दिवाळी अंक २०२३ - सोनेरी पूल

गवि's picture
गवि in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am

स्थळ बा ना हिल्स , दा नांग , व्हिएतनाम.
काळ: गैरलागू.
वेळ : महत्वाची.

प्रवास करायला जायचे म्हणजे एखादे स्थळ नीट बघायला जायचे ना? पण सुरुवातीच्या अनेक खेपा कोण्यातरी मराठी बोलणाऱ्या टूर गाईडच्या हाती धरलेल्या खुणेच्या झेंड्याकडे नजर ठेवत गर्दीतून पळत पळत त्याला गाठण्याचे एकच ध्येय ठेवण्यात वाया गेल्या. बरे, हे धाप लागेपर्यंत पळणे कशासाठी तर कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त स्थलदर्शन, पैसे वसूल होणे (आणि हो.. आम्हाला तिथे स्वित्झर्लंडमध्ये बर्फात पावभाजी मिळाली.!!) यासाठी.

माझे फोपसेपण मी मुळातच मान्य करतो. परंतु अगदी रोज धावण्याचा सराव केल्याखेरीज पर्यटन शक्यच नाही असे नसते ना ? "चलो चलो" असे सतत ऐकत, खांद्याच्या वर नजर न उचलता, मेंढरे बनून सतत हाकलले जाणे, हे सर्व एका अशाच ग्रुप टूरनंतर मी नाकारले. आपल्या संथ वेगाने रमत गमत, काहीशी कमी ठिकाणे का होईना पण नीट डोळे भरून बघता यावी म्हणून मी त्यानंतर देशी आणि विदेशी प्रवास पूर्णपणे स्वतःच प्लॅन करणे सुरु केले.

आता इतपत सांगणे पुरे. नाहीतर लघुलेखाचे तंत्र बिघडायचे.

बा ना हिल्स हा माझ्या व्हिएतनाम प्रवासातला हाय पॉईंट असणे अपेक्षित होते. म्हणजे सर्वच अर्थांनी हाय पॉईंट. जगातली सर्वात लांब केबल कार घेऊन उंच आणि दूर पर्वतावर एक मोठ्ठे अद्भुत विश्व तिथे उभे केले गेले आहे. एक मोठे फ्रेंच शहरच तिथे आहे. अनेक जादुई वाटणारे महाल, वेगवेगळी प्रचंड थिएटर्स आणि खूप काही.

पण या ठिकाणाचे फार वर्णन मला आत्ता करायचे नाही. मी काहीतरी वेगळेच सांगू इच्छितो.

या बा ना हिलवर सुरवातीलाच एक मोठ्ठा अर्धचंद्राकृती पूल आहे. तो दोन मोठ्ठ्या हातांवर तोलला गेला आहे. जणू निसर्गाचे हात. हा पूल सोनेरी रंगाचा आहे. बहुतांश वेळा तो दाट धुक्यात बुडालेला असतो. खोल दरीवर असलेला हा पूल आपल्याला एका वेगळ्या स्वप्नातल्या विश्वाच्या वाटेवर नेतो.

सोनेरी पुल

या पुलावर पोचण्यापूर्वी खूप दिवस आधीच मी तिथे मनाने अनेकदा जाऊन आलो होतो. मनाने म्हणजे गूगलने. अनेक रिव्ह्यूजमध्ये लोकांनी सांगितलेली युक्ती वापरून मी देखील भल्या पहाटे तिथे पोचणार होतो. तिकीट आदल्याच दिवशी काढून ठेवले होते. म्हणजे तिथे गेल्यावर गेट उघडता उघडता साडेआठ वाजता थेट पहिल्या केबल कारमध्ये घुसणे.

