दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे,
“आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”.
खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो.
अशा तऱ्हेने त्या रुग्णाचे आयुष्यातील अखेरचे पर्व चालू होते आणि ते किती काळ चालेल हे अनिश्चित असते. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. प्रत्यक्ष मृत्यू होईपर्यंत कुटुंबीय अथवा सेवक अशा कोणाला ना कोणाला तरी रुग्णाची सोबत करावी लागते. त्या दृष्टिकोनातून पाहता, मृत्यू जवळ आला असता रुग्णात कोणते शारीरिक बदल होतात आणि इतरांना त्याच्यात कोणती लक्षणे अथवा चिन्हे दिसतात यांचा आढावा या लेखात घेतोय. तो सामान्यज्ञान म्हणून सर्वांनाच उपयुक्त ठरावा. त्याचबरोबर या अंतिम घटिकांमध्ये रुग्ण-सोबत्याने रुग्णाची कशी काळजी घ्यावी आणि काय पथ्ये पाळावीत याचाही थोडक्यात उल्लेख करतो. (या लेखात फक्त नैसर्गिक मृत्यूच विचारात घेतला आहे).

आता पाहूया महत्त्वाची मृत्यूपूर्व लक्षणे :
निरिच्छता
अंथरुणाला खिळलेला रुग्ण वेळ जाण्यासाठी एरवी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत मन रमवित असतो. जसे की, पेपर वाचन, संगीत श्रवण, टीव्ही पाहणे आणि किरकोळ कौटुंबिक हितगुज. मात्र तब्येत जशी गंभीर होते तसतसा त्याचा या सर्व दैनंदिन गोष्टींमधला रस झपाट्याने कमी होतो. किंबहुना त्याची कशाचीच इच्छा नसणे आणि शांतपणे नुसते पडून राहणे हा एक महत्त्वाचा बदल इतरांनी लक्षात घेण्याजोगा. अशा प्रसंगी प्रेमभराने रुग्णाचा हात हातात घेतला असता रुग्णाला भावनिक आधार वाटू शकतो.
ढासळते अन्न-पाणीग्रहण
खाण्यापिण्याची वासना शमविणे हा तर आयुष्यभरातला सर्वोच्च आनंद असतो. परंतु मृत्यूसमीप अवस्थेत खाण्यापिण्याची वासना प्रकर्षाने कमी होते. आजारामुळे शरीरात काही रासायनिक बदल झालेले असतात व त्यामुळे शरीराची अन्नपाण्याची गरज देखील खूप कमी होते. अशा प्रसंगी, कोणीतरी आपल्याला भरवतंय ही भावना रुग्णाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरते.
आता अन्न पाणी देताना शरीरपोषण वगैरे मुद्दे बाजूला ठेऊन रुग्णाचे आवडते पदार्थ झेपेल अशा पद्धतीने देणे श्रेयस्कर. बळेबळे खाऊ घालणे तर टाळलेच पाहिजे. बरेच रुग्ण घन आहार घेण्यास नाखुश असतात. अशा वेळी बर्फाचा तुकडा अथवा गोठवलेल्या फळांच्या रसाचा तुकडा चघळायला दिल्यास बरे वाटते. एखादा रुग्ण तोंडाने गिळूच शकत नसल्यास त्याला मुद्दाम भरवता कामा नये; चुकून असे केल्यास अन्नकण श्वासनलिकेत जाऊन परिस्थिती बिकट होते.
झोप
रुग्णाचा झोपेचा कालावधी प्रमाणाबाहेर वाढू लागतो आणि तो वाढतच राहतो. अत्यंत थकव्यामुळे त्याला डोळे उघडण्याचे कष्टही पेलत नाहीत. अशा परिस्थितीत तो कित्येक तास झोपून असला तरीही त्याला उठवण्याच्या फंदात पडू नये.
