माझी मायभू

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
8 Feb 2008 - 4:04 pm

प्राचीन काळापासूनची आपली संस्कृती बहुतांशी टिकवून ठेवणारा, विविध परकियांचे आकर्षणस्थान झाल्याने व त्यांच्या आक्रमणांमुळे या संस्कृतीत किंवा संस्कृतीतून जरी काही घटक समाविष्ट अथवा नाहीसे झालेे असले, तरी न ढळता अभिमानाने जगात मान उंचावणारा, जीवसृष्टी व लोकसृष्टीत अमाप प्रमाणात विविधता असलेला, विकासाच्या दिशेने रोज पाऊले पुढे टाकत जगावर छाप पाडणारा, असा हा भारत देश.
ह्या देशावर सर्वप्रथम आर्य, त्यानंतर शक, मग मौर्य, मग ग्रीक, इत्यादी प्रबळ राजवटींनी देशाचा कायापालट करून त्याचे जणू सुवर्ण संास्कृतिक भूमीत रूपांतर केले.
भारताने 1 ते 9 हे अंक अस्तित्वात आणले. शून्याचा शोध भारतीयांनी लावला.
त्यानंतर अरबांशी केलेल्या व्यापारामुळे व यवनांच्या राजवटीत भारत जगप्रसिध्द देश झाला. या कालावधीत देशातील लोकविविधता वाढली, काही प्रमाणात देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली. पण शिल्पकला व वास्तुकौशल्याला प्राधान्य मिळून देशाचे सौंदर्य वाढले.
त्याच्या पुढील काळात मुघल व त्यानंतर मराठे भारताच्या राजवटीवर आले. त्यांना कपट-कारस्थानाने पराभूत करून व औद्योगिक दृष्ट्या पुष्कळ संपत्ती असलेल्या या देशात पूर्णपणे धूमाकूळ माजवून संपूर्ण देशावर आपली जुलमी राजवट प्रस्थापित केलेल्या ब्रिटिशांमुळे देशाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पण काही प्रमाणात देशाचा फायदा झाला.
ब्रिटिशांच्या राजवटीत देशात अनेक विचारवंत उदयाला आले. लोकशाहीची कल्पना आली. जुन्या रुढी- परंपरा यांना विरोध केला गेला, व वैविध्यपूर्ण असा भारत जगापुढे उभा ठाकला.
भारताने यवनांच्या काळापासून ते ब्रिटिशांच्या राजवटीपर्यंत सुमारे एक हजार वर्षे पारतंत्र्यात काढली. नुकतेच 25 ऑक्टोबरला भारताच्या ग्रीकांविरोधात असलेल्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाला सुमारे 3200 वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून आतापर्यंत भारत केवळ आपल्या स्वत:च्या हक्कांसाठी व स्वातंत्र्यासाठी लढा देत आला आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यसंग्राम हा जगातील सर्वांत मोठा लढा मानला जातो. ह्या लढयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्रदीर्घकाळ चालू असलेल्या संग्रामात जगातील इतर संग्रामांच्या मानाने कमीत कमी जीवीतहानी झाली.
ह्या सहस्र वर्षांच्या पारतंत्री राजवटीत ब्रिटिशाची राजवट दीडशे वर्षे एवढी होती. म्हणजेच पारतंत्री काळापेक्षा सुमारे सहापटींनी लहान होती. या काळात भारतातून एवढी संपत्ती लुटली गेली, की जिचे मूल्य आत्ताच्या बाजारपेठांमध्ये जवळजवळ चारशे निखर्व अमेरिकन डॉलर्स एवढे होईल. असे असूनही भारत अजूनही बऱ्याच प्रमाणात विकसित झाला आहे. विचारवंतांच्या हिशेबाप्रमाणे भारत इसवी सन 2050 पर्यंत जगातील सर्वात मोठी महासत्ता होणार आहे.
भारत हा विकसनशील देश असून त्याने आत्तापर्यंत बऱ्याच क्षेत्रात प्रगती केली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले.
उद्योगधंद्यांच्या क्षेत्रातदेखील आधुनिक तंत्रांचा वापर करून आपण लक्षणीय प्रगती केली आहे. माहिती, तंत्रज्ञान, संगणक क्षेत्र, अवकाश संशोधन, उपग्रहाद्वारे माहिती संकलन, अणुऊर्जा, इत्यादी क्षेत्रात भारताची प्रमुख राष्टांत गणना केली जाते.
भारताला दक्षिणेला हिन्दी महासागर, उत्तरेला हिमालय पर्वत, यांसारखे भौगोलिक विविधता असलेले वातावरण प्राप्त झाले आहे.
अशाप्रकारे भाषा, संस्कृती, इतिहास, गणित, विज्ञान, भूगोल, औद्योगिक तत्त्वे, इत्यादी घटकांद्वारे भारताने जगाला मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. त्यामुळे आज भारतात मी एक अभिमानी दृष्टिकोन बाळगून राहतो. माझ्या भारताला एखाद्या स्वप्ननगरीसारखे पहाण्याची गरजच नाही; कारण भारत हीच अशी एक सुंदर स्वप्ननगरी आहे, जी कोणत्याही देशाच्या तुलनेत उत्तमच आहे. जी सर्वात प्राचीन संस्कृती बाळगणारी असून अजूनपर्यंत प्रगतदृष्ट्या अस्तित्वात आहे. 'भारत कसा असावा', ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा भारताच्या प्रगतीपथावरून वाटचाल करत आपल्यामागून येणाऱ्या इतर भारतीयांसाठी हा विकासाचा प्रवास सोपा करून द्यावा व 2050 च्या आधीच सर्वांत मोठी महासत्ता होऊन अखिल जगाला चकित करावे.

