मी कोण होणार? - भाग २

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
24 Feb 2008 - 12:16 pm

खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.

ना खेळाडू, ना कलाकार ना दुकानदार
शाळेच्या अभ्यासक्रमातल्या सगळ्याच विषयांत मला पहिल्यापासून चांगली गती होती आणि वाचनाची आवड असल्यामुळे नवी पुस्तके आणल्यावर लगेचच त्यावर वर्तमानपत्राची कव्हरे घालून त्या कव्हरांवरील बातम्यासकट आंतल्या पुस्तकांची अथपासून इतीपर्यंत सारी पाने मी आपणहून वाचून काढीत असे. त्या काळात गृहपाठ नांवाचा बोजा फारसा नसायचा. त्यामुळे मुलांना भरपूर रिकामा वेळ मिळायचा. अर्थातच तो खेळण्यात घालवायचा.

माझ्या वर्गात मी वयाने सर्वात लहान होतो आणि अंगकाठी बारीक असल्याने आकाराने सुद्धा. उशीराने शाळेत प्रवेश घेऊन एकेका इयत्तेत दोन दोन वर्षे मुक्काम करत आलेली कांही थोराड मुले तर माझ्या दुप्पट अंगाची होती. अशा आडदांड मुलांवर मैदानी खेळात कुरघोडी करणे मला अशक्य होते. हुतूतूच्या खेळात मी चढाई केल्यावर अशा एकाने नुसती माझी चड्डी चिमटीत धरली तरी मी तिथेच तडफडत असे आणि त्याला मी मिठी मारून पकडले तरी तो मला फरपटत मध्यरेषेपर्यंत सहज नेत असे. शिवाय असे धुळीत लोळून कोपरे आणि गुडघे फोडून घेणारे खेळ खेळायची मला मुळीसुद्धा हौस नव्हती. हातपाय, कंबर वगैरेंची काळजी वाटत असल्यामुळे कुस्तीच्या हौद्यात उतरण्याचे साहस मी कधी केलेच नाही. क्रिकेटच्या 'जंटलमन्स' गेममध्ये सुद्धा मी फलंदाजी करायला गेलो की पहिल्या चेंडूला बाद व्हायचा आणि मला कोणी गोलंदाजी देतच नसे. क्षेत्ररक्षणासाठी स्लिपमध्ये उभे केले तर जवळून सणसणत जाणारा वेगवान चेंडू हातात पकडायचा धीरच मला व्हायचा नाही. सीमेजवळ उभा असतांना नेमका माझ्या दिशेने चेंडू आला तर ठीक होते, पण त्याच्यामागे माझ्या छोट्या पावलांनी पळत जाऊन त्याला पकडण्याआधीच तो सीमापार होऊन जायचा. अखेर मला अंपायर किंवा स्कोअरर करून पाहिले. इथे सुद्धा "माझ्या निर्णयावरून वाद झाला आणि मारामारीपर्यंत प्रकरण गेले तर मार खावा लागू नये" असा विचार मनात येत
असल्यामुळे कदाचित माझ्याकडून पक्षपात घडत असावा, किंवा तसे घडण्याची शक्यता असल्यामुळे मला बहुतेक वेळा प्रेक्षकाची भूमिकाच करावी लागत असे. एकंदरीत सांगायचे झाले तर हिंदकेसरीचा खिताब जिंकून खांद्यावर गदा घेऊन उभा असलेल्या किंवा विजयी षट्कार मारलेल्या फलंदाजाच्या पवित्र्यात माझा फोटो वृत्तपत्रात छापून येण्याची सुतराम शक्यता मला कधीही दिसली नाही.

चित्रे काढण्याची मला लहानपणी खूप हौस होती आणि अजूनही आहे. फक्त मी घोड्याचे चित्र काढले तर तो उंदीर आणि बेडूक यांच्या संकरातून निर्माण झालेला नवा प्राणी असावा असे वाटत असे. आमच्या गांवातल्या लोकांनी पिकासोची चित्रे कधी पाहिलीच नव्हती. त्यामुळे त्यांना या कलाकृतींचे मुळीसुद्धा कौतुक वाटले नाही. पिकासो अशी वेडीवाकडी चित्रे मुद्दाम काढत होता आणि माझ्या हांतून ती आपोआप निघत होती असे असले तरी पाहणार्‍यांनी त्याचा अर्थ लावायला नको कां? "उगाच कागदाची नासाडी करू नकोस" असा दम मला भरला जात असल्यामुळे माझ्यातल्या त्या कलेचे चीज झाले नाही आणि मोठ्ठा चित्रकार बनण्याचे स्वप्नही मी पाहू शकलो नाही.

माझे पाठांतर चांगले असल्याकारणाने मला शाळेतल्या समूहगीतांच्या कार्यक्रमात दुस-या रांगेत स्थान मिळत असे. मुख्य गाणे म्हणणार्‍या मुलाला पुढची ओळ आठवली नाही तर मी तिची सुरुवात करून द्यावी एवढाच उद्देश त्या मागे असायचा. त्यामुळे माझ्या वाटणीला "जीजीजी"च्या पलीकडे फारसे शब्द कधी आले नाहीत. जीजीजी करणारा होऊन होऊन कितीसा मोठा होणार?