भल्या पहाटे गेल्याने मला त्या पुलाचे एकांतात रिकामे असे दुर्मिळ दर्शन होणार होते. तो सोनेरी स्वप्नातला पूल. असा एक झोकदार वळण घेऊन ढगांच्या आत लुप्त होणारा. त्यावर मी एकटा असणार होतो. म्हणजे मी आणि सौ. तिथे आम्ही दोघे आणि पार्श्वभूमीवर तो पूल, अशी सेल्फी मला मिळणार होती.

केबल कारमध्ये चढलो. गंमत म्हणजे केबल कारच्या माझ्या कंपार्टमेंटमध्ये मी आणि सौ असे दोघेच. झरझर वर जात तो झोपाळा खूप वेळ स्वर्गाची सफर करवत राहिला. धुक्याने त्या छोट्याश्या लटकत्या खोलीत शिरून आधीच वातावरण निर्मिती सुरु केली. गार वाराही आला. समुद्र किनाऱ्याची दमट हवा आणि ही ढगाळ बोचरी थंडी, हे केवळ अर्ध्या तासाच्या अंतराने. अद्भुत वाटत होते सर्व.

वरचे स्टेशन आले. लगबगीने केबल कारमधून खाली उडी टाकली. थोडा फरपटलो. पण तोल साधला. स्टेशनच्या बाहेर येऊन पुलाकडे जाण्यापूर्वी असलेल्या एका सेंट्रल हॉलच्या दिशेने निघालो. आता तो पूल अगदी पाच मिनिटांत भेटणार होता. उत्सुकतेने थोडी धडधड होत होती. धुके तर अगदी दाट झाले होते. सगळा सीन मला हवा तसा जमून येणार होता.

हॉलमध्ये पाऊल टाकले आणि ...

भ्रमनिरास, स्वप्नांचा चक्काचूर, स्वर्गातून उडी मारून जमिनीवर दाणकन आदळणे या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी एकही शब्द अधिकचा खर्चण्याची माझी इच्छा नाही. तेव्हा टु से द लीस्ट , आम्ही दोनेकशे लोकांच्या प्रदीर्घ रांगेत पुलाकडे जाण्यासाठी लागलो. इतके लोक माझ्या आधी पोचलेच कसे? गूगल ?

आजूबाजूला हॉलमध्ये लोकांचा खच होता. आमची त्यात भर. त्यामुळे नावे तरी कोणी कोणाला ठेवावी? त्यातल्या त्यात भारत वगळता चिनी किंवा अन्य कोण्या विशिष्ट देशाचे लोक कसे अधिकच मॅनरलेस किंवा बेशिस्त किंवा लाऊड असतात असा काही डेटा मिळतो का हे पाहण्याचा प्रयत्न करत निमूट रांगेतून सरकत राहिलो. लहान पोरे सैरावैरा पळत होती. मोठे लोक देखील सरळ धक्काबुक्की करत होते. तेही चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन. मी बळेच प्रयत्न करून दा-नांगच्या लेडी बुद्धासारखे सौम्य गूढ हास्य चेहऱ्यावर तरंगत ठेवले.

अखेरीस आम्ही त्या पुलावर पहिले पाऊल टाकले.

धुके तर दाट होतेच. पण काहीही न दिसण्यात धुक्यापेक्षा त्या कचकोल गर्दीचा सहभाग जास्त होता.

पुलावर काही पाहणे किंवा फोटो काढणे हे आता वेगळ्या अर्थाने स्वप्न उरले. कसेतरी करून जीव सांभाळून पैलतीरी पोचणे हेच एक ध्येय उरले. आम्ही दोघे एकमेकांचा हात धरून रेटा देत देत त्या गर्दीतून सरकत राहिलो. मुंबई कोणाला काय काय आयुष्यभर पुरणारे कौशल्य देईल सांगता येत नाही.