संभ्रमावस्था आणि चित्रविचित्र भास
टप्प्याटप्प्याने काळ, वेळ आणि ठिकाण यांचे भान राहत नाही. जवळच्या व्यक्तीही अनोळखी वाटू लागतात. चित्रविचित्र भास होणे हे देखील या अवस्थेचे एक वैशिष्ट्य. असे भास शुश्रुषा केंद्रात ठेवलेल्या वृद्धांच्या बाबतीत तर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. रुग्णाच्या नजरेसमोर दिवंगत प्रिय व्यक्ती येऊ शकतात आणि जुन्या आठवणींचीही गर्दी होते. जेव्हा रुग्ण अशा स्वरूपाची वर्णने करू लागतो तेव्हा सोबतच्या व्यक्तीने त्यात ‘हो हो करून’ सामावून जाणे हिताचे असते; उगाच रुग्णाचा भ्रम दूर करण्यात अर्थ नसतो.
अस्वस्थता व कासाविसी
जागेपणी रुग्ण कमालीचा अस्वस्थ असतो आणि त्याच्या जीवाची अक्षरशः तगमग होते. अशा वेळेस झोप लागणे कठीणच. एकंदरीत बुद्धिभ्रंश झाल्याची ही अवस्था असते. अशा वेळेस त्याचे शांतपणे ऐकून घेऊन धीर देणे हे हितावह. गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने सौम्य गुंगी आणणारी औषधे देता येतात.
अनियंत्रित मलमूत्रविसर्जन
लघवी आणि/अथवा शौच नकळत होऊन बसणे हा या स्थितीतील एक महत्त्वाचा बदल आहे. त्याने रुग्णाचा आत्मसन्मान ढासळतो आणि त्रस्तता वाढते. त्यातून पुढे त्वचेचा दाह आणि जंतूसंसर्ग देखील होऊ शकतो. या प्रकाराची वेळच्यावेळी स्वच्छता राखणे हे परिचारकाच्या दृष्टीने महत्त्वाचे काम ठरते. कित्येक तास जर लघवी झालेली नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मूत्रमार्गातील नळीची व्यवस्था करावी लागते. मृत्यू समीप आला असता असता लघवीचे प्रमाण खूप कमी होते आणि ती बरीच गडद रंगाची असते.
दृष्टी आणि श्रवण दुर्बलता
मृत्यूपूर्व काही तासांमध्ये या दोन्ही महत्त्वाच्या संवेदना बऱ्याच कमी होतात. किंबहुना प्रकाश आणि आवाज या दोन्ही गोष्टीची सहनशीलता बरीच घटते. या दृष्टीने रुग्णाच्या खोलीतील प्रकाश मंद असावा आणि आजूबाजूला मोठे आवाज करणे टाळावे. शरीराच्या सर्व विशेष संवेदनांमध्ये ऐकण्याची थोडीफार क्षमता जवळजवळ शेवटपर्यंत टिकून राहते.
वर उल्लेखलेली महत्त्वाची लक्षणे रुग्णाचे सोबती अथवा कुटुंबीयांना दिसून येतात आणि मृत्यूची चाहूल लागते. मात्र कधीकधी काही रुग्णांच्या बाबतीत वरील परिस्थितीत अचानक सुधारणा झाल्यासारखे वाटते परंतु ती अल्पकाळ टिकते आणि परिस्थिती पुन्हा एकदा वेगाने बिघडू लागते. तात्पुरत्या सुधारलेल्या अवस्थेत जिवलगांच्या अखेरच्या भेटीगाठी घडू शकतात.
मृत्यूपूर्व परिस्थितीत डॉक्टर किंवा नर्सने रुग्णाची तपासणी केली असता काय महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात ते आता पाहू.
शारीरिक तपासणीच्या नोंदी
१. तापमान : आयुष्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये शरीराचे तापमान 1C ने बऱ्याचदा वाढते. शरीरातील दाह, कर्करोगप्रक्रिया अथवा चयापचयातील बिघाड त्याला कारणीभूत असतो. अशा प्रसंगी मुद्दामहून औषधे देण्याची गरज नसते; कपाळावर किंचित थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तरी पुरते.
२. त्वचेतील बदल : मृत्यूपूर्वी काही तास त्वचा लाल होऊ शकते आणि घामाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते. मात्र मृत्यूच्या नजिक पोचताना अचानक शरीर तापमान एकदम कमी होते आणि त्वचा निळसर दिसू शकते. जसजसे रक्ताभिसरण अत्यंत मंद होते तसे संपूर्ण शरीर थंड पडू लागते. काही वेळेस चेहरा फिकट पिवळसर पडतो आणि हा पिवळेपणा तोंडाभोवती अधिक दिसून येतो.
