पुरोगामित्वाची चढाओढ ही तितकी वाईट नाही

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
8 Jul 2009 - 2:45 am

मागे दुसर्‍या एका मराठी संकेतस्थळावर "समलैंगिकता आणि समाज" चर्चा चालू होती, तिथे "डीजे" या आयडीखाली मी पुढील प्रतिसाद दिला होता. (त्या संकेतस्थळावर "धनंजय" हा आयडी उपलब्ध नाही, म्हणून वेगळा आयडी घेतला.) बारीक सारीक बदल करून - म्हणजे मिसळपावावरील माझ्या लेखाचा दुवा देऊन, तो प्रतिसाद येथे देत आहे.

- - -

एका सामाजिक विषयावर चर्चा चलली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे मतमतांतरे ऐकू येत आहेत.
या विषयाच्या अनुषंगाने आत्मकथन मी मिसळपावावर केले आहे. तेच पुन्हा वेगळ्या संकेतस्थळावर करण्यासाठी मला इच्छा नाही.

परंतु या बाबतीत वर एक मत आले आहे, त्याविषयी मला काही सांगावेसे वाटते.

एक प्रतिसादकर्ते म्हणतात :

आजकाल कुठलीही चर्चा झाली की संस्कृती बुडते आहे असे बोंबलणार्‍यांमध्ये जशी स्पर्धा असते. मी किती पुरोगामी आहे हे दाखविण्याची चढाओढ लागली असते.

या बाबतीत मला काही सांगायला आवडेल. माझ्या समलैंगिकतेमुळे संस्कृती बुडते असे अहमहमिकेने सांगणार्‍यांच्या विरुद्ध स्वतःहून माझी बाजू घेऊन कोणी आत्मीयतेने बोलतो याचा मला आधार मिळतो.

मला वाटते अन्य कोणाची चीरफाड होताना त्याचा कैवारी होणे म्हणजे जर पुरोगामित्वाची दांभिक चढाओढ असेल, तर अशा दंभाचा मी समर्थक आहे. जीव वाचवणार्‍याच्या दंभामुळे जीव वाचला म्हणून वाचलेला जीव स्वस्त होत नाही.

हे झाले टोकाचे विधान - "चढाओढ असली तरी चालेल". मुळात कुणाचा कैवार करणे म्हणजे दंभ आहे असे म्हणण्यासाठी काय पाया आहे?

ठीक आहे : समाजात मी दांभिक दिसू नये, अशा प्रकारे संचार कसा करावा, या बाबतीत शिकवण घ्यायला मी तयार आहे. पण वेगळ्या विषयात ही शिकवण मला मिळवू द्या. समजा आमच्या ऑफिसमध्ये एका महत्त्वाकांक्षी बाईची (आणि त्याबरोबर सर्व महत्त्वाकांक्षी बायकांची) नालस्ती होत आहे. काही लोक कोमल-स्त्रीत्वाची संस्कृती बुडते आहे म्हणून बोंब मारत आहेत. उगाच पुरोगामित्वाचा बाऊ करायचा नाही तर मी कसे वागावे? "पूर्वीपासून पुरुषाच्यामागून गुप्तपणे बायका सूत्रे हलवत होत्या, हे आम आहे" असे एकदा म्हणून मग गप्प बसावे काय? मी "मध्यभागी" गप्प बसलो, तर "संस्कृती बुडते" हीच बोंब शिल्लक राहाते. सध्यातरी 'हे नेहमीच चालते' समजून गप्प बसणे मला प्रशस्त वाटत नाही.

कुणाची बाजू हिरिरीने घेऊ शकणे हे मानव्य मूल्य आहे. "चालायचंच" म्हणणार्‍या, मत नसणार्‍या, बहुसंख्यांना तो दिखाऊपणा वाटू शकतो, तरी हे मानाव्य मूल्य जोपासावे, अशी माझी येथील मित्रांना विनंती आहे. अन्य लोकांना मीसुद्धा कधीमधी बुजरेपणा टाकून मदत करावी, अशी वृत्ती मीसुद्धा बाणवावी.

वरील प्रतिसादकर्ता असेही म्हणतो :

जुन्या काळापासून भारतात अम्रदपसंदी किंवा लौंडेबाजी ही अतिशय आम.

राहिला समलैंगिकतेबाबत "लौंडेबाजी"चा उल्लेख. "लौंडेबाजी पूर्वी कधी भारतात आम होती" तशी आजही आहे. लौंडेबाजी करायला अवसर नाही हे काही कारण नाही की भारतात राहाणे मला शक्य नाही. अतिसामान्य तर्‍हेने एकनिष्ठ प्रेम, किंवा एकनिष्ठतेचे ध्येय असलेले अतिसामान्य स्खलनशील प्रेमही, असे काही करण्यास मला भारतात वाव नाही, म्हणून माझा जन्मदेश मला जाचक आहे. उगाच मला आधार देऊन समलैंगिकतेचा बाऊ होईल, असे वाटून "अरे तू ऐतिहासिक प्रकारची आम लौंडेबाजी करून चालवून घे" असे कोणी म्हटले, तर माझे समाधान होण्यासारखे नाही.

- - -

आजकाल मिसळपावावरच्या काही प्रतिसादकर्त्यांच्या सह्या लोकप्रिय झाल्या आहेत त्यांत "समलैंगिकतेचे उदात्तीकरण" करणार्‍यांना व्यंग्यात्मक शैलीत ढोंगी म्हणले जाते आहे. या हेटाळणीने माझ्या (आणि कोणाच्याही) कैवाराला आलेल्यांनी बुजू नये, ही विनंती. उगाच "आपण ढोंगी आहोत का?" या विचारांत गढून स्वतःला दोष देऊ नये. डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो.

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

नंदन's picture

8 Jul 2009 - 3:19 am | नंदन

लेखात मांडलेल्या विचारांशी सहमत आहे. मुळात सतीची चाल बंद करणे, स्त्रियांना मतदाराचे अधिकार देणे इ. सुधारणांना झालेल्या विरोधातील मुद्दे आणि आता घेतले जाणारे आक्षेप यांत कमालीचे साम्य आहे. (संस्कृती बुडणे, समाजव्यवस्थेचा र्‍हास होणे, स्वैराचाराला प्रोत्साहन मिळणे, विवाहसंस्था धोक्यात येणे, आंग्लाळलेल्या समाजाची किंवा मूठभर श्रीमंतांची ढोंगी पुरोगामित्वाची कल्पना इ.)

एकंदरीत उठलेल्या गदारोळावरून 'when they came for me, there was no one left to speak out' ची आठवण येते.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आजकाल मिसळपावावरच्या काही प्रतिसादकर्त्यांच्या सह्या लोकप्रिय झाल्या आहेत त्यांत "समलैंगिकतेचे उदात्तीकरण" करणार्‍यांना व्यंग्यात्मक शैलीत ढोंगी म्हणले जाते आहे. या हेटाळणीने माझ्या (आणि कोणाच्याही) कैवाराला आलेल्यांनी बुजू नये, ही विनंती. उगाच "आपण ढोंगी आहोत का?" या विचारांत गढून स्वतःला दोष देऊ नये. डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो.

हा हा! असल्या सह्यांमुळे लोक मत बदलत असतील तर अश्या लोकांच्या मताला काय अर्थ?

अर्थात अश्या सह्या टाकणार्‍यांच्या वागण्याने मला तरी फक्त हसु येतं.

असो चालायचंच! (;) )

मिसळभोक्ता's picture

8 Jul 2009 - 3:27 am | मिसळभोक्ता

पुरोगामित्वाची चढाओढ वाईट नाही, हे खरेच.

पण इथे किंवा इतरत्र जे बोलताहेत/लिहिताहेत, ते पुरोगामी आहेत की पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेले (नुसते बोलणारे) दांभिक लोक आहेत, हे जोखायला हवे. जिथे विज्ञानसंमेलन भरवण्यासाठी साडेतीन मुहुर्तांपैकी एक शोधला जातो, तिथे असे बुरखेच अधिक सापडणार.

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

आण्णा चिंबोरी's picture

14 Jul 2009 - 6:21 am | आण्णा चिंबोरी

>>पण इथे किंवा इतरत्र जे बोलताहेत/लिहिताहेत, ते पुरोगामी आहेत की पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेले (नुसते बोलणारे) दांभिक लोक आहेत, हे जोखायला हवे.

सर्किटशी पूर्णपणे सहमत!

आण्णा चिंबोरी-->
(पुराणमताभिमानी)

चतुरंग's picture

8 Jul 2009 - 3:37 am | चतुरंग

समाजरचनेमधे काही निराळे रंग असतात (पण ते समाजाचाच भाग असतात) त्या निराळ्या रंगात आपण असणे हे एकप्रकारे विलगीकरण घडते आधी मानसिक आणि मग शारीर पातळीवर. बहुसंख्येने असलेले वैशिष्ठ्य (गैर असले तरी) उदा. "पुरुष म्हणजे स्त्रियांना मारणारच, सगळीकडे असतेच, थोडे सहन करायचे" अशी मानसिकता गैर असली तरी बहुसंख्य म्हणून खपून जाते, खपवून घेतली जाते.
विलगीकरणाचे बळी ठरलेले व्यक्तिमत्व हे अतिशय जाचक परिस्थितीतून जात असते.
आपण वेगळे आहोत ह्या मानसिक कोंडमार्‍यातून आपल्या नैसर्गिक जाणिवांपर्यंत पोचणे, त्या समजून घेणे आणि मग त्याच्याशी प्रामाणिक रहाणे सोपे नाही. त्यापुढे जाऊन ज्या समाजाचा आपण भाग आहोत त्याच्याशी वैफल्याने नाळ न तोडता संबंध टिकवून ठेवणे तर अभिनंदनीयच म्हणायला हवे.
समलैंगिकतेचे उदत्तीकरण करण्याचा प्रश्न इथे नसावा. उदात्तीकरण कुठल्यातरी भव्यदिव्य गोष्टीचे केले जाते. सर्वसामान्य स्त्री पुरुष संबंधांचे कोणी उदात्तीकरण करीत नाही तसेच ह्याचेही असू नये. हेही नैसर्गिकच आहे पण तुलनेने कमी आढळत असावे इतकेच.
बाकी सह्यांबद्दल फारसे काही बोलण्यासारखे नाही! नदीच्या कोणत्या तीरावर तुम्ही आहात त्याप्रमाणे तुम्हाला दृष्य दिसणार.