भारतीय टुरिस्ट एरवी सगळ्या जगात प्रचंड घोळक्यांनी फिरत असतात. विशेषतः मराठी. त्यातले अनेक जण हायब्रीड टुरिस्ट ड्रेसमुळे पटकन नजरेत भरतात. म्हणजे पंजाबी सलवार कमीज आणि खाली ऍक्शन स्पोर्ट्स शूज. पुरुष कम्पल्सरी चड्डीत. मफलर, माकडटोपी, जाकीट, शाल असा जामानिमा मस्ट. हॅट एरवी कधी नसलेली प्रवासात डोईवर असलीच पाहिजे. वगैरे.

पण इथे व्हिएतनाममध्ये भारतीय नागरिक खूपच तुरळक दिसत होते. इथे बा ना हिल्सवर तर अगदीच कमी. आणि त्यामुळेच मला एकदम ते आजोबा नजरेत भरले. घुसलेच.

पुलाच्या मधोमध ठेचाठेची म्हणता येईल अशा गर्दीत ते म्हातारे गृहस्थ एका व्हीलचेअरवर मान खाली घालून गप्प बसले होते. शुभ्र लांब दाढी आणि सैलसर ढगळ कपडे. सुरकुतलेली त्वचा आणि पापणीचे केसदेखील पांढरे. एक पंधरा सोळा वर्षांचा पोरगा ती व्हीलचेअर ढकलण्याचा प्रयत्न करत होता. पण ते अशक्य झाल्याने तो एकाच जागी उभा राहिला असावा. लोकांच्या धक्क्यांनी व्हीलचेअर इकडे तिकडे सरकत होती. आजोबांचा तोल बिघडत होता. ते थरथरत होते. मान डुगडुगत होती. पण तरी ते शक्य तितके स्थिर बसले होते. वाट पाहून पाहून मग त्या पोराने चेअरच्या चाकाला लॉक करून टाकले आणि स्वस्थ उभा राहिला.

व्हील चेअर

आजूबाजूने लोक धक्के देत भराभर पुढे जात होते. त्या आजोबांच्या सोबत बहुधा त्यांचे पूर्ण कुटुंब होते. त्यातील एका पोक्त पुरुषाचे, जो कुटुंब प्रमुख असणार, सर्वांवर वसावसा ओरडणे चालू होते. मराठी भाषा ऐकू आल्याने त्यांच्याकडे माझे आणखीनच जास्त लक्ष लागून राहिले. पुरुषाला आपण शिरीष म्हणूया. कारण त्या वयाच्या पुरुषांत दहातील किमान एक शिरीष असतोच. आणि त्याच्या बिचाऱ्या पत्नीला वैशाली म्हणूया. पुन्हा एकदा कारण तेच.

शिरीष वैशालीवर खेकसत होता.

"पटकन उभी राहा ना इथे. जागा रिकामी मिळालीय तर पटकन पकडता नाही येत?"

वैशाली त्याने दाखवलेल्या एका किंचित रिकाम्या जागेत खांबाला पकडून उभी राहिली. फोटोसाठी.

"मयंक.. मयंssक..!!", शिरीष खच्चून ओरडला. "राहा ना उभा गाढवा. मिळालेली जागा जाईल."

मुलाचे नाव कळले. त्यामुळे त्याला काल्पनिक नाव नको. तर तो व्हील चेअर ढकलणारा मयंक दचकून ती व्हील चेअर सोडून दोन्ही हातांनी गर्दी वारत वारत वैशालीच्या बाजूला कसाबसा येऊन टेकला. अत्यंत चपळाईने पटकन शिरीषने मोबाईलवर कचाकचा चार सहा फोटो मारले. स्वतः फोटोत नसूनही त्याने कुटुंबासाठी हा त्याग केला असे मला वाटले. पण नाही..! लगेचच शिरीष वैशालीच्या बाजूला जाऊन उभा राहिला. त्याने मयंकला पटकन कोणी इतर लोक मध्ये यायच्या आत आपला सपत्नीक फोटो काढण्याची आज्ञा खेकसली. मयंक घाबरून फोटो घेण्याचा प्रयत्न करायला लागला खरा,पण सतत येणारी चिनी, तैवानी, युरोपीय, थाई गर्दी त्यांना मध्ये घुसून फोटोबॉम्ब करत होती.

