डरना मना है

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
28 Mar 2009 - 4:19 pm

मी कॉलेजात असतानाची गोष्ट. अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाच्या परिक्षेचा शेवटचा दिवस. जून महिन्याचा दुसरा आठवडा. माझे दोन्ही सिनिअर रुम पार्टनर आदल्या दिवशीच परिक्षा आणी त्यानंतरची पार्टी संपवुन घरी गेलेले. माझी एक तोंडी परिक्षा बाकी असल्याने अजुन दोन दिवस थांबणे भाग होते. त्याचबरोबर रुम बदलायची असल्याने पॅकिंग करायचे होते आणी वस्तु दुसर्‍या रुमवर हलवायच्या असल्याने घरी जाता येत नव्हते. माझे मुंबईचे मित्र दोन दिवसांसाठी घरी निघुन गेल्याने मी एकटाच उरलो होतो.
संध्याकाळी ५:३० ला परिक्षा संपल्याची घंटा वाजली आणी सगळेजण खुष होऊन एकमेकाना शुभेच्छा देऊन घरी जाण्याच्या तयारीला लागले. वेगळाच आनंद असतो परिक्षा संपल्याचा.

अभ्यासाच्या टेंशन आणी जागरणामुळे अंग जड झाले होते आणी डोकं सुन्न. मित्राना बस स्टँडवर सोडवुन ८:०० ला रुमवर परतलो, एकटं वाटु लागल्याने फ्रेश होऊन पुन्हा रुमपासुन साधारण ७०० मीटर वर असलेल्या टपरीवर आलो. अण्णाला म्हंटल "एक क्लासिक माइल्ड्स". त्याने त्याचे भूतासारखे डोळे माझ्याकडे रोखुन मला सिगारेट देत म्हणाला "क्या भाई, घर नही गये क्या?" मी काहीही न बोलता सिगारेट सुलगावली आणी वळालो तेवढ्यात कोणितरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. दचकुन मी पाहिलं तर तो माझ्याच कॉलेजातला ओळखीचा मित्र होता. मला म्हणाला "आज पार्टी नाही का?" मी नाही म्हणालो आणी तो निघुन गेला.
अजुन एक दिर्घ झुरका घेउन मी आकाशाकडे पाहिले तर काळ्या ढगानी भरुन गेल होत. जूनचा महिना होता, पाऊस सुरु होण्याची चिन्हे दिसत होती. वीज अधुन मधुन तिच्या अस्तित्त्वाची जाणीव करुन देत होती. वारा हळुहळु त्याचा जोर वाढवत होता. आणी तेवढ्यात कसर पुर्ण करण्यासाठी दिवेपण गेले.कालच झालेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र चिकचिक झालेली होती. सर्वत्र काळोख पसरला होता आणी प्रत्येकजण घरी परतण्याच्या मार्गावर होता. काहीतरी वेगळाच अनुभव येत होता.

बाजुच्या हॉटेलात जाउन एक चहा मागवला. हॉटेलात जेमतेम ३-४ लोकं होती. वाफारणारा चहा घेत मी रस्त्यावर कमी होणारी रहदारी बघत होतो. बराच वेळ तिथेच बसुन राहिलो, काहीतरी पोटात टाकायचे म्हणुन पुलाव मागवला. पुलाव संपेपर्यंत १०:३० झाले होते. तोपर्यंत रस्त्यावर कुणीच दिसेनासे झाले होते आणी वारा वादळाचे रुप घेऊ पहात होता. हॉटेलातुन बाहेर आलो आणी रुमकडे जाणार्‍या रस्त्यावर नजर टाकली. काळोखात रस्ता कुठेतरी गुडुप झाला होता. दोन चार कुत्र्यांचे चमकाणारे डोळे आणी त्यानी सुरु केलेली कोल्हेकुई काळजाचे ठोके वाढवत होती आणी मी परतण्याचा धीर जमा करत होतो.