चतुरंग

अनामिक's picture

8 Jul 2009 - 4:18 am | अनामिक

समलैंगिकतेचे उदत्तीकरण करण्याचा प्रश्न इथे नसावा. उदात्तीकरण कुठल्यातरी भव्यदिव्य गोष्टीचे केले जाते. सर्वसामान्य स्त्री पुरुष संबंधांचे कोणी उदात्तीकरण करीत नाही तसेच ह्याचेही असू नये. हेही नैसर्गिकच आहे पण तुलनेने कमी आढळत असावे इतकेच.

अगदी हेच म्हणतो.

-अनामिक

शलाका's picture

8 Jul 2009 - 3:39 am | शलाका

समलैंगिकतेचे उदात्तीकरण" करणार्‍यांना व्यंग्यात्मक शैलीत ढोंगी म्हणले जाते आहे. या हेटाळणीने माझ्या (आणि कोणाच्याही) कैवाराला आलेल्यांनी बुजू नये, ही विनंती. उगाच "आपण ढोंगी आहोत का?" या विचारांत गढून स्वतःला दोष देऊ नये.

असेच म्हणते.

मिसळपाववर हे लोक कोण आहेत ते सगळ्यांना ठाउक आहे. इथेही आता उच्चभ्रु उच्चभ्रु करत यथेच्छ टवाळी करायला हे लोक येतीलच. बरं काही तक्रार असेल तर मुखपृष्ठावरच मालकांनी चपला घालुन बाहेर पडायला सांगीतले आहे. त्यामुळे ह्या सोशल न्युसन्स असणार्‍या प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करावे आणि स्वत:ला दोष देऊ नये हे उत्तम.

विसोबा खेचर's picture

8 Jul 2009 - 9:09 am | विसोबा खेचर

बरं काही तक्रार असेल तर मुखपृष्ठावरच मालकांनी चपला घालुन बाहेर पडायला सांगीतले आहे.

अहो ते इतक्या सिरियसली घेऊ नका हो! :)

तो संदेश मिपाला उठसूठ, मुद्दामून नावे ठेवणार्‍यांकरता आहे!

धन्यवाद,

तात्या.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

8 Jul 2009 - 5:16 am | कालिन्दि मुधोळ्कर

धनंजय यांचे सर्व मुद्दे आवडले. तुमच्या संयमितपणाला सलाम.

>>अतिसामान्य तर्‍हेने एकनिष्ठ प्रेम, किंवा एकनिष्ठतेचे ध्येय असलेले अतिसामान्य स्खलनशील प्रेमही, असे काही करण्यास मला भारतात वाव नाही, म्हणून माझा जन्मदेश मला जाचक आहे.

संस्क्रुतीच्या गप्पा मारणार्यांनी आणि पुरोगाम्यांना नावे ठेवणार्यांनी वरचा परिच्छेद वाचावा.

पुरोगामी लोकांना हिणवले की मग माझे पुरूष्/स्त्री/भिन्नलिंगी/उच्च्वर्णिय्/श्रीमंत/विवाहित असणे म्हणजे काय, आणि त्यामुळे त्या कळपात जे नाहीत त्यांच्या मुलभूत हक्कांचे, त्यांच्या स्व्प्नांचे, प्रेरणांचे काय असे विचार करण्यातून सुटका होते.

>>स्वाक्षर्‍यातून बौद्धिक दारिद्र्याचे प्रदर्शन मांडणार्‍या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करावे.
सहमत.

अवांतरः माझी सही: ज्या दिवशी विवाहसंस्था कोसळेल त्या दिवशी मी ब्रेक-डान्स करेन.

वजीर's picture

8 Jul 2009 - 5:28 am | वजीर

धनंजयांचे मनोगत आवडले. काहीतरी बिनडोक स्वाक्षर्‍या करणारर्‍यांची कीव करावी आणि दुर्लक्ष करावे हेच उत्तम. कारण ह्यांच्याशी वाद घालायला गेल्यावर कपडे तुमचेच घाण होणार आहेत.

--वजीर

------
डुकराशी चिखलात कधीही कुस्ती करु नये. तुमचे कपडे घाण होतातच डुकराला मात्र त्यात मजा मिळत असते.

नंदन's picture

8 Jul 2009 - 6:33 am | नंदन

ही चर्चा धनंजयांनी मांडलेल्या विचारांवरच असू द्यावी, असं मला वाटतं. स्वाक्षरीवरून किंवा वेगळ्या मतावरून वैयक्तिक ताशेरे कृपया ओढू नयेत, नाहीतर त्यामुळे चर्चेला जी अनावश्यक वळणे लागतात ती बहुतेक सर्वांना परिचित असावीत. मतस्वातंत्र्यासाठी भांडताना, तुमच्या विरोधी गटाच्या मताचा (भले मग ते तुमच्या दृष्टीने मत नसून पूर्वग्रह, हेकेखोरपणा इ. असो) आदर करणेही महत्त्वाचे. नाहीतर कट्टरपणाविरूद्ध झगडताना दुसर्‍या टोकाचा कट्टरपणाही येऊ शकतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास's picture

8 Jul 2009 - 8:17 am | विकास

धनंजयने केलेले मनोगत चांगलेच आहे. त्यातल्या त्याच्या भावना आणि त्यांचे संयमित प्रदर्शनपण पूर्णपणे समजू शकतो आणि त्यांच्याशी सहमतच आहे.

>>अतिसामान्य तर्‍हेने एकनिष्ठ प्रेम, किंवा एकनिष्ठतेचे ध्येय असलेले अतिसामान्य स्खलनशील प्रेमही, असे काही करण्यास मला भारतात वाव नाही, म्हणून माझा जन्मदेश मला जाचक आहे.<<
असे म्हणणे हे भारतातील कुठल्याही नात्याच्या (समलिंगी/भिन्नलिंगी) संबंधात वाटते की केवळ समलिंगीसंबंधात?

नंदनने म्हणल्याप्रमाणे चर्चा ही त्या स्वाक्षर्‍यांवर अथवा वैयक्तिक होवू नये असे वाटते. इथे वैचारीक लिहीले, टिकात्मक लिहीले तरी कोणी वाचक स्वतःची मते बदलत नाही, तर स्वाक्षर्‍या वाचून बदलेल असे खरेच वाटते का? :)

चतुरंगने "उदात्तीकरणाचा" प्रश्न आणला आहे आणि तो मात्र मला मान्य आहे. कुणाचेच (सम/भिन्न) उदात्तीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही असे वाटते. त्याच संदर्भात असे वाटते की जर मी या संदर्भात समलिंगींच्या विरोधात बोललो नाही आणि समजून घेतले तर याचा अर्थ मी कैवार घेतो असा असतो का? कदाचीत नाही तर असेही असू शकते इतके वैज्ञानिक सत्य म्हणून मान्य करण्याचा कदाचीत दृष्टीकोन त्यात असेल.

आता वैयक्तिक स्तरावर (म्हणजे येथे धनंजय संदर्भात): आधी मी एक थोडे वेगळे उदाहरण देतो. मी अमेरिकेतील स्वतःला खूपच लिबरल समजणार्‍या राज्यात मॅसेचुसेट्स मधे रहातो. सर्वांना समान वागवणे वगैरे.. पण मग कोणी गोरा अमेरिकन माझ्याशी मी केवळ एक (इथला) अल्पसंख्य आहे, दुसर्‍या वंशाचा आहे म्हणून स्पेशल ट्रीटमेंट देत जास्तच मैत्रीपूर्ण वागला/वागली तर मला ते आवडत/णार नाही. कारण त्यात "समान/इक्वल" वागणूक नसून फुकटची सहानभुती अर्थात स्वतःचा (त्यांचा) अहंकार सुखावण्याची (मी कसा/शी लिबरला आहे) धडपड असते असेच वाटेल. मला तसेच या संदर्भात वाटते. मी जेंव्हा धनंजयशी संवाद करतो आणि या संदर्भात पण सपोर्टीव्ह लिहीतो तेंव्हा त्यात कैवार नसावा, सहानभूती नसावी तर पूर्ण एका व्यक्तीचा दुसर्‍या व्यक्तीशी बुद्धीवादाने (इंटलेक्चुअल) संवाद अथवा विरंगुळा (टाईमपास) असेल असेच वाटले पाहीजे.

आता सरते शेवटी एक प्रश्नः माझा तर यासंदर्भात कधी विरोध नव्हता/नाही. कोर्टाचा निर्णय देखील स्वागतार्हच वाटला. पण मी तर टाळकुट्या, हिंदुत्ववादी माणूस...सुडोसेक्युलर्स/बुद्धीभेदी वगैरे शब्द सातत्याने वापरणारा. थोडक्यात पुरोगामी स्वत:ला समजू शकत नाही की पुरोगामी तसे मला समजणार देखील नाहीत (माझी तक्रार नाही ;) ) पुरोगामित्वाच्या चढाओढीत तर मी त्यामुळे असूच शकत नाही असे वाटते...पण मग आता मी स्वत:ला काय म्हणावे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2009 - 8:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे, पण संस्कृतीच्या नावाखाली काही धूर्त लोक ज्ञानी /अज्ञानी लोकांवर सतत सामाजिक दडपण टाकत असतात, आणि प्रगतीच्या वाटा खुंटतात या शंकाच नाही. सारासार विचार करण्याची शक्ती माणूस गमावून बसतो. जरासे विषयांतर होत आहे, पण लिहिण्याचा मोह आवरत नाही. शुद्रादी-अतिशूद्र आणि स्त्री-पुरुष भेद, हे दैवाने निर्माण केलेले आहे, नव्हे तर धार्मिक ग्रंथात ईश्वराने ते स्वतः सांगितलेले असल्यामुळे तसेच वागले पाहिजे, यासाठी हट्ट धरणारी मंडळी याच समाजात होती,आहे. पण ग्रंथात आलेले विचार किती भाकड आहेत,बनावट आहेत, हे सांगण्यासाठी विचारवंताना कितीतरी प्रबोधन करावे लागले. ते आपण सर्वांना ज्ञात आहे.

