खजुराहो-बनारस सोलो ट्रिप

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
6 Dec 2025 - 4:44 pm

तसा मी अप्रवासी फार कुठे गेलो नाही.पण नुकताच खजुराहो- वाराणसी अशी दहा दिवसांची स्वैर व सोलो टूर करुन आलो. अंशत: नियोजित पण बरीच स्वैर. IRCTC वरुन trial and error बेसीस वर तात्काळ ट्रेन बुकिंग केले. 25 नोव्हे ला सकाळी सोलो बॅग पाठीवर घेउन ट्रेन PUNE GCT SPECIAL ने भोपाळ ला गेलो. तिथे रात्री 12 ला पोचलो. रात्री IRCTC च्या एका दुर्लक्शित ठिकाणी फलाटा बाहेर असलेल्या एका रिटायरिंग रुम इमारतीत अनेकांना विचारत पोचलो. तिथे सामसूम होती. ऒफिस नाही. मग तिथे एका ठिकाणी एका बाईने एक जळमट व धूळीने माखलेली खोली दिली. तोपर्यंत चौकशी करण्यात माझे सर्व भोपाळ स्टेशन फिरुन झाले होते. तिथे उत्तम व चकचकीत एसी रिटायरिंग रुम होत्या. मी non ac बुक केले होते. मला आयत्यावेळीही ते मिळाले असते. असो. रात्र कशी बशी काढली. इंडियन संडास होता. कसरत करत लघुगुरु शंका निरसन करुन भोपाळ ते खजुराहो ट्रेन चे AC chair तिकिट काढले होते. सकाळी 6.30 ला बसलो व खजुराहोला दुपारी 1 वाजता पोचलो. रिक्षावाल्यांच्या गराड्यातून एका शेअर रिक्षातून 50 रुपयात वेस्टर्न ग्रुप टेंपल जवळ सोडले मग हॉटेल बरेच पुढे असल्याचे सांगून अजून पन्नास रुपयात सोडतो सांगितले व गल्ली बोळातून मी केलेल्या मेक माय ट्रिप च्या कासा दी विल्यम नावाच्या बिल्डिंग वजा हॉटेल मधे गेलो. 800 रुपयात टेंपल फिरवून आणतो असे रिक्षावाल्याने सांगितले. मी त्याला सांगितले ठिक आहे. तू 3 वाजता ये मग बघू. दुपारी चालत गेलो तर हॉटेल अगदीच टेंपल पासून जवळ होते. अल्पोपहार करुन थोडी वामकुक्षी घेउन मग रिक्षेवाला आला नाही मग एकटाच निघालो चालत. चालत जेमतेम 1 किमी वेस्टर्न टेम्पल च्या प्रवेश होता. तिथे क्यू आर कोड स्कॅन करुन तिकिट काढले मग आतमधे निवांत फिरत अनेक मंदिरे पाहिली ज्यावर सुप्रसिद्ध शिल्पे आहेत. ज्याची वर्णने व व्हिडिओ गुगल वर उपलब्ध आहेत. जी अगोदर पाहून होमवर्क केले होते. सायंकाळी एक लाईट ॲंड साउंड शो पाहिला अप्रतिम होता. माहितीपुर्ण व होता माझ्या हॉटेलच्या अगदीच जवळ होता त्याचे गेट. टाईमपास करताना दिल्लीचे एक जोडपे भेटले. गृहस्थ डॉक्टर होते. त्यांच्याशी गप्पा मारताना सूर जुळले. मुंबई तून मेडिकल डीग्रि केल्याने मराठी येत होते मग इच्छामरण व वैद्यकीय नितीमत्ता यावर गप्पा झाल्या. रात्र झाल्यावर श्रमपरिहार करावा वाटले. कुठेही जवळबार नव्हता. खाद्य पेय दुकाने मात्र भरपूर. एका रेस्टॉरंट मधे गेलो मॅनेजरशी सेटिंग केले मग त्याने रुफ टॉप रेस्टॉरंटवर व्हिस्कि ची सोय केली. वर आकाशात चांदणे होते. स्वयंमग्न अवस्थेत मदिरेचा व सामिष अन्नाचा स्वाद घेतला. . मग चालत हॉटेल वर आलो. फार अंतर नव्हते.