। जय हिन्द ।

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Feb 2008 - 11:15 am | विसोबा खेचर

या काळात भारतातून एवढी संपत्ती लुटली गेली, की जिचे मूल्य आत्ताच्या बाजारपेठांमध्ये जवळजवळ चारशे निखर्व अमेरिकन डॉलर्स एवढे होईल.

अरे बापरे!

विचारवंतांच्या हिशेबाप्रमाणे भारत इसवी सन 2050 पर्यंत जगातील सर्वात मोठी महासत्ता होणार आहे.

माहिती, तंत्रज्ञान, संगणक क्षेत्र, अवकाश संशोधन, उपग्रहाद्वारे माहिती संकलन, अणुऊर्जा, इत्यादी क्षेत्रात भारताची प्रमुख राष्टांत गणना केली जाते.

ते सगळं ठीक आहे हो, परंतु आज तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबईच्या जवळ असलेल्या आमच्या ठाणे शहरात रोजची ३ तास वीज नसते! स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष झाली तरी वीज, पाणी यांसरख्या किमान आवश्यक नागरी सेवासुविधांच्या बाबतीत अजूनही माझी मायभू पारतंत्र्यातच आहे याचे वाईट वाटते! रोज तीन तास, मला माझे सगळे कामकाज थांबवावे लागते, माझी प्रॉडक्टिव्हिटी बंद पडते. का? तर वीज नाही!!

अहो फार लांब नाही तर डोंबिवली, कल्याण सारख्या शहरांतून जेथे तुम्हाआम्हासारखा अतिशय मोठ्या प्रमाणावर कष्टकरी, सुशिक्षित मध्यमवर्गीय चाकरमानी वर्ग राहतो त्यांना वेळच्या वेळी विजेची बिले भरूनसुद्धा, सर्व सरकारी कर प्रामाणिकपणे भरूनदेखील जर दिवसाचे सहा सहा, सात सात तास साधी वीजही मिळणार नसेल तर मग माझी मायभू अद्यापही पारतंत्र्याच आहे असेच म्हणावे लागेल! वीज नाही म्हणजे संगणकावरील कामापासून ते अगदी चक्क्यागिरण्यांपर्यंतचे सर्व महत्वाचे व्यवहार तर ठप्प होतातच, परंतु करमणूक म्हणून घटकाभर दूरदर्शनवील एखादा कार्यक्रमही बघता न येऊन सहा तास सक्तीने गप्प बसावे लागते, याला माझी मायभू अद्यापही पारतंत्र्याच आहे असे नाही म्हणणार तर दुसरे काय म्हणणार?

