दिवाळी अंक २०२३ - एका शिक्षिकेची संघर्षगाथा

मार्गी's picture
मार्गी in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
1

पुस्तकाचं नाव - 'आकार निर्गुणाचा'
लेखिका - सौ. आकांक्षा देशपांडे.
प्रकाशक - लोकव्रत प्रकाशन, पुणे.

आपण ज्या जगामध्ये जगतो, ते जग सगळ्या लोकांना मिळतंच असं नाही. ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात, त्या सगळ्यांना मिळालेल्या नसतात. कधीकधी तर असे अनेक जण असतात, ज्यांना आपल्या अगदी दु:खांचाही हेवा वाटेल अशी स्थिती असते. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही असं भीषण जग अनेकांना मिळतं. जेव्हा अशा अज्ञात जगाचा आपण परिचय करून घेतो, तेव्हा आपल्याला एक नवीन दृष्टी मिळते. आपण किती नशीबवान आहोत आणि जीवनाने आपल्या ओंजळीत किती गोष्टींचं भरभरून दान दिलं आहे, ही डोळे उघडणारी जाणीव होते. ही कहाणी आहे एका अशाच खूप वेगळ्या जगाची आणि ह्या जगातला अंधकार मिटवणा-या दीपस्तंभाची.

आपण थोडे डोळे उघडून बघितलं, तर खरं तर असं जग आपल्यापासून काही फार लांब नसतं. आपल्याही माहितीमध्ये असे लोक कुठे कुठे असतात. आपणही अनेकदा जवळून नाही, पण थोडे लांबून बघितले असतात. हे जग आहे अशा लोकांचं, ज्यांना समाज दूर झिडकारतो. ते समोर आले तरी ते जणू अस्तित्वात नाहीत असं समजून चालतो. हे जग आहे अशा लोकांचं, ज्यांना बोलीभाषेमध्ये लोक वेडं समजतात. किंवा हे लोक अ‍ॅबनॉर्मल आहेत - आपल्यापेक्षा वेगळे आहेत, 'त्यांचं जग' वेगळं आहे असं समजतात. असं हे जग आहे बौद्धिकदृष्ट्या अक्षम किंवा बौद्धिक दिव्यांग मुलांचं व प्रौढांचं. तांत्रिक दृष्टीने त्यामध्ये स्वमग्नता (ऑटिझम), डाउन्स सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी अनेक प्रकारच्या अक्षमता (मल्टिपल डिसेबिलिटीज), अध्ययन अक्षम, हायपरअ‍ॅक्टिव्ह (अतिचंचल) या व इतर अनेक विकारांचा व लक्षणांचा समावेश होतो. सोप्या भाषेत ह्यांना एकत्रित 'बौद्धिकदृष्ट्या अक्षम' किंवा बौद्धिक दिव्यांग - विशेष मुलं व प्रौढ असं म्हणता येऊ शकेल. हे असतात आपल्यासारखेच. पण त्यांचा बुद्ध्यंक सामान्य पातळीहून कमी असतो. त्यामुळे ज्या गोष्टी सामान्य लोक सहजपणे शिकतात, त्या गोष्टी हे सहजपणे शिकू शकत नाही.

इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की, आपण नॉर्मल लोकसुद्धा अनेक गोष्टी शिकू शकत नाही. किंवा किती तरी साध्या गोष्टी शिकायला आपल्यालाही वेळ लागतो. किंवा आपणही अनेक गोष्टी करण्यासाठी 'अक्षम' असतो. त्याबरोबर आपणसुद्धा अनेकदा चंचल किंवा अस्वस्थ (हायपर) होत असतो. त्यामुळे ह्या बाबी आपल्यामध्येही थोड्या प्रमाणात असतातच. पण आपला बुद्ध्यंक एका स्तराच्या पुढे असतो आणि ह्या लोकांचा तो त्या स्तराच्या मागे असतो. त्यामुळे किती तरी सोप्या आणि मूलभूत गोष्टी ह्या लोकांना शिकणं अतिशय कठीण होतं. आपल्याला आपल्या शर्टचं बटन लावणं किंवा जेवताना घास हाताने घेणं हे कधीच एखादी कृती वाटत नाही. पण ह्या व्यक्तींसाठी ह्या गोष्टीसुद्धा एक टप्पा असतात. प्रयत्नपूर्वक शिकाव्या लागतात आणि कधीकधी अशा गोष्टी शिकायला अनेक वर्षं लागतात. विशेष मुलांना शिकवणार्‍या शिक्षक-शिक्षिकांना ह्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. एका एका विद्यार्थ्यावर अनेक वर्षं काम करत राहावं लागतं. अशाच एका विशेष मुलांच्या शिक्षिकेबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

