राखी : देवस्थळी ते सावंत!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
5 Aug 2009 - 6:39 pm

rakhi
राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते. तेवढं एक बंधन अतूट राहिलं.
त्या काळी वर्गातल्या, शेजारच्या मुलीशी बोलणंही पाप मानलं जायचं. वर्गात दंगा करणाऱ्या मुलाला शिक्षा म्हणून मुलीशेजारी बसवायचे! सातवीत एकदा अशीच "शिक्षा' आमच्या अख्ख्या वर्गाच्या वाट्याला आली होती. मग आम्ही बेंचवरच आपापली "हद्द' कर्कटकाने आखून घेतली होती. त्या हद्दीच्या पार कुठली वस्तू आली की जप्त करायची किंवा शेजारच्या मुलीला काहितरी शिक्षा करायची, असा नियम होता!
आमच्या घराच्या पल्याड काही अंतरावर राखी देवस्थळी नावाची एक मुलगी राहायची. घराशेजारी राहणाऱ्या, वर्गातल्या, नात्यातल्या, किंवा परिचयातल्या कोणत्याही समवयस्क मुलीच्या नावानं मुलांना चिडवण्याचा त्या काळी दंडकच होता! त्यामुळं मलाही तिच्या नावानं चिडवलं जायचं. हातावरच्या राखीनंतरची आयुष्यातली दुसरी "राखी' ही! बाकी, मामेबहिणी, अन्य शेजारणींच्या नावानंही चिडवणं व्हायचंच.
शाळेत रक्षाबंधनाचा सामूहिक, पारंपरिक, बंधनकारक सोहळा व्हायचा. मुला-मुलींची समसमान वाटणी करून प्रत्येकाला साधारणपणे एक या प्रमाणात राखी बांधण्याचा सार्वजनिक कार्यक्रम असायचा. या कुंभमेळ्यात आपली "लाइन' ("शाळा'!) आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी सर्वांची धडपड असायची. शाळेत ज्याच्या नावानं आपल्याला चिडवलं जातं, त्याला राखी बांधण्याचीही भयंकर प्रथा त्या काळी अस्तित्त्वात होती. मग या दहशतीमुळे अनेक जण राखीपौर्णिमेच्या दिवशीच नेमके आजारी पडायचे! तरीही नंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यांना गाठून हा कार्यक्रम पार पाडला जायचाच! एकदा का त्या मुलाला राखी बांधली, की आपण "पवित्र' झालो, असा अनेक मुलींचा समज होता बहुधा!! पण राखी बांधली, तरी आम्ही "दादाभाई नवरोजी' व्हायला तयार आहोत, असा आमचा दावा असे.
हातावरची राखी जास्तीत जास्त दिवस टिकवणं हेदेखील एक पवित्र कर्तव्य होतं. आंघोळ करताना तिला पाणी लागू न देण्याचं कसब त्यासाठी पार पाडावं लागे. चित्रपटांच्या नावांच्या, भल्या मोठ्या स्पंजच्या आणि हल्लीच्या "पेस्ट्री'ला लाजवतील, अशा राख्याही बाजारात असायच्या. पण त्या हातावर बांधणं म्हणजे आपण अगदीच "ह्यॅ' असल्याचं लक्षण मानलं जायचं. शाळेत मिळायच्या त्या संघाच्या राख्या. मऊसूत गुंडा आणि एक साधा, केशरी दोरा. बस्स!
कॉलेजात असताना शेवटच्या वर्षात एकुलत्या एक वेळेला प्रेमात पडलो होतो. ही बया आपल्याला आता राखी बांधते की काय, अशी प्रचंड भीती त्या वर्षीच्या राखीपौर्णिमेला होती! पण सुदैवानं तसं काही झालं नाही. आणि तसं झालं असतं, तरी फरक पडला नसता, हे कॉलेज संपल्यानंतर उमगलं.
पुण्यात आल्यानंतर काही वर्षं बहिणींनी पोस्टानंही राखी पाठवली. साधारणतः राखीपौर्णिमा झाल्यानंतर आठवडाभराने ती मिळायची. त्यानंतरही ती हातावर बांधून मिरवण्यात एक प्रकारचं समाधान असायचं. विशेषतः एकटा राहत होतो, तेव्हापर्यंत!
...अगदी अलीकडच्या काळात आणखी एक "राखी' आयुष्यात आली. म्हणजे, खासगी नव्हे, तर सार्वजनिक आयुष्यात! ही राखी भलतीच मजबूत, बोल्ड आणि आकर्षक (हॉट?) होती! तीच ती..."महाराष्ट्राची खंत'. कुण्या पंजाब्यानं तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोण तीळपापड झाला होता अंगाचा!!
...पण हाय रे कर्मा! तिचं अगदी दोनच दिवसांपूर्वी लग्न ठरलं. आमचा मेव्हणा सातासमुद्रापारचा कुणी राजकुमार आहे म्हणे! आता त्याचे कान उपटायला जाईन म्हणतो!!

मुक्तकप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

सूहास's picture

5 Aug 2009 - 6:45 pm | सूहास (not verified)

<<<ही राखी भलतीच मजबूत, बोल्ड आणि आकर्षक (हॉट?) होती! >>
अमान्य ...सौ॑दर्याचा मागमुस ही नसलेली ही केवळ तो॑डाने हॉट आहे असे माझे जाहीर मत आहे..

असो लेख छान..

बाकी मला अकोलकर गाढवाचा लई राग आलाय..अरे, गाढाव हाय म्हुण काय कोणाशी ही लगीन करायच का ??

सू हा स...

आपला अभिजित's picture

5 Aug 2009 - 7:01 pm | आपला अभिजित

बाकी मला अकोलकर गाढवाचा लई राग आलाय..अरे, गाढाव हाय म्हुण काय कोणाशी ही लगीन करायच का ??