आज एखादा विचार समाजाला मान्य नसेल, तो प्रश्न तितक्या प्रमाणात कोणाच्या घरात नसेल, पण मानसिक गरज काय असते ते एखाद्या संस्कृत रक्षकाच्या घरी असा एखादा अनुभव असल्याशिवाय त्याची अनुभूती त्यांना येणार नाही, त्यांची वटवट बंद होणार नाही,असेही वाटते. काही संस्कृत अभिमानी लोक नीतीविषयक गप्पा हादडण्यात फार पुढे असतात. अर्थात अशा लोकात त्यांचा कावेबाजपणा दडलेला असतो, हेच लोक अतिशय लवचिक धोरणाचा स्वीकार करणारे असतात. कोणत्याही पुरोगामी विचारामुळे संस्कृती बूडत नसते, या धनंजयाच्या विचाराशी मी सहमत आहे.....!

खरं तरं, अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात. ज्यामुळे संस्कृती बूडते, तोच अभिमान आपण बाळगला असता तर आपण कितीतरी वर्ष मागेच राहिलो असतो, वो बाते फिर कभी !!!

अवांतर : स्वाक्षरीचे फार मनावर घेऊ नये, तो निव्वल टाईमपास असतो :)

-दिलीप बिरुटे

सहज's picture

8 Jul 2009 - 9:02 am | सहज

मुळ लेख, बिरुटेसरांचा प्रतिसाद याच्याशी सहमत आहे.

जे योग्य वाटते त्याबद्दल भुमीका घेणे जसे नैसर्गिक तसेच तारतम्य ठेवून खुलेपणाने दुसर्‍या बाजुचा प्रतिवाद ऐकुन, खातरजमा करुन परत आपल्या मतात योग्य तो बदल करणे हे देखील तितक्याच आपसूकपणे करता आले पाहीजे.

समलैंगीकतेबद्दल जे काही वाचले, ऐकले आहे त्यावरुन समलैंगीकता ही नैसर्गीक आहे असेच समजले आहे. त्यामुळे त्यावरुन एखाद्या व्यक्तिचा नैसर्गिक हक्क हिरावणे किंवा त्यावरुन दुजाभाव करणे पटत नाही. निदान असे वाटावे इतका तर २१व्या शतकातील मानवी उत्क्रांतीचा प्रवास झाला असला पाहीजे.

आनंदयात्री's picture

8 Jul 2009 - 8:59 am | आनंदयात्री

धनंजय तुझे म्हणने नेहमीच पटत आले आहे. मिपासारख्या संस्थळांवर आपण भावनिकदृष्ट्या जोडले गेलेलो आहोत, तु इथे प्रकट रुपाने समलैंगिक म्हणुन वावरतोस, त्यामुळे तुला त्या सहीने क्लेष होणे स्वाभाविक आहे.
राहिला प्रश्न आंतरजालावर असलेल्या स्युडो पुरोगामित्वाचा. याची चढाओढ नक्कीच वाईट आहे, त्यावर सवडीने लिहीनच.

विसोबा खेचर's picture

8 Jul 2009 - 9:15 am | विसोबा खेचर

डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो.

उत्तम प्रकटन...

धन्याशेठला सलाम...

तात्या.

यशोधरा's picture

8 Jul 2009 - 9:43 am | यशोधरा

नंतर शांतपणे वाचते. घाईगडबडीत नीट वाचून होणार नाही...

सुनील's picture

8 Jul 2009 - 10:16 am | सुनील

डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्‍या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो.
क्या बात है!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ's picture

8 Jul 2009 - 10:42 am | विजुभाऊ

समलैंगीकता आणि त्यास कायद्याने मान्यता हा एवढा मोठा गहजब करण्या एवढा किंवा जग बुडी एवढा मोठा विषय आहे असे मला वाटत नाही.
ती बाब अत्यन्त वैयक्तीक आहे. समलैंगीक असणार्‍या व्यक्तीचे कार्य आयुष्य तशा नसलेल्या माणसाइतकेच महत्वाचे असते
पोटापाण्यासाठी त्याना ही काहितरी व्यवसाय करावयाचा असतो
तूलनाच करायची झाली तर माझ्या सोबत असणारा एखादा/एखादी त्याच्या आलेल्या मूळव्याधीच्या मोडावर काय उपाय करतो याने मला असा काय फरक पडतो.
उद्या अमिताभ बच्चनने त्याला जांघेत होणार्‍या खरजेवर कोणते मलम लावावे यावर सबसे तेज वाहिनीने एस एम एस पाठवून कौल घेण्यासारखे आहे.
एखादा समलैंगीक सम्बन्ध ठेवतो/ठेवते म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे वेगळी आहे असे नाही. तो भाग त्याच्या आयुश्याचा एक छोटासा हिस्सा असतो.
निदान तो कबूल तरी करत असतो. लैंगीकता त्याचे आयुष्य व्यापून टाकत नसते. त्याचे कार्य विश्व इतरांसारखेच असते
रजनीश एके ठीकाणे म्हणतात की ब्रम्हचारी हा नेहमीच पाखंडी असतो. त्याच्या डोक्यात लैंगीक कामांध विचार जेवढे येतात तेव्हढे एका दहा राण्या असणार्‍या राजाच्याही मनात येत नाहीत.
स्वभावतः असणारी नैसर्गीकता जे नाकारतात ते स्वतःलाच फसवत असतात
भारतातली संस्कृती इस्लामी /ब्रीटीश आक्रमणापूर्वी मोकळी होती.
सम्भोग आणि कामवासना हे टाकाऊ त्याज्य असे मानले जात नसे.म्हणून तर खजुराहो सारखी शिवशिल्पे झाली.
"ब्रम्हचर्य म्हणजे जीवन आणि वीर्यनाश म्हणजे मृत्यू" ह्या आणि असल्या कल्पनाच खरेतर अनैसर्गीक आहेत

नंदा's picture

8 Jul 2009 - 1:24 pm | नंदा

इथे तुमचा लैंगिकता म्हणजे केवळ शयनगृहात, खाजगीत केलेली शरीरभोगाची क्रिया असा गोंधळ होत असावा. जेंव्हा कार्यालयात तुंम्ही सहकार्‍याला सहज म्हणता की, 'परवा अर्ध्या दिवसाची रजा टाकतो, ही चिरंजीवांना घेउन काही दिवसांसाठी माहेरी जाणार आहे, त्यांना स्टेशनवर गाडीत बसवून मग परस्पर ऑफिसला येइन', तेंव्हा तुम्ही विषमलिंगी आहात, तुमची साथीदार एक स्त्री असून विषमलिंगी विवाहसंस्थेवर आधारलेले असे तुमचे सहजीवन आहे, त्यापासून तुम्हाला अपत्य आहे, वगैरे गोष्टी अनुस्यूत असतात. त्या मुद्दाम सांगाव्या लागत नाहीत कारण त्या तुंम्हाला न विचारता गृहित धरल्या जातात. हे गृहितक बरोबर असल्यामुळे तुम्हाला त्यावर आक्षेपही नसतो. पण समलैंगिक लोकांना अशा गृहितकांचा जाच होण्याचीच शक्यता अधिक. हा केवळ समलैंगिक लोकांचाच प्रश्न नाही, तर कोणत्याही बहुसंख्यांच्या समूहात राहणार्‍या कोणत्याही अल्पसंख्यांचा आहे. त्यामुळे अशा अल्पसंख्य समूहाला आपले किमान अस्तित्व ते हक्क या सर्व आघाड्यांवर जागरुक आणि झगडत राहावे लागते, आपल्या वेगेळेपणाची खासकरून जाणीव करून द्यायला लागते. नाहीतर अस्तित्वच नाकारून बहुसंख्यांत 'स्वाहां' (असिमिलेट) होण्याचा धोका असतो. म्हणून एखादा समलिंगी त्याची समलैंगिकता चव्हाट्यावर आणतो, त्याबाबतीत चर्चा घडवून आणतो, ते तो शयनगृहात, खाजगीत काय काय करतो हे सांगण्यासाठी नव्हे, तर तुमची त्याच्या संदर्भातली गृहितके बरोबर करण्यासाठी!

प्रतिसादाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट करू इच्छितो की केवळ पुरोगामित्व दाखवायचे म्हणून समलैंगिकतेला समर्थन द्यावे या मताचा मी नाही.

धनंजयाचा कोणार्कशिल्पे हा लेख/(प्रकटन) वाचला तेव्हा प्रथम मला धक्काच बसला होता. या विषयावर गंभीरपणे विचार करण्याला मी कचरत होतो. पण धनंजयसारखा माणूस जेव्हा एखादे स्वानुभवाधारीत प्रकटन लिहितो तेव्हा ते चिंतनीय असते. या सामाजिक विषयाबद्दल विचार करण्यास त्या लेखाने भाग पाडले. माझ्या मनात असलेला 'बुजरेपणा' नाहीसा झाला. त्यामुळे समलैगिकता मला समर्थनीय नसली तरी मी तिचा विरोधकही नाही हे मला कळून चुकले.

