दिवाळी अंक २०२५ - उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद - लेख

नूतन's picture
नूतन in दिवाळी अंक
21 Oct 2025 - 12:00 am

उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद

नमस्कार मंडळी! चक्रावलात ना? माझीदेखील तीच गत आहे. पण सावकाशपणे हे शब्द वाचलेत, तर तुम्हाला आठवेल की अतिशय लोकप्रिय आणि लयपूर्ण अशा 'राधाधर मधुमिलिंद जय जय' या नाट्यपदातील हे शब्द आहेत.

प्रत्येक रसिक मराठी मनात नाट्यसंगीतासाठी नेहमीच एक कोपरा राखीव असतो, माझ्याही आहे. अगदी शाळकरी वयापासून मी नाट्यसंगीत ऐकत आहे. मनात रेंगाळत राहणाऱ्या चाली, ठेका, लयकारी आणि ताना‌ सारं काही कानात - मनात साठवून ठेवलं आहे. हे सारं इतकं प्रभावी आहे की नाट्यपदाचे शब्द काय आहेत, ‌याविषयी आपण फारसा विचार करत नाही.

जुनं सिनेसंगीत (१९७०पूर्वीचं म्हणायला‌ हरकत नाही) हादेखील माझ्या जिव्हाळ्याचा विषय. अतिशय अर्थपूर्ण, भावनेने भरलेल्या या गीतांमधले शब्द आणि अर्थ समजायला तुलनेने तसे सोपे. माझी खोड अशी की शक्यतो गीताचा अर्थ समजून घ्यायचा, प्रसंग समजून घ्यायचा. कारण त्यामुळे ते गीत मनाला अधिक भिडतं, अशी‌ आपली माझी समजूत आणि अनुभवदेखील! आता खोड म्हटली की.. म्हणतात ना मेल्याशिवाय जात नाही.. त्यामुळे वर्षानुवर्षं आवडीने ऐकलेल्या नाट्यपदांनी मात्र मला जेरीस आणलं. एकतर मला हे कायम कोडं आहे की नाट्यपदांतील शब्द इतके कठीण आणि विचित्र का असतात? कधीकधी तर ‌ते वृत्तात बसणारेसुद्धा नसतात. त्यांचे संदर्भ काय? नाट्यप्रसंगाशी ते कसे निगडित असतात? असे शब्द चालीत बसवायचे, त्याला सुयोग्य संगीत साज चढवायचा ! किती कठीण आहे ! पण तरीही या पदांनी त्या त्या काळी अमाप लोकप्रियता तर मिळवलीच‌, आणि त्यांची शतकोत्तर यशस्वी वाटचाल सुरू आहे.

तर पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे वळते. शीर्षकात लिहिलेल्या या आणि अशा शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा मी प्रयत्न केला, करते आहे..
वाचनातून, संशोधनातून मला जे काही उमजलं, ते मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. यासाठी मला आवडणारी काही पदं मी निवडली आहेत, त्यांच्याविषयी मी इथे लिहिणार आहे.

कोणत्याही संगीत नाटकाची सुरुवात होते ती नांदीने. तेव्हा आपणही नांदीनेच सुरुवात करू या.
ही नांदी आहे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या 'संगीत मानापमान'मधील, ज्याला स्वरसाज चढवला आहे गोविंदराव टेंबे यांनी.

नमन नटवरा

नमन नटवरा विस्मयकारा। आत्मविरोधी कुतूहलधरा ॥
विवाह करुनी मदन जाळिला । मग मदनमित्र इंदु सेविला ।
धनवैरागी द्यूत खेळला । गौरीचा तो अंकित झाला ।
परमेशाच्या ऐशा लीला। कविकृष्ण गात विस्मयकारा ॥