अकोलकर कोण??

सूहास's picture

5 Aug 2009 - 9:41 pm | सूहास (not verified)

अकोलकर मनसैनिका॑नी लगन लावुन दिलेला..

सू हा स...

पाषाणभेद's picture

6 Aug 2009 - 2:15 am | पाषाणभेद

अतिशय छान लेख लिहीलास अभिजित. पण दुसर्‍या राखीचा उल्लेख केल्याने विरस झाला. अरे काय (पहील्या) राखीशी काय तुलना होवू शकते काय?

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2009 - 6:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)
या कुंभमेळ्यात आपली "लाइन' ("शाळा'!) आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी सर्वांची धडपड असायची.
हीहीही ....

"महाराष्ट्राची खंत" हे नामकरण भारीच!

रक्षाबंधन लहानपणी सगळे करतात म्हणून घरी व्हायचं. पुढे अक्कलेची शिंग फुटल्यावर मी आणि भावाने परस्परसमजुतीने हे प्रकरण बंद केलं. गेल्या आठवड्यापासून एक नवंच प्रकरण बरोबरच्या पोरांकडून ऐकलं. "तुम मुझे राखी दो(गी तो) मै तुम्हे मंगलसूत्र दूंगा!" या बंगाली बाबूमोशायांच्या डोक्यातून काय उगवेल सांगता नाही येत!

अदिती

आनंदयात्री's picture

5 Aug 2009 - 6:58 pm | आनंदयात्री

>>. "तुम मुझे राखी दो(गी तो) मै तुम्हे मंगलसूत्र दूंगा!" या बंगाली बाबूमोशायांच्या डोक्यातून काय उगवेल सांगता नाही येत!

!!!! .. !!

दशानन's picture

5 Aug 2009 - 7:02 pm | दशानन

>>"तुम मुझे राखी दो(गी तो) मै तुम्हे मंगलसूत्र दूंगा!" या बंगाली बाबूमोशायांच्या डोक्यातून काय उगवेल सांगता नाही येत!

:|

निशब्द !

नाना बेरके's picture

5 Aug 2009 - 7:03 pm | नाना बेरके

ह्या आकर्षक राखीला लग्नाचे फारसे अप्रूप नसेलसुध्दा.
डकवर्थ लु़ईसच्या नियमाप्रमाणे ज्या संघाला कमी गुण, तो हरतो. त्याप्रमाणे, अभिजीत आपला हा जो मेव्हणा आहे ना त्याच्याबाबतीतही अश्याच कुठल्यातरी डकवर्थ लु़ईसच्या नियमाचा वापर होईल, अशीच शक्यता आहे.
आमच्या कट्ट्यावर 'डकवर्थ लु़ईस (D L )चा' अर्थ ढुं..वर लाथ मारुन हाकलून लावला असा केला जातो.

प्रशु's picture

5 Aug 2009 - 8:39 pm | प्रशु

मागे कुटेतरी वाचलेलं होतं...

जोराचा सुटला वारा.
रडु लागले संत,
अवघ्या महाराष्ट्राची खंत..
राखी सावंत.........

बेसनलाडू's picture

5 Aug 2009 - 11:24 pm | बेसनलाडू

अप्रतिम लेखन... आणि अगदी समयोचित, बर्‍याच आठवणींना उजाळा मिळू देणारे वगैरे ... फार आवडले!
(बंधुराज)बेसनलाडू

शाहरुख's picture

6 Aug 2009 - 12:16 am | शाहरुख

>>या कुंभमेळ्यात आपली "लाइन' ("शाळा'!) आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी सर्वांची धडपड असायची.

खि..खि..खि..शाळेत केलेली कॅलक्युलेशन्स आठवली. ;-)

कालेजात असताना (त्या वर्षीची) आपली 'लाइन' राखी बांधायला आली होती.आपण म्हणालो होतो "तू आयुष्यभर नाही बोललीस माझ्याशी तरी मला *ट्ट फरक पडणार नाही..पण असले नाटक बिलकूल चालणार नाही" आणि तिला हाड हाड करून परतवली होती. :-D
तेज्यायला, राखीची ढाल कशाला पुढे करायची ??

बाकी, येवढ्या सुंदर आठवणींत राखी सावंतला ओढून-ताणून आणल्यासारखे वाटले..

आपला अभिजित's picture

6 Aug 2009 - 12:59 am | आपला अभिजित

बाकी, येवढ्या सुंदर आठवणींत राखी सावंतला ओढून-ताणून आणल्यासारखे वाटले..

सुंदर??
आमच्या जखमांवर मीठच चोळताय तुम्ही शाहरुखभाई!
च्यायला, शाळेत असताना ज्या कुणी दोन-चार मुली बोलायच्या माझ्याशी, त्याच समाजभयास्तव राखी पण बांधायच्या!!
(बाकी, राखी बांधतानाच्या वेळच्या हस्तस्पर्शानंही हुळहुळायला व्हायचं, ही गोष्ट अलाहिदा!)
सुंदर आठवणी कसल्या? डोंबलाच्या??

शाहरुख's picture

6 Aug 2009 - 1:22 am | शाहरुख

जखमा तर आम्हालाही झाल्या होत्या अभिजीत भाऊ..पण काळाने मलमपट्टी केल्याने त्या आठवणी आम्हाला आत्ता सुंदर वाटतात.

तुमच्या जखमा जर अजून ताज्या असतील तर वाक्य बदलतो..

बाकी, येवढ्या सुंदर पध्दतीने लिहिलेल्या आठवणींत राखी सावंतला ओढून-ताणून आणल्यासारखे वाटले..

धनंजय's picture

6 Aug 2009 - 1:35 am | धनंजय

मजेदार लेख!