दूरवरची स्पष्ट प्रतिमा

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
9 Jan 2026 - 1:51 pm
गाभा: 

दूरवरची स्पष्ट प्रतिमा दाखवणार्‍या दुर्बीण किंवा बायनॉक्लर्स, बायनॉक्युलर्स Binoculars चर्चेसाठी हा धागा काढत आहे.

माझ्याकडे एक ऑलिंपस १०x५० आहे पण ती पडल्यामुळे जरा फोकस बिघडला आहे. म्हणजे दोन चित्रे दिसतात. कॉलिमेशम गेले आहे. एका डोळ्याने मात्र सुंदर स्पष्ट चित्र दिसते. चंद्र अप्रतिम दिसतो. गुरूचे चार चंद्र ही दिसतात. या शिवाय एक १२x५० ची जुनी झेनिथ आहे जपानी बनावटीची. पण त्यात प्रतिमेला हलक्याश्या सप्तरंगी कडा येतात. त्यामुळे ती जास्त चांगली असूनही अवकाश दर्शनासाठी फार वापरात येत नाही. आणि याशिवायही एक निकॉन ची ट्रॅव्हललाईट आहे. ही मी सदैव वापरतो. असो, मला वाटते की दुर्बीण हे केवळ एक साधन नसून एक वेगळी दृष्टी आहे. मग तुम्ही सह्याद्रीच्या कड्यावर पक्षी शोधत असाल किंवा क्रिकेटच्या मैदानात आवडत्या खेळाडूचा शॉट जवळून पाहू इच्छित असाल, एक चांगली दुर्बीण तुमच्या अनुभवात मोलाची भर घालते!

निकॉनची 8x25 ट्रॅव्हललाईट दुर्बीण प्रवासात नेहमी जवळ ठेवतो. अगदी हलकी आणि दणकट आहे. राजस्थानमध्ये फिरतांना दुर्बीण खूप वापरली आहे. राजवाडे आणि त्यातले निरनिराळे बारकावे पहायला फार उपयोगी आली. अगदी हलकी अगदी लहानशी तरी चांगली पॉवर आणि स्पष्ट चित्रं.

तरीही आता अजून एक चांगली १०x५० दुर्बीण घेण्याची इच्छा आहे.

दुर्बीण खरेदी करताना काय पाहावे यावर तज्ञ लोकांनी अधिक माहिती द्यावी ही विनंती. मला फार माहिती नाही पण मला समजलेल्या कोणतीही दुर्बीण घेताना प्रामुख्याने खालील गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या पुढील प्रमाणे.

मॅग्निफिकेशन म्हणजे दुर्बीणवर लिहिलेला गुणाकार. दुर्बीणवर 8x42 असे लिहिले असेल, तर '8x' म्हणजे ती वस्तू तुम्हाला ८ पट मोठी दिसेल. पक्षिनिरीक्षणासाठी ८x किंवा १०x सर्वोत्तम मानले जाते. यापेक्षा जास्त मॅग्निफिकेशन असल्यास हात जरा जरी हलला तरी प्रतिमा थरथरते. त्यामुळे ट्रायपॉद वापरावा लागतो.

ऑब्जेक्टिव्ह लेन्स: '8x42' मधील '42' म्हणजे समोरच्या काचेचा व्यास (मिमी मध्ये). ही काच जेवढी मोठी, तेवढा प्रकाश जास्त नळीच्या आत येतो आणि चित्र अधिक स्पष्ट दिसते. पहाटे किंवा संधिप्रकाशात पाहतांना हे जास्त महत्वाचे ठरते.

दुर्बीणीतील प्रिझम प्रकार: बाजारात दोन प्रिझम प्रकार मिळतात - 'पोरो' (Porro) दिसायला थोडी मोठी असते आणि 'रूफ' (Roof) प्रिझम ही दुर्बीण दिसायला सरळ आणि कॉम्पॅक्ट असते.

अगदी स्वस्त मिळणार्‍या चीनी बनावटीच्या दुर्बीणी टाळा असा (विकत घेतलेला सल्ला) मी फुकट देतो आहे. काहीही धड दिसत नाही!

माझी एंट्री लेव्हल पसंती म्हणजे बजेटमध्ये बसणारी 'निकाॅन' (Nikon)
जर तुम्ही सुरुवात करत असाल, तर Nikon Aculon किंवा Nikon Prostaff सिरीज एक उत्तम पर्याय आहे.

