परदेशवारी १

Primary tabs

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
4 Feb 2022 - 3:36 pm

अमरनाथ ते रामेश्वर , उनाकोटी (आगरतल्ला, त्रिपुरा) ते गंगानगर -बहावलपूर पर्यंत उभा आडवा संपन्न देश बघितला.कधी वाटले नव्हते की साता समुद्रापार परदेशवारी पण नशिबी आहे.आदर्श आईबापां प्रमाणेच आमचा आग्रह की मुलांनी डाँक्टर, इंजिनियर व्हावे पण धाकटी बंडखोर तीने शुद्ध शास्त्र विषय(Pure Science) घेऊन सरळ संशोधना करता विदेशी प्रस्थान केले. आम्हाला परदेश वारीची संधी मिळाली.

करोना जगभर धुमाकूळ घालत होता. सर्व जगाला त्याने गुडघे टेकायला लावले होते. काय विकसीत अन काय विकसनशील सगळ्यांची सारखीच परिस्थिती.सर्व व्यवहार बंद होते.नुकतीच पहिली लाट मंदावली होती, थाबंलेले व्यवहार सुरू करावेत किवां नाही, करावेत तर किती प्रमाणात असा गोंधळ उडाला होता. रस्ते, रेल्वे ,विमान वहातुक संपूर्ण बंद होती एवढच काय खाजगी वाहतुकीवर सुद्धा निर्बंध होते. फार वाईट परिस्थिती,

करोना करोना
जीव आला मेटाकुटी
जन अंतरले एकमेका
दुरावल्या गाठीभेटी
कुणा बाधंले खाटेवर
कुणी निजला घाटावर
करोना करोना
लागल्या आवघ्याले भुका
द्यारे घासतला घास
कुणाच्या तोंडाला पदर
कुणाच्या नशिबी चादर

एक वंदे भारत सोडली तर सर्व हवाई वहातुक बंद.आली गोड बातमी,तारीख ठरली म्हणून तिकीटाची लगबग सुरू झाली.असामान्य परीस्थिती,हौशे,गवशे,नवशे यांनी प्रवास व्यवस्थापनाची जबाबदारी स्वखुशीने उचलली. मग काय विचारता....चौकशीअंती कळाले की फक्त भारतीय हवाई सेवा जेव्हा सुरू होईल तेव्हाच जाता येईल.सरतेशेवटी सेवा सुरु झाली आणी तयारीला लागलो. किती किलो,काय नेता येते, काय प्रतिबंधित वगैरे. पत्ता लिहीलेला टॅग बांधा,प्रत्येक सुटकेस मधे कागदपत्रांच्या फोटोकाँपी टाका,सामान पटकन ओळखता येईल आसे काहितरी करा ,कारण सगळ्याच लाल, निळ्या अन काळ्या ,अनोळखी व्यक्ती कडुन काहीही घेऊ नका, बँकसँक ला छोटे कुलुप लावा आशा एक ना आनेक काळजीच्या स्वरातील सुचना येऊ लागल्या."इमिग्रेशनवर",उत्साही मंडळींनी "माँक " साक्षात्कार घेण्यास सुरवात केली.काय बोलावे, किती बोलावे, तीकडचे नियम, लोकांचे स्वभाव,पोलीसी खाक्या या सर्वच गोष्टींवर बौद्धिक घेतले.एकाने तर चक्क इमिग्रेशन फार्म कसा भराल याची परीक्षाही घेतली. हितचितंकाची मांदियाळी बाकी काय.चितळे,पाटणकर,लक्षमीनारायण,मगनलाल, हल्दिराम सारे जमा झाले,लाडवा करता डिंक, चिवडा,चकल्या,जनमघुट्टी,ग्राईप वाँटर,औषधे सगळ्या गोष्टी जमा झाल्या. थंडीचे स्पेशल कपडे खरेदी केले गेले. डोक्यावर सुटकेस घेऊन वजनाची कसरत सुरू झाली.यातले काढा त्यात टाका आसे जुन्या काळातल्या मतमोजणी सारख्या फेर्‍या सुरू झाल्या. डाँलर,रुपये,रूपये डाँलर डोक्यात फेर धरू लागले.विमा,तीकीट,करोनाची टेस्ट, आतंरजालावर बोर्डिंग पास, स्वास्थ्य फाँर्म ,चेक इन इत्यादी आघाड्या मुलींनी संभाळल्या.आमची अवस्था पहिलटकरणी सारखी. बायको,हितचितंक यांच्या प्रश्नावली, शंका कुशंका यात भरडून निघत कबीरदासजीं म्हणल्या प्रमाणे अस्मादिकांची परिस्थिती,

