भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग ४

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
1 Apr 2024 - 3:11 pm

भाग ३ येथे वाचा

काल रात्री आम्ही सावित्री नदी पार करून हरिहरेश्वरास आलो होतो. सावित्री नदीच्या दक्षिण तीरावर जेथून फेरीबोट सुटते तेथे वेश्वी गाव आहे आणि येथेच रत्नागिरी जिल्ह्याची हद्दही संपली. नदीच्या उत्तर तीरावरील बागमांडला येथे पोहचताच आमचा आता रायगड जिल्ह्यात प्रवेश झाला होता.
आज सहलीस निमित्त ठरलेला दिवस म्हणजेच 'महिला दिन' उगवला. ध्यानी मनी नसतांना आज महाशिवरात्रीच्या शुभ दिनी आम्ही दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरास येऊन पोहचलो होतो. मंदिरात प्रचंड गर्दी असणार होती. दर्शन घ्यायचे तर लवकर निघणे भाग होते त्यामुळे पटापट सर्व आवरून सकाळी सातलाच चेक आऊट करण्यासाठी MTDC च्या कार्यालयात आलो. काल येथे येणारे शेवटचे पर्यटक आम्ही होतो आणि आज येथून बाहेर पडणारे पहिले पर्यटकही आम्हीच.

महिला दिनानिमित्त पर्यटन मंडळाने महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याचे ठरविले होते. पण इतक्या लवकर पुष्पगुच्छ आणल्या गेलेले नव्हते. त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी म्हणून बागेतीलच काही फुले देऊन आमचा सत्कार केला गेला.

हरिहरेश्वराचे मंदिर जवळच होते. एका घराच्या खाजगी पार्किंग मध्ये ५०/- रुपये प्रति गाडी देऊन गाड्या उभ्या केल्या आणि मंदिरात पोहचलो.

श्रीहरिहरेश्वर आणि श्री काळभैरव अशी बाजूबाजूला असलेली दोन मंदिरे दिसतात.
श्री काळभैरव मंदिर
कालभैरवाच्या पूजनाने पीडा नष्ट होतात अशी भाविकांमध्ये श्रद्धा असते. आधी कालभिरावाचे दर्शन घेऊन नंतर श्रीहरिहरेश्वराचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे.

श्रीहरिहरेश्वर मंदिर.
लवकर पोहचल्याने रांगही लावावी लागली नाही. प्रवेश करताच सभागृह असून त्यानंतर गाभाऱ्यात जाण्यासाठी काही पायऱ्या उतराव्या लागतात.

मंदिराच्या बाहेर सजवलेली पालखी आणून ठेवल्या गेली. संध्याकाळी गावातून मिरवणूक काढून परत मंदिरात येणार होती.

मंदिर डोंगरकड्याला लागून असल्याने प्रदक्षिणा घालायची झाल्यास संपूर्ण डोंगराला वळसा घालून यावे लागते. डोंगरावर चढण्या उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत.

चढतांना उजव्या बाजूस समुद्र किनारा दिसतो.

डोंगर चढून गेल्यावर एका अरुंद घळीतून पायऱ्या उतरत जातात.पायऱ्यांची उंची जास्त असल्याने थोडी दमछाक होते पण पायऱ्या उतरून आल्यावर आपण समुद्र पातळीशी येतो.

येथे उजव्या बाजूस रुंद असा कातळात प्रदक्षिणा मार्ग तयार झलेला आहे.

सततच्या लाटा कातळावर आपटून त्यावर सुंदर नक्षी तयार झाली आहे. याला 'हनिकोंब वेदरिंग' म्हणतात असे वाचले आहे.

आम्ही पायऱ्या उतरलो तेव्हा नुकतीच भरतीला सुरुवात झालेली होती. पूर्ण भरतीच्या वेळी हा भाग पाण्याखाली जातो त्यामुळे प्रदक्षिणा शक्य होत नाही. आम्हालाही पाणी वाढायच्या आत प्रदक्षिणा पूर्ण करावी लागणार होती.

लाटांमुळे कड्याच्या कातळात गुफाही तयार झाल्या आहेत. अशाच एका गुफेत काही शिल्प दिसली.

