नजरा!!

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
29 Apr 2009 - 12:44 am

क्रान्तीची "मी तिला वाचवलं " वाचली.. आणि भावनांचा हल्लकल्लोळ झाला. त्या उद्वेगातून खालील गझल उतरली.

सार्‍याच ओळखीच्या दिसतात रोज नजरा
देहावरी तरी या, उरतात रोज नजरा..

आहेत वागण्याचे, रीती-रिवाज सारे
नियमांत कोणत्या, ह्या बसतात रोज नजरा?..

बिनघोर वागण्याची, मजला मुभाच नाही!
बुरख्यात मैतरीच्या, डसतात रोज नजरा ..

मूर्तीस मंदिराच्या, वसने अनेक उंची
नारीस नागवी या, करतात रोज नजरा..

"तू विश्वकारिणी!", हे वदला जगन्नियंता
उपभोग्य 'मान' माझा, वदतात रोज नजरा..

शापीत जन्म माझा, टाळू तरी किती मी
होऊनिया गिधाडे, फ़िरतात रोज नजरा..

बाजार वासनेचा, आसक्त स्पर्श सारे
ओंगळ हिडीस सार्‍या, असतात रोज नजरा..

नाजूकशी कळीही, तोडून कुस्करावी
बेशर्म पाशवी या , छळतात रोज नजरा..

झगडून मी जपावे , अस्तित्व रोज माझे
माझ्या असाह्यतेला, हसतात रोज नजरा..

माझी व्यथाच कोणी, का आपली म्हणावी??
विश्वास वाटणार्‍या, नसतात रोज नजरा..

- प्राजु

(उद्वेगात लिहिलेली कविता, गझल स्वरूपात आणण्यास माझ्या गुरूंची (के सुंची) खूप मदत झाली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.) :)

कवितागझलप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

नंदन's picture

29 Apr 2009 - 1:28 am | नंदन

मनातील भावनांना समर्थपणे वाचकांपर्यंत पोचवणारी ही गझल आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

29 Apr 2009 - 1:33 am | श्रावण मोडक

उघडणारी रचना.
अवांतर : विडंबनासाठी हा फुलटॉस वाटेल, पण हुकला तर विकेट निश्चित.

चकली's picture

29 Apr 2009 - 1:39 am | चकली

आवडली गझल

चकली
http://chakali.blogspot.com

चतुरंग's picture

29 Apr 2009 - 1:42 am | चतुरंग

अस्वस्थ करणारी गजल!

बुरख्यात मैतरीच्या आणि मक्ता फार आवडले! :)

चतुरंग

अवलिया's picture

29 Apr 2009 - 6:55 am | अवलिया

हेच म्हणतो

--अवलिया

सँडी's picture

30 Apr 2009 - 1:39 pm | सँडी

हेच म्हणतो!

आवडली.

बेसनलाडू's picture

29 Apr 2009 - 1:51 am | बेसनलाडू

करणारी गझल. फार आवडली.
(स्त्रीदाक्षिण्यवादी)बेसनलाडू
(मला) बिनघोर ऐवजी बिनधास्त सुचले,जास्त बरे वाटले, वजनातही बसले. गेयतेसाठी बेशर्म चालेलच; पण बेशरम चूक नसते. असाह्य नाही तर असहाय असा शब्द/त्याचे रूप हवा/हवे (हतबलता दर्शक/दुर्बलता दर्शक). पण ते वजनात
बसण्यासाठी चपखल शब्द/रूप कोणते याचा विचार करतो आहे.
(सूचक)बेसनलाडू

धनंजय's picture

29 Apr 2009 - 1:59 am | धनंजय

यांचे हिडीस रूप उघड करणारी गझल. नजरेत वखवख असते तेव्हा अक्षरशः गलिच्छ झाल्यासारखे वाटते.

