहा महिन्यांत काय घडेल हे आपण एआयला विचारू शकतो. उदा., आज दिवसभरात घडलेल्या घटना पाहता, उद्या बाजाराचा कल काय असेल हे जाणून घेण्यासाठी आपण एआयचा वापर करू शकतो. मी हा लेख लिहीत असलेल्या तारखेचे, म्हणजे २१ सप्टेंबरचे उदाहरण घेऊ. आज रविवार आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाचे शुल्क १००० अमेरिकी डॉलर्सवरून थेट एक लाख अमेरिकी डॉलर्सवर नेण्याची घोषणा केली आहे. तेव्हा, या बातमीची प्रतिक्रिया उद्या बाजार कशी देईल असा प्रश्न आपण चॅटजीपीटीला विचारल्यास, त्याचे उत्तर काहीसे असे मिळते.

https://ibb.co/NnbXkqPK

एकूण जागतिक परिस्थिती पाहता किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात घडत असलेल्या घडामोडी पाहता, पुढचे काही महिने या क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी कशी असेल, समभागांच्या किमती खाली जातील की वाढतील, वाढ किंवा घट झाली तर ती किती टक्के होईल, असे प्रश्नही आपण एआयला विचारू शकतो.

पुढील ६ महिन्यांत औषधनिर्मिती करणा-या भारतीय कंपन्यांची कामगिरी शेअर बाजारात कशी असेल असे विचारल्यास त्याचे उत्तर काहीसे असे मिळते:

https://ibb.co/3mX5wXrm

एका विशिष्ट कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हे जाणून घेण्यासाठी

प्रत्येक गुंतवणूकदार शेअर बाजारातील चांगल्या कंपन्या निवडण्यासाठी काही विशिष्ट निकष लावतो, काही चाळण्या लावतो. मात्र आपण निवडलेली कंपनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे की नाही याची खात्री आपण एखाद्या एआय मदतनीसाकडून करून घेऊ शकतो. काही वेळा असेही घडते की आपण निवडलेल्या कंपनीची एकूण कामगिरी चांगली असली, तरी तिच्यात गुंतवणूक करण्यासाठी सध्याची वेळ योग्य नसते. तर काही वेळा, कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य असते, थोड्या वेळात झटपट नफा मिळवून देण्यासाठी तिचा फारसा उपयोग नसतो. त्यामुळे आपण कष्टाने कमावलेला पैसा एखाद्या कंपनीत गुंतवण्याआधी, एखाद्या एआय मदतनीसाकडून त्या कंपनीची शहानिशा करून घेणे महत्त्वाचे आहे.

एखाद्या कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हा प्रश्न विचारण्याआधी मी त्या कंपनीची सगळी माहिती गोळा करतो. ही माहिती मी Screener (https://www.screener.in/) व Google Finance (https://www.google.com/finance/) या संकेतस्थळांवरून (Websites) मिळवतो. त्यानंतर ही माहिती मी स्वतः बनवलेल्या एका टेम्प्लेटमध्ये भरतो. या टेम्प्लेटमध्ये मी कंपनीचा आर्थिक ताळेबंद (उत्पन्न व नफा), कंपनीची एकूण मालमत्ता व तिच्यावरील कर्जे, कंपनीकडे असलेल्या रोख रकमेची माहिती (कॅश फ्लो) इत्यादी भरतो. त्याबरोबरच कंपनीची माहिती संक्षिप्तपणे दिल्यास (ती कोणत्या क्षेत्रात आहे, तिचा विस्तार केवढा आहे, ती किती वर्षे व्यवसायात आहे), एआय त्या कंपनीचे मूल्यमापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, असा माझा अनुभव आहे.

मी वापरत असलेले टेम्प्लेट असे आहे:

OK, now let's analyse the financial data of a company that is **Company info copied from screener.in** All statements are annual and all numbers are in Indian rupees.

Here is some basic information about company’s stock:
**Stock information copied from screener.in**
Here are the financial details:
Income statement
**Income statement copied from Google finance website**
Balance sheet
**Balance sheet copied from Google finance website**
Cash flow
**Cash flow copied from Google finance website**
Based on this info, would you recommend buying this stock?

या टेम्प्लेटमधील **अबक** अशा पद्धतीने दर्शवलेली माहिती आपण screener.in व google.com/finance या संकेतस्थळांवरून (Websites) कशी भरायची ते आता पाहू.

सगळ्यात प्रथम आपण screener.in ही वेबसाईट ऊघडू आणि तिथे आपल्याला हवी ती कंपनी शोधू, उदा. TCS.

https://ibb.co/0kf2VTz

इथे 1 या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे कंपनीची थोडक्यात करून दिलेली ओळख आहे. ही माहिती कॉपी करून आपण **Company info copied from screener.in** इथे चिकटवू. नंतर 2 ह्या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे कंपनीच्या स्टॉकची सद्यस्थिती दर्शवणारी माहिती आहे. ती आपण कॉपी करून **Stock information copied from screener.in** इथे चिकटवू.