प्रथेप्रमाणे आरंभी नटराजाला वंदन करताना कवी म्हणतो, नमन नटवरा.. परंतु हा नटराज मोठा विस्मयकारी आहे, ‌कारण त्याची विरोधाभासी रूपं माझ्या मनात कुतूहल निर्माण करतात.
दक्षकन्या सतीशी भगवान शंकरांचा विवाह झाला. परंतु दक्ष प्रजापतीने‌ केलेल्या यज्ञात भगवान शंकरांना आमंत्रित केलं नाही, म्हणून अपमानित होऊन सतीने यज्ञात उडी घेतली. या घटनेनंतर मुळात विरागी असलेले शंकर पूर्णतः विरक्त झाले. समाधिस्थितीत गेले. या परिस्थितीत सृष्टीच्या कल्याणाचं काय होईल याची चिंता देवादिकांना पडली.
इकडे तारकासुराने सर्वांना त्राही भगवान करून सोडलं होतं. तपामुळे ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊन, 'माझा मृत्यू केवळ शिवपुत्राकडूनच व्हावा' असा वर त्याने प्राप्त केला होता. हे होणं काहीसं अशक्य होतं. ब्रह्मदेवाच्या या वरामुळे तो अजिंक्य झाला होता.
यावर उपाय एकच होता आणि तो म्हणजे भगवान शंकरांना समाधिअवस्थेतून बाहेर काढणं, त्यांच्या हृदयात प्रेमभावना उत्पन्न करणं. कामभावना निर्माण करण्यासाठी मदनाची योजना झाली. या कामात त्याच्यासोबत त्याचा मित्र इंदु म्हणजे चंद्र होता. परंतु शिवाने क्रोधित होऊन मदन जाळिला आणि त्याचा मित्र इंदु याला मस्तकी धारण केला. ही युक्ती असफल ठरली. मग पार्वतीचा जन्म झाला आणि आपल्या घोर तपश्चर्येने तिने श्रीशंकरांना प्रसन्न करून घेतलं. यानंतर शिवपुत्राचा - कार्तिकेयाचा जन्म झाला. त्याने अखेर तारकासुराचा वध केला.

भगवान शिव हे विरक्त आहेत. त्यांना कुठल्याही भौतिक गोष्टीची लालसा नाही. असा‌ हा धनवैरागी, गौरीशी द्यूत अर्थात सारिपाट खेळायला बसला. (असा खेळ, ज्याचा हेतू धनप्राप्ती आहे). पण आपलं सर्वस्व हरून बसला. गौरीचा अंकित झाला. (गुलाम झाला). शिवपुराणात अशी‌ कथा सांगितली आहे. त्यामागचा गर्भितार्थ गहन आहे, त्यामुळे तूर्तास नांदीच्या संदर्भापुरतीच ही कथा.
म्हणून कवी कृष्ण अर्थात कृष्णाजी खाडिलकर म्हणतात की 'परमेश्वराच्या अशा विविध रूपांमुळे, तसंच त्याच्या अद्भुत अशा लीला बघून मी अचंबित होऊन त्या नटराजाला नमन करतो.'

दुसरं पद आहे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या 'संगीत मानापमान'मधीलच

युवतीमना दारुण रण

युवतीमना दारुण रण रुचिर प्रेमसें झालें । रणभजना संसारीं असें अमर मीं केलें ॥

रमणिमनहंसा नर साहससरसीं रमवी । शूर तोचि, विजय तोचि; हें शुभ यश मज आलें ॥

गीताची पार्श्वभूमी - सुरुवातीला गरीब, सामान्य सैनिक असलेल्या, पण आता सेनापती झालेल्या धैर्यधराशी लग्न करणं हे श्रीमंत बापाची लाडकी कन्या असलेल्या भामिनीला सुरुवातीला अजिबात मान्य नव्हतं. पण जसजसा काळ गेला, तसतशी धैर्यधराच्या शौर्याची, व्यक्तिमत्त्वाची तिला जाणीव झाली. त्यानंतर आपल्या मनातले भाव ती या पदातून व्यक्त करते.