३. श्वसनातील बदल : श्वसनाचा वेग बराच मंदावतो आणि उथळ आणि अनियमित श्वास घडू लागतात. दोन श्वासांमधील कालावधी देखील वाढतो. तर कधीकधी काही श्वास भराभर घेतले जाऊन पुढे काही क्षण श्वसन थांबल्यासारखे होऊ शकते. एकंदरीत ही अनियमितता वाढतीच राहते.
४. जागृतावस्था : अखेरच्या तासांमध्ये शरीराचा प्रवास जागृतीकडून कायमच्या बेशुद्धीकडे सुरू होतो. त्यावेळेस बऱ्याच जणांच्या बाबतीत गिळण्याची आणि घशातील द्रव खाकरून स्वच्छ करण्याची क्षमता संपुष्टात येते. घशात साठलेल्या द्रवातून जेव्हा श्वसन होते त्यातून मोठमोठे आवाज येऊ लागतात. सामान्य भाषेत याला मृत्यूची घरघर लागली असे म्हणतात. काही रुग्णांच्या बाबतीत हा अनुभव येतो. ही घरघर कुटुंबीयांसाठी अर्थातच चिंताजनक असते परंतु रुग्ण मात्र तिची जाणीव होण्याच्या पलीकडच्या अवस्थेत गेलेला असतो. अशा वेळेस त्याच्या डोक्याखाली मोठी उशी देऊन अथवा त्याला कुशीवर वळवून पहावे. घरघर फारच असह्य वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे देता येतात. घरघर लागलेल्या रुग्णांपैकी सुमारे 75% च्या बाबतीत सुमारे 48 तासात त्यांचा जीवनप्रवास संपतो.
. . .
चित्रपट व तत्सम दृश्य माध्यमांमधून दाखविला जाणारा मृत्यूपूर्व क्षण हा खरोखरच फिल्मी असतो ! त्यात आत्यंतिक प्रेमालाप, गुपितकथन किंवा प्रेमिकांचे हात मिळवून देणे इत्यादी रंजक गोष्टींची रेलचेल असते. परंतु वास्तव मात्र या कल्पनारंजनापासून फार दूर असल्याचे दिसते. खरोखरीच असे सुखाचे क्षण ज्यांच्या वाट्याला आले असतील ते भाग्यवानच. तसेच बऱ्यापैकी निरोगी व्यक्तींचे झोपेतले मृत्यूही सुखदायी.
परंतु वास्तवातील बहुतांश चित्र काय दिसते ? जराजर्जर रोगावस्थेतल्या मृत्यूचे दर्शन केविलवाणे असते. शरीरभर फोफावलेला कर्करोग, मेंदूचे ऱ्हासकारक गंभीर आजार, मोठे अपघात किंवा शरीराच्या सर्व महत्त्वाच्या अवयवांनी पत्करलेली शरणागती, अशा अनेक प्रसंगीचा मृत्यू बघणे हे अतिशय वेदनादायकच. घरी झालेला मृत्यू त्यातल्या त्यात बऱ्या वातावरणातला म्हणायचा. एखाद्यावर हीच वेळ जर रुग्णालयात दीर्घकाळ ठेवून आली तर तिथले वातावरणात अधिकच शोकाकुल व रोगट असते.
आपल्यातील अनेकांनी आपल्या कुटुंबीय अथवा जिवलगाचे असे मृत्यू जवळून पाहिले असतील आणि ते अखेरचे दृश्य देखील आपल्या स्मृतीत असेल. मृत्यू तर अटळ आहे. यास्तव प्रत्येकावर कधी ना कधी एखाद्या मृत्यूशय्येवरील व्यक्तीची सोबत करण्याचा प्रसंग येणार आणि अखेरीस एखाद्या दिवशी आपणही त्या शय्येवर कायमचे विसावणार आहोत. आयुष्यातले ते अखेरचे क्षण सर्वांनाच कमीत कमी त्रासदायक व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करतो.
