नाडी अनुभव -स्फुट

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
4 Sep 2009 - 1:00 pm
गाभा: 

केवळ तुमच्या अंगठयाच्या ठशावरून काढलेल्या नाडीपट्टीत तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, तुमची कुंडली, तुमचा वर्तमान काळ, भूत, भविष्य सर्व काही कस काय सापडत ब्वॉ?

दक्षिण भारतातील हे नाडीग्रंथ महाराष्ट्रातही आले आहेत. २०-२२ ठिकाणी ही नाडीकेंद्रे जोरात चालू आहेत. उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी पाच केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तेथे भेट दिली असता तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो. नाडी पट्टीतील मजकुर हा कूट तामिळ लिपीत असतो असे सांगितले जाते. त्याअनुषंगाने ते हिंदीत प्रश्न विचारतात. नाडीपट्टी शोधण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात असे नाडीवाचक सांगतात. सर्वांच्याच पट्टया सापडतात असे नाही असे नाडी केन्द्रात अगोदरच सांगितले जाते. पट्टी सापडल्यास वाचनाचे रूपये तीनशे आकारले जातात. ( हा रेट नाडी केंद्रानुसार बदलतो.)
माझी पत्नी मंजिरी ता. २३-२-२००१ रोजी श्री रिसबूड व आमचे स्नेही श्री प्रकाश पेंडसे(कट्टर नाडी समर्थक) यांच्या समवेत पुण्यातल्या नाडी-केंद्रात गेली. तिने तिच्या अंगठयाचा ठसा, पूर्ण नाव व जन्मतारीख सांगितली पण जन्मवेळ मात्र माहीत नाही असे सांगितले. काही काळानतंर ज्योतिष्याने नाडी-बंडलातली एकेक पट्टी भराभर उलटत तिला बरेच प्रश्न विचारले. तिची रास धनू आहे हे दरम्यानच्या काळात तिच्या जन्मतारखेवरून पंचांगातून त्याने काढले असावे, म्हणून एक पट्टी समोर धरून व तिच्यात वाचल्यासारखे करून त्याने तिला विचारले की तुमची रास धनू आहे का ? मंजिरी म्हणाली की तिला माहीत नाही. श्री. रिसबूड शेजारीच बसले होते, त्यांनी त्याला विचारले की पट्टीवर धनू रास लिहिली आहे काय ? तो होय म्हणाला. त्यावर रिसबुडांनी म्हटले की मग त्या पट्टीत लग्न कोणते लिहिले आहे ते सांगा. तो जरासा घुटमळला व म्हणाला की ते आत्ता कळणार नाही, वो तो बाद मे आयेगा. आणखी काही प्रश्न विचारून झाल्यावर त्याने सांगितले की तुमची पट्टी सापडत नाही. हा त्याचा हुकुमी एक्का होता. पट्टी सापडत नाही असे म्हटले की खेळ खलास. पट्टी सापडली असे म्हणायची सोय नव्हती कारण जन्मवेळ दिलेली नसल्यामुळे लग्न-रास काढता येत नव्हती, ती काय सांगायची हा पेच त्याला पडला असता. त्यातून त्याने अशी सुटका करून घेतली.
मंजिरीच्या वडिलांचे नाव लक्ष्मण. ज्योतिष्याने अनेक प्रश्न विचारून ते नाव कसे काढून घेतले ते मंजिरीने समक्ष अनुभवले आहे. त्याने विचारलेले प्रश्न असे :- नाव तीन अक्षरी की दोन अक्षरी आहे ? नाव देवाचे आहे का ? ते नाव य र ल व यापैकी कोणत्या अक्षराने सुरू होते ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतांना मधले अक्षर एकच समजायचे की दीड अक्षर समजायचे असा संभ्रम तिला पडला म्हणूने तीन अक्षरातले मधले अक्षर जोडाक्षर आहे असे तिने सांगितले. तिच्या वडलांचे नाव पट्टीत निघाले असे नंतर सांगायची तयारी त्याने केली असावी यात आम्हाला शंका नाही.