याउप्पर हेही खरे की समलैगिकता एक नैसर्गिक (उपजत) प्रेरणा आहे असे मान्य केले तरी हिरीरीने सरसकट समलैंगिकतेचा कैवार घ्यावा असेही मला वाटत नाही.
जसे - या आणि अशा काही लोकांच्या मते "बहुसंख्य पुरुष नैसर्गिकरित्या बहुस्त्रीगामी असतात आणि एकपत्नीत्वाचा कायदा हा नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे. कोणी किती लग्ने करावीत हे ज्याचे त्याने ठरवावे." या मताला पौराणिक,प्रागैतिहासिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांख्यिकी आणि वैज्ञानिक ;) आधारही देता येतील. पण या मताचा हिरीरीने कैवार घ्यावा असे मला वाटत नाही.
एखाद्या एकाकी व्यक्तीवर सामुहिक हल्ला होत असेल तर तिचे हिरीरीने संरक्षण करणे हे मानव्य मूल्य आहे हे मला मान्य आहे. पण त्या अगोदर त्या व्यक्तीची बाजू न्याय्य आहे हे मला पटले पाहिजे. ती व्यक्ती आपल्या अनुक्रमे माहितीची, ओळखीची, निकटची,नातेसंबंधातील, घनिष्ट असेल तर तिचे संरक्षण करण्यात मानव्य मूल्य कमी होते असे मला वाटत नाही. येथील उदाहरणात धनंजय या व्यक्तीशी माझा परिचय आहे आणि त्याची बाजू न्याय आहे हे मला पटले आहे. म्हणून केवळ या उदाहरणापुरता मी त्याची बाजू हिरीरीने घेऊ शकतो. पण हेच सूत्र सरसकट सर्वच उदाहरणात लागू होईलच असे नाही.

समलैगिकतेबाबत अजूनही अनेक मुद्दे माझ्यासाठी संदिग्ध आहेत. ते कुणा इतरेजनांच्या अनुभवांच्या वाचनातून कदाचित स्पष्ट होतील. असे झाल्यास सरसकट सर्वच समलैंगिकांची बाजू घ्यायची की तिला काही 'जर..तर' जोडायचे हे निश्चित करता येईल.

तोवर माझ्या पुरोगामित्वाची धाव केवळ धनंजय या एकाच व्यक्तीची वैयक्तिक मनोधारणा मान्य करण्यापुरती मर्यादित असेल. त्यामुळे पुरोगामित्वाची चढाओढ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jul 2009 - 2:43 pm | परिकथेतील राजकुमार

अग्ग बाब्बो !!

ओ धनु शेठ अहो आमची सही म्हणजे मिपावर चालु असलेल्या मारामार्‍या, वाद ह्यांची टिंगल करणे येव्हड्याच उद्देशाने बनवलेल्या आहेत. त्यामुळे कोणी दुखावले असल्यास मी जाहीर माफी मागतो.

ह्या सह्यांमागचा उद्देश केवळ आणी केवळ करमणुक, थट्टा हा आहे.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º

नविन सहीच्या शोधात.

आमचे राज्य

अवलिया's picture

8 Jul 2009 - 3:01 pm | अवलिया

लेख उत्तम आहे.

धनंजयशेट माझे मित्र आहेत. त्यांची माझी विविध विषयांवर खरड वा व्यनीतुन चर्चा होत असते तसेच क्वचित ते माझ्या लेखांना प्रतिसाद देतात तेव्हा माहितीची देवाणघेवाण होत असते. या सर्व प्रक्रियेत त्यांच्याशी एक सुहृद म्हणुनच बघत असतो याविषयी ते सुद्धा मान्यता देतील अशी खात्री आहे.

त्यांचा बहुचर्चित लेख आला तेव्हा माझे आणि त्यांचे संभाषण झाले होते, पण त्या धाग्यावर मी प्रतिक्रिया दिली नव्हती कारण मला काहिही वेगळे वाटले नव्हते (पण मला काही शंका आल्या होत्या, त्यांचे निरसन मी करुन घेतले होते) आणि मी वास्तव लगेच मान्य केले होते.

बाकी, सह्यावरचा थट्टा मस्करी करण्यासाठी वापरला जाणारा मजकुर धनंजयसारखी प्रगल्भ विचाराची व्यक्ती वैयक्तिक घेवुन मनाला लावुन घेते हे मला मात्र बुचकळ्यात टाकणारे आहे. असो.

धनंजयांचा आदर राखुन मी ती बहुचर्चित सही वापरणे बंद करत आहे.

त्यांच्या भावनांना झालेल्या इजेबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागतो आणि त्यांनी उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी अशी केवळ विनंती करतो... क्षमा करणे न करणे हा केवळ आणि केवळ त्यांचाच अधिकार आहे.

--अवलिया

विनायक प्रभू's picture

8 Jul 2009 - 7:49 pm | विनायक प्रभू

जाहीर माफी मागितल्यावर प्रश्नच संपतो.

धनंजय's picture

8 Jul 2009 - 9:23 pm | धनंजय

लांब प्रतिसाद देताना ही पोच देण्यास माझ्याकडून उशीर होऊ नये.

भावना दुखावल्याबद्दलची माफी मागितलीत हे तुमचे मोठे मन. अर्थातच माफी आहे.

शंका, वेगळे विचार, हे सर्व असण्याबद्दल तर माफी देण्याघेण्याचा विचारही नको. पटवणे-पटणे हीच भाषा योग्य आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jul 2009 - 4:39 pm | प्रकाश घाटपांडे

मला वाटते कि बरेचसे प्रतिसाद हे त्यावेळी उमटणार्या तरंगातुन प्रतिक्षिप्त क्रिये सारखे आलेले असतात. ते खुप विचारपुर्वक च दिलेले असतात असे नव्हे. समलैंगिकता हा विषय किमान आता चर्चिला तरी जातो आहे. मुळात लैंगिकता हाच विषय भारतीय समाजात फारसा बोलला जात नाही. समलैंगिकतेचे प्रमाण हे अत्यल्प असल्याने (हे तर्काच्या आधारे संख्याशास्त्रीय पुरावा नाही) ते 'वेगळेपण' पचवणे बहुसंख्यांना जड जाते. टवाळकी , अवहेलना,कुत्सितपणा, डिवचणे इ. प्रकार त्यातुनच निर्माण होतात.
एखादा भांबावुन वस्तु शोधताना इकड तिकडे पाहु लागला कि त्याला इतर म्हणतात " ए आंधळ्या अरे तुझ्या समोर बघ कि....." असे म्हणताना आपण अंधजनांची अवहेलना करतो आहे अशी भावना नसते. ती परंपरागत नकळत झालेल्या संस्कारांचा भाग असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ's picture

8 Jul 2009 - 9:02 pm | लिखाळ

सहमत आहे. लेख छान.

विसुनानांचा प्रतिसाद वेगळाच आणि छान वाटला. (याचा अर्थ प्रत्येक मुद्द्याशी सहमती नाही.) नंदा यांनी जे म्हटले आहे की आपण भिन्नलिंगत्व गृहित धरतो ते सुद्धा बरोबर. उदात्तीकरण होते असे नाही पण भिन्नलिंगी जोडप्याला मान मिळतो. बहुधा कोणार्क शिल्पे या लेखावरच्या प्रतिसादांत यावर चर्चा झाली आहे.

नलाने हंसाला पकडल्यावर हंस म्हणाला की बायको एकटी आहे आई म्हातारी आहे असे ऐकल्यावर नळराजा हेलावला. हीच सहानुभूती त्या हंसाला 'माझा मित्र मानसरोवरापाशी वाट पाहत असेल' असे म्हटल्यावर मिळाली असती का? असा प्रश्न पडतो. (स्त्री-पुरुष जोडीला जी मान्यता सहानुभूती मिळते ती समलिंगी जोडीला मिळत नसावी असे मला वाटते.)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

या धाग्यावरती सर्वांनीच अत्यंत गंभीरपणे विचार करून प्रतिसाद दिले आहेत. सर्वांनाच चर्चेची खोली वाढवण्याबाबत धन्यवाद. अनेकांनी मूळ लेखातील मुद्द्यांना विस्तारित केलेले आहे, किंवा अनुमोदन केलेले आहे, त्यात सर्वश्री नंदन, नाईल, चतुरंग, विसोबा खेचर, कर्क, कालिंदी, वजीर, दिलिप बिरुटे, सहज, लिखाळ यांचे विचार आहेतच. विजुभाऊ आणि नंदा यांनी नैसर्गिकता आणि समावेशन (ऍसिमिलेशन) या बाबतीत चर्चा पुढे नेली. अनेकांनी दुर्ल़क्ष करणेच योग्य हे सांगितले. उदाहरणार्थ प्रकाश घाटपांडे यांनी योग्यच सांगितले, की "ए आंधळ्या" म्हणणारे लोक जाणूनबुजून अवहेलना करत नसतात - आणि हीच बाब परिकथेतला राजकुमार आणि अवलिया यांनी सांगितली.

लेख कशाबद्दल नाही -
हा लेख हळवेपणाने "मी दुखावलो" असे म्हणणारा नव्हे. "तू गोरा का काळा, तुझे कोकणी उच्चार घाटी लोकांसारखे गचाळ" असल्या चिडवाचिडवीला हसतखेळत कसे सामोरे जायचे, तरीही मित्रत्व कसे ठेवायचे, त्याचे प्रशिक्षण शाळेतच प्राप्त होते.