*************************************************************************************
संदर्भ :
प्रतिक्रिया
8 Sep 2025 - 11:27 am | राजेंद्र मेहेंदळे
कुमार सरांचे लेख नेहमीच अनवट विषयांवर आणि विचार प्रवर्तक असतात. हा लेखही तसाच.
धन्यवाद डॉ. लिहिते रहा
8 Sep 2025 - 12:48 pm | कर्नलतपस्वी
लेख अतिशय महत्वाचा जाणाऱ्या साठी व मागे रहाणार्या साठीही.
वैद्यकीय क्षेत्र अतिशय जवळून बघितल्याने बरेच अनुभव आले आहेत.
काही दिवसापूर्वीच एक नात्मयातील महिला अत्यवस्थ होत्या त्याना त्यांचे मरण कळले होते जणू,त्यांनी सांगीतले मी फार तर दोन किंवा तीन दिवस तुमच्रयाबरोबर रहाणार आहे.
माझी स्वताची आई जेंव्हा गेली त्याच्या एक दिवस आगोदर मला डायपर व व्हिल चेअर आणावी लागली. त्याच रात्री तीने माझ्या हाताने दुध पिवून झोपेतच प्राण सोडला. आयुष्य भर स्वताच्या पायावर खंबीर उभी असलेली माझी आई, आता अवलंबून रहावे लागणार या धसक्याने गेली असावी. कारण अशक्तपणा सोडल्यास सारे वैद्यकीय पॅरामिटर सामान्य होते.
तेंव्हा आपण मांडलेले मुद्दे खरोखरच मार्गदर्शक आहेत. "फिलिंग ऑफ इम्पेंडिग डुम", अशी रुग्णाची अवस्था ओळखण्यास,समजून घेण्यास मदतच करतील.
8 Sep 2025 - 2:27 pm | श्वेता व्यास
जवळच्या दोन वृद्ध वक्तींबाबत वरील बरीचशी लक्षणे जाणवली होती.
आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो.अगदी खरंय ! नकळत पणे सारखं जाऊन श्वास चालू आहे का पाहणं म्हणजे आपण असं गृहीतच धरलंय की ही व्यक्ती जाणार याचा फार त्रास व्हायचा.
8 Sep 2025 - 3:31 pm | कुमार१
अभिप्राय, प्रोत्साहन आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसंबंधीचे अनुभव मोकळेपणाने मांडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद !
हा शब्दप्रयोग भलताच आवडला आहे.
कोकणी ना ?
8 Sep 2025 - 5:04 pm | सुधीर कांदळकर
अनवट विषय हे अगदी खरे. हल्लीच कायप्पावर ढकलपत्रातून एक विचार आला होता. बालपण, किशोरावस्था, तारुण्य, गृहस्थ मध्यमवय, वृद्धावस्था हे जसे मानवी जीवनातील क्रमाने येणारे टप्पे आहेत तसाच मृत्यू हाही एक अपरिहार्य टप्पा मानून त्याला शक्य तेवढ्या धीराने सामोरे जावे.
अर्थात हे आचरणात आणणे तेवढे सोपे नसावे.
मी तर प्रायोपवेशन करणार. आपण लक्षणे दिली ते फार छान केलेत. त्यामुळे ते केव्हा सुरू करावे याचा थोडाफार अंदाज येईल. बहुधा हाताला गजरे बांधेन आणि स्वर्गात गेल्यावर रंभामेनकांवर उधळायला एक नोटांचे बंडल देखील ठेवणार असे म्हणतोय. रंभामेनकांच्या मागे गेलो तर तुम्हाला राग तर नाही येणार ना?
8 Sep 2025 - 8:15 pm | कुमार१
राग कसला? उलट बरेच वाटेल.
माणसाने इथे असले काय किंवा तिकडे असले काय, आनंदातच राहावे.
तुमच्या मागोमाग काही वर्षांनी मी पण तिकडे येईन तेव्हा तुमचाच वशिला लावेन म्हणतो !
8 Sep 2025 - 7:03 pm | Bhakti
निःशब्द!
न आवडता ,पण न टाळता येणारी घटिका.
