रेकमेंडेशन लेटर
==========
पूर्वप्रसिद्धी - फेबु, ऑगस्ट २०२४
माझ्या आईवडीलांनी मला बरंच काही दिलं, पण त्यात काही गुण द्यायचे ते विसरले. ते जन्मत: मिळाले असते तर आतापर्यंतचे आयुष्य जास्त सोपं गेलं असतं...
हे गुण कोणते?
- कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा
हे तीन गुण तुमच्यामध्ये असतील तर नैतिक प्रश्नांचे त्रांगडं सोडविणे फारसे त्रासदायक होत नाही.
अनेक वर्षांपूर्वी माझ्या एका अत्यंत बुद्धीमान मित्रामुळे आलेला एक गमतीदार अनुभव आजही स्मृतीमध्ये ताजा आहे. तर झालं असं की हा माझा मित्र आय० आय० टी० मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक विजेता होता. शिक्षण संपल्यावर त्याने माझ्याबरोबर १ली नोकरी केली. या माझ्या मित्राकडे सिओइपीचा, त्याच्यासारखाच एक हुशार विज्ञार्थी (बोर्डात १ला आलेला) शेवटच्या वर्षाच्या पदवी-प्रकल्पासाठी येत असे. एक दिवस कळले की माझ्या मित्राने अचानक राजीनामा दिला. मी त्याला भेटून कारण विचारले. तेव्हा त्याने सांगितले की त्याला हवा असलेला मनासारखा जॉब मिळाल्यामुळे त्याने राजीनामा दिला. तो असं करणार असल्याची त्याने व्यवस्थापनाला अगोदरच कल्पना दिली होती. मग तो विषय तिथेच संपला.
एकदोन दिवसांनी माझा मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला -"चहा प्यायला चल. मला तुझ्याकडून जरा मदत हवी आहे".
मी हो म्हटले आणि आम्ही कँटीनच्या दिशेने निघालो.
मित्राने मग एकदम आढेवेढे न घेता विषयाला हात घातला-"हे बघ मला नव्या जॉबमध्ये लगेचच जॉईन व्हावे लागणार आहे. पण जाण्यापुर्वी माझ्याकडे प्रकल्प करणार्या या मुलाची मला व्यवस्था करून जायचे आहे. त्याला प्रकल्पासाठी जी तांत्रिक, शैक्षणिक मदत लागेल त्यासाठी मी विद्यापीठात एका प्राध्यापकांना विचारले आहे आणि त्यांनी ’हो’ म्हटले आहे. मी पण इमेलद्वारे त्याला हवं तेव्हा उपलब्ध असेनच. आपल्या संस्थेत त्याला जी काही "प्रशासकीय" मदत लागेल त्यासाठी कुणीतरी कागदावर को-गाईड होणे आवश्यक आहे. तू ही जबाबदारी घेऊ शकलास, तर एक मोठ्ठा प्रश्न सुटेल."
माझ्या गोल्डमेडॅलिस्ट मित्राने केवळ "प्रशासकीय" मदतीसाठी का होईना माझी निवड केल्याने मला व्हायच्या त्या गुदगुल्या झाल्याच (कारण नाही म्हटले तरी कागदावर मी एका बोर्डात १ला आलेल्या मुलाचा कोगाईड होणार होतो.) पण तरीही मी मित्राला बजावलेच, "बाबा रे, तुझ्या विषयातले मला ’ओ की ठो’ कळत नाही. तुझ्या विज्ञार्थ्याला उद्या विषयाशी संबंधित काहीही जरी अडचण निर्माण झाली तर मला सोडवता येणार नाहीच, पण फजिती होईल ती निराळीच."
माझ्या मित्राने मला ती वेळ येणार नाही असे सांगून परत एकदा गळ घातली, तेव्हा मी त्याला होकार दिला. एका गोल्डमेडॅलिस्ट मित्रामुळे मी एका बोर्डात १ला आलेल्या विज्ञार्थ्याचा कोगाईड बनलो आणि माझ्या अंगावर मूठ्भर मांस चढल्याचा मला भास झाला.
मग नंतर यथाकाल माझा मित्र नव्या नोकरीत रुजू झाला. त्याच्या हुशार विद्यार्थ्याचा प्र॒कल्प सुरळीतपणे चालू होता.
एक दिवस हा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला,
"सर, तुमच्याकडे एक काम होतं."
मला वाटलं काही परवनगीसाठी सही हवी असेल. पण त्याने सांगितले की त्याला एका मातब्बर अमेरीकन विद्यापीठाने (स्टॅनफर्ड) सन्मानवृत्तीसह एमेससाठी प्रवेश देऊ केला होता. पण एक तांत्रिक अडचण आली होती. त्याला एक शिफारस-पत्र त्याने पदवी-प्रकल्प जिथून केला आहे, त्या संस्थेच्या लेटर-हेडवरच हवे होते. माझ्या मित्राने नेमस्त केलेले विद्यापीठातील प्राध्यापकांकडून ते घेऊन उपयोग नव्हता. त्याने माझ्या मित्राला इमेलने अडचण कळवली होती पण विकांतामुळे माझा मित्र सोमवारीच ते मेल उघडू शकणार होता (नव्वदच्या दशकात इमेल काही मोजक्या ठिकाणी फक्त ऑफीसमध्ये जाऊन वाचावे लागे. व्हिएसएनल ची व्यापारी सेवा तेव्हा अगदीच नवी होती). मी कोगाईड असल्याने त्या मुलाला माझ्याकडून संस्थेच्या लेटरहेडवर एक शिफारस-पत्र हवे होते आणि ते तातडीने लगेच स्टॅनफर्ड विद्यापीठाला पाठवायचे होते.