सकाळी उठून अल्पोपहार करायला एका मद्रासी टपरी त गेलो. मालकाला बोलते केले. मद्रासी कॉफी अप्रतिम होती. आतापर्यंत अशी कॉफी मी आयुष्यात प्यायली नव्हती. मग चालत चालत असताना एक बाईक रेंटची पाटी दिसली. सहज पाहिल तर मालकाने मला बोलावले. मी दुर्लक्ष करुन पुढे गेलो. नंतर मला परत मागे येवून जावेसे वाटले. महंमद बिलाल मालक होते. गप्पिष्ठ होते बुद्धीस्ट तत्वज्ञाना विषयी आकर्षण त्यांना वाटले व ज्योतिष विषयी आस्था व आकर्षण. मग काय त्यांना किती बोलू किती नको असे झाले. बाईक राहिली बाजूला.मग उत्तम अशी ACTIVA 5G अशी उत्तम स्कूटर व हेल्मेट दिले.400/- दिवसाचे भाडे. जा घेउन म्हणले. अहो पण माझी आयडेंटी तर पहा. मी फक्त कास दी विल्यम मधे उतरल्याचे तोंडी सांगितले होते. मी कशावरुन लफंगा नाही? बिलाल म्हणाले," आम्हाला माणसे समजतात. इतक्या वर्षे धंदा करतोय. तुमच्याशी ह्स्तांदोलन केल तेव्हाच मला काही स्पंदने जाणवली. ज्यावर माझा विश्वास आहे." मग माझे ड्रायव्हिंग लायसन्स त्यांना दाखवून त्यांना फोटो काढयला सांगितला. 400/- देउन मी वाहन घेउन मी गेलो. पेट्रोल टाकले. पंपावरच प्रातर्विधी उरकले व रानेह धबधबा 20 किमी वर होता तिथे गुगल मॅप च्या साथीने थोडे चुकत व विचारत गेलो. रस्ते मूलत: गाय गुरांसाठी होते वाहने दुय्यम. असे करत त्या जंगलात पोचलो. ते वनविभागाच्या अखत्यारीत होते. तिथे तिकिट मोबाईल वर स्कॅन करुन काढले. मग पुढे रस्ता फारच खराब होता पण स्कूटरने माझी काळजी घेतली. धबधब्याजवळ छोटा वाहनतळ व रेस्टॉरंट होते. वर्दळ नव्हती. मग धबधबा व परिसर पहायला पायर्‍या व फरशांची पायवाट होती. कठडे होते. उनही होते व टोपीही होती. निवांत पहात टाईमपास केला एनर्जी ड्रिंक घेतले. अर्धवट स्वच्छ टॉयलेट होते. परत खजुराहोला निघालो. मग नेव्हिगेटर च्या मदतीने ईस्टर्न ग्रुप ऑफ टेंपल पाहिले. काही भग्न शिल्पे व मंदिरे होती. नंतर सदर्न ग्रुप पाहिला तिथे जैन टेंपल आहेत. मूळ भग्न मंदिरांना थोडा टच देउन ती बनवली असल्याचे स्वच्छ दिसत होते. वाटेत बिस्किट पुडा घेउन तो खाल्ला. एनर्जी आली. मग हॉटेल वर आलो. झोप काढली व नंतर निरुद्देश स्कूटर वर भटकत व भरकटत गेलो. परत गुगल मॅपच्या साहाय्याने जागेवर आलो. स्कूटर परत केली. रस्त्यावर व्हीआयपी येणार असल्याने बंदोबस्त होता. म्युझियम पण बंद झाले होते. मग वाईन शॉप च्या शोधार्थ. गुगल व स्थानिक माहितीत तफावत पडायला लागली. एका सात्विक रिक्षेवाल्याने आम्ही तसल्या भानगडी पडत नसल्याचे सांगितले. मात्र एका इरसाल रिक्षावाल्याने मला ग्राहक बनवण्यासाठी माहिती दिली. मी फक्त माहीती घेतली व अंग्रेजी शराब की दुकान अशा ठिकाणी पोचलो. किती ती पायपीट? मग बडवायझर टिन बिअर घेतली वाटेत एक पराठा टपरी वरुन पराठा घेतला व रुमवर आलो शांतपणे कमी खर्चात श्रमपरिहार झाला.
