सर, नमस्कार ! ओळखलं का ?
असे म्हटल्याबरोबर..मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पण याचे कपडे काही कर्दमलेले वगैरे नव्हते. अगदी टापटीप होता.त्यामुळे मी जरा स्वत:शीच ओशाळलो.
आम्ही नेहमीप्रमाणे एसटी स्टँडवर एस्टीची वाट पाहात होतो. गजबजलेल्या स्टँडवर लोकांची ये-जा चाललेली होती. आणि माझ्या समोर एक तरुण त्याच्या पत्नी सोबत उभा होता. मी त्याच्या चेह-याकडे पाहिले, ओळखीचे कोणतेच चिन्ह त्याच्यात दिसत नव्हते. पण नेहमीचे गुळगुळीत वाक्य फेकुन दिले.
पूर्वी भेट झाल्यासारखी वाटते ! पण नेमके सांगता येईना आपण कुठे भेटलो ते!
सर, तुमच्या लक्षात कसे राहील? किती तरी विद्यार्थ्यात एक चेहरा लक्षात ठेवायचा, म्हणजे जरा अवघड काम आहे.
खरं तर दोन तीन वर्षाच्या सहवासात विद्यार्थी लक्षात राहतो. पण याला प्रयत्न करुनही मला आठवता येईना.कोणत्या वर्गाचा असेल.
कोणत्या वर्षी शिकला असेल. खूप स्वत:ला ताण देऊन पाहिला पण काही जमेना.
सर, ही माझी पत्नी !(एकमेकांना नमस्कार झाला)
नुकतीच डीएड झाली आहे. एका विनाअनुदानित शाळेत गेल्या सहा महिन्यापासून नोकरी करतेय.
पगार नियमित होतो का ?
सर,पगार दिल्यानंतर अर्धा पगार पुन्हा संस्थेला द्यावा लागतो.
अरेरे ! मग दुसरीकडे प्रयत्न करायचा. सध्या डीएड झालेले आणि पोलिसांत भरती होणा-यांना शासकीय नोक-यांची काही कमी नाही.
तसेही,विनाअनुदानित शाळेत नोकरी करण्यापेक्षा किराणा दुकान टाकलेलं बरं ! असा एक विचार मी मनातल्या मनात गिळला.
तुम्ही काय करता ?..मी त्या तरुणाला विचारलं
सर, मी एमए.झालोय, इतिहास विषयात. नेट-सेटची प्राध्यापकाची पात्रता परिक्षा देत आहे. आतापर्यंत दोनदा परिक्षा दिली,
पण पास काही होईना. माझ्या मागचे, पुढचे,बाजूचे पास होतात. पण माझ्याच बाबतीत दुर्दैव आडवं येतंय !
अरे,नेट-सेट्चा अभ्यासक्रम तसा अवघड आहे. काही विषयात तर शुन्य टक्के निकाल आहे. तेव्हा प्रयत्न करत राहावे.
प्रयत्न तर चालूच आहेत सर ! गावाकडची शेती विकून बीएडला डोनेशन देऊन प्रवेश घेतला.
वर्षभर हमालासारखे राबराब राबलो,स्कॉलरशिप संस्थाचालकांनी ढापली.
हं ! शिक्षण संस्था चालकांनी काही ठिकाणी बाजार मांडला आहे.पण परिस्थिती बदलेल असा विचार केला पाहिजे.
कशाची परिस्थिती बदलते सर, माझेच पहा. शिक्षणासाठी शेती विकली. अभ्यासही केला.
बीएडची परिक्षा देत होतो, तर..
तर काय ?
ज्या परिक्षा केंद्रावर परिक्षा देत होतो, त्या बीएडच्या एका पेपरला जरा एका मुद्यावर अडलो.
खिशातून काही चिठ्ठ्या काढायला आणि आपण माझी कॉपी पकडायला एकच वेळ झाला.
अरेरे !पण कॉपी करायची नाही ना !
खरंय सर, पण पन्नास टक्के विद्यार्थी कॉप्या करुन पास होतात..तीस टक्के मुले कॉप्या घेऊन येतात पण त्यांच्यात कॉप्या काढायची हिम्मत होत नाही. वीस टक्के मुले अभ्यास करुन लिहितात.
तुम्ही कोणत्या कॅटेगीरीत येता ?.. मी मिश्कीलपणे म्हणालो.