नाडी-पट्टीत कुंडलीची माहितीच कोरलेली नसावी असा तर्क वा संशय आम्ही वरील प्रयोगावरून बांधला. तो बरोबर आहे की नाही ते पहाण्यासाठी रिसबुडांनी इथल्या नाडी-केंद्राला एक पत्र पाठवले. त्यात संशोधनासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले होते. त्यात असे म्हटले होते की, आम्ही आपणास जन्मतारीख व वेळ सोडून व्यक्तीच्या ठशाबरोबर व्यक्तीचे नांव, व्यक्तीचे जन्मसाल, महिना, आठवडा, व्यक्तीच्या आईचे नांव, वडिलांचे नाव, पती/ पत्नीचे नांव, स्वत:चा व्यवसाय, शिक्षण, भावंडाची माहिती, संततीची माहिती देउ. सोबत सील केलेली कुंडली देउ. ठसा व माहितीवरून नाडीपटटीतील कुंडली केंद्राने शोधावी. ती जर सील केलेल्या कुंडलीशी जुळली तर आपल्या नेहमीच्या फीच्या दुप्पट फी आम्ही देउ. हा प्रयोग दि.१३ एप्रिल २००१ रोजी सायंकाळी करण्याचे ठरले. प्रत्यक्ष प्रयोगात तुमची माहिती तुमच्या जवळच ठेवा आम्हाला तिची गरज नाही असे सांगून तुमचे फक्त ठसे आम्ही घेतो असे सांगितले. आम्ही तिघांचेही ठसे त्याला दिले. आता पट्टी सापडेपर्यंत थांबा असे त्याने आम्हाला सांगितले. दरम्यानच्या काळात मुंबईहून आलेल्या एका दांपत्याची नाडीपट्टीही सापडली व नाडीवाचनही झाले. अर्ध्या तासानंतर तुम्हा तिघांच्याही नाडी पट्टया या केंद्रात नाहीत. आम्ही त्या मद्र्रासवरुन मागवून घेउ व तुम्हाला फोन करु असे सांगून आम्हास वाटेला लावले. त्यानंतर आजतागायत अनेकदा फोन करुनही आमच्या पट्टया सापडल्या नाहीत यावरुन सूज्ञ वाचक काय ते समजून घेतील.
अन्य काही तटस्थ अनुभव
साताऱ्याचे श्री. ओंकार पाटील यांनी स्वत: चेन्नईच्या आसपासच्या नाडीकेंद्रांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला आहे व तो किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी (१९९६) अंकात प्रसिद्ध केला आहे तसेच अं.नि.स.ने प्रकाशित केलेल्या प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या पुस्तकातही त्याचा समावेश केला आहे. त्यांचा तो विविध नाडीकेंद्रांच्या अनुभवांवर आधारित लेख मुळातूनच वाचला पाहिजे. नाडी-पट्टी शोधून काढण्याच्या बहाण्याने पृच्छकाला अक्षरश: शेकडो प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायची आणि नंतर नाडी-पट्टी वाचण्याचा देखावा करीत तीच माहिती त्याला ऐकवायची असा प्रकार इथे चालतो. ओंकार पाटलांच्याकडून त्यांची जन्म-वेळ अशीच त्या नाडीवाचकाने त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिच्यावरून तामिळी पद्धतीची कुंडली बनवून त्यांना दिली पण भासवले मात्र असे की ती कुंडली पट्टीतच लिहिलेली होती.