दुसर्‍या दिवशी चेक आउट करायचे होते. पटकन वंदेभारत चे बनारस साठी बुकिंग केले. अगदी नुकतीच खजुराहो ते बनारस अशी वंदे भारत चालु झाली होती. चेक आउट करुन मग रेल्वे स्टेशनवरच टाईमपास करायचे ठरवले. दुपारी 3.30 ला वंदे भारत होती. मग स्टेशन वर वेटिंग कक्षात भुभु लोकांच्या संगतीत बसलो. स्वच्छता गृह नावालाच होते. नंतर वंदेभारत साठी फलाटावर आलो. तिथे काही भिकारी एक भटकी गाय व वंदे भारत उभी होती. स्टेशनची डागडुजी चालु होती. वंदे भारत मधे बसल्यावर सहप्रवाशांशी गप्पा मारल्या. बागेश्वर धाम सरकार या तरुण बाबा चे प्रस्थ तिथे बरेच आहे. तुम्हारी मन की बात ही बाबाने निकली हुई पर्ची मे लिखी हुई होती है। कैसी निकलती है पता नही लेकीन वो सच निकलता है। बाबा की अभी शादी भी नही हुई है। तुम्ही अनुभव घेतला आहे का? असे विचारल्यावर नाही असे उत्तर आले. मग ज्योतिष विषय येतोच. मग मी जरा सूत्रे हातात घेतली. तो बनारस चा होता. काही गोष्टी त्याला विचार करायला भाग पाडणार्‍या होत्या. त्याची बहीण ज्योतिष शिकलेली होती. बनारसला BSBS या स्टेशनला वंदे भारत चा शेवटचा थांबा आहे.तिथे तीन स्टेशन असल्याने गुगलच्या माहितीत देखील काही त्रुटी असल्याने त्याने स्थानिक माहिती दिली. तो अन्य ठिकाणी चालला होता. मग माझा फोन नं देउन व घेउन रात्री 11 वाजता पोचल्यावर काही अडचण आल्यास जरुर फोन करा असे सांगितले. नंतर आलेला सहप्रवासी एक कश्मीरी वायुसेना अधिकारी होता. बर्‍यापैकी rational होता.हिंदू मुस्लिम अशा गप्पांवर विषय आल्यावर तो म्हणाला आम्ही देखील कन्वर्टॆड आहोत. it makes no difference.
बनारसला रात्री उतरल्यावर भोपाळचा अनुभव असल्याने नंतरच एका एसी रिटायरिंग रुम साठी गेलो. बुक केलेल हॉटेल कम लॉज हे काशी विश्वनाथ मंदिराला लागून होते. रात्री उशीरा न जाण्यात शहाणपण होते. रिटायरिंग रुम मिळाली नाही तरी डॉर्मिटरी मधे बेड होते. ते घेतले. तीन चारशे रुपयात नउ तासांचा स्लॉट घेतला. मोबाईल रेंज होती. बनारसी बाबूचा फोन आलाच. त्याला मी डॉर्मिटरी मिळाल्याचे सांगितले व धन्यवाद दिले. रात्री झोपताना बनारस घाटांचे दर्शन घडवणार्‍या क्रुज चे बुकिंग केले. दोन क्रुज बुक्ड होत्या पण. माणेकशॉ क्रुज वर online बुकिंग मिळाले. मग झोपलो. कृत्रिम बुद्धीमत्तेने देखील रात्री स्टेशनवरुन मंदिर परिसरात जाण्याचे टाळा असा सल्ला दिला होताच. एसी डॉर्मिटरी मात्र उत्तमच होती.
सकाळी आरामात उठलो. आवरुन डॉर्मिटरी सोडली. स्टेशन सोडले. खाली उतरताना रॅपिडो वाला एका सोलो ट्रॅवलर मुलीला स्टेशनवर सोडत होता. त्याला गाठले व मला गुडवाडिया चौराहा ला जायचे आहे. त्याने अधिक माहिती विचारुन मंदिराजवळ लॉजवर सोडतो असे सांगितले. 