नंतर आपण जाऊ google.com/finance/ ह्या वेबसाईटवर आणि हीच कंपनी तिथे शोधू.

https://ibb.co/tPnFfL43

इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण (1 या आकड्याने दर्शवलेल्या) Annual ह्या टॅबवर क्लिक करू. याचे कारण असे की आपल्याला मागच्या पाच वर्षांची आर्थिक कामगिरी पहायची आहे, मागच्या पाच तिमाहींची नव्हे. नंतर 2 या आकड्याने दर्शवलेली माहिती (कंपनीचा मागील आर्थिक वर्षातील ताळेबंद) कॉपी करून आपण **Income statement copied from Google finance website** इथे चिकटवू. 3 ह्या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे कंपनीची एकूण मालमत्ता व तिच्यावरील कर्जे यांची माहिती आहे. ती आपण कॉपी करून **Balance sheet copied from Google finance website** इथे चिकटवू. 4 ह्या आकड्याने दर्शवलेली माहिती म्हणजे मागील आर्थिक वर्षात कंपनीने कमवलेल्या व तिने खर्च केलेल्या रोख रकमेची माहिती देणारा तक्ता आहे. तो आपण कॉपी करून **Cash flow copied from Google finance website** इथे चिकटवू.

हे टेम्प्लेट वापरून "सिपला" कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हे एआयला विचारायचे झाले, तर तो प्रश्न काहीसा असा बनेल:

https://ibb.co/Lzc9206x

या प्रश्नाला ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी गुगलच्या जेमिनीने दिलेले उत्तर पहा:

https://ibb.co/RW7kN3q

हे फक्त एक उदाहरण झाले. मला असे वाटते की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी, तुमचे काम अधिक वेगवान, अधिक परिणामकारक, अधिक अचूक होण्यासाठी तुम्ही एआयचा वापर करू शकता. अर्थात हे करताना फक्त खात्रीशीर एआय साधनांचाच वापर करणे, एआय मदतनीसाने दिलेली उत्तरे इतर भरवशाच्या माहितीस्त्रोतांशी ताडून पाहणे आणि एआय मदतनीस चुका करू शकतात हे नेहमी ध्यानात ठेवणे ही काळजी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी आणि ती वापरून आपले आयुष्य अधिक सोपे, अधिक संपन्न, अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

मारवा's picture

21 Oct 2025 - 9:00 am | मारवा

तुम्ही एखादा शेअर घेतला आणि सर्व अभ्यास करूनही दुर्दैवाने तुम्हाला लॉस झाला तर तुम्ही काय करता ? तुमची रिस्क मॅनेजमेंट कशी आहे ?
1. Stop loss किती percent चा लावता? की लावत नाही ?
2.एकूण समजा 100 रुपये भांडवल आहे तर ते किती शेअर मध्ये विभागणी करता .
3 यशस्वी आहोत की नाही हे FD च्या परताव्याचा criteria लावून तुलना करून ठरवता की अजून काही ?
4 non financial resources म्हणजे अमूल्य वेळ, आरोग्य, वीज, computer इत्यादि मुख्य म्हणजे मानसिक योगदान ते खर्च म्हणून गृहीत धरतात का ? म्हणजे oportunity cost मध्ये की इतका वेळ इतकी मानसिक ऊर्जा समजा दुसरीकडे दिली बाजारा ऐवजी तर परतावा काय मिळेल ? असा काही विचार आहे का ?
जाणून घ्यायला आवडेल.

श्वेता२४'s picture

21 Oct 2025 - 10:01 am | श्वेता२४

एआय चा वापर शेअर बाजारात करत आहे. काही नवीन मुद्दे कळले. त्याचाही वापर करून बघेन. अर्थातच ए आय वर पूर्णपणे विसंबून राहत नाही. सध्या दुरूनच निरीक्षण करणे चालू आहे. माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.

श्वेता व्यास's picture

1 Nov 2025 - 2:35 pm | श्वेता व्यास

उत्तम KT

सुखी's picture

2 Nov 2025 - 2:39 pm | सुखी

माहितीपूर्ण लेख

स्वधर्म's picture

3 Nov 2025 - 6:35 pm | स्वधर्म

आपण दिलेले संदर्भ व दुवे सवडीने पाहीन, पण लेख आवडला. तुंम्ही अगदी मूलभूत पातळीला ए आय चा वापर शेअर बाजारासाठी कसा करावा, हे उत्तम समजाऊन दिले आहे. आपण जमिनीमध्ये गुंतवलेले पैसे काढून परत शेअर बाजारात गुंतवत आहात का? तो निर्णय खूप रोचक असणार.

मी खूप खूप उशीराने शेअर बाजारात पैसे गुंतवले व अजिबात सक्रीय नसल्याने सध्या कॉफी बीन प्रकारचे इन्व्हेस्टिंग करत आहे. शेअर घेतले आणि ठेऊन दिले असे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Nov 2025 - 12:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी कृ बु चा उपयोग ह्यावर अजुन विचरच करतो आहे, पण वापर केला नाही. या लेखात दिलेल्या काही टिप्स वापरुन बघतो. १५% पेक्षा जास्त परतावा मिळाला तर अजुन काय पाहीजे.

सुबोध खरे's picture

5 Nov 2025 - 10:11 am | सुबोध खरे

चढत्या बाजारात सर्वच बुद्धिमत्ता नैसर्गिक किंवा कृत्रिम उत्तम परतावा देतात.

पडत्या बाजारात यापैकी किती टिकून राहतात हे पाहणे रोचक ठरेल.

बाजार हा बऱ्यापैकी मानवी भावभावनांवर अवलंबून आहे आणि अजून तरी कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी भावभावनांचा तळ गाठता आलेला नाही

त्यामुळे पडत्या बाजारात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून असणारे किती टिकून राहतात

आणि

त्यापैकी किती प्रामाणिकपणे आपल्या जखमा उघड्या करून दाखवतात हे पाहणे रोचक ठरेल.