Nikon Aculon A211: ही एक मजबूत आणि स्वस्त दुर्बीण आहे. ज्यांना ट्रेकिंग किंवा खेळांच्या सामन्यांसाठी साधी पण टिकाऊ दुर्बीण हवी आहे, त्यांच्यासाठी हा 'पैसा वसूल' पर्याय आहे. पण ही वॉटरप्रूफ नाही.

Nikon Prostaff P3/P7: ही थोडी प्रगत आवृत्ती आहे. ही दुर्बीण वॉटरप्रूफ असते, त्यामुळे पावसाळ्यात गडकिल्ल्यांवर फिरताना लेन्सवर वाफ साचण्याची भीती राहत नाही.

जरा या पेक्षा वरची मिड-रेंज म्हणजे Nikon Monarch सिरीज. याची प्रतिमा अधिक स्पष्ट असते आणि रंगांची अचूकता खूप छान मिळते. या श्रेणीत Vortex Diamondback सारख्या कंपन्याही आहेत, ज्यांची वॉरंटी आणि बिल्ड क्वालिटी जबरदस्त असावी असे किंमत पाहून वाटते.

आता हाय-एंड दुर्बीणीचे राजपुत्र स्वारोवस्की! या अशा प्रकारांना 'ऑप्टिकल इंजिनिअरिंगचा चमत्कार' म्हटले जाते. स्वारोवस्की ची तुलना कॅमेऱ्यांच्या जगात जशी लायका शी होते, तशी आहे.

Swarovski EL किंवा NL Pure सारख्या दुर्बीणीची किंमत लाखांच्या घरात असते. पण एकदा तुम्ही यातून पाहिले की तुम्हाला साध्या डोळ्यांपेक्षाही अधिक 'रिअल' आणि लख्ख जग दिसते. अत्यंत हलकी वजन, हाताला मिळणारी पकड आणि काचेवर केलेले विशेष कोटिंग, ज्यामुळे अगदी अंधुक प्रकाशातही तुम्हाला पक्ष्याच्या पंखांवरील बारीक रेषा स्पष्ट दिसतात. अशी घेतली

तर मग ती भयंकर महाग दुर्बीण कपाटात पडून राहण्याची भीती वाटते. त्यामुळे निकॉनची ट्रॅव्हललाईट खूप आवडते. ही तशी माझी पहिली पसंती आहे.

तर दुर्बीण घेतांना दुर्बीण ही केवळ स्पेसिफिकेशन पाहून घेऊ नका. शक्य असल्यास दुकानात जाऊन ती हातात धरून पहा. तुमच्या डोळ्यांना ती सोयीस्कर वाटते का? बराच काळ पकडण्यासाठी तिचे वजन तुम्हाला पेलवेल का? आणि मुख्य म्हणजे, चष्मा लावणाऱ्यांसाठी 'आय रिलीफ' पुरेशी आहे का, हे नक्की तपासा.

सरते शेवटी असे म्हणतो की सर्वात उत्तम दुर्बिण तीच जी तुम्ही बिनधास्त पणे प्रत्येक प्रवासात तुमच्या गळ्यात असते!
तुम्हाला काय वाटते?

कोणती दुर्बीण तुमच्याकडे आहे?

प्रतिक्रिया

द्विनेत्री कितीही पॉवरफुल असली तरीही तिच्यातून दूरवरची वस्तू बघताना फोकसिंग पटकन होत नाही किंवा किंवा प्रतिमा सतत हलत असल्याने बघणे त्रासदायक होते असा अनुभव आहे. मी शक्यतो दूरवरचे बघण्यासाठी डिएसएलआर कॅमेऱ्याची 50*250 लेन्स वापरतो. द्विनेत्रीपेक्षाही ते दूरदर्शीचे कार्य उत्तम प्रकारे करते.
अर्थात तंत्रज्ञानात खूप फरक आहे, मर्यादाही आहेत पण माझे काम बहुतांशी खूप सोपे होते.

आजोबांची एक पितळी परदेशी बनावटीची कोणत्यातरी महायुद्धातली दुर्बीण आता आतापर्यंत घरात होती. आता मात्र सापडणे कठीण.