खरे उद्दिष्ट्य दोलायमान समर्थकांना आभार पोचवणे
खरे तर येथे आनंदयात्री यांनी थोडक्यात मर्म जाणले, की हा लेख डिवचले जाण्याबद्दल नाही, मात्र काही प्रमाणात पूर्णपणे न पटूनही पुरोगामित्व दाखवणाऱ्यांबाबत आहे. त्यांना हे वागणे स्युडो वाटते. मला मात्र हे वागणे समाजाच्या बदलातील केवळ एक टप्पा वाटतो. माझ्या लहानपणी ज्या ठिकाणी आम्ही राहात होतो, तिथे आमच्या पोटजातीतील आम्ही एकमेव कुटुंब होतो. शेजाऱ्यापाजाऱ्यांशी आम्हा मुलांनी उगाच वेडेवाकडे बोलू नये, म्हणा, किंवा शाळेतील शिकवणीशी उगाच का भांडावे म्हणा... आमच्या घरात "जात" या विषयावर आम्ही मुलांनी फारसे काही ऐकले नाही. पुढे चुलत-मामेभावंडांची लग्ने होऊ लागली तशी घरच्यांच्या बोलण्यात अधूनमधून क्वचित आंतरजातीय विवाहांविरुद्ध काही ऐकू आले. कोणी अगदी काटेकोर फुटपट्टी नेईल, तो म्हणेल की आमच्या कुटुंबातले वडीलधारे लोक खोटार्डे होते. मी म्हणेन की त्यांचा खोटेपणा अत्यंत क्षम्य स्वरूपाचा होता, कारण त्यांच्या (थोड्याशा) सोंगामुळे पुढच्या पिढीपर्यंत आदला कट्टरपणा पोचला नाही.

लेखातील मानव्य मूल्य खरेच जरुरीचे आहे का?
विकास आणि विसुनाना यांनी लेखातील मुद्द्याला सीमा असावी, असा विचार पुढे नेलेला आहे. विकास आपला अनुभव सांगतात :

पण मग कोणी गोरा अमेरिकन माझ्याशी मी केवळ एक (इथला) अल्पसंख्य आहे, दुसर्‍या वंशाचा आहे म्हणून स्पेशल ट्रीटमेंट देत जास्तच मैत्रीपूर्ण वागला/वागली तर मला ते आवडत/णार नाही.

अंततोगत्वा ही भावना माझीही आहे. परंतु शारिरिक इजा न होता आत्मसन्मानाची भावना जोपासणे शक्य आहे अशा ठिकाणी मी राहातो. आज भारतात मला ते शक्य आहे का? बरेच पैसे असले तर होय, शक्य आहे. पण याला धनदांडगेपणा म्हणावा. अजून दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो काय निर्णय असेल तो लोकसभा उलथवू शकते.

हा कायदा कुठे वापरला जातो? ज्यांच्याकडे अगदी थोडासुद्धा पैसा आहे त्यांना धाक दाखवून पैसे उपटण्यासाठी. नाहीतर अटक करून शिपायांकडून बलात्कार करून मग सोडून देण्याकरिता. (कोर्टापर्यंत ही प्रकरणे जातच नाहीत.) मी त्या परिस्थितीत असतो तर? कधी बलात्कार होत असताना कोणी "दिखाऊ दयावानाने" मला सोडवले, तर त्या दयेला ठोकरून आत्मसन्मानाचा उदो-उदो करण्याइतपत मी मूर्ख नाही. "कैवारी" हा एक चांगला शब्द म्हणून आंबेडकरांनी दोन वेगवेगळ्या वेळेला वापरलेला मी हल्लीच वाचला आहे. एक त्यांनी वापरला राजारामशास्त्री भागवतांबाबत, आणि एक त्यांनी वापरला ज्योतिबा फुल्यांबाबत. पैकी राजारामशास्त्री भागवत फार-फारतर पोटजातींमध्ये लग्ने व्हावीत इतपतच म्हणणारे सुधारणावादी होते. स्वत:हून त्यांचे लग्न पोटजातीच्या आतच झाले होते. त्यामुळे त्यांना "स्यूडो" म्हणावे का? केसरी वर्तमानपत्राने त्यांची निर्भर्त्सना केली, तेही आहेच. पण तरीही "कैवारी" म्हणून भागवत-शास्त्रीबोवांचा आधार घेण्यालायक होताच.

समाजाच्या प्रवाहाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कधी कैवाराचे मनापासून आभार मानावेत, आणि कधी आत्मसन्मानासाठी कैवाराचा अव्हेर करावा त्याबद्दल तारतम्य असावे लागते. अगदी अमेरिकेतही वेगळ्या प्रकारचा डबघाईचा प्रसंग येऊ शकतो. आता सांगतो ही परिस्थिती सुदैवाने माझ्यावर आलेली नाही, पण माझ्या ओळखीतील व्यक्तीवर आलेली आहे. (माझ्या ओळखीतल्या विश्वासातल्या मिपाकरांना हवे तर नाव देईन.) अतिशय तडकाफडकी इस्पितळात भरती झाल्यानंतर या मित्राच्या जोडीदाराला त्याच्या बाजूला जाता आले नाही. अशी परिस्थिती माझ्यावर आली तर काय? कोणाच्या अगदी खोट्यानाट्या दिखाऊ दयेने जर मला वेळ निभावता आली तर तशा दयेला मी मुळीच ठोकरणार नाही. विकास ज्या अत्युच्च ठिकाणी (म्हणजे कैवार नसावा, सहानभूती नसावी तर पूर्ण एका व्यक्तीचा दुसर्‍या व्यक्तीशी बुद्धीवादाने संवाद अथवा विरंगुळा असेल) आहेत, तिथे सर्व असावेत तो सुदिन लवकर येवो. पण ते आहेत तिथे सर्वांनी आताच असावे असा मी हट्ट करणार नाही. लोकलज्जेसाठी लटकेच चांगले वागणाऱ्यांना मी दोष मुळीच देणार नाही. (पण फक्त बोलायला नको - लज्जेने चांगले वागायला पाहिजे, हे आलेच.) आजच्या पुढे दोन पिढ्यांनंतर तशा लोकांना दोष देणे योग्य का असेना. आज लाजूनही जे लोक चांगले वागतात, त्यांची प्रशंसाच करणे मला योग्य वाटते. कारण इथे एकीकडे लाज आणि एकीकडे टिंगल अशा डळमळीत स्थितीत ते मागेपुढे का करेनात, पुढच्या पिढीला बदलू देत असतात. या प्रकारे त्यांचा कार्यभाग फार मोठा असतो.

नैसर्गिक न्यायामुळे कोणाची कड घ्यावी का?
विजुभाऊ नैसर्गिक न्यायाचा दाखला देतात की ब्रह्मचर्य हेच पुष्कळदा ढोंगी असते, त्यापेक्षा नैसर्गिक ओढ ही मोकळी असू द्यावी. त्यांच्या म्हणण्यात पुष्कळ तथ्य आहे. पण त्या संदर्भात विसुनाना न्याय्य-अन्याय्यतेबाबत बिंदुगामी चर्चा करतात. त्यांचा दाखला अत्यंत विचारणीय आहे. ते म्हणतात की काही लोक बहुपत्नीत्व नैसर्गिक आहे, असे म्हणू शकतील. तरी या बाबतीत त्यांना न्याय्यतेमुळे नैसर्गिकाच्या विरोधात जावेसे वाटते. त्यांचे किंचितही खंडन करण्यापूर्वी त्यांचे आभार मानणे योग्य आहे. माझ्याशी झालेल्या पत्रव्यवहारातून त्यांना असे जाणवले आहे, की माझी बाजू न्याय्य आहे. हा चौकसपणा आणि नवीन विचार मनात तोलण्याची तयारी खरी प्रगल्भता दाखवते.

त्या प्रगल्भतेचा फायदा घेऊन मी दोन मुद्द्यांबद्दल येथे बोलणार आहे - एक तर ते म्हणतात

"एखाद्या एकाकी व्यक्तीवर सामुहिक हल्ला होत असेल तर तिचे हिरीरीने संरक्षण करणे हे मानव्य मूल्य आहे हे मला मान्य आहे. पण त्या अगोदर त्या व्यक्तीची बाजू न्याय्य आहे हे मला पटले पाहिजे."

अशा गोष्टी पटवण्यासाठी कधीकधी पुष्कळ प्रशिक्षण लागते, भरपूर माहिती हाताशी लागते, आणि ती संकलित करण्यासाठी वेळ (म्हणजेच वेळ देणारा अधिक पगाराचा व्यवसाय) आवश्यक होतो. मला असे वाटते, की स्खलनशील, अशिक्षित व्यक्तीही मानव्य विचारणेसाठी मानव म्हणून परिपूर्ण असते. अनेक देशांत (म्हणजे भारतातही) कायद्यांच्या मूलभूत नैतिकतेत दंड करणार्‍याला गुन्हा सिद्ध करावा लागतो. दंड भोगणार्‍यावर आपण न्याय्य असल्याचे सिद्ध करायचा भार नसतो. हा विचार अगदीच तर्कट नाही. सीतेला अग्निदिव्य करावे लागले हे ठीक नाही, असे कित्येक लोक हळहळतात ते याच विचारामुळे - आरोप करणार्‍या धोब्याला, किंवा शासन करणार्‍या रामाला तिचा गुन्हा सिद्ध करायला हवा होता, असा भाव कित्येक लोकांत दिसतो. त्याच प्रकारे माझे म्हणणे आहे - आणि भारतील कायद्याचेही मूलभूत तत्त्वज्ञान आहे.

आता याचेच पुढचे विवेचन म्हणून मी बहुपत्नीत्वाचा मुद्दा चर्चेत घेणार आहे. येथे मी सांगणार आहे, की हा दाखला विसुनानांच्या म्हणण्याच्या पूर्णपणे विपरित आहे. बहुपत्नीत्व हेच कायद्याने पूर्वी ग्राह्य होते - ते बदलण्यासाठी कारण होते स्त्रियांना वाटणारा जाच. हा जाच पुरावे देऊन गार्‍हाणी मांडून स्त्रियांना तपशीलवार सिद्ध करावा लागला नाही. तो घटनात्मक सैद्धांतिक कारणांसाठी मान्य केला गेला. (येथे नैसर्गिक-अनैसर्गिक याचा प्रश्न नाही. कोणावर अन्याय होत असला तर अस्तित्वातल्या कायद्याला बदलावे, उगाच "तुमचे न्याय्य आहे हे सिद्ध करा" हा हट्ट धरू नये, याबद्दल आहे.) २२-९-१९५१ च्या जनता मासिकातला हा उतारा आहे - हा युक्तिवाद संसदेत कायदेमंत्री श्री. आंबेडकर यांनी केला होता -

हिंदूंची पवित्र विवाहपद्धती म्हणजे पुरुषाला बहुपत्नीत्वाचा अधिकार आणि स्त्रीची कायम गुलामगिरी. अर्थशास्त्रामध्ये गुलामी आणि स्वायत्त श्रमाची संस्था यात जो फरक आहे तोच यात आहे. स्वायत्त श्रमाच्या कल्पनेत नोकरीचा करार अवश्य वाटेल तेव्हा मोडण्याची मुभा असते.