एक अध्यात्मिक साधक श्री आत्मानंद यांनी भारतातल्या विविध नाडी केन्द्रांचे स्वत: अनभव घेतले होते. १९६७ साली यशवंत प्रकाशन, कुमठेकर रोड, पुणे ३० यांनी प्रकाशित झालेल्या 'अमुत तुषार ` या पुस्तकात त्यांनी आपले हे अनुभव व साधार टीका नमूद केली आहे. ते म्हणतात,'' थोडा वेळ असे गृहीत धरु या की पूर्वीचे ऋषीमुनी द्रष्टे होते व त्यांनी लोककल्याणासाठी असे नाडीग्रंथ लिहून ठेवले आहेत.अर्थात त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीला हेही दिसले असेल की त्या नाडया पुढे कोणाच्या हातात पडणार आहेत व ते त्यांच्या स्वार्थाकरिता व जनतेला लुबाडण्याकरिता कसा उपयोग करणार आहेत? त्यांचा उद्देश लोककल्याणाचा होता. अशा स्वार्थ साधू व जनतेला अमाप लुबाडणाऱ्या लोकास मदत करण्याचा खास नव्हता.त्यांच्या दिव्य दृष्टीला हे खात्रीन दिसले असलेच पाहिजे. त्या ग्रंथाचे भवितव्य त्यांच्या नजरेस आले असते तर त्यांनी ते ग्रंथ अशा लोकांच्या हाती पडू देण्यापेक्षा त्यांच्या समोरच नष्ट करून टाकलेले त्यांना परवडले असते. ``
पुस्तकाच्या 'पुरवणी` त आत्मानंद हे आपल्या निकटच्या स्नेह्याचा पुढील अनुभव नमूद करतात:- मद्रास कडील भागात ते गेले असता तेथील एका नाडी ग्रंथात महाराष्ट्रीयन माणसाची कुंडली इंग्रजी भाषेत व लिपीत ऋषींचे नावे कोरलेली आढळली. मग त्यावेळी जर इंग्रजी भाषेचे ज्ञान होते तर मराठी भाषेचे नक्कीच असले पाहिजे. मग ते ताडपत्र मराठीत न लिहिता इंग्रजीत का लिहिले होते? याचा अर्थ एकच की ते लिहिणारास इंग्रजी येत होते पण मराठी येत नव्हते. नाडी ग्रंथ लिहिण्याचा कारखाना हा आजही चालू आहे हे सिद्ध होते.
दुसऱ्या एका अनुभवात एक प्रसिद्ध नाडीवाले त्यांच्या कडे असलेले ताडपत्र घेवून आले. स्नेह्यांनी ऐकण्याकरता दोघा तिघांना मुददाम बोलावले होते. नाडीवाले वाचन करीत असताना पुष्कळवेळा असे वाचून दाखवतात की हे वाचन चालू असताना अमुक अमुक बसलेले असतील, व असा उल्लेख आला की ऐकणारा चकित होतो. या नाडी वाल्याने सहज म्हणून कोण कोण बसले आहेत त्याची चौकशी केली व स्नेह्यांनी अनवधाने सांगून टाकले. हे लक्षात ठेवून ती नाडी वाचताना ओघात त्यानी तेच नांव वाचून दाखविले. यावरून त्यांना थोडा संशय आला व ते नांव कोठे लिहिले आहे. ते दाखविण्यास सांगितले. ते तामीळ लिपीत असल्याने त्यानी ते पान काढून ठेवण्यास सांगितले, हेतू हा की नंतर कोणाकडून तरी ते वाचून घेता येईल. त्याप्रमाणे नाडीवाल्याने कबूल केले. इतक्यात जेवणाची वेळ झाली म्हणून स्नेही जेवण्यास गेले व जेवून येईपर्यंत नाडीग्रंथधारकाने ते पान काढून ठेवले होते. ते त्यांस वाचून दाखवण्यास सांगितले. त्यावेळी असे आढळून आले की नाडीवाले प्रथम कुंडली वाचली त्यावेळी त्यांच ते नाव पहिल्या पाच सहा श्लोकात वाचले गेले होते व आता ते शेवटी शेवटी वाचले गेले. यावरून स्नेह्यांना संशय आला. तपास केला तेव्हा असे आढळून आले की नाडीवाले यानी स्नेह्र्याच्या गैरहजेरीत त्यांचे गडयाकडून थोडी कोळशाची भुकी व खोबरेल तेल मागून घेतले होते. व टेबलावरील लोखंडी टोच्याने त्यानी काही कारागिरी केली होती. स्नेह्यांनी ते पान ठेवून घेतले व एन्लार्ज फोटो काढून तज्ञाकडून तपासून घेतले, त्यावेळी त्याना नुसते ते नावंच नाही तर मधील तीन ओळी सबंध नवीन घातलेल्या आढळल्या.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

