काही आम्ही आणि एक म्हातारा.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
26 Apr 2024 - 5:01 pm

काही आम्ही आणि एक म्हातारा.
आजचा दिवस आमच्या गँगसाठी खास होता. कारण आमच्या गँगच्या एका मेंबराची म्हणजे पक्याची कसोटी होती.
पक्याने शाळेत असतानाच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. बोले तो शाळेच्या टीम मधून खेळायला सुरवात केली. तसं तर आम्हीपण क्रिकेट खेळत होतोच कि. पण पक्या म्हणजे राजहंस होता आणि आम्ही म्हणजे बदकं. आमची थेरी अफाट पण पक्या प्रॅक्टिकल. एकदा का क्रिकेटवर चर्चा सुरु झाली कि पहा सापळ्या तुम्हाला स्विंग बॉलिंगचे फ्लुइड मेकॅनिक डायग्रामसकट समजावून सांगणार. स्पिन बॉलिंग म्हणजे आम्हाला वाटायचे कि टप्पा खाल्यावर चेंडू इकडे वळतो नाहीतर तिकडे वळतो. पण च्यायलाने आम्हाला “बीटन इन द एअर” म्हणजे नेमके काय ते एक्सप्लेन केले. तर मसाला अरुने क्रिकेटच्या सगळ्या पोझिशन नकाशा काढून दाखवल्या. लॉंग काय शॉर्ट काय ते त्यानेच सांगावे.
तर असे हे हे एक्स्पर्ट.
पण पक्या क्रिकेटवर एक शब्द बोलत नसे. तो फक्त खेळायचा.
आमची बडबड सुरु झाली कि तो एकचित्ताने ऐकायचा. एकदा च्यायला, रवि शास्त्रीची पिसे काढत होता.
“च्यायला, तुम्हाला माहित आहे? विंडीजच्या कप्तानने टीम मीटिंग मध्ये काय सांगितले. म्हणाला च्यायला, जो कोण रवि शास्त्रीची विकेट काढेल, त्याचा कॅच पकडेल त्याला टीम मधून बाहेर करण्यात येईल. आपल्याला ही मॅच जिंकायची आहे ना? मग तुम्ही एव्हढेच करायचं, काय, शास्त्रीची विकेट नाही काढायची.”
आम्ही सगळे ख्या ख्या करून हसायचे पण पक्या कधी हसला नाही.
आता मला कळतय कि आमची क्रिकेट भंकस ऐकून पक्याला मनोमन काय वाटत असेल.
तरीही पक्या आम्हाला चिकटून असे.
तर असा हा पक्या शाळेतून कॉलेजमध्ये आला नि अलगद कॉलेजच्या टीममध्ये आला.
ह्या सीझनला पक्याचा खेळ चांगला झाला होता. बॅटिंग सरासरी सदतीसने त्याच्या नावावर २२२ रन नोंदल्या होत्या. शिवाय सहा विकेट. नॉट बॅड. नॉट अॅट ऑल बॅड!
म्हणून तर आज त्याच्यावर सगळ्यांच्या आशा होत्या. आजचा सामना होता चोरडिया कॉलेज विरुद्ध. आता पहा चोरडिया म्हणजे अब्यास वगैरे काही करायचा नाही. नुसतं खेळायचे. मला नेहमी प्रश्न पडायचा कि ह्या कॉलेजच्या मुलांचे आईबाप ह्यांच्या समोर इंजिनिअर व्हायचं स्वप्न ठेवत नाहीत का? गेला बाजार दाताचा डॉक्टर तरी.
“अरविंदराव, ह्या वर्षी क्रिकेट बंद. सिओइपीला प्रवेश पाहिजे ना?”
“बीजेमध्ये एकदा घूस...”
वर चोरडिया म्हणा किंवा सेंट विन्सेंट म्हणा किंवा सेंट ऑर्नेला म्हणा. कॅम्पातलं कॉलेज म्हटलं कि दडपण यायचं. आम्ही गावातली साधीभोळी मुलं. ते “या, यो, फक यू. यू ब्लडी बास्टर्ड” ऐकून धडकी भरायची. आमची मजल “च्यायला-मायला” पर्यंत. पण बास्टर्ड? हा शब्द प्रथम ऐकला तेव्हा डिक्शनरी उघडून बघितलं. लगेच बंद केली.
अशा चोरडिया कॉलेज बरोबर खेळायचं होत. पण आमच्या कडे पक्या होता. अकलकखान नावाचा फिरकी बॉलर होता. सदा नावाचा मिडीअम पेसर होता. स्विंगर? छ्या. काहीच्या काही. त्यावेळी स्विंग जगात फक्त इंग्लंडमध्ये व्हायचा. ते देखील आकाश ढगाळ असेल तर. हवा पण “हेवी” पाहिजे. ते काहीही असो. कॉलेज लेवलला बॉल स्विंग होत नसे.