या मार्गाचे अंतर साधारण एक कोस असल्याने यास कोसाची परिक्रमा असेही म्हणतात. परिक्रमा जेथे पूर्ण होते तेथून दिसणारा सागर किनारा

आता बस भरभरून भाविक हरिहरेश्वरास दाखल व्हायला सुरुवात झाली होती. माणसांचे अनेक घोळके मंदिराच्या दिशेने सरकत होते. आज लवकर निघाल्याने गर्दीचा दिवस असूनही कुठलीही धक्काबुक्की न होता देवदर्शन आणि समुद्राला भरती नसल्याने कोसाची परिक्रमाही पूर्ण झाली होती. एका ठिकाणी थांबून मिसळपावचा नाश्ता केला आणि श्रीवर्धनकडे निघालो. श्रीवर्धनचा समुद्रकिनारा सुंदर असला तरी पूर्वी पाहिलेला होता तसेच वेळही कमी असल्याने तिकडे जाण्याचे टाळले. त्याऐवजी पेशवे स्मारक मंदिर पाहण्याचे ठरले.

श्रीवर्धन हे पेशव्यांचे मुळगांव. ते येथील देशमुख होते. हबशांची गैरमर्जी होऊन त्यांना श्रीवर्धन सोडावे लागले. पुढे त्यांना पुण्याची सरसुभेदार मिळाली व नंतर काही काळाने पेशवेपद.
मूळ वास्तूच्या चबुतऱ्यावर उभारलेली नवीन वास्तू , त्यासमोरील पिशव्यांचा पूर्णाकृती पुतळा व प्रांगण असे या स्मारक/मंदिराचे स्वरूप आहे. सध्या याची मालकी श्रीवर्धन नागरपालिकडे आहे असे येथे घेतलेल्या फोटोतून स्पष्ट होते, स्मारकाची दुरावस्था असून कोणीही कर्मचारी येथे दिसला नाही.

एका खिडकीतून वास्तूचा आतील फोटो घेतला.

एका फळ्यावर खालील माहिती लिहिलेली दिसली.
बाळाजी विश्वनाथ भट (निधन-३ एप्रील १७२०) यांच्या श्रीवर्धन येथील मूळ वास्तूच्या चबुत्यावर उभारलेले पेशवे स्मारक मंदीर [मालकी- श्रीवधन नगरपालिका]
(बाहेर पुतळ्यावर मृत्यूची तारीख २ एप्रील १७२० अशी आहे ती बरोबर असावी.)

दुसऱ्या फळ्यावरची माहिती
बाळाजी विश्वनाथ पेशव्याची कामगिरी
पुणे प्रांताची सरसुभेदारी सेनापती धनाजी जाधव त्याच्या हाताखाली लढून सिहगडाचे रक्षण.
कान्होजी आंग्रे आणि शाहूराजे यांच्यात मैत्रीचा तह घडवून आणला.
पंधरा हजार मराठा स्वार घेवून दिल्लीस प्रस्थान.
मुघल पातशहा आणि कारभारी यांच्यात्री बोलणी करून मराठ्यासाठी स्वराज्याचे आणि चौथाईसरदेशमुरती वसुलीचे हक्क मिळविले. तसेच पातशहाच्या कैदेतील संभाजीची राणी येसूबाई हिची सुटका करून तिला साताऱ्यास आणले.

फोटोत येथे मार्शल आर्टचे खाजगी वर्ग चालवले जात असावे असेही दिसते.
काल मालगुंड येथे पाहिलेले केशवसुत यांचे सुंदर स्मारक आणि आज पाहिलेले पेशव्यांचे स्मारक यात केव्हडा फरक. मालकी नगरपालिकेकडे असल्याने दुरावस्थेमागे नगरपालिकेची अनास्था जाणवते.

थोडावेळ येथे थांबून दिवेआगारास जाण्यासाठी निघालो. प्रथम भेट दिली सुवर्ण गणेश मंदिरास. मंदिराच्या समोरच पार्किंगची व्यवस्था आहे. येथे पूर्वी एक छोटंसं मंदिर होतं.
आताचे मंदिर

