पुस्तक परिचय (तेलाविषयक)

सुचेल तसं's picture
सुचेल तसं in जनातलं, मनातलं
1 Jul 2009 - 9:07 pm

नुकतीच जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ह्यांची दोन पुस्तकं वाचली. दोन्ही पुस्तकं खूप आवडल्यामुळे त्यांचा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करत आहे.

१. हा तेल नावाचा इतिहास आहे: काळं सोनं असं ज्याला संबोधलं जातं त्या तेलाचा मनोरंजक इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. अमेरीकेत पहिली तेलविहीर खणल्यानंतर अल्पावधीतच तेलाची मागणी प्रचंड वाढली. अमेरीकेतील उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर (थोरले) ह्यांनी सुरु केलेली स्टँडर्ड ऑईल कंपनी, तेलातून मिळालेल्या प्रचंड नफ्यामुळे बलाढय बनली आणि तिची मक्तेदारी निर्माण झाली. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आणि त्यांना ह्या कंपनीवर अंकुश ठेवण्यासाठी काही कायदे निर्माण करावे लागले.

पुस्तकाच्या पूर्वार्धात रॉकफेलर आणि त्यांच्या स्टँडर्ड ऑईल कंपनीची वाटचाल ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. जगाची तेलाची भूक वाढल्यावर इतर देशांमधे तेल उत्खननाचे प्रयत्न सुरु झाले. अमेरीका, इंग्लंड सारख्या मोठमोठ्या देशांतील तेलकंपन्यांमध्ये जिथे जिथे तेलाचे साठे मिळण्याची शक्यता आहे अशा भूभागांसाठी तीव्र चुरस निर्माण झाली. रशियामधे तेलाचे प्रचंड साठे सापडले पण अमेरीकेबरोबर वैर असल्यामुळे पर्यायी तेलसाठ्यांचा शोध सुरु झाला.

इब्न सौद हा पश्चिम आशियातील एका भूभागाच्या (सौदी अरेबिया) टोळीचा म्होरक्या होता. मक्का आणि मदिना ही मुस्लिम धर्मियांसाठीची अतिशय पवित्र ठिकाणं त्याच्या ताब्यात होती. हज यात्रेसाठी येण्यार्‍या भाविकांकडून करापोटी जी रक्कम मिळायची तेच त्यांच्या राज्याचं उत्पन्नाचं मुख्य साधन होतं. पण जागतिक महायुद्धामुळे भाविकांचं प्रमाण कमी झालं आणि इब्न राजाला चांगलाच फटका बसला. असं म्हणतात की त्यावेळी राज्याचा खजिना एका ऊंटाच्या पाठीवर मावेल एवढाच राहिला होता. अशा हलाखीच्या परिस्थितीत, भूगर्भ शास्त्रज्ञांनी सौदीच्या भूमीत तेलाचे प्रचंड साठे आहेत असा निर्वाळा दिला. अमेरीकन तेल कंपन्यांनी इब्न सौदशी पुढील ६० वर्षांचा करार केला (तो २००३ मधे संपला). इथे एक मजेदार किस्सा सांगितला आहे. इंग्लंड आणि अमेरीका दोघेही ह्या इब्न सौदला खुश करण्याचा प्रयत्न करत होते. अमेरीकेनी
एका मोठ्या जहाजावर त्यांच्यासाठी पार्टी ठेवली आणि इंग्लंडने रत्नजडीत रोल्स रॉईस त्यांच्या भेटीसाठी पाठवली. इंग्लंडमधल्या गाड्यांचं स्टिअरिंग उजव्या बाजूला असतं आणि इब्न सौद हे नेहेमी ड्रायवरच्या शेजारीच बसत, मागे नाही. ड्रायवरच्या डाव्या बाजूला बसणं त्यांना अपमानास्पद वाटलं आणि त्यांनी ती गाडी तशीच त्यांच्या भावाला देऊन टाकली. गाडी भेट (लाच) देताना ही साधी गोष्ट इंग्लंडच्या लक्षात आली नाही.