तिचे एक भिंग पिवळे झाले होते. दुसरे मात्र उत्तम होते. आटे फिरवून पुढील दोन्ही भिंगे त्यांच्या सिलिंडरसकट वेगळी करता यायची. तसे करून मी शाळेत असताना ते भिंग, आणि एक मोठा पुठ्ठ्याचा खोका वापरून प्रोजेक्टर बनवला होता. कोणाकडून तरी मिळालेल्या स्लाईड (स्लाईड्स ऊर्फ ट्रान्सपरंसीज हा प्रकार आता कोणाला माहीत असेल का, शंकाच आहे.) एक शंभर वॉट शक्तीचा प्रखर बल्ब त्यात लावला होता. स्लाईड उलटी घालावी लागायची. कूलिंग सिस्टीमची जुळणी नसल्याने त्यात स्लाईड वितळून वेड्यावाकड्या होऊ लागल्या. मग बाजूने भोके पडून एक छोटा टेबल फॅन त्याच्या बाजूला लावण्याचा प्रयत्न झाला. तरीही स्लाईड बदलताना हात भाजत असे. पण अंधाऱ्या खोलीत भिंतीवर स्लाईडचे चित्र उत्तम उमटत असे.

एका थिएटरमध्ये ओळखीने वाया गेलेल्या फिल्मचे तुकडे मिळाले. ते एका विशिष्ट वेगाने स्लाईडच्याच जागी येतील अशा प्रकारे ओढले तर चालते फिरते चित्र दिसेल अशी मला आशा होती. पण त्यात काही यश आलं नाही. बेगडी सामान वापरून उपकरणे तरी किती बनवणार. शिवाय एवढे सर्व करून जे काही बनेल त्याहून बरेच बरे चित्र अडीच रुपये तिकीटात श्रीराम चित्रमंदिरात बघायला मिळत असल्याने आणि दादासाहेब फाळके यांनी माझे हे कार्य फार पूर्वीच पूर्ण केल्याने मला त्यात फार लक्ष घालण्याचे कारण उरले नव्हते. मग मी अन्य समाजहिताची कामे शोधण्यात लक्ष घातले.

असो.

युयुत्सु's picture

10 Jan 2026 - 5:03 pm | युयुत्सु

साधारण ५वी ते पुढे १२वी या वयात ज्या वस्तूनी मनावर राज्य केलं त्यात बहिर्गोल भिंग एक महत्त्वाचे होते. स्लाईड प्रोजेक्टर बनवून पाहूण्यांना सिनेमा (स्लाईडस) दाखवायची भरपूर हौस भागवलीच पण नंतर १०वीत गेल्यावर शाळेतला प्रत्यक्ष १६ एम्०एम० चा प्रोजेक्टर चालवायला मिळाला तेव्हा जणू काही बोर्डात आल्याचा आनंद मिळालाझाला होता.

दुर्बिणी पण अनेक बनवल्या. मग जॉब चालू झाल्यावर दुसर्‍याच पगारातून एक खरा मायक्रोस्कोप (तो अजुनही आहे) आणि नंतर पुढे व्हि०टी०च्या फूट्पाथवर रशियन दूर्बिण विकत घेऊन हौस भागवली. त्यानंतर सेलेस्ट्रॉन्ची एक दूर्बीण लेकीसाठी घेतली. पण खरी मस्ती फोटोग्राफी साठी ७०-३००ची व्हाईट (रेड रिंग) घेतल्यावर केली. त्या लेन्सने काढलेले फोटो पोस्टर होर्डींग वगैरे ठिकाणी वापरलेले दिसतात तेव्हा गुदगुल्या होतात.

निनाद's picture

12 Jan 2026 - 4:35 am | निनाद

प्रत्यक्ष १६ एम्०एम० चा प्रोजेक्टर चालवायला मिळाला हे मस्तच.