" दुई पाटन के बीच मे साबूत बचा न कोय।

शेवटी जायचा दिवस आला आणी वऱ्हाड निघाले आमरिकेला. मुलीने "ओला" मागवली, ड्रायव्हरनी सुटकेसेस सँनिटाइज केल्या. आमच्या हातावर सुद्धा आधुनिक गोमुत्र शिंपडले.शुद्धीकरणाची नवीन पद्धत.शेजारी पाजारी खिडकीतूनच "शुभास्ते पंथान सन्तू" म्हणत होते पण डोळ्यात त्यांच्या एक अनामिक भीती "काळजी घ्या सुखरूप जा" आसा संदेश स्पष्ट दिसत होता.ते प्रेम बघून आमचे पण डोळे भरून आले.विमानतळा कडे जाताना महामारीची दहशत स्पष्ट दिसत होती.रस्त्यावर तुरळक चार,दोन चाकी, पादचारी तर नदारद होते.विमानतळावर प्रवाशां पेक्षा सुरक्षारक्षक व इतर कर्मचारीच जास्त होते.

प्रत्येक ठिकाणी अधुनिक गोमुत्र हातावर पडत होते, सुरक्षा निरीक्षण,सामानाचे क्ष किरण परीक्षण, सामानाचे वजन,कोव्हिड टेस्ट इत्यादी अडथळ्यांना पार करताना उच्च रक्तदाब हळुहळू सामान्य होत गेला. तोफांच्या आवाजा प्रमाणेच कानावर शब्द आले "तुमचे विमान गेट नंबर पाच वर येईल तिकडे जाऊन बसा". परीक्षेची धास्ती घेतलेल्या विद्यार्थ्याला सोप्पा पेपर आल्यावर काय वाटेल तीच परिस्थिती आमची.हवाई सुदंरी किंवा सुरक्षा रक्षकांनी काहीच त्रास दिला नाही. जणू म्हणत होते ,जा बाबांनो जा पण सुखरूप परत या. दिवसभर चाललेल्या गडबडीत जेवणाची शुद्ध नव्हती, सर्व ठिक झाल्यानंतर वाटले काहीतरी खावे.पुन्हा एकदा रक्तदाबाने ऊंच उडी घेतली,दोन वडापाव, दोन चहा पाचशे रूपये.

पुणे-दिल्ली-शिकागो आसा विमानाचा प्रवास. गेट नबंर पाच वरून विमान सुटणार होते. "वारंवार उडणारे" (frequent flyer) कोचवर पाय पसरून, कानातल्या कळ्या (Ear buds) घालून डोळे मिटून ध्यानस्थ झाले होते काही पेपर मासिका मधे बुडले होते.काही तर मोबाईल फोन चार्जिंग ला लावून चक्क घोरत होते. काही भेदरलेली कोकरे.जास्त गर्दी नव्हती.चकाचक दुकाने,स्मार्ट,अपटूडेट पोशाखातील विक्रेते,लाइटचा झगमगाट,पण माणुसच माणसा पासुन दुर पळत होता एखादा वन्य प्राणी बघितल्या सारखा.सर्वजण कसल्या तरी दडपणाखाली वावरत असल्याचं भासत होतं.

सुरक्षा रक्षक पाठोपाठ हवाई सुद्र्ंया आणी ब्रिफकेस खरडत येणारे पायलट बघून एका हातात पासपोर्ट, बोर्डिंग पास, RTPCR संभाळत नवशांनी पटापट लाईन तयार केली."वारंवार उडणारे" ,कशाला आले इतक्या लवकर या आविर्भावात आळोखे पिळोखे देत सामान समेटू लागले. एक आजोबा आजींपाशी कटकट करत होते बहुदा त्यांचा मदतनीस (Assistant)आसपास दिसत नव्हता.अगदी रेल्वेच्या हामाला सारखा,गाडी आली तरी पत्ता नाही.सर्व काही बस किंवा रेल्वे स्टेशन सारखेच पण फक्त चकाचक,परीटघडी सारखे.