8 Sep 2025 - 7:41 pm | श्वेता२४
मी माझ्या घरातील अनेक वृद्धांची घरात/ हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा सेवा केलेली आहे. परंतू आतापर्यंत कोणाचाही मृत्यू प्रत्यक्ष जवळून पाहिलेला नाही. खरंतर तशी इच्छाही नाही. परंतु ही माहिती सर्वांनाच असणे खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येक जण कधी ना कधी अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाणारा असतो. त्यामुळे तुमच्यासारख्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून ही लक्षणे माहीत असणे व त्याबाबत एक सामान्य माणसाने काय करावे याबाबत तुम्ही दिलेल्या सल्ला अतिशय उपयुक्त आहे.
8 Sep 2025 - 8:03 pm | तिता
Living Will बद्दल काही माहिती मिळेल का? नैसर्गिक मृत्यू शांतपणे आला तर चांगलेच पण जर असे नसेल तर इतरांना फार त्रास होतो. आणि आजारी माणसाला काही जाणीवच नसते. Living Will मुळे सर्वांचीच सुटका होईल.
8 Sep 2025 - 8:17 pm | कुमार१
भारतातील यासंबंधीच्या कायद्यांची माहिती देण्यासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मार्गदर्शक केंद्र अलीकडेच सुरू झालेले आहे.
त्यांच्या संस्थळावर सर्व माहिती मिळेल.
8 Sep 2025 - 8:18 pm | स्वधर्म
पण पटकन वाचण्याची छाती झाली नाही. आधी प्रतिसादच वाचले. असो.
वडीलांच्या मृत्यूची आठवण आली. रात्रभर ते बरळत होते व मी त्यांच्याच दवाखान्यातील खोलीत कधी जागा कधी झोपलेलो होतो. सकाळी जेंव्हा डॉ आले, तेंव्हा वडील बरेचसे शांत झाले होते. डॉक्टरांनी मला बाहेर थांबायला सांगितले व काही वेळा नंतर वडील गेले. रात्री ते नाकातील नळी काढ म्हणत होते पण मी तसे केले नाही कारण नंतर अन्न देता येणार नाही म्हणून सांगितले होते. मला कधी कधी वाटते की काढायला हवी होती नळी, म्हणजे त्यांना जाताना जरा आणखी बरे वाटले असते. राहून गेले मनात पण.
10 Sep 2025 - 12:03 pm | अनामिक सदस्य
दयामरणाचा कायदा का होत नाही? दुरूपयोग होऊ शकतो हे एवढे एकच कारण आहे का?
दुरूपयोग इतर अनेक कायद्यान्चा होत असतो.
10 Sep 2025 - 12:45 pm | कुमार१
या विषयावरील पूर्वीची चर्चा या स्वतंत्र लेखात वाचता येईल. सध्या जगभरातील 196 पैकी जेमतेम डझनभर देशांमध्ये ऍक्टिव्ह इच्छामरणाचा कायदा झालेला आहे. त्याचा अद्यतन सारांश असा आहे :
1. नेदरलँडस : जगात सर्वप्रथम कायदा मंजूर (एप्रिल 2002). आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी त्याचा वापर करून जीवन संपवले.
2. Ecuador : फेब्रुवारी 2024 मध्ये कायदा लागू
3. इटली : इथे डॉक्टरांना मृत्यूचे इंजेक्शन द्यायला परवानगी नाही; ते फक्त रुग्णाला मदत करू शकतात (assisted dying)
4. पेरू : फक्त एका व्यक्तीला न्यायालयीन आदेशाने परवानगी दिली गेली.
5. पोर्तुगाल : कायदा संसदेत मंजूर झाला आहे परंतु अजून काही तांत्रिक प्रक्रिया बाकी आहे.
6. इंग्लंड : विधेयक इंग्लंडच्या संसदेत 314वि. 291 मतांनी संमत करण्यात आले. आता यथावकाश त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
. .
भारतात अजूनही आपण पॅसिव्ह प्रकारासंबंधीच कायदा करण्याच्या टप्प्यावर आहोत. अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे येत असतात परंतु संसदेच्या पटलावर ऍक्टिव्हचा विषय यायला (?) किती वर्षे लागतील ते माहित नाही.
10 Sep 2025 - 12:16 pm | कंजूस
वैद्यकीय नजरेतून आणि भावनात्मकही.