जोधा अकबर

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
19 Feb 2008 - 11:51 am

लगान हा सिनेमा लोकप्रिय झाला त्याबरोबर आशुतोष गोवारीकर या नांवाला एक वलय प्राप्त झाले. अशक्यप्राय वाटणारी एक गोष्ट कथानायक कशी करून दाखवतो ते गोवारीकरांनी या चित्रपटात अत्यंत कौशल्याने प्रेक्षकांच्या गळी उतरवले याचे कौतुक करावे तेवढे थोडे
आहे. त्यानंतर आलेला त्यांचा स्वदेस हा चित्रपटही असाच नाविन्यपूर्ण व अजब घटना दाखवणारा होता. तोही सुपरहिट झाला. त्यामुळे त्यानंतर आलेल्या जोधा अकबर या सिनेमाबद्दल तो प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. त्या बहुतांशी
पूर्ण झाल्या असेच म्हणता येईल.

हे तीन्ही चित्रपट वेगवेगळ्या कालखंडात घडलेल्या घटनांवर आधारलेले असले तरी त्यात कांही समान सूत्रे दिसतात. हे तीन्ही नायकप्रधान चित्रपट आहेत. त्यांत नायिकेला महत्वाचे स्थान असले तरी कथानायकच सतत आपले लक्ष वेधून घेतो. तीन्ही नायक देशप्रेमासाठी सर्वस्वाचा त्याग वगैरे करून त्याला आपले सारे तन मन धन त्याला अर्पण करणारे नसले तरी तीघांच्याही मनात देशाभिमानाची ज्योत प्रज्वलित झालेली स्पष्टपणे दाखवली आहे. तीघेही तत्कालीन रूढी सोडून जगावेगळे कांही करण्याचा ध्यास मनात धरतात, सुरुवातीला आलेल्या अपयशाने गांगरून न जाता खंबीरपणे आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करतात आणि अखेरीस यशस्वी होतात. "प्रयत्नांती परमेश्वर" किंवा "हिंमते मर्दा तो मददे खुदा" या उक्ती सार्थ ठरल्याचे पाहून प्रेक्षकही सुखावतात आणि टाळ्या वाजवून दाद देतात.

तीन्ही नायकप्रधान चित्रपटात नायकाच्या भूमिकेसाठी लोकप्रिय अभिनेत्यांचीच निवड केलेली होती. लगान आणि स्वदेस या पहिल्या दोन सिनेमात नवतारकांना नायिकेची भूमिका देऊन त्यांना तारांगणात आपले स्थान निर्माण करण्याची संधी दिली होती. पण जोधा अकबरचे एकंदर अंदाजपत्रक पाहून त्यातल्या नायिकेची भूमिकासुद्धा एका आघाडीच्या अभिनेत्रीला दिली असावी. इतर सहकलाकारांबाबत मात्र पूर्वीचेच धोरण पुढे चालू ठेवलेले दिसते. कुलभूषण खरबंदाखेरीज इतर कोणत्याही नटाचे नांव त्याची भूमिका पाहून निदान मला तरी आठवले नाही. कोणाकोणाला पाहून "हा सुद्धा लगानमधल्या क्रिकेटच्या टीममध्ये होता" असे अधूनमधून वाटले असेल, पण त्या नटाचे नांव तेंव्हाही कळले नव्हते आणि आताही नाही.

