गोवा एका वेगळ्या रुपात - अंतिम भाग

Primary tabs

मित्रहो's picture
मित्रहो in भटकंती
21 Dec 2021 - 4:22 pm

भाग १ मार्ग
भाग २ सायकलींग

गोवा सायकल दौऱ्याचा हा शेवटला भाग, या भागात सायकल दौऱ्यात निवास आणि भोजन कुठे केले याची माहिती आहे.

divarresort
(दिवार बेटावर एक तळे)

निवास आणि भोजन
दौऱ्यात काही ठिकाणी निवासाची सोय मोठ्या हॉटेलमधे होती त्यामुळे ते जसे असायला हवे होते तसे होते. दिवार बेटावर आम्ही Mercure Devaaya Retreat या रिसॉर्टवर राहिलो होतो. हे हॉटेल मांडवी किंवा म्हादेई नदीच्या तीरावर होते. तीच गोष्ट शेवटल्या दिवशीच्या Beleza रिसॉर्टची आहे. हे रिसॉर्ट अगदी समुद्र किनारी होते. पाळोळे समुद्र किनारी असलेले Ciarans मात्र ठिकठाक होते.

mollem
(मॉलेम अभयारण्याजवळून जाताना)

tanshikar

तानशीकर स्पाईस फार्मचा अनुभव मात्र पूर्ण वेगळा होता. Tanshikar Spice Farm नेत्रावळी जंगलाच्या जवळच आहे. तिथे सेंद्रिय पद्धतीने (Organic) शेती होते. तानशीकर कुटुंब तिथेच राहतात. शेतात नारळ, सुपारी, कोको, पपई, अननस, काजू, हळद, विलायची, मिरे अशा विविध फळांची आणि मसाल्यांची झाडे आहेत. तिथे मधमाशांची शेती देखील करतात. शेतात त्यांनी काही कॉटेज बाधली आहेत. हि कॉटेज सर्व सोयींनी युक्त आहेत म्हणजे एसी, मोठा बेड, पंखा आंघोळीला गरम पाणी या सर्व सोयी आहेत. कॉटेजचे प्रकार आहेत मी Wooden Cottage मधे राहिलो होतो आणि छान होते. जंगलाच्या जवळच असल्याने प्रचंड शांत जागा आहे तसेच इथे रात्री इथे किर्र अंधार असतो. लाईट आहेत पण आपण किर्ऱ अंधारात, एका जंगलाच्या जवळ आहोत याची जाणीव होत राहते. या भागात फक्त BSNL चे नेटवर्क आहे. त्यांच्याकडे घरगुती पद्धतीचे जेवण होते. जेवणात त्यांच्या शेतातले मसाले वापरले होते त्यामुळे घरचे परंतु गोव्याच्या पद्धतीचे जेवण जेवल्याचा आनंद मिळाला. तानशीकर शाकाहारी आहेत परंतु त्याच्या इथले मसाले वापरुन ते मांसाहारी पदार्थ बाहेरुन बनवून घेतात. इथला बांगडा आणि सुरमयी चांगलेच लक्षात राहिले. जबरदस्त चव होती. मी त्यानंतर गोव्यात मासे खाणे टाळले कारण साधारणतः हॉटेल मधे साऱ्या पदार्थाना एकाच मसाल्याची चव येते. थोडा वेळ असता तर कदाचित शेताचा टूर सुद्धा करता आला असता. इथून बुडुबड तळे, सावेरी धबधबा पाच ते सात किमीच्या अंतरावर आहे. तुम्ही राहू शकता किंवा डे टूरमधे धबधबा, ट्रेक, शेताचा टूर करुन त्याच्याकडे जेवण करु शकता. ते त्यांच्या इथल्या मसाल्याची विक्रि देखील करतात. ही एका दुर्गम जंगलाच्या जवळच्या भागात राहायची सोय आहे, पंचतारांकित हॉटेल नाही याची जाणीव ठेवूनच इथे जायला हवे. पंचतारांकित सोयींची अपेक्षा ठेवू नये. तसेच जेवण किंवा इतर कुठलीही अक्टीव्हीटी करायची असेल ते आधी बोलून ठरवून गेलेले योग्य आहे.