आम्ही पण लाईनीत शिरलो.सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा दाखवली.फेसमास्क,फेसशिल्ड, पी पी ई किट आणी सँनिटायझरच्या पुड्या प्रवाशांना देत होते जणू सत्कार समारंभात दिल्या जाणाऱ्या श्रीफळ आणी शाल सारखे. नवरदेवा प्रमाणे पी पी ई किट परिधान करत सेल्फी काढून ताबडतोब सोशल मीडियावर पोस्ट करण्यात प्रवासी दंग झाले."अजी म्या ब्रम्ह पाहिले",सारखे एकमेकाना बघत होते.
mipa पि पी ई किट

"सब घोडे बारा टक्के",प्रमाणे पांढरे स्वछ पी पी ई किट फ्री साईझ होते.काटकुळे,ठेंगणे ठुसके,जाडे भरडे सर्वच प्रवासी इग्रंजी सिनेमातल्या झाँम्बी सारखे दिसत होते. लाइटची चकाचौधं नसती तर एखादा जरूर मुर्छित पडला असता.हवाई सुंदरी आपला नेहमीचा हसरा मुखवटा आणी एन नाईन्टीफाईव्ह मास्क चढवून पण संभाळून सर्वाचे स्वागत,मदत करत होत्या.प्रत्येकाच्या सीट वर एक पाकीट आणी दोन छोट्या बिसलेरी पहुडल्या होत्या. थोड्याच वेळात आकाशवाणी सुरू झाली.उदघोषीका अज्ञात ठिकाणावरून सुचना देत होती.कोव्हिड आणी पन्नास टक्के कर्मचारी उपस्थित( नशिब पयलट आणि को- पयलट दोघेहि होते) असल्याने नियमीत सेवा देण्यासाठी आम्ही अक्षम आहोत."असुविधा के लिए खेद है".सीटवर खाण्यापिण्याची पाकीटे बाटल्या ठेवल्या आहेत.काहिही लागले तर पेन्टरी मधून घेण्याची विनंती केली आणी गप्प झाली. जेवण मात्र जागेवर मिळाले. चहा, काँफी, चॉकलेट, वाईन सर्वच गायब होते. रसभरीत विमान प्रवासाची दाखवलेली स्वप्ने "मुंगेरीलाल के हसीन सपनों मे", तबदिल हुये।

पुण्यावरून दिल्लीत पोहचलो.सगळी आपलीच माणसं त्यामुळे दिल्लीतही फारसे काही वेगळे घडले नाही.पहिले पाढे पंचावन्न. सर्वच प्रवास रात्रीचा म्हणून भरपुर झोप काढुन घेतली."आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास" म्हणून हवाई सुद्रयांच्या सेवेबद्दल जास्त न बोललेलेच बरे. तारीख न बदलता एअर इंडिया सकाळी सात वाजता आम्हाला शिकागोला घेऊन पोहोचले.तेव्हांच पुन्हा एकदा हवाई सुंद्रया दिसल्या."ओ हारे" विमानतळ आणी पुणे, दिल्ली येथील विमानतळा मधे खुपच फरक जाणवत होता.ठीक ठिकाणी सुरक्षारक्षिका, हो बहुतेक महिलाच होत्या, अधून मधून बाऊन्सर दिसत होते. पोलीसांचा गणवेश आणी रुबाब बघण्या सारखा होता.भरपूर मार्गदर्शक फलक होते. प्रवासी चोविस तास एकत्र प्रवास केल्यानंतर सुद्धा अनोळखीच वाटत होते.

पुन्हा एकदा रक्तदाब वाढणे सुरू झाले. इमीग्रेशनचा फार्म भरुन पुन्हा लाईनीत लागलो.मख्ख चेहर्‍याच्या श्वेत वर्णीय, स्मार्ट, अधेड वयातील कर्मचारी आपल्या भेदक नजरेने जणू प्रवाशांचा सि टी स्कँन काढतोय आसे वाटले.आमच्या सौ पुढे झाल्या. फोटो, निशाणी डावा आगंठ्याबरोबर बाकीच्या बोटांचे ठसे घेतले.सौ नां काही प्रश्न विचारले. त्याच्या मख्ख चेहर्‍याच्या पाठीमागे दडलेला मिश्कील चेहरा आपली झलक दाखवून गेला. मला वाटते हे लोक चेहरा पाहुन भविष्य सागंणारे ज्योतिषी असावेत.किती पैसे आणलेत,एवढे पुरतील का,सहा महिने कशाला राहाताय वगैरे विचारले पण त्या आगोदरच पासपोर्टवर स्टँप मारला होता. थोडंफार रँगिगं बाकी काय, पण फार काही त्रास नाही दिला. हुश्श.