पडदा उघडताच अमिताभ बच्चनच्या भरदार आवाजात मुगल साम्राज्याच्या प्रारंभाचा इतिहास ऐकू येतो आणि त्याची दृष्ये पडद्यावर दिसतात. बाबराच्या भारतावरील चढाईपासून जलालुद्दीन मोहंमदाच्या जन्मापर्यंतचा भाग थोडक्यात सांगून भारतात जन्माला आलेला आणि हिंदोस्तॉँबद्दल मनःपूर्वक आस्था बाळगणारा तो पहिला मुगल सम्राट होता हे सांगितले जाते. पिता हुमायून जीव वाचवण्यासाठी इतस्ततः भटकत असतांना जलालुद्दीनचा जन्म राजपुतान्यातील एका राजपूताच्या घरी होतो म्हणे. अमीरकोट हे त्याचे जन्मस्थान आता पाकिस्तानात आहे एवढी चूकभूल द्यावी घ्यावी. पुढे हुमायुनाचा स्वामीभक्त नोकर बैरामखान मुगलांच्या विखुरलेल्या सेनेला पुन्हा एकत्र आणून त्यांनी गमावलेले राज्य परत मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली करतो आणि आपला अंमल वाढवत नेतो वगैरे सांगितल्यानंतर अशाच एका युद्धाचा प्रसंग पडद्यावर येतो. त्यात नामोहरम झालेल्या राजाला ठार मारण्याची बैरामखानाची सूचना बालक जलालुद्दीन मान्य करीत नाही इथपासून अकबराच्या महानतेच्या दर्शनाला सुरुवात होते.

सर्रास कत्लेआम करून आपल्याला सारा मुल्क जिंकून घेता येणार नाही, त्यासाठी आपली प्रजा आणि इतर राजेरजवाडे यांचेबरोबर स्नेहपूर्वक संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे हे त्याला मनोमन पटलेले असते. त्या अनुसार तो आपले धोरण ठरवतो आणि अंमलात आणतो. त्याचे निकटवर्तीच प्रतिगामी विचारांचे असल्याकारणामुळे त्याला विरोध करतात, प्रसंगी दगाफटकाही करतात, पण तो त्यांना पुरून उरतो आणि आपले स्वप्न पुरे करतो. शहेनशहा जलालुद्दीनला त्याची प्रजाच प्रेमाने 'अकबर' म्हणजे 'सर्वश्रेष्ठ' हा खिताब देते असेही या चित्रपटात दाखवले आहे.

याच राजकीय धोरणाचा एक भाग म्हणून तो आमेरची राजकन्या जोधा हिला पाहिले नसतांना व तिची कसलीही माहिती काढल्याशिवाय तिच्याबरोबर लग्न करण्यास आपली अनुमती देतो. एवढेच नव्हे तर त्याने नकार द्यावा या उद्देशाने तिने घातलेल्या अटी जाहीररित्या मान्य करून हा विवाह घडवून आणतो. अनिच्छेने त्याच्याबरोबर आलेल्या जोधाला तो इतकी चांगली वागणूक देतो की तिच्या मनातला त्याच्याबद्दलचा तिरस्कार मावळतो. तसेच त्यालासुद्धा तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागते आणि त्यांची विवाहोत्तर प्रेमकहाणी सुरू होते. अर्थातच त्याचा अंत सुखद होणार हे ठरलेलेच असते.

इतक्या सरळ सोप्या गोष्टीला आशुतोष गोवारीकरांनी आपल्या प्रतिभेने सुंदर रीतीने फुलवले आहे. त्यासाठी अनेक छोटे छोटे प्रसंग त्यात घातले आहेत. हळुवार प्रेमाचा प्रसंग असो वा घनघोर युद्धाचा असो, तो विलक्षण ताकदीने उभा केला आहे. हत्ती, घोडे, पायदळ, तोफखाना इत्यादींचे इतके प्रभावी चित्रण यापूर्वी कोणी केले नसेल. तसेच राजवाडे, त्यातील महाल वगैरेंची भव्यता पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. यातले कसब नितिन देसाई या दुस-या मराठी माणसाचे आहे. शहंशाह, बेगम, राजे, राण्या आणि इतर राजघराण्यातील व्यक्तींना दागदागीन्यांनी मढवून ठेवले आहे. तसेच त्यांचे भरजरी पोशाख पहाण्यासारखे आहेत. यातल्या कांही गोष्टी उद्या फॅशनमध्ये आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. हा चित्रपट पाहून 'ग्रँड' हाच शब्द मनात येतो.