भारतात कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम प्रसंगी सक्तीने राबवण्यास माझी मायभू पूर्णत: अयशस्वी ठरली आहे याचेही मला मनापासून वाईट वाटते!

स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले.

??

आज अनेक दुर्गम ग्रामिण भागात दिवसाचे ९ ते १२ तास वीज नसते, कळशीभर पिण्याच्या पाण्याकरता बायकांना दोन मैल रपेट करावी लागते याला आपण,

"स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले""

असे जर आपण म्हणत असाल तर मग प्रश्नच मिटला!

त्यामुळे आज भारतात मी एक अभिमानी दृष्टिकोन बाळगून राहतो. माझ्या भारताला एखाद्या स्वप्ननगरीसारखे पहाण्याची गरजच नाही; कारण भारत हीच अशी एक सुंदर स्वप्ननगरी आहे,

स्वप्ननगरी तर आहेच, परंतु वीज नसल्यामुळे अंधेरनगरीही आहे असे खेदाने म्हणावे लागेल!

असो, तरीही आपल्याप्रमाणेच माझेही माझ्या मायभूवर प्रेम आहे, अगदी निरतिशय प्रेम आहे! परंतु ते प्रेम डोळस नसून आंधळं असतं तर किती बरं झालं असतं!

तात्या.

संजय अभ्यंकर's picture

10 Feb 2008 - 3:35 pm | संजय अभ्यंकर

तात्यांशी सहमत...

ठाणे शहरात रोजची ३ तास वीज नसते!
भारताच्या वीजेच्या समस्येच्या मुळाशी आपल्यादेशाचे (वीज निर्मिती व वितरणाचे) कल्पनाशुन्य नियोजन कारणीभूत आहे.
(शेतकर्‍यांना फुकट वीज देण्याचा मुर्खपणा यातच सामिल आहे).
जेथे रिलायंस वा टाटा वीज वितरित करते, तेथे आणी जेथे सरकार वितरित करते तेथे फरक का दिसुन येतो?

"स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले"
पाण्याचे नियोजनही वीजेप्रमाणे कल्पनाशुन्य आहे. भारताच्या तुलनेते इस्रायलचे पर्जन्यमान कमी असुनही शेती उत्पन्न (दर हेक्टरी) आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणुन काही ठिकाणी पाण्याचा सुकाळ, तर काही ठिकाणी दुर्भिक्ष.

रस्त्यांचे काय?
भारतातले रस्ते आणि वाहतूक व्यवस्था हा एक पोरखेळ आहे.
मुंबईत उड्डाणपुल कुर्म गतीने बांधले जातात. हा पोरखेळाचाच एक प्रकार आहे. बांधकाम कंत्राटदारांवर वेळेचे कसले बंधन नाही काय?

पाणीपुरीजी , भारताला महासत्ता बनण्यासाठी अजुन बरेच पापड बेलायचेत असे मला वाटते.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

राजे's picture

10 Feb 2008 - 4:06 pm | राजे (not verified)

जेथे देशाच्या राजकीय नाड्या आवळल्या व सोडल्या जातात त्या राजधानी दिल्ली ची हाल / वृतांत खालील प्रमाणे -

१. वीज (खाजगी कंपनी द्वारे) - घोषीत कपात २ तास रोज. ( अघोषीत -५, ६,४ ,१० तास येईल तेव्हा येईल नाहितर नाही जा तीकडे)

२. पाणी - स्वत:चा पाण्याचा पंप नाही आहे असे घर दिल्लीत शोधून सापडले नाही मलातरी अजून.

३. रस्ते - क्या कहने ! परवाच झालेल्या एका सर्वेकक्षणात असे सांगीतले गेले की दिल्ली तील रस्ते सर्वात सेफ आहेत..... मोठे आहेत वाहन चालवण्या करता. ( त्यामुळेच दररोज एक असे बस अपघाताचे प्रमाण आहे, मरणारी व्यक्ती संख्या -रोज ३ अशी आहे दिल्ली मध्ये.) दिल्ली गुडगांव रोड २७ कीमी. - कोठे ही थांबा नाही, १५ मिनीटाचा रस्ता पण टोल मुळे तो २ तास तर कधी कधी ४ तास देखील घेत आहे ( जगातील एकमेव २७ कीमी चा रस्ता ज्यावर तीन टोल-प्लाझा आहेत)

४. सार्वजनीक वाहतूक - १५ वर्षाच्या माझ्या दिल्ली राहण्याच्या कालावधी मध्ये मला एक ही रिक्क्षेवाला भेटला नाही जो मीटर प्रमाणे भाडे घेतो.