मंदिरातील श्री सुवर्ण गणेश मुखवट्याबद्दल वरील फोटोतून मिळालेली माहिती.
दिनांक १७ नोव्हेंबर १९९७ रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी मौजे दिवेआगर, ता. श्रीवर्धन येथे श्रीम. द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत बागकाम करीत असताना आढळलेला सुवर्णगणेश मुखवटा दिवेआगर येथील श्री सुवर्ण गणेश मंदिरात ठेवण्यात आला. दिनांक २४ मार्च २०१२ रोजी मंदिरात दरोडा पडून सुवर्ण गणेश मुखवट्याची चोरी झाली. संबंधित गुन्हेगारांना पकडून त्यांचेकडून सदर गणेश मुखवटा हा सोन्याची लगड व गोळे या स्वरूपात जप्त करण्यात आला. मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी दिलेल्या आदेशान्वये प्राप्त झालेल्या सोन्यापासून पुनर्घडणावळ करून तयार केलेल्या श्री गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मा. ना. श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा मंत्री, वित्त व नियोजन महाराष्ट्र राज्य आणि मा. सौ. सुनेत्राताई पवार, अध्यक्षा, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

नंतर येथून जवळच असलेल्या रुपनारायणाच्या मंदिरास भेट दिली.
श्री रुपनारायण मंदिर.
मूर्ती आयुधक्रमानुसार (पद्म,शंख,चक्र,गदा) केशवविष्णूची/लक्ष्मीकेशवाची असल्याचे वाचनात आले आहे.
 .

वरील फोटोतील माहिती
मूर्तीचे दशावतार रुप

१) पहिला पहिला अवतार
मूर्तीच्या उजव्या हातास वर मत्स्य अवतार (मासा) हा प्राण्यातील पहिला अवतार
२) दुसरा अवतार
थोडी उत्क्रांती डाव्या हाताचा कुर्म (कासव) हा जमीन व पाणी 'दोन्हीकडे फिरणारा.
३) तिसरा अवतार
कूर्म नंतर आणखी प्रगती उजवीकडे वराह (डुक्कर) अलीढासनामध्ये पृथ्वी हातावर उचलून धरली आहे.
४) चौथा अवतार
चतुस्पाद व माणूस यांच्यामधला नृसिंह यामध्ये एका हाताने हिरण्यक्तेश्यपुची (प्रल्हादाचे वडील) शेंडी पकडली असून दुसऱ्या हाताने त्याला तांडला आहे. पायाने त्याच्या शरीराभोवती विळखा घातला आहे. बहुतेक ठिकाणी नृसिंह हिरण्यकश्यपुचे पोट फाडताना दाखवितात, येथे उजवीकडे आत, भक्त प्रल्हाद कमळ घेऊन बसला आहे. त्याला कोणी बलराम असे संबोधितात.
५) पाचवा अवतार
उजव्या बाजूस शरीर मध्यावर, बटू वामन हातात छत्री घेऊन उभा आहे. या अवतारात विष्णूने बलीचा नाश केला
६) सहावा अवतार
डाव्या बाजूस खाली हा परशुरामाचा अवतार आहे. परशुरामाने २१ वेळा जुल्मिक क्षेत्रियांचा नाश केला. पण रामासारखा न्यायी क्षत्रिय राजा भेटल्यामूळे त्याच्यापुढे परशु ठेऊन परशुराम तपश्चर्येसाठी निघून गेला.
७) सातवा अवतार
राम, तो उजव्या बाजूस खाली आहे. त्याचे खांद्यावर धनुष्य व हाती बाण आहे. त्याचे बाजूला लक्ष्मी आहे व ती नृत्याच्या अविष्कारात उभी आहे. तीची केशरचना विशेष आहे.
८) आठवा अवतार
कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण उजवीकडे खांद्याजवळ आहे.
९) नववा अवतार
गौतम बुध्द डाव्या बाजूस खांद्याच्या रेषेत आहे.
१०) दहावा अवतार
कलकीचा डाव्या बाजूस तळाला पायाजवळ घोड्यावर बसलेला आहे. हा अवतार कलियुगाच्या शेवटी होणार आहे. त्याचा मानैवरील भाग (मुंडके) दाखविलेले नाही.