इतिहासात जोधाबाई हे व्यक्तित्व होते की नाही याबद्दल कांही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर वादविवादही सुरू आहेत. तसेच अकबर बादशहा हा खरोखरीच तेवढा महान नव्हता. हिंदू जनतेची दिशाभूल करण्यासाठी इंग्रजांनी त्याला महानपण चिकटवले असा
आरोपही कांही लोक करतात. इतिहासकारांची एकंदर जिज्ञासू वृत्ती पाहता त्या सर्वांनी कट करून भारतातल्या लोकांना शिकवण्यासाठी मुद्दाम मुगलांचा वेगळा इतिहास लिहिला असेल असे मला वाटत नाही. तो माझा प्रांत नसल्यामुळे त्यावर आपले मत मांडायचा अधिकारही मला नाही.
मुगलेआझम हा सिनेमा आल्यापासून पृथ्वीराज कपूर यांचा बादशहा अकबर आणि दुर्गा खोटे यांची महाराणी जोधाबाई ही प्रौढ वयातली पात्रेच माझ्या डोळ्यासमोर होती. ते तरुण पणी प्रेमी युगल असेल अशी कल्पनाच करवत नव्हती. हा पूर्वग्रह पुसून टाकण्यात हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यशस्वी झाले आहेत. ए.आर.रेहमान यांनी दिलेले सुरेल संगीत अत्यंत श्रवणीय आहे. त्यातली गाणी मुगले आझम मधल्या गाण्यांसारखी अजरामर होतील की नाही यात शंका आहे. सिनेमा पाहतांना मात्र ती कानाला गोड लागतात, त्याचप्रमाणे प्रसंगाला उठाव आणतात.

साडे तीन तास चालणारा हा सिनेमा कंटाळा आणत नाही की झोपवत नाही. प्रेक्षकांना आपल्या खुर्चीवर खिळवून ठेवतो. मी कांही कोणा बेगमेला प्रत्यक्षांत पाहिले नाही की कोणा महाराजाशी कधी माझा संबंध आला नाही. नाटक सिनेमे पाहूनच त्यांची जी कांही
प्रतिमा मनात तयार झाली असेल त्याबरहुकूम सर्व पात्रे हुबेहूब आणि जीवंत वाटतात. तसेच दिल्ली, आग्रा, जयपूर, म्हैसूर वगैरे ठिकाणचे राजवाडे पाहून त्यांची जी भव्यता मनात साठवून ठेवली गेली आहे तसेच सेट नितीनने तयार केले आहेत. दीवानेआम पहातांना
तो शहाजहान याने बांधला असे गाईडने सांगितल्याचे स्मरते. मग तो अकबराच्या काळात कसा आला असले तर्कदुष्ट प्रश्न विचारावे असे मला वाटत नाही. तो किती छान दाखवला आहे हे जास्त महत्वाचे आहे. यातल्या घटना दिल्लीला घडतात की आग्र्याला याबद्दल थोडा
संभ्रम निर्माण होतो. पण तेही एवढे महत्वाचे नाही. तेंव्हा इतिहास व भूगोलाचे ओझे मनावर न बाळगता एक काल्पनिक कथा म्हणून हा चित्रपट पाहिला तर ते नक्की आनंददायी ठरेल.

चित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2008 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जोधा अकबर चित्रपट अजून काही पाहिला नाही, पण आपल्या परिक्षणाने तो पाहण्याचा उत्साह निर्माण झाला आहे.
तटस्थपणे केलेले परिक्षण आवडले हे सांगणे न लगे !!!

अवांतर :- जोधा ही अकबराची सून होती आणि पत्नी सुद्धा अशी एक चर्चा आहे, आपणास काय वाटते ?

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 2:24 pm | विसोबा खेचर

पण आपल्या परिक्षणाने तो पाहण्याचा उत्साह निर्माण झाला आहे.
तटस्थपणे केलेले परिक्षण आवडले हे सांगणे न लगे !!!

हेच म्हणतो! चांगलं लिहिलं आहे...

अवांतर-

राम राम आनंदराव. आमचं मनोगत सुटल्यापासून आज बर्‍याच दिवसांनी आपली भेट होते आहे! तशी एकदा ठाणे कट्ट्याला आपली प्रत्यक्ष भेटही झाली होती.

असो, मिसळपाववर आपल्याला पाहून आनंद वाटला. आता इथेही लिहा निवांतपणे आणि स्वच्छंदपणे...