निनाद's picture

12 Jan 2026 - 4:34 am | निनाद

असा प्रोजेक्टर बनवण्याची हौस मला पण फार होती... फिल्मचे तुकडे तर खूप वेळा पाहात बसणे व्हायचे. पण पंखा वगैरे लावणे इतके उपद्व्याप मात्र नाही केले किंवा जमले म्हणा! :)

या धाग्याच्या निमित्त्याने मला जाहिरात करायची संधी मिळाली!
कोजागिरी पौर्णिमा (चंद्र दर्शन)
पुन्हा एकदा चंद्र दर्शन...
बाकी, टेलिस्कोप घ्यायची इच्छा अजुन झालेली नाही. पण मोठ्या टेलिस्कोप मधुन चंद्र पाहण्याची इच्छा मात्र आहे.
मी SOHO ची सूर्याची प्रकाशचित्रे अधुन मधुन पाहत असत.
SOHO :-SOHO is a project of international cooperation between ESA and NASA. SOHO's EIT (Extreme ultraviolet Imaging Telescope) images.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Con Calma... : Daddy Yankee & Snow

निनाद's picture

12 Jan 2026 - 4:36 am | निनाद

मस्त फोटो! सुंदर आले आहेत. १० बाय ५० ने खड्डे पण स्पष्ट दिसतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Jan 2026 - 12:00 am | अमरेंद्र बाहुबली

मला दुर्बिणीने आकाश निरीक्षण करायची खूप इच्छा आहे, गुरु वगैरे ग्रह दिसत असतील तर फार उत्तम. पण दुर्बीण घ्यायची ईच्छा नाही, कुठे खगोल अभ्यासिक असेल तर तिथे तिकीट वगैरे काढून दुर्बिणीतून ग्रह पाहू देतात का?

निनाद's picture

13 Jan 2026 - 3:22 pm | निनाद

मुंबईतील नेहरू तारांगण मध्ये विचारून पाहिले का?

अवांतर :

टेलिस्कोप ला मराठी प्रतिशब्द म्हणून तलक्षेपिका चालेल का? माझ्या मते चालून जावा.
-गा.पै.

निनाद's picture

12 Jan 2026 - 4:37 am | निनाद

दूरदर्शक असा साधा सोपा शब्द आहे ना...?

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Jan 2026 - 12:21 pm | अमरेंद्र बाहुबली

मी पवनचक्की कंपनीत कामाला असताना मला कंपनिने मला पावरफुल बायनाकुलर दिली होती, व पवनचक्कीच्या खाली जाऊन त्या बायनाकुलकरने मला पवनचक्कीचे पाते व्यवस्थित आहेत कुठे क्रॅक वगैरेतर नाही पहावे लागायचे. मला रोज नबीन नवीन पवनचक्कीत नवीन नवीन क्रैक सापडू लागल्याने बायनाकुलर जमा करून मला दुसऱ्या कामावर नेमण्यात आले, नि ज्याला क्रॅक सापडणार नाहीत अश्या व्यक्तीला नेमण्यात आले. :)
क्रॅक सापडला की प्रचंड मोठा लवाजमा तो क्रॅक बुजवायला लागायचा!

युयुत्सु's picture

10 Jan 2026 - 4:49 pm | युयुत्सु

मला रोज नबीन नवीन पवनचक्कीत नवीन नवीन क्रैक सापडू लागल्याने बायनाकुलर जमा करून मला दुसऱ्या कामावर नेमण्यात आले,

हा हा हा!

कंजूस's picture

10 Jan 2026 - 6:53 pm | कंजूस

स्पष्टवक्तेपणाचे तोटे.

टर्मीनेटर's picture

10 Jan 2026 - 8:41 pm | टर्मीनेटर

मला नाही वाटत तसे... का ते समजुन घ्या...

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jan 2026 - 6:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

मित्राकडे नवीन ओप्पो मोबाईल पाहीला ज्यात १०० की १५० x झूम आहे. त्याला गंमतीने विचारलेही "काय चंद्रावरचे खड्डे बघायचेत का?". पण अशा झूममुळे द्विनेत्रि कालबाह्य होणार का असे वाटलेच.

एका मित्राच्या सॅमसंग फोनवर खरोखर दिसतात.

निनाद's picture

12 Jan 2026 - 4:40 am | निनाद

झूममुळे द्विनेत्रि कालबाह्य होणार का असे मला ही एका काळात वाटलेच. द्विनेत्रि ती द्विनेत्रि. तंत्रज्ञान असे पुढे जाते आहे की दोन्ही ची सरमिसळ होते आहे. द्विनेत्रि मध्ये अप्रतिम फोटो + व्हिडियो घेण्याच्या सुविधा वाढत आहेत. त्यात ए आय ने कोणता पक्षि प्राणि पहात आहात हे ही समजते आहे.