नंतर ह्या पुस्तकात, तेल असण्यार्‍या देशांच्या दोन महत्वाच्या संघटनांची (ओपेक आणि आओपेक) माहिती देण्यात आली आहे. तेलकंपन्यांची मनमानी आणि भाववाढ/घट करताना जिथून तेल उपसत आहे त्या देशांना कसलीही किंमत न देणं ह्याला आळा बसावा ह्या हेतूनं ह्या संघटनांची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला जरी तेलकंपन्यांनी ह्या संघटनांना महत्त्व दिलं नाही तरी काही वर्षातच ओपेकने त्यांच्या नाकी दम आणला. सद्दाम हुसेननी कुवेतवर आक्रमण करुन ते तेलसाठे बळकावयचा सतत प्रयत्न केला त्याचंही वर्णन केलं आहे. सद्दाम जरी अमेरिकेसाठी वाईट असला तरी आंतरराष्ट्रीय परिषदेत त्याने कायम भारताची बाजू घेतली होती हेही लेखकाने नमूद केलं आहे.

पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यात भारताच्या ओएनजीसी ह्या पेट्रोलियम कंपनीचा आढावा घेण्यात आला आहे. के.डी.मालवीय ह्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आज ओएनजीसी उभी आहे. स्वकीयांचा तसेच अमेरिकेसारख्या देशांचा विरोध पत्करून त्यांनी उत्खनन चालू ठेवले त्याचं उत्तम वर्णन लेखकानं केलं आहे. भारत आणि इराणदरम्यान (पाकिस्तानमधून) तेलवाहक पाईपलाईन टाकायचं काम सुरु होणार होतं. आश्चर्य म्हणजे पाकिस्तानकडून मोठ्या मुश्किलीनी आपण परवानगी मिळवली होती पण केवळ अमेरिकेच्या दबावामुळे आपण ते काम थांबवलं.

तेलाचा शोध, त्याची उपलब्धता आणि त्यावरुन खेळलं जाणारं जागतिक राजकारण ह्याचा सुंदर आढावा ह्या पुस्तकात घेण्यात आला आहे.

२. एका तेलियाने: गिरीश कुबेर ह्यांचं पुढचं पुस्तक म्हणजे एका तेलियाने. ह्या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे - शेख अहमद झाकी यामानी . हा माणूस सौदी अरेबियाचा तेलमंत्री होता. उच्चविद्याविभूषित आणि तेलाच्या राजकारणातले बारकावे समजणारा. पुस्तकाच्या मागील बाजूस त्याची सुंदर ओळख करुन देण्यात आली आहे.
" हा आजारी पडला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची. हा प्रसन्न झाला तर अनेक देशांमधे दिवाळी साजरी व्हायची. ह्याच्या भेटीसाठी अनेक देशांचे प्रमुख तासन् तास ताटकळत बसायचे."

अमेरिकेने पश्चिम आशियातील तेलउत्पादक देशांना नेहेमी कमी लेखलं. त्यांना अविकसित समजून त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे ह्या देशांमधे अमेरिकेच्या विरोधात प्रचंड द्वेष निर्माण झाला. ह्या महासत्तेला शह देण्याचं काम लिबियाचे सर्वेसर्वा कर्नल गडाफी आणि यामानी ह्यांनी पद्धतशीरपणे केलं. यामानींचा जन्म १९३० मधे मक्केत झाला. राजे फैजल (इब्न सौद ह्यांचे पुत्र) ह्यांनी त्यांची तेलमंत्री म्हणून निवड केली. ती यामानी ह्यांनी अगदी सार्थ ठरवली. राजे फैझल ह्यांचं यामानींवर स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम होतं. यामानी ओपेक आणि सौदी अरेबिया सरकारचे २५ वर्षं मंत्री होते (१९६२-१९८६). ह्या काळात त्यांनी तेलखात्याचा कारभार अतिशय कुशलतेने सांभाळला.