45 रुपयात ठिक होते. मग त्याने मला बाईक वर घेतले. त्याचा गुगल मॅप लावून तो पतल्या गल्ल्यांमधून चालला. मग वाटेत गंडला. त्यालाही सुधरेना. त्यानेही स्थानिक लोकांना विचारत विचारत मार्गक्रमणा केली. थोड्याच वेळात आम्ही परत ओरिजनल ठिकाणी म्हणजे स्टेशनवरच पोचलो. फिरुन फिरुन भोपळे चौक. मग त्याला सांगितले कि तुझ्या सारख्या स्थानिक माणसाला ही पत्ता सापडत नाही तर आमचे काय? पण तू मला गुडवाडिया चौराहा ठिकाणी सोड. पुढे मी पहातो काय करायचे ते. त्याने मला अनेक खाच खळग्याच्या रस्त्यातून त्या ठिकाणी सोडले. तो चौक व दशमेश्वर घाटाकडे जाणारा रस्ता ओव्हर ब्रिज साठी खणून ठेवला होता. मी गुगल मॅप लावून बॅरिकेड लावलेल्या जत्रा स्वरुपाच्या वॉकिंग प्लाजा वरुन लॉज वर जाण्यासाठी तयार झालो कधी मॅप गंडायचा तर कधी मी. तुळशी बागेतली गल्ली जशी तसे बोळातून वाट काढत काढत पुढे जात राहिलो. मग काही स्थानिकांची मदत घेतली व योग्य दिशेने जात असल्याची खात्री केली. पाच फूटाच्या गल्लीतून चार व तीन फूटाच्या गल्लीत आलो तिथे ते गोल्डन लॉज नावाचे स्वयंघोषित 1 स्टार हॉटॆल होते. वास्तव व बुक करताना असलेली माहिती यात फरक माझ्या अंदाजापेक्षा फारच वेगळा होता. काशी विश्वनाथ मंदिर गेट क्रं 2 च्या अगदीच जवळ होते. जुन्या वाड्यात अशी अनेक लॉज तिथे आहेत. पान फूल माला भांडाराचे प्रत्येक गल्लीत आहे. प्रत्येक जण फ्री लॉकर सुविधा सांगतो. मंदिरात मोबाईल चप्पला अन्य वस्तू यांना परवानगी नाही.
मी लॉजवर उतरलो. उंच दगडी पायर्‍यांवरुन मला तो तिसर्‍या मजल्यावर घेउन जायला लागला. मी ते लगेच नाकारले व तळमजल्यावर तुलनेने कमी साईज ची खोली घेतली. हे स्वयंघोषित 1 स्टार हॉटेल म्हणजे थोडी सुधारलेली धर्मशाळा होती. मी बॅग पॅक ठेवून लगेच काशी विश्वनाथ च्या मंदिरात गेलो. कुत्री ,भिकारी व विष्ठा व लोकांची लाईन यातून लगेचच मंदिरात पोचलो. पैसे भरुन लवकर दर्शनाचा काउंटर होता. मी तिथे गेलो तर त्याने सांगितले आत्ता फार गर्दी नाहीये उगीच कशाला पैसे भरता. मग लॉकर मधे मोबाईल पान फुलाच्या दुकानात बूट ठेउन सिक्युरिटी गेट वर गेलो. त्याने खिशातील पाउच मधे असलेली लवंग विक्स इनहेलर, ट्थ पिक सकट प्रवेश नाकारला . परत ते मोबाईल लॉकर मधे ठेउन आलो. भक्तांच्या लाईनीत उभा होतो. सरकत सरकत अर्ध्या तासाने मंदिराच्या गाभार्‍याजवळ पोचलो. पाच सेकंदात शिवलिंग व मी यांनी परस्परांचे दर्शन घेतले. पुढे गेलो. होम पुजा सर्व चालू होतेच. प्रांगणात इकडे तिकडे फिरुन पाहिले स्वच्छता होती. मग बाहेर पडलो. अल्पोपहार केला. सर्व स्ट्रीट फूड स्टॉल्स. रेस्टॉरंट कमी. दुपारी झोप काढून संध्याकाळी 5 वाजता मला रविदास घाट या क्रूज पॉईंट वर पोचायचे होते. वाहतुकीचा बट्टयाबोळ होता. टू व्हिलरवाले हॉर्नवर सतत बोट ठेवून होते. मुख्य रस्ता खणलेल्या चौकात आलो. गुडवाडिया चौराहा. प्रत्येक जण ऑटो ऑटो असे विचारत होता. मग मी रविदास घाटचे किती घेशील? त्याने चारशे रुपये सांगितले मी म्हटले हड. मग रॅपिडो स्कूटर बुक केली 20 रुपयात मला रविदास घाटावर एवढ्या गर्दीतून त्याने पोचवले. मलाच लाज वाटल्याने मी त्याला अजून 20 रुपये दिले. मग क्रूज धक्का अजून लांब होता. पळत पळतच गेलो. अलकनंदा क्रूज लाईन्स ची माणेकशॉ क्रुज तिथे उभी होतीच. मग जरा वाट पाहिली व आत सोडायला लागल्यावर त्याल तिकिट बुकिंग