आपला,
(एक्स मनोगती) तात्या.

आनंद घारे's picture

19 Feb 2008 - 10:27 pm | आनंद घारे

आंतर्जालावर मी गोगलगायीच्या वेगाने भ्रमण करतो. त्यामुळे मला मिसळ पावाचा इतके दिवस पत्ताच लागला नव्हता. आज पहिल्यांदा हे ठिकाण सापडले तेंव्हा त्याचे नांव वाचूनच मला सर्वात आधी तुमची आठवण झाली. तुम्ही नक्की इथे भेटणार असे वाटले. आता मिसळपावाच्या मेजवानीबरोबर कोणता राग ऐकवता आहात?

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 10:34 pm | विसोबा खेचर

आज पहिल्यांदा हे ठिकाण सापडले तेंव्हा त्याचे नांव वाचूनच मला सर्वात आधी तुमची आठवण झाली. तुम्ही नक्की इथे भेटणार असे वाटले.

हो, खरं आहे तुमचं आनंदराव! मलाही जालावर भ्रमंती करताना हे नांव वाचून खूप आनंद झाला आणि मीदेखील लगेचच या संकेतस्थळाचा सभासद झालो! ;)

आता मिसळपावाच्या मेजवानीबरोबर कोणता राग ऐकवता आहात?

आता आहात इथेच तर बोलूया निवांतपणे रागदारीवर. आपणही आपल्या सवाईच्या वगैरे आठवणी इथे लिहा..

तात्या.

जुना अभिजित's picture

19 Feb 2008 - 1:46 pm | जुना अभिजित

इतिहासकथांवर चित्रपट काढणार म्हणजे वाद हे होणारच. आजकाल जात, धर्म या विषयी पूर्वीपेक्षा जास्त संकुचित आणि संवेदनशील झाले आहेत.

दिवानेआम आणि दिवानेखास हे वेगवेगळ्या लोकांशी शहेनशहाला भेटण्यासाठी असणारे कक्ष होते. आणि ते बहुधा प्रत्येक किल्ल्यात किंवा महालात/राजवाड्यात असायचे. उदा आग्रा किल्ला, फतेपूरसिक्री, लालकिल्ला.

सकाळमध्येही श्रीपाद ब्रम्हे यांनी अनुकूल लेख लिहीला आहे.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

एकलव्य's picture

22 Feb 2008 - 10:23 am | एकलव्य

तेंव्हा इतिहास व भूगोलाचे ओझे मनावर न बाळगता एक काल्पनिक कथा म्हणून हा चित्रपट पाहिला तर ते नक्की आनंददायी ठरेल.

चांगला आहे. भव्यता साधली आहे. राजस्थानी थाट मनात भरण्यासारखा आहे. जोधा-अकबरची जोडी ऐश्वर्या-रोशन यांनी जिवंत केली आहे@@ काही वेळा "नाट्य" ओढूनताणून आणल्यासारखे वाटते पण एकूण कथानकास इतिहासाचा टेकू नक्कीच आहे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

5 Mar 2008 - 6:44 pm | डॉ.प्रसाद दाढे

इतिहासात जोधाबाई हे व्यक्तित्व होते की नाही याबद्दल कांही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर वादविवादही सुरू आहेत.
सम्राट अकबराने अ॑बरच्या (कछवाह घराणे) राजा बिहारीमलच्या सुस्वरूप कन्येशी विवाह केला होता जिचे नाव इतिहासास अज्ञात आहे. तिच्यापासूनच अनेक नवसा-सायासाने झालेला पुत्र म्हणजेच 'सलीम उर्फ जहा॑गिर' होय. ही राजपूत कन्या राजा भगव॑तदासाची बहिण व मानसि॑गाची आत्या होती. ती अकबराची लाडकी बायको असून तिला त्याने हि॑दू आचारधर्म वगैरे पाळण्याची पूर्ण मुभा दिली होती. अकबराला आणखी सुद्धा राजपूत राण्या होत्या.
पुढे अकबराच्या शेवटच्या दिवसात सलिमने गादीसाठी बापाविरूद्ध ब॑ड पुकारले तेव्हा मानसि॑गाने सलिमच्या विरूद्ध त्याच्या मुलाची (खुश्रु) बाजू घेतली. तेव्हा मुलाची बाजू घ्यावी की भावाची अशा स॑भ्रमात पडलेल्या त्या राजपूत कन्येने को॓डमारा असह्य होऊन अफू खाऊन आत्महत्त्या केली (१६०४)