सर, मी तीस टक्क्यामधे येतो. आपण माझी कॉपी पकडली आणि माझे सर्व विषयांचे गुण रद्द करण्याची शिफारस विद्यापीठाकडे केली आणि माझ्या एका महत्वाच्या वर्षाबरोबर माझे सर्व भविष्याचे स्वप्न हवेत विरुन गेले.
ते कसं काय बॉ?
बीएड झाल्याबरोबर मला ज्युनियर कॉलेजमधे नोकरी लागणार होती. नातेवाईकाच्या एका संस्थेत चार लाख रुपये भरले होते.
पदाची जाहिरात दिलेली असल्यामुळे त्यांनी दुसरा उमेदवार घेतला आणि माझे पैसे..त्यांच्याकडेच राहिले.
अरे, मिळतील ना पैसे. नातेवाईक आहेत म्हटल्यावर तुझे पैसे कुठे जाणार?
संस्थाचालक पैसे परत देत आहेत. पण दहा हजार, वीस हजार, असे करुन देत आहेत. तेही तगादा केल्यावर .
काय करावे या संस्थाचालकांचे काही कळत नाही.... मी
सर, माझं तुमच्याकडं फारसं मागणं नाही. असाच प्रसंग भविष्यात कोणाबरोबर घडला तर त्याला त्याची परिस्थिती विचारा,
आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याचा प्रामाणिकपणा पडताळून पाहा.आणि जमल्यास त्याला माफ करा.
माझ्यासारखा एखादा तग धरतो,पण एखादा आयुष्यातून उठून जाईल.पाहा जमलेच तर....
इथे त्याचे डोळे भरतील असे वाटले होते. पण तसे काहीच झाले नाही. कोणत्या आत्मविश्वासाने तो असा बोलत होता. मला कळलेच नाही. आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नव्हते. मी काय बोलावे असा विचार करत होतो, तेवढ्यात त्याची एसटी आली. त्यांची धावपळ सुरु झाली. तरी तो बोलत होता...
सर, पुन्हा परिक्षेला येणार आहे. तुमच्या शुभेच्छांबरोबर, जमलेच तर मला थेट मदत करा.
असे म्हणून तो माझ्यासमोरुन बसमधे बसण्यासाठी निघूनही गेला.
मी मात्र जागच्या जागी थिजून गेलो होतो. इथे कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेवून 'लढ' म्हणावे, असा प्रश्न मला पडला होता.
प्रतिक्रिया
16 Feb 2009 - 7:02 pm | अवलिया
खरे तर नक्की काय आणि कशी प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाही.
पण परिस्थिती खुप खराब आहे हे नक्की.....
लेख चांगला जमला आहे.
तुम्ही फार कमी लिहिता, आपल्यातला लेखक असा मारु नका...
--अवलिया
16 Feb 2009 - 7:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"मी बी यडं, तू बी यडं", असं बाबा आणि त्यांचे मित्र एकमेकांना चिडवून दाखवत होते याची आठवण झाली.
बाकी त्या नेट-सेटच्या परीक्षांचं गणित मला कधीच जमलं नाही. (म्हणूनही) देशाबाहेर जाऊन पदवी मिळवली, आता कोणी ना मार्क विचारत ना नेट-सेटची चौकशी करत.
अदिती
17 Feb 2009 - 5:32 am | सहज
>खरे तर नक्की काय आणि कशी प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाही.
भविष्यात सर्व परिक्षा केंद्रात सीसी टिव्ही येणार का? भावी शिक्षक जर असे असतील तर काय बोलायचे?
त्रास यांनी उल्लेख केल्या प्रमाणे ओपन बूक परिक्षा घेउन पाहील्या पाहीजेत.
डोनेशन देऊन शिक्षण, मग पैसे देउन नोकरी. ज्या माणसाकडे चार लाख नगद आहेत, [आणी / किंवा] शेती देखील अश्याने ह्या प्रकारात पडावे का? पुढे मागे सरकारी नोकरी किंवा जिथे काम करणार त्या शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळवुन देण्यात हे गुंतवलेले पैसे वसुल करणार का?
दरवर्षी पिढीजात शेती व्यवसायात असणार्यांच्या पुढच्या पिढीतुन अशी किती संख्येने बाहेर पडत असतील? व त्याचे शेतीवर अनिष्ट परिणाम अटळ आहेत का?
17 Feb 2009 - 6:34 am | दशानन
शिक्षण संम्राटांनी किती मुलांचे भविष्य असे विसकटून टाकले असेल देव जाणे... :(
सरकार काय झोपा काढते की काय कळत नाही कधी कधी .. इतका अंधाधुंद कारभार चालू असतो ह्यांचा.. !
* येथे (हरयाणा मध्ये) डिग्री विकत मिळते हे कळाल्यावर मी =)) अगदी असाच लोळून लोळून हसलो व म्हणालो... राजा तुझं बरं आहे लेका अडाणीच आहेस... च्यामायला इकतची डिग्री पेक्षा कष्टांचे अडाणी पण किमती !
17 Feb 2009 - 6:38 am | त्रास
राजे, खरच तुम्ही आडाणी आहात. हरियाणात कशाला जाता त्यासाठी?
17 Feb 2009 - 8:02 am | मैत्र
हे सगळीकडे वाचतो की शिक्षकाच्या जागेसाठी इतके लाख, शिपायाच्या जागेसाठी पन्नास हजार वगैरे वगैरे.
ज्यांच्याकडे इतके लाख असतात किंवा कर्ज घेऊन, जमिनी विकून उभे करतात ते काही तुटपुंज्या पगारासाठी इतकं सगळं पणाला का लावतात? पोलिसात लोक खूप लाच देत असावेत किंवा सरकारी खात्यात कारण ती नावाप्रमाणे 'खाती' आहेत. पुढे हे लोक टेबलाखालून गोळा करत असतील.
पण असे लाखो रुपये देऊन शिक्षकाची नोकरी, कष्ट आणि खाजगी संस्थांमधली परवड पत्करण्याचं कारण काय?
आणि अशा पद्धतीने जे काही नग शिक्षक होत असतील त्यांच्या विद्यार्थ्यांचं काय होत असेल. गेल्या महिन्यात नगर शहरात चांगल्या शाळेत यम यन हेच बरोबर आहे असं ठामपणे सांगणारे शिक्षक पाहिले. गावात काय असेल देव जाणे!
या मागचं अर्थकारण आणि राजकारण कोणी सांगेल काय?
कोणी कोणाला लढ म्हणावं ? -- म्हणजे परिस्थिती वाइट आहे किंवा कुठे जमीन विकून जागेसाठी पैसे भरले आहेत म्हणून येत नसताना कॉपी करून पास होऊ द्यावं ????? मग ज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे त्यांच्या परीक्षाच घेऊ नका!
यापुढे कॉपी करणार्याला पकडताना त्याची पार्श्वभूमी विचारा म्हणे!!
आणि हे वाक्य लोकांना सुंदर वाटतं आहे याचंच नवल वाटतं!! ह्म्म्म... काही गोष्टी चालवण्यासाठी काहीच्या काही गोष्टी करायला लागत आहेत आता....
16 Feb 2009 - 7:17 pm | छोटा डॉन
अख्खी कथा वाचली व आवडली ...
एकंदरीतच शिक्षण क्षेत्रातली दुरावस्था व होतकरु उमेदवारांना करावी लागणारी तडजोड पाहुन कसेकसेच झाले. "शिक्षक राष्ट्र घडवतो" हे जरी खरे असले तरी "शिक्षक घडायला" जर असे वागाए लागत असेल तर ते राष्ट्र कितपत घडेल ह्याची शंकाच आहे.
असो. तो आपला "सध्याचा विषय" नाही ...
एकंदरीतच मला सरांनी "कॉपी" पकडणे, त्यामुले त्या व्यक्तीची पुढील आयुष्यात वाट लागणे व हे सर्व ऐकुन सरांना त्या व्यक्तीला "लढ" म्हणताना " कसे कसेच" वाटणे हे मानसीक द्वंद्व जास्त पटले नाही.
मुळात पहायला गेले तर कसल्याही गैरमार्गांना थारा न देता आपल्या परिने परिक्षा पारदर्शक मार्गाने पार पाडणे हे शिक्षकाचे प्रथम कर्तव्य, ते आपण "कॉपी पकडुन" उत्तम पार पाडलेत. आता ह्यामुळे त्या मुलाचे नुकसान तर होणारच होते पण ह्याचा विचार त्याने आधीच करायल हवा होता ...
"त्या प्रकरणानंतर " झालेल्या नुकसानीस तो स्वतः दोषी आहे हे माहित असुन दुसर्यांकडुन कसल्याही "सॉफ्ट कॉर्नरची " अपेक्षाच कशी काय ठेऊ शकतो. जर हे प्रकरण "सरळपणाने" न्ह्यायचे नसल्यास मग वैध मार्गाने (!) म्हणजे सध्याच्या प्रचलीत पद्धतीने कुठल्यातरी टिनपाट नेत्याचे अथवा भाई/दादा/आण्णा चे प्रेशर तरी आणायचे होते, म्हणजे सरांना त्याला "माफ करता " आले असते व त्यांचे माफ करणेही माफ केले जाऊ शकले असते ...