दाखवले. उत्तम क्रुज रुफ टॉप वर मस्त जागा खाली एसी रेस्टॉरंट. कॉफी बिस्किट चा स्वाद घेत. गंगाघाट सफर चालू झाली. थंडी होती. सुर्यास्तानंतर घाटावर असलेली आरती क्रूज वरुन पाहिली. प्रत्येक घाटाची माहिती घेत आम्ही नमो घाटापर्यत गेलो तिथून परत रविदास घाट. आता रात्र झाली होती. परत रॅपिडो बाईक बुक केली या वेळी 80 रुपये पडले. एका गजबजलेल्या माहोल मधे एका निवांत रेस्टॉरंट मधे गेलो. डिनर करुन चालत परत रुमवर आलो. रुमच्या बाहेर अन्नपुर्णा मंदिर असल्याने तिथे अन्नछत्र व गर्दी चालूच होती. रात्री देखील वर्दळ होती
पुढे तीन चार दिवस सकाळ दुपार संध्याकाळ घाटच घाट चालत पाहिले पन्नास शंभर मिटर वर एक एके घाट. घाटांवर अनेक मंदिरे. मानसिंग वेधशाळा पाहिली जुन्या काळची बांधकामाची ढाचे म्हणजे यंत्रे. दिशा दर्शक . मुझियम व डॉक्युमेंटरी शो पाहिला. पुरातत्व खात्याने अजुन काही गोष्टी मेंटेन ठेवल्या आहेत. नंतर घाटावर बोटी . बोटींच्या फटीत लोकांच्या आंघोळी. वेगवगळ्या फिरते विक्रेते, पुजारी, श्राद्ध विधी यांची मांदियाळी. मनकर्णिका घाटावर गेलो. तिथे लाकडी ओंडक्यांवर लाईनीने सतत चिता जळत असतात. थोड्या थोड्या वेळात एकेक प्रेतयात्र येत असते. परिसर चिखल माती व घाण. एका चितेजवळ गेलो तिथे एक परदेशी काळी वस्त्रे घालून चितेभोवती फेरी मारत होता.घाटावर अनेक विदेशी लोक गंध लावून माळा घालून फिरत होते. सराईत विदेशी स्थानिक विक्रेत्यांना काही बळी पडत नव्हते पण नवीन मात्र कापले जात होते. घाटावर मी मस्त बॉडी मसाज पाचशे रुपयात घेतला. बार्बर ने दगडावर चादर आंथरली व मी कपडे काढून मसाज करुन घेतला. खूप काही भारी नव्हता. खाली दगड असल्याने झोपल्यावर तो मालिश करताना टोचत होता. मग नमो घाटला जायचे ठरवले पुन्हा गर्दी खड्डे व रॅपिडो बाईक. नमो घाटावर जाई पर्यंत जीव मुठीत. तिथे पोचल्यावर काळाले की नमोच येणार आहेत म्हणून व्ही आय पी बंदोबस्त लागला होता. प्रत्यक्ष घाटावर जाउ देत नव्हते. मग आईसक्रिम खाल्ले व पुन्हा रॅपिडो ने आलो. आता त्याने मला मंदिराच्या 1 नंबर गेटला सोडले. मग चक्र्व्यूहातून गुगल मॅपद्वारे पुन्हा मी मूळ जाग्यावरच. उन्हामुळे मोबाईलचा डिस्प्ले पण नीट दिसत नव्हता. आंधळ्याची काठी काढून घेतल्यावर कसे होईल तसे काही से झाले. मग एसी रेस्टॉरंट मधे जाउन आईस्क्रिम कॉफी घेतली व मोबाईलही थंड केला. मग मला सुधरले की मी कोठे आहे? ओळखीच्या खुणा मेंदुने मार्क केल्या होत्या मग गुगल मॅप शिवाय मी पोहोचलो. बिचारा गुगल घनदाट गल्ली बोळातील रस्ते कसे दाखवणार? कधी हेडफोन मधे सूचना यायच्या टर्न राईट , वी विल रिरुट यू मग तर अजूनच गोंधळ व्हायचा. पण तारतम्य वापरुन पोहोचता यायचे.