tanshikar
(तानशीकर फार्म)

doodhsagar

दुसरे लक्षात राहिण्यासारखे ठिकाण म्हणजे Dudhsagar Plantation आम्ही इथे पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी थांबलो होतो. हे ठिकाण भगवाण महावीर अभयारण्याच्या जवळ आहे. यांच्याकडे राहण्याची सोयसुद्धा आहे. कुळें रेल्वे स्टेशनपासून हे स्थान साधारण दहा किमीच्या अंतरावर आहे. इथले मुख्य वैशिष्ट म्हणजे इथे असलेला पोहण्याचा नैसर्गिक तलाव. मालकाने आम्हाला फेनी कशी बनवितात याची सविस्तर माहिती दिली. आम्ही फेनी विकत घेतली पण सायकलींग करीत असल्याने फेनी पिण्यासाठी रात्रीची वाट बघावी लागली परंतु इथे जंगल ज्यूस नावाचा प्रकार आम्ही पिला. त्यात उराक, लिमका, लिंबू आणि हिरवी मिरची असते. उराक म्हणजे काजूच्या फळाचे First distillation(मराठी शब्द?) फेनीच्या आधीची पायरी. उराक साधारणतः जानेवारी ते एप्रिलमधे मिळते परंतु काही मंडळी रेफ्रिजरेट करुन ठेवतात. उराकमधे अल्कोहोलचे प्रमाण फेनीपेक्षा कमी असते. परत त्यात इतर पदार्थ टाकल्याने आणखीन कमी होते. पुढे सायकलींग करायची असल्याने आम्ही छोटा ग्लास घेतला. रात्री फेनी प्रथमच प्यालो. मला तरी ती फेनी ऑन द रॉक व्हिस्की सारखी वाटली. जेवण घरगुती पद्धतीचे ठिकठाक होते. इथली आणखीन एक गंमत लक्षात राहिली. त्यांच्याकडे एक देशी कुत्रा होता. त्याला लगेच आमचा लळा लागला. तो आमच्यासोबत जवळ जवळ पाच किमी अंतर घरापासून दूर आला. मालकाला काळजी लागली की कुत्रा खूप लांब गेला तर घरी परत येऊ शकणार नाही. आपण आता भटकलोय याची जाणीव कुत्र्याला देखील व्हायला लागली होती. शेवटी एका ठिकाणी आम्ही थांबलो, मालक गाडी घेऊन आला आणि कुत्र्याला घेउन गेला. तेंव्हा कुठे मालकाचा आणि कुत्र्याचा दोघांचाही जीव भांड्यात पडला. मॉलेमच्या अभयारण्यात जाण्यासाठी नेचर नेक्स्ट नंतर हा एक पर्याय होऊ शकतो. इथून दूधसागर सुद्धा जवळ आहे. मी इथे राहिलो नाही त्यामुळे राहण्याच्या सोयीविषयी फार सांगू शकणार नाही. हे स्थळ सुद्धा जाऊन धडकण्यासारखे नाही तर बोलून ठरवून गेलेले उत्तम.

doodhsagar1
(दूधसागर प्लांटेशन)

खाण्याच्या बाबतीत लक्षात राहिलेले एक छोटे ठिकाण म्हणजे काणकोण मधले दयानंद हॉटेल आणि तिथला गोवाच्या पद्धतीचा नाष्टा विशेषतः केळी घातलेला गरमागरम बन. गोव्यातील नाष्टा म्हणजे भाजीपाव होताच पण बन निव्वळ अप्रतिम होता. भाजीपाव मला नॉर्मल वाटला, तसा भाजीपाव बऱ्याच ठिकाणी खाल्ला आहे. मिक्स भाजी म्हणजे उसळ ज्यात बटाट्याची सुकी भाजी घातली होती. हे हॉटेल काणकोण चावडीच्या तिथेच आहे. तसेच कोला बीचच्या चढाच्या पायथ्याशी एक छोटेसे हॉटेल होते. ते स्रियांच्या सेल्फ हेल्प ग्रुपने चालविले होते. तिथे नारळ पाणी, चहा अशा गोष्टी मिळत होत्या. तिथे खालेला वडापाव चविष्ट होता. कदाचित खूप थकल्याने अधिक चविष्ट लागला असेल पण लक्षात राहिला. आम्ही दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी तिथे थांबलो होतो.

last day
(शेवटल्या दिवशी मधे कुठेतरी. )