राजे फैझल ह्यांच्याबद्दलही लिहीलं आहे. टेलिफोन, रेडीओ, टीव्ही, स्त्री-शिक्षण अशा अनेक सुधारणा त्यांनी सौदी अरेबियात आणल्या. अर्थातच त्यांना मुल्ला-मौलवींकडून प्रचंड विरोध झाला. मुलींच्या शाळेची जबाबदारी तर त्यांनी आपल्या पत्नीवरच टाकली होती. यामानी ह्यांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला. दोघांमधे गैरसमज नसल्यामुळे राजे फैझल ह्यांचे यामानींविरुद्ध कान कोणीही भरवू शकले नाही. १९७३ मधे झालेल्या तेलसंकटामुळे यामानी सगळ्या जगाला माहिती झाले.

अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्रप्रमुखांनी इब्न सौद ह्यांना शब्द दिला होता की ते इस्त्राईलची बाजू घेणार नाहीत. तो शद्ब मोडून अरब-इस्त्राईल युद्धात अमेरिकेने इस्त्राईलला मदत केली आणि अरब राष्ट्रांमधे अमेरिकेविरोधात संतापाची लाट उसळली. लिबियाचे कर्नल गडाफी ह्यांनी सगळ्या तेल कंपन्यांचं राष्ट्रियीकरण करुन टाकलं. ते फारच आक्रमक आणि अमेरिका-विरोधी होते. तेलाचे भाव एकदम दुप्पट करण्याची मागणी त्यांनी ओपेकच्या मिटींगमधे केली. एकदा तर ओपेकची मिटींग लिबियात भरलेली असताना त्यांनी सगळ्या देशाच्या मंत्र्यांचं अपहरण करण्याची योजना आखली होती. पण यामानींना ह्याचा सुगावा लागला आणि त्यांनी शिताफिने तिथून ग्रीसमधे पलायन केल्याने पुढचा प्रसंग टळला. पण काही दिवसांनी ओपेकच्या सर्व मंत्र्यांचं कार्लोस द जॅकल ह्या कुख्यात दहशतवाद्यानं अपहरण केलं त्याला फक्त यामानी आणि इराणच्या तेल मंत्र्यांना मारायचं होतं. पण परत एकदा यामानींनी शिताफीनी सुटका करुन घेतली.

ह्या पुस्तकात सौदी अरेबिया बरोबरच इराणमधलं सत्ता-स्थित्यंत्तर, पॅलेस्टिनी नेते यासर अराफत आणि जॉर्डनचे राजे हुसेन आणि इस्त्राईल) ह्यांच्यातल्या संघर्षाचं वर्णन आहे. पॅलेस्टिनी बंडखोरांनी जॉर्डनमधे घुसखोरी केली होती आणि तिथून ते इस्त्राईलवर हमला करायचे. ह्या दोघांमधे जॉर्डनची जनता पुरती कावून गेली होती. ह्या पॅलेस्टिनी बंडखोरांची एवढी दहशत होती की एकदा जॉर्डनमधल्या एका पोलिसाची त्यांनी हत्या केली, त्यांचं मुंडकं कापलं आणि त्याचा फुटबॉल करुन खेळले. यामागे जॉर्डनच्या लोकांवर दहशत बसवायचा त्यांचा हेतू होता. शेवटी राजे हुसेन एवढे वैतागले की त्यांनी जोरदार हमला करून जवळपास ५००० बंडखोरांना मारलं. असं म्हणतात की तेव्हा इस्त्राईलनी जेवढे पॅलेस्टिनी बंडखोर मारले नसतील तेवढे राजे हुसेन ह्यांच्या सैन्याने मारले.