बेल्टवर येवून सामान घेतले.मोबाईल नेटवर्कशी जोडण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात एक दक्षिण भारतीय युवा जोडपे जवळच उभे होते. माझी धडपड युवकाने ओळखली आणी आपल्या मोबाईल वरून आमच्या जावयाशी संपर्क साधला.आम्हाला बाहेर पर्यंत सोडवण्यासाठी सुद्धा आला.जावईबापू गाडी घेऊन आले होते. बाहेर येताच वजा तीस तापमान, सायं साय करती हवा आणी हाडे गोठवणारी थंडी आमच्या स्वागता साठी सज्ज होती. मिशीगन लेक च्या किनार्‍यावर वसलेले शिकागो "विंडी सिटी" म्हणून पण ओळखले जाते. बाकी स्वामी विवेकानंदांमुळे या शहराचे भारतीयाशीं एक विषेश नाते आहे हे वेगळे सांगायला नकोच.
mipa चिकगो हवाई आड्डा mipa चिकगो हवाई आड्डा
आतापर्यंत ओझं वाटत आसलेले गरम कपडे आता तारणहार वाटू लागले. "जावईबापू, खुशाली नंतर विचारा पहिली गाडी उघडून आम्हाला आत बसू द्या",इती सौ. दातावर दात वाजत होते.सैन्यातील नोकरी मुळे मला अनुभव होता पण सौभाग्यवतीची मात्र परिस्थिती आवघड होती.तीला गाडीत बसवले, सामान अँडजेस्ट केले आणी आम्ही दोघे बसलो. https://drive.google.com/file/d//view?usp=sharing
mipa मिषिगन कडे mipa
पंधरा विस मिनीटे सर्व चुपचाप. गाडी खुपच उबदार असल्याने जीवात जीव आला. शिकागो-मिशीगन -डेट्रॉईट प्रवास सुरू झाला. दोन्हीही बाजुला स्वच्छ शुभ्र बर्फाचे डोंगर. मधून ओला पण काळा कुळकुळीत ओला डांबरी रस्ता. मोठ्ठ्या बंद गाड्या वाहतुक दिव्यांच्या इशाऱ्यावर पळत,थाबंत होत्या.पांडू हवलदार कुठेच दिसत नव्हता. मधेच निळ्या रंगाची "पोलिस क्रुझर" भरधाव वेगात पळताना दिसत होती."पहीली पोलिस क्रुझर १८९९ मधे रस्त्यावर आली. आताचे माँडेल १९३०-३५ च्या दरम्यान बनवलेआहे यात फर्स्ट एड किट,फायर फायटिंग सामुग्री बरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो जेणेकरून कमीत कमी वेळात मदत पुरवली जाऊ शकते. यानां पोलिस इन्टरसेप्टर, पेट्रोल (गस्ती) कार,प्राँल कार(prowl car) रेडिओ मोटार गस्ती कार ( radio motor patrol (RMP) ) आसेही म्हणतात." इती जावई. इथे आतंराज्यीय महामार्गाची ओळख नबंरा वरून म्हणजे ५५,५६,१६५ आशी आहेत. याला नंबर माईल सिस्टम म्हणतात. मिशीगन मधे रस्ते नाईन माईल, टेन माईल, झिरो माईल वगैरे नावाने ओळखले जातात. मला ही सिस्टीम जाम आवडली. नावावरून राजकारण होउच शकत नाही ,अर्थात करणारे करू शकतात , जसे झिरो माईलला कुणी म्हणेल सिफर किंवा शुन्य नाव द्यावे. प्रत्येक लेन ची वेग मर्यादा ठरलेली असते आणि जागोजागी तसे फलक लावण्यात आले असून लेन शिस्त काटेकोरपणे पाळली जाते.