तसा मी कधी न घाबरणारा माणुस पण तरी त्या दिवशी दिवे येईपर्यंत मी तिथेच थांबण्याचा विचार केला आणी अजुन एक सिगारेट सुलगावली. अण्णा टपरी बंद करुन मला रुमवर परतण्याचा सल्ला देऊन निघुन गेला. दिवे येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती आणी वादळी पावसाची दाट शक्याता वाटत होती. ७०० मीटर अंतर चालायचे होते आणी जवळ छत्री नसल्याने मी उसने आवसान आणुन
परत जाण्याच्या उद्देशाने पाउल उचलले आणी तेवढ्यात कडाड्कन वीज चमकली आणी माझा थरकाप उडाला. वारा थोडा शांत झाला होता आणी ढगांनी त्यांच्या गाळणीची छिद्र थोडी मोठी केली होती.पावसाचे अतिथंड पाणी अंगाला टोचत होते आणी मी चिखलातुन रस्ता शोधत पावले टाकत होतो, तेवढ्यात कोणीतरी माझ्या मागे चालतय असा भास झाला. मी मागे न बघता झपाझप पावले टाकायला सुरुवात केली आणी माझ्या मागचा येणारा आवज पण वाढला. एकट्यात स्वतःच्या पावलांचा आवाज येतो हे माहीत असुन्सुद्धा मागे वळुन पाहण्याचे धाडस होत नव्हते. तेवढ्यात एक मोटार रस्त्यावरचे पाणी कापत झर्रकन् माझ्या बाजुने निघुन गेली. (माझ्याकडे कार असती तर किती बरं झालं असतं असा एक विचार मनात येऊन गेला.)

भुंकणार्‍या कुत्र्याना हाकलुन मी माझ्या बिल्डिंगपर्यंत पोहोचलो आणी थोडासा जीव भांड्यात पडल्यासारखे वाटले. मी नखशिखात भिजलोय याची मला जाणीव झाली. वारा पुन्हा घोंघावू लागला आणी त्याच्याबरोबर वीजेचा खेळ सुरु झाला. इतरत्र भयाण शांतता होती. सोसायटी नविन असल्याने २-३ कुटुंबच रहात होती आणी रखवालदार तर नव्हताच.आमची बिल्डिंग जुन्या स्मशानभुमीच्या जागेवर बांधली आहे अस काही लोकं म्हणत.

अंधारात चाचपडत मी दुसर्‍या मजल्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो पण मला काळोखात कुलुपच दिसेना. वीज पुन्हा कडाडली आणी मी तेवढ्या उजेडाचा फायदा घेत कुलुपाला किल्ली लावली आणी दरवाजा उघडुन पटकन घरात शिरलो. आंधळ्या माणसासारखा वस्तुंचा ठाव घेत कपडे बदलले, पाण्याचा माठ शोधुन एक ग्लास पाणी प्यालो आणी बेडवर येऊन बसलो. डोळे उघडे असुन सुद्धा बंद आहेत असा भास होण्याइतका काळोख पसरला होता. मला पुन्हा भिती वाटु लागली, कुणी जोरजोरात दार वाजवाव तसा वारा स्लायडिंग्च्या खिडक्यावर धडका मारत होता वेगवेगळे आवाज करत होता. किचनची खिडकीची काच फुटल्याने तिथुन तो मुक्क्तसंचार करत घरातल्या सगळ्या वस्तुंना धक्के देत होता. भिंतीवर चिटकवलेले पोस्टरसुद्धा झेंड्याप्रमाणे फडफड करत होते.