**(पण तारतम्य असावे - आसक्ती आणि वासना या मानवसुलभ आहेत. "असामी असामी" मधील प्रसंग आठवतो. बायकोची साडी-खरेदी चालली असताना मुख्य पात्राची नजर शेजारच्या बाईच्या गोर्‍या अंगावर स्थिरावते. त्याला त्याची बायको खडसावते, तेव्हा श्रोत्यांना/वाचकांना मुख्य पात्राबद्दल सहानुभूतीच वाटते. पाकळ्यांच्या चोळी घातलेली लावण्यवती नृत्यांगना बघितली, तर तिच्या शरिराचा आकार स्पष्ट दिसतो, तो भुरळ पाडणारा असतो - म्हणूनच तर मुद्दामून पाकळ्यांची चोळी शिवतात. प्राचीन भारतीय शिल्पकार पातळ कपड्यांच्या मागे दिसणारे स्त्रीचे नग्न शरीर दाखवतात, त्याबद्दल इरावती कर्वे यांनी वर्णन केले आहे. ते कलात्मक/वास्तववादी आहे, असे इरावती बाईंचे म्हणणे आहे. कपड्यांमागची नग्नता नजरेने हेरणे [अन्ड्रेसिंग समवन विथ युवर आइज] ही एक सामान्य गोष्ट आहे - अनेक स्त्रियाही ही नजरचालाखी ठेवतात असे मला वाटते.)**

प्राजु's picture

29 Apr 2009 - 2:39 am | प्राजु

शेजारच्या बाईच्या गोर्‍या अंगावर स्थिरावते. त्याला त्याची बायको खडसावते, तेव्हा श्रोत्यांना/वाचकांना मुख्य पात्राबद्दल सहानुभूतीच वाटते.
या अशा गोष्टी फक्त कथांतूनच (मुख्यत्वे विनोदी) घडत असतात. किंबहुना विनोद निर्मितीसाठीच लिहिलेल्या असतात.

पाकळ्यांच्या चोळी घातलेली लावण्यवती नृत्यांगना बघितली, तर तिच्या शरिराचा आकार स्पष्ट दिसतो, तो भुरळ पाडणारा असतो - म्हणूनच तर मुद्दामून पाकळ्यांची चोळी शिवतात.
असहमत. तशी चोळी शिवण्याचा आणि स्त्रीदाक्षिण्याचा काडिमात्र संबंध नाही.

प्राचीन भारतीय शिल्पकार पातळ कपड्यांच्या मागे दिसणारे स्त्रीचे नग्न शरीर दाखवतात, त्याबद्दल इरावती कर्वे यांनी वर्णन केले आहे. ते कलात्मक/वास्तववादी आहे, असे इरावती बाईंचे म्हणणे आहे.
इरावती बाईंनी फक्त सौदर्य दृष्टी दाखवली याचा अर्थ, सगळे पुरूष स्त्रीकडे (लहान मुलगी, तरूणी, प्रौढा, वृद्धा) सौदर्य दृष्टीने बघतात असा समज आहे का? उद्या बस-ट्रेन मध्ये माझ्याकडे कोणी विक्षिप्तपणे पाहू लागले तर "बाबा रे तू सौदर्य दृष्टीने बघतो आहेस का माझ्याकडे?" असं मी नक्कीच नाही विचारणार. (कदाचीत आणि वेळ आली तर) त्याच्या श्रीमुखातच भडकवेन. आणि वासनांधतेला सौदर्य दृष्टी नक्कीच नसते. अन्यथा फक्त आणि फक्त तरूणीच "शिकार' झाल्या असत्या. वासानांध माणसाला प्रसंगी स्त्रीच काय पुरूषची चालतो. तेव्हा कामुक नजरांना सौदर्य दृष्टी म्हणण्याचा मूर्खपणा मी तरी नक्कीच नाही करणार.

कपड्यांमागची नग्नता नजरेने हेरणे [अन्ड्रेसिंग समवन विथ युवर आइज] ही एक सामान्य गोष्ट आहे - अनेक स्त्रियाही ही नजरचालाखी ठेवतात असे मला वाटते.
त्या स्त्रीया कशा आणि काय असतात हे विप्रच सांगू शकतील. पण सर्वसाधारण (ज्या समाजातून मी आले आहे) स्त्री ही अशी नसते असा माझा अनुभव असतो.

असो.. शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्यामुळे माझी मते तुम्हाला पटावीत असा अट्टाहास अजिबात नाही. पण ज्यांना(पुरूषाना) मुली आहेत त्याना नक्कीच पटतील अशी आशा आहे.