माझ्याकडे तीन होत्या./आहेत
१. त्यातली vixen 10x21 बिघडली. मुंबईत एकमेव REMEDIOS दुकानात कोलिमेशनला दिली पण त्यालाही जमले नाही.
२. रशियन 10x42 monocular आहे. अगदी हलकी. पण आता आतला प्रीझम पिवळा पडल्याने उजेड कमी झाला. ९७' साली घेतलेली.
३. 10x50 bino खराबच झाली.
क्रमांक १ आणि २ मधून गुरूचे दोन चंद्र दिसायचे नवीन असताना.
बाईनोंचा खरा उपयोग स्टार क्लस्टर पाहण्यासाठी आणि पक्षी पाहण्यासाठी. बाइनोचा आइपीस जेवढा चांगला तेवढी किंमत वाढते.
.........
मोबाईलमध्ये कॅम्रे ....आणि त्यातले टेलीफोटो लेन्स..
याचे स्पेसिफिकेशन साधारणपणे 70mm with 3x optical zoom. ( = 200mm equivalent.) हे लेन्स असणारे मोबाईल वीस हजारापासून सत्तर हजारांपर्यंत मिळतात. माझ्याकडे moto edge neo 50 आहे. किंमत वीस हजार. त्यात आहे tele 70-3x.
आता ओप्पोचा एक आला आहे त्यात 80mmx3,5 ( =280mm) झाले. पण विशेष कामाचे tele लेन्स म्हणजे 400mm ते कुणी देत नाही. आइफोनचे टॉप एंड फोनात 120mm with 5x optical zoom ( म्हणजे 600mm lens). यामुळेच ताऱ्यांचे फोटो घेता येतात.
काही फोनवाले मुख्य लेन्स ( 25mm) 200 megapixel देऊन telephoto सारखा रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतात पण ते डिजिटल झूम असते, खऱ्या टेलीची सर येणार नाही.

निनाद's picture

12 Jan 2026 - 4:55 am | निनाद

१. vixen 10x21 कोणती आहे त्यावर अवलंबून आहे. सावधगिरीने केले तर कोलिमेशन शक्य आहे. पण कोणते मॉडेल आहे यावर अवलंबून आहे.
जॉयफुल किंवा कोलमन सिरीज सारख्या मॉडेल्ससाठी शक्य आहे. प्रिझम हलवण्यासाठी लागणारे कोलिमेशन स्क्रू रबर आर्मरखाली लपवलेले असतात. जुनी असेल तर वरच असतात. ते स्क्रू फिरवणे जमले तर कोलिमेशन शक्य होते.
यु ट्युबर वर Easily adjust the collimation of your binoculars , How to fix binoculars out of collimation वगैरे सर्च करा. प्रिझम कसा हलला तर प्रतिमा कशी हलेल याचे एक तंत्र आहे. त्यांचे हलणे ४५ अंशात असते. ते तंत्र समजले तर स्क्रू फिरवणे सहज जमण्यासारखे असते हे. पण पेशन्स हवा! आता असे ही कुणी करत नाहीये. तर तुम्हीच करून पहा. नथिंग टू लूज!

२. रशियन 10x42 monocular फोटो काढायला उत्तम असावी. आतला प्रीझम पिवळा पडला असेल तर बहुदा धूळ जमली असेल. उघडून स्वच्छ करता येतो. फार सावधगिरीने हे कार्य करावे लागते. यासाठी एक वेगळ्या प्रकारचे चिकट असे ग्रीस वापरले जाते. ते आवशयक आहे. कारण ते वितळून त्याचे तवंग तयार होत नाहीत. पण ते धूळ आत जाऊ देत नाहीत. तुमचे लेखन पाहता कदाचित तुम्हाला हे जमेल असे मला वाटते आहे.

३. ३. 10x50 bino खराबच झाली. - अरेरे!!

कंजूस's picture

13 Jan 2026 - 10:34 am | कंजूस

@ निनाद, क्रमांक तीनचा कोलिमेशन उद्योग करताना ती खराब झाली आणि फोकसिंग रचनाही मोडली.
आणि आता हे करणारे मुंबईत खात्रीलायक कुणी नाही. डीएनए रोडवरच्या रेमेडिओसच्या बाजूच्याच कॅननच्या ( कॅम्रा दुकानात) गेलो विचारायला तर तिथे एक मराठी अटेंडट होता. तो म्हणाला की आमच्याकडे हे काम होत नाही, रेमेडिओसच करतो, आणि लेन्स क्लिनर सोल्यूशन दुर्बिणीच्या लेन्सवर मुळीच लावू नका त्यांचे कोटिंग विरघळते.