ती म्हणते,
युवतीमना - माझ्यासारख्या युवतीला हे दारुण रण म्हणजे घनघोर युद्धाविषयी, रणांगणाविषयी प्रेम निर्माण झालं आहे. रणभजना - रणभूमीवरचा हा कल्लोळदेखील आता जणू नित्याचीच बाब वाटते आहे. रमणीमनहंसा - इथे सुंदर युवतीच्या मनाला हंसाची उपमा दिली आहे. या मनहंसाला जो नर म्हणजे पुरुष साहससरसी - साहस सरोवरात रममाण करतो, अर्थात आपल्या पराक्रमाने तिला भारून टाकतो, अशा शूर पुरुषाला वरण्याची संधी मला मिळाली, हे शुभयश - माझं सौभाग्य आहे.

असंच एक नितांतसुंदर पद म्हणजे प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं 'विलोपले मधुमिलनात या'. नाटक संगीत ब्रह्मकुमारी. लेखक - विश्राम बेडेकर. संगीत - मास्टर दीनानाथ

मधुमिलनांत । या । विलोपले । स्मरभाव काय विलोल हे ॥
सखि बोल जी हो कामना । करूं सार्थ त्यासह यौवना । प्रणयान्विता । दे धन्यता ॥

ब्रह्मकुमारी म्हणजे अहल्या, प्रसिद्ध पंचकन्यांपैकी पहिली.
ब्रह्मदेवाने निर्माण केलेली म्हणून ब्रह्मकुमारी. अत्यंत लावण्यवती असलेल्या या मुलीचा विवाह कोणाशी करावा, अशी ब्रह्मदेवाला चिंता पडली. यासाठी अखेर ज्ञानी आणि ही जबाबदारी टाकण्यायोग्य, सुरक्षित अशा गौतम ऋषींची निवड केली. विवाह झाला आहे, पण अजून पतिपत्नींचं मिलन झालेलं नाही. पण आज आपलं कार्य संपवून गौतम ऋषी आश्रमात परतले आहेत. मध्यंतरीच्या काळात काही घटना घडल्या आहेत. इंद्रदेवाला पहिल्या दिवसापासून अहल्येचा मोह पडला आहे आणि तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मदन आणि चंद्र यांची मदत घेतली आहे. मदनाच्या प्रभावामुळे आश्रमाभोवतीचा निसर्ग बहरला आहेच, तसंच कामाने अहल्या आणि गौतमांनाही प्रभावित केलं आहे, असा प्रसंग आणि त्या वेळी गायलेलं हे पद.

गौतम ऋषी येणार, म्हणून अहल्येच्या सखीने - बृहस्पतीची पत्नी तारा हिने तिला खास पुष्पशृंगार केला आहे. मुळात सुंदर असलेल्या अहल्येच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. गौतम ऋषी मोहित होऊन म्हणतात, "या मधुर मिलनात मी पार बुडून गेलो आहे, लुटला गेलो आहे. (विलोपले). प्रिये, तुझ्या चेहऱ्यावरचे हे चंचल, लोभस भाव (विलोल) मला मोहित करत आहेत (स्मर - मदन, स्मरभाव - प्रणयभाव)
अशा या सुंदर क्षणी तुझी मनोकामना मला मोकळेपणाने सांग. (सखी बोल जी हो कामना)
प्रणयान्विता - प्रणयाने युक्त अशी आपली मनोवस्था झाली आहे, त्यामुळे दोघं मिळून आज
ती कामना सार्थ करू या.
नाटक जरी पौराणिक असलं, तरी पुराणकाळापासून आजतागायत चालू असलेला स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना, मोह आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या व त्यांची उत्तरं याविषयी मांडलं गेलं आहे.