पण हे न करता समोरच्या प्रामाणीक व्यक्तीकडुन अशा "अपेक्षा" ठेवणे चुकच ठरते ...
मग नुकसान कसलेही झाले असले तरी "आपण माफ केले असते तर असे घडले नसते" असे बोलुन दाखवणे म्हणजे अप्पलपोटेपणाचे लक्षण आहे ...
ह्याला जर कॉपी करताना माफ करायचे तर वर उल्लेखलेल्या "२० % अभ्यासु" जनतेने काय घोडे मारले आहे ?
त्यांनी का बरे अभ्यास करावा ? त्यांनाही अशीच कॉपी करण्याची व पकडले गेल्यास माफ करण्याची हमी परिक्षेचा फॉर्म भरतानाच देण्यात यावी ...
तर मुद्दा असा की सरांना सध्याच्या परिस्थीतीतसुद्धा "लढ" म्हणायला कसलाही मानसीक त्रास होऊ नये, व्हायचे कारणच नाही.
आपण आपले कर्तव्य करत रहावे, समोरचा त्याला देव जशी अक्कल देतो त्याप्रमाणे वागत राहतो व त्या हिशोबाने आयुष्यात यश मिळवतो ...
हे म्हणजे "मिसबाह-उल-हक" ने श्रीशांतला " च्यायला, तु माझा कॅच पकडला नसतास तर मी पाकिस्तानला ट्वेन्टी-ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकुन दिला असता. पुढच्या वेळी हे लक्षात ठेव " असे म्हणण्यासारखे आहे. ;)
अवांतर :
सरांना एक प्रश्न, समजा आपण त्या मुलाला "माफ केले" असते तर त्याने आज जसे आपल्याला लक्षात ठेवले तसेच त्या परिस्थीतीत सुद्धा "लक्षात ठेवले" असते का ?
शक्यतो अशी "उपकारी" माणसे लक्षात रहात नाहीत, आपल्या चुका दाखवणारे मात्र आपण कधीही विसरु शकत नाही.
माझ्यामते ह्याचे उत्तर "नाही" असे आहे.
असो.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
16 Feb 2009 - 11:34 pm | त्रास
परीक्षा ओपन बूक घेतल्यातर कॉप्या करण्याचे प्रमाण शून्य होइल.
17 Feb 2009 - 5:56 am | सर्किट (not verified)
आणखी अशा भावी शिक्षकांच्या माझ्याकडे खूप ष्टोर्य आहेत. जरा वेळ मिळू द्या (तिकडल्या वादातून) , मग लिहितो.
-- सर्किट
17 Feb 2009 - 7:25 pm | कलंत्री
अहो, अकारणच वाद निर्माण करुन कोणाचे भले झाले आहे तेंव्हा तुमचे भले होणार आहे? आपल्यासारखा अभ्यासु आणि हुशार माणसाचे कर्तुत्व अकारणच वाया जात असते असे कधी कधी मला वाटते.
तुमच्या एका मित्राबरोबर जेंव्हाही माझी भेट होत असते तेंव्हा आपल्या हुशारीबद्दल चर्चा होत असते. आपल्या कडुन अशी वाक्ये वाचली की वाईट वाटते.
असो, थोडा आगावुपणा केला असल्यास समजुन घ्यावे,
18 Feb 2009 - 7:28 am | सर्किट (not verified)
श्री. द्वारकानाथ कलंत्री,
आपल्या धंतोलीतल्या कुटुंबात माझे सोमलवारच्या मित्रांचे मित्र असे अनेक मित्रगण आहेत, पण त्यांतले कुठले मित्र अपल्या परिचयाचे आहेत, आणि माझ्या सध्याच्या वागणुकीविषयी खेद व्यक्त करतात, हे एकदा व्यनीने कळवावे. बघून घेईन त्या सगळ्याना ;-)
-- सर्किट
17 Feb 2009 - 6:12 am | विसोबा खेचर
मी मात्र जागच्या जागी थिजून गेलो होतो. इथे कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेवून 'लढ' म्हणावे, असा प्रश्न मला पडला होता.
क्या बात है! सुंदर लिहिलं आहे बिरुटेशेठ..
तात्या.
17 Feb 2009 - 6:34 am | त्रास
MCA होवून माझ्याकडे काल एक दगड आला होता. त्याला मी माझा एक वर्कशॉप करायला दिला. त्यातील एका प्रश्नाचे उत्तर देतांना खालील उत्तर मला पाठवले-
1)it is bertter understanding to a softwer testing understud the problem
2) to communicates to developer & tester& knowlages to the softwer
3) it is imperative to have clarity [<- हे त्याने कॉपी केले आहे. पण दोन ठिगळं पण त्याला नीट नाही लावता आली] &our profession better
4) user satisfcation user guideline it is bettar
to a achives objects for a test to a bettar user satisfcation & bug occar & time management to a time to become effective tester
हा दगड ३ वर्षे MCA शिकत होता आणि ह्याला सॉफ्टवेअरचे स्पेलिंग माहित नाही?
त्याने जे काही लिहिले आहे त्यातून काय अर्थबोध होतो तुम्हाला? मी अचंबित झालो; नंतर, माझ्या तोंडातून जे त्याने ऐकले त्यानंतर तो माझ्या पायापडून निघून गेला.
प्रश्न-
१. हा कूलदिपक MCA होवूच कसा शकतो? त्याची ही सर्वांग सुंदर विंग्रजी त्याच्या पेपर तपासणाऱ्या एकाही शिक्षकाला "वेगळी" वाटली नाहि? की ते ही ह्याच मालेतील मणी?
२. कॉलेजमधे त्याला फार पुर्वीच फिडबॅक कुणीतरी द्यायला हवा होता; तो कुणीच कसा दिला नाही?
बिरुटे सरांनी जो प्रसंग वर दिला आहे त्यातील नायक पैसे देउन नोकरी मिळवत असेल तरी, एकदा नोकरी मिळाल्यानंतर काम जे करायला हवे ते न करता आता आपल्याला कायमचा रोजगार मिळाला असे ह्या शिक्षकांना वाटते का? ह्यात संस्था चालकांना दोष कशाला देता?
17 Feb 2009 - 7:30 am | आनंदयात्री
छान लिखाण. मास्तरकीच्या नोकरीचे दुष्टचक्रात अडकणारे असे पदोपदी सापडतील.
17 Feb 2009 - 1:44 pm | चाणक्य
आपल्या चुकीचं हा माणूस समर्थन कसं काय करू शकतो? दुसर्याचे (आईवडिलांचे असले म्हणून काय झालं) ४ लाख रुपये भरले होते तर मान पाठ एक करून अभ्यास करायला काय झालं होतं? खिशात कॉप्या ठेवून परिक्षेला बसणं हेच त्याचा आत्मविश्वास किती कमी आहे हे दाखवतं.
बिरूटे सर, बेधडक अश्या मुलांच्या कॉप्या पकडत जा. अजिबात हयगय करू नका.
17 Feb 2009 - 7:34 pm | लिखाळ
ह्म्म .. अनुभव विचित्रंच !
पण तुम्ही त्या मुलाबाबत केलेत ते योग्यच होते.
ही खरी समस्या दिसते. आणि तो नेमका पकडला गेला ही त्याची खंत.
मी शाळेत असताना आमच्या परिक्षांच्या वेळी एखादा शिपाई एक पोतं घेऊन यायचा आणि ज्यांच्या खिशांत चिठ्या-चपाट्या असतील त्यांनी त्या आताच जमा करा नंतर पकडले गेल्यास जबर शिक्षा होईल असा दम भरायचा. त्यावेळी काही मुले आपणहून खिसे रिकामे करत. ती मुले ३०%तली होती हे आता समजले ;)
-- (२०%तला पण अधूनमधून सहकार तत्त्वावर परिक्षा दिलेला) लिखाळ.
17 Feb 2009 - 9:52 pm | श्रीकृष्ण सामंत
डॉ.दिलीप खूप दिवसानी आपलं लेखन वाचलं.वाचून बरं वाटलं.
"सुख जवापाडे दुःख पर्वता एव्हडे"
हेच खरं.
सत्यकथन असल्याने आठवणीत ठेवावं लागत नसावं.
एखाद्दा पूर आलेल्या ओढातल्या पाण्यासारखं कथन आहे.
तात्पर्य काय?
"घटा घटाचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे"
नाहीपेक्षा असं का व्हावं?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
18 Feb 2009 - 4:23 am | सुधीर कांदळकर
वाटतो.
या तरुणाला व त्याच्या पत्नीला शिकवायची कला अवगत आहे कां? असल्यास शिकवायची आवड आहे कां? या दोन्हीं प्रश्नांची उत्तरे होय असतील तरच एखाद्यानें शिकवायला जावें. केवळ पोट भरण्याचें साधन म्हणून एखादा माणूस शिक्षकाचा पेशा निवडणार असेल आणि उमलत्या पिढीच्या शिक्षणाची माफ करा शिक्क्शनाची वाट लावणार असेल तर शिक्षण सम्राटांचें तरी काय चुकतें?
सुधीर कांदळकर.
18 Feb 2009 - 5:09 am | धनंजय
पण कोणाच्याही आयुष्यात येईल असा. काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचत नाही. विचार करायला लावले बिरुटे सरांनी.
शक्यतोवर पुळका येऊन अनिष्ट मार्ग कोणाला सुखकर करू नये, असे माझे मत आहे. पण कधीकधी तशी वर्तणूक मला जमली नाही, असेही झाले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमात एका सहविद्यार्थिनीला मी अभ्यासात मदत करत असे. मग भर परीक्षेत तिने मला प्रश्नाचे उत्तर विचारले - परीक्षार्थींवर विश्वास ठेवण्याची पद्धत असल्यामुळे कोणी शिक्षक पहारा देणारा नव्हता. परीक्षेसाठी केवळ ३-४ विद्यार्थी होते. मी तिला म्हटले, "आपण अभ्यास केला ना, तसे आठवून लिही, इथे विचारू नकोस."
परीक्षासमय झाल्यावर आणखी एका विद्यार्थिनीने तक्रार करून कॉपी करू बघणार्या मुलीला दंड करवून घेतला. (नकल केली नाही तरी तसा प्रयत्न करणे गुन्हाच.) मला अजून वाटते - "माझी कॉपी करू देणार नाही" इतके म्हणण्यापुरतीच गुळमुळीत तत्त्वनिष्ठा पुरे होती का? मी स्वतः तिची तक्रार शिक्षकांपर्यंत पोचवयला हवी होती का? की "ओळखीची सह-अभ्यासिनी" म्हणून मुद्दामून "जाऊ दे तिला" म्हटले मी? [त्या मुलीबरोबर लफडे नव्हते आणि संभाव्यही नव्हते ;-) ]
18 Feb 2009 - 12:23 pm | प्रकाश घाटपांडे
बी एस्सील असताना माझ्या समोरच्या बाकावर एक मुलगी होती. सुपरवायझर चे आन तिचे काहीतरी सुत असावे असे जाणवले. सुपरवायजरलाच तिला कॉपी पुरवायची होती. पण मी अगदी मागेच असल्याने माझ्या अस्तित्वाचा त्यावर दबाव आला होता. मग त्याने मला ही कॉपी कर असे सुचवले. मी केली नाही व विषयात काठावर नापास झालो.
प्रकाश घाटपांडे
18 Feb 2009 - 3:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवर्जून प्रतिसाद लिहिणार्या मिपा मित्रांचे आणि वाचकांचेही स्पेशल आभार ! खरं तर शिक्षण व्यवस्थेवर बोलायचं म्हटलं की विषय न संपणारा... आपण आपले विचार मांडलेत, लेखनाचं कौतुक केले, बरं वाटलं ! :)
अवलियासेठ, वीज भारनियमनाचे आणि जालावर मिळणार्या वेळेचे गणित जमेना..त्यामुळे लिहिणे राहून जाते.
अदिती : नेट-सेटच्या परिक्षेला आम्हीही कधी 'नेट' लावला नाही. अवघड अभ्यासक्रमाबरोबर,
दीर्घोत्तरी प्रश्नोत्तरे लिहिणे कंटाळवाने काम. :)
धनंजय : ''शक्यतोवर पुळका येऊन अनिष्ट मार्ग कोणाला सुखकर करू नये, याच्याशी सहमत ! विद्यार्थ्यांच्या तुलनेत का कोणास ठाऊक..सुंदर आणि हुशार विद्यार्थीनींना, काही प्राध्यापकांचा जरा सॉफ्ट कॉर्नर असतो का ?
सर्किट : भावी शिक्षकांच्या ष्टोर्या वाचायला आवडतील. आपण (वाद सोडून ) खूप लिहावे..अशी इच्छा नेहमीच असते.
असो, पुन्हा एकदा सर्वांचे मनःपुर्वक आभार !!!
-दिलीप बिरुटे