मूर्तीची सौंदर्य स्थळे
मूर्तीच्या कानात मकर कुंडले, कमलनयन नेत्र, नासिकाग्र नजर, गळ्यात भौतुके (मोत्याच्या) माळा, यज्ञोपवित, कमरेला कलमचुणीदार वस्त्रावर, कमरपट्टा, मनगटात सुवर्णकडी, गळ्यात पोची हा दागिना सैलसर असल्यामुळे खाली झुकला आहे, गंडामध्ये बाजुबंध, हातातील सर्व बोटांत अंगठ्या, कमरेला अनेक सुवर्ण मोतीं अलंकारामुळे कमेरेला शोभा आली आहे. कमर, मध्यावरून खाली लोंबणारा भौतिक घोस अप्रतिम आहे. हातातील गर्दा सहज़ धरली आहे. बोटे मोकळी आहेत. बोटावरील नखेही हुबेहुब दिसतात. पायातील पैंजणे शोभा वाढवितात. हिरवट काळ्या पाषाणांतील गुळगुळीत प्रमाणबंध लावण्यखणी असे हे अलंकृत शिल्पकाव्य त्या काळीही शिल्पकला एवढ्या उंचीवर पोहचली होती, याची कल्पना देते, गंडभेऊंड आहे हत्ती हे वैभवाचे प्रतिक आहे. सिंह हे पराक्रमाचे प्रतिक आहे. येथे वैभवापेक्षा पराक्रम श्रेष्ठ दाखविला आहे. म्हणून हत्तीच्या गंडस्थळावर सिंहाने आपले पंजे उभारले आहेत.

हातातील आयुधांचा क्रम जसा बदलतो, तशी विष्णूची २४ रुपे होतात. हे आहे केशवाचे ध्यान आणि सुंदरनारायण हे हरीचे ध्यान आहे.

या मूर्तीला रुपनारायण का म्हणतात मूर्तीचे अप्रतिम रुप शिवाय या मूर्तीवर विष्णूचे १० अवतार कोरले आहेत म्हणून हा रुपनारायण आहे. मस्तकावर कमलपुष्प करंडक मुकुट त्यावरील कौस्तुभ चिन्ह व व्याघ्रमुख ही मूर्ती दक्षिणभारतीय शैलीचे असल्याचे द्योतक आहे. अलंकृत कायबंधन व किर्तीमुख कमरपट्ट्यावर आहे. करंडक मुकुटातून केशसंभार बाहेर डोकावत आहे.

संकलन :
को. गणेश नारायण बापट
पावंत विश्वनाथ आवळमकर
मु. दिवेआगर, ता. श्रीवर्धन, जि. रायगडश्री रुपनारायण मंदिर

खालील फोटोत मूर्तीचा पूर्व इतिहास सांगितला आहे

मूर्तीचा पूर्व इतिहास
इ.स. ८०० ते १२६५ या कालावधीत या प्रदेशावर शिलाहरांच्या उत्तर कोकण शाखेचे अधिपत्य होते. ही रुपनारायणाची मुर्ती मधुमला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरली आहे. मुर्तीचे नाक, हात व चक्र हे भंगलेले असून त्या संदर्भात कथा सांगतात कि, फिरंग्यांनी (बहुधा पोर्तुगीज) ही मूर्ती पळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील भक्तांनी त्यांना अटकाव केला. हा विरोध त्यांनी मोडून काढत ही मूर्ती जहाजावर चढविली पण भर समुद्रात जहाज भरकटल्याने ही मूर्ती मुळपदावर स्थापन करण्यात आली. दिवेआगर गावाला प्राचीन इतिहास आहे. येथे दीड हजार वर्षांपूर्वीचे म्हणजे पाचव्या शतका पासूनचे तांब्रपट मिळाले आहे. शिलाहारनृपति मुम्मुणिराज यांच्या तांब्रपटात दिपकगर, तर मराठीतील सर्वात प्राचीन तांब्रपटात (शके ९८२ शार्वरी संवत्सर मार्गशीर्ष पौर्णिमा शुक्रवार १० नोव्हेंबर १०६०) दिव असा दिवआगरचा उल्लेख येतो. मुसलमान अमलाखाली अरबचाचे व पोर्तुगीजांच्या वारंवार हल्ल्यामुळे गांव उध्वस्त झाले.

स्वरुपनारायण मंदिर आणि पुष्करणी

मंदिराच्या मागे जवळच दिवे आगारचा निसर्गसुंदर समुद्र किनारा आहे. किनाऱ्यावर शुभ्र वाळूची मुलायम पुळणआहे तर किनाऱ्याने केवडा, सुरूचे वन तसेच मंदिर परिसराच्या आजूबाजूस माडा पोफळीच्या बागा आहेत.

येथे पर्यटकांसाठी खेळाच्या सुविधाही बऱ्याच प्रमाणात दिसतात.

महाराष्ट्र पर्यटन मंडळाने जाहीर केलेली महिला दिनाची सवलत एक निमित्त ठरून चार दिवसाची मस्त कोकण सहल अनुभवायला मिळाली. पर्यटन मंडळ व सहलीत भाग घेऊन उत्साहात सहल पार पडणाऱ्या सर्वांचे आभार.

लेखमाला समाप्त.

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

1 Apr 2024 - 3:13 pm | गोरगावलेकर

या लेख मालिकेचे सर्व भाग भटकंती विभागात हलवावे ही नम्र विनंती

गोरगावलेकर's picture

7 Apr 2024 - 4:39 pm | गोरगावलेकर

कृपया लेखाचे चारही भाग भटकंती विभागात हलवावे

कर्नलतपस्वी's picture

1 Apr 2024 - 5:49 pm | कर्नलतपस्वी

मी पहीला समुद्र मुंबई आणी दुसरा हरीहरेश्वर. कातळावर चालताना बऱ्याच जखमा होतात पण खार्यापाण्या मुळे लगीच बऱ्या होतात असे एक निरिक्षण.

दिवे आगर पण पाहीले आहे पण तुमच्या लेखात माहिती वाचून पुन्हा जावेसे वाटत आहे.

माहितीपूर्ण लेख. दिवेआगर चांगले ठिकाण आहे.

निनाद's picture

2 Apr 2024 - 3:58 am | निनाद

खूप छान लिहिता. सगळी छायाचित्रे सुंदर आहेत. तुमच्या सोबत आमची पण एक सहल होत जाते. मूर्तीची माहिती आणि अवतारांचे विवेचन आवडले. असेचे भटकत रहा आणि लिहीत रहा!

गोरगावलेकर's picture

7 Apr 2024 - 4:36 pm | गोरगावलेकर

@कर्नलतपस्वी, कंजूस, निनाद यांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच सर्व वाचकांचे आभार.

प्रचेतस's picture

8 Apr 2024 - 10:34 pm | प्रचेतस

हाही भाग सुंदर. हरिहरेश्वर मंदिर सुरेख आहे मात्र तिथला किनारा धोकादायक आहे, भरतीच्या वेळी प्रदक्षिणापथावर पाणी चटकन भरते त्यामुळं नीट अंदाज घेऊनच येथे जावे. श्रीवर्धनचे पेशवे स्मारक पाहिलेले होतेच, अजूनही काहीही बदल झालेला दिसत नाहीये.
दिवेआगरचा किनारा हल्ली खूपच अस्वच्छ झाला आहे. अगदी साताठ वर्षांपूर्वीपर्यंत तो खूपच सुंदर होता. रुपनारायणाचे पूर्वीचे रूप फारच सुंदर होते, हल्ली वस्त्रे नेसवून आणि काळे पॉलिश लावून मूर्तीचे मूळचे सौंदर्य घालवून टाकले आहे. सुंदरनारायणाला तर भरमसाट पॉलिश फासून चक्क निळा कद नेसवला आहे जे फारच हास्यास्पद आहे. पुरातत्त्व खात्याने ही दोन्ही मंदिरे ताब्यात घ्यावयास हवी अन्यथा सुवर्ण गणेश मंदिराप्रमाणे भरून न येणारे नुकसान होईल.

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2024 - 5:51 pm | चौथा कोनाडा

वा, सुंदर सफर घडवलीत, हरिहरेश्वर आणि दिवेआगारची.
...... अप्रतिम फोटो !!!!
.............. खडकांची जाळी, सुवर्ण गणेश, रूपनारायण मंदिर, स्वरूपनारायण मंदिर इत्यादी माहिती खूप छान आहे.
..............................तुमचे धागे म्हणजे एक वेगळीच मेजवानी असते
.......................................धन्यवाद.

चक्कर_बंडा's picture

24 Apr 2024 - 12:56 pm | चक्कर_बंडा

सर्व भाग वाचले.... यातील बहुतेक ठिकाणे पाहीली ही आहेत, यातुन पुन्हा आठवणी ताज्या झाल्या, छान सफर घडली.