शेवटी
४ डिसेंबरला म्हणजे नौदल दिवस त्यादिवशीच नौदलाचे प्रमुख केंद्र असलेल्या गोव्यात, आमच्या गोवा सायकल दौऱ्याची सांगता झाली. एक योग असा होता की दौऱ्याचे चार दिवस मी ज्या व्यक्तीसोबत रुम शेअर करीत होतो ती व्यक्ती निवृत्त नौदल अधिकारी होती. त्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर I was submariner for 22 years. दुसरी गंमत म्हणजे जेव्हा आम्ही काणकोणवरुन चढ चढून जेंव्हा गडावर पोहचलो तेंव्हा आयोजकांनी आम्हाला एक सुखद धक्का दिला. आमच्या ग्रुपमधील एकाचा वाढदिवस त्यादिवशी हिलटॉपवर जंगलात, फॉरेस्ट चौकीच्या बाजूला केक कापून साजरा केला. त्या बर्थडे बॉय़ला देखील याची कल्पना नव्हती. हा वाढदिवस त्याला कायम स्मरणात राहिल. अर्थात कोणताही कचरा होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली होतीच. असे दौरे म्हटले की नवीन ओळखी, चर्चा, गप्पा या होणारच. नेहमीची चौकट मोडली की हे असे योग येतात, असे व्यक्ती भेटतात, वेगळ्या जगाची माहिती होते. याच छोट्या छोट्या गोष्टी सायकल दौरा करायला प्रेरीत करतात नाहीतर फिटनेस तर काय घरात ट्रेडमिल वर पळून देखील मिळवता येतो. मी काही फार फिट नाही मला सायकलवर काही कठीम चढ चढताना त्रास होतो. परंतु जो अनुभव असतो तो खूप वेगळा आणि आनंददायी असतो म्हणूनच मला हा दौरा संपताना आता पुढचा दौरा कधी करायचा याचे वेध लागले होते.

betalbatim
(समारोप वेताळभाटी)

जाता जाता
गोव्यातील मंडळींची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे फुटबॉल, त्यामुळे सायकलींग करताना बऱ्याच ठिकाणी फुटबॉलचे मैदान दिसले. ISL सीझन असल्यामुळे फुटबॉल टिमच्या बसदेखील दिसल्या. आम्ही ज्या Beleza रिसोर्टला आमचा दौरा संपविला त्याच्या बाजूचे रिसॉर्ट Mumbai City FC संघाने राहण्यासाठी घेतले होते. तसेच दौरा संपल्यानंतर असनोडाला मी कुटुंबासमवेत जिथे थांबलो होतो त्या रिसॉर्टमधे Goa FC ची टिम थांबली होती. तिथे तो बायोबबल वगैरे प्रकार होता. बरेच देशी विदेशी खेळाडू दिसले पण मी कुणाला ओळखत नव्हतो.

(समाप्त)

मित्रहो
http://mitraho.wordpress.com/

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Dec 2021 - 8:26 am | चंद्रसूर्यकुमार

तिनही लेख आवडले.

स्पाईस फार्मला भेट देणे हा एक मस्त अनुभव असतो. फोंड्याजवळ सहकारी स्पाईस फार्म म्हणून आहे तो बघितला आहे. पुढच्या वेळेस तानशीकर स्पाईस फार्म बघायला हवा.

मुक्ता नार्वेकरने नेचर नेस्ट रिसॉर्टचा केलेला व्हीलॉग इथे देत आहे

प्रचेतस's picture

22 Dec 2021 - 9:12 am | प्रचेतस

अहाहा. मुक्कामाची ठिकाणे जबरदस्त आहेत.
धन्यवाद या भागासाठी.

कंजूस's picture

22 Dec 2021 - 10:23 am | कंजूस

कोकणात कुणी अगदर गेले असल्यास मिरी, जायफळ ,दालचिनी,तमालपत्र पाहिलेले असतेच. फक्त वेलदोडे आणि लवंग नसते.ती केरळात पोनमुडी'ला दिसते.

ठिकाणं थोडी आतल्या बाजूस असल्याने सुरेखच आहेत.
आता सायकलवाले जाऊ शकतात.

मित्रहो's picture

22 Dec 2021 - 10:27 am | मित्रहो

धन्यवाद कंजूस
ठिकाण आत असली तरी डांबरी रस्त्याने जोडलेली आहे. कार, स्कुटर, सायकल सारे जाऊ शकते.

