रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
9 Dec 2025 - 10:06 am

रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड
=============

--राजीव उपाध्ये

कर्वेरोडवर मेट्रो झाल्यानंतर पुलाखाली लावलेले अनेक साहित्यिकांचे फोटो दृष्टीस पडतात आणि काही लेखकूंची अनुपस्थिती ठळक जाणवते. कधी कधी मला प्रश्न पडतो माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर काय झालं असतं?

थोडी फार प्रसिद्धी मिळाली असती, ठराविक सामाजिक वर्तूळात ऊठबस झाली असती. पण माझ्या आई-वडीलांचे सामाजिक वर्तूळ माझ्या सामाजिक वर्तूळापेक्षा खुपच मोठे होते. नको ती अक्कल शिकविणारे कमी होते, मर्यादांचा आदर ठेवणारे, आनंदात सहभागी होणारे खुप होते. १ल्या लोकसभेतील एकुलत्या एक महिला खासदार इंदिराबाई मायदेव आमच्या घरी अनेकवेळा येऊन गेल्या आहेत. मी त्यांच्या पिवायसी जवळील घरातील झाडाच्या कैर्‍या पाडून खाल्ल्या आहेत. त्यांचा आणि आईचा उत्तम परिचय होता. ज्ञानप्रबोधिनीचे अप्पा पेंडसे वडिलांच्या चांगले परिचयाचे. ते ही आमच्याकडे अनेकवेळा येऊन गेले आहेत. वडीलांनी कोटीभास्कर उद्योगसमूह उभा करताना बरीच मदत केली होती. ती लक्षात ठेऊन रस्त्यात वडील दिसले की स्कूटर थांबवून चवकशी करत. मुलाला आमच्याकडे पाठवा म्हणून बजावत असत.

मला आय०आय०टी० मध्ये प्रवेश मिळाला तेव्हा माझा स्वत:वर विश्वास बसला नव्हता. प्रवेश यादी लागायच्या अगोदरच मी "आपण पुण्याला परत जाऊ" असा हट्ट धरला होता. पण मी केलेल्या कष्टांवर माझ्यापेक्षा वडिलांचा विश्वास जास्त. आईवडीलांना झालेला आनंद अजुनही चांगले लक्षात आहे. प्रवेश यादी जाहीर झाल्यावर वडील मला ठाण्याला व्होल्टास मध्ये त्यांच्या डॉ० बत्तीवाला नावाच्या पी०एच०डी० झालेल्या मित्राकडे घेऊन गेले. डॉ० बत्तीवालाने जेव्हा माझे अभिनंदन केले तेव्हा कुठे माझा स्वत:वर विश्वास बसला. माझ्या पी०एच०डी झालेल्या काही ’मित्रा’ना माझी लेक माझ्या पुढे गेली याच्या आनंदापेक्षा मी त्यांच्या तालावर नाचत नाही याचे दु:ख जास्त...

मराठी साहित्याला उत्तेजन देण्यासाठी १ कोटी देणारा सुनील देशमुख माझ्या मामाचा सख्खा मित्र. त्याला आईचे प्रेम फारसे मिळाले नाही म्हणुन तो माझ्या आजीला आईला मानायचा. त्यामुळे तो माझा पण मामा! त्याने आजीला मामाने भारतात परत यावे म्हणून २५ लाख रुपये (चाळिस वर्षांपूर्वी) नवा व्यवसाय उभा करण्यासाठी देण्याचे लेखी वचन दिले होते. आजी तो कागद मला अनेक वेळा दाखवायची. तो कागद उराशी बाळगून आजी मामासाठी झुरत-झुरत गेली.

आज कुणाचाही विश्वास बसणार नाही पण अंनिसला सुनील देशमुखानी पुरस्कार दिला तरी भारतभेटीमध्ये माझ्याकडुन त्यांची पत्रिका तपासून बघत असत. "माझं अमुक-तमुक डिल अडकून पडलं आहे. एक डिल झालं की माझे वीस कोटी सुटतात" असं म्हणायचे.

माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर त्यांनी केलेल्या लिखाणाची थोडी-फार रॉयल्टी मिळाली असती. वडिलांना दारू-सिगरेटचे व्यसन नसल्याने आईने ही रॉयल्टी शिलकीतच टाकली असती. वडिलांच्या डोक्यावर बसून त्यांना योग्य गुंतवणूक करायला भाग पडलं असतं.

पण ही रॉयल्टी त्यांनी दाखवलेल्या ’दूरदृष्टीच्या डिव्हीडण्ड’ इतकी नक्कीच मिळाली नसती. त्या रॉयल्टीमध्ये मला स्वत:च्या अटीवर आयुष्य जगायचा निर्णय घेता आला असता का? माझ्या लेकीचे टॉप-नॉच डिझाईन स्कूलमध्ये शिक्षण पार पडले असते का?

