मला जादूचा डब्बा मिळाला.आणि डाळींना मोड आणणे हा कंटाळवाणा कार्यक्रम आनंददायी झाला.खाकराचे जे पसरट गोल डब्बे मिळतात ते वापरून मूग आणि मेथी दाणे याला मस्त मोड आले.भिजलेले दाणे टाकून दर रात्री पाण्याचा थोडा शिपका त्यावर मारायचा.तिसर्या दिवशी डब्याला खुलजा सिम सिम केलं की छान छान मोड दिसतात.
१.वाटीभर मेथ्या रात्रभर भिजवल्या.
२.दुसर्या दिवशी एका किंचित हवा जाऊ शकेल अशा पसरट डब्यात त्या मोड यायला पसरून ठेवल्या.
३.तीन दिवसांनी मेथ्यांना छान मोड आले होते.
४.भाजी नेहमीप्रमाणे फोडणी देत बारीक चिरलेला कांदा टोमॅटो परतून त्यात हे मोड आलेले मेथी दाणे परतून वाफवून घेतले.
याची रस्सा भाजीही करू शकता.
दरवेळी त्याच त्याच चवीपेक्षा वेगळया चवीची भाजी मस्त लागते.चव खरच अप्रतिम आहे किंचीत कडू अगदी नाममात्र.मोड आलेल्या मेथी दाण्यांचे इतर पदार्थ -
१.मोड आलेल्या मेथी दाण्यांचे लोणचे
२. मोड आलेल्या मेथी दाण्यांचे भात/खिचडी
बाकी मेन्यू..
फ्लॉवर भाजी, मोड आलेल्या मेथी दाणेची भाजी, घरचं लिंबाचे लोणचे,भात तुरीचे वरण,अर्धी पोळी.वरण अळणी आहे.भातही अळणी आहे.वरण भात खातांना मीठ न घालता कमी मिठातल्या भाज्या एकत्र करून खाल्ला.
प्रतिक्रिया
22 Apr 2024 - 12:40 pm | कंजूस
खादाडीचे एपीसेंटर पुण्याकडून संभाजीनगरला सरकले आहे.
22 Apr 2024 - 12:42 pm | Bhakti
हा हा!
आम्ही अहिल्यानगरचे ;)
22 Apr 2024 - 12:44 pm | Bhakti
आताच एका दुसऱ्या ग्रुप वर सूचना मिळाली की लसणाची फोडणी यावर छान लागते.लसूण + लाल मिरची फोडणी द्यायची.
22 Apr 2024 - 2:12 pm | कर्नलतपस्वी
राहातो का?
बाकी प्रेझेंटेशन मस्त.
22 Apr 2024 - 4:46 pm | Bhakti
नाही.केवळ १०-१५% कडवटपणा असतो.तो सहजपणे सहन केला जाऊ शकतो.
23 Apr 2024 - 12:32 pm | निनाद
फारच सुंदर. करून पहायल पाहिजे हे.
23 Apr 2024 - 2:37 pm | अहिरावण
क्या बात है !!
23 Apr 2024 - 5:24 pm | विवेकपटाईत
आवडली
24 Apr 2024 - 8:55 pm | चौथा कोनाडा
व्वा ... भारीमस्त ... करुन खायला हवी !
या वरून आठवलं , गुजराती की राजस्थानी अशी मेथी + पापडाची भाजी खाल्ली होती .. टेस लै भारी हुती..
कुणाकडे रेसिपीक्रिया असेल तर मिळेल का ?
29 Apr 2024 - 12:31 pm | नगरी
पाहू करून
20 May 2024 - 8:06 pm | सविता००१
मेथीदाण्यांची उसळ मी अशी करते- मोड आलेले मेथीदाणे किंचित जास्त तेल आणि जास्त हिंग घातलेल्या फोडणीत घालायचे. किंचित परतून त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, आवडीनुसार थोडा गूळ घालून अंगासरसा रस होइल इतकं पाणी घालून मेथी नीत शिजवून घ्यायची आणि मग भरपूर ओला नारळ आणि कोथिंबीर घालायची. हिची चव इतकी छान येते की पोळी, भात हे काही नसलं तरि वातीत घेउन खाउ शकतो आपण. तुमचीही पाककृती छान आहे. आता तशी करुन बघेन