धन्यवाद. :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

29 Apr 2009 - 3:31 am | बेसनलाडू

पण ज्यांना(पुरूषाना) मुली आहेत त्याना नक्कीच पटतील अशी आशा आहे.
असहमत. माता, पत्नी, भगिनी, कन्या - कोणत्याही नात्याने पुरुषाशी संबंधित असलेली स्त्री आणि या नात्याची जाणीव असलेला पुरुष यांना तुमचे विचार पटू शकतील; मुलगी-बाप हेच नाते असायला हवे असे नाही.
मात्र धनंजयांचा मूळ मुद्दा हा मूलभूत पुरुषी/'नर' वृत्तीचा (बेसिक् मेल् इन्स्टिंक्ट्?) आहे, असे मला वाटते. अगदी स्वपत्नीशी एकनिष्ठ असणारे पुरुषही रस्त्याने जाणार्‍या एखाद्या (सामान्य समाजमान्यतेनुसार) 'सुंदर' स्त्रीकडे (निदान) चोरूनही पाहत नसतील, यावर विश्वास ठेवणे (निदान माझ्यासाठी तरी) कठीणच आहे. अशाच प्रकारचे विधान स्त्रियांच्याही बाबतीत लिहिता येईल. पण अशी मूलभूत वृत्ती अविवेकी/अनियंत्रित झाली की तिचे स्वैराचार, वासनांधता यांत रुपांतर होते, असे वाटते.
सुंदर पोशाख, शोभेसा नट्टापट्टा केलेल्या सुंदर स्त्रीस नजरेने किंवा प्रत्यक्ष बोलून 'कॉम्प्लिमेन्ट्' देणे आणि केवळ उपभोगाच्या हेतूने, वखवखलेल्या कामुक/वासनांध नजरेने पाहणे यांत फरक आहे, हे खरे; आणि स्त्रियांना हा फरक नक्कीच कळतो, असे (मला तरी) वाटते. पण असे सौंदर्य प्रत्यक्ष 'अवलोकनाविना' कसे 'ऍक्नॉलेज्' करता येईल (दखल घेता येईल), हे मात्र मला कळत नाही. धनंजयांच्या मूऴ प्रतिसादात प्राचीन शिल्पादी कलांबाबतची विधाने, पोशाख इ. बद्दलची विधाने ही स्त्रीच्या सौंदर्याकडे पुरुषाने डोळे भरून पहावे ('सौंदर्याचा' उपभोग घेण्याच्या दृष्टीने, स्त्रीच्या 'शरीराचा' कामभावनेतून उपभोग घेण्याच्या दृष्टीने नव्हे), त्याची दखल घ्यावी आणि तसे व्यक्त करावे या मूळ उद्देशाचे दाखले देणारी आहेत, असे मला वाटते. मला व्यक्तिशः (कदाचित पुरुष असल्याने म्हणा हवे तर) त्यात काही गैर वाटत नाही. पण स्त्रीस ज्या नजरेची जाणीव केवळ सौंदर्यास्वादक नजर म्हणून नाही तर त्याहीपलीकडची (कामुक, वासनांध, हिडीस, वखवखलेली इ.) नजर म्हणून होते, अशा नजरेचे मी समर्थन करत नाही/करणार नाही//करू शकत नाही/शकणार नाही, हेही तितकेच खरे.
(समंजस)बेसनलाडू

प्राजु's picture

29 Apr 2009 - 6:25 am | प्राजु

आपला प्रतिसाद बॅलन्सिंग आहे. आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

30 Apr 2009 - 7:32 pm | टारझन

(कामुक, वासनांध, हिडीस, वखवखलेली इ.)

बेला शेट, वरचा शब्द वेगळा असेल हो .. बाकी ३ शब्दांच्या ग्रुप मधे नसेल बसत .. पहाना ... :(

हिडिस हा शब्द फक्त हिण बरोबर ठिक वाटतो हो ...

प्रकाश घाटपांडे's picture

29 Apr 2009 - 9:56 am | प्रकाश घाटपांडे

सुंदर पोशाख, शोभेसा नट्टापट्टा केलेल्या सुंदर स्त्रीस नजरेने किंवा प्रत्यक्ष बोलून 'कॉम्प्लिमेन्ट्' देणे आणि केवळ उपभोगाच्या हेतूने, वखवखलेल्या कामुक/वासनांध नजरेने पाहणे यांत फरक आहे, हे खरे; आणि स्त्रियांना हा फरक नक्कीच कळतो, असे (मला तरी) वाटते.