ओपेक असो किंवा अमेरिका असो, सगळ्यात जास्त महत्त्व सौदी अरेबियाला. कारण तिथे निघणारं तेल हे इतर ओपेक देशांच्या एकत्र तेलापेक्षा जास्त होतं. त्यामुळं सौदी अरेबियाची पश्चिम आशियातल्या राजकारणात नेहेमी मध्यवर्ती भूमिका राहिली आहे. यामानींनी लिबिया, सिरीया सारख्या माथेफिरू अरब देशांना जवळपास २५ वर्ष कुशलतेने हाताळलं आणि ओपेकला सामर्थ्यवान बनवत गेले. १९७३ च्या ऑईल क्रायसिमधे ओपेक देशांनी उत्पादन कपात २५ टक्क्यांपर्यंत वाढवली आणि पाश्चिमात्य देशांना जेरीस आणले. अमेरीकन लोकांना कधी माहित नसलेल्या तेल-टंचाईला सामोरं जावं लागलं. तेव्हा अमेरिकन गाड्या लिटरला ४-५ किमी धावायच्या. (हॅमर सारखी गाडी तर लिटरला १ किमी देखील धावत नसे) तेल संकटामुळे फ्युएल-इफिशियंट गाड्या बनवणं त्यांना भाग पडलं. (जपान आधीपासूनच अशा फ्युएल-इफिशियंट गाड्या बनवत होता.) ह्या काळात पेट्रोल-पंपावर लांबलचक रांगा लागत होत्या. त्यात परत अमेरिकन लोक रांगेत असताना एक क्षणसुद्धा गाडी बंद करत नव्हते. शेवटी सरकारला एक दिवसाआड पेट्रोल देण्याची सक्ती करावी लागली. (म्हणजे सम आकडा असलेल्या गाड्या एका दिवशी तर विषम नंबर असलेल्या पुढच्या दिवशी). इंग्लंडमधे तर तीनच दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात आला. घड्याळ दोन तास पुढे करण्यात आलं. त्यामुळे मुलांना सकाळी ७ च्या ऐवजी पहाटे पाचलाच शाळेसाठी निघावं लागे. त्यामुळे अपघात वाढले आणि पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचंच बंद केलं. ह्या काळात यामानींनी प्रमुख देशांचा दौरा केला (फ्रान्स, जपान, इंग्लंड, इत्यादी.) आणि त्यांना विश्वासात घेऊन तुमचा तेल पुरवठा पूर्ववत चालू राहिल असं आश्वासन दिलं. अखेर ओपेक (म्हणजे यामानी) पुढे अमेरिकेला माघार घ्यावी लागली.

यामानींनी नेहेमी तेलउत्पादक आणि तेल कंपन्या/ग्राहक देश ह्यांच्यात समन्वय साधला. इराण, लिबिया तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बॅरल अशी प्रचंड भाववाढ मागत असताना त्यांना शांत ठेवायचं काम यामानींनी केलं. १९७५ मधे राजे फैझल ह्यांची हत्या झाल्यावर (ह्यामागे अमेरिका असल्याचा संशय आहे) सौदीला परत त्यांच्यासारखा दुरद्रुष्टि असणारा राजा लाभला नाही. नव्या राजाचा अर्थातच यामानींवर आकस होता. १९८६ मधे त्यांना टीव्हीवर कळाले की त्यांना तेलमंत्रीपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर सौदीचा र्‍हास सुरु झाला.

तेलातून मिळणारा पैसा किती असावा? असं म्हणायचे की सौदी राजपुत्र एवढे माजले होते की गाडीतला अ‍ॅश ट्रे भरला की ते नवीन गाडी घ्यायचे. पैसा अक्षरशः नाकातोंडात जायला लागला होता. एका सौदी बँकरने सांगितले की त्याच्या स्वतःच्या घरात ५ माणसं आहेत. त्यांच्यासाठी ६ नोकर आणि ९ गाड्या. त्याच्या म्हणण्यानुसार हा अतिपैसा आहे. ह्याची इतकी सवय झाली आहे की उद्या तो नसेल तेव्हा काय करणार?

