आपलेच दात, आपलेच ओठ!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
20 Dec 2008 - 7:44 pm

आपलेच दात, आपलेच ओठ!
----------
मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांचा तणाव सुरक्षा दलांबरोबरच सगळ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना जाणवत होता. सुमारे तीन आठवडे हा तणाव घेऊन वावरणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. देशावरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता. काहींनी त्याची गणना 11 सप्टेंबरच्या अमेरिकेवरील हल्ल्याशीही केली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानी दहशतवादाविरोधात या वेळी सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले होते. पाकिस्तानचा निषेध एकमुखाने केला होता आणि कठोर पावले उचलण्याची मागणीही करत होते. एवढे दिवस हा तणाव सगळ्यांनाच असह्य झाला होता...त्यातून सुटका प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत होती. पण पुढाकार कुणी घ्यायचा, हा प्रश्‍न होता.
सत्ताधारी पक्ष म्हणून सर्वाधिक जबाबदारी असलेल्या कॉंग्रेसमधील एका जबाबदार नेते म्हणून अ. र. अंतुले यांना प्रत्येकाच्या मनातली ही भावना अस्वस्थ करत होती. नेत्यांच्या तणावाला वाट करून देण्याची संधी ते शोधत होते. संसद अधिवेशन सुरू झाल्यावर त्यांनी घाव घालायचे ठरविले. दहशतवादाविरोधातील एकजुटीचा ताण थोडा हलका होईल आणि सर्वांनीच देशभावनेचे चढविलेले मुखवटे उतरवून त्यांना आपल्या नेहमीच्या, "स्वहित श्रेष्ठ' भूमिकेकडे पुन्हा वळता येईल, या उदात्त हेतूने अंतुलेंनी करकरेंच्या मृत्यूबद्दलचे वादग्रस्त विधान केले. ते करण्यामागे त्यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. केवळ नेत्यांच्या मनावरील ताण हलका करण्याचा निर्भेळ हेतू त्यामागे होता.
अंतुलेंचा बार बरोबर योग्य ठिकाणी लागला. सर्वांनाच हायसं वाटलं. कॉंग्रेसनं आधीच ध्वनिमुद्रित करून ठेवलेली "ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे,'ची टेप वाजवली. भाजपनं अपेक्षेप्रमाणे कडाडून टीका केली. लालूप्रसाद, मुलायमसिंह, पासवान यांनी सोयीस्कररीत्या मौनव्रत स्वीकारलं. डाव्यांनी नाइलाजानं का होईना, अंतुलेंना देशहिताचा डोस पाजला.
अंतुलेंसारखीच खदखद भाजपमध्ये असलेले जसवंतसिंह यांच्याही मनात सुरू होती. तसं त्यांनी संसदेतल्या गाजलेल्या खासदार लाच प्रकरणादरम्यान थेट पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाला अडचणीत आणलं होतं. अंतुले प्रकरणातही त्यांना नामी संधी मिळाली. "लोकांचे प्राण वाचविण्यासाठी अतिरेक्‍यांना सोडण्यासाठी पुन्हा जाईन,' असं हृदयस्पर्शी, मर्मभेदक आणि रोखठोक विधान करून त्यांनीही स्वतःच्या मनावरचा ताण हलका करून घेतला.(आणि पक्षाचा ताण वाढवला.)
...
अनपेक्षित वेळी, मूळ स्वभावाला जागून दे धम्माल वक्तव्यं करण्यात पहिला नंबर कोणाला द्यायचा, असा विचार प्रसारमाध्यमांनी सुरू केला, तेव्हा अर्थातच जसवंतसिंहांचं पारडं अंतुलेंपेक्षा काकणभर काय, चांगलं मणभर जास्त झालं. जसवंतसिहांचं नाव अगदी निश्‍चित झालं, त्याच वेळी पाकिस्तानातून आलेल्या एका बातमीनं जसवंतसिंहांच्या तोंडातला घास हिरावून घेतला.
तिथं कारगिल प्रकरणात धडधडीत खोटेपणानं वागणारे माजी पंतप्रधान, सध्या सत्तेतही सहभागी असलेले नवाझ शरीफ यांनी मुंबईत जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाब पाकिस्तानचाच असल्याचं कबूल करून टाकलं! खोटारडेपणावरच ज्या देशाची कारकीर्द घडली आणि भवितव्यही अवलंबून आहे, तेथील एका सत्ताधारी, प्रमुख नेत्यानं आपल्याच देशाच्या अध्यक्षांना, पंतप्रधानांना तोंडावर पाडण्याचा उद्योग केला होता. मीडियानं जाहीर केलेल्या स्पर्धेत शरीफ यांचं नाव एका क्षणात बिनविरोध निवडलं गेलं!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2008 - 7:57 pm | परिकथेतील राजकुमार

अरे रे रे अभिजित राव काय करुन बसलात हे ? (सदर वाक्य , "सुधाकर वास्तविक तुम्ही आमचे पाठचे भाऊ ..." ह्या चालिवर घ्यावे.)
आत्ता कुठे जरा मि.पा आपल्या खर्‍या रुपात परत येत होती आणी त्याच वेळी तुमचा हा लेख आला कि हो ! आता होत्याचे न्हवते होणार आणी आम्हा सभासदांना परत एकदा अतिरेकी - पोलिस - राजकारणी - संघ - गांधी असा प्रवास करत करत 'दादां' पर्यंत पोचावे लागणार ! तोवर पिंडाला कावळा शिवणे नाहि !!
असो, शेवटी तुमच्याच शब्दात सांगायचे म्हणजे ... आपलेच दात, आपलेच ओठ!
धास्तावलेला
नारायण धास्तक

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

ऍडीजोशी's picture

21 Dec 2008 - 1:29 am | ऍडीजोशी (not verified)

"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"

टेंशन काय को लेनेका?

हेरंब's picture

21 Dec 2008 - 9:44 am | हेरंब

आपल्या देशातले राजकारणी हे कधीही सुधारणार नाहीत. तेंव्हा उगाच त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. या वायफळ चर्चा बंद करा अशी सर्व सुजाण मिपावासीयांना विनंति आहे.

सखाराम_गटणे™'s picture

21 Dec 2008 - 12:28 pm | सखाराम_गटणे™

मस्तच
लिहीले आहे.

कणाहीन मंत्री आणि कणाहीन राजकारणी

----
सखाराम गटणे