‘चक्र’ची प्रतीक्षा (नौदल दिन विशेष)

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
4 Dec 2023 - 4:11 pm
गाभा: 

नव्या शतकात बदलत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाला आपल्या ताफ्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रवाहक अणुपाणबुड्यांबरोबरच (SSBN) हल्लेखोर अणुपाणबुड्यांचीही नितांत गरज भासत होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलासाठी नेर्पा ही अकुला-2 वर्गातील हल्लेखोर अणुपाणबुडी भारतानं भाड्यानं घेतलेली होती. भारतीय नौदलाची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं ते एक महत्वाचं पाऊल होतं. वाजपेयी सरकारच्या काळात 2004 मध्ये भारत आणि रशियामध्ये या पाणबुडीसंबंधीचा करार झाला होता. त्यानुसार आधी रशियाकडून अकुला-2 वर्गातील दोन अणुपाणबुड्या 10 वर्षांसाठी भाड्यानं घेण्याचा निर्णय झाला होता. पण प्रत्यक्षात एकच पाणबुडी घेतली गेली.

नेर्पा अणुपाणबुडीचं नामकरण रशियातील सैबेरियातील बयकाल सरोवरात सापडणाऱ्या माशाच्या एका प्रजातीवरून करण्यात आलं होतं. नेर्पाची बांधणी 1993 मध्ये सुरू झाली होती. पण सोव्हिएट संघाच्या विघटनानंतर आलेल्या आर्थिक संकटामुळं या पाणबुडीचं काम थांबवण्यात आलं होतं. ते काम भारत आणि रशिया यांच्यात अणुपाणबुडी भाड्यानं घेण्यासंबंधीचा करार झाल्यावर पुन्हा सुरू झालं. बांधणी सुरू असतानाच 2008 मध्ये पाणबुडीत वायूगळती झाल्यामुळं 20 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नेर्पाची पुन्हा संपूर्ण तपासणी सुरू करण्यात आली होती. परिणामी ती पाणबुडी भारतीय नौदलाला मिळण्यासाठी तीन वर्षे उशीर झाला.

भारतानं 1980 च्या दशकात तत्कालीन सोव्हिएट संघाकडून पहिली हल्लेखोर अणुपाणबुडी (Nuclear-powered attack submarine) भाड्यानं घेतली होती. Charlie वर्गातील त्या पाणबुडीचं भारतीय नौदलात सामिलीकरण झाल्यावर तिचं नामकरण आयएनएस चक्र असं करण्यात आलं होतं. त्यानंतरच्या काळात रशियाकडून भाडेतत्वावर भारतीय नौदलात सामील होत गेलेल्या अणुपाणबुड्यांना तेच नाव दिलं जात आहे.

सुमारे 8100 टन वजनाच्या या अणुपाणबुडीचा सांगाडा दोन स्तरांचा असतो. त्यामुळं तिच्यावर शत्रूचा हल्ला झाला तरी पाणबुडीच्या मुख्य सांगाड्याचं संरक्षण होण्यास मदत होते. चक्र अणुशक्तीवर चालणार असल्यानं पाण्यातून संचार करताना ती कमीतकमी कंपनं निर्माण करते. परिणामी शत्रूच्या पाणबुडीशोधक यंत्रणेला (SONAR) तिचा शोध घेणं कठीण होतं. त्याचवेळी तिच्यावर बसवण्यात येणाऱ्या स्वयंचलित सोनार यंत्रणेमुळं दूरच्या आणि जवळच्या लक्ष्यांचा शोध घेऊन त्यांचा अचूक वेध घेणं शक्य होतं. अकुला-2 वर्गातील पाणबुडी पाण्याखालून ताशी 33 सागरी मैल (knots), सुमारे 50 किमी वेगानं जाऊ शकते.

स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी आयएनएस अरिहंत भारतीय नौदलात कार्यरत झालेली आहे. अशा आणखी 4 अणुपाणबुड्या भारतीय नौदलात सामील होणार आहेत. पण त्या अण्वस्त्रवाहक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रवाहू अणुपाणबुड्या आहेत, तर अकुला-2 (Akula-2) हल्लेखोर अणुपाणबुडी आहे.

पारंपारिक पाणबुडी डिझेल-इलेक्ट्रीक शक्तीवर संचालित होते. त्या पाणबुड्यांच्या बॅटऱ्या डिझेल जनरेटरद्वारे चार्ज केल्या जात असतात. त्यामुळं त्या पाणबुड्यांना ठराविक काळानं पाण्यावर यावं लागतं. पण अणुपाणबुडीला वीजपुरवठा तिच्यावरच्या अणुभट्टीतून होत असतो. त्यामुळं तिला पाण्याखाली दीर्घकाळ राहता येतं. अकुला-2 पाणबुडीवर वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांबरोबरच विमानभेदी क्षेपणास्त्रही बसवण्यात येणार आहेत. त्यामुळं ही पाणबुडी शत्रूच्या हवाई हल्ल्यापासूनही स्वत:चा बचाव करू शकेल.

भारतीय नौदलासाठी स्वदेशी बनावटीच्या हल्लेखोर अणुपाणबुड्या बांधण्याचा प्रोजेक्ट-76 सध्या सुरू आहे. या प्रकल्पात 6 पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत. पण त्या पाणबुड्या भारतीय नौदलाला मिळण्यासाठी अजून बराच वेळ लागणार असल्यामुळं मधल्या काळात रशियाकडून एक अणुपाणबुडी भाड्यानं घेण्याचा विचार पुढं आला.

https://avateebhavatee.blogspot.com/2023/12/blog-post.html

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

14 Dec 2023 - 12:34 pm | Nitin Palkar

केंद्रातील सध्याचे सरकार सर्वच क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे दृढतेने आणि वेगाने वाटचाल करत आहे.
संरक्षणदले ही त्याला अपवाद नाहीत.
भारतात बुद्धिमत्तेची कमतरता नाही. राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देवून तिचा योग्य वापर आता होतो आहे असे चित्र दिसत आहे.

नठ्यारा's picture

15 Dec 2023 - 2:48 am | नठ्यारा

आत्मनिर्भर भारत = शक्तिमान भारत

काही वर्षांपूर्वी वरील समीकरणाची खिल्ली उडवली जायची. परदेशी गुंतवणूक म्हणजे जणू अर्थमंदिराचं तीर्थ ! केवळ परदेशी गुंतवणूकच भारतास प्रगतीपथावर नेऊ शकते, या वचनावर डोळे झाकून विश्वास ठेवला जायचा. पण आता मात्र चित्रं बदलतंय. ते ही झपाट्याने. अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

-नाठाळ नठ्या