गंगाेत्त्रीच्या त्या बर्फाच्छादित प्रदेशात सूर्य अस्ताला जात होता. हिमालयाच्या शांत, पण भीषण वातावरणात मी विचारमग्न होऊन चालत होतो..घर सोडून 9 महिने होऊन गेले होते. आयुष्याच्या गुंत्यात गुरफटलेलो, अपराधी भावनेने पछाडलेलो. काहीतरी हरवले होते माझे पण शोधायचे कुठे ते कळत नव्हते त्याचा शोध घेत मी इथवर आलो होतो.
"कोणता शोध आहे तुझा?"
एक शांत, पण गूढ आवाज ऐकू आला. मी वर पाहिलं. समोर शुभ्र वस्त्रांमध्ये एक योगी उभा होते.. पांढर्या दाढीचे लाटा वाऱ्यासोबत हेलकावत होते. त्यांच्या डोळ्यांत खोल तलावासारखी शांती होती.
"माहिती नाही" विषण्णतेने उद्घागरलो..
काही हवाय का ?.....
तेही माहिती नाही ..
पैसा, कुटुंब ,माणसे सार काहीं आहे.. भौतिक दृष्ट्या सगळे आहे...पण माझ्या चुकांचा प्रायश्चित्त... आत्मशुद्धीचा शोध घेतोय मी,.
कधीकाळी चेतवलेल्या सूडभावनेतून तयार झालेले हे वैभव मला जाळते आहे.निसटलेला काळं मला वाकुल्या दाखवत आहे .
रोज स्वतःला पडलेला प्रश्न ? तुला खरंच हेच हवं होता का ?
योगी हसले. "चालत राहा. हा मार्ग सोपा नाही.
काहीतरी मिळवायचे असेल तर काही द्यावे लागेल.. सर्वकाही हवे असेल तर सर्वस्व पणाला लावावे लागेल."
हुंकार भरून मी विचार न करता त्यांच्या मागे चालू लागलो. रस्त्याला शेवट नव्हता. हिमाच्छादित पर्वतामधील पायवाटा, घनदाट झाडं, निळ्याशार आकाशाखाली अव्यक्त गूढता. किती वेळ गेला, मला उमजलंच नाही.
अचानक, समोर एक नितळ तलाव दिसला. इतका शांत की त्याच्या पाण्यात ढगही स्थिर भासले. सूर्याच्या शेवटच्या किरणांनी ते सोनेरी चमकत होते. त्या शांत पाण्याकडे पाहताच, माझ्या मनातली अशांतता उसळून वर आली.
"हा निर्वाणाचा तलाव आहे," योगी शांतपणे म्हणाले. "इथेच तू स्वतःला समर्पित करायचं ."
मी गोंधळलो. "म्हणजे?"
ते पुढे सरसावले. "सर्व काही त्याग कर. तुझं नाव, तुझं पाप, तुझं पुण्य, तुझी कहाणी... हे सर्व ज्या हातांनी घट्ट पकडलंय, ते मोकळे कर. फक्त रिकामे हातच पुन्हा भरले जाऊ शकतात."
मला काळजात काहीतरी हलवल्यासारखं वाटलं. स्वतःच्या नावाशिवाय मी कोण? माझ्या कहाणीशिवाय, कर्मांशिवाय, मी उरेल तरी काय? आणि त्याला अर्थ तो काय ?
पण मी विचार करायचा थांबवला. तलावाच्या काठावर गेलो. डोळे मिटले. एकेक करून अर्घ्य द्यावे तसे सर्व सोडून दिलं. माझे नाव, पूर्वज, त्याच्या आठवणी, माझे प्रेम अहंकार..माझे पाप पुण्य .. प्रत्येक भावना पाण्यात विलीन झाली.
क्षणभर मला काहीच जाणवलं नाही. जणू काही स्वतःला पुसून टाकलं.
पण नंतर... नंतर मला नव्याने काहीतरी उमगलं. एक विलक्षण हलकेपणा, मोकळेपणा. जणू माझा पुनर्जन्म झालं होतं.
मी आता मी नव्हतो. मी कोण होतो, ते ठाऊक नव्हतं. पण आता, पहिल्यांदाच मी स्वतःला पूर्ण जाणवत होतो.
ते माझ्याकडे बघून हसले,
मूर्ख आहेस तू, तुला जे आता वाटत आहे ते केवळ तुझ्या मनाचा खेळ आहे..पुन्हा भौतिकात गेलास की तू पुन्हा ओझे घेऊन येणार.. अजून तुझी वेळ आली नाहीये..परत जा..
पण हा नियम लक्षात ठेव, भरून घेण्यासाठी हात रिकामे लागतात..हा सृष्टीचा नियम आहे, विनाशानंतर निर्माण, मृत्यू नंतर जीवन.. हे सगळे याच नियमात बांधले गेले आहेत..
प्रतिक्रिया
25 Jan 2025 - 11:32 am | विजुभाऊ
जर पुन्हा तेच भरून घ्यायचे असेल तर मग हात रिकामे करायचेच कशाला?
गोष्ट छान वाटली. जडभरताची कथा अशीच काहीशी आहे
25 Jan 2025 - 1:35 pm | कर्नलतपस्वी
योगीराज यांनी दिलेले उत्तर बरोबरच वाटते.
ऋणानुबंध, पाप,पुण्य, चुका ,लागेबांधे शरीर व आत्म्याला इतके घट्ट पकडून बसलेले असतात की सहजा सहजी त्यांना दुर करणे अशक्य असते.
कुठल्याही अज्ञाताचा शोध घेण्यापेक्षा ज्ञात भोग भोगणे जास्त सोयिस्कर व सोपे असते..
25 Jan 2025 - 6:23 pm | Bhakti
सुंदर प्रतिसाद!मी सध्या गीतारहस्य वाचत आहे.त्यातही कर्म मीमांसा खुप केली आहे.विरक्तीपेक्षा गुंतून राहणे कर्मयोगीला आवश्यक आहे.
25 Jan 2025 - 2:21 pm | विजुभाऊ
कुठल्याही अज्ञाताचा शोध घेण्यापेक्षा ज्ञात भोग भोगणे जास्त सोयिस्कर व सोपे असते..
ज्ञात कर्म आणि त्याचे ज्ञात फळ यात आपण गुंतत जातो. आणि तेथेच रमतो. त्याला जीवन असे गोम्डस नाव देतो
25 Jan 2025 - 6:23 pm | Bhakti
बरोबर.छान सांगितले.
2 Mar 2025 - 11:42 am | कर्नलतपस्वी
One in hand and two on fence.
25 Jan 2025 - 4:53 pm | कर्नलतपस्वी
आत्मा,परमात्मा,प्रारब्ध, पुर्व संचित, द्वैत, अद्वैत इ. हे काही कळत नाही. पायरीवर घोटाळणारे.. चिंचेच्या झाडाखाली बसलेले पांथस्थ.
उजाडेल तेंव्हा उजाडेल, तोपर्यंत जगून घ्यायचं.
25 Jan 2025 - 6:41 pm | मुक्त विहारि
अगदी अगदी....
आमचा एक मित्र म्हणतो की,
उजाडेल तेंव्हा उजाडेल, तोपर्यंत बसून घ्यायचे...