संध्याकाळी पायर्‍यांवर बसून आरती जत्रा सोहळा पाहिला. तिकिट वाले बोटीत व आरक्षित खुर्च्यांवर होते बाकी लोक घाटाच्या पायर्‍यांवर बसत होते. जेमतेम चालण्यापुरती जागा देत होते. मला काही उद्योग नसल्याने प्रत्येक ठिकाणी मी टाइमपास करत होतो. पुढे मी तात्काळ मधे दिल्लीचे वंदे भारत चे यशस्वी बुकिंग केले. तिथे मुलगी जावई होते व नातीचे वर्षाचा वाढदिवस 10 तारखेला होता. बायकोही तिथेच दिल्लीला होती. जायच्या आदल्या दिवशी सासुबाईंची प्रकृती बिघडल्याचे सांगितल्याने मी बनारस वरुन व बायको दिल्ली वरुन जाणार होती. मग मी तिकिट कॅन्सल केले. पुण्याचे तात्काळ रेल्वे बुकिंग मिळेना . मग एजंटला शरण गेलो. त्यालाही जमले नाही. दहा वाजता तात्काळ चालू होते व दहा वाजून 1 मिनिटांनी तिकिटे संपतात आम्हाला ॲप अक्सेसच पाच मिनिटांनी मिळतो मग परत तात्काळ च्या वेटिंग लिस्टवर. ट्रेन आठवड्यात चार. मग शेवटी मोबाईल ॲप वरुन ऐन गर्दीत चालता चालता स्पाईस जेटचे विमान बुक केले. मधल्या काळात मग जवळ 10 किमीवर असलेल्या सारनाथ ला जाउन आलो. परत रॅपिडो. सारनाथ मात्र स्वच्छ आहे. तिकिट आहे पुरातत्व खात्याचे. आत मधे अनेक भग्न अवशेष व स्तूप, मंदिराच्या रस्त्यावर ही स्वच्छता होती. दुकानेही लाईनीने व स्वच्छ होती जैन हिंदु बौद्ध सर्वच मंदिरे ही होती. मी चायनीज बौद्ध मंदिरात गेलो. परत जाताना रॅपिडो. मात्र यावेळी बॅटरी ऑटो बुक केली. ड्रायव्हर ला सांगितले वाटेत बिअर दुकान मिळाले तर पहा . तिथे ते सहजसाध्य नाही. एका विंग्रजी दुकानाच्या ठिकाणी त्याने थांबवले व मी टिन बिअर घेउन आलो. नशीब तिथे रस्यावर 2 मिनिट थांबायला रिक्षाला जाग मिळाली. पुढे चक्रव्यूहातून गेलो. एक ठिकाणी त्याने रिक्षा थांबवली व सांगितले की आता इथून पुढे वाहन जाउ शकत नाही. ते अंतर होते घाटापासून 1.3 किमी. मग परत गुगल मॅपने चुकत जात एका ठिकाणी बुर्जी स्टॉल दिसला. अशा गाड्या अपवादानेच दिसतात. ब्रेड आम्लेट घेतले व चालत चालत आलो. अगोदरचे दोन दिवस मी त्याजवळ असलेल्या एका उत्तम रेस्टॉरंट मधे बिअर साठी मागणी केली होती. सुरवातीला मान्य करुन त्याने आता संपली असे सांगितले होते. बार मिळणे तिथे दुरापास्त, सहा दिवस त्याच एरियात फिरत होतो. गल्ली बोळातील एजंट लोकांनी आता मला विचारणे सोडून दिले होते. सकाळ दुपार संध्याकाळ हा च माणूस दिसतो
माझे बुकिंग पिरियड संपला असल्याने दर दिवशी 1000/- देत मी ढब्बू सिंग नावाच्या मॅनेजर ने कंटिन्यु केले. सुरवातीला दोन टॉवेल दोन साबण व दोन शंभर एमेल च्या पाण्यच्या बाटल्या दिल्यावर प्रत्येक बाब ही चार्जेबल होती. त्याने हे सांगितल्यावर मी त्याला 1 स्टार हॉटेल म्हणवता व दर दिवशी मिनिरल वॉटर देत नाही असे कसे? त्याने फक्त मग आर ओ ची व्यवस्था आहे असे सांगितले. मी तसा रिव्हू लिहिन असे सांगितल्यावर थोड्या वेळाने तो मिनिरल वॉटर द्यायला तयार झाला. त्याच्य बदल्यात मी चांगला रिव्हू लिहावा अशी गळ घातली मी ती अमान्य केली व जी फॅक्ट आहे तेच लिहिन असे सांगितले