सध्या यामानी लंडनमधे राहतात आणि तेलाच्या राजकारणापासून दूर झाले आहेत. सौदीच्या नवीन राजाने त्यांना तेलमंत्रीपद स्विकारण्यासाठी आमंत्रण पाठवलं पण त्यांनी नकार कळवला.

जगाच्या राजकारणाचं मध्यबिंदू असणारं हे तेल आणि त्याचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. विषय किचकट असूनही गिरीश कुबेरांनी तो सोपा आणि सहज समजेल असा मांडला आहे. इतिहास आणि जागतिक राजकारणाची आवड असणार्‍यांनी ही दोन्ही पुस्तकं जरूर वाचावी.

इतिहाससमाजजीवनमानअर्थकारणमाहितीसमीक्षा

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

1 Jul 2009 - 9:23 pm | अभिज्ञ

दुसरे पुस्तक सध्या वाचतो आहे. अतिशय सुरेख व ओघवती भाषा अन तसा नवीनच विषय असल्याने पुस्तक आवडत आहे हे सांगणे न लगे.
आपले परिक्षण वाचून "हा तेल नावाचा इतिहास आहे" हे पुस्तक देखील एकदा वाचायला पाहिजे.
असो.
परिक्षण आवडले.

अभिज्ञ

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

सहज's picture

2 Jul 2009 - 6:12 am | सहज

पुस्तक ओळख आवडली.

डॉ.प्रसाद दाढे's picture

2 Jul 2009 - 6:25 am | डॉ.प्रसाद दाढे

एका तेलियाने हे पुस्तक फारच सुरेख आहे.. तीन पारायणे झाली. मीसुद्धा ह्या पुस्तकावर स्वतंत्र लेख लिहिणार होतो पण तुम्हांला आधी
सुचलं ते बरं झालं.
यामानी हा खरोखरंच अफलातून माणूस आहे, त्यांनी किसिंजर, निक्सन इ मंडळींची जी मारली त्याला तोड नाही. मी तर ह्या माणसाच्या इतक्या प्रेमात पडलोय की सध्या मी त्यांच्यासारखीच दाढीही ठेवली आहे :)
फैझलचा खून वाचल्यावर खूप वाईट वाटते..
शैली अतिशय ओघवती आणि गुंगवून टाकणारी आहे..आवर्जून वाचावेच!

विंजिनेर's picture

7 Nov 2009 - 9:21 am | विंजिनेर

भारी परिचय.

मी तर ह्या माणसाच्या इतक्या प्रेमात पडलोय की सध्या मी त्यांच्यासारखीच दाढीही ठेवली आहे Smile

हे लय भारी...

अवलिया's picture

2 Jul 2009 - 6:40 am | अवलिया

दोन्ही पुस्तकं वाचली आहेत. सुरेख आहेत.

--अवलिया

अभिरत भिरभि-या's picture

2 Jul 2009 - 9:53 am | अभिरत भिरभि-या

खरोखर सुरेख परिचय.. अभिनंदन

संजय अभ्यंकर's picture

2 Jul 2009 - 3:32 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सुचेल तसं's picture

2 Jul 2009 - 5:26 pm | सुचेल तसं

राजहंस प्रकाशन (दिलीप माजगावकर)

अतिशय ओघवत्या शैलीत आणि सोप्या भाषेत लिहिलेलं हे उत्तम माहितीपूर्ण पुस्तक आहे. विशेषतः तेलासारख्या अक्षरशः हरघडी वापरल्या जाणार्‍या इंधनाबाबत आपण इतके अनभिज्ञ असतो हे पहिल्यांदाच लक्षात आले!
संपूर्ण जगाचा इतिहास आणि काही प्रमाणात भूगोल सुद्धा बदलून जाईल इतका उत्पात ह्या तेलानं घडवला आहे आणि पुढेही घडवू शकेल.
भांडवलशाही जोपासताना मूल्यं म्हणून काही चीज असते ह्याचा सोयिस्कर विसर अमेरिकन आणि ब्रिटिश तेल कंपन्यांना कसा पडला? सर्व तेलधारक देश हे आपले जन्मजात मांडलिक आहेत असे समजून अमेरिकेने तेल उपसण्याबाबत, तेलाच्या दराबाबत सतत दंडुकेशाहीचं धोरण कसं ठेवलं? ह्याचा इत्थंभूत आढावा ह्या पुस्तकात घेतलाय.