बोर्डात आलेला १ला आलेला मुलगा, स्टॅनफर्ड सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात मिळालेला प्रवेश, माझ्या मित्राची, विद्यापीठातील प्रा० महाशयांची विकांतामुळे अनुपलब्धता, माझे त्या विषयातले अज्ञान आणि त्यामुळे "शिफारस-पत्र" काय लिहायचे हा प्रश्न माझ्या मनात झिम्मा खेळू लागला होता.
मी त्याला कसेबसे पटवून मला एक दिवसाचा वेळ मागून घेतला. मला कोणत्याही गोत्यात अडकायचे नसल्याने मला मित्राशी फोनवर एकदा तरी बोलायचे होते आणि जमलं तर शिफारस-पत्राचा मजकूर पण त्याच्याचकडून घ्यायचा असे मी यो्जले होते.
शिक्षणासाठी परदेशी जाणार्या विद्यार्थ्यांना शिफारस किती महत्त्वाचे असते, हे मी आय० आय० टी० मध्ये असताना जवळून पाहिले आहे. काही शिफारस पत्रे मला ’योगायोगाने’ वाचायला मिळाली, तर काही मित्रांची शिफारस-पत्रे मी त्यांना लीलया उघडून दिली होती. काही विकृत प्राध्यापक विद्यार्थी हुशार असला तरी "याला अजिबात प्रवेश देऊ नये", अशी नकारात्मक शिफारस करत असत. (माझेही असे अपरिमित नुकसान एक-दोन मास्तर्ड्यानी केलेले आहे). ते अगोदरच कळल्यामुळे माझ्या काही मित्रांना पर्यायी व्यवस्था वेळीच करता आल्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळता आले होते.
तात्पर्य शिफारस-पत्र हा परदेश-गमनेच्छुंसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज असतो. ते साधारणपणे कसे लिहीतात हे माहिती होते, पण विषयाशी संबंधित मी काहीच लिहू शकणार नव्हतो. मुख्य गोची तिथेच होती.
मी घरी आलो, संध्याकाळी जेवण झाल्यावर मित्राला एकदा फोनवर (मुंबईत) संपर्क साधायचा प्रयत्न केला पण तो उपलब्ध नव्हता. उद्या परत एकदा प्रयत्न करावा असा विचार करून टि०व्ही० बघत असताना दारावरची बेल वाजली. दार उघडले तेव्हा किंचित दचकलोच, काळोखात ५-६ व्यक्तींचा थवा एकदम येऊन थडकला होता.
दिवा लावला तेव्हा माझ्या मित्राचा हुषार विद्यार्थी आणि त्याचे आईवडील, आजी-आजोबा आणि भाऊ माझ्या दारात अवेळी दत्त म्हणून उभे होते...
गडबडूनच मी त्यांना "आत या’ म्हटले, आणि त्या मुलाने ओळख करून दिल्यावर आजीने बोलायला सुरुवात केली. नातू हुशार आहे, त्याला अशी-अशी ॲडमिशन मिळाली आहे आणि एक शिफारस-पत्र कमी पडत आहे, ते मी लगेच द्यावे अशी त्यांची कळकळीची विनंती होती...
मी त्यांना माझी अडचण (मला त्या विषयामधले काहीही कळत नसल्याचे) न संकोचता सांगितली, शिवाय असे शिफारस-पत्र देण्याने मी कदाचित गोत्यात येऊ शकलो असतो (किंवा मला आणले गेले असते), हे पण मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले.पण त्यांनी त्यांचे मुद्दे रेटून, मी काहीही करून शिफारस पत्र द्यावे, हा आग्रह चालूच ठेवला.
माझ्यापुढे यक्षप्रश्न असा की नैतिकता/तत्त्व/कातडीबचाऊ धोरण सर्वोच्च मानून स्पष्ट नकार द्यायचा की त्या हुशार मुलाचे भवितव्य लक्षात घेऊन वेळ निभावून न्यायची?
शेवटी परत एकदा सर्व नैतिक मुद्यांची जाणीव करून देऊन मी त्यांना "शिफारस-पत्र" द्यायचे कबूल केले आणि दुसर्या दिवशी त्याच्या भावाला दिले पण...
... नंतर पुढे काही काळाने मी जेव्हा मी त्या मुलाच्या भावाकडे काही कामासाठी संपर्क साधला तेव्हा त्याने मला थारा पण केला नाही. तो वेगळाच विषय आहे.
मुद्दा असा आहे की "कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा" अंगी बाणलेला असला की असे नैतिक प्रश्न सोडविणे फार त्रासदायक होत नाही.
माझ्या आईवडीलांनी मला "कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा" दिले नाहीत. नैतिक प्रश्न सोडवायला हे गुण फार उपयोगी पडतात".
प्रतिक्रिया
23 Jul 2025 - 11:28 am | अमर विश्वास
जेंव्हा एखाद्या विषयात गती नसताना कोगाईड व्हायला मान्यता दिलीत .. तेंव्हाच नैतिकतेचा विषय निकाली निघाला आहे ..
उगाच रेकमेंडेशनच्या वेळी नैतिकतेचा बाऊ कशाला ?
23 Jul 2025 - 11:35 am | युयुत्सु
कोगाईड प्रशासकीय मदतीसाठी व्हायचे ठरले होते. शिवाय माझ्या मर्यादांची स्पष्ट कल्पना मित्राला दिली होती.
23 Jul 2025 - 2:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
या आधी अनेक विषयात असाच अडकलो असल्याने कल्पना आहे. तस्मात xxx गाढवे गळ्यात घेउ नयेत या मतावर आलो आहे.