खर तर हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. समजा अशी कॉम्प्लिमेंट दिली आन " डोळ फुटल का र मेल्या. आया भैनी नाहीत का? त्यांच्याक तसाच पघतो का?" असा काहीसा प्रतिसाद आला तर?
किंवा
अगदी अश्श्याच 'कॉम्प्लिमेंट' आपल्याला मिळाव्या( पण फक्त आपल्या आवडत्या पुरुषा/ प्रियकरा कडुन) असे त्या स्रीला वाटत असेल तर?
किंवा
मनातल्या मनात मनोमन सुखावुन केवळ नजरेने "थँक्स' असे म्हणुन पुढील प्रवास आपापल्या वाटेने.
असो फरक हा व्यक्तिसापेक्ष, मनःस्थिती/ परिस्थिती सापेक्ष आहे.
चला नवा धागा सुरु करा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

झगडून मी जपावे , अस्तित्व रोज माझे
माझ्या असाह्यतेला, हसतात रोज नजरा.. खूप छान !

कविता/ गझल / प्रकटन आवडले .

उमेश कोठीकर's picture

29 Apr 2009 - 9:01 am | उमेश कोठीकर

अगदी नेमके वर्णन केलेस प्राजु. 'मनात लपलेला दु:शासन' लिहितांना असेच विचार माझ्या डोक्यात आले होते. वरील प्रतिक्रियांवरील तुझे म्हणणे पटले. पुरुषांच्या नजरेतला पशू जागा झाला की नजर आपोआप गिळायला बघते; आणि त्या नजरेला नात्याचा पदर मिळाला की तीच नजर प्रेमळ्,स्नेहार्द्,शालीन वाटू लागते.(ही कविता पुरुषी नजरांवर आहे म्हणून पुरुषांवर म्हटले.)
नजर या विषयावरील एक प्रसिद्ध शेर,
'सबकी नजरो मे हो साकी,ये जरूरी है मगर
सब पे साकी की नजर हो, जरूरी तो नही'

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2009 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्त्रीयांचा म्हणून विचार करतांना त्यांच्याच काही आत दडलेल्या भावना गझलेद्वारे पोहचल्या.

बाकी, बेसनलाडवाच्या विश्लेषणाशी / विचाराशी सहमत !

-दिलीप बिरुटे
(सहमतलाडू)

चन्द्रशेखर गोखले's picture

29 Apr 2009 - 9:19 am | चन्द्रशेखर गोखले

अंतर्मुख करुन अस्वस्थ व्हायला लावणारी गझल्..मराठीतल्या काही अविस्मरणीय गझलांमध्ये हि गझल समाविष्टित होईल. !

चन्द्रशेखर गोखले's picture

29 Apr 2009 - 9:19 am | चन्द्रशेखर गोखले

अंतर्मुख करुन अस्वस्थ व्हायला लावणारी गझल्..मराठीतल्या काही अविस्मरणीय गझलांमध्ये हि गझल समाविष्टित होईल. !

काळा डॉन's picture

29 Apr 2009 - 10:21 am | काळा डॉन

तुम्ही त्या वसंत फुलला वगैरे साखरपाकातल्या कविता करता त्या बर्या असतात.
असले विषय हा तुमचा प्रांत नाही.
स्पष्ट मत. रागावु नका.

ही सहज स्फुरलेली रचना आहे. खूप व्यथीत होऊन लिहिलेले आहेस हे जाणवतंय.
"ऋण मातीचे.." लिहिताना मलाही असेच काहीसे वाटले होते.
चांगली रचना - अंगावर येणारं वास्तव.

राघव

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Apr 2009 - 2:09 pm | llपुण्याचे पेशवेll

छानच आहे कविता.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Apr 2009 - 2:15 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय सुंदर आणि भिडणारी कविता. प्राजुच्या आत्तापर्यंतच्या कवितांमधे मनामधे खूप खोल जाणारी म्हणूनच सगळ्यात उत्तम कविता.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

29 Apr 2009 - 4:48 pm | विसोबा खेचर

अतिशय सुंदर आणि भिडणारी कविता.

हेच बोल्तो..!

प्राजू, जियो..

तात्या.

अश्विनि३३७९'s picture

29 Apr 2009 - 2:56 pm | अश्विनि३३७९

दुसरे शब्दच नाहियेत... अप्रतिम..

स्वाती दिनेश's picture

29 Apr 2009 - 6:12 pm | स्वाती दिनेश

प्राजु,
गझल अस्वस्थ करुन गेली.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

29 Apr 2009 - 6:32 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

संदीप चित्रे's picture

29 Apr 2009 - 7:50 pm | संदीप चित्रे

कविता / गझल इ. जर कधी निवडल्यास तर त्यात ही गझल नक्की खूप वरचे स्थान मिळवेल.
अजून काय सांगावे !

क्रान्ति's picture

29 Apr 2009 - 8:02 pm | क्रान्ति

प्राजु, तुझ्या कवितेला प्रतिसाद देताना नेहमी समोर फेर धरणारे, नाचणारे सगळे छानसे शब्द कुठेतरी हरवून गेले! अस्वस्थ केलं तुझ्या या गझलेनं!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

अनामिक's picture

29 Apr 2009 - 10:59 pm | अनामिक

हेच म्हणतो... अस्वस्थ झालो वाचून.

-अनामिक

शितल's picture

29 Apr 2009 - 8:20 pm | शितल

प्राजु,
गझलच्या दर्जा बद्दल मला काहि कळत नाही पण त्यातुन तुला जे सांगायचे आते ते ह्रदया पर्यंत पोहचले आहे.

जागु's picture

29 Apr 2009 - 9:29 pm | जागु

खुप छान प्राजू.

ऋषिकेश's picture

29 Apr 2009 - 9:52 pm | ऋषिकेश

(किंचीत मोठी ) गझल आवडली

ऋषिकेश

मीनल's picture

29 Apr 2009 - 10:05 pm | मीनल

सहमत
मीनल.

उदय सप्रे's picture

30 Apr 2009 - 12:54 pm | उदय सप्रे

अप्रतिम ! शब्दच नाहीत बोलायला......फारच छान आणि हृदयस्पर्शी !

फोडून टाकुया या , वळल्या खाली जरा
नसतात माणसाला माणूसकीच्या नजरा !

लिखाळ's picture

30 Apr 2009 - 5:31 pm | लिखाळ

गजल छान आहे.
या स्त्रीला फारच पुरुषी जाच सहन करावा लागत आहे. ती म्हणते त्या प्रमाणे एका जरी स्त्रीच्या वाट्याला अशी विचित्र परिस्थिती येत असेल तरी 'महान संस्कृतीच्या'' वारसदारांनी टेंभा मिरवणे थांबवले पाहिजे असे वाटले.
पण तरी गजलेतली परिस्थिती अतिरंजीत वाटली.
-- लिखाळ.

अनामिक's picture

30 Apr 2009 - 5:40 pm | अनामिक

माझ्या मते ही फक्तं कोण्या एका स्त्रीची परिस्थिती नसावी.... स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कधीनाकधी अश्या परिस्थितीला/नजरांना सामोरे जावेच लागते. कोणा एकीची व्यथा न समजता, एका जनरिक (मराठी शब्द) परिस्थितीची जाणिव करून देणारी कविता/गजल म्हणून घेतली तर अतिरंजीत वाटू नये.

-अनामिक

प्राजु's picture

30 Apr 2009 - 7:13 pm | प्राजु

सर्वांची मनापासून आभारी आहे.
धन्यवाद. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चंद्रशेखर महामुनी's picture

30 Apr 2009 - 11:48 pm | चंद्रशेखर महामुनी

खरे तर... लिहायचे म्हणुन लिहितोय...
खरे तर......
शब्द नाहित..!!

निश:ब्द...!

जयवी's picture

11 May 2009 - 4:59 pm | जयवी

प्राजु.....फार उच्च गझल लिहिली आहेस आणि मुख्य म्हणजे गझल लिहायच्या नादात शब्दांची ओढाताण अजिबातच झाली नाहीये. मनातल्या भावना अतिशय उत्तम रितीने उतरल्या आहेत.

खूप खूप आवडली !!

बाकरवडी's picture

22 May 2009 - 1:02 pm | बाकरवडी

कविता वाचून काहीही वाटले नाही. :<

:B :B :B बाकरवडी :B :B :B