सौदी अरेबिया किंवा इतर तेलवाल्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये अमेरिकेबाबत इतकी चीड का आहे ह्या प्रश्नाचं उत्तरं ह्या पुस्तकात मिळतं.
सीआयए ह्या गुप्तचर संस्थेला हाताशी धरुन अमेरिकन सरकारनं जे काही घृणास्पद खेळ मध्यपूर्वेत खेळले, ओसामा, आयातोल्लाह खोमेनी, सद्दाम ह्यांना वेळप्रसंगी शस्त्रास्त्रे पुरवून रशियाविरुद्ध उभं केलं आणि तेलाच्या व्यवहारात ते आपल्यालाच डोईजड होताहेत म्हटल्यावर निर्दयपणे त्यांना बा़जूला सारायला मागेपुढे बघितलं नाही त्याचाही गोषवरा ह्यात आलेला आहे.
किंग फैजल ह्या सौदीच्या अतिशय दिलदार, प्रगतीशील आणि अमेरिकन तेल कंपन्यांना सतत मदत करणार्‍या राजाची तो केवळ एका तेल व्यवहारात आपल्याला डोईजड होतोय असे लक्षात आल्यावर हत्या झाली. ह्यात सीआयएचा हात आहे असा संशय आहे. ते कधीच सिद्ध होऊ शकले नाही परंतु परिस्थितीजन्य गोष्टी कुठे निर्देश करतात ते सुजाण व्यक्ती समजू शकते!

तेलटंचाईचे चटके सोसून, दोन महायुद्धे खेळून, विएतनाम, इराक, अफगाणिस्तान च्या लढाया लढून इतक्या वर्षांनंतरही अमेरिकन सरकारच्या इतर जगाला दुय्यम मानून विचार करण्याच्या पद्धतीत फारसा फरक पडलेला नाही हे आजही जाणवतं आणि आपण दिग्मूढ होतो.

आमचं नाक कापलं गेलं तरी चालेल पण आम्ही अवलक्षण करणार हा दुराभिमान उद्या जगाला खाईत लोटेल की काय ह्या आशंकेनं पुस्तकाच्या शेवटी आपण ग्रस्त होतो, निदान मी तरी झालो.
---------------------------------
अहमद झाकी यामानी ह्या अफलातून व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिले आहे त्यामुळे जागोजागी यामानींची थोरवी लेखकाने गायली आहे. कधी क्वचित ती जरा जास्त होते की काय असे वाटून जाते परंतु तो काही फार मोठा दोष नव्हे. हा माणूस अफलातून आहे ह्यात संशय नाही. सगळ्या लोभी आणि व्यवहारशून्य अशा तेलसमृद्ध राष्ट्रांची मोट बांधून अमेरिकेच्या अंगभूत माजुरड्या दंडुकेशाहीला टक्कर द्यायची म्हणजे खायच्या गप्पा नाहीत.
ओपेक्/ओआपेक संस्था स्थापण्यात ह्याचा पुढाकार होता. त्यामुळे आज अमेरिकेला व्यवस्थित फाट्यावर मारलेले आहे. नाहीतर हे तेलसाठे अमेरिकेने केव्हाच गिळंकृत करुन सर्व जगाला नाकदुर्‍या काढायला लावल्या असत्या ह्यात मला तरी शंका नाही.

चतुरंग

अभिज्ञ's picture

7 Nov 2009 - 8:26 pm | अभिज्ञ

या पुस्तकाबरोबरच कुबेरांचे नुकतेच आलेले " अधर्मयुध्द" हे पुस्तक
हे मला सर्वात जास्त आवडले.
आजपर्यंतचा दहशतवादाचा इतिहास अतिशय सुंदर रितीने कुबेरांनि शब्दबध्द केला आहे.संग्रहि असावे असे पुस्तक.