आता ज्या नाट्यपदाविषयी मी लिहिणार आहे, ते पद आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'संन्यस्त खड्ग' या नाटकातील 'सुकतातचि जगिं या'

सुकतातचि जगिं या । जरी कीं। फुलें गळत पाकळी पाकळी । उमलति ना त्याही कलिका । ज्या ॥

परंतु सुंदर कळ्या पाकळ्या । फुलती ही जगिं या । विसर ना हे वैतागीं। तुझिया ॥

तत्कालीन राजकीय परिस्थितीत लिहिलं गेलेलं हे नाटक. अहिंसा तत्त्व आणि हिंसा यावर केलेलं विवेचन. नाटकाची नायिका सुलोचना. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू यात दाखवले आहेत. त्यापैकी एक पैलू दाखवणारं हे पद. पुढे जाण्याआधी नाटकाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी.
शाक्यांचा युवराज सिद्धार्थ गौतम यांनी राज्यत्याग केला आहे. जन्म-मृत्यू-जरा-व्याधी यापासून मुक्तीचा मार्ग त्यांना सापडला आहे. कृषी, कामिनी आणि कृपाण यांपासून दूर राहावे, असा त्यांचा उपदेश आहे. शाक्य राज्यातील अनेक लोक त्यांचे शिष्य झाले आहेत. अगदी सेनापती विक्रमसिंह यांचं मनदेखील त्यांनी वळवलं आहे. आपल्या तळपत्या तलवारीला विक्रमसिंहाने त्यागलं आहे. आसपासच्या राज्यांनीही तथागतांचं शिष्यत्व स्वीकारलं आहे. कोसल देशाच्या राजानेही शिष्यत्व पत्करलं आहे. पण त्याला छेद देऊन त्यांनी शाक्यांवर आक्रमण केलं आहे. नुकताच विक्रमसिंहाचा मुलगा वल्लभ हा शाक्यांचा सेनापती झाला आहे. त्याचा या सुलोचनेशी प्रीतिविवाह झाला आहे. आज त्यांच्या विवाहाला एक वर्ष पूर्ण झालं आहे, म्हणूनच‌ सुलोचनेला आपल्या प्रीतिदेवाची पूजा करायची आहे. त्यासाठी ती पुष्पमाला गुंफते आहे. इतक्यात वल्लभ अचानक येतात. ती लटक्या रागाने रूसून बसते. इतक्यात निरोप येतो आणि कोसलनरेशाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी वल्लभ त्वरेने निघून जातो. शर्थीने लढतो, पण अखेर राजबंदी होतो. कृपणाचा त्याग केलेल्या, संन्यस्त शाक्यराष्ट्रात आक्रमणाला उत्तर देणारं आता कुणी नाही. पराभव अटळ आहे. शरण याल तर वल्लभाला‌ मुक्त करू, अन्यथा शिरच्छेद निश्चित असा संदेश आला आहे. अशा वेळी विक्रमसिंह समरसभा घेतो. यात सुलोचना सैनिक वेषात सुलोचन म्हणून हजर राहते. शरणागती हा‌ मार्ग नाही, असं ठामपणे सांगते. राष्ट्रासाठी रण, मारता मारता मरण. या निर्णयामुळे तिच्या परमप्रिय वल्लभाचा शिरच्छेद होइल, हे तिला नक्कीच माहीत आहे. विक्रमसिंह ‌आता आपलं संन्यस्त खड्ग पुन्हा हातात घेतो आणि ‌युद्धाला सिद्ध होतो. सुलोचन पुन्हा मूळ रूपात येऊन कोमल सुलोचना होते. आपल्या वल्लभासाठी करत असलेल्या हाराची फुलं आता सुकली आहेत.. पण काही हरकत नाही. ही तर जगरहाटी आहे. जन्म आहे तिथे मृत्यू आहे. आज ताजी असलेली फुलं उद्या सुकणारच आहेत. पण म्हणून काय झालं? ही फुलं ‌याच‌ जगात फुलणार आहेत. आपला सुगंध पसरवणार आहेत. मग दु:ख का करायचं? आपण मात्र हे समजून वागलं पाहिजे.
ती फुलं उमलली आहेत तोवरच ती वाहिली पाहिजेत, माळली पाहिजेत. त्याचा सुगंध अनुभवला पाहिजे. लटकं रागवून त्या वेळी आपण वेळ दवडला आणि पुष्पमाला सुकून गेली.
कदाचित ही संधी पुन्हा मिळेल.‌ तेव्हा मात्र ती चूक पुन्हा करायची नाही.