त्यांचं नाव आहे सौ. आकांक्षाताई देशपांडे आणि गेली १८ वर्षं त्या नागपूरमध्ये विशेष मुलांना शिकवत आहेत आणि घडवत आहेत. लेखकांच्या एका समूहामध्ये त्यांचा आणि माझा परिचय झाला आणि त्याच्या कामाची माहिती मिळत गेली. एकदा नागपूरला त्यांची भेट घेण्याचा योग आला. त्यांच्या काही मुलांना भेटता आलं. तेव्हा ह्या प्रश्नाचं गांभीर्य जाणवलं. समाजामध्ये ह्या विषयाबद्दल अतिशय कमी जागरूकता आणि समज आहे, हे कळलं. त्यातून त्यांच्या कामाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली. त्यातून हळूहळू त्यांचं काम आणि ह्या विषयाची खोलीसुद्धा उलगडत गेली. त्यातून त्यांच्याबद्दलही कळत गेलं आणि ह्या विषयाचे अनेक पैलू उलगडत गेले.

आकांक्षाताईंना विद्यार्थिदशेपासूनच 'मानसशास्त्र' ह्या विषयाची ओढ होती. त्यामुळे त्यांनी मानसशास्त्रातून एमए केलं. हळूहळू ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम सुरू झालं. सुरुवातीला नवीन असताना ह्या क्षेत्रातल्या काही विशेष शाळांतून व संस्थांमधून त्यांनी काम केलं. लग्नानंतर त्या पुण्यातून नागपूरला गेल्या. स्त्री म्हणून समोर येणार्‍या अडचणी त्यांनाही आल्या. काही‌ वर्षं गृहिणी म्हणून द्यावी लागली. ह्या क्षेत्रात काम करण्याची व जॉब करण्याची इच्छा काही वर्षं स्थगित ठेवावी लागली. पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. गृहिणी असतानाही ह्या विषयाची स्वप्न बघणं सोडलं नाही. अखेर मुलगा लहान असतानासुद्धा 'विशेष शिक्षण' या स्पेशलायझेशनमध्ये बीएड केलं आणि आपल्या कार्यक्षेत्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली. लहान मुलगा, पती अनेकदा दौर्‍यावर, त्यामध्ये मुलाची वेगळी ऑपरेशन्स आणि पथ्य अशा असंख्य अडथळ्यांची ही शर्यत होती. त्यात बीएड केलं, तेव्हा अनेक वर्षांचा शिक्षणातला खंड त्रास देत होता. तरीही ताईंनी सगळ्या अडथळ्यांवर मात करून अखेर विशेष मुलांना शिकवणारी शिक्षिका म्हणून काम सुरू केलं.