मेट्रोच्या खांबावर काही लेखकूंची अनुपस्थिती ठळक जाणवते. कधी कधी मला प्रश्न पडतो माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर काय झालं असतं?

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

12 Dec 2025 - 4:34 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. समाजासमोर नास्तिक असणारे, प्रत्यक्षात भयंकर अंधविश्वासी असतात. हा माझा अनुभव आहे. बाकी मी आयुष्यात कधीच पत्रिका कुणाला दाखवली नाही. मुलांचे लग्न करताना ही पत्रिका पाहिली नाही. कारण माझा देवावर विश्वास आहे, देवाने जे काही दिले आहे ते चांगले मानून त्याचे आभार मानावे, हीच शिकवण आमच्या वडिलांनी दिली होती.

सौंदाळा's picture

12 Dec 2025 - 5:31 pm | सौंदाळा

लेख भिडला.
छान स्फूट

कंजूस's picture

12 Dec 2025 - 7:17 pm | कंजूस

खरंय.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Dec 2025 - 7:49 pm | प्रकाश घाटपांडे

सुनिल देशमुख हे पुरोगाम्यांचे आधार स्तंभ. त्यांच्या दानशूर प्रवृत्ती मुळेच अनेक उपक्रम अंनिस करु शकली ही वस्तुस्थिती आहे. पण अंनिसला देणग्या दिल्या म्हणुन अंनिसच्या सर्व विचारांशी सहमत अथवा बांधिल असण्याचे कारण नाही.त्यांच्यामुळेच अनेक गोष्टी अंनिसला शक्य झाल्या.दाभोलकरांकडे माणूस समजून घेउन त्याच्या उपयुक्ततेचा उपयोग करुन घेण्याची क्षमता व स्किल होते.
दाभोलकरांच्या सहवासात अनेक लोक ज्योतिषविषयक ममत्व बाळगून होते. त्यांना तसे अनुभव वैयक्कित आयुष्यात आलेले होते. ज्योतिष हे सहजासहजी फेकून द्यावे असे शास्त्र नव्हे त्यात काहीतरी असले पाहिजे असे रा.ग.जाधव हे त्यांचे जवळचे मित्र जे नंतर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते यांचे मत होते हे मी त्यांच्याशी बोलताना जाणून घेतले होते.
सुनिल देशमुख हे तुमच्या मामासम होते त्यामुळे तुम्हाला त्यांचाअधिक परिचय असणार हे मान्य आहे

तुर्रमखान's picture

14 Dec 2025 - 4:28 pm | तुर्रमखान

पण अंनिसला देणग्या दिल्या म्हणुन अंनिसच्या सर्व विचारांशी सहमत अथवा बांधिल असण्याचे कारण नाही.

पटलं.

'अंनिस' म्हणजे एक वेगळा पंथच आहे असं बर्‍याच जणांना वाटतं. इतर सगळ्या संस्थेमध्ये असतात तश्या यांच्यात पण काही अपप्रवृत्तीची लोकं असतात. त्यांचे दाखले देउन ती संस्थाच कशी नालायक आहे, आपल्याच धर्मावर बोलते, भ्रष्टाचारी आहे असं काही लबाड लोकं सांगत असतात.

खरंतर वैज्ञानिक मार्गाचा अवलंब करावा, कार्यकारण भाव समजून घ्यावा अश्या साध्या गोष्टी आहेत. मॉडर्न मेडिसिनलाला सुद्धा 'अ‍ॅलॉपॅथी' म्हणून अगदी तसाच प्रकार करतात. खरतर, सिद्ध करता आलं तर इतर कुठल्याही पॅथीची उपचार पद्धतीचा वापर करता येइल. बरं हा निकष त्यांचा काही स्वतःचा नाही. साधी तार्किक सिद्ध करता येइल अशी वैज्ञानिक पद्धत आहे. कायदे तयार करताना, न्यायालये यात सुद्धा अशीच *पद्धत वापरतात.

* १९९७ मध्ये जग्गी वासुदेवच्या बायकोने जिवंत समाधी घेतली होती. नंतर १९९९ मध्ये पुरावे नसल्याने त्याला खुनाच्या अरोपातून मूक्त केलं. पण आता (होपफुली) अश्या गोष्टींवर कोर्ट विश्वास ठेवणार नाही. कायदेशीर इच्छामरणाला जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत अश्या लोकांच्या मुसक्या आवळतील.

उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद!

गामा पैलवान's picture

15 Dec 2025 - 3:05 am | गामा पैलवान

तुर्रमखान,

.... पण काही अपप्रवृत्तीची लोकं असतात. त्यांचे दाखले देउन ती संस्थाच कशी नालायक आहे, ....

दाभोलकरांवर हत्येच्या समयी फ्रॉडचा खटला चालू होता. अनिस नालायक आहे की नाही ते कोर्ट ठरवेल. बाकी, नक्षलवाद्यांचे व अनिसचे जे काही संबंध होते त्यावर आपलं मत वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.