टाहो

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जे न देखे रवी...
31 May 2009 - 7:51 pm

तडकलेला माळ
जळणारं रान
फेसाळता धुराळा
धुराळ्याच्या थारोळ्यांत
टळटळीत उन्हाचं
मी न्हाणं घेतोय !

गाठुळलेल्या बुंध्यावर
ठणकणार्‍या सांध्यांवर
सोलावलेली साल
तराटलेल्या फांद्यांवर
लटकणार्‍या कबंधागत
मी टाहो फोडतोय !

शिशिर-बहर चक्राच्या
नि वैशाख ज्वाळांचा
हा सदाचा आवर्त नाही.
मृगजळांच्या मागे जात
माझा मलाच मी
भडाग्नि दिला आहे !

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

31 May 2009 - 8:20 pm | पाषाणभेद

मस्त रे कांबळी.
सर, एका अजाण व्रूक्षाची व्यथा आहे का ही ?
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

प्राजु's picture

31 May 2009 - 8:28 pm | प्राजु

बापरे!!
कविता वाचून वणव्यात सापडल्यासारखं वाटलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

31 May 2009 - 11:20 pm | क्रान्ति

वणव्याचा अनुभव खरंच उतरलाय कवितेत!
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

अरुण वडुलेकर's picture

2 Jun 2009 - 3:44 pm | अरुण वडुलेकर

ही कविता कांहीशी दुर्बोध झालेली आहे अशा अर्थाच्या कांही प्रतिक्रिया आहेत.
म्हणून -

या कवितेतला टाहो, अनिर्बंध जीवन जगून झाल्यावर जीवनाच्या मध्यावर
सिंहावलोकन करीत बसलेल्या एका हतप्रभ माणसाचा आहे.

आपल्याला जीवनप्रवासांत कांही वेळा अत्यंत गुणी परंतु भरकटलेली आणि
भरकटीत स्वत:चे जीवन स्वतःच विस्कटून घेतलेली माणसे दिसतात.
या कवितेत आक्रोश करणारा असाच एक जीव आहे. व्यावहारिक जगाच्या
गणतीत सर्व पातके करून बसलेला. त्यामुळे समाजात मान नाही. वर करून
दाखवायला तोंड नाही. म्हणून कबंध. कबंध म्हणजे बिनमुंडक्याचा माणूस.
अशा माणसाला कबंधासारखे लटकणे क्रमप्राप्तच आहे.

सुवर्णमयी's picture

2 Jun 2009 - 6:24 pm | सुवर्णमयी

कविता आवडली.दुर्बोध वगैरे वाटली नाही.

श्रावण मोडक's picture

2 Jun 2009 - 6:53 pm | श्रावण मोडक

पूर्ण सहमत. रचना चांगली झाली आहे. अरूणराव, जोरदार सुरू आहे सध्या. शुभेच्छा.