घरासमोर अनाहुतपणे वाढलेल्या तुरीच्या शेंगांची कचोरी केली.आमटी करेन करेन म्हटलं तर राहिलेच.आमच्याकडे बाजारात तुरीच्या शेंगा विकत मिळत नाही.मागच्या महिन्यांपासून सकाळी फिरायला पुन्हा सुरूवात केली तेव्हा हळूहळू इमारतींनी भरून जाणाऱ्या रस्त्यालगत काही शेतं शिल्लक आहेत तिथे तुरीचे खुप मोठं शेत होत.आज तोडेन उद्या तोडेन ठरवत होतं तर तुरीची काढणी पण झाली.झाली का पंचाईत,आता पुढच्या वर्षीच तुरीची आमटी खाऊया म्हटलं.खरोखरीच मागच्या वर्षीची इच्छा आज नवीन वर्षी पूर्ण झाली.आई खानदेशात फिरायला गेली होती तिकडून तिने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या.

तुरीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या.कुकरमध्येच फोडणी दिली.कांदा टोमॅटो लसूण,खोबरे,तीळ,धने , कोथींबीर,लाल मिरची यांच परतून केलेलं वाटण फोडणीत टाकून परतून घेतले.मग तुरीच्या यात शेंगा परतून घेऊन आवश्यकतेनुसार पाणी,मीठ टाकले.कुकरच्या चार शिट्ट्या होऊ दिल्या.
आधीच कालच्या कडक एकादशीने खुप भूक लागली होती.तीळ लावत भाकरी केली.गाजर किसून डाळिंब पेरत कोशिंबीर केली.भाकरी कुस्करून त्यात हवी तेवढी आमटी टाकत तृप्तीचा ढेकर भक्तीने दिला :) ;)
नवीन वर्षाची सुरुवात खमंग झाली..

-भक्ती
प्रतिक्रिया
1 Jan 2026 - 10:00 pm | चामुंडराय
स्लर्रर्रर्प ... (लाळ गाळू इमोजी कल्पावि)
👌
तुरीची आमटी भलतीच छान दिसते आहे.
चविष्ट असणार, शंकाच नाही.
आता तुरीच्या शेंगा शोधणे आले.
सोयाबीनच्या नक्की मिळतील.
1 Jan 2026 - 10:34 pm | अभ्या..
जगातली सर्वोत्तम तूर आणि ज्वारी जिथे पिकते तिथे जन्म आणि बालपण असल्याने तुरीची आमटी, भाजलेली तूर शेंग आणि अर्थातच तुरीची दाळ ही जिव्हाळ्याची आहेतच.
छान रेसिपी.
2 Jan 2026 - 1:36 am | स्वधर्म
>> जगातली सर्वोत्तम तूर आणि ज्वारी जिथे पिकते
मी असे ऐकले होते की लातूर चे लातूर हे नांवच मुळी तूर तिथे चांगली पिकते म्हणून पडले होते.
बाकी भक्ती ताई त्यांच्या रेसिपीचे फोटो अगदी साधे टाकतात, त्यावर वेगवेगळ्या प्रकारे बदाम, चीज वगैरे टाकून सौंदर्य वाढवत नाहीत, जे चॅनेलवरचे मास्टर शेफ अगदी हमखास करतात, त्यामुळे भक्ती ताईंच्या रेसिपीज खूप आवडतात. बदाम, काजू, खोबरे, लालभडक चेरी, टाकून; डिझायनर प्लेटमधे पदार्थ सजवून टाकणारे डोक्यात जातात.
2 Jan 2026 - 8:31 am | अभ्या..
श्री अंबरीश वरद भगवंताची बार्शी.
2 Jan 2026 - 2:48 pm | अभ्या..
ते डिझायनर प्लेट आणि चीज ड्राय फ्रुट च्या माऱ्यात आमच्या मावशीचा अँटिक डायलॉग आठवतो....
"काजू बदाम पिस्ते टाकून म्हशीचे शेण सुध्दा चांगले लागतं".
.
तिनं फूड ब्लॉगिंग केलं असतं तर निम्मे शेफ आणि त्यांचे धंदे बंद पडले असते"
5 Jan 2026 - 4:22 pm | स्वधर्म
>> "काजू बदाम पिस्ते टाकून म्हशीचे शेण सुध्दा चांगले लागतं".
चितळेंनी विकायला सुरू केलं तर पुणेकर शेणही दुप्पट भावात घेतील ही म्हण आठवली.
7 Jan 2026 - 9:20 am | चामुंडराय
अॅमेझॉनवर cow dung cakes (शेणाच्या गोवऱ्या - शेण्या) उपलब्ध आहेत.
8 Jan 2026 - 10:18 pm | अभ्या..
हायला, मिपावरचे सगळे पुणेकर शांत चक्क.....
.
आता डायरेक्ट चितळ्यावर मारून बघा बरं एखादा टॉन्ट..
2 Jan 2026 - 1:07 pm | Bhakti
+१११
2 Jan 2026 - 6:02 am | नगरी
आमच्याकडे मध्यंतरी बाजारात तुरीच्या शेंगा भरपूर आल्या होत्या. मिठाच्या पाण्यात शिजवून खाल्ल्या. रेसिपी आवडली आणि फोटो तर मस्तच. परत आणून करून बघायला पाहिजे. बाकी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
2 Jan 2026 - 3:11 pm | संजय पाटिल
वा !!!
तोंपासू....
8 Jan 2026 - 7:31 pm | विवेकपटाईत
मस्त रेसिपी. आवडली.
9 Jan 2026 - 12:07 am | खटपट्या
ओल्या तुरीच्या शेंगा दिसत आहेत. तर यास कुकरची शीट्टी दीलीच पाहीजे का ? कारण ओले दाणे नरम असतात.
कुकर मधे न शिजवल्यास चालेल का ?