मी तोंडावर पांघरुण घेउन चुपचाप पडुन निद्रादेवीची अराधना करु लागलो तेवढ्यातबाथरुममधे काहितरी पडल्याचा आवाज झाला
आणी त्याने माझ्या काळजाचे एक क दोन कितीतरी ठोके चुकवले. "बाथरुम मधे खिडकी लावलेली असेल तर मग तिथे पडण्यासारख काय आहे?" मी स्वतःशीच मनातल्या मनात, तोंडावरचे पांघरुण तसेच. "भूत वगैरे काहीही नसते, जाऊन बघायला पाहिजे काय पडलं ते" "जाऊ दे ना, पडलं तर पडलं उद्या बघता येईल." "घाबरट कुणीकडचा" असे अनेक विचार माझ्या मनात लढाई करु लागले आणी मला मात्र पुर्ण घाम फुटला होता. वारा खिडक्यावर धडका मारत होताच आणी त्याच्या आवाजाला वीजेची साथ होतीच. मी पुर्ण हिंम्मत करुन काय होणार आहे आणी काय पडले ते बघायचेच असा विचार केला आणी तोंडावरचे पांघरुण दुर करतो न करतो तोच.... काहीतरी फड्फड करत माझ्या अंगावर येऊन पडले....ह्रुदय पुर्णपणे थांबले आहे असे वाटले पण तरी पुर्ण ताकदीनिशी मी ते दुर फेकले आणी लढाईचा पवित्रा घेऊन उभा राहिलो, पुन्हा वीज कडाडली आणी ते दुसरे तिसरे काहीही नसुन भिंतीवरचे पोस्टर आहे हे समजले. वार्‍याने चिकट्पट्ट्यांना निकामी केले होते आणी बहुतेक माझ्या हृदयालाही.
प्रचंड धड्धड आणी दरदरुन फुटलेला घाम अशा आवेशात मी माझा मोर्चा बाथरुमकडे वळवला. मुश्किलीने मेणबत्ती आणी माचिस शोधली आणी हातात मेणबत्ती घेउन बाथरुम मधे डोकावलो तर दाढीचा ब्रश बादलीत पडल्याचे दिसले, आणी ही कमाल उंदीरमामाची आहे ही खात्री झाली आणी हा विचार मनात आधी का नाही आला याचे आश्चर्य वाटले. क्षणभर हसावे का रडावे कळेनासे झाले.

आपण कितीही निर्भीड असलो तरी काही अनुभव असे थरकाप उडवुन देणारे असतात. त्यामुळे मी अजिबात भीत नाही असे आता मुळीच म्हणत नाही. खरी भुतं असतात की नाही हे अजुन माहीत नाही पण कधी कधी भुतांसारखे भासणारे हे अनुभव मात्र खरे आहेत.

आपला,
थोडासा भित्रा मराठमोळा.

कथा

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

28 Mar 2009 - 4:38 pm | योगी९००

आयला.. फारच छान लिहिलयं. वाचताना मला ही थोडी भिती वाटली. तुमची काय अवस्था झाली असेल ते समजू शकतो.

एकदा असेच मी रात्री घरी एकटा झोपलो असताना मध्येच जाग आली आणि पाहीले तर कोणीतरी माझ्या रुमचा दिवा लावला होता. मला जाम भिती वाटली. पहिल्यांदा वाटले की चोरबिर आले असावेत पण बेडरूमचा दरवाजा बंद होता त्यामुळे नक्की काय ते समजत नव्हते. तेवढ्यात एक पाल दिव्याच्या बटणापासून थोड्या दुर अंतरावर बघितली आणि पालीमुळे दिवा लागला असावा अशी समजूत करून घेतली.

दुसराही असाच एक प्रसंग-होतो.रात्री बेडरूम मध्ये एकटाच झोपलो होतो. जवळच एक खुर्ची होती. झोप तशी लागतच होती आणि अचानक कोणीतरी खुर्चीवर बसल्यावर आवाज येतो ना तसा एक आवाज झाला. मला दरदरून घाम फुटला. तोंडातून एक शब्द फुटेना. (दातखिळ बसणे यालाच म्हणतात काय?). जवळजवळ ३-४ मिनीटे अशाच अवस्थेत होतो. (हा इतका कालावधी सुद्धा खुप मोठा वाटतो.). नंतर कसे काय कोणास ठावूक तोंडातून दत्तगुरूंचे नाव बाहेर आले आणि एकदम मोकळे वाटले. २ मिनीटांनी ऊठलो आणि दिवा लावला. खुर्चीत कोणीच नव्हते (कसे कोण असणार?) . आज हे लिहिताना मला हसू येतेय पण त्यावेळी माझी फारच तंतरलेली होती.