लगडलेली हिरवी मिरी खायला खूप छान लागते. तमालपत्र तर सह्याद्रीत चिक्कार आढळते.

जेम्स वांड's picture

23 Dec 2021 - 11:46 am | जेम्स वांड

अश्या ओल्या हिरव्या मिरीचे घड तोडून त्यातील मिरी सुटी करून त्याला मीठ आणि व्हिनेगर (का ब्रायनिंग लिक्विड ते नक्की आठवत नाही आता) घालून एक साधेसे पण अतिशय चविष्ट लोणचे करतात तयार, आणि एक चटणी पण करतात त्याचीच. मला तो प्रकार फार तुफान वाटला होता, त्यात एका केरळी मित्राने ४५ एमएल बकार्डी व्हाईट प्लस थोडा (अगदी दोन मोठे चमचे) अननस ज्युस प्लस सोडा आणि हे ब्रायनिंग लिक्विड प्लस सातआठ ठेचलेल्या हिरव्या मिरी घालून एक अफलातून जुगाड कॉकटेल पाजले होते ते अजूनही लक्षात आहे चांगलेच.

मित्रहो's picture

22 Dec 2021 - 10:25 am | मित्रहो

धन्यवाद चंद्रसूर्यकुमार आणि प्रचेतस
@चंद्रसूर्यकुमार ते नेचर नेस्ट आहे होय माझ्या डोक्यात का बरं नेचर नेक्स्ट बसले होते माहित नाही. हे रिसोर्ट लागले होते जंगलाच्या सुरवातीलाच आणि रोडवर आहे. मी निदान पाटीचा फोटो काढणार होतो परंतु थांबायचा कंटाळा आला. विडियो बद्दल धन्यवाद. तानशीकर अगदी नेत्रावळीच्या कुशीत आहे. स्पाईस फार्ममधे राहायला आवडत असेल तर नक्की जावे.
@प्रचेतस हो दोन्ही जागा छान होत्या. ७५ किमी सायकल चालविल्यानंतर Dudhsagar Plantation च्या नैसर्गिक तलावात डुंबण्यात मजा आली. सारा थकवा निघाला आणि पुढे तानशीकर पर्यंत पोहचायला उत्साह आला.

पराग१२२६३'s picture

22 Dec 2021 - 5:44 pm | पराग१२२६३

मस्त होती मालिका. अलिकडेच माझी पहिलीवाहिली पण धावती गोवा भेट झाली. त्यामुळे
ही मालिका वाचत असताना मी पाहिलेल्या गोव्याची दृष्येही डोळ्यासमोरून सरकत होती.

चौथा कोनाडा's picture

22 Dec 2021 - 5:53 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच ! झकास ! !
मजा आली भटकंती वाचायला आणि प्रचि अनुभवायला !

मित्रहो's picture

22 Dec 2021 - 8:09 pm | मित्रहो

धन्यवाद पराग१२२६३, चौथा कोनाडा

तीनही भाग सुंदर होते! मस्त अनुभव,प्रचि!

राघवेंद्र's picture

23 Dec 2021 - 1:06 am | राघवेंद्र

तीनही भाग आवडले. ट्रिप मस्त झाली. सायकलिंग चे फायदे छान मांडले आहेत.

प्रचेतस's picture

23 Dec 2021 - 9:47 am | प्रचेतस

बाकी तुमचे धागे वाचून माझ्यादेखील गोव्यातील ठिकाणांविषयी लिहिलेल्या दोन लेखांची आठवण झाली.

गोवा - भाग १: जुन्या गोव्यातील चर्चेस

दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

मित्रहो's picture

23 Dec 2021 - 9:55 am | मित्रहो

धन्यवाद भक्ती आणि राघवेंद्र
परत एकदा धन्यवाद प्रचेतस तुमचे लेख म्हणजे एक खजिना असतो. आता दोन्ही लेख शांतपणे वाचणार.

