सखे...
तू माहेरच्या वाटेवरून जात असताना
तुझ्या मनाच्या फुलदाणीत फुलारल्यात
माहेरच्या कित्येक आठवणी
अन् तू अनुभवली सुखाची शिरशिरी.
रानाच्या रानवाटेवरील गाठाळलेल्या चिंचेच्या झाडाची
तू अंगावर पांघरूण घेतलेली
गारगर्द सावली.
नितळशार पाण्यात स्व:चं न्याहळलेलं सावळं प्रतिबिंब.
उन सावलीचा मनमोहक खेळ.
शेवाळल्या गवताळ दगडधोंडयातून वाहणारं
पाटाचं काळंभोर पाणी.
माहेरच्या गाव शिवारातील
सुखदुःखाच्या
आठवणींचे थांबे.
डोळ्यांच्या लेणीत कायम कोरल्या गेलेला
माहेरचा भोवताल...
सखे...
आज तुझ्या अंत:करणाला स्पर्शून गेली
जुन्या आठवांची कचांग लाली...
बघ ना किती खुलून दिसतो तुझा चेहरा
अन् तुझ्या चेहऱ्यावरील
प्रसन्न झळाळी...
प्रतिक्रिया
13 Nov 2023 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रसन्न झळाली आणि माहेर आठवणी भारी.
-दिलीप बिरुटे
13 Nov 2023 - 12:49 pm | चांदणे संदीप
वाचता वाचता मन हरवून गेलं. काय काय दृश्य आणि आठवणी डोळ्यासमोर फेर धरून नाचल्या काही क्षणासाठी. सुंदर!
सं - दी - प
13 Nov 2023 - 12:55 pm | तुषार काळभोर
रानाच्या रानवाटेवरील गाठाळलेल्या चिंचेच्या झाडाची
तू अंगावर पांघरूण घेतलेली
गारगर्द सावली.
..
भारी लिहिलंय!
18 Nov 2023 - 6:09 pm | चौथा कोनाडा
सुंदर !
चित्रदर्शी !!
वेगळ्या वातावरणात घेऊन जाणारी कविता आवडली !
कचांग म्हणजे काय ? हा शब्द पहिल्यांदाच वाचण्यात आला !