समाजाने एक प्रकारे धुडकावलेल्या ह्या विशेष मुलांसाठी त्यांनी जे सोसलंय आणि जे काही करून दाखवलंय, ते ऐकताना अंगावर काटा येतो. अतिचंचल आणि स्वत:ला व इतरांना मारझोड करणार्‍या मुलांसह काम करताना त्यांना अनेक महिने पेनकिलर घेऊनच काम करावं लागलं आहे. अनेक मुलं त्यांच्या अंगावर धावून यायचे, केस ओढायचे, मारहाण करायचे. कधी रक्ताची उलटी करायचे. अशा त्या जगातलं त्यांचं हे कर्तृत्व आहे. क्षणोक्षणी संयमाची आणि धैर्याची कसोटी बघत बघत त्यांनी अक्षरश: ही तपश्चर्या पूर्ण केली आहे. सामान्य नागरिक म्हणून जगताना आपल्याला जाणवतही नाही की, पेन्सिल हातामध्ये धरून कागदावर काही उमटवणं हेही एखाद्या मानसिक अक्षम मुलासाठी खडतर टास्क असू शकतं. किंवा स्वत: कपडे घालणं किंवा स्वत:ची अंघोळ स्वत: करणं मानसिक अक्षम असलेल्या प्रौढासाठी कठीण असू शकतं. पण आकांक्षाताई त्यांना सोबत करतात, स्वीकार आणि प्रेम देतात आणि हळूहळू ही मुलं व प्रौढ एक एक खडतर टास्क शिकत जातात. ह्या वेळी आकांक्षाताई व त्या मुलांचे पालक ह्यांना होणारा आनंद फक्त तेच जाणू शकतात. ही मुलंसुद्धा अनेक गोष्टी शिकू शकतात. बरेचसे जण स्वत:चं स्वत: करायलाही शिकू शकतात. पण त्यासाठी गरज असते एखाद्याने अतिशय प्रेमाने आणि संयमाने शिकवण्याची, सतत सोबत करण्याची, प्रेम देण्याची आणि स्वीकार करण्याची. पालकांनाही खूप मोठ्या प्रमाणात मदतीची व मार्गदर्शनाची गरज असते. आणि असं काम करणा-या आणि ते यशस्वीही करणा-या थोड्या लोकांमध्ये आकांक्षाताई आहेत. अनेक महिने किंवा वर्षं काम केल्यावर जेव्हा मुलं किंवा प्रौढ काही गोष्टी शिकतात, थोडे शांत होतात, थोडे आनंदी होतात, तेव्हा त्यांचे पालक व आकांक्षाताईंसारखे शिक्षक ह्यांना होणारा आनंद तेच जाणू शकतात. असं काम त्या गेली १८ वर्षं करत आहेत.

आकांक्षाताईंचं काम जाणून घेताना नतमस्तक व्हायला होतं. पण त्यांचं वेगळेपण इथे थांबत नाही. इतकं सगळं काम करत असतानाच त्यांना अनेक प्रकारे व्यक्तिगत संघर्ष करावा लागला. म्हणतात ना, ज्याच्याकडे मोठी क्षमता असते, त्याच्यापुढे नियतीसुद्धा मोठी आव्हानं उभी करते. संसाराच्या अगदी उमेदीच्या टप्प्यावर आकांक्षाताईंच्या पतींना गंभीर आजारामुळे संसाराची जवाबदारी पेलवणं शक्य उरलं नाही. भर संसारामध्ये पतीला असं हतबल होताना बघून कोणाची हिंमत हरणार नाही? पण इथेही ताई खचल्या नाहीत. त्यांचे पती आजारपणामुळे हतबल झाले आणि संसाराची सगळी जवाबदारी ताईंनी घेतली. हिंमत टिकवली. पुढे पतींचं आजारपण वाढलं आणि डिमेन्शिया आणि पक्षाघात अशा कुटुंबीयांची परीक्षा बघणार्‍या आजाराचं निदान केलं गेलं. पण आकांक्षाताईंनी संसाराची लढाई तर पुढे चालू ठेवलीच, त्याबरोबर कित्येक मुलं व प्रौढ ह्यांच्यासाठीही त्या कार्यरत राहिल्या. आकांक्षाताईंनी केलेलं हे सगळं काम अनेक प्रकारे आणि अनेक पातळ्यांवर असलेल्या संघर्षातून केलेलं खडतर असं काम आहे आणि म्हणून ते जाणून घेणं हा अनुभव अतिशय रोमहर्षकसुद्धा आहे आणि आपण किती भाग्यवान आहोत, ह्याची जाणीव करून देणाराही आहे.

आकांक्षाताईंच्या इतक्या वर्षांच्या कामानंतर आज अशी कित्येक मुलं व प्रौढ आकांक्षाताईंच्या मार्गदर्शनाने व प्रेमाच्या सोबतीने तयार होऊन पुढे गेले आहेत. आज अशी मुलं बसने प्रवास करून पेट्रोलपंपावर जॉब करतात किंवा दुकानामध्ये काम करतात. कोणी तर हॉस्पिटलमध्ये नोकरी करून स्वत:च्या पायांवर तर उभा आहेच, त्याचबरोबर समाजाचीही सेवा करतो. असं म्हणतात की देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे आणि घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावेत! आज ही मुलं आकांक्षाताईंचं दातृत्वही घेताना दिसतात.

आकांक्षातांईंचा हा सगळा जीवनप्रवास आणि ही संघर्षगाथा पुस्तकरूपाने आपल्यापुढे येत आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं शब्दांकन मला करता आलं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. अतिशय थरारक आणि 'हर पल इम्तेहान की घड़ी' असं त्यांचं आयुष्य आहे. हे सगळं जाणून घेताना आपणही ह्या मुलांसाठी व प्रौढांसाठी कितीतरी गोष्टी अगदी सहज करू शकतो, हेसुद्धा जाणवतं. आपल्यालाही अनेकदा अशी मुलं किंवा असे प्रौढ दिसतातच. पण दुर्लक्ष किंवा अपमान करणारी आपली नजर! ती नजर जर थोडी स्वीकाराची व थोडी प्रेमाची झाली, तरीसुद्धा त्या मुलांना बरं वाटेल. शिवाय समाजात ह्या विषयाबद्दल जितकी जागरूकता वाढेल आणि समज वाढेल तितकी ह्या मुलांसाठी मदत मिळेल. अनेकदा ह्या मुलांना उपचार, थेरपी, अध्ययन साधनं ह्यांची गरज असते. किंवा काही जणांच्या बाबतीत केअरटेकरची गरज असते. त्यासाठीही समाजाने पुढे आलं पाहिजे. त्याबरोबर जर समाजात व पालकांमध्ये जागरूकता असेल, तर लवकर अशा मुलांना ओळखता येईल, त्यांची तपासणी करून अगदी कमी वयात त्यांच्या ट्रीटमेंट/ थेरपीज सुरू करता येतील. कमी वयात असं इंटरव्हेन्शन केलं, तर जास्त चांगले परिणाम मिळू शकतात.

आकांक्षाताई ह्या अंधकाराला दूर करण्याचा प्रयत्न करणार्‍या एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचं पुस्तक हे खूप मोठी प्रेरणा देणारं आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तेव्हा सर्वांना आग्रहाची विनंती की हे पुस्तक आपण जरूर वाचावं.

सौ. आकांक्षा देशपांडे.
संपर्क - 7387667180
ईमेल - akanksha1076deshpande@gmail.com

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

13 Nov 2023 - 5:59 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर पुस्तक परिचय !

बौद्धिक दिव्यांग मुलांना शिकवणे किती कर्मकठीण असते हे काही उदाहरणांवरून पहिलंय.

ह्या विशेष मुलांसाठी त्यांनी जे सोसलंय आणि जे काही करून दाखवलंय, ते ऐकताना अंगावर काटा येतो. अतिचंचल आणि स्वत:ला व इतरांना मारझोड करणार्‍या मुलांसह काम करताना त्यांना अनेक महिने पेनकिलर घेऊनच काम करावं लागलं आहे. अनेक मुलं त्यांच्या अंगावर धावून यायचे, केस ओढायचे, मारहाण करायचे. कधी रक्ताची उलटी करायचे.

वाचताना सुद्धा अंगावर काटा आला ! त्यांनी कसे सोसले आहे हे तेच जाणोत !

क्षणोक्षणी संयमाची आणि धैर्याची कसोटी बघत बघत त्यांनी अक्षरश: ही तपश्चर्या पूर्ण केली आहे.

हो ... अगदी खडतर तपश्चर्याच म्हणायला हवी !

पक्षाघात, डिमेन्शिया असल्या पतींचं आजारपणात सुद्धा त्या कार्यरत राहिल्या हे वाचून निःशब्द व्हायला होते.

आपण किती नशीबवान आहोत आणि जीवनाने आपल्या ओंजळीत किती गोष्टींचं भरभरून दान दिलं आहे, ही डोळे उघडणारी जाणीव होते !