सामना हिराबागेच्या मैदानावर होता. तेव्हढीच एक जमेची बाजू. म्हणजे मैदान आम्हाला सोयीचे होते. आमच्या कॉलेजची झाडून सारी पोरं हजर. मराठी नवकविता शिकवणारे सशी सर पण आले होते. सशी सर ज्या प्रेमाने विंदा वा मंगेश पाडगावकर शिकवायचे तितक्याच प्रेमाने क्रिकेटवर बोलायचे. सापळ्या म्हणायचा, “त्यात नवल ते काय? तुम्हाला केंब्रिजचा गणिती हार्डी ऐकून तरी माहित असेल कि. अरे तोच तो ज्याने रामानुजमला केंब्रिजला आणले तो. एवढा मोठा गणिती तो पण क्रिकेटच्या प्रेमात पडला.”
टॉस जिंकला तर काय घ्यावे यावर आमच्यात घमासान झाले. कुणी म्हणे बॅटिंग घ्या कुणी म्हणे फिल्डिंग घ्या. आता त्या दिवशी नेमके काय झाले टॉस कुणी जिंकला. मला नीटसे आठवत नाही. पण चोरडिया प्रथम बॅटिंगला उतरले. त्यांचे बर्वे आणि चव्हाण ओपनर होते. सदाच्या पहिल्या ओवरच्या चौथ्या बॉलला बर्वेची दांडी वाकली. बरं झाल बरव्या आउट झाला तो. कशाला गेला क्यांपाच्या कॉलेजात? गद्दार साला. नाव सांगतो बर्वे आणि खेळतो क्यांपाच्या कॉलेजकडून. चव्हाण पण चार ओवर नंतर आउट झाला. आमच्या गँगला जोर चढला. मसाला अरु हातात कागद घेऊन मैदानात उतरला आणि त्याने “रोल कॉल” सुरु केला.
“बर्वे?”
आम्ही ओरडायचो, “येस्स सार!”
“चव्हाण?”
“येस्स सार!”
“कानेटकर?”
“येस्स सार!”
“डायस?”
“येस्स सार!”
अशी अकरा प्लेयर्सची हजेरी लागायची.
पण त्यांच्या चौथ्या आणि पाचव्या जोडीनं बाजू लावून धरली. स्कोर ११० पर्यंत खेचला.
विकेट मिळता मिळेना. मसाला अरुला आठवण झाली, म्हणाला, “आता म्हसोबा करायला पाहिजे.”
एक मोठा दगड आणला गेला, बुचाची उदंड फुले होती. ती जमा करून आणली गेली. ती फुले वाहून म्हसोबा सजवला गेला.
“देवा, फार किरकिर होतेय. आउट कर त्याला.” आम्ही हात जोडून प्रार्थना केली. आणि मग विकेट मागून विकेट पडत गेल्या. म्हसोबाची कृपा.
चोरडियाची इनिंग म्हसोबाने १३१ धावात गुंडाळली.
आमच्या डावाची सुरवातही खराब झाली. आता पक्या खेळण्यासाठी ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला. आम्ही सर्वांनी त्याची पाठ थोपटून त्याला आश्वस्त केले. म्हणालो, “यू कॅन डू इट.”
पक्या काही बोलला नाही. आम्ही दगडी म्हसोबाची प्रार्थना केली. फुलं दिली.
अर्थात पक्याने खेळ सावरला. आम्ही थोडे रीलाक्स झालो.
इतक्यात मसाला अरु मला म्हणतो कसा, “केशव, तू बघितलास का तो म्हातारा. तो तिकडच्या बाउंडरी पाशी उभा आहे तो?” मी बघितले तर खरोखर तिथे एक कार्टून उड्या मारत होते. पक्याच्या प्रत्येक शॉटवर तो रीअक्ट करत होता. कधी कपाळावर हात मारून घ्यायचा तर कधी स्वतःचे केस ओढायचा. एकदा पक्याने हूक केला. तो फसला. थोडक्यात पक्या वाचला. लकी. पण इकडे म्हाताऱ्याची सटकली. त्याने खोटी खोटी बॅट हातात धरून हूक कसा करायचा त्याचा डेमो दिला.
“आयला खरच रे. म्हातारा सटकला आहे.”
क्रिकेट इन्सानको क्या बना देता है.
सगळे खो खो हसले. म्हणाले म्हातारा जोकर आहे.
सामना संपला. पक्याने एकट्याने सामना खेचून आणला होता. ग्रेट! आमच्या कॉलेजचा विजय झाला होता.
पक्याला घेऊन आम्ही स्टेडिअमच्या बाहेर पडलो. जवळपासच्या उडप्याच्या हॉटेलात जाऊन सामोसा आणि कोका कोला प्यायचा बेत होता.
“पक्या बिल तू भरणार आहेस.” पक्या फक्त हसला. आम्ही हसत खेळत चाललो होतो. समोरच्या पार्किंग लॉट मध्ये एका गाडीला टेकून तोच म्हातारा उभा होता. आमच्या कडेच खुन्नसमध्ये बघत होता. आम्ही थोडे टरकलो. आता हा काय करतो.
“चला रे पोरांनो, बसा आत.” त्याने ऑर्डर दिली.
त्याच्या एकंदर गेट अप, जबरी आवाजावरून वाटलं कि हा डिपार्टमेंटचा माणूस असणार. आम्ही काचकूच करायला लागलो. एकदा वाटलं Gला ३.१४ लावून पळावं. मन्या उसन्या अवसानाने बोलायला लागला. पण तोंडून शब्द कसे बसे निघाले. “पण आम्ही काय बी नाय केलं साहेब काही चुकलं असेल तर माफ करा.”
“चूप, मुकाट्याने आत बसा.”
“कुठं घेऊन चाललाय आम्हाला?”
म्हातारा खुनशी हसला, “आता कळेल.”
गाडी स्वार गेट कडून हडपसर रोडवरून गोळीबार मैदानावरून मिलिटरी अकौंटंच्या ऑफिसकडून आत आली. पुण्याच्या कधीही न बघितलेल्या भागातून आम्ही जात होतो.
शेवटी एका पॉश हॉटेलासमोर थांबली.
“उतरा.” त्याने हुकुम केला. ठीक आहे. निदान ही पोलीस चौकी तरी नव्हती.
“चला.”
एका मोठ्या टेबलापाशी आम्ही आलो.
“बसा.”
वेटर आला. त्याने आमच्या प्रत्येकासमोर एक एक मेनू कार्ड टाकले.
“तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डर करा. तवर मी एक फोन करून येतो.”
चहा प्यायचा पण मूड नव्हता. ऑर्डर काय करणार.
म्हातारा दूर कौंटरपाशी होता. तरी मी आवाज कमी करून विचारले, “कोण आहे हा म्हातारा. चान्स आहे तेव्हड्यात पळून जाउया.”
“अरे पण आपल्याला घराचा रस्तापण माहित नाही, खिशात पैसे नाहीत.” सापळ्या अगदी रडक्या आवाजात बोलला.
“अरे विचारत जाऊ, पायी पायी जाऊ.”
“ते तुझं म्हणणं ठीक आहे रे. पण इथं कुणी सदाशिव पेठेचं नाव पण ऐकले असेल कि नाही, कोण जाणे? काय विचारायचं? मुंजाबाचा बोळ कुठे आहे म्हणून कि पत्र्या मारुतीला जायचा रस्ता कुठला?”
पक्या नेहमी प्रमाणे चूप बसून ऐकत होता. “पक्या, बोल काही तरी. काहीतरी आयडीया दे.”
“तुम्हाला आयडीया पाहिजे? ही घ्या. घाबरायचे काम नाही. खाओ, पिओ. मजा करो.”
“आणि तो म्हातारा आपली किडनी काढून विकेल, मग एका किडणीवर आयुष्य काढा. असच ना?”
“घाबरू नका. तो म्हातारा म्हणजे माझे आदरणीय पिताश्री आहेत.” पक्याने अशी एक सिक्स मारली. आमच्या सगळ्यांच्या डोक्यावरून. स्टेडीअम वरून टिळक रोडवर.
पक्याचे बाबा फोन करून परत आले.
“अरे तुम्ही लोकांनी ऑर्डर नाही केली?”
मी पाण्याचा घोट घेऊन कसाबसा बोललो, “सॉरी शक्तिमान.”
“सॉरी शक्तिमान? म्हणजे काय? प्रकाश, हा असा का बोलतोय?”
“बाबा तुम्ही लक्ष देऊ नका. शक्तिमान बघून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तो जो भेटेल त्या प्रत्येकाला “सॉरी शक्तिमान.” असं म्हणत असतो.”
(झाला एवढा इज्जतका फालुदा पुरा नाही का.)

कथा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

26 Apr 2024 - 10:20 pm | कंजूस

ख्या ख्या ख्या.

हसा. आता सगळे हसाल. आमची काय हालत झाली होती ते आम्हालाच ठावे.

अहिरावण's picture

27 Apr 2024 - 1:47 pm | अहिरावण

एक नंबर !!!

च्यायला त्यावेळेस गोट्या कपा़ळात जाणे म्हणजे काय याचा "एक अनुभव" तुम्हाला मिळाला असणार्‍ !!

तुम्ही हसत नाही? हसा हसा.

नठ्यारा's picture

27 Apr 2024 - 7:54 pm | नठ्यारा

भागो,

किस्सा छान रंग(व)लाय. मला वाटलं की पक्याने सामना जिंकवून दिल्यावर म्हातारा गायब होईल. आणि पक्या सांगेल की त्या म्हाताऱ्याने मार्गदर्शन केल्यानुसार खेळलो म्हणून जिंकलो. सगळी म्हसोबाची कृपा असेल.

-नाठाळ नठ्या

भागो's picture

27 Apr 2024 - 8:03 pm | भागो

नाठाळ नठ्या
ह्या कथेतील प्रसंग. काही खरे काही कपोल कल्पित.
आहा. ते शाळा कॉलेजचे मंतरलेले दिवस. फुटबॉल आणि क्रिकेटचे सामने. गाव आणि कँपची रायव्हरली. बीइंग नोस्टाल्जिक नाऊ. खरच गेले ते दिन गेले. वाटतं टाईममशीन असतं तर कित्ती मज्जा आली असती. ती इंजीनियरिंग वर्सेस वाडिया मॅच जाऊन पुन्हा बघितली असती ना.
पेठेतले मध्यम वर्गीय आणि कँपमधले दांडगे. कुठे ती पुण्यातली कॉलेजेस आणि कुठे सध्याची. खाली किराणा भूसारची दुकाने, वर ऑफिसेस आणि त्याच्या वरच्या मजल्यावर शाळा. ग्राउंड नाही लायब्ररी नाही, कुठून तरी धरून आणलेले गुर्जी. कस होणार?