शिरीष आणि वैशाली तणावग्रस्त वैतागलेल्या चेहऱ्यावर खूपच कष्टाने फोटोपुरते हसू आणून उभे होते. शिरीषचे दात संतापाने आवळलेले लक्षात येत होते. ते जी फोटोयोग्य जागा पकडून उभे होते तीवर डोळा ठेवून एक चिनी घोळका ताटकळत होता. ते बघून शिरीष चवताळून पोरावर ओरडला.

"एक साधा फोटो नाही का तुला वेळेत काढता येत? एक गुड मोमेंट कॅप्चर करता येत नाही का तुला ? इतका खर्च करून इथपर्यंत आलो आपण.. यूसलेस...!! ", त्याने तावातावाने जागा सोडली.

"बाबा, आलाय तुमचा दोघांचा फोटो नीट", मयंक कसाबसा म्हणाला.

आजोबा व्हीलचेअरमध्ये मान खाली घालून पुतळ्यासारखे बसले होते. मला अचानक जाणवलं की ते बहुधा दृष्टिहीन होते. किमान नजरेने अधू.

अपंग, चालू न शकणाऱ्या आणि आंधळ्या म्हाताऱ्या माणसाला इतक्या दूरच्या देशात पर्यटनाला आणणाऱ्या कुटुंबाचे लॉजिक मला कळेना. आणि त्या पार्श्वभूमीवर शिरीषचे इतके चिरडीस जाऊन ओरडणे देखील कळेना.

आजोबांना आजूबाजूचे काही दिसणे त्या खुर्चीवर बसून अशक्यच होते. कारण गर्दीत ते चहूबाजूंनी ठेचले जात होते. त्यातून चुकून गर्दी पांगली असती तरी आजोबांचे डोळे अधू. आणि डोळे धड असते तरी धुक्याने सगळी दरी झाकून टाकली होती.

पुलाला तोलणारे ते दोन प्रचंड हात देखील आता धुक्यात गुरफटून दिसेनासे झाले. आता मला दिसत होते फक्त आजोबा. व्हीलचेअरवर स्थितप्रज्ञासारखे अचल बसलेले. ते स्थितप्रज्ञ होते की स्थितीशरण होते ते मला माहीत नव्हते. मी गर्दीचे धक्के खात पुढे सरकत सरकत त्या आजोबांकडे बघत राहिलो.

कशाला आले हे इथे? काय अर्थ आहे त्या येण्यात? यांच्यामुळे त्या सगळ्या कुटुंबाला उगीच ताण आणि त्याच्या बदल्यात यांना फार काही साईट सिईंग करायला मिळतेय असेही नाही. परक्या देशात व्हील चेअर अरेंज करा, टीनएजर मुलाला त्याची एन्जॉयमेंट सोडून ढकलण्याच्या कामी लावा. तेही इतक्या गर्दीच्या आणि अवघड जागी. फार तुडवातुडवी झाली तर केवढा अनर्थ होऊ शकतो. या कुटुंबाला भान नाही का? बरे तरुण पिढीला असेल हौस, या आजोबांनी तरी नकार द्यायचा. काय हे चोचले? मुळात एखादी जागा बघायची नाही, फिरायची नाही तर तिथे यायचेच कशाला ?

की भारतात आजोबांना सांभाळायला, ठेवून घ्यायला कोणी तयार नसेल? नाईलाजाने त्यांना घेऊन फिरावे लागत असेल? म्हणून तो शिरीष इतका अपसेट झाला असेल का?

पुलाच्या वळणावरचा एक मस्त कोपरा तिथल्या एका प्रेममग्न युरोपियन जोडप्याने निवांतपणे पन्नास फोटो काढून झाल्यावर अखेरीस सोडला. ते बघून मी हिला ओरडलो. "पकड लवकर तो कॉर्नर". शिताफीने पकडलेला कॉर्नर आळीपाळीने अडवून एकमेकांचे दहा फोटो काढून होईपर्यंत मला आजोबांचा पूर्ण विसर पडला.

अखेरीस एकदाचा सरकत सरकत तो स्वप्नातला पूल आम्ही एखाद्या दु:स्वप्नातून पार व्हावे तसा ओलांडला. पुढे मायानगरी आमची वाट पाहात होती. फ्रेंच व्हिलेज, मोठाले महाल, भव्य ऑपेरा, ऑगमेंटेड रियालिटी वापरून केलेले सुंदर शोज, सुशीपासून ते पिझ्झ्यापर्यंत जगभरातल्या सर्व खानपानाची रेलचेल असे सर्व अनुभव रिचवत रिचवत पुढे जाताना दर ठिकाणी एक विचार येत होता की ते आजोबा हे सगळे कसे एन्जॉय करणार ? नुसते फिरू देखील शकणार नाहीत, अनुभवणे तर फार दूर.

सगळा दिवस आजोबांनी व्यापून टाकला होता.

संध्याकाळ व्हायला आली आणि पूर्ण दिवसाचे तिकीट वसूल झाल्याचा फील यायला लागला तेव्हा परतीची केबल कार पकडायला परत निघालो. पुन्हा त्या सोनेरी पुलावरून क्रॉस करणे आले. आणि काय आश्चर्य. त्या क्षणी पुलावर गर्दीही नव्हती आणि धुकेही. फक्त दोनच व्यक्ती होत्या. मयंक आणि आजोबा.

आजोबा तसेच व्हील चेअरवर स्थिर बसलेले. मान खाली ती खालीच. फरक इतकाच की मयंक त्यांच्या कानाला लागून काहीतरी बोलत होता. मी त्यांना अजिबात न जाणवेल अशा बेताने जवळ जाऊन पुलावरून खाली दरीकडे बघत उभा राहिलो. मागून सौ देखील शांतपणे आली. डोळे दरीतले अथांग अरण्याचे दृश्य बघत होते. कान मात्र मयंकने ताब्यात घेतले होते.

"आबा, इथून खाली ना, अगदी क्लियर दिसतंय आता, मी घरीच तुम्हाला म्हणालो होतो ना, की एखाद्या दिवशी ढग हटले तर अगदी दूर पाणी सुद्धा दिसतं इथून असं म्हणतात. आत्ता नाहीये दिसत. पण बाकी जंगल दिसतंय. आपल्या आंबोली घाटात असतं तसंच आहे. इथली झाडं अगदी भारतातली असतात तशीच आहेत. आंबा, फणस, काजू. आपण आत्ता राहतोय ते दा-नांग तर अगदी कोंकणासारखं आहे.", मयंक एकतर्फी बडबड करत होता. दा-नांगच्या पुलावरचा ड्रॅगन जसा दर रविवारी आग ओकतो तसा मगाशी आग ओकणारा त्याचा बाप वैशालीला घेऊन जरावेळ दूर कुठेतरी फिरत असावा. किंवा हा परतीच्या मार्गातला शेवटचा पॉइंट असल्याने इथे थांबून एकमेकांची वाट पाहायचे ठरले असावे.

"आत्ता आपण जिथे आहोत ना, तिथेच त्या दोन हातांपैकी एक हात आहे. पुलाला असा खालून सपोर्ट करणारा. हातावर शेवाळं चढलंय. पण नॅचरल वाटावं म्हणून ते साफ करत नसणार.", मयंक थांबत नव्हता. आबा ऐकत असावेत नसावेत. कोण जाणे.

आता पुलावर चक्क कोणीही नव्हते. मी घड्याळात वेळ बघून घेतली. पुढे लोकांना टिप्स देऊन इम्प्रेशन मारायला बरे की बुवा बरोब्बर साडेचार वाजता जा म्हणजे पूल रिकामा मिळेल.

"थंडी वाजतेय का आबा ? शाल घालू का ?", मयंक म्हणाला.

मला आता त्या दोघांच्या जगात आणखी घुसखोरी करणे जिवावर आले. पत्नीने माझा हात धरला आणि आम्ही दोघे पूल सोडला. केबल कारच्या लायनीत लागण्यापूर्वी जरा एक आईसक्रीम खाण्याची हुक्की आली म्हणून त्या रांगेत लागलो. केबल कारला मात्र रांग नव्हती. केबल कार पूर्ण थांबत नसते. तिचा स्पीड थोडा कमी होतो तेवढ्यात पटकन आत चढावे लागते. पण आमच्या आधीच शिरीष, वैशाली, आजोबा आणि मयंक केबल कारमध्ये चढण्यासाठी हजर होते. आजोबांची व्हीलचेअर आत चढवायला क्षण दोन क्षण जास्त जाणार म्हणून तिथल्या स्टाफपैकी दोन जवान व्हिएतनामी तरुण पोझिशन घेऊन तयार होते. एकाने रिकामी कार धरून किंचित स्लो केली. दुसऱ्याने झपाटा दाखवत आजोबांना खुर्चीसह आत ढकलले. मागोमाग ते पूर्ण कुटुंब आत चढलं. तरीही कार टोकाला पोचायला शेवटचे काही क्षण बाकी होते म्हणून मी आणि सौ देखील चपळाईने त्याच कारमध्ये घुसलो. मुख्य कारण म्हणजे उत्सुकता.

धापा टाकत एका साईडला रेलून मी बसलो. परदेशात मराठी मराठी म्हणून फार गळ्यात पडायला जायचे नसते. शिवाय जास्त ओळख करून गप्पा मारायला जावे तर त्यांचे एकमेकांत काय बोलणे होते हे मिस झाले असते. त्यामुळे "आपण सारे भारतीय" या ढोबळ पातळीचे केवळ पोच देणारे एक स्मित त्या फॅमिलीच्या दिशेने टाकून आणि त्यांचे स्वीकारून मी पटकन खिडकीतून खाली बघत नेहमीप्रमाणे मोबाईलवर व्हिडीओ शूट करायला लागलो.

आपण पर्यटनस्थळे तिथे बघण्यापेक्षा घरी परत येऊनच नीट बघतो हे खरे. कशाला कोणत्या यात्रा कंपनीला दोष द्या?

बाकी नजर कुठेही असली तरी कान त्या कुटुंबाकडे होते. एक जमदग्नी कसाई बाप, त्याची गरीब स्वभावाची पत्नी, शहाणा गुणी मुलगा आणि त्याचे असहाय्य्य विकलांग वृद्ध आजोबा. आजोबांची पत्नी कधी बरे त्यांना सोडून गेली असावी ? वगैरे ...

"सॉलिड मजा आली ना? मस्त जागा आहे", शिरीष अचानक मोठ्याने म्हणाला. तो आता चक्क निवळलेला आणि चांगल्या मूडमध्ये दिसत होता. दा नांगच्या पुलावरचा ड्रॅगन आग ओकून झाल्यावर थंड पाण्याचे फवारे देखील सोडतो.. बाय द वे. हे सहज आठवलं.

"हो. आणि थंडी पण छान आहे.", वैशाली चक्क हसून म्हणाली.

ऑ? हे कुटुंब चक्क सुखी कुटुंब आहे की काय ? मग मगाशी हा बुवा का इतका खेकसत होता सगळ्यांवर ?

"बाबा, तुम्हाला कशी वाटली जागा? काही फील आला का?", शिरीष आजोबांना चक्क प्रेमाने विचारत होता.

"छान आहे. पूल तर खूपच सुंदर आहे.", आजोबा पहिल्यांदाच काहीतरी बोललेले ऐकून मी दचकलोच. त्यांचा आवाज अत्यंत क्षीण होता. पुढे त्यांना सलग वाक्य बोलवेना म्हणून ते हातानेच छान छान अशी खूण करत राहिले. मग श्वास घेऊन पुढे बोलले.

"डोळ्यांनी दिसत नाही म्हणून काय झालं ? याच्या डोळ्यांनी दिसलं मला सगळं.", आजोबांनी बाजूला चिकटून बसलेल्या मयंकचा हात दाबला आणि पकडून ठेवला. मयंक नुसताच हसला.

"जितक्या मार्गांनी व्हिएतनाम बघता येईल तितकं बघतोय. स्पर्श, वास, आवाज.. तू एवढा दगदग करून घेऊन आलास. आय एम एंजॉईंग."

"याचसाठी तर घेऊन आलो तुम्हाला बाबा.", शिरीष झटकन काचेतून दूर बघायला लागला. पण तरी मला त्याचे भरलेले डोळे दिसलेच.

मग मीही उरलेला वेळ काचेतून दूर दूर बघत राहिलो. मलाही काही प्रायव्हसी आहे की नाही? आणि बा ना हिल्सची केबल जगातली सर्वात लांब केबल आहे. कोरडे व्हायला खूप वेळ मिळाला मला..

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

12 Nov 2023 - 9:33 am | विजुभाऊ

एक्दम सिरीयस केलंत गवी.
दिवाळी शुभेच्छा

वाह वा..गवीदादा, लेख अप्रतिम आणि वर्णन खूपच सुरेख..आपण फार लगेच मतं तयार करतो आणि तेच बरोबर समजतो. शेवट फारच छान..

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Nov 2023 - 8:08 am | ज्ञानोबाचे पैजार

असा अनुभव थोड्याफार प्रमाणात प्रत्येक पर्यटन स्थळावर येतो, अपेक्षाभंग, गर्दी, घाई, गोंगाट, अशीच प्रत्येक वेळेला सहल होते
पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

13 Nov 2023 - 2:04 pm | तुषार काळभोर

मयंक, शिरीष, आजोबा आणि तुमचं लेखन. सगळंच हृदयस्पर्शी!

सोत्रि's picture

13 Nov 2023 - 5:38 pm | सोत्रि

अपेक्षापूर्ती करणार लेख!

- (गविपंखा) सोकाजी

अनन्त्_यात्री's picture

13 Nov 2023 - 8:38 pm | अनन्त्_यात्री

__/\__ !

कुमार१'s picture

14 Nov 2023 - 8:52 am | कुमार१

हृदयस्पर्शी!

टर्मीनेटर's picture

14 Nov 2023 - 12:11 pm | टर्मीनेटर

सुपर क्लास लेखन! एकदम मार्मिक 👍

गवि टच....

उग्रसेन's picture

15 Nov 2023 - 8:32 am | उग्रसेन

वार्धक्य कठीण असतं त्यावर अशा प्रेमाचा मुलामा . वयस्कर लोकांवर फार प्रेम आहे, अशा पठडीतील लेखन. लेखक नाव पाहिले. अपेक्षाभंग झाला.
स्पष्टपणाबदल माफ़ी असावी.

गवि's picture

15 Nov 2023 - 8:39 am | गवि

:-)

वयस्कर लोकांवर प्रेम आणि तरुण पिढी वाईट असे लिखाण झालेय ना? हो. तपशीलवार नीट वाचल्याबद्दल.... आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद. काहीतरी कमी पडले आहे ही जाणीव आणखी चांगली निर्मिती करायला भाग पाडते. सर्व काही सर्वोत्तम झाले तर पुढील वेळी वावच उरत नाही आणि लेखक एक लेखक म्हणून 'कै.' होतो. _/\_

प्रचेतस's picture

15 Nov 2023 - 8:36 am | प्रचेतस

ललित लेखन करणाऱ्यात गवि हे मिपावर सर्वश्रेष्ठ आहेत. पर्यटनातही त्यांच्या संवेदनशील मनाला कारुण्याची झालर दिसली आणि हा उत्कृष्ट लेख आला.