अजूनही मी कधी एकटा झोपणार असलो तर माझ्या बेडरूम मध्ये एकही खुर्ची ठेवत नाही.

खादाडमाऊ

दशानन's picture

28 Mar 2009 - 4:55 pm | दशानन

मागील महीन्यात माझ्या सोबत पण असेच काही झाले होते, मामाच्या फार्म हाऊस वर रात्री पार्टी करुन मस्त पैकी झोपलो होतो, फार्म हाऊस हा शहरा बाहेर व जवळ पासची वस्ती देखील तीन-चार किलो मिटर दुरवर... रात्री झोपलो होतो व अचानक जाग आली कारण कोणी तरी स्त्री माझ्या कानात काही तरी बोलून गेली असे मला वाटले ... मग काय... दरदरुन घाम फुटला, शरीर जागचे हलेना, तोंड उघडेना.... अशीच काही मिनिटे गेली... फटाक करुन उठलो बाहेर गॅलरी मध्ये आलो व मस्त पैकी जोराने श्वास घेतला व त्या बाईचा शोध घेण्यासाठी परत बेडरुम मध्ये आलो, इकडे तिकडे पाहिले काहीच दिसले नाहि, बेड खाली पण शोधले पण काहीच दिसले नाही... परत बेड वर आलो तोच उशी खाली ठेवलेला फोन वाजला, एक मैत्रिण होती व म्हणाली " अरे एवढ्या रात्री फोन करायला तुला काय झाले, बरं फोन केलास तो केलास व बोलत ही नव्हतास.... "
=)) मला जाम हसू फुटले... च्यामायला झोपेत फोनवर हात पडला असेल व त्यामुळे लास्ट डायल मधील फोन पुन्हा लागला... व ती ने तो उचलला असेल, माझ्या फोन मध्ये जरा आवाज जास्तच आहे, लाऊडस्पिकर ऑन करण्याची गरज नाही एवढा जास्त... तर तीच बया माझ्या कानात बोलत होती व मला वाटले भुत आहे...... =))

योगी९००'s picture

28 Mar 2009 - 5:03 pm | योगी९००

राजे,

कानात बाई बोलली म्हणून शोध घ्यायला उठलात..जर एखादा बुवा ( बु..वा...) बोलला असता तर तसेच पडून राहिला असता. (ह.घ्या.)

मला जरी अजून एकही भुत दिसले नाही तरी एखाद्या तरूण बाईचेच भुत पहिल्यांदा दिसावे असे वाटते.

बाकी इकडे युरोपात बरेचश्या मुली भुतासारख्याच दिसतात. कदाचित गोर्‍या लोकांचे भुत काळे असावे नाहीतर त्यांना समजणारच नाही की भुत कोण आणि खरोखरची बाई कोण?

खादाडमाऊ

मराठमोळा's picture

28 Mar 2009 - 6:18 pm | मराठमोळा

तुमचा किस्सा वाचुन ह. ह. पु. वा. झाली
अजुन लिहा...

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

शितल's picture

28 Mar 2009 - 7:23 pm | शितल

राजे,
=)) =))

लवंगी's picture

28 Mar 2009 - 5:04 pm | लवंगी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अनंता's picture

28 Mar 2009 - 5:21 pm | अनंता

१०२%सहमत.

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत फिरत असतो ;-)

प्रमोद देव's picture

28 Mar 2009 - 6:12 pm | प्रमोद देव

लेख आणि प्रतिक्रिया दोन्हीही मस्त आहेत.
( ह्या लेखाला किमान ५० प्रतिक्रिया निश्चित येतील. ) :)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Mar 2009 - 6:52 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.... छान लिहिलं आहे.

बिपिन कार्यकर्ते

योगी९००'s picture

28 Mar 2009 - 7:34 pm | योगी९००

मला जसा कोणीतरी खुर्चीवर बसल्याचा भास झाला..तसाच एकालाही सारखा होत होता..त्याने मुद्दामून त्याची चित्रफित बनवून घेतली. ती आपण खालील दुव्यावर बघु शकता..
सुचना खरोखरच्या भुताची चित्रफित असल्याने आपापल्या जबाबदारीवर चित्रफितीतील खुर्ची कडे बघावे...थोडी थोडी हलल्याचा भास होईल..
http://www.youtube.com/watch?v=QfZItov1BUo&feature=rec-HM-fresh+div

खादाडमाऊ

सुक्या's picture

29 Mar 2009 - 8:28 am | सुक्या

काय राव किती भ्यालो मी ती चित्रफित पाहुन. :-)

बाकी किस्सा मस्त आहे.

