राझ - द डोकेदुखी कंटीन्युज...

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
29 Jan 2009 - 12:30 pm

काल कुठुन अवदसा आठवली आणी तो राझ नावाचा शिनिमा बघितला असे झाले आहे !
हा राझ नक्की हॉरर आहे, मर्डर मिस्ट्री आहे का सस्पेन्स थ्रिलर आहे हे शेवट पर्यंत राझच राहाते. भट (घाटावरले न्हवेत) आणी सुरी द्वयी ला नक्की काय दाखवायचे आहे तेच कळत नाही. अतिशय बाष्फळ आणी मुर्ख प्रसंगांची मालिका म्हणजे राझ असे वर्णन करता येईल.
सुरुवात एकदम मुंग्या आणणारी (डोक्याला नाही तर हाता पायांना), कोणीतरी एक मरणासन्न माणुस एका गोर्‍या परदेशी माणसाला सांगत असतो की आता सगळे मरणार, 'तो' कोणालाही सोडणार नाही. मग त्या गोर्‍या माणसाला तो हे ही सांगतो की 'तुम अशुद्ध हो , अंदरसे सड चुके हो.' आणी येथेच आपल्याला आता आपल्या डोक्याची मंडई होणार ह्याची पुसटशी जाणीव व्हायला सुरुवात होते.
नंदिता (कंगना राणावत) हि एक फॅशन मॉडेल आणी यश (अध्ययन सुमन) 'अंधविश्वास' ह्या रिएलीटी शो च्या डायरेक्टर / सादरकर्त्याची प्रेयसी. पृथ्वी (इम्रान हाश्मी) हा एका मेलेल्या सैनिकाचा मुलगा आणी चित्रकार. ह्या तिघांभोवती फिरणारी हि कथा आहे.
कंगना राणावतने स्टेज पेक्षाही लहान लहान कपडे घालुन घरात / दारात / रस्त्यावर हिंडणे हे तिचे आवडिचे आणी झेपणारे काम 'सफाईदारपणे' केले आहे. इम्रान हाश्मी हा एक तर आधी मानवच वाटत नाही, त्यात त्याला बघुन का कुणास ठाउक पण मला आपण उंची वाढवलेल्या राजपाल यादवला पाहात आहोत असे वाटते. तर आता हा माणुस चित्रकार वाटला पाहिजे ह्यासाठी ती कसली 'फ्रेंच' का काय म्हणतात तसली दाढी ठेवुन पुर्ण चित्रपटभर वावरला आहे. बर त्यामुळे तो चित्रकार तर वाटतच नाही उलट ते पाव / बिस्किट वगैरे विकणारे डोक्यावर पेटी घेउन येतातना, त्यांच्यापैकी एक वाटतो. अध्ययनरांवा विषयी काहि न बोलणेच उत्तम. तो एक फारच वेगळा अध्ययनाचा विषय होइल.
असो, तर ह्या नंदिताचा एक दिवस अचानक पृथ्वीकडुन पाठलाग सुरु होतो, मग तिचे घाबरणे , दचकणे ह्या सगळ्याला तिच्या प्रियकराने अगदी सहजपणे घेणे हे नेहमीचे प्रसंग घडतात. बर मधल्या काळात शिकली सवरलेली आणी यशासाठी कोणताही मार्ग वाईट नाही असे समजणार्‍या ह्या नंदिताला लग्नाआधी एकत्र राहुन (विप्रंचा समुपदेश न घेतल्याने, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती नसल्यामुळे) यश पासुन दिवस गेले आहेत ह्या एका राझवरचा पडदा दुर हटतो.
मग एक दिवस खुप प्रयत्न (?) करुन पृथ्वी तिला गाठतोच आणी आपली काहि चित्रे तिला दाखवतो. मग आपल्याला उलगडा होतो की, ह्या पृथ्वी रावांना रोज घराच्या गच्चीत उलटे पडुन दारु ढोसायची सवय असते, मग अचानक त्यांच्या डोळ्यासमोर काहि वाईट/ खुनशी प्रसंग येत असतात ज्यांना ते कागदावर उतरवर असतात. हे सगळे प्रसंग नंदिताशी संबधित असतात.
नेहमी प्रमाणेच ती ह्यावर विश्वास ठेवत नाही, मग अचानक रहस्यमय प्रसंग घडायला सुरुवात होते, आंघोळ करत असताना (ह्या दृष्यात कंगनाकडुन ज्या काही 'खास' अपेक्षा होत्या त्यात ती पुर्णपणे नापास झाली आहे) तिला अचानक दोन हात येउन टबात ओढतात मग तिचा हाताची नस कापली जाते आणी ती बेशुद्ध पडते.
नंदिताला काहि ना काहि होणारच अशी खात्री असलेला पृथ्वी लगेच तिच्या घरात तोडफोड करुन घुसतो आणी तिला दवाखान्यात घेउन जाउन तीचे प्राण वाचवतो. ह्या गडबडीत 'खून बहोत बहेने की वजाहसे' वगैरे डॉक्टर तिच्या मुलाला वाचवु शकत नाहीत.
त्यानंतर मग अशा प्रसंगांची एक मालिकाच चालु होते, पृथ्वीनी चित्र काढायचे आणी तसेच घडायचे 'सोहळे' चालु होतात. 'तुम अशुद्ध हो, सड चुके हो' चा मंत्रजागर सतत चालु असतोच.
प्रियकाराकडुन काहिच मदत होत नसल्याने मग नंदिता शेवटी पृथ्वीच्या आश्रयाला जाते, तोवर तमाम पोलिस खात्याला जी माहिती काढता आलेली नसते जे दुवे जोडता आलेले नसतात , ती सगळी माहिती मिळवुन ते सगळे दुवे जोडुन पुथ्वी साहेब नंदिताची वाटच बघत असतात. मग ह्या सगळ्या घटनांचा आणी त्या दोघांचा संबंध काय याचा ते शोध सुरु करतात. मग एका छोट्याश्या गावत घडलेल्या खुनापसुन सुरु झालेला हा थरार (?) उलगडत उलगडत शेवटी शिनीमा शेवटाकडे जातो.
आता काहितरी तरी राझ रहावे म्हणुन सगळा चित्रपट इकडे उलगडून सांगत नाहिये.
तरी काहि प्रश्न मनाला टोचत राहतात,
१) नंदिताच्या शरीरात आत बाहेर करणार हा 'पवित्र' प्रेतात्मा एका फॅशन शो च्या वेळी आलेल्या कुठल्याश्या मठाधीपतीला झोपडपट्टितील लोक लाजतील इतक्या 'उच्च' दर्जाच्या शिव्या का देतो ?
२) सतत अंधश्रद्धे विरुद्ध लढणारा यश ह्या 'ढोंगी' बाबाला कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणुन स्विकार कसा काय करतो?
३) चित्रपटाच्या शेवटी शेवटी यशवर हि हल्ला सुरु करणारा (पक्षी : ATM मधील प्रसंग) प्रेतात्मा आधी पासुन नंदितावर का हल्ले करत असतो ? पार तिला आत्महत्या करायाचा प्रयत्न करायला भाग पाडेपर्यंत?
४) कधीकाळी ज्या गोर्‍या माणसाबरोबर आपण त्याला लोकांसमोर उघडे न पाडण्याचा सौदा केला होता त्याच गोर्‍या माणसाचे तांत्रिक मांत्रिकांबरोबर 'लाइव्ह' शुटिंग करणारा यश त्याला ओळखत कसा नाही ?
हे आणी असे बरेच प्रश्न मागे ठेवुन शिनीमा संपतो आणी आपल्याला आपण किती सहनशील आहोत ह्याची जाणीव करुन देतो.

मौजमजाचित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

समीरसूर's picture

29 Jan 2009 - 2:20 pm | समीरसूर

खूप सही परीक्षण लिहिले आहे तुम्ही. :-) हे वाचूनच हा चित्रपट टाळणे किती श्रेयस्कर आहे हे लक्षात आले. तसे आजकालचे बहुतेक सगळे हिंदी चित्रपट बिनदिक्कतपणे टाळले तरी काही फरक पडणार नाही असे वाटते. 'रब ने बना दी जोडी' आणि 'गजनी' हे चित्रपट देखील चित्रपट म्हणून किती चांगले असतील ही शंका आहेच. केवळ शाहरुख खान आणि आमीर खान हे सुपरस्टार्स असल्याने, असीन आणि अनुष्का शर्मा सारख्या सुंदर बाहुल्या असल्याने आणि पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची ऐपत असल्याने या चित्रपटांनी यश मिळवले. याच चित्रपटांमध्ये शाहरुख आणि आमीर यांच्या जागी अनुक्रमे उपेन पटेल आणि आफ्ताब शिवदासानी असते तर हे चित्रपट इतकं भव्य यश मिळवू शकले असते काय हा प्रश्न आहेच. शिवाय शाहरुख आणि आमीर आज अशा उंचीवर आहेत की त्यांचे चित्रपट कितीही भिकार असले तरी 'बंपर ओपनिंग' मिळून हमखास हिट होतात. असो. परीक्षण वाचून करमणूक झाली. इम्रान हाश्मी, कंगना रानावत, नेहा धुपिया, अमृता अरोरा, सोनु सूद, विक्रम सलुजा, मोना चोप्रा, गीता बसरा, आफ्ताब शिवदासानी, आशिष चौधरी, सायली भगत, रणदीप हुडा, अर्जुन बाजवा, रुसलान खान, झायेद खान, फरदीन खान, मिलिंद सोमण, एजाज खान, अध्ययन सुमन, हरमन बावेजा, उदय चोप्रा, तनिशा ही व अशी यच्चयावत बिनडोक दिसणारी/भासणारी/असणारी मंडळी खरच काय करत असते हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. अर्जुन रामपाल देखील काही दिवसांपूर्वी या यादीमध्ये हिरीरीने सहभागी झाला होता पण ओम शांती ओम आणि रॉक ऑन मुळे बिचार्‍याची उपासमार टळली. 'पुणे टाईम्स' मध्ये शेवटच्या पानावर यांचे फोटो येत असतात आणि यांचे चेहरे बघून प्रश्न पडतो की यांना 'सेलिब्रिटी' कसे काय म्हणायचे? रस्त्यावर पडल्यावर यांना काळं कुत्रं देखील ओळखेल की नाही ही शंका मनाला चटून जाते. यांच्या मुलाखती म्हणजे एक विनोद असतो. यांना नेहमी 'डेट्स' चे प्रॉब्लेम्स असतात; यांच्याकडे एकाचवेळी ३-४ चित्रपट असतात आणि त्यातल्या यांच्या भूमिका म्हणजे एकदम 'हटके' आणि 'डिफरंट' असतात; त्यासाठी यांनी 'रीसर्च' पण केलेला असतो. हे चित्रपट कधीच पडद्यावर येत नाहीत आले तरी त्यांच्या स्वतःच्या लक्षात राहत नाही की कधी आले आणि कधी आपटले. :-) त्यातल्या त्यात इम्रान हाश्मी म्हणजे या गरीब जनतेचा मिथून आहे. त्याचे चित्रपट येतात बर्‍यापैकी चालतात आणि गाणी मात्र सॉलीड हिट होतात. त्याचा जन्नत चित्रपट बरा होता आणि त्यातली गाणी देखील बरी होती. ती सोनल चौहान नावाची नटी पण बरी होती. राज-द मिस्ट्री कंटीन्युज मात्र बर्‍यापैकी चालतोय आणि थोडी अजून प्रेक्षकांची साथ मिळाली तर चांदनी चौक टू चायना पेक्षा जास्त किफायती ठरेल हा चित्रपट असे तज्ञांचे मत आहे. द्रोण आणि चांदनी चौक टू चायना या अतिमहत्वाकांक्षी, भव्य-दिव्य, सुपर बिग बजेट, ओव्हर्-हाईप्ड चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः भुईसपाट केले हे एका दृष्टीने बरे झाले. प्रेक्षकांना सहज मूर्ख बनवता येते हा निर्मात्यांचा गैरसमज थोडा दूर होण्यास मदत होईल आणि अभिषेक बच्चनला आपल्यासाठी अजून कुठले कार्यक्षेत्र चांगले आहे हे ही ठरवता येईल. :-)