आनंद घारे's picture

5 Mar 2008 - 8:31 pm | आनंद घारे

आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. सध्या या विषयावर जो गजहब चालला आहे, कांही राज्यात हा चित्रपट दाखवलासुद्धा जात नाही आहे . या पार्श्वभूमीवर मी खालील वाक्य लिहिले आहे.
इतिहासात जोधाबाई हे व्यक्तित्व होते की नाही याबद्दल कांही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर वादविवादही सुरू आहेत.

डॉ.प्रसाद दाढे's picture

5 Mar 2008 - 8:59 pm | डॉ.प्रसाद दाढे

सोळाव्या शतका॑त घडलेल्या गोष्टी॑बद्दल आज वाद घालणे मला तरी अर्थहीन वाटते..अर्थात तो ह्या लेखाचा विषय नाही. अकबराबद्दल समग्र माहिती 'रवि॑द्र गोडबोले लिखीत 'सम्राट अकबर' ह्या पुस्तकात मिळेल. तुम्ही परिक्षण छान लिहिले आहे..अभिन॑दन

प्राजु's picture

5 Mar 2008 - 11:38 pm | प्राजु

इतिहासात जोधाबाई हे व्यक्तित्व होते की नाही याबद्दल कांही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर वादविवादही सुरू आहेत. तसेच अकबर बादशहा हा खरोखरीच तेवढा महान नव्हता. हिंदू जनतेची दिशाभूल करण्यासाठी इंग्रजांनी त्याला महानपण चिकटवले असा आरोपही कांही लोक करतात.

अकबर हा सम्राट होता. आणि मोंगलांच्या परंपरेला तडा जाणारे अनेक निर्णय त्याने त्याच्या कारकिर्दीत घेतले होते. जसा त्याने जिझिया कर रद्द केला तसेच हिंदूंवर लादला गेलेला यात्रा करही त्याने रद्द केला होता. आणि जिझिया हा कर रद्द केला म्हणजे मुस्लिम धर्म शास्त्रांत त्याने ढवळाढवळ केली असे म्हणावे लागेल. ज्या हिंदूस्थानात आपण आलो तिथे आधीपासून राहणारे हिंदू हे आणि नंतर आलेले आणि स्थायिक झालेले मुस्लिम यांना एकत्र ठेवायचे असेल तर त्यासाठी धर्मशास्त्रही बदलाण्याइतका काळाच्या पुढचा विचार करणारा अकबर होता. इतकेच नव्हे तर अकबराने स्वतः निरक्षर असूनही हिंदू-मुस्लिम, ख्रिश्चन पारशी अशा धर्मांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. त्याच्या "इबादत खाना" या वास्तूमध्ये धार्मिक चर्चा घडत. या चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वधर्मांच्या विद्वानांना आमंत्रणे दिली जात. जनतेच्या हितासाठी त्याने मुस्लिमधर्म गुरूंचे अधिकारही कमी केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. सगळ्या धर्मांच्या अभ्यासातून त्याने स्वतःचा असा दिन्-ए-इलाही हा पंथ स्थापन केला होता. पण तो धर्म्/पंथ स्विकारण्याची त्याने कोणावरही सक्ती केल्याचा पुरावा अथवा उल्लेख इतिहासात नाही. ..
म्हणूनच जोधा-अकबर मध्ये घेतलेले प्रसंग किंवा उल्लेख हे काल्पनिक असावेत असे नाही म्हणता येणार. त्यामुळे या सिनेमावर बंदी घालणे किंवा त्यावर वाद-विवाद होणे म्हणजे एका चांगल्या कलाकृतीला मुकण्यासारखेच आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु