साहित्य- २ वाट्या हरबरा डाळ, ४,५ हिरव्या मिरच्या, १ मध्यम कांदा, १ मध्यम टोमॅटो,चवीनुसार मीठ,१ चहाचा चमचा साखर, तेल, फोडणीचे साहित्य, ओले खोबरे, कोथिंबिर, लिंबू
कृती- डाळ ५/६ तास भिजत घालावी ,नंतर उपसून चाळणीवर घालून स्वच्छ धुवून घ्यावी व भरड वाटावी, वाटतानाच त्यात मिरच्या घालाव्यात.
कांदा व टोमॅटो चौकोनी चिरावेत.
साधारण पळीभर तेलात फोडणी करावी त्यात कांदा व टोमॅटो घालून एक/दोन वाफा आणाव्या,(पोह्यांकरता कांदा घालतो तसे.) नंतर त्यात भरड वाटलेली डाळ घालावी व नीट मिक्स करुन झाकावे व एक वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात मीठ व साखर घालून ढवळावे व परत झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. नंतर त्यात थोडे ओले खोबरे आणि कोथिंबिर घालावी व अजून एक वाफ आणावी.
सर्व्ह करताना थोडा लिंबाचा रस घालावा आणि खोबरे, कोथिंबिरीने सजवावे.
प्रतिक्रिया
19 Jul 2009 - 7:39 pm | प्राजु
मार डाला..!
ही अतिशय लाडकी डीश आहे माझी.
मला आठवतं.. माझ्या लग्नाच्यावेळी ग्रहमका दिवशी जेवणात वाटली डाळ माझ्या आजीने मुद्दाम करायला लावली होती.
यात मी कधी कांदा टॉमॅटो नाही घालून पाहिला पण आता नक्की करेन असा प्रयोग. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jul 2009 - 7:42 pm | रेवती
अरे वा!!
खमंग पाकृ! स्वातीताईने बर्याच दिवसांनी पाकृ टाकली.
ही थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली डाळ दिसते.
शक्यतो सणावारी डाळ करायची वेळ आल्याने कांदा, टोमॅटो (लसूण?) घालायची वेळ आली नाही. आता अश्या प्रकारे करून बघते. मी डाळ वाटताना थोडे ओले खोबरे त्यात घालते व थोड्या दुधात वाटण करते. त्यामुळे शिजल्यावर डाळ फारच मऊ होते. वर दिल्याप्रमाणे फोटू चढवले तर ती प्लेट लग्गेच हातात घ्यायचा मोह होतो. (म्हणजे भरलेली प्लेट म्हणायचे आहे.;))
रेवती
19 Jul 2009 - 8:01 pm | क्रान्ति
आमच्याकडे अनंत चतुर्दशीला ही डाळ करतात कांदा टोमॅटो न घालता. [गणपतीला वाटे लावायचे म्हणून वाटली डाळ करायची अशी प्रथा आहे म्हणे!] आता चातुर्मास संपला की अशा पद्धतीने पण करून पहाते.
फटू मस्त आलाय पण फटूमुळे उपास मोडला ना! ;)
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
19 Jul 2009 - 8:26 pm | शाल्मली
अरे वा!! मस्त पदार्थ. पण मी कधी कांदा-टोमॅटो घालून केली नाही.
आमच्याकडे पण वाटली डाळ गणपती विसर्जनाच्या दिवशी नैवेद्य म्हणून करतात.
--शाल्मली.
19 Jul 2009 - 10:06 pm | नितिन थत्ते
>>कधी कांदा-टोमॅटो घालून केली नाही
मी ही कधी कांदा टोमॅटो घातलेली डाळ खाल्लेली नाही.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
19 Jul 2009 - 10:19 pm | बिपिन कार्यकर्ते
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
बिपिन कार्यकर्ते
19 Jul 2009 - 10:25 pm | लवंगी
लगेच चमचाभर तोंडात टाकाविशी वाटतेय.
20 Jul 2009 - 12:01 am | विसोबा खेचर
स्वाती, मस्तच पाकृ बरं का!
कालच आमच्या म्हातारीने केली होती. सुरेखच केली होती! :)
तात्या.
20 Jul 2009 - 3:14 am | चतुरंग
()चतुरंग [(
20 Jul 2009 - 5:34 am | स्वाती२
स्वाती मस्त दिसतेय डाळ. मी कधी कांदा-टोमॅटो घातला नव्हता. आता तुमच्या पद्धतीने करून पाहीन.
20 Jul 2009 - 6:11 am | सहज
वाटली डाळ आवडता पदार्थ पण कांदा-टोमॅटो घालून कधी केला नव्हता. करुन पाहीला पाहीजे.
धन्यु.
28 Jul 2009 - 10:13 am | श्रीयुत संतोष जोशी
वाटल्या डाळीच्या ओरिजीनल पाकक्रियेमधे कांदा लसूण कधीही घालत नाहीत.
हा !!! आता घातल्यामुळे एक वेगळी चव येईल कदाचित पण तरीही नाही. मूळ पाकक्रिया अशी नाही.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
28 Jul 2009 - 11:23 am | स्वाती दिनेश
वाटली डाळीत कांदा,टोमॅटो घालत नाहीत कारण गणपती विसर्जनासाठीचा प्रसाद म्हणून ती केली जाते, जेव्हा प्रसादाव्यतिरिक्त केली जाते तेव्हा काही जण लसूण घालतात, मी कांदा+ टोमॅटो घालते कारण त्याने छान वेगळी चव येते.
स्वाती
28 Jul 2009 - 12:16 pm | वैशाली हसमनीस
डाळ मिक्सरवर वाटून घेतल्यावर त्यांत थोडे कच्चे गोडे तेल घालावे म्हणजे डाळ मऊ व मोकळी होते असा माझा अनुभव आहे.
28 Jul 2009 - 12:36 pm | सन्दिप नारायन
वाटली डाळ माझ्या बाबाना फार फार आवडची , बाबा गेल्यावर आता
केली जात नाही .वाटली डाळमुळे जुन्या आटवणी जाग्या झाल्या.
संदीप
28 Jul 2009 - 5:32 pm | हरकाम्या
यालाच आमच्याकडे काही लोक " मोकळ पिठल " म्हणतात.
28 Jul 2009 - 5:32 pm | हरकाम्या
यालाच आमच्याकडे काही लोक " मोकळ पिठल " म्हणतात.
28 Jul 2009 - 5:33 pm | हरकाम्या
यालाच आमच्याकडे काही लोक " मोकळ पिठल " म्हणतात.