दुसर्‍या दिवशी सकाळी लॉज सोडले व एअर पोर्ट साठी रवाना झालो. पुन्हा गर्दी, खड्डे, बंद रस्ते मधे गुडवाडिया चौराहा वरुन रॅपिडो ऑटो बुक केली. पण नंतर त्याने तुमच्या पिकप पर्यंत पोहचू शकत नाही. तुम्ही 1.5 किमी बाईकवर या असे सांगितले मग मी ती कॅन्सल केली. पण त्याने सांगितले कोणीच येणार नाही तिथे जाताच येत नाही तिथे. पुन्हा चालत चालत निघालो. अनेक जण ऑटो विचारत होते. शेवटी थकल्यावर एक जरा बरा वाटला 600 रुपये घेइन म्हणाला. मी ठिक आहे सांगितल्यावर मला गल्ली बोळातून चालत एक ठिकाणी नेले.मग आलोच म्हणाला. लगेच तो रिक्षा घेउन आला. पण त्यालाही तिथून बाहेर पडायला बराच त्रास झाला. विमानतळ 25 किमीवर होते. वाटेत गप्पा मारत इथे लोक पान खाउन कसे पचापच थुंकतात हे पान न खाता थुंकत सांगितले. मोदी इंडियाका जापान बना देगा। सब जगह बॅट्री कार दिखेगी। हमार लोकही गंदे है तो मोदी क्या करेगा? फिर भी बनारस अभी पहिला इतना गंदा नही है। अपनेकू एक घर चलाना मुश्किल होता है। उसको तो देश चलान है। वगैरे वगैरे करमणूक करत होता.
एअर पोर्ट वर पोचल्यावर कळले की आमचे विमान तीन तास लेट आहे. मग काय टाईमपास करत होतो. लाउंज पण सिक्युरिटी चेक इन झाल्यावर पहायचे होते. मग शेवटी एकदा आत मधे गेलो. लाउंज मधे जरा मस्त बिअर प्यावी असा विचार केला . एन्ट्रिलाच त्याने सांगितल तुमचे Axis Liberty Debit card इथे चालणार नाही. मला आत मधे उंच स्टूलावर बसून बिअर प्यायची होती. मग मी त्याला अन्य काही पर्याय आहे का मला फक्त बिअर प्यायची आहे असे विचारल्यावर माझ्याकडे पाहून म्हणाला जा आत. बिल नंतर द्या. मग उंच स्टुलावर बसून बिअर व फ्रेंच फ्रईज घेउन टाईम पास करत होतो. लाउंज कसले ते कॅफे होते. गर्दी वाढल्यावर माझ्यावर मनोवैग्यानिक दबाव वाढत गेला. पण मी तो जुगारुन शांतपणे माझे निवांत झाल्यावरच उठलो व बिल दिले. नंतर ही टाईमपास करावा लागला तोपर्यंत इंडिगोची विमाने रद्द होत होती. माझे स्पाईस जेट होते.
मग एकदाचे उड्डाण झाल्यावर पुण्यात पोचल्यावर लगेज बेल्ट वर ही माझी एकमेव सॅक फार उशीरा आली. बाहे पडल्यावर एरोमॉल वर गेलो. तिथे प्रिपेड वर तो कोथरुड देत होता. पण मी सांगितले मला रामवाडी मेट्रो द्या. मग 175 रुपयात मी मेट्रो त पोचलो. पुढे 27 रुपयात मेट्रो ने वनाझ. मग चालत निघालो. वाटे बुर्जी पोळी घेतली व आता जवळच्या अंतरासाठी रात्री दहा वाजता रिक्षा मिळेना. मग उबेर रिक्षा बुक केली.48 रुपये अधिक टिप 20 रुपये टाकल्यावर रिक्षा बुक झाली. घरापाशी पोचल्यावर मला रिक्षावाला म्हणाला की तुमचे चार्जेस वाढले आहेत आता 84 रुपये झालेत. उबेर चे तुमच्याकडे बॅलन्स असतील ते यात टाकले आहेत तो पर्यंत मला फ्लॅश मेसेज आला तुमच आता 84 रुपये. अडला ह्र्री परिस्थिति करुन उबेर लुटते आहे. आल्यावर मी निवांत तक्रार केली त्यात सविस्तर लिहिले मागचे कुठले कॅन्सलेशन चार्जेस आता घुसडले होते. तक्रार पहाता उबेर ने अधिक चे रुपये वॉलेट मधे रिफंड दाखवले.
असो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