५. दिल्ली -NCR - माझ्या नजरे समोर शेकडो- हजारो एकड जमीन, उपजाऊ जमीन कंपन्यांना दिली गेली, कारखाने तयार करण्यासाठी. साध्या भाजी व धान्यासाठी देखील शेजारील राज्यातून मदत घ्यावी लागत आहे व भाज्यांचे भाव आकाशाला पोहचले आहेत.

६. उड्डाण फुल - जेथे गरज आहे तेथे नाहीत, जेथे गरज नाही तेथे दोन दोन आहेत.

७. पोलिस व कायदा - कोणी ही कधी ही तुम्हाला लुटू शकतो फक्त डोके हवे, पोलिस प्रथम एफ्-आई-आर पण लिहून घेत नाहीत, माझ्या गाडीचे कागज हरवले, ८०० रुपये मागीतले गेले, मी दिले नाही, दोन आठवडे लागले एफ्-आई-आर साठी. मागील वर्षामध्ये चालत्या गाडीमध्ये ३ बलात्कार झाले, शेकडो खुन, तपास प्रतीशत १०% देखील नाही, चोरी व लुटमारचे आकडे माझ्या कडे नाही आहेत.

८. विमानतळ - साधं पिण्याचे पाणी नाही उपलब्ध. (काही दुकान दारांचे साटे-लोटे आहे असे म्हणतात लोकं) बाहेर नियमाबाहेर गाडी उभी करु पर्यंत तुम्हाला कोठी थांबवत नाही पण एकदा का तुम्ही गाडी उभी केली व बाहेर आलात तर मात्र चलान घेऊन एकदा पोलीसवाला तुम्हाला देऊन जाईल.

९. भ्रष्टाचार - प्रचंड हा एकच शब्द. -छोट्या व्यक्ती पासून मोठ्या नेत्या, अधिकारया पर्यंत भ्रष्टाचार. पैसे आहेत खिश्यामध्ये तर तुमचे कोणीच काही बिघडू शकत नाही, पण पैसे नाहीत तर तुम्ही नियमानूसार असला तरी तुम्ही गुन्हेगार होऊ शकता,

धीस इज दिल्ली माय डियर फ्रेडं ! धीस इज दिल्ली !!!!!!

जय हो भारत माता की,
माफी बरं का
जय हो इंडीया की!!!!!!!!!!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

वडापाव's picture

10 Feb 2008 - 4:17 pm | वडापाव

श्री. राजे

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांपैकी सहावा मुद्दा मी स्वत: अनुभवला आहे. पुन्हा कधी दिल्लीत जायचं झालं, तर तुम्ही दिल्लीबद्दल दिलेल्या या आगाऊ माहितीच्या आधारे मी दिल्लीत दिवस काढीन.
पहिल्या दर्शनातच व दिल्लीला जाऊन आलेल्या माझ्या ओळखीतील व्यक्तींच्या मतांवर नजर फिरवल्यास तुम्ही मांडलेल्या इतर आठ मुद्यांमधून पूर्णसत्य दिसून येते याची मला खात्री आहे.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

जय हो भारत माता की !!!!!!!

सहज's picture

10 Feb 2008 - 4:45 pm | सहज

पाणी पुरी आपण हा लेख लिहायला जे श्रम घेतले त्याचे कौतुक वाटते. धन्यवाद.

हा लेख वाचुन तोंडात सुंदर चॉकलेटचा तुकड ठेवल्यासारखे वाटले. काश!! फक्त चॉकलेट खाउन आयुष्य काढता आले असते तर.