4 Sep 2009 - 1:50 pm | मदनबाण

ह्म्म... हे नाडी प्रकरण वाचुन वाचुन... आता टाळक्यात भलत्याच नाड्या आल्या....
http://www.tantra-kundalini.com/nadis.htm
बाकी चालु ध्या... ;)

(कोणाची नाडी कोणाच्या हातात !!! :?)
मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

गणपा's picture

5 Sep 2009 - 1:59 am | गणपा

नाडी पहाणारे फक्त भुतकाळच सांगतात की भविष्य पण वर्तवतात.
जर भविष्य वर्तवत असतील तर ते पडताळुन पहाण्या साठी, मुन्नाभाईच्या सर्किटचा उपाय अवलंबुन पहावा. ;)

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

5 Sep 2009 - 11:03 am | अमित बेधुन्द मन...

तुच आहेस तुझ्य जिवनाचा शिल्पकार

प्रकाश घाटपांडे's picture

12 Oct 2009 - 3:07 pm | प्रकाश घाटपांडे

प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा हे पुस्तक आपल्याला स्क्रिब्ड मधे टाकलेले आहे.ओंकार पाटील यांचा लेख वाचा. आता नाडीवर चर्चेचे अजीर्ण झाले आहे. त्यामुळे चर्चा अपेक्षीत नाही
अवांतर- कुणी तरी तिकड कुजबुतय कि काढलच खाजवुन बाहेर; जाउ दे भास आहे वाटतं

अवलिया's picture

12 Oct 2009 - 3:12 pm | अवलिया

कुजबुज कशाला? जाहिर बोलतो की.
पकाकाका (हे पकाक पकाक पकाक असे वाचु नये [वाचुन ये नाही] )

तुम्हाला काय दिवाळीची सुटी कशी घालवायची ही चिंता पडली का?
उगा आपलं परत काडी कुडी नाडी साडी फाडा फाडी सुरु केली ?

तुम्ही माझ्यासारखेच डांबरट आहात हे नक्की ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विनायक प्रभू's picture

12 Oct 2009 - 3:20 pm | विनायक प्रभू

आपले भविष्य आपल्या हातात(अगदी नाडीसकट)

सखाराम_गटणे™'s picture

12 Oct 2009 - 3:23 pm | सखाराम_गटणे™

+१
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 Oct 2009 - 3:40 pm | फ्रॅक्चर बंड्या

आज सकाळी सकाळ मध्ये वाचले की पुण्यातील जोशी नामक ज्योतिषाने अ.नि. स. चे आव्हान स्विकारले...
अ.नि.स चे आव्हान असे होते की महाराष्ट्रात कुठले उमेदवार निवडुन येतिल ते सांगायचे बरोबर सांगितले तर २१ (?) लाखाचे बक्षीस...

प्रकाश घाटपांडे's picture

12 Oct 2009 - 3:47 pm | प्रकाश घाटपांडे

ही बातमी नगरची आहे. आव्हान स्वीकारल कि हमखास प्रसिद्धी! ( अन दिल कि सुद्धा)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

Nile's picture

12 Oct 2009 - 3:51 pm | Nile

लई भारी, निकाला बद्द्ल उत्सुकता असेल. :)