सुरुवातीला उल्लेखलेल्या पदाने आता शेवट करते. हे पद आहे अण्णासाहेब किर्लोस्करांच्या 'संगीत सौभद्र'मधील.

राधाधर मधुमिलिंद जय जय

राधाधर मधुमिलिंद । जय जय रमारमण हरि गोविंद ॥
कालिंदी-तट-पुलिन-लांच्छित सुरनुतपादारविंद, जयजय
उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद, जयजय ॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतितें न निंद, जयजय

हे पद तर आधी म्हटल्याप्रमाणे अशा शब्दांनी भरलं आहे ‌की नुसतं वाचायचं म्हटलं तरी कठीण. मग गाणं तर दूरच‌ राहिलं. तेव्हा पहिलं काम शब्दांचा अर्थ जाणून घेणं. तर सुरू करू या.

राधाधर मधुमिलिंद । जय जय रमारमण हरि गोविंद

राधाधरमधु - राधा अधर मधु. राधेच्या ओठांवरचा मध (अर्थात गोडवा) याकडे एखाद्या मिलिंद म्हणजे भुंग्याप्रमाणे आकर्षित होणाऱ्या श्रीकृष्णाला वंदन करू या.
रमारमण - रमापती, लक्ष्मीपती हरीला, गोपालक अशा गोविंदाला वंदन करू या.

कालिंदी-तट-पुलिन-लांच्छित सुरनुतपादारविंद, जयजय

पुलिंद - रानटी, पर्वतीय जमाती
लांच्छित - सजलेल्या
सुर - देव
नुत - भजणे, भक्ती करणे
पाद - चरण
अरविंद - कमळ
कालिंदीच्या तटावर राहणारा अप्रगत समाज ज्याची भक्ती करतो, ज्या चरणकमलांची देवदेखील पूजा करतात, अशा या रमारमणाला वंदन करू या.

उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद, जयजय ॥

उद्धृत - उचललेला
नग - पर्वत (गोवर्धन)
मध्व - मधु नावाचा असुर, राक्षस. अशी कथा आहे की श्रीविष्णूच्या कानातील मळापासून मधु आणि कैटभ नावाचे दैत्य निर्माण झाले आणि ते ब्रह्मदेवाला मारायला धावून गेले. ब्रह्मदेवाने विष्णूचा धावा केला. विष्णूने अहंकारी आणि क्रूर अशा या दैत्यांचा वध केला.
अरिन्दम - विजयी
अनघ - निर्दोष
कुविंद - विणकर

गोवर्धन पर्वत उचलणारा, मधु नावाच्या दैत्याचा वध करून त्याच्याशी झालेल्या युद्धात विजय प्राप्त करूनही निर्दोष असलेल्या अशा कृष्णाला, तसंच या विश्वाचं महावस्त्र विणणाऱ्या अद्भुत अशा विणकराला वंदन करू या.

गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतितें न निंद, जयजय

गोपसदन - नंदाच्या घरी
गुरु - मोठं, विस्तिर्ण
अलिन्द - अंगण

नंदाघरच्या विस्तीर्ण अंगणात मनसोक्त खेळणाऱ्या या बालगोपालाच्या, या बलवंताने (बळवंत पांडुरंग किर्लोस्कर) केलेल्या स्तुतीला कृपया निंदू नका.
त्या रमारमणाला वंदन करू या.

मंडळी, अत्यंत संपन्न असा हा संगीत ठेवा पिढ्यानपिढ्या टिकून राहावा, या सदिच्छेसाठी माझा हा अल्पस्वल्प प्रयत्न थोडा जरी कामी आला, तरी भरून पावेन.

