आमच्यासारख्या रात्रीचा दिवस करणाऱ्या (म्हंजे रात्रपाळीत काम करणाऱ्या) लोकांना पहाट माहीतच नसते. दिवाळीची- नरक चतुदर्शीच्या दिवशी आम्हाला पहाट दिसते. एरवी बारावाजेपर्यंत आमचा सूर्य उगवत नाही. या वर्षीची पहाट मात्र आम्ही एन्जॉय केली. पुण्यातल्या दोन कार्यक्रमांना (सुरेश वाडकर आणि पंडित जसराज) आम्ही पहाटेच (आमच्या मध्यरात्रीला) हजर होतो. हे आम्हाला कसं काय जमलं, याचा शोध आम्ही घेतोय. पण पहाटेच उठून सात्विक आनंद घेण्याचे आम्हाला यंदा जमले खरे! एरवी आम्ही अनेकदा भरलेले ग्लास खाली करीत उत्तररात्रीची मजा घेतलीय. त्यावेळी दिसलेली पहाट आम्हाला तांबूस वाटली. अगदी आमच्या पोटात थम्सअपबरोबर गेलेल्या "रसा'सारखी. (खरे सांगतो अनेकादा ती दिसलीच नाही.)
यंदाची पहाट मात्र आम्हाला देवासमोरच्या दिव्यासारखी वाटली. सूर्यप्रकाशात देवांच्या त्या मूर्तींमध्ये देवत्व आहे की नाही, अशी शंका आम्हाला येते. मात्र समईचा मंद प्रकाश पडला की याच मूर्ती सजीव होत असल्याचा भास आम्हाला होतो. यावर्षीची पहाटही अशीच वाटली. अगदी निर्मळ आणि सात्विक. संगीतातल्या स्वरांसारखी. मंदिरातल्या घंटानादामुळे आसमंतात उमटणाऱ्या तरंगांसारखी... भैरवमधल्या कोमल धैवतासारखी...
रोजची पहाट अशीच असेल काय?...
http://beta.esakal.com/2009/10/17232956/pune-cultural-suresh-wadkar-si.html
प्रतिक्रिया
18 Oct 2009 - 6:20 pm | विजय राणे
प्रकटन आवडले.
आम्हा पत्रकारांची ही च व्यथा आहे.
रात्रपाळी, वेळी अवेळी जेवण त्यातून येणारे आजार
असे सगळे पत्रकाराला विशेषत: उपसंपादकाला भोगावे लागते.
लोक जेव्हा काम उरकून घरी जातात तेव्हा आम्ही कामावर जातो.
खासगी आयुष्य तर उरतच नाही.
पोटपाण्याचा प्रश्न आहे. पगारासाठी तरी हे सर्व सहन करावेच लागणार.
18 Oct 2009 - 6:31 pm | मदनबाण
वैद्य बुवा प्रकटन आवडले...
आमची पण हीच परिस्थीती आहे... भास्कर शेठ आणि आमचा असाच लपंडाव चालु असतो... असो चालायचे... ;)
पण पहाटेच उठून सात्विक आनंद घेण्याचे आम्हाला यंदा जमले खरे!
व्वा. उत्तम !!! अशीच संधी आपल्याला नेहमी लाभो. :)
(घोडीवाले वैद्य ह्म्म... या नावामागे काय इस्टोरी असेल बरं ? :? )
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |