स्ट्रॉबेरीच्या मळ्यात

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
4 Jan 2009 - 9:26 pm

मुंबईकराला स्ट्रॉबेरी दिसते ती आकर्षक खोक्यात. आणि विकत घेतल्यावर समजते की स्ट्रॉबेर्‍या फक्त पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाईतक्याच आहेत, बाकी खोक्याचा खालचा भाग भरलाय कागदी कपट्यांनी.

पाचगणीच्या मॅप्रो उद्यानातुन पाचगणी गावाकडे येताना एका झाडाखाली एक स्ट्रॉबेरीचा ठेला दिसला. गाडी थांबवली. ठेलेवाल्या मामांनी प्रेमानी सार्‍यांना स्ट्रॉबेर्‍या हातावर दिल्या. रसाळ होत्या खर्‍या. मामा हुशार. पोराटोरांना पाहताच म्हणाले, भाव कशाला करता घ्या आपल्या हातान खुडुन, भरा टोपली मग भावाच बघु! मामा जवळच्याच भोसे गावातले. स्वतःचा छोटा मळा होता, सध्या चार महिने स्ट्रॉबेरीचा हंगाम आहे म्हणाले.

मळ्यातल्या ताज्या फळांच नी भाज्यांच कौतुक सगळ्यांनाच. आणि नेमेके हे कौतुक हेरुन मुंबई गोवा रस्त्यावर पेणच्या अलिकडे -पलिकडे अनेक भाजीवाले वाशीच्या बाजारातुन आणलेली भाजी जवळच्या गावात पिकलेल्या एखाद दुसर्‍या भाजीबरोबर 'रानातली ताजी भाजी' म्हणुन राजरोस विकतात. इथे तसा प्रकार नव्हता. मामांच - त्यांच नाव वाडकर; त्यांचा मळा फुलला आणि फळला होता. मामांनी प्रस्ताव मांडताच सगळे खुशीने उतरले.

मामा उत्साहाने मळा दाखवत होते. मधेच सूचना देत होते, की दोन रांगांमधुन चला, रोपांवर पाय देउ नका, कोवळी फळ उगाच उपटु नका, अलगद खुडा रोप उखडु नका वगैरे. आपल्याला भले काही समजत नसले म्हणुन काय झाले? शेताची माहिती आम्ही विचारताच मामांनी पाणी, हवामान, निगा वगैरे सर्व माहिती तत्परतेने दिली. एका रांगेते रोपे पसरलेले वाफे मस्त दिसत होते. वाफ्यांना नळकांड्यांचा रांगा फिरवुन ठिबक सिंचन पद्धतिने पाणई दिले जात होते. हे रोप फार नाजुक असते आणि जर रोग पडला तर एकजात सगळी रोपे माना टाकतात असे मामांनी सांगितले. मात्र बहर चांगला बहर असला अतर एक रोप चार महिन्यांच्या हंगामात एकंदर दहा किलोपर्यंत फ़ळे देते अशी माहिती मिळाली.

वाफ्यांमध्ये बाळाच्या अंगाखाली दुपटे अंथरावे तसे प्लास्टिकचे पट्टे टोकापर्यंत पसरलेले होते. रोपाच्या जागी भोक पाडुन रोप वर घेतले होते. स्ट्रॉबेरी नाजुक. चिखलात फळ कुजु नये आणि त्याला थोडी उब मिळावी म्हणुन फळ जमिनीपासुन अलगद ठेवण्यासाठी मधे प्लास्टिक पसरले होते.

बाजारात स्ट्रॉबेरी राशीने मिळते पण प्रत्यक्ष मळ्यातली पाने, फुले, कोवळी हिरवट फळे आणि लाल-गुलाबी स्ट्रॉबेर्‍या हे सगळे एकत्र असलेली रोपे हे दृश्य काही वेगळेच.

आपल्या हाताने फळे तोडण्याचा आनंद काही वेगळाच. मुले तर एकदम खुश! भाचीच्या हाताला लहान लाडवाइतकी टपोरी स्ट्रॉबेरी लागली आणि ती हरखुन गेली.

बघता बघता बायका - पोरांनी छोट्या टोपल्या भरल्या. 'धुतल्याशिवाय खाऊ नका' असा दम पोरांना दिला नाही तर त्या आया कसल्या? पोरांना धीर धरवत नव्हता. मामांनी टोपल्यावर पाण्याचा हलका फवारा मारला आणि स्ट्रॉबेर्‍या धुवुन काढल्या. त्या ताज्या स्ट्रॉबेर्‍या मोठ्या आकर्षक दिसत होत्या.

लाल-गुलाबी फळ अन वर हिरवट महिरपीसकट हिरवा देठ

विकत घेण्याआधी घरी गेल्यावर स्ट्रॉबेरी मिल्क शेकच्या करण्याच्या बाता चालल्या होत्या, स्ट्रॉबेरी जॅमचे बेत झाले होते. मात्र एक एक करीत सगळ्या टोपलीचा फन्ना कधी उडाला ते समजलेच नाही.

प्रवासमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

4 Jan 2009 - 9:52 pm | लिखाळ

वा !
छान वर्णन आणि मस्त फोटो. स्ट्रॉबेरीची फळे आणि फुलासहित बेरीचे फोटो मस्तच.

महाबळेश्वर परिसरातली लाल माती पाहून फार आनंद झाला.

अवांतर : स्ट्रॉबेरीला त्या भागात काही लोक इष्टापूरी म्हणतात :)

लिंगमळ्याच्या धबधब्याला भेट दिली का?
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

आजानुकर्ण's picture

4 Jan 2009 - 9:59 pm | आजानुकर्ण

मॅप्रोचा ठेलाही छान आहे. थोडा महागडा आहे पण फार दर्जेदार पदार्थ मिळतात

शेवटचा फोटो फार आवडला.

आपला
(दर्जेदार) आजानुकर्ण

सुचेल तसं's picture

7 Jan 2009 - 9:19 am | सुचेल तसं

इथलं फ्रेश स्ट्रॉबेरीज विथ क्रीम (किंमत ९९/-) आणि ग्रिल्ड सॅंडविच (८०/-) मस्त आहे.

अवांतरः ह्याशिवाय १२.५% वॅट बिलावर आकारला जातो.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

चतुरंग's picture

4 Jan 2009 - 10:09 pm | चतुरंग

नेहेमीप्रमाणेच सुरेख फोटू. टपोर्‍या फळाचा मस्तच आलाय!
ह्या उन्हाळ्यात स्ट्रॉबेरीच्या मळ्यात जाऊन भरपूर स्ट्रॉबेरीज खुडल्या होत्या त्याची आठवण झाली. मुलालाच काय पण मलाही आवडल्या गोळा करायला स्ट्रॉबेरीज.

चतुरंग

पांथस्थ's picture

4 Jan 2009 - 10:14 pm | पांथस्थ

काय जबराट वर्णन आहे. आत्ता लगेच पाचगणीला कुच करावेसे वाटते आहे.

(रसरशीत स्ट्रॉबेरी प्रेमी) पांथस्थ

माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

कोलबेर's picture

4 Jan 2009 - 10:18 pm | कोलबेर

स्ट्रॉबेरीच्या मळ्यातील सफर मस्तच!!

गेल्या वर्षी स्ट्रॉबेरी चॉकलेट मध्ये बुडवुन काढलेला फोटू -

अवांतर : स्ट्रॉबेरी हे फळ दिसायला जितके आकर्षक आहे तितके चवीला विशेष वाटत नाही.

आजानुकर्ण's picture

4 Jan 2009 - 10:21 pm | आजानुकर्ण

नुसताच रसरशीतपणा आहे. गोडवा किंवा ठसका नाही

फोटो फारच जबरा आहे.

आपला
(ठसकेबाज) आजानुकर्ण

आणि रसाळ खाल्लेल्या आहेत पण त्या संख्येने कमी असतात आणि अगदी निवडून निवडून बघाव्या लागतात, थोडा चान्सचा भाग असतोच.
हे फळ सरसकट गोड नसते हे खरेच.
(मलबेरीज, आपण ज्याला तुती म्हणतो त्या मात्र अतिशय गोड असतात.)

चतुरंग

मीनल's picture

4 Jan 2009 - 10:23 pm | मीनल

सर्व फोटो मस्त .
झटपट जॅम बरा लागतो.
स्ट्रॉबेरी चे तुकडे करायचे. साखरेचा जाडसर पाक करायचा.
स्ट्रॉबेरी चे तुकडे घालायचे. थोडसं उकळल की गॅस बंद करायचा कारण स्ट्रॉबेरी पटकन शिजते.मग ती मिक्स होऊन जाते.
फोडी दिसायला ,खायला चांगल्या लागतात.
फार दिवस टिकत नाही. पण आंबट गोड छान लागतो.

मीनल.

प्राजु's picture

5 Jan 2009 - 1:43 am | प्राजु

वर्णन आणि फोटो.... अप्रतिम
मला आणि माझ्या लेकाला अतिशय आवडते स्ट्रॉबेरी...
आपण घेतलेले फोटो उत्तम आले आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रामदास's picture

5 Jan 2009 - 8:01 am | रामदास

पांथस्थ ,कोलबेर,मंडळींनी छान छान पाककृती फोटोसहीत टाकल्या होत्याटाकल्या होत्या.आज तुम्ही स्टॉबेरीचे फोटो टाकून आणखी मजा आणली.
आजपासून मिपाचं पान उघडण्यापूर्वी गळ्यात लाळेरं बांधणार आहे.

यशोधरा's picture

5 Jan 2009 - 9:52 am | यशोधरा

मस्त फोटो!

सुनील's picture

5 Jan 2009 - 10:21 am | सुनील

फोटो आणि वर्णन छान.

तसे स्ट्रॉबेरी हे फळ जितके दिसायला सुंदर तितके चवदार नसते (पण किंचित काळपट पडलेली फळे सहसा गोड असतात). अर्थात आईसक्रीममध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर माझा आवडता. शॅम्पेनसोबत स्ट्रॉबेरी खाल्ल्या जातात, असे ऐकून आहे!

(स्वगत - "स्ट्रॉबेरी आँखे" हे गाणे लिहिणार्‍या गीतकाराला नक्की काय म्हणायचे असावे?)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

5 Jan 2009 - 10:26 am | सहज

स्ट्रॉबेरी मळा भेट, वर्णन व फोटो दोन्ही मस्तच की :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jan 2009 - 11:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मजा आली वाचायला आणि फोटो पहायलाही! स्ट्रॉबेरीच्या हंगामात महाबळेश्वर/पाचगणीला जाऊन आलं पाहिजे.

तसं स्ट्रॉबेरीचं मलाही फारसं कौतूक नाही. या बाबतीत मी "कडवी भारतप्रेमी" आहे.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

विनायक प्रभू's picture

5 Jan 2009 - 11:40 am | विनायक प्रभू

स्ट्रॉबेरी क्रिम बरोबर खावी. 'जीवाला" बरी असते.

साधारण मार्च महिन्यात मॅप्रोचा 'स्ट्रॉबेरी फेस्टिवल' असतो.
तिथे तुम्ही हव्या तेवढ्या स्ट्रॉबेरी त्यांच्या मळ्यातून घेउन खाउ शकता . (फुकट !!!)

ऋषिकेश's picture

5 Jan 2009 - 1:54 pm | ऋषिकेश

वा! सह्ही!
:)

-ऋषिकेश

मनस्वी's picture

5 Jan 2009 - 2:12 pm | मनस्वी

सगळे फोटो मस्त.
शेवटचे दोन तर 'के व ळ अ प्र ति म'
शेवटचा फोटो ढापला आहे (मी).

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2009 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर

शेवटची दोन्ही छायाचित्रे अतिशय रसाळ.
अभिनंदन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

मदनबाण's picture

6 Jan 2009 - 9:08 pm | मदनबाण

फोटो आणि वर्णन झकास... :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

धनंजय's picture

7 Jan 2009 - 6:11 am | धनंजय

लेखन छान, चित्रे तुफान!

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 8:04 am | विसोबा खेचर

क्लासिक...!

लेखन छान, चित्रे तुफान!

हेच बोल्तो..!

तात्या.

सर्किट's picture

7 Jan 2009 - 8:11 am | सर्किट (not verified)

सुंदर चित्रे. बंगालच्या वाघिणी असोत किंवा पाचगणीच्या स्त्रॉबेरी, सर्वसाक्षिंना तोड नाही.

-- सर्किट

संदीप चित्रे's picture

17 Mar 2009 - 12:18 am | संदीप चित्रे

सुरू झाला की स्ट्रॉबेरीचे मळे फुलतील.
वर्षभर ज्या समरची वाट पाहतो त्याची वार्ता पोचवल्याबद्दल धन्स :)