निनाद's picture

13 Jan 2026 - 3:14 pm | निनाद

कोलिमेशन उद्योग करताना ती खराब झाली आणि फोकसिंग रचनाही मोडली.

अरेरे! पण मला वाटते ती दुरुस्त नक्की होईल. कारण तसे या कोलिमेशन शिवाय खराब व्हायला आहेच काय यात! :)

लेन्स क्लिनर सोल्यूशन दुर्बिणीच्या लेन्सवर मुळीच लावू नका त्यांचे कोटिंग विरघळते.

१००% सहमत!

साफ करण्यासाठी Zeiss किंवा Nikon सारख्या ब्रँड्सचे 'ऑप्टिक-स्पेसिफिक क्लीनर' वापरले पाहिजेत. मुळात अगदी त्रास होत असेल तेव्हाच लेन्स क्लिन कराव्यात. शक्यतोवर हवेच्या पंपाने कराव्यात (फुंकून नाही!)
कधीही घरगुती चष्म्याचे क्लीनर वापरू नका! किंवा अमोनिया किंवा साबणाचा वापर करू नये, कारण यामुळे लेन्सचे कोटींग कायमचे खराब होऊ शकते. साफ करताना लिक्विड थेट लेन्सवर न टाकता एका स्वच्छ 'मायक्रोफायबर कपड्या'वर घ्यावे आणि मध्यभागाकडून वर्तुळाकार पद्धतीने बाहेरच्या बाजूला हलक्या हाताने पुसावे. जुना टीशर्ट वापरण्याचा मोह होऊ शकतो - तो टाळावा! किंवा समोरच असलेल्या कागदी नॅपकिनने लेन्स पुसल्यास त्यावर बारीक स्क्रॅचेस पडू शकतात, त्यामुळे नेहमी बायनोक्युलरसोबत येणाऱ्या विशेष कापडाचाच वापर करावा!

मुंबई सारख्या घामट ठिकाणी वापर असल्यास वॉटर प्रूफ मॉडेल्स चा प्रामुख्याने विचार करा. जसे निकॉन अ‍ॅक्शन वगैरे...

आग्या१९९०'s picture

13 Jan 2026 - 1:33 pm | आग्या१९९०

फोर्ट मध्ये K. Prabhakar कॅमेरा आणि लेन्सेस रिपेअर करतो. मी १९८० ते ८४ पर्यंत कॅमेरा (SLR) आणि टेली लेन्स रिपेअर त्याच्याकडेच करायचो. खूप नम्र आणि वेळेत उत्तम काम करून देत असे. सहज होण्यासारखे असेल तर तासाभरात करून देतो. २०१८ मध्ये कॅनन झूम लेन्सचे ऑटोफोकस फंक्शन तासाभरात दुरुस्त करून दिले.
कितीही जुने कॅमेरे किंवा binocular दुरुस्त करून देतो. कॅमेरा फोकसिंग आणि लेन्स क्लिनिंग त्याच्याइतके दर्जेदार काम मुंबईत कोणीच करत नाही. मुख्य म्हणजे spare part मध्ये अजिबात तडजोड करत नाही.

टर्मीनेटर's picture

13 Jan 2026 - 2:05 pm | टर्मीनेटर

अरे वाह! माझ्या एका मित्राकडे टेलिस्कोपीक एअर गन आहे. त्याचा टेलिस्कोप जर्मन मेड (दुसऱ्या महायुद्ध काळात नाझी जर्मनीत विकसित झालेल्या तंत्रज्ञानावर बनलेला) आहे. वस्तू एक नंबर आहे पण त्याच्या लहान मुलाने टेलिस्कोपच्या पुढच्या आणि मागच्या भिंगवाल्या चकत्या उघडून आतले मेकॅनिझम बिघडवले आहे. हा बिघाड तुम्ही म्हणताय त्या दुकानात दुरुस्त होऊ शकेल काय?