--समीर

भास्कर केन्डे's picture

29 Jan 2009 - 11:05 pm | भास्कर केन्डे

मूळ लेख तसेच समीररावांचा हा प्रतिसाद लय भारी! चित्रपटांपेक्षा अशा प्रतिसादांनीच आमची अंमळ करमणूक होते म्हणून आम्ही (म्हणजे आमच्या कुटुंबातील सदस्य) सहसा चित्रपटांच्या वाट्याला जात नाही (तारे जमी पर, वेन्सडे असे सन्माननीय अपवाद वगळता). पावासंगे झक्कास मिसळ व तजेलदार तर्रीनेच आमचा आत्मा तृप्त होतो.

आपला,
भास्कर
चवीचे खाणार त्याला मिसळपाव देणार

टारझन's picture

30 Jan 2009 - 12:08 am | टारझन

राज हा कितीही एक णंबरचा येडझवा थ्रिलर कॉमेडी असला तरी आपल्या गर्लफ्रेंड सोबत पाहिल्यास मणोकामणा पुर्ण होण्याचा संभव आहे, कारण त्यावेळी शुक्र पंचम स्थानात आणि चंद्र षष्टी मधे फार स्ट्राँग होतो.

असो .. आपल्याला त्या राझ मधे काय आवडलं तर त्यात सगळे धप्पा धप्पा खेळतात .. दरवाज्यावर असताना नाव घेऊन बोलावण्या ऐवजी धाड धाड दरवाजा वाजवणार , कधी कोणती फ्रेम किंवा पुस्तक धाप्प कन पडणार .. ज्या भुताला ज्या व्यक्तीतर्फे आपला मेसेज द्यायचाय तेच भुत त्याच व्यक्तीला अल्मोस्ट मारणार ..

आणि ह्या पिक्चर मधे हिरविण ला सर्वात जास कोणी गाभरवलं (आणि गाभारवलं) आसंत त्या हिरू नी .. ते येडझवं गुपचुप झोपलेल्या हिरविण च्या अंगावर अचाणक हात टाकून तिला झोपेतून दचकून उठवतो, आणि ती उठली म्हणून तिला म्हणतो .. "क्या जग रही हो .. सो जाओ ना " =)) इथे मी प्रचंड हसलो गडबडाट लोळलो .. पॉपकॉर्ण नाकातून उडाले.

१. रँपवर चालणारी हिरवीण रापचिक दिसली .
२. इम्राण हाश्मी ला ह्या पिक्चर मधे एकदाही स्कोप मिळाला णाही
३. एणिमेटेड रेडे लैच्च बकवास होते.
४. पाप केलेला मुख्य आरोपी तसाच मोकाट हिंडत आहे.
५. इम्राण हाश्मी एंट्री सिण मधे स्लमडॉग दिसतो.
६. माझे १५० रुपये वाया गेले असं म्हणणार णाही, कारण ह्या चित्रपटाणे मला तरी तुफाण हसवलं
७. ह्या चित्रपटाणे बिंधास्त लिव्ह-ईण चे प्रमोशण केले आहे. इतके की तो हिरो डेली मेस लावतो .

-- टारझण
मै अंदर से साफ हू , अभी जाके आया हू , आप रिव्हायटल लेणा कब सुरू कर रहे है ?

सहज's picture

29 Jan 2009 - 3:34 pm | सहज

तुम्ही राजकुमार असुन फारच सहनशील आहात असे दिसते [बहुतेक परिकथेमुळे]

मोठे बॅनर, मोठे स्टार घेउन सिनेमे सगळेच काढतात त्याचे काय कौतुक?

पण हे भट बंधु आपला खान्दानी बिझनेस [हौशी चित्रपट] ते देखील अवघडातील अवघड हौशी कलाकार घेउन ज्या नेटान सिनेमे रेटत असतात त्याला दाद ही दिलीच पाहीजे.

भट बंधुंना हा प्रतिसाद समर्पित.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jan 2009 - 8:16 pm | llपुण्याचे पेशवेll

हाहाहाहा.. हाण तिच्यायला. सहीच. यकदम झक्कास.
पुण्याचे पेशवे
Since 1984

सुचेल तसं's picture

29 Jan 2009 - 8:43 pm | सुचेल तसं

>>इम्रान हाश्मी, कंगना रानावत, नेहा धुपिया, अमृता अरोरा, सोनु सूद, विक्रम सलुजा, मोना चोप्रा, गीता बसरा, आफ्ताब शिवदासानी, आशिष चौधरी, सायली भगत, रणदीप हुडा, अर्जुन बाजवा, रुसलान खान, झायेद खान, फरदीन खान, मिलिंद सोमण, एजाज खान, अध्ययन सुमन, हरमन बावेजा, उदय चोप्रा, तनिशा <<

वा!!! लिस्ट भारी तयार केलीय...

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मैत्र's picture

30 Jan 2009 - 10:51 am | मैत्र

अगदी हेच म्हणतो... बेष्ट लिस्ट आहे
आणि प्रतिक्रिया ही समीर.. हे लोक नक्कि काय करत असतात आणि स्वतःला काय समजतात कधीच कळत नाही..

प्राजु's picture

30 Jan 2009 - 12:04 am | प्राजु

हसून हसून पुरेवाट झाली.
तुम्ही लिहिलेल्या परिक्षणामुळे निदान ही सगळी गंमत अनुभवण्यासाठी हा चित्रपट बघावाच असं वाटतं आहे.
जबरदस्त परिक्षण...
समीर रावांचा प्रतिसाद तर त्यावर कडीच.. एकदम सह्ही!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

30 Jan 2009 - 6:56 pm | विसोबा खेचर

जबरदस्त परिक्षण...
समीर रावांचा प्रतिसाद तर त्यावर कडीच.. एकदम सह्ही!

हेच बोल्तो! :)

तात्या.

गरम मसाला's picture

30 Jan 2009 - 12:20 am | गरम मसाला

आजकालचे बहुतेक सगळे हिंदी चित्रपट बिनदिक्कतपणे टाळले तरी काही फरक पडणार नाही असे वाटते. (समीर)

हे अगदी खरं वाट्लं ! सिनेमा पुण॑ झाल्यावर एडीटरला सुद्धा कळाले नसेल, नक्की काय प्रकार घड्ला आहे...पण मला मुळात एक प्रश्ण सारखा पडतो की हे लोक सीनेमे कुठ्ल्या दर्जाचा प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून बनवतात ???

असो..निदान त्या क्षेत्रातील इतर काम करणारया लोकांची तरी पोटं भरली तरी पुश्कळ आहे,

भडकमकर मास्तर's picture

30 Jan 2009 - 12:21 am | भडकमकर मास्तर

उलट ते पाव / बिस्किट वगैरे विकणारे डोक्यावर पेटी घेउन येतातना, त्यांच्यापैकी एक वाटतो
अगदी अगदी... पावबिस्किटवाला... =)) =))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2009 - 2:03 am | बिपिन कार्यकर्ते

पर्‍या, पुढच्या पुणे भेटीत तुझं दर्शन नक्की घेणार. परिक्षण वाचून कृतकृत्य झालो. वाहवा!!! दुर्बिटणे बाईशी सहमत.... तुझ्या लेखात डानराव दिसले.

बिपिन कार्यकर्ते

मदनबाण's picture

30 Jan 2009 - 4:07 am | मदनबाण

राजकुमारा मानसिक अत्याचार करुन घेण्यापासुन वाचवलेस म्हणायचे !!!

इम्रान हाश्मी हा एक तर आधी मानवच वाटत नाही, त्यात त्याला बघुन का कुणास ठाउक पण मला आपण उंची वाढवलेल्या राजपाल यादवला पाहात आहोत असे वाटते.
8} 8} 8}

तर आता हा माणुस चित्रकार वाटला पाहिजे ह्यासाठी ती कसली 'फ्रेंच' का काय म्हणतात तसली दाढी ठेवुन पुर्ण चित्रपटभर वावरला आहे.
बापरे !!! कसं दिसत असेल ते ध्यान ते अगदी योग्य शब्दात मांडले आहेस...
बर त्यामुळे तो चित्रकार तर वाटतच नाही उलट ते पाव / बिस्किट वगैरे विकणारे डोक्यावर पेटी घेउन येतातना, त्यांच्यापैकी एक वाटतो.
मस्का खारी ले लो...अशी आरोळी मारतो का रे तो ? :D

चांगलीच चिरफाड केली आहेस तु... :)
मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

मयुरा गुप्ते's picture

30 Jan 2009 - 8:22 am | मयुरा गुप्ते

साहेब, एकदम मस्त लेखन आणि परिक्षण केलेला आहे. खरतर भट्टाचा सिनेमा आणि इम्रान हाश्मी पाहयला खुप,खुप हीमत लागते.त्या बद्द्ल आधि ....पाय कुठे आहेत तुमचे? लहानपणी असाच एक सुनिल गावस्करचा पिक्चु बघितला होता.तेव्हा असेच गडबडा लोळुन हसलो होतो. सगळ्यंअचे प्रतिसाद तर अजुन जबराच.

दशानन's picture

30 Jan 2009 - 10:38 am | दशानन

ज ब रा

पण लई येळ केला राव आमच्या डोक्याचा पार भुग्गा झाला.... आम्ही अर्ध्यातून परतलो !
कालच दुपारी गेलो होतो ... डोक्याला लै वाईट शॉट लागला... राव...

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jan 2009 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे व न देणार्‍यांचे हि धन्यवाद ;)
समीरराव बाकी तुमचा प्रतिसाद म्हणजे, 'ज्ञानदेवे रचिला पाया...' असा झाला आहे बघा.
मस्त प्रतिसाद दिलेत सर्वांनी त्याबद्दल सर्वांचे विशेष आभार !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

30 Jan 2009 - 1:42 pm | अनिल हटेला

छान परीक्षण दिल्याबद्दल पराचे आभार ..
उत्तम प्रतीसाद दिल्याबद्दल समीर चे आणी
इतर माननीय प्रतीसादींचे देखील आभार ..
परा ने पून्हा एकदा सर्वाना धन्यवाद दिल्या बद्दल त्याचे पून्हा एकदा आभार !!
आणी बीनकामी इतकं लिहील्या बद्दल माझे देखील आभार !! ;-)

अवांतर : इम्रान हाश्मी नावाच्या प्राण्याचे चित्रपट आम्ही बघत नाही ... :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अन्वय's picture

30 Jan 2009 - 7:44 pm | अन्वय

खरंच अतिशय फालतू पिच्चर होता. त्या भट बंधू, तो सुरी आणि कलाकारांच्यायच्या --- --

सिनेमा पाहता अतिशय संताप आला. पण करणार काय, अख्खे पन्नास रुपये मोजले होते. मधूनच उठूनही जात येत नव्हते. निर्माते, निग्नदर्शक, न कलाकार (हाश्‍मी वगैरे) यांना शिव्या देण्यापलीकडे काहीच करू करता येत नव्हते. पण एक काम केले शेवटी चांगलं. बाहेर पडल्यावर तिकिट खिडकीवर जाऊन प्रत्येकाला सांगितलं, शाने असाल, तर मागं फिरा... उगाच पैसे देऊन मनस्ताप विकत घ्याल....
त्यातल्या कितीजणांनी ऐकलं कुणास ठाऊक. आत गेले असतील, तर नक्कीच पस्तावले असतील.

हुप्प्या's picture

31 Jan 2009 - 5:39 am | हुप्प्या

अमेरिकेत असल्या हास्यास्पद आणि अवाच्या सवा महत्त्व मिळालेल्या सिनेमांचे विडंबन मॅड नामक मासिकात यायचे. त्यात रॉकी अन्य सिरियलची मनसोक्त टिंगल वाचली आहे.

हिंदी सिनेमात असला हास्यास्पद प्रकार इतका भरलेला असतो की कुण्या प्रतिभावान विडंबकाने असे हिंदी वा मराठी मॅड काढले तर जोरदार चालेल.