म्हातारपणी पर्यटनाचा खटाटोप कशासाठी?

एकदा कन्याकुमारी ला गेलो होतो. विवेकानंद स्मारक,तिरुवल्लुवर पुतळा असे जाणाऱ्या बोटी असतात. त्यातून स्मारकास गेलो तर एका वयस्कर बाईंना चाकाच्या खुर्चीत बसवून फिरवताना एक जण तिथे दिसला. चालवणारा नातेवाईक वाटला नाही. मी विचार केला की कन्याकुमारीच्या किनाऱ्यावरून दुरूनच पाहून परत गेले असते तरी चाललं असतं. एवढा पर्यटनाचा खटाटोप कशाला करतात? अगदी गरजेचा प्रवास करावा त्यांनी. जगात कितीही पर्यटन केलं तरी जागा संपणार नाहीत. त्या युट्युबवर विडिओंत पाहाव्यात.

सुंदर कथा आहे.गर्दी पाहून होणारा त्रागा त्यात आपलीच परीक्षा होते आणि निवांत क्षण अनुभवताना गोडवा मंतरला जातो.बाकी प्रत्येक कुटुंबाचे सूत्र वेगळेच असते :)

सौंदाळा's picture

20 Nov 2023 - 10:44 am | सौंदाळा

सुंदर लेख.
कुटुंबच डोळ्यासमोर उभे राहिले. मयंक, शिरीष, आजोबा सर्वांचे छोटेखानी व्यक्तीचित्रण आणि बरोबर प्रवासवर्णन पण.
व्हिएतनामचे पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2023 - 10:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह क्या बात है. सुंदर अनुभव. लिहिते राहा सर.
चित्रही आवडलं.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

27 Nov 2023 - 11:21 am | सस्नेह

भापो...

पाषाणभेद's picture

30 Nov 2023 - 5:06 pm | पाषाणभेद

हृदयस्पर्शी लेख.
कोरोनात वडीलांचे काहीच करू न शकल्याने मनाला चटका लावून गेला.
:-(

कर्नलतपस्वी's picture

30 Nov 2023 - 8:04 pm | कर्नलतपस्वी

देहूला जावे लागले. आता आलोच आहे तर नवीन मंदिर बघुन घ्यावे म्हणून काम झाल्यावर परीसरात फिरत होतो. एक बापलेकाची जोडी दिसली. कुतूहल म्हणून मुलाला विचारले वडीलांचे वय काय? म्हातारा कडक होता. वाटले ऐंशी वगैरे असावे. तर म्हातारा म्हणाला शंभरावर दोन वरीस, कदाचीत थोडे कमी जास्त. ऐकल्यावर राहावले नाही म्हणून मुलाचे वय विचारून घेतले. एकसष्ट होते.

मुलगा म्हणाला वय झालयं म्हणून वडलांना एकटे सोडत नाही. मी सगळ्यात लहाना. आसे म्हणून बापलेक लांब लांब ढांगा टाकत पुढे निघून गेले.

बेटा सेर तो बाप सवासेर म्हणत आम्हीं सुद्धा आपल्या मार्गी लागलो.

श्वेता व्यास's picture

28 Dec 2023 - 3:30 pm | श्वेता व्यास

हृदयस्पर्शी लेखन.
चित्रदर्शी वर्णनामुळे सगळे प्रसंग जणू अनुभवले.
आणि शेवटाला डोळे पाणावले. आजीची आठवण आली उगीच.