(भित्रा) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

क्रान्ति's picture

28 Mar 2009 - 7:42 pm | क्रान्ति

खास लिहिलंय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

टारझन's picture

28 Mar 2009 - 8:18 pm | टारझन

लेख ओके ओके वाटला !!
राजेंचा अणुभव (की येडचापपणा बे ? ) एक णंबर्स !!
असो .. मी ऑफिसातून लेट घरी यायच्या वाटेवर कॉलणीतलं एक कुत्र माझ्या वर लै भुंकायचं .. त्याची मला लै भिती वाटायची म्हणून मी लांबच्या वाटेने यायचो ... पण दुसरीकडेही कुत्र्याचा त्रास सुरू झाला .. मग मी एक दिवस हातात दगड घेऊन चालू लागलो .. कुत्र जसं भुंकायला लागलं तसं त्याच्या दिशेने एक सॉलीड दगड फेकला गेला, तो इतका अचुक होता की क्लियर डोक्यात बसला , कुत्र गप्प गार झालं ते उठलंच नाही.. म्हंटलं कुत्र खपलं की काय .. मला कुत्र्याची हत्या झाल्याचं वाईट वाटलं पण नाही , दुसर्‍या दिवशी ते पुन्हा दिसलं .. पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता =)) मला प्रचंड आणंद झाला होता .. असो

मराठमोळा's picture

28 Mar 2009 - 10:40 pm | मराठमोळा

लेख ओके ओके वाटला !!
सहमत आहे. हा लेख मी आणखीन रोचक बनवु शकलो असतो हे नक्की. असो...

पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता
=)) हे भारी.. बाकी दगड नक्की कसा व केवढा मारलात ते सांगितले तर बरे होईल. आजकाल सगळीकडे फार त्रास वाढला आहे भटक्या कुत्र्यांचा. मीसुद्धा बेंगलोर मधे ऑफिसवरुन घरी येताना ज्या रस्त्याने कुत्रे नाहीत असा रस्ता शोधत यायचो..
तोसुद्धा एक गमतीदार लेख होईल.

अजुन कुणाचे असे अनुभव असतील तर नक्की लिहा.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

संग्राम's picture

28 Mar 2009 - 8:52 pm | संग्राम

=)) =))
पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता
=)) =))
कदाचित गोर्‍या लोकांचे भुत काळे असावे नाहीतर त्यांना समजणारच नाही की भुत कोण आणि खरोखरची बाई कोण?

प्राजु's picture

28 Mar 2009 - 9:59 pm | प्राजु

मस्त!
कधी कधी साध्या साध्या गोष्टींची सुद्धा भिती वाटते हे खरंच आहे.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

29 Mar 2009 - 3:16 am | भाग्यश्री

लेख मस्त लिहीला आहे !! वाचतानाही मी घाबरले!!
माझं असं नेहेमी होत असतं! अंधाराला अजुन घाबरते मी.. :)

रेवती's picture

29 Mar 2009 - 6:53 am | रेवती

भाग्यश्रीशी सहमत.
मीही वाचताना घाबरले. मधेच वाचन थांबवून घरात एकदा फिरून आले, मगच पुढची गोष्टं वाचली.
लहानपणी मी फारच भित्री होते (आता तितकी नाही ;)).
पुजेतली सुपारी माझ्याच धक्क्याने अंगावर पडल्यावर मी इतकी घाबरले आणि ओरडले की घरदार जमा झाले होते.

रेवती

विसोबा खेचर's picture

29 Mar 2009 - 8:57 am | विसोबा खेचर

लै भारी रे! :)

येऊ द्या अजूनही..

तात्या.