दिवाळी अंक २०२३ - काकणं

उमेश तुपे's picture
उमेश तुपे in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
1

आभाळ भरून आलं होतं. सूर्य क्षितिजावर टेकला होता. तांबूस रंगाची पुसटशी छटा अजूनही सूर्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. वाऱ्याचा वेग हळूहळू कमी झाला, तशी झाडांची सळसळ थांबली. एकाकी अंधारून आलं. पाखरं चिडीचूप झाली. परतीच्या वाटेवर असलेली जनावरं पांदीने नदीत उतरली. तोच एक वीज स्मशानातल्या पिंपळामागे लख्खपणे कडाडली. क्षणभर सगळा परिसर उजळून निघाला. तिची नजर समोर एकाकी उभ्या असलेल्या पिंपळावर गेली. नेहमीप्रमाणे आजही तो वटवाघळांनी भरलेला होता. त्या उजेडात तिला तो अधिकच भेसूर वाटला. आपलं क्षीण शरीर तिने भिंतीला टेकवलं. आता ती एकटक त्या पिंपळाकडे पाहत होती. इतक्यात टपोरे थेंब पत्र्यावर ताडताड करत वाजू लागले. थेंबांच्या शिडकाव्याने ओलसर झालेल्या मातीचा गंध हवेत पसरला. पोट कुरतडणाऱ्या भुकेचा क्षणभर तिला विसर पडला. आभाळ हळूहळू फटकलं. क्षितिजावरली पुसटशी रेषा पुसली गेली. पाखरांचा किलबिलाट पुन्हा सुरू झाला. निवाऱ्याला थांबलेली जनावरं वाटेला लागली. जिकडे तिकडे वटवाघळांसारखी लटकलेली प्रेतं तिला दिसू लागली. तिचं अंगं थरथरलं. मनातले विचार डोळ्यांवर येऊन तरळू लागले. उद्याच्या पहिल्या प्रकाशकिरणाबरोबर हा पिंपळ पुन्हा वाटवाघळांनी भरून जाईल, पण हे स्मशान मात्र पूर्वीसारखं हावरट होईलच असं नाही. आणखी काही दिवस कोरोनाची लाट ओसरली नसती तर बरं झालं असतं.. हा विचार येताच तिच्या मनात कालवाकालव झाली. आपलं पोट असं दुसऱ्याच्या मरणावर अवलंबून असावं, या विचाराने ती शहारली.

काळोख आता गडद झाला होता. मघापासून सुरू असलेला देवळावरला भोंगा पसायदानानंतर बंद झाला. एक भयानक विषण्णता तिच्या भोवती दाटून आली. आज नाही तर उद्या कोणीतरी मरंल, या आशेवर तिने महिना काढला होता. दिवसातून दोन-तीन वेळा तरी ती रवीला फोन करून कोणी गेलं का याचा तपास करत होती. आज तरी काही वर्दी मिळेल या आशेने उगवणारा प्रत्येक दिवस निराशेने मावळत होता. आपला तुटक्या बटनाचा मोबाइल तिने बाहेर काढला. गेल्या चार-पाच तासात तिने सातव्यांदा हिच कृती केली होती. पण रवीला फोन लावावा असं आज तिला वाटत नव्हतं. सारखं सारखं फोन करून तेच तेच कसं विचारावं, असं वाटून तिने पुन्हा तो परत ठेवला होता. पण पोटातली भूक आता तिला शांत बसू देईना. जवळचा सगळा पैसा कधीच संपला होता. पोटात अन्नाचा कण नव्हता. पोटाची आतडी पोटाला खाऊ लागली होती. पाण्याच्या घोटांवरच अजून किती दिवस भूक जाळायची असं वाटून तिने शेवटी मन घट्ट केलं. सवयीप्रमाणे आकडे दाबले, पण शून्य काही दाबला जाईना. रवीला फोन करायचा म्हटलं की हिच मोठी पंचाईत.. असं म्हणत तिने करंगळीच्या नखाने कसाबसा तो दाबलाच. फोनची रिंग वाजू लागली. एकदा.. दोनदा.. तीनदा.. तिची घालमेल आता अधिकच वाढली. शेवटी फोन उचलला गेला. पलीकडून आवाज आला.

"बोल मावशे"

"आरे, ते.."

"हे बघ मावशे, तू काही बोलूच नको. आगं, तुझ्यापेक्षा मला जास्त गरज आहे. कोणी मरणा झालं तर काय हाताने गळा दाबून मारू काय?"

"तसं नाही.. मी असंच म्हटलं. असलंच एखादं तर… पैशांचं काय थोडे फार इकडे तिकडे. "

"एक आहे.. तसं मग.. दोन-तीन तासांत जाईलच. ॲडमिट करुन गेलेली बाई चार दिवस झाले फिरकलीच नाही."

" बरं.. बरं.. कळव मग…."

काम मिळावं म्हणून गेल्या चार-पाच दिवसांत तिने अख्खा गाव पालथा घातला होता. पण तिला कोणी साधं दारातसुद्धा उभं केलं नव्हतं. लोक तिच्याकडे तुच्छतेच्या नजरेने पाहू लागले होते. तेल्याची म्हातारी तर जळकं लाकूड घेऊन तिच्या मागे धावली अन म्हणाली, "आता कशापायी इकडे उलथाया आली गं सटवे, तिकडंच हूडकीव मढी अन बस की पेटवत. अवदासा कुठली." तिला या बोलण्याची सवय झाली होती. तरीही हताश न होता ती चार-पाच दिवस काम मागत गावभर हिंडली होती.

दहा वर्षांपूर्वी पोरगं बायकोला घेऊन शहरात गेलं. जाताना येतो म्हणालं. तिने सगळी तयारी करून ठेवली. तिला वाटलं, येतो म्हणालंय... मग येईल कधीतरी. तिने आशा सोडली नाही. दिवसामागून दिवस जात राहिले, पण ते कधी परतलं नाही की त्याचा निरोप आला नाही. तिने वेड्यासारखी त्याची वाट पाहिली. रोज सायंकाळी शहरातून येणाऱ्या बसची वाट पाहत ती वडाच्या झाडाखाली बसायची. सूर्य मावळायचा. बाहेरगावी कामानिमित्ताने गेलेली लोकं परतायची. बस रस्त्याने धूळ उडवीत आदळत यायची. ब्रेकचा कचकच करणारा आवाज व्हायचा. गाडी वडापाशी थांबायची. कंडक्टर बेल मारत मोठ्याने आवाज द्यायचा. "आशेगाव.. आशेगाववाले चला उतरा पटकन." त्याच्या आवाजातील चढउतारही नेहमीचाच. ती उतरणाऱ्या लोकांना न्याहाळायची. ड्रायव्हर कधीतरी म्हणायचा.. "मावशे, येत नाही त्यो आता. लाज वाटते त्याला तुझी." त्याच्या बोलण्याने ती अस्वस्थ व्हायची. त्याला शिव्या घालत तिथून उठून घराकडे निघायची. लोक हसायचे. हे सगळं नित्याचंच झालं होतं. यात तसूभरही फरक पडत नव्हता. कधीतरी आपलं पोरगं येईल, आपल्याला घेऊन जाईल या आशेवरच ती जगत होती. काहींना तिची दया यायची. त्यातलीच एक म्हणजे सुताराची पारूबाई. ती तिला समजावयाची, "अगं, तो येतो म्हणाला म्हणजे जातो म्हणाला. आता किती दिवस अशी त्याची वाट पाहणार. आपलंच नशीब फाटकं, त्याला कोण काय करणार असं समजायचं आणि जगायचं." त्यानंतर तीने बस स्टँडवर जाणं सोडलं, पण वाट पाहणं काही सोडलं नाही. तिच्या मनात अजूनही कुठेतरी एक आशेचा किरण जिवंत होता. ती आता गावातच छोटं-मोठं काम करून आपल्या पोटापुरतं कमावत होती. आपल्या आयुष्याचा एक-एक दिवस ढकलत होती. पण कोरोना आला आणि तिच्या जगण्याची समीकरणं बदलली. पोटापुरतं जे काम मिळत होतं, ते कोरोनामुळं बंद झालं. कोणी कोणाला जवळही येऊ देईनात. काय करावं, कसं जगावं तिला समजेनास झालं. अशातच एके दिवशी भर पावसात रवी तिला देवदूतासारखा भेटला. त्या दिवशी ती अन्नाच्या शोधात भर पावसात बाहेर पडली होती. रवी एका 'अनाथ अंत्यविधी संस्कार मंडळाच्या' गाडीत एक प्रेत घेऊन स्मशानभूमीवर आला होता. पावसाचा जोर वाढू लागला, तसं सगळं एकदा कधी उरकतंय असं त्याला झालं होतं. त्याची अस्वस्थता तिने हेरली. तिने आपणहोऊन रवीला मदत केली. रवीला बरं वाटलं. त्यालाही कोणीतरी जोडीला हवं होतंच. रवी तिला पाचशे रुपये देऊ लागला. ती नको म्हणाली.

"तुझं हाल पाहवत नव्हतं, म्हणून मी तुझ्या मदतीला आले. "

"आगं मी काय माझ्या खिशातून थोडे देतोय? मला एका बेवारस प्रेताचे हजार रुपये मिळतात. अनाथ अंत्यविधी संस्कार मंडळाकडून. वरून प्रेताचं जवळचं कोणी आलं, तर अजून वर चार-पाचशे रुपये मिळतात. "

तिच्या साध्या सरळ स्वभावामुळे रवीचं आणि तिचं चांगलंच जमलं. त्या दिवसापासून हे तिचं नेहमीचंच काम होऊन गेलं. एका प्रेताची विल्हेवाट लावायचे रवी तिला पाचशे रुपये द्यायचा. बेवारस प्रेत मिळाल्यावर रवी तिला फोन करून आगोदर कळवायचा आणि ती सगळी तयारी करून ठेवायची. त्यासाठी रवीने तिला फोनदेखील दिला होता. ही बातमी गावभर पसरली. तिला आता गावात येण्यासही लोकांनी बंदी घातली. गावात आता आपल्याला कोणी काम देणार नाही हे तिला समजलं होतं. तिलाही आता त्या कामाची गरज वाटली नाही. महिन्याकाठी दोन- तीन हजार मिळवणारी ती आता एका दिवसात दोन हजार रुपये मिळवू लागली होती. जगण्याचा नवा मार्ग तिला मिळाला होता. तिने नदीच्या कडेला साधं एक पत्र्याचं घरदेखील बांधलं होतं. पण हळूहळू कोरोनाची लाट ओसरली आणि हातात खेळणारा पैसा बंद झाला.

भूतकाळातले काही क्षण सरसर तिच्या पुढून सरकू लागले. पोरगं नोकरीला लागावं, म्हणून आपण चाळीस मैल पायी चालत जाऊन यल्लम्माचा नवस फेडला होता. पोराचं लग्न झालं, तेव्हा आईने दिलेली सोन्याची काकणं किती प्रेमाने आपण सुनेच्या हातात घातली. त्यावरली कोयरी आपल्याला किती किती आवडायची. आपल्या आईची ती एकमेव आठवण होती. तो लहान असताना कितीदा तरी भाकर त्याला देऊन मोकळं टोपलं उगाचचं आपण झाकलं होतं. या आठवणी आता तिला नकोशा वाटत होत्या. तिच्या मनाला त्या पुन्हा पुन्हा डंख मारत होत्या. पोरगं आता कधी येणारच नाही, असं तिला कळून चुकलं होतं. त्या आठवणीने तिला उचमळून आलं. तिच्या निस्तेज डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या. कसंबसं स्वत:ला सावरत ती उठली. तांब्याभर पाणी घेतलं. बळेच दोन घोट घशाखाली ढकललं आणि ती आपल्या गोणपटावर परत बसली. आता ती रवीच्या फोनची वाट पाहत होती. कधी नव्हे ती आज कोणाच्या तरी मरणाची इतक्या आतुरतेने वाट पाहत होती. पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली. पत्र्यावरल्या थेंबांची तडतड वाढली. पिंपळाची सळसळ रातकिड्यांचा आवाजात मिसळून गेली. एक भयानक विषण्णता तिच्या सभोवार दाटून आली.

तिचं सारं लक्ष फोनकडे लागून होतं. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. रोज रोजचं तेच रटाळ जीवन जगणं आता तिला असह्य झालं होतं. किमान एक दिवस तरी आपल्या आयुष्यात काही तरी वेगळं घडावं.. स्मशान, पिंपळ, वटवाघुळं आणि रवी सोडून आपल्या आयुष्यात कशालाच जागा उरली नाही. यापलीकडे आपलं आयुष्य नाहीच का? आजचा दिवसही कालसारखाच. वेगळं काय असेल तर कोणाच्या तरी मरणाची आशा.. जिच्यावर कितीतरी माणसं जगतात, ती आशा. आज तरी तिने आपल्याला निराश करू नये. जर कोणी मरणारच असेल तर मरावं त्याने. तोच तिच्या लक्षात आलं - बऱ्याच वेळची फोनची रिंग वाजतेय. ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. घाईगडबडीने उठली. घरा बाहेरच्या काळ्याकुट्ट अंधारात आली. पावसाची रिपरिप सुरूच होती. पिंपळ अजूनही सळसळत होता. तिचे डोळे लालसेने भरले होते. सावज मिळाल्याचा आनंद तिला झाला होता. कोणाच्या तरी मृत्यूची बातमी ऐकण्यास ती आतुर झाली होती. पलीकडून आवाज आला. आवाज अडखळत येत होता. ती जराशी गोंधळली.. तोच पलीकडून पुन्हा आवाज आला,

"हॅलो.."

"हा.. हॅलो.. कोण?"

"मावशे, रवी बोलतोय. तयारीला लाग."

त्या शब्दांबरोबर तिला एकदम तरतरी आली. तिच्या अंगात विलक्षण अशी ऊर्जा संचारली. तिने नेहमीचं आपलं साहित्य बाहेर काढलं. बॅटरी हातात घेतली. काखेला गाठोडं बांधलं. एका हातात तिरडी आणि दुसऱ्या हातातील बॅटरीच्या उजेडात ती स्मशानभूमीच्या वाटेला लागली. वाट सवयीची होती. पण पावसाने निसरडी झाली होती. पाय सटकत होते, तरीही झपाझप पावलं टाकत ती काळोखाला कापत होती. गार वारा अंगाला झोंबत होता. तिच्या चपलेचा आवाज चटचट करत शांततेला चाटत होता. रातकिड्यांचा किर्र..किर्र करणारा आवाज अचानकच बंद होत होता. कुत्र्यांचं विव्हळणं सुरूच होतं. तिला हे सगळं अगदी सवयीचं होतं. अंगवळणी पडलेलं होतं. पण आज पहिल्यांदाच तिचा जीव घाबरा झाला. तिला उदास वाटू लागलं होतं. पाय जड पडले होते. हे असं आपल्याला का होतंय तिला नेमकं समजत नव्हतं. भुकेमुळे होत असावं असा तर्क करत तिने स्वत:ची समजूत घातली. नदीची वाट सोडून ती हमरस्त्यावर आली. रस्त्याने येणाऱ्या गाडीचा उजेड तिच्यावर पडला, तशी ती जरा मागे सरकली. गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली. रात्र बरीच सरल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. काचेवरून ओघळणारे पाण्याचे थेंब तेवढे चमकत होते. रवीने गाडीचं दार उघडलं. दोघांनी मिळून प्रेत तिरडीवर ठेवलं. प्रेताला स्मशानभूमीपर्यंत आणलं. सवयीप्रमाणे सगळी तयारी पटपट उरकवली. तोच एक कार रवीच्या गाडीमागे येऊन थांबली. रवीला वाटलं, कारमधली व्यक्ती खाली उतरून येईल, पण बराच वेळ झाला, तरी तसं काही घडलं नाही. शेवटी रवी म्हणाला,

"मावशे, तुला म्हणलं होतं ना.. एक बाई आहे ॲडमीट करून गेली, परत आलीच नाही.. ती आता आली बघ. "

"काय दगडाच्या काळजाची बाई म्हणायची ही.. खालीसुद्धा उतरंना झाली."

"मोठ्या लोकांचं असंच असतंय, मरायला लई घाबरतेत.. आपल्याला तरी काय.. पैशांशी मतलब.."

"ते पण खरंयं.. उरक बाबा आपलं लवकर."

दोघांनी मिळून एकदाचं सगळं काम उरकलं. आता केवळ चितेला अग्नी देण्याचं शेवटचं काम बाकी राहिलं होतं. तिने कितीतरी प्रेतांना आजपर्यंत अगदी निर्विकारपणे अग्नी दिला होता. पण आज पहिल्यांदाच तिचे हात थरथरत होते. तिचा कंठ दाटून आला. डोळ्यांना नकळत पाण्याच्या धारा लागल्या. या साऱ्याने रवी एकदम चक्रावून गेला. तो तिला म्हणाला,

"मावशे, आज काय झालंय तुला?"

"काही कळत नाही रे, अचानक काळीज तुटल्यासारखं वाटलं. मी कधी कोणाचं मरण मागितलं नाही देवाकडे, पण आज याच्या मृत्यूसाठी मात्र मी प्रार्थना केली." शेवटी कठोर मनाने तिने चितेला अग्नी दिला. हळूहळू पेट घेत सरण धुमसू लागलं. अग्नीच्या ज्वालांनी आसपासच्या अंधाराला चाटून घेतलं. पिंपळ त्या उजेडात लालभडक दिसू लागला. चितेच्या तडतडणाऱ्या आवाजातही पिंपळाचं सळसळणं ऐकू येत होतं. आता एकही वटवाघूळं पिंपळावर उरलं नव्हतं. त्या उजेडाचा फायदा घेत बाईने कार फिरवून घेतली. सरण आता चांगलंच धडाडून पेटलं होतं. रवी आता कारशेजारी येऊन उभा राहिला. काहीतरी पैसे मिळतील या आशेने काचेकडे पाहू लागलां. तोच काच सावकाशपणे वीतभर खाली सरकली. दोन हजारांची नोट असलेला एक हात काचेतून हळूच बाहेर आला. दोन हजाराची नोट पाहून रवी आनंदी झाला. आज पहिल्यांदाच दोन हजार रुपये वरचे मिळणार होते. अंत्यविधी संस्कार मंडळाकडून मिळणारे आणखी वेगळेच. त्याने पटदिशी नोट हातात घेतली. गाडी काळोखाला भेदत रस्त्याने धावू लागली. त्याने मागे वळून पाहिलं. त्याला ती दिसली नाही. तो भयभीत झालां. सभोवताली तिला शोधू लागला. मोठमोठ्याने आवाज देऊ लागला. ती शांतपणे सळसळणाऱ्या पिंपळाकडे डोळे उघडे ठेवून निष्प्राण झाली होती. दाट काळोखातून धावणाऱ्या गाडीला धगधगणाऱ्या अग्नीने कवेत घेतलं होतं. बाईच्या हातातील कोयरी असलेली सोन्याची काकणं अग्नीच्या मंद प्रकाशात अजूनही चमकत होती. किणकिणत होती.

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

12 Nov 2023 - 8:58 pm | कर्नलतपस्वी

नशीब एकेकाचे.

श्वेता व्यास's picture

13 Nov 2023 - 7:14 pm | श्वेता व्यास

अरेरे! कथा वाचताना अण्णाभाऊ साठेंच्या 'स्मशानातील सोनं' ची आठवण झाली.

टर्मीनेटर's picture

13 Nov 2023 - 10:23 pm | टर्मीनेटर

कारुण्याची झालर असलेली, अंतर्मुख करणारी कथा!

चौथा कोनाडा's picture

18 Nov 2023 - 9:50 pm | चौथा कोनाडा

जबरद्स्त रंगवली आहे.
वातावरण निर्मितीला दाद द्यावीच लागेल !
एकंदरीत भारी कथा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2023 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रदर्शी कथा. लेखनशैली सुंदर. कथेतील पात्र आणि कथानक नंबर एक.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

रंगीला रतन's picture

13 Dec 2023 - 11:04 am | रंगीला रतन

कथा आवडली.

अनिल हटेला's picture

13 Dec 2023 - 2:55 pm | अनिल हटेला

कथा आवड्ली

प्रदीप's picture

15 Dec 2023 - 9:29 pm | प्रदीप

लिहीली आहे तुम्ही. असेच लिहीत रहा.

नूतन's picture

20 Dec 2023 - 1:27 pm | नूतन

कथा आवडली. वातावरण निर्मिती छान झाली आहे