अभिज्ञ.

टुकुल's picture

7 Nov 2009 - 9:09 am | टुकुल

सुंदर परिचय !!
वाचुन बघतो..

रंगासेठ, तुम्ही पण भर टाकली आहे..

--टुकुल

मदनबाण's picture

7 Nov 2009 - 1:16 pm | मदनबाण

पुस्तक परिचय फार आवडला. :)

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Nov 2009 - 2:09 pm | भाग्यश्री कुलकर्णी

पहिलं पुस्तक वाचलं आहे.चांगली माहिती मिळाली .

स्वाती२'s picture

7 Nov 2009 - 5:31 pm | स्वाती२

सुरेख परिचय. चतुरंग यांचा प्रतिसादही आवडला.

भोचक's picture

7 Nov 2009 - 6:58 pm | भोचक

पहिलं पुस्तक वाचलं आहे. तेव्हाच ते प्रचंड आवडलं होतं. कुबेरांची लिखाणाची शैली मस्त आहे. त्यामुळे अवघड विषयही ते छान सोपा करून सांगतात. वाचायलाही मजा येते. पहिल्या पुस्तकात काही शब् कसे रूजले याविषयी त्यांनी फार छान माहिती दिलीय. उदा. आसाममधले दिग्बोई हे आता तेलासाठी प्रसिद्ध असलेले गाव. तिथे तेल असल्याचे लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी ते खोदून काढण्यासाठी मजूर लावले. त्यासाठी ते 'डिग बॉय' असे म्हणायचे. यातून म्हणे दिग्बोई हे नाव रूढ झाले. शेल कंपनीच्या बाबतीतही असेच काहीसे स्पष्टीकरण त्यात आहे.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2009 - 12:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगला धागा, आधी नजरेतून सुटला होता. सुचेल तसं, चतुरंग, भोचक आणि अभिज्ञ तुम्हा चौघांचे आभार.

अदिती

बकुळफुले's picture

12 Nov 2009 - 1:00 pm | बकुळफुले

ओपेक वर बृनेई च्या सुलतानाचा किती पगडा आहे?
मी एका दिवाळी अंकात सौदी तले सगळे भूगर्भीय तेल काही टेक्नीक वापरून भारतात भूमीखालून आणले ..या कल्पनेवर एक लिखाण वाचले.
तेल संपले तर सौदीचे काय होईल हा मोठाच प्रश्न आहे.
कदाचित ते दुबई सारखे पर्यटन केंद्र बनवतील. अर्थात इस्लामी पर्यटन केंद्र.

"एका तेलियाने" चा इंग्रजी अनुवाद/ या विषयावरील इंग्रजी पुस्तक सुचवाल काय..? माझ्या एका अमेरिकन मित्राला हवी आहे. वाद घालत बसण्यापेक्षा त्याला हे पुस्तकच द्यावे म्हणतो.
"अधर्मयुध्द" हे Peter Bergin यांचे Holy War INC. चा मराठी अनुवाद तर नाही ना?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Mar 2010 - 4:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

Oil 101 बद्दल ऐकून आहे. अजून पुस्तक हातात पडलं नसल्यामुळे नक्की माहित नाही.
एका तेलियाने हा कोणत्याही पुस्तकाचा अनुवाद नसावा.

अदिती

संदीप चित्रे's picture

17 Mar 2010 - 10:49 pm | संदीप चित्रे

'एका तेलियाने' वाचलंय.
तुम्ही पुस्तकाचा परिचय खूप छान करून दिला आहे त्यामुळे इथे अजून काही लिहीत नाही. त्या पुस्तकावर मी एक लेख लिहीला होता तो मात्र अजून मिपावर आणायचा राहिलाय.. लवकरच टाकतो.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com