अगदी ... यासाठी त्या जगनियंता परमेश्वराचे कृतज्ञ राहायलाच हवे !

अवांतर: लेखातले चित्र खूप सुंदर, समर्पक आणि उद्बोधक आहे

कर्नलतपस्वी's picture

14 Nov 2023 - 1:16 pm | कर्नलतपस्वी

आमच्या सासुरवाडी. सासर्‍यांच्या मित्रांची सुन आणी सौं.ची मैत्रीण, पहीला मुलगा दिव्यांग. निराशेने ग्रासलेली,कधी आत्महत्येचा विचार करणारी तरुण आई.

हैदराबादला जाऊन अशा प्रकारच्या दिव्यांग मुलांना कसे सांभाळावे, शिकवावे व किमान आत्मनिर्भर कसे करता येईल याचे प्रशिक्षण घेऊन आली. प्रथम स्वतःच्या मुला पासुन सुरूवात केली. आज कित्येक आईवडीलांसाठी आशेचा किरण,मार्गदर्शक झाली आहे.

अमिताभ बच्चन व इतर मान्यवर व्यक्तींनी तीच्या संस्थेला भेट देऊन कार्याचे कौतुक केले आहे.

तिचा खडतर प्रवास आम्हीं सर्वानी जवळुन पाहीला आहे.

खरोखर कौतुकास्पद आणी प्रेरणादायक असतात अशा व्यक्ती.

आणखीन एका माऊलींची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

14 Nov 2023 - 2:25 pm | तुषार काळभोर

हा परिचय करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
अनुभव वाचताना देखील अंगावर काटा येत होता. वर्षानुवर्षे या कार्याला वाहून घेणे केवळ अद्वितीय!
आकांक्षाताईंना मनोमन वंदन..

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 7:00 pm | मुक्त विहारि

सध्या तरी पुस्तक खरेदी बंद आहे...

पण, पुस्तक बकेट लिस्ट मध्ये टाकले आहे...

नठ्यारा's picture

14 Nov 2023 - 8:52 pm | नठ्यारा

काय म्हणणार .... ! 'आकांक्षा'पुढती जिथे गगन ठेंगणे. __/\__

आपल्या पोटच्याला सुधारणा करून दाखवलेल्या मार्गावर चिकाटी आणि धीर यांचा पाया घालून इतर अनेक मुलांची जीवने सुधारली. आकांक्षा जींना सादर नमस्कार.
पुस्तक परिचय नेटका आणि प्रेरणादायी आहे.

मार्गी's picture

3 Dec 2023 - 7:42 pm | मार्गी

सर्वप्रथम दिवाळी अंकाचे संपादक व सर्व चमूचं अभिनंदन आणि मनःपूर्वक धन्यवाद! लेख घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आणि लेखातलं रेखाचित्र फार उत्तम घेतलं आहे.

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!!

@ कर्नलतपस्वी जी, अशी उदाहरणं प्रेरणादायी असतात. ती अजून समोर आली पाहिजेत.

विअर्ड विक्स's picture

15 Dec 2023 - 4:12 pm | विअर्ड विक्स

लेख आवडला . स्वानुभवातून सांगतो कि जितक्या लवकर निदान होईल तितके रुग्ण व मुले लवकर बरे म्हणता नाही येणार पण सुधारतात . २-३ वर्षे वयोगटात बालक माईलस्टोन चुकत असेल तर त्वरित चिकित्सा करणे , दोन तीन डाँक्टरांचा सल्ला घेणे .
पालक म्हणून खंबीर राहणे जास्त गरजेचे आहे .

श्वेता व्यास's picture

29 Dec 2023 - 12:16 pm | श्वेता व्यास

पुस्तक परिचय आवडला.
समाजातील अशा लोकांमुळेच समाजाला अर्थ प्राप्त झाला आहे.
त्यांना सलाम आहे.

विवेकपटाईत's picture

29 Dec 2023 - 3:24 pm | विवेकपटाईत

प्रेरणा आणि आशेची किरण दाखविणारा लेख आवडला.