या बिलात घटस्फोटाच्या ज्या अटी आहेत, त्या कमी करण्याची नवी योजना कोणाही सभासदाने मांडली तर मी त्याचा विचार करण्यास सिद्ध आहे. तुम्हाला स्त्रियांना भारतीय घटनेत दिलेले स्वातंत्र्य द्यावयाचे असेल तर ही सोय ठेवलीच पाहिजे. नाहीतर घटनाच चालू ठेवणे योग्य ठरणार नाही.

हे बील भारताच्या प्राचीन ध्येयवादावरही नाही किंवा पाश्चात्त्यांचेही अनुकरण नाही. या घटनेच्या प्रास्ताविक भागातच स्वातंत्र्य समता व बंधुत्व या कल्पना आहेत. आणि त्या निकषांवर या देशात असलेली प्रत्येक सामाजिक संस्था तपासून बघितली पाहिजे.

यातील शेवटल्या वाक्याला मी अधोरेखित केलेले आहे. कुठल्याही अशिक्षित, गांजलेल्या, सवतीने आपल्या दुखण्याची न्याय्यता सिद्ध करायची नाही आहे. सुशिक्षित मंत्री किंवा उच्चपदस्थ खासदारांवर ती जबाबदारी पडते. कायदेमंत्री आंबेडकर हे पुरुष होते, सवतपिडा झालेली स्त्री नव्हते. पुढे असे दिसते, की या बिलाला संमती कित्येक विधायकांनी लोकलज्जेने दिली - लोकसभेतले काही खासदार दृढ तार्किक विचार करणारे नसतातही. पण ते विधेयक पास होण्यासाठी हिरिरीने पुढे होणारा एक व्यक्ती आणि लज्जेने त्याला मान्यता देणारे काही स्यूडो लोक आवश्यक होते. त्या खासदारांची निर्भर्त्सना करणे मला मुळीच प्रशस्त वाटत नाही. अर्धवट पटलेल्या डळमळीत अवस्थेत त्यांनी नव्या कायदेव्यवस्थेला मान्यता दिली याबद्दल त्यांचे अभिनंदनच करणे योग्य आहे. त्यांच्या अर्ध्यामुर्ध्या धाडसामुळे पुढील पिढ्यांना स्त्री-समानतेची न्याय्यता इतकी नीट कळली की विसुनानांना हा दाखला चुकून उलट अर्थाने दिला.

बहुपत्नीत्वाचा मुद्दा खरा तर असा - कायदा बहुपत्नीत्व चालवून घेत होता, काही स्त्रियांवर लादत होता. ज्या बायकांना त्याचा जाच होत होता, त्यांच्यापैकी बहुसंख्य बायका वादविवाद घालू शकत नव्हत्या. त्यांच्या बाजूने ("न्याय-अन्याय सिद्ध करा" असे न म्हणता) भारताचा (पुरुष) कायदेमंत्री बोलला. काही अर्धवट पटलेल्या खासदारांनी अर्धवट-ढोंगाने स्त्रियांना दिलासा दिला. पण जे झाले ते उत्तम झाले.

- - - -

पुन्हा लेखा-प्रतिसादाचा सारांश देत आहे.
१. येथे मला वैयक्तिक जखम झालेली नाही. प्राथमिक शाळेतल्यापासून गंमत-टक्के-टोणपे खेळवण्यास मी समर्थ आहे. मी जिथे आहे तिथे रोजव्यवहारात सुस्थितीत आहे. मिसळपावावर स्वत:च्या आनंदासाठी येत आहे.
२. पण अजून भारतात मला माझ्या बाजूने कायद्यासाठी झगडणार्‍या मित्रांची आवश्यकता आहे. ही निकड फार मोठी आहे. कारण एका दिल्ली उच्च न्यायालयाचा तकलादू निकाल हा लोकसभेच्या निकालाइतका स्थायी नाही. फार तर काही थोड्या लोकांना मी वैयक्तिक पटवू शकेन. काही सहृदय लोकांनी हे जाणावे की कित्येक अशिक्षित, दरिद्री लोकांना पटवा-पटवी करता येणार नाही. मग त्यांनी स्वत:हून त्यांची बाजू घेतली पाहिजे. घटनेच्या प्रास्ताविक भागातल्या स्वातंत्र्य समता व बंधुत्व या निकषांवर (शिवाय अन्य मूलभूत तत्त्वांवर) या देशात असलेली प्रत्येक सामाजिक संस्था तपासून बघितली पाहिजे. याचा भार भरडल्या जाणार्‍या व्यक्तीवर नसून कुठल्यातरी न-भरडल्या जाणार्‍या बोलक्या व्यक्तीनेसुद्धा हिरिरीने घ्यावा.
३. जर कोणी अर्धवट पटले असेल, आणि लोकलज्जेसाठी पुढे सरत असेल, तेसुद्धा समाजाच्या बदलातला एक टप्पा आहेत. त्यांचीसुद्धा प्रशंसाच मी करतो आहे.
२ व ३. या व्यक्तींना टोमणे सहन करायची सवय नसेल. त्यांना एकजात ढोंगी म्हटले जाईल, आणि तो आरोप क्रमांक-३च्या बाबतीत काही थोड्या प्रमाणात खराही असेल. पण लोकलज्जेने चांगले केले तरी ते चांगलेच असते - त्यांना माझे आभार प्रामाणिकपणे देतो. आणि जे भारावून काम करतात, त्यांना माझ्या आभाराची अपेक्षा नाही. तरी आभार देतो.
४. कोणाची कीवयुक्त मदत झिडकारण्याची वेळ माझ्या पिढीत, भारतात तरी, आलेली नाही. आधी जीव वाचू देत मग स्वाभिमानाच्या पन्नास पगड्या विकत घेऊ. (अमेरिकेत मात्र आता स्वाभिमानाच्या पन्नास पगड्या विकत घ्यायची वेळ आलेली आहे - इथे काही गोष्टी कीव म्हणून स्वीकारणार नाही, हक्क म्हणून झगडेन.)

लिखाळ's picture

10 Jul 2009 - 3:50 pm | लिखाळ

धनंजय,
चर्चेचा परामर्श फार चांगला आणि सकारात्मक घेतला आहे. त्यातले ''याचा भार भरडल्या जाणार्‍या व्यक्तीवर नसून कुठल्यातरी न-भरडल्या जाणार्‍या बोलक्या व्यक्तीनेसुद्धा हिरिरीने घ्यावा.'' हे वाक्य नक्कीच पटले. खरेतर आंबेडकरांचे जे उदाहरण दिले आहे आणि जे मत मी उधृत केले आहे त्याच सारखे रामशास्त्रींचे एक उदाहरण मी 'पुरोगामित्वाच्या' चर्चेमध्ये लिहिले आहे. ज्यांना इतर परिस्थितीतल्या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता येतो आणि जे बोलू शकतात त्यांनी त्या भरडल्या जाणार्‍यांची बाजू मांडावीच. आजवर आपल्या माहितीमध्ये असलेले अनेकानेक समाजसेवक याच तर्‍हेचे आहेत असे मला वाटते.

बहुपत्नित्वाच्या निर्णयाबद्दल दिलेली माहिती आणि त्यावरून केलेले मतप्रदशन आवडले. समलिंगी व्यक्तींच्या हक्कांबाबत मी जेव्हापासून वाचतो आहे तेव्हापासून प्रत्येक लेखामध्ये उभयलिंगी आकर्षण असलेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा लिहिलेले आढळते आहे. या परिस्थितीमध्ये जर पुढे उभयलिंगी आकर्षण असलेल्या व्यक्तीने आमचा तो नैसर्गिक अधिकार आहे आणि आम्हा तिघांना 'त्रिकूट' बनवून राहण्याचा अधिकार असावा असे मागणे मांडले तर मला नवल वाटणार नाही. त्यातून पुन्हा नवे प्रश्न सामोरे येतील आणि नैसर्गिक म्हणजे काय? जे जे नैसर्गिक ते ते सर्व किती पातळीपर्यंत चालवू द्यावे? या तर्‍हेच्या चर्चा होत राहतील. पण हे विचारमंथन चांगलेच आहे. कारण या तर्‍हेच्या मंथनातून तत्कालिक प्रश्नावरच फक्त तोडगा निघतो असे नसून इतरही पुढे निर्माण होणार्‍या प्रश्नांवर विचार करण्यासाठी भूमिका तयार होते आणि विचार करण्याची क्षमता तयार होत असते असे वाटते.

क्लोन करणे योग्य की नाही? या तर्‍हेच्या प्रश्नांवर झालेल्या नीति-अनीतिच्या चर्चा आणि या चर्चा, मूलतः समाजमन घडवणार्‍याच असतात असे मला वाटते.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2009 - 4:57 pm | प्रकाश घाटपांडे

या तर्‍हेच्या चर्चा होत राहतील. पण हे विचारमंथन चांगलेच आहे. कारण या तर्‍हेच्या मंथनातून तत्कालिक प्रश्नावरच फक्त तोडगा निघतो असे नसून इतरही पुढे निर्माण होणार्‍या प्रश्नांवर विचार करण्यासाठी भूमिका तयार होते आणि विचार करण्याची क्षमता तयार होत असते असे वाटते.

सहमत आहे. आज या चर्चेत ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांनी दहा वर्षांनंतर मागेवळून पहाताना.....
असा विचार केला तर त्यावेळी ते मनोरंजक असेल
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसुनाना's picture

10 Jul 2009 - 7:46 pm | विसुनाना

उत्तमच आहे. म्हणजेच विचार करायला लावणारा आहे.

व्यक्तीची बाजू न्याय्य आहे हे मला पटले पाहिजे.

या माझ्या वाक्यावर धनंजय यांचे विवेचन उत्कृष्ट आहे. न्याय्य बाजू मला कुणी पटवून देण्याची जशी गरज नाही (-म्हणजे माझ्या मताला महत्त्व देण्यासारखी व्यक्ती मी नाही किंवा मी काही त्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभेही करत नाही-) तसेच ती न्याय्य आहे हे माझ्या परीने (माझ्या पायरीने, माझ्यापुरते) तपासून घेण्याला काहीच प्रत्यवाय नसावा.

त्यांच्या अर्ध्यामुर्ध्या धाडसामुळे पुढील पिढ्यांना स्त्री-समानतेची न्याय्यता इतकी नीट कळली की विसुनानांना हा दाखला चुकून उलट अर्थाने दिला.

येथे मी दिलेले उदाहरण अर्धवट होते ही चूक मी मान्य करतो. मूळ मुद्दा लैंगिक संबंधातील स्वातंत्र्याबद्दल होता. 'स्वैच्छिक बहुपतित्व' असेही रूप हा मुद्दा घेऊ शकतो. (बाबासाहेब आंबेडकरांचे बहुपत्नित्वाबद्दलचे विचार भारतीय संदर्भात योग्य आहेत. पण इतरत्र जी तथाकथित विचारधारा आहे ती कधीकाळी भारताकडे वळू शकते. विशेषतः ते शब्द - 'एकमेकांस अनुमोदन देणार्‍या प्रौढ आणि प्रगल्भ व्यक्ती' - तेच शब्द त्या विचारसरणीच्या पुरस्कर्त्यांनीही हेतुपुरस्सर वापरायला सुरुवात केली आहे.)

लिखाळ यांनी परामर्शावर दिलेल्या प्रतिसादात काही शंका उपस्थित केल्या आहेत. अशा अनेक शंका माझ्याही आहेत. या विषयाबाबत माझ्यापुरतेही सर्वसमावेशक उत्तर माझ्याकडे नाही.

पुढे निर्माण होणार्‍या प्रश्नांवर विचार करण्यासाठी भूमिका तयार होते आणि विचार करण्याची क्षमता तयार होत असते असे वाटते.

हे लिखाळ यांचे मत पटते.

म्हणूनच,

समलैगिकतेबाबत अजूनही अनेक मुद्दे माझ्यासाठी संदिग्ध आहेत. ते कुणा इतरेजनांच्या अनुभवांच्या वाचनातून कदाचित स्पष्ट होतील. असे झाल्यास सरसकट सर्वच समलैंगिकांची बाजू घ्यायची की तिला काही 'जर..तर' जोडायचे हे निश्चित करता येईल.

-हाच माझा सध्यापुरता पवित्रा आहे. हा (कायद्याने शिक्षा करण्यासारखा अथवा सामाजिक-नैतिक दृष्टीकोनातूनही) गुन्हा नाही पण या संबंधांना कायद्याने कोणत्या चौकटीत बसवायचे हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे.

असो.

(अवांतर : 'लिव्ह-इन रिलेशनशिप' संबंधांना कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसवावे या विषयावरही भारतात चर्चा सुरू आहे. या बाबतीत न्यायालयांचे निकाल पाहता बहुपत्नित्व मागील दाराने प्रवेश करत आहे काय? अशी शंका येते.)

नितिन थत्ते's picture

10 Jul 2009 - 9:00 pm | नितिन थत्ते

विसुनानांच्या प्रतिसादातील शेवटच्या मुद्द्याच्या अनुषंगाने पुन्हा थोडेसे.

मुद्दा एक: असे संबंध चालवून घेणे हे समर्थनीय आहे का?
न्यायालयाचा हा निर्णय फक्त शासकीय दंडव्यवस्थेला शिक्षा करण्यापासून प्रतिबंध इतकाच मर्यादित आहे. त्या संबंधांना उत्तेजन द्यायचे की दुर्लक्ष करायचे की त्या संबंधांची एक व्यवस्था लावायची हे न्यायालय ठरवणार नाहिये.

सध्याच्या न्यायालयीन निर्णयाने फक्त गुन्ह्याचा शिक्का पुसलाय.
तुम्ही या ठिकाणी 'हे' वाक्य लिहिलंय ना? मग 'हे दुसरे' वाक्य त्याच्याशी विसंगत आहे. असे न्यायालयाचे म्हणणे आहे. हे दुसरे वाक्य हवे'च' आहे का हे आता समाजाने ठरवायचे आहे. समाजाला जर दुसरे वाक्य हवेच आहे असे वाटत असेल तर पहिले वाक्य सुधारून/बदलून/अपवाद करून घेता येईल का हे समाजाला पहायला लागेल. आणि तेही घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता.

मुद्दा दोन
हे जेव्हा समाज ठरवायला बसेल तेव्हा विविध गटांत रस्सिखेच होईल. पुन्हा ही विभागणी अशी पक्क्या दोन तुकड्यांत असणार नाही. काही जण कुंपणावर असतील. त्या कुंपणावरच्यांनी लिबरल मताची (लिबरल मत दिल्याने विरोधकांकडून हेटाळणी होण्याची) भीती बाळगू नये असा धनंजय यांच्या धाग्याचा उद्देश आहे.
पत्नीवर घरातली मंडळी जुलूम करीत असताना नवर्‍याने 'मी तिची बाजू घेतली तर घरातले लोक मला बाईलवेडा वगैरे म्हणतील' या भीतीने तिची बाजू घेण्यास कचरू नये. असा धनंजयचा मतितार्थ आहे. त्या नवर्‍याची त्यावेळची मनोधारणा लक्षात घेतली म्हणजे धनंजयची वेदना लक्षात येईल.

दुसरे उदाहरण 'घरेलू हिंसाको रोको, बेल बजाओ' या कॅम्पेनचे घेता येईल. त्या कॅम्पेनमध्ये कोणत्या घरात हिंसा चालू असेल तर बेल वाजवा म्हणजे त्या दडपणाने हिंसा (त्यावेळी) थांबेल असा संदेश होता. विसूनाना म्हणतात तसे मारहाण चालू असेल तर 'मारहाणीचे कारण योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार आत्ता करत बसू नका. आधी बेल वाजवून मारहाण थांबवा' असा धनंजय यांचा संदेश आहे.

धनंजयनी जरी समलैंगिकता या निमित्ताने हे विचार मांडले असले तरी ते बर्‍याच सामाजिक प्रश्नांमध्ये लागू आहेत.

एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवणे बर्‍याचदा अवघड असते हे खरेच. बर्‍याचदा अनेक गैरसमज आपल्या मनात असतात. आजच्या लोकप्रभा मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात समलैंगिक आणि यूनक (हिजडे) हे एकच समजून लेख लिहिलेला आहे.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

मेघना भुस्कुटे's picture

13 Jul 2009 - 3:21 pm | मेघना भुस्कुटे

योग्य विवेचन. मनापासून सहमत.

स्वाती२'s picture

11 Jul 2009 - 12:24 am | स्वाती२

>>याचा भार भरडल्या जाणार्‍या व्यक्तीवर नसून कुठल्यातरी न-भरडल्या जाणार्‍या बोलक्या व्यक्तीनेसुद्धा हिरिरीने घ्यावा
हे अगदी पटले. पण बरेचदा असे करायचे मनात असूनही धीर होत नाही.
३-४ महीन्यांपूर्वी असेच एकांकडे जमलो होतो. नेहमी प्रमाणे चर्चा मुलांवर आली आणि एक बाई म्हणाल्या 'मी मुलांना सांगितलय काहीही व्हा फक्त गे होऊ नका." मी पटकन DH कडे बघीतले. त्याच्या डोळ्यात 'please don't'. त्या बाईंचे म्हणणे खोडून काढावे असे मनात असूनही उगाच लोकांकडे तमाशा नको म्हणून काहीच बोलले नाही. निरोप घेऊन गाडीत बसलो आणि नवरा म्हणाला 'thanks'. तो खिन्न thanks एखाद्या थपडेसारखा लागला. त्याचे दोघे मित्र गे आहेत. पण त्या दिवशी त्यांच्याबाजूने भांडायचा धीर झाला नाही.

प्रिय धनंजय,

एखाद्याने आपले खासगी आयुष्य कसे जगावे (एखाद्याने कुठली भाजी खावी पासून त्याचे सेक्शुअल ओरिएंटेशन काय असावे पर्यंत सर्वकाही) हे सांगण्याचा अधिकार इतरांना नाही. त्यामुळे हायकोर्टाने दिलेला निकाल स्वागतार्हच आहे.

अनेकदा चिरफाड होत नसतानाही, काही छाकटे मी किती पुरोगामी आहे दाखवण्यासांठी इतरांच्या विवंचना, दुःखे चघळत असतात. ही त्यांची स्वतःची कहाणी नसते. पण ही मंडळी इतरांना पेट्रनाइझ (मराठीत काय म्हणतात पेट्रनाइझ करण्याला?)करत, पोकळ सहानुभूती दाखवत इकडे-तिकडे फिरत असतात. असे अनेक छाकटे एकत्र येतात आणि मग पुरोगामीपणाची चढाओढ सुरू होती. ( अशी चढाओढ चांगली आहे की वाईट हा वेगळा मुद्दा. तुम्ही म्हणता तसे अशी चढाओढ चांगलीच. कारण यातून बळ मिळते. ) पण संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी बोंब मारणाऱ्यासारखीच अशा दिखाऊ पुरोगाम्यांची मला तरी खिल्ली उडवावीशी वाटते. ह्या लोकांमुळे पुरोगामीपणाची बदनामी होते, असे माझे स्पष्ट मत आहे.

बाकी माझा एखादा मित्र किंवा परिचित समलैंगिक आहे की विषमलैंगिक हे माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाही. समलैंगिक असणे हे विषमलैंगिक असण्याइतकेच माझ्यासाठी नॉर्मल किंवा ऍबनॉर्मल आहे. थोडक्यात, एखाद्या विषमलैंगिकाची जशी टिंगलटवाळी करतो तशीच समलैंगिकांची टिंगलटवाळी केल्यास कुणी आरडाओरडा करायला नको, असे मला वाटते.

जुन्या काळापासून भारतात अम्रदपसंदी किंवा लौंडेबाजी ही अतिशय आम.

अम्रदपसंदी किंवा लौंडेबाजी हे शब्द तसे बोचणारे आहेत हे मी मान्य करतो. चैनीसाठी एखादा अशी गोष्ट करत असावा असे वाटू शकते. ह्या दोन शब्दांऐवजी समलैंगिकता हा एकच शब्द ठेवायला हवा होता. असो. ह्या शब्दांमुळे, किंवा एकंदरच त्या प्रतिसादामुळे, तुम्ही दुखावले असल्यास मी तुमची माफी मागतो.

चित्तरंजन

अन्यत्र सुरू झालेला संवाद येथे पुढे चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या भावनांची तुम्ही कदर केली, सद्भावना पोचल्या.

बहुतेक दु:खे ही स्वतःची नसतात. 'सह'अनुभूती शब्दातच अन्यासह अनुभूती सामावली आहे. स्वतःच्या कहाणीतली विवंचना सांगण्याला आपण "गार्‍हाणे" किंवा असे काही म्हणू. शब्दाचा कीस काढण्याचा उद्देश - हा विचार असंदर्भ आहे.

अनेकदा चिरफाड होत नसतानाही, काही छाकटे मी किती पुरोगामी आहे दाखवण्यासांठी इतरांच्या विवंचना, दुःखे चघळत असतात.

"चीरफाड होत नसतानाही" या परिस्थितीचा त्या चर्चेशी संबंध काय होता? तिथे तर चीरफाड होत होती.

अशी चढाओढ चांगली आहे की वाईट हा वेगळा मुद्दा. तुम्ही म्हणता तसे अशी चढाओढ चांगलीच... (आत्मगौरवात्मक कीव - पेट्रनाइझ करणार्‍या) ह्या लोकांमुळे पुरोगामीपणाची बदनामी होते, असे माझे स्पष्ट मत आहे.

कीव आत्मगौरवात्मक आहे की नाही यासाठी तुम्ही काय निकष वापरता? अमुक चार छाकट्यांनी (१) केवळ पुरोगामीपणा दाखवण्यासाठी केलेली आणि (२) पोकळ अशी, ही सहानुभूती आहे; आणि चार मुनुष्यांनी (१) याबद्दल विचार करून (२) खरी अशी साहानुभूती दाखवली आहे, यातला फरक तुम्हाला कसा कळतो?

खिल्ली उडवण्यासाठी कोण अप्रामाणिक आहे, त्याच्या अप्रामाणिकपणावर बोट ठेवून खिल्ली उडवलेली ठीकच. त्या चर्चेत भाग घेतलेले काही "पुरोगामी" लोक मला ओळखतात. मीसुद्धा त्यांना ओळखतो. त्यांनी घेतलेला पवित्रा पटून घेतला आहे, भंपक नाही, हे मला माहीत आहे. जे माझ्या ओळखीचे नाहीत त्यांचे मला माहीत नाही. पण ते अप्रामाणिक आहेत हे तुम्हालातरी कसे ठाऊक?

आणि थोडासा अपूर्ण विचार करून लोकलज्जेखातर थोडीशी सहानुभूती दाखवणारे लोकही पुरोगामित्वाची बदनामी करतात काय?

थोडक्यात, एखाद्या विषमलैंगिकाची जशी टिंगलटवाळी करतो तशीच समलैंगिकांची टिंगलटवाळी केल्यास कुणी आरडाओरडा करायला नको, असे मला वाटते.

या विचाराशी मी सहमत आहे. पण याचा संदर्भ काय? त्या चर्चेमध्ये जी टवाळी आहे ती जशी विषमलैंगिकाची असावी तशीच आहे काय? त्या चर्चेतील बहुतेक वाक्यांमधे मी "समलैंगिक" शब्दाच्या जागी "विषमलैंगिक" शब्द घालून बघितला.

उदाहरणार्थ तिथला पहिला प्रतिसाद उलटवून बघूया :

विषमलैगिंकता ही एक विकृतीच आहे. ह्या मंडळींचा मला खूप किळस येतो. दादर (वा अन्य कोणत्याही) पश्चिम च्या रेल्वे फलाटावर जायलाही मी घाबरतो. तिथं सर्वत्र ही विकृत माणसं गाडीची वाट बघत असल्याचे सोंग करीत इकडे-तिकडे विचीत्र नजरेने पाहत असतात. पहीलं म्हणजे रेल्वेच्या फलाटावरच्या घाणीमुळे ही उभं राहणं शक्य होत नाही. तिथं ही मंडळी जोडीदार शोधत असतात. रेल्वेच्या डब्यात ही जनावरे नको तिथं चोरटा स्पर्श करू पाहतात. त्यांचा खूप राग येतो पण रागवता येत नाही. स्वतःच घाबरून दूर व्हावं लागतं.
माझ्या मते ह्या मंडळींवर शाररीक, मानसिक व आध्यात्मिक उपचार केले जायला हवेत.

आता पुढचा प्रतिसाद उलटवून -

जर हे विषमलैंगिक अनैसर्गीक तर मग असे प्राणी हे इतर प्राणी वर्गाच्या खालच्या पातळीचे की वरच्या? हे रुग्ण की निरोगी?
अशा प्राण्यांसाठी गाजर की छडी?

तुम्ही अशी विषमलैंगिकांबद्दल टवाळी ऐकली आहे म्हणता? अशी टवाळी जर सामान्य असेल तर त्याविषयी आरडाओरड करू नये हे मान्य. पण मी तरी कधी नाही ऐकली. त्यामुळे माझ्या मित्रांनी याबबत आरडाओरड केली ते मला क्रमप्राप्त वाटले.

चित्तरंजन भट's picture

14 Jul 2009 - 12:50 pm | चित्तरंजन भट

कीव आत्मगौरवात्मक आहे की नाही यासाठी तुम्ही काय निकष वापरता? अमुक चार छाकट्यांनी (१) केवळ पुरोगामीपणा दाखवण्यासाठी केलेली आणि (२) पोकळ अशी, ही सहानुभूती आहे; आणि चार मुनुष्यांनी (१) याबद्दल विचार करून (२) खरी अशी साहानुभूती दाखवली आहे, यातला फरक तुम्हाला कसा कळतो?

"आय नो वन व्हेन आय सी वन" एवढेच म्हणू शकेन. एखाद्याचा पूर्वेतिहास (आधीचे प्रतिसाद व विरोधाभास) अभ्यासल्यास काही निष्कर्ष काढता येतात, असे मला वाटते. आणि हे निष्कर्ष माझ्यापुरते आहेत. मी ते इतरांवर लादलेले नाहीत.

अनेकदा चिरफाड होत नसतानाही, काही छाकटे मी किती पुरोगामी आहे दाखवण्यासांठी इतरांच्या विवंचना, दुःखे चघळत असतात.

"चीरफाड होत नसतानाही" या परिस्थितीचा त्या चर्चेशी संबंध काय होता? तिथे तर चीरफाड होत होती.

माझा प्रतिसाद केवळ त्या प्रतिसादापुरता आणि समलैंगिकतेच्या मुद्द्यापुरता मर्यादित नाही. बाय द वे, चिरफाड होत असताना तर काही बहरात येणारे "पुरोगामी"ही छाकटे असतात. विरोधकांप्रमाणेच त्यांनाही त्यांचे ऱ्हेटरिक पाजळण्याची चांगली संधी मिळते. (पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे वाईट नाही. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जो "कँडललाइट पुरोगामीपणा" झाला होता तो वाईट नव्हताच. त्यातले अनेक जण प्रामाणिक होते. नंतर झालेल्या निवडणुकीत मात्र मतदानाच्या वेळी ही मंडळी कुठे गायब झाली होती? )

थोडक्यात, एखाद्या विषमलैंगिकाची जशी टिंगलटवाळी करतो तशीच समलैंगिकांची टिंगलटवाळी केल्यास कुणी आरडाओरडा करायला नको, असे मला वाटते.

ह्याचा अर्थ असा की जेवढी मोकळीक विषमलैंगिकांची मस्करी करताना असते तेवढीच समलैंगिकांसाठी गृहीत धरावी.

त्या चर्चेवरील ते होमोफोबिक प्रतिसाद माझ्यामते दखल घेण्याच्या लायकीचेही नाहीत. अशा प्रतिसादांची दखल घेऊन उगाच तेच ते जुने युक्तिवाद, ऱ्हेटरिक परजण्यासाठी मला वेळ व रुची नाही, नव्हती. आणि तुम्ही ज्या प्रतिसादांना टवाळी म्हणताहात ती टवाळी नाही. तो होमोफोबिया असू शकतो किंवा हिडीसपणा.

बाय द वे, तुम्ही जसे प्रतिसाद उलटवले तसे प्रतिसाद उलटवण्याची आयड्या छान आहे.

तूर्तास एवढेच.

नीधप's picture

14 Jul 2009 - 10:17 am | नीधप

तुमचे प्रांजळ लिखाण आवडले.
पुरोगामी असण्यापेक्षा माणूस असणं हे खरं आहे. बाकी सगळी लेबल्स. असं मला वाटतं.

- नी