टर्मीनेटर's picture

23 Dec 2021 - 10:28 am | टर्मीनेटर

सगळे भाग सलग वाचले.
मला सायकलिंग आणि ट्रेकिंग ह्या प्रकारात रस नसल्याने मी त्याबद्दलचे लेखन वाचत नाही, पण "गोवा एका वेगळ्या रुपात " असे शीर्षक वाचून आवडत्या गोव्याचे काही अपरिचित पैलू पाहायला मिळणार ह्या अपेक्षेने वाचायला सुरुवात केली आणि ती नक्कीच पूर्ण झाली. अनेक नवीन ठिकाणाची माहिती मिळाली, फोटोही सुंदर आहेत 👍
ह्या भागात आलेला 'उराक' चा उल्लेख वाचून तर विशेष आनंद झाला. मी गोव्याला जातो ते (सिझन असेल तर) उराक आणि इतर वेळी काजू फेणी व कोकोनट फेणी प्यायला, बाकी भटकंती वगैरे ओघानी येते 😀
धन्यवाद.

मित्रहो's picture

23 Dec 2021 - 10:54 am | मित्रहो

धन्यवाद टर्मीनेटर
मला याआधी उराकविषयी माहिती नव्हती. उराकचा जंगल ज्युस हा प्रकार आवडला. फेणी मात्र फार आवडली नाही.

टर्मीनेटर's picture

23 Dec 2021 - 12:18 pm | टर्मीनेटर

चांगल्या प्रतीच्या उराकचा खरा सिझन फेब्रुवारीचा उत्तरार्ध आणि मार्च महिना. बाकी वाईन शॉप मध्ये बाटलीबंद स्वरूपात ती वर्षभर मिळते पण त्यात मजा नाही!
तुम्हाला काजू फेणी आवडली नसल्यास पुढच्या गोवा भेटीत कोकोनट फेणी ट्राय करा. काजू फेणी संपूर्ण गोव्यात मिळते पण कोकोनट फेणी मुख्यत्वे साऊथ गोव्यात.

जेम्स वांड's picture

23 Dec 2021 - 11:53 am | जेम्स वांड

एकतर तुमच्या ग्रामीण लिखाण अन शैलीचा मी चाहता आहे बघा. तुमची सरप कुपात धसला मला मोक्कार आवडली होती किंवा तुमचे आमचे मिरासदारी प्रेम पण मॅच होते.

आप तो हरहुन्नरी निकले मामा, एकदम किराक लिखते बोलेसो एकदम, गोवा वर्णन तुमच्या शैलीत तर अतिशयच जास्त जास्त आवडले बघा. विशेषतः रहिवाशी ठिकाणे, जेवण आणि निसर्गवर्णन म्हणजे इन शॉर्ट तीनही भाग आवडले, प्लस तुम्ही स्वतःला जसे मोटिव्हेट केलेत राईट पूर्ण करायला ते पण आवडले, एकंदरीत खरोखर तुमच्या लेखनातून अनवट अनोख्या वाटेवरचा गोवा बघायला मिळाला मला.

मुक्त विहारि's picture

23 Dec 2021 - 6:49 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

मित्रहो's picture

25 Dec 2021 - 8:25 am | मित्रहो

धन्यवाद जेम्स वांड आणि मुवि
वांड भाऊ दोन दिवस बाहेर गावी गेल्यामुळे प्रतिसाद द्यायला उशीर झाला. द. मा. मिरासदार वारल्यानंतर मी परत एकदा तुमचा आणि माझा लेख वाचला होता. मिपासदारीतल्या बऱ्याच कथा परत वाचल्या. सरप धसला कुपात तुम्हाला अजूनही लक्षात आहे त्याबद्दल धन्यवाद. मी परत ती कथा वाचली. वर्ष झाले वऱ्हाडी लिहिणे होत नाही आहे. सुचतच नाही. बघू कधी काही सुचते का?

जेम्स वांड's picture

25 Dec 2021 - 9:07 am | जेम्स वांड

सरप धसला कुपात एक साहित्यमौक्तिक आहे मित्रहो, स्वतः ग्रामीण लेखन करत असल्यामुळे जास्तच म्हणा ना. लवकर लवकर काहीतरी मजेदार लिहा, मागे तुम्ही नागपूरला जाऊन पिक्चर पाहण्यावर एक मजेशीर लेख लिहिला होता तो पण मस्त होता, तसलं काहीतरी लिहा पण लिहीत राहा, पुढील लेखनास शुभेच्छा.

गोरगावलेकर's picture

26 Dec 2021 - 10:44 am | गोरगावलेकर

वेगळ्या नजरेतून पाहिलेले गोवा छानच.

मित्रहो's picture

26 Dec 2021 - 11:41 am | मित्रहो

धन्यवाद गोरगावलेकर ताई