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रतिक्रिया

केदार भिडे's picture

20 Oct 2025 - 3:35 pm | केदार भिडे

नाट्य संगीतातील शब्द म्हणजे निश्चितच विलक्षण प्रकार आहे आणि तो अतिशय सुंदर प्रकारे समजावून सांगितला आहे . यावर एखादी सुंदर लेखमाला जरूर होईल. शुभेच्छा.

नूतन's picture

20 Oct 2025 - 6:23 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
यावर एखादी सुंदर लेखमाला जरूर होईल.
सहमत

नाट्यपदं कितीही श्रवणीय वाटली तरी बहुतेकदा अर्थ समजत नसल्याने कोड्यात टाकणारी वाटत. आता तुमच्या लेखामुळे त्यातली गंमत समजली. त्या काळातही ती पदे गाणाऱ्या किती कलाकारांना त्याचा अर्थ समजत असेल, कोणास ठाऊक?

नूतन's picture

22 Oct 2025 - 12:52 am | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

श्वेता२४'s picture

22 Oct 2025 - 5:16 pm | श्वेता२४

हे माझे अतीशय आवडते नाट्यगीत...लहानपणी मला देखील या शब्दांचा अजिबात अर्थ कळायचा नाही. नंतर जसे मोठे होत गेलो तशी ही संगीत नाटके पाहिली, वाचली. त्यामुळे त्यांचे अर्थही त्या- त्यावेळी कळत गेले. परंतु मी बऱ्याचदा पाहिले आहे की ही नाट्यगीते कोणत्याही अर्थ समजून घेतल्या विनाच ऐकली किंवा म्हणली जातात. त्याहीपेक्षा संस्कृतप्रचुर भाषेमुळे ती समजण्यास तितकी सोपी देखील नाहीत. आपल्या लेखामुळे या नाट्यपदांचा अर्थ आपण अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून सांगितला आहे त्यामुळे लोकांना अर्थासहित समजणे नक्की शक्य होईल. माहितीपूर्ण लेखन. धन्यवाद.

नूतन's picture

22 Oct 2025 - 7:49 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2025 - 5:05 pm | सुधीर कांदळकर

नाटके कधी आवडली नाहींत. संगीत मात्र आवडले होते. गाण्यांचा अर्थ ठाऊक नव्हता. तो आकर्षक पद्धतीने करून दिल्याबद्दल धन्यवाद.

नूतन's picture

27 Oct 2025 - 9:02 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

युयुत्सु's picture

30 Oct 2025 - 5:31 pm | युयुत्सु

लेख आवडला

नूतन's picture

31 Oct 2025 - 1:37 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

चांगली खोड आहे. अर्थ छान समजाऊन सांगितला आहे

नूतन's picture

1 Nov 2025 - 5:56 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

श्वेता व्यास's picture

31 Oct 2025 - 2:18 pm | श्वेता व्यास

लेख आवडला. वरील सर्वच गीते आवडती आहेत, पण सगळ्यांचाच अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता.

नूतन's picture

1 Nov 2025 - 5:57 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

शेखर काळे's picture

1 Nov 2025 - 7:33 am | शेखर काळे

नाट्यगीत गाताना गायक ओळीच्या शब्दांची मोडतोड करतात किंवा संगीतकार चालीप्रमाणे शब्द हलवतात.
युवतीमना...झाले ऐवजी झाले युवतीमना ... हे एक उदाहरण.

लेख आवडला.

नूतन's picture

1 Nov 2025 - 5:58 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

अप्रतिम!!! प्रिंट काढून कायम साठी ठेवावा इतका सुंदर लेख!!

'राधाधर...' हे अतिशय आवडीचं गीत, ऐकताना शब्द कळेनात तेव्हा गुगल सर्च वैग्रे केलेला. पण अर्थ असा आत्ताच कळला!!

अनेक धन्यवाद!!

नूतन's picture

1 Nov 2025 - 5:58 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार