'आंबे' त्वा निर्मीयले कवतुके....

उदय ४२'s picture
उदय ४२ in जनातलं, मनातलं
4 Apr 2009 - 7:57 pm

वसंत समयी फुले ,परिमळे दिशा व्यापि जो,
जयास अवलोकुनी सुरतरुही चित्ती थिजो
तया सतत सेविती विहग आम्रवृक्षा किती
परिपिकची एकला मधुर वाणि लाधे कृती.

कृष्णशास्त्री चिपळूणकरांच हे कवन .त्याचा लहानपणी कधी अर्थ कळला नाही , आताही धड माहीती आहे ,असे ठामपणे सांगता येणार नाही.पृथ्वी वृत्ताचं उदाहरण म्हणून तोंडपाठ करून ठेवलेल्या चार ओळी या पलीकडे माझी दृष्टी कधी गेलीच नाही.' 'परिमल ', 'चित्ती थिजो ' 'मधुर 'वगैरे शब्द (शिवाय धडधडीत पुरावा म्हणून ) आम्रवृक्ष असा उल्लेख यावरून आंबे खाण्याशी याचा काही संबध असावा असं माझ्या बालबुध्दीला वाटत असे (हे पिक म्हणजे कोकीळेला उद्देशून रचलेलं कवन आहे असं पुढे कोणीतरी सांगीतलं. असेलही ).ते काहीही असो ,'आंबे खाण्याची कविता ' म्हणून ती डोक्यात फिट्ट बसली होती , एव्हढं मात्र खरं.
आमच्या लहानपणी त्र्यंबकेश्वरला ,उन्हाळ्याच्या दिवसात मौज असे .डोक्याला रुमाल बांधून आमचे आजोबा बाहेर जात.
बिटक्या बिटक्या आंब्यांचे ढिग असायचे.
"फाडा कितीचा "
"चौदाचा"
"छे ! पंधरा कर. " असला संवाद व्हायचा .
फाडा म्हणजे डझन .बाराचा नव्हे चौदाचा वगैरे डझन मोजला जायचा .शेकड्यांनी खरेदी केलेले आंबे टोपली भरून घरात यायचे .
सोबत कधी जांभळं तर कधी तोरणं वगैरे रानमेवाही असायचा .
घंगाळातल्या पाण्यात आंब्यांचं टोपलं रिकामं व्हायचं .
"सदरे काढा ' ,चला !!!" अशी हाळी आली की आम्ही पोरं क्षणार्धात शर्ट काढून फेकून देत असू....बघता बघता त्या चिमुकल्या आंब्यांचा फडशा पडे. सकाळ दुपार संध्याकाळ हा एकच उद्योग .उघड्याबंब ढेरीवर आंब्याचा रस ओघळलेला. हात कोपरापर्यंत बरबटलेले.नाकालाही रसाळ टिळा लागलेला ,अशी सगळी 'ध्यानं ' दिसायची.
खरं सांगायचं तर या आंब्यांच आकर्षण होतंच, पण त्याहीपेक्षा जिभेला पाणी सुटायचं ते कैरीच्या वासानी .
छे !! कैरी म्हटलं की आजही तोंडाला पाणी सुटतं.
कैर्‍या कधी पिकूच नयेत,त्यांचे आंबे होऊच नयेत ,अशी देवाकडे प्रार्थना करायचो.
(देवानं माझ्या बर्‍याच गोष्टी मुळ्ळीच ऐकल्या नाहीत ,त्यापैकी ही एक.)
मीठ तिखट लावून कैर्‍या खाण्याचे ते आंबटढाण दिवस आठवले की आजही जीव हुरहुरा होतो.
तुमचा विश्वास बसणार नाही ,पण खराखुरा देवगड हापूस मी पत्रकारीतेत आल्यानंतरच पाहिला.त्याकाळी क्रॉफर्ड मार्केटात उन्हाळ्यात आंब्याच्या पेट्या येत हापूस आंब्याचा 'अल्फान्सो' वगैरे झाला नव्हता. सरळ सरळ हापूस असंच त्याला म्हणत असत.कोकणातून येणारा हा आंबा विकण्याचं काम मात्र देशावरचे टिळा लावलेले वारकरी विक्रेते करायचे.पुणे जुन्नर सातार, भीमाशंकर इथून पांढरीशुभ्र टोपी ,कपाळी टिळा गळ्यात माळ अशा वेशातले हे आंबेवाले येत असत.(संगीताचे अनेक उतामोत्तम कार्यक्रम सादर करून नावलौकीक मिळवणारा अशोक हांडे हा देखील मूळचा हापूस आंब्याचा मोठा व्यापारी आहे.)मार्केटात आलेल्या पहिल्या पेटीचा खरेदीचा मान हमखास एखाद्या धनीकाकडे जाई,.
असलाच कुठलातरी इव्हेंट कवर करण्याच्या निमीत्ताने मी देवगड हापूस पाहिला.
मुठी एव्हढचं रसरशीत फळ ,बिन डागाचं, त्याची चोचही तशी चिमुकलीच पण हाताळताना आपण काहीतरी लाखमोलाच पाहतो आहे याची जाणिव होई.वाटायचं हा खरा फळाचा राजा ! त्याचा अंगगंध त्याचं रंगीन ताजेपण ...सालीच्या आत खचाखच भरललेला गर आणि हा सारा ऐवज एकत्र ठेवणारी ती आतील कोय.असल्या फळाची पेटी पाच हजाराला कुठलाही धनवंत घेईलच. आपल्याकडे पैसे असते तर आपणही घेतली असती ! पण असलं साजरं गोजरं फलळ खाण्यावेरी घालवायचं की शोकेस मध्ये ठेवायचं .?
"जाऊ द्या आंबे स्वस्त झाले की आपणही घेऊ एखादी पेटी" असा समंजस विचार करत वर्षानुवर्ष काढली .
आमच्या घरात दरवर्षी पेटी आली ती आंब्याचं अप्रूप कमी झाल्यावर. असो.
पंच तारांकीत हॉटेलात आजकाल बारमाही आंबे मिळतात .अर्थात तो हापूस असतोच असं नाही .एकदा असाच ,बिनहंगामाचा कुठल्यातरी हॉटेलात गेलो होतो.तिथे आंबा दिसला "या दिवसात आंबा ? " मी विचारलं चवीला बरा लागत होता. पण त्याचं नातं कोकणापासून बरंच दूरचं आहे हे कळत होतं ते फळ पाकीस्तानातून आलं होतं असं कोणीतरी मला सांगीतलं .जय महाराष्ट्रा असंम्हणत मी सुखानं त्या गरात दात रुतवले.
फिलीपाईन्स, पाकिस्तान ,भारत अशा काही मोजक्या देशातच आंबा होतो असं म्हणतात . आंब्याच्या असंख्य जाती एव्हाना (सालीसकट )आमच्या उदरात सामावल्या आहेत.फिलीपिनो आंबा ही तर निव्वळ फळफेक (धुळफेक सारखी !) आहे असे माझे मत आहे.पाकिस्तानी आंबा बरा असला तरी चवीला तसा "लंगडाच "आहे. मध्यंतरी कुठल्यातरी समारंभात अफगाणी आंबा पाहिला होता.बारकं फळ होतं .म्हटलं ,काबूली चण्यापेक्षा जर फल मोठं आहे इतकंच.!
आंब्याच्या एव्हढ्या जाती आहेत जगात .पण माझी पसंती विचाराल अतर देवगड हापूसला!या देवगड हापूसला जे कॅरेक्टर आहे ते जगात कुठल्याच आंब्याला नाही. मोगल राजवटीत आंब्याचे नजराणे जायचे म्हणे. कसे जात असतील? बाबासाहेब पुरंदर्‍यांना विचारायला हवं .म्हणजे अडी .इथे लावायची मजल दरमजल करत दिल्ली गाठेपर्यंत डझनभर उरत असतील.विख्यात उर्दू शायर मिर्झा गालीब यालाही आंबे खाण्याच शौक होता. आणि त्यासाठी कर्ज काढण्याची त्याची तयारी असे असं म्हणतात.बाकी आंबे खावे ते मोगलांनीच .त्या फळाचा रसास्वाद ,व्यवस्थीत चोखून चोखून घेतल्यावर उरणारी केसाळ कोय ही कुठल्यातरी खानसाहेबांशीच नातं सांगत नाही का ?
आमचा देवगड किंवा रत्नांग्री हापूस मात्र असा दाढीधारी कोयीचा नाही .अस्सल कोकणस्थी बाण्यानं हा वाढतो.आणि खाल्ला जातो. या राजस फळाची हेळसांड कुणाला करताच येत नाही ,शिस्तीत खाण्याचं फळ आहे हे.
अर्थात या दोघांशीही स्पर्धा करणारी चव कारवारच्या इशार्द आंब्याची. हे फळ पटकन संपवायला लागतं .इतक्या नाजूक प्रकृतीचं ,पण याच्या रसदारपणाला तोड नाही.खरं सांगू का देवगड ,रत्नांग्री आणि इशार्द (की इशाद्दु)आंब्यात माझी आवड संपते.बाकी पायरी बलसाड तोतापूरी वगैरे आंबे घरी पाहुणे आले तरच.! हापूसच्या रसात भर पडणारा पायरी आंबा एरवी आपली पायरी सांभाळून असतो.

जाता जाता एक डिश सांगतो. देवगड हापूस घ्यावा.त्याच्या फोडी कराव्यात .वर थोडी थोडी (म्हणजे बरीच साय ) घालावी . हे प्रकरण तासभर फ्रीज मध्ये ठेवावं ,आणि खावं ! बस्स! याच चालीवर बनवलेला मँगो बाऊल पूर्वी फोर्टमध्ये ब्रायटन मिल्क बार मध्ये मिळायचा .आता ते हॉटेलही गेलं आणि तो झकास मँगो बाउअलही गेला.!
चालायचंच. गेले ते दिवस.
अहिंया केरीनो ताजो रस मळशे अशी पाटी दिसली माझा जीव तीळ तीळ तुटतो.
आमरस घरी घेऊन जायचा ? आ-म-र-स ?
ते मोठ भांडं घेऊन रस काढत बसणं नाही.,साली कोयी चोखणं नाही ,तो फजीता नाही ...मग त्या रसात काव्य कुठलं ? प्लॅस्टीकच्या पिशवीतून काव्य कधी घरात येतं ?
कधी कधी एखाद सहृदय नेता (नारायणराव ,ऐकताय ना ?)प्रेमानं आंब्याची पेटी घरी पाठवतो.एखाद्या रविवारी,त्या पेटीकडे नजर जाते.आज आमरसपुरीचा बेत करावा असं मनात येतं आणि आजोबांची ती हाक कानात गुंजते.
"सदरे काढा ,चला !"
....माझा हात उगाचच छातीच्या बटणाकडे जातो.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

रामदास's picture

4 Apr 2009 - 8:02 pm | रामदास

बेतासारखा जमला आहे लेख .!

उदय ४२'s picture

4 Apr 2009 - 8:12 pm | उदय ४२

रामदास काका धन्यवाद....

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

यशोधरा's picture

4 Apr 2009 - 8:38 pm | यशोधरा

सही जमलाय लेख! आजोळ, पणजोळची आठवण आली...

मराठमोळा's picture

4 Apr 2009 - 9:32 pm | मराठमोळा

लेख एकदम रसाळ झाला आहे. आंब्याचे एवढे सुरेख वर्णन आधी वाचल्याचे स्मरणात नाही.
एखादा फोटो डकवला असता तर अजुन मजा आली असती. असो

अवांतरः उद्याच आंब्याची पेटी आणावी लागणार

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अविनाशकुलकर्णी's picture

4 Apr 2009 - 9:59 pm | अविनाशकुलकर्णी

जुन्या आठवणी ता़ज्या केल्यात दादा तुम्हि...लहान पणी रसाचे निराळे व चोखुन खायचे निराळे आंबे असत..त्याला साखर गोट्या म्हणायचो...मजा होति....

पक्या's picture

4 Apr 2009 - 11:04 pm | पक्या

सुरेख लेख. रसाळ हापूस प्रमाणेच लेख ही रसाळ.

मदनबाण's picture

5 Apr 2009 - 4:24 am | मदनबाण

आम्रपुराण आवडले... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अनिल हटेला's picture

6 Apr 2009 - 7:36 am | अनिल हटेला

आम्रपुराण आवडले...

:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

भाग्यश्री's picture

5 Apr 2009 - 5:44 am | भाग्यश्री

जबरा!!!

विनायक प्रभू's picture

5 Apr 2009 - 11:22 am | विनायक प्रभू

आवडला

विसोबा खेचर's picture

5 Apr 2009 - 11:55 am | विसोबा खेचर

सु रे ख..!

टारझन's picture

5 Apr 2009 - 2:49 pm | टारझन

लेख के व ळ अ प्र ति म ..!

मराठी_माणूस's picture

5 Apr 2009 - 1:27 pm | मराठी_माणूस

रसाळ लेख

क्रान्ति's picture

5 Apr 2009 - 1:40 pm | क्रान्ति

सुरेख! अप्रतिम!
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

6 Apr 2009 - 7:16 pm | प्राजु

लेखातील काही शब्द... उदा. आंबटढाण दिवस, हे प्रकरण फ्रिज मध्ये,काव्य प्लास्टीकमधून.. खूप म्हणजे खूपच आवडले.
नोस्टॅल्जिक केलंत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

5 Apr 2009 - 2:14 pm | स्वाती दिनेश

आंबे रसाळ आहेत,
लेख आवडला. जुन्या दिवसात घेऊन गेला.
स्वाती

अवलिया's picture

5 Apr 2009 - 2:34 pm | अवलिया

मस्त :)

--अवलिया

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 5:40 pm | सुधीर कांदळकर

गोव्याचा माणकूर आंबा. जास्त गोड पण स्वाद कमी. टिकत नाहीं. पिकल्यावर एकदोन दिवसांत डागळतो.

कोंकणांत दूधपेढा आंबा मिळतो. तो पण कधींतरी खायला छान.

नीलम आणि रत्ना. बरेचसे हापूससारखे लागतात. याचें पीक दरवर्षीं सारखें व भरपूर येतें. मुंबईत बरेच ठिकाणीं भय्ये हापूस म्हणूनच विकतात. पण पट्टीच्या खाणार्‍यांना लगेच कळते.

बलसाड पायरीला रत्नागिरी पायरीपेक्षां 'चार' कमी असते व चवीला जास्त स्वादिष्ट असतो.

उत्तर प्रदेशचा. लंगडा आंबा पण मस्तच. बराचसा पायरीसारखा लागतो. बाहेरून हिरवा. आंतून लिंबू रंग. पण त्याच्या चवीत फारफार विविधता असते. कांहींना प्रचंड डिंक असतो. कधीं बेचवहि निघतो. म्हणून बेभरंवशी. पण भरपूर टिकतो. पाण्यानें खराब होत नाहीं. पावसाळ्यांत पण मिळतो. डॉ. नारळीकरांचा आवडता आंबा.

बाटली आंबा पण छान. हा पण पण भरपूर टिकतो. पाण्यानें खराब होत नाहीं. पावसाळ्यांत पण मिळतो. पण लिबलिबीत. कापल्यावर आकार धरत नाहीं.

दशहारी आंबा. हा पण पण भरपूर टिकतो. पाण्यानें खराब होत नाहीं. पावसाळ्यांत पण मिळतो. याचे सासव नावाची आंबटगोड तिखट आमटी तर लाजबाब. पण लिबलिबीत. कापल्यावर आकार धरत नाहीं.

देवगड किंवा रत्नागिरी हापूसच्या डोंगरी आंब्याचा रुबाबच वेगळा. एक आंबा जरी घरांत असला तरी शेजारीपाजारीं लगेच कळतें पिकल्यानंतर दोन आठवडे टिकतो. खाल्ला नाहीं तर.

केसर आंबा
सुधीर कांदळकर.

घाटावरचे भट's picture

6 Apr 2009 - 7:28 am | घाटावरचे भट

मस्त!!

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Apr 2009 - 7:43 am | llपुण्याचे पेशवेll

लेख आवडला. तोतापुरी, केसर, दशेरा इतरही अनेक आंबे खाल्ले पण शेवटी हापूस तो हापूसच. हल्ली देवगड हापूस कोयीला खराब निघतो, कारण माहीत नाही पण न खराब झालेल्या गरावरही जीव ओवाळून टाकावासा वाटतो.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विसोबा खेचर's picture

6 Apr 2009 - 10:38 am | विसोबा खेचर

पण शेवटी हापूस तो हापूसच.

अगदी खरं! पण मला पायरीही हापूसइतकाच आवडतो. तश्या आंब्यांच्या अनेक जातीजमाती आहेत पण त्या हापूसपायरीच्या आसपासही नाहीत!

असो,

आपला,
(कलमी आंबा प्रेमी) तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Apr 2009 - 10:48 am | परिकथेतील राजकुमार

मस्त रसाळ लेख आवडला :)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पाषाणभेद's picture

6 Apr 2009 - 1:07 pm | पाषाणभेद

लहाणपणाची आंबे खाण्याची आठवण झाली. तशी मजा आता नाही हे खरेच. आपल्या नंतरची पिढी किती मोठ्या आनंदाला मुकतेय, नाही?
लेख वाचून तोंडाला पाणी सुटले.
- पाषाणभेद

सुमीत भातखंडे's picture

6 Apr 2009 - 2:03 pm | सुमीत भातखंडे

निव्वळ अप्रतिम!!!
शब्दच नाहीत.

चतुरंग's picture

6 Apr 2009 - 7:41 pm | चतुरंग

आंबे खायचे ते पोतं टाकून बुट्टीशेजारीच बसून. दोन्ही हात कोपरापर्यंत ओघळलेले, गाल आणि नाकं रंगलेले, चड्यांवर केशरी रसाचा सडा पडलेले बाळगोपाळ नंतर एकगठ्ठा चौकात हौदाच्या पाण्यात आंघोळीला जायचे!
'सदरे काढा, चला!' ने एकदम नॉस्टाल्जिक केलंत. जियो!!

चतुरंग

उदय ४२'s picture

6 Apr 2009 - 7:41 pm | उदय ४२

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

लिखाळ's picture

6 Apr 2009 - 7:51 pm | लिखाळ

लेख आणि शीर्षक दोन्ही मस्त :)
-- लिखाळ.

chipatakhdumdum's picture

6 Apr 2009 - 8:50 pm | chipatakhdumdum

आज मालवणात बाजारात ४०० रु. डझन भाव आहे, पण फळ एकदम बेस्ट, साधारण पणे किलोत पाचच बसतील, आणि मुख्य म्हणजे पिकलेल फळ..

chipatakhdumdum's picture

6 Apr 2009 - 8:53 pm | chipatakhdumdum

काल देवगडात चौकशी केली, कच्च फळ, ४०० रु. डझन. पिकायला कमितकमी दहा दिवस लागणार..