अरे वा मस्त झाली खजुराहो - वाराणसी - दिल्ली एकट्याची सहल.
घाई गर्दी असली की सगळे पाकिट कापायला बघतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Dec 2025 - 1:10 am | अमरेंद्र बाहुबली

ट्रिप आवडली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2025 - 7:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाटपांडे काका, ट्रिप मस्त झाली. मिपाशास्त्रानुसार सहलीच्या धाग्यात छायाचित्रे असायला पाहिजे होती. सहलीच्या धाग्यात छायाचित्रे नसली तर, मिपाशास्त्रानुसार आनंद कमी मिळतो. छायाचित्रे असली की मजा येते. बाय द वे, आपल्या बियरच्या गप्पा वाचक म्हणून उत्साह वाढवणा-या होत्या, रेस्टारॉची शोधाशोध, मंदिरे, घाट आणि एकूण प्रवास भन्नाट. सलग वाचून काढले.

आपल्या भेटीला दहा एक वर्ष झाली असतील. छ. संभाजीनगरला या. मस्त फिरवतो. सायकांळी निवांत बसू आणि गप्पा मारू..

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

7 Dec 2025 - 10:45 am | प्रचेतस

मस्तच ट्रिप झाली की.
खजुराहोचे अजुन सविस्तर वर्णन हवे होते.

कानडाऊ योगेशु's picture

7 Dec 2025 - 12:12 pm | कानडाऊ योगेशु

फलाटावर आलो. तिथे काही भिकारी एक भटकी गाय व वंदे भारत उभी होती.

तसेच

पाच सेकंदात शिवलिंग व मी यांनी परस्परांचे दर्शन घेतले.

अशा वाक्यांमुळे प्रवासवर्णन खुसखुशीत झाले आहे.

तुर्रमखान's picture

8 Dec 2025 - 2:10 am | तुर्रमखान

एका दमात वाचून काढले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Dec 2025 - 1:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण फोटो पाहीजेतच. त्या शिवाय प्रवास वर्णनाची मज्जा नाही. घाटाचे फोटो, खजुराहोचे फोटो (नुसते भटकंतीचे टाकले तरी चालतील, मंदिरांचे जालावर दिसतीलच).

काही विशेष आध्यात्मिक अनुभव वगैरे?

प्रकाका तुमच्या भटकंतीची कथा आवडली. तुम्ही बरेच भाग्यवान दिसता, नाही म्हणजे बुकिंग सगळीकडे पटकन मिळाले ना ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rehman Dakait Entry Song :Dhurandhar

प्रकाश घाटपांडे's picture

11 Dec 2025 - 1:03 pm | प्रकाश घाटपांडे

तात्काळ मिळाले की स्वीकारायचे तोपर्यंत पुढचे फार ठरवायचे नाही.अनेकदा कॅन्सल ही करावी लागली. स्वैर मूडची किंमत मोजावी लागते. माझ्या स्वयंप्रवासी शिक्षणाचा तो भाग आहे.

मदनबाण's picture

12 Dec 2025 - 2:43 pm | मदनबाण

ओक्के.
स्वैर मूडची किंमत मोजावी लागते.
खरंय!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Ved | Ajay-Atul | Vasundhara Vee | Manya Narang |

काशी विश्वनाथ कॉरिडॉर कुठे आहे? कोण जाऊ शकतो त्यातून?

प्रकाश घाटपांडे's picture

11 Dec 2025 - 1:14 pm | प्रकाश घाटपांडे

काशी विश्वनाथ मंदिराचा आतला भाग स्वच्छ आहे पण तिथे पोहोचण्यासाठी असलेलेले रस्ते विकसित होत आहेत. ओव्हरब्रिज होणार आहेत. मंदिराला चार गेट आहेत. तिथे पोहोचायचे मार्ग फार अरुंद आहेत

काशी विश्वनाथ कॉरिडॉर म्हणजे विश्वनाथ देवळापासून गंगा नदी पर्यंत जाण्यासाठी बांधलेला रस्ता / घाट (नदीकाठच्या कोणत्याही मंदीरामधे असतो तसाच)
पण पूर्वी कच्ची, पक्की दुकाने, घरे असल्यामुळे देवळातून थेट नदीवर जाता यायचे नाही.
हे सर्व हटवून प्रशस्त दगडी घाट, दिवे वगैरे केले आहेत.
विश्वनाथ मंदीराबाहेरील घाटावर थेट नदीच्या बाकीच्या घाटांवरुन जाता येते पण घाटावरुन देवळात यायला मोठी रांग असते. (मी गेलो होत तेव्हा तरी होती)