निनाद's picture

13 Jan 2026 - 3:20 pm | निनाद

याच धाग्यात स्पॉटिंग स्कोप पण घ्यायला हवे होते.
स्पॉटिंग स्कोप (Spotting Scope) हे प्रामुख्याने लांब अंतरावरील वस्तू किंवा प्राणी स्पष्टपणे पाहण्यासाठी वापरले जाणारे एक शक्तिशाली दुर्बिणीसारखे उपकरण आहे. हे मोनोक्युलर म्हणजे एकच नळी असलेले असतात. बायनोक्युलरच्या तुलनेत यांची झूम खूप जास्त असते, त्यामुळे पक्षीनिरीक्षण, वन्यजीव फोटोग्राफी, आणि शूटिंग रेंजवर लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.

स्पॉटिंग स्कोप आकाराने थोडे मोठे आणि वजनदार असल्याने ते स्थिर ठेवण्यासाठी ट्रायपॉडची गरज भासते. यामध्ये दोन मुख्य प्रकार असतात—एक सरळ आणि दुसरा आयपीस साठी कोनामध्ये वाकलेला; यापैकी तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवड करू शकता.
द्विनेत्री प्रमाणेच यातील लेन्स जेवढी मोठी आणि उच्च दर्जाची असते, तेवढीच प्रतिमेची स्पष्टता आणि उजेड अधिक चांगला मिळतो आणि चित्र स्पष्ट दिसते.

टर्मीनेटर's picture

13 Jan 2026 - 3:35 pm | टर्मीनेटर

बायनोक्युलरच्या तुलनेत यांची झूम खूप जास्त असते, त्यामुळे पक्षीनिरीक्षण, वन्यजीव फोटोग्राफी, आणि शूटिंग रेंजवर लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.

सहमतआहे!
थोडे अवांतर होईल पण, भारतात शिकारीवर कागदोपत्री बंदी असली तरी ती राजरोसपणे चालू असते हा भाग वेगळा...
(नरो वा... कुंजरो वा... 😀)

स्पॉटिंग स्कोपचा उपयोग प्राणी पक्षी यांचे निरीक्षण करणारे वापरतात. वर्धन ( magnification) 30 किंवा 50 असते.

आग्या१९९०'s picture

13 Jan 2026 - 2:23 pm | आग्या१९९०

नक्कीच होईल. मी एकदा घरीच टेली लेन्स साफ करण्यासाठी ओपन केली परंतु लेन्सचा क्रम विसरलो. मी केलेला उद्योग त्याला सांगितला त्याने पटकन क्रमवारी लेन्स लाऊन दिल्या.
माझ्या ६० च्या दशकातील PRAKTICA SLR कॅमेराचा ( East Germany ) मिरर फुटला होता. तो त्या देशातून मागवून बसवून दिला ( १९८२ ). आता फिल्म कॅमेरा पडून आहे, पण मिरर अजिबात खराब झाला नाही.

टर्मीनेटर's picture

13 Jan 2026 - 2:31 pm | टर्मीनेटर

ओक्के... मी हवेतर स्पेसीफिकेशन घेऊन इथे कळवतो, तुमच्याकडे त्यांचा नंबर असेल तर विचारून बघा... किंवा त्यांचा पत्ता द्या...

निनाद's picture

13 Jan 2026 - 3:02 pm | निनाद

K Prabhakar
Saheb Building, 2nd Floor, Opposite Suvidha Restaurant, 195 D N Road, Fort, Mumbai-400001

टर्मीनेटर's picture

13 Jan 2026 - 3:19 pm | टर्मीनेटर

धन्यवाद 🙏

आग्या१९९०'s picture

13 Jan 2026 - 3:05 pm | आग्या१९९०

माझ्याकडे नंबर ( visit card ) होता , शोधावे लागेल. पण K. Prabhakar binocular गुगल केल्यास पत्ता आणि फोन नंबर मिळेल. CST पासून जवळ आहे.

टर्मीनेटर's picture

13 Jan 2026 - 3:23 pm | टर्मीनेटर

ओके... वर निनाद साहेबांनी पत्ता दिला आहे.... तुमचेही खूप आभार हे ठिकाण सुचवण्यासाठी 🙏

लेख आणि प्रतिसादांतून चांगली माहिती मिळाली.
मी जेव्हा वस्तू घेतल्या तेव्हा यांचा उपयोग झाला असता.