ggl सौजन्य गुगल मानचित्र, आभार mipa
( डेट्टरऑईट चिकागो मर्ग नम्बर २०)
आगोदरच आम्ही साडेबारा हजार कि मी हवाई प्रवास करून आलो होतो. सर्व प्रवास रात्रीचाच होता म्हणून माकूल झोप झाली. बरेच वर्षानी इतका लाबंवर प्रवासाचा योग उत्साह उतू चालला होता.जवळपास चारशे कि मी चा प्रवास बाय रोडने करायचा होता. वातानुकूलित, प्रशस्त SUV असल्याने आरामशीर प्रवास होणार यात शंकाच नव्हती. गाडी सत्तर,पंच्च्याहत्तर मैल, साधारण शभंर ते सव्वाशे कि मी वेगाने पळत होती.लेन डिसीप्लिन,मार्किंग,वहातुक दिवे आणी स्थान आणी दिशादर्शक फलक,सर्व्हिस रोड आणी रोडचे नंबर ह्यावर विषेश जोर होता. खड्डे सुद्धा काही ठिकाणी दिसले परंतू बरोबरच दुरूस्ती लवकरच सुरू होणार असल्याच्या खुणा दिसत होत्या. चार साडे चार तास लागणार होते. शिकागो डाउन टाऊन मुंबईतल्या एखाद्या उपनगरा सारखेच वाटत होते. नरीमन पाँईट सारख्या उचंच उंच इमारती, गर्दीने भरलेले रस्ते, मोठे मोठे होर्डिंग्ज आणी सुसाट पळणार्‍या गाड्या. पोटातले पाणी पण हालत नव्हते, बाहेच्या थंडीचा मागमूसही नव्हता. तब्बल तीन वर्षानंतर भेटत होतो. ऐसपैस गप्पा चालू झाल्या. आम्ही आल्यामुळे जावई खुपच रिल्याक्स वाटत होते.गाडीतही मास्क लावलेला होताच. रस्त्याच्या दुतर्फा बर्फाचे ढीग आणी खराटे वृक्ष तरी बर्‍यापैकी सुचिपर्णी वृक्षांनी आपल्या हिरव्या रंगाने शुभ्र वसुधरेची एकतानता भंग करण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता.
mipa बर्फच बर्प्फ चहुकडे mipa

पोटात कावळे कोकलत होते, सकाळपासून चहाचा घोट की पाण्याचा थेबंही गेला नव्हता.रस्त्याने शुकशुकाट,हॉटेल नाही,ढाबा किवा चहाची साधी टपरी पण नाही.या बाबतीत मात्र अमेरीका आपल्या पेक्षा गरीब राष्ट्र नक्कीच ठरेल.विचारावे न विचारावे तेवढ्यात गाडीने मुख्य रस्ता सोडला आणि सर्व्हिस लेन पकडली. एक बर्फाने झाकलेल्या छोटे बंगलीवजा घर दिसले पण चिटपाखरूही नव्हते." पेट्रोल भरू आणी नाष्टा करू". गाडी थांबली, " माणसं खुप कमी त्यामुळे स्वताच बरीच कामे करावी लागतात". सर्वच गोष्टी डिजीटल.किती पेट्रोल हवे आणी त्याची किंमत भरून कार्डचा कोड टाकला. स्वताच पाईप गाडीच्या टाकीच्या तोडांत घातला. जवळच "आर बी ज"(Arby's) पिक पाँईटवरून काँफी घेतली, मुलीने सँडविच, बिस्किटे, वेफर्स आणी भरपूर मोठ्ठा थर्मास भरुन चहा दिला होता. गाडीत बसूनच भरपुर नाष्टा करून घेतला.पुढचा प्रवास चालू केला.ठरलेल्या वेळेत घरी पोहचलो. "वाट पाहुनी जीव शिणला" ,मुलगी खिडकीतच उभी होती मग काय "आनंदी आनंद गडे ", पण करोना मुळे थोडे विरजण पडले. एक आठवडा होम क्वारंटाईन व्हावे लागणार होते.
mipa "आर बी ज"(Arby's) पिक पाँईट mipa
पोहोचलो घरकडे एकदाचे

आसो, येथील सहा महिन्याच्या वास्तव्यात भरपुर नवनवीन गोष्टी केल्या, बघितल्या, कँमेर्यात कैद केल्या पण त्या पुढच्या भागात.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 Feb 2022 - 4:20 pm | कंजूस

दरवर्षी वारी सुरू होणार. लिहित राहा. उच्च रक्तदाबाची सवय होईल.
असो.

सौंदाळा's picture

4 Feb 2022 - 4:56 pm | सौंदाळा

वा खूप दिवसांनी परदेशी भटकंतीचा लेख आला आणि छान वाटले.
लेख आणि फोटो मस्तच.
पुभाप्र

गोरगावलेकर's picture

5 Feb 2022 - 9:20 am | गोरगावलेकर

घरबसल्या परदेशवारी होणार आहे आमची. माहिती व फोटो दोन्ही छानच.

श्रीगणेशा's picture

5 Feb 2022 - 10:59 am | श्रीगणेशा

छान वर्णन!
खूप बारकावे टिपले आहेत.
पुढील भागाची प्रतीक्षा.

मुक्त विहारि's picture

6 Feb 2022 - 1:13 am | मुक्त विहारि

पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत

तुषार काळभोर's picture

6 Feb 2022 - 10:54 am | तुषार काळभोर

पहिला परदेश प्रवास नेहमीच 'स्पेश्शल' असतो. जीवाची अमेरिका केल्याच्या पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

लास वेगासला जायला सांगा.

जीवाची अमेरिका केल्याच्या पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

Nitin Palkar's picture

6 Feb 2022 - 2:38 pm | Nitin Palkar

छान सुरुवात. पुभाप्र.

चौकस२१२'s picture

7 Feb 2022 - 3:12 pm | चौकस२१२

आम्ही आल्यामुळे जावई खुपच रिल्याक्स वाटत होते.

हे वाचून खुद्कन हसू आले पहिली भेट असेल तर जावईबापू खुश असतातच कारण साहजिक आहे ! सौ ची कानउघाडणी परस्पर होनार असते !

श्रीरंग_जोशी's picture

7 Feb 2022 - 11:20 pm | श्रीरंग_जोशी

तुमच्या अमेरिकेतल्या वास्तव्याच्या अनुभवकथनमालिकेची सुरुवात उत्तम झाली आहे. तपशीलवार वर्णन आवडले.
मी ग्रेट लेक्सच्या पश्चिमेला मिनेसोटात राहतो अन तुम्ही पूर्वेला मिशिगनमधे होता (किंवा आहात).

२०१७ चा टुलिप फेस्टिवल पाहण्यासाठी आम्ही हॉलंड मिशिगन येथे आलो होतो. या लेखाच्या निमित्ताने त्या आठवणी जाग्या झाल्या.
पुभाप्र.

कर्नलतपस्वी's picture

8 Feb 2022 - 8:40 am | कर्नलतपस्वी

होय, यावेळेस नाही जमले पण पुढच्या वेळी नक्कीच बघणार. फोर्ड संग्रहालय, अप्पर पेनिनसुला आणी फाँल सिझन या करता समयानुसार वारी होणारच आहे.

जुइ's picture

11 Feb 2022 - 7:41 am | जुइ

रंजक शैलीत लिहिलेले प्रवासवर्णन आवडले. अमेरिकास्थित मिपाकरांची संख्या भरपूर असली तरीही अमेरिकेतली प्रवासवर्णने मिपावर विरळच. त्यातही मिडवेस्ट भाग म्हणजे अतिविरळ. तुमच्या या मालिकेने ती कसर थोडीफार भरुन निघेल.

मिशीगन लेक च्या किनार्‍यावर वसलेले शिकागो "विंडी सिटी" म्हणून पण ओळखले जाते.

शिकागोत नेहमी वेगवान वारे वाहत असले तरी विंडी सिटी या उल्लेखामागे जुन्या काळी शिकागोवासियांच्या आत्मप्रौढीची टर उडवणे हा उद्देश असायचा असा एक प्रवाद आहे. स्रोतः Why is Chicago called the “Windy City”?

आम्ही एकदा भारतात जात-येत असताना डेट्रॉइट विमानतळावर ले-ओव्हर होता. तिथले कारंजे फारच कल्पक वाटले. तुमच्या लेखामुळे त्याची आठवण झाली.
पुढील भाग लौकर येऊद्या.

टर्मीनेटर's picture

11 Feb 2022 - 4:01 pm | टर्मीनेटर

छान सुरुवात 👍
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2022 - 5:19 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त सुरेख भटकंती वर्णन !
प्रचि देखिल समर्पक !
शिकागो-मिशीगन -डेट्रॉईट प्रवासाचे वर्णन भारी आहे

|| पु भा प्र ||

अभिजीत अवलिया's picture

13 Feb 2022 - 7:32 am | अभिजीत अवलिया

छान लिहीलेय.

प्रचेतस's picture

13 Feb 2022 - 8:01 am | प्रचेतस

खूप छान लिहीत आहात तुम्ही. एका वेगळ्याच शैलीत वाचायला आवडते आहे.