:-)

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 7:12 pm | सुधीर कांदळकर

लूट केली. ते करणारच. त्यासाठीच ते इथे आले होते. स्वकीयांचे काय. चोर, गुन्हेगार, पोलिस, राजकारणी, सरकारी अदिकारी, सगळे सर्व स्वकीयच आहेत. माझ्या मते स्वकीयांनीच आपल्याला जास्त लुटले. ही रक्कम १५०० वर्षातील परकीयांनी लुटलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल. ही आपण देत असलेली लोकशाहीची किंमत आहे. याहूनहि वाईट असे राज्य हुकूमशाहीत येऊ शकते. ते येऊ नये म्हणून आपण ही किंमत मोजतो. प्रतिभा गुंडींनी स्टलिनचे चरित्र लिहिले आहे. त्याने राजकीय कारणावरून ५ टक्के जनतेला नाहीसे केले. परंतु राष्ट्राला आर्थिक दृष्ट्या १०० वर्षे पुढे नेले. कारण कोणतेहि उत्पादक काम न करणारे असे व आर्थिक दृष्ट्या जनतेवर बोजा असणारे राजकीय नेते व कार्यकर्ते त्याने नाहीसे केले.

संजय अभ्यंकर's picture

10 Feb 2008 - 8:33 pm | संजय अभ्यंकर


सार्वजनीक वाहतूक - १५ वर्षाच्या माझ्या दिल्ली राहण्याच्या कालावधी मध्ये मला एक ही रिक्क्षेवाला भेटला नाही जो मीटर प्रमाणे भाडे घेतो.


राज साहेबांनी दिल्लीचे यथार्थ वर्णन केले आहे.

माझी कं. जेव्हा जेव्हा मला दिल्लीला पाठवते, तेव्हा मला अस्वस्थ वाटु लागते (पण जावेच लागते).
दिल्लीतली "जी हुजुर" पद्धती, लोकांचे खोटे हास्य, मुंबईच्या मानाने महागाई इ. प्रकार फार यातना देतात.

दिल्लीसारख्या महाप्रचंड शहरात स्वतःचे वाहन असल्याशिवाय कोणाचा निभाव लागु शकत नाही.
एखाद्या संध्याकाळी, कॅनॉट प्लेस मधिल, निरुलाचे -पॉट पौरि किंवा काकेदा कडे जेवायला जायचे असेल तर आपले वाहन घेउन जावे लागते.
अन्यथा आपले हॉटेलात परत पोहोचणे त्या हरामखोर रिक्षावाल्यांच्या मर्जीवर अवलंबून असते. ते किती पैसे मागतील हे केवळ तेच जाणतात.


स्टालिनने...परंतु राष्ट्राला आर्थिक दृष्ट्या १०० वर्षे पुढे नेले.


सुधीर साहेबांनी सांगितल्याची प्रचीती, जेव्हा मला रशियन्स भेटले तेव्हा आली. एकेकाळी हा देश कम्युनिस्ट असला तरी त्या काळातही त्यांनी प्रचंड तांत्रीक प्रगती केली. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स मध्ये सुखोई-३० या रशियन बनावटीच्या विमान प्रकल्पात आम्ही अनेक यंत्रे उभी केली. तेव्हा त्यांचे तंत्रज्ञान, त्यांनी केलेले डोळे दिपवणारे कार्य पहावयास मिळाले. विमानाचा प्रत्येक भाग कसा बनवावा, ह्या प्रक्रियेचे जगड्व्याळ लेखन, केवळ स्तिमीत करणारे आहे.

हे लिहिण्या मागचा उद्देश हा, कि कम्युनिस्ट(समाजवादि) असल्यामुळे रशियाच्या तांत्रिक प्रगतीत अडथळा आला नाही, गेल्या ५० वर्षांत रशियाने अनेक लढाऊ विमाने विकसित केली. आम्ही अजुनही लढाऊ विमानाला लागणारे एकमेव कावेरी ईंजिन गेली १६ वर्षे बनवू शकलो नाही.
संरक्षणा साठी लागणारे बहुसंख्य तंत्रज्ञान आम्ही अजुनही आयात करतो. आम्ही खरोखर महासत्ता बनू शकतो?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

जालिम लोशन's picture

26 Aug 2019 - 10:20 pm | जालिम लोशन

काही फरक जाणवतो का?

जॉनविक्क's picture

27 Aug 2019 - 12:59 am | जॉनविक्क