दर गुरुवारी भरणार्‍या आठवड्याच्या बाजारात सुईदोर्‍यापासून भाजीपाल्यापर्यंत सगळ्या जीवनावश्यक वस्तू मिळायच्या. 'पट्टणशेट्टी' किंवा 'लाहोटी' अशासारख्या आडनांवाच्या व्यापा-यांची कांही दुकाने बाजारात होती. त्यांना कांचेची तावदाने, रोलिंग शटर्स, शो विंडो, दिव्यांचा झगमगाट असले कांही नव्हते. साधे कौंटरदेखील तिथे नसायचे. किराणा दुकान असेल तर पोती, पत्र्याचे डबे आणि बरण्या यात भरलेला माल पसरून त्यातच तो दुकानदार बसायचा. कापडाच्या दुकानात कापडे, धोतरे आणि लुगड्यांचे गठ्ठे बांधून भिंतीशी लावून ठेवले असायचे आणि एक जाजम अंथरून त्यावर लोडाला टेकून शेठजी बसायचा. तसले दुकान आपण चालवावे असे वाटण्यासारखे कांहीसुद्धा आकर्षण त्यात नव्हते. सराफीचा आणि सावकारीचा धंदा करणारे खूप श्रीमंत असतात असे ऐकले होते, पण त्यांचा लहान मुलांशी कांही संबंध येत नव्हता. हा धंदा करायला आधी मुळात भरपूर माया जवळ असणे आवश्यक होते. ती तर नव्हतीच. म्हणजे मोठे झाल्यावर आपण दुकानदार तर होणार नाही हे सुद्धा निश्चित होते.

त्या काळात सुतार, लोहार, सोनार, कोष्टी आदि उत्पादक काम करणारे लोक वंशपरंपरा ते काम करत असत. बाहेरच्या लोकांना त्यात शिरकाव करायला वाव नव्हता. या कष्टकर्‍यांचा समावेश मोठ्ठ्या लोकात होतही नव्हता. त्यामुळे त्या मार्गाकडे वळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. अखेर मिळेल तेवढे शिक्षण घेऊन त्याच्या आधारावर आपले जीवन ठरले जाणार आहे हे सत्य शाळेच्या शेवटच्या वर्गात येईपर्यंत स्पष्ट झाले होते.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Feb 2008 - 8:18 am | विसोबा खेचर

फक्त मी घोड्याचे चित्र काढले तर तो उंदीर आणि बेडूक यांच्या संकरातून निर्माण झालेला नवा प्राणी असावा असे वाटत असे.
त्यामुळे माझ्या वाटणीला "जीजीजी"च्या पलीकडे फारसे शब्द कधी आले नाहीत. जीजीजी करणारा होऊन होऊन कितीसा मोठा होणार?
:)
छान लेखन..!
तात्या.

ऋषिकेश's picture

25 Feb 2008 - 8:22 am | ऋषिकेश

वा वा वा.. हा लेख मस्तच जमलाय!! लेखातील अनेक वाक्ये अत्यंत खुमासदार!.. मजा आली वाचताना :)पुढिल भागांची वाट पाहतोय
-ऋषिकेश

तात्या विन्चू's picture

25 Feb 2008 - 9:27 am | तात्या विन्चू

"पिकासो अशी वेडीवाकडी चित्रे मुद्दाम काढत होता आणि माझ्या हांतून ती आपोआप निघत होती असे असले तरी पाहणार्‍यांनी त्याचा अर्थ लावायला नको कां? "
ही ओळ फार आवडली बुवा....धमाल आहे लेख.
 
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

प्राजु's picture

25 Feb 2008 - 9:27 am | प्राजु

फक्त मी घोड्याचे चित्र काढले तर तो उंदीर आणि बेडूक यांच्या संकरातून निर्माण झालेला नवा प्राणी असावा असे वाटत असे.
या तुमच्या वाक्याने मला माझ्या नवर्‍याचा जोक आठवला. माझ्या नणंदेने एकदा स्वतःचे चित्र पावडर शेडींग मध्ये काढले होते.. तर हा तिला म्हणतो.."ऐश्वर्या राय चं चित्र काढायला गेली आणि आता ते स्वतःसारखचं काढलंय"
- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती दिनेश's picture

25 Feb 2008 - 8:24 pm | स्वाती दिनेश

"पिकासो अशी वेडीवाकडी चित्रे मुद्दाम काढत होता आणि माझ्या हांतून ती आपोआप निघत होती असे असले तरी पाहणार्‍यांनी त्याचा अर्थ लावायला नको कां? "हे मस्तच!दोन्ही भाग आजच वाचले.एकदम खुसखुशीत !अवांतरः मिपाच्या नव्या रुपड्यामुळे लेख पटकन सापडत नाहीत :( स्वाती

सुधीर कांदळकर's picture

25 Feb 2008 - 9:37 pm | सुधीर कांदळकर

खरेच एका थोर चित्रकाराला तसेच गायकाला मुकला.
वा मस्त जमले बरे का. मज्जा आली.
पु भा च्या प्रतीक्षेत. शुभेच्छा.