संत-सत्पुरुषांच्या सामाजिक योगदानाचे निकष

लिखाळ's picture
लिखाळ in काथ्याकूट
18 Dec 2008 - 11:22 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
सत्पुरुषांचे कार्य काय? अथवा अमुक एका संताने समाजासाठी काय केले? अश्या तर्‍हेचे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. आपण जर कुणा सत्पुरुषाला, संताला मानत असू, पूजत असू तर असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. याबद्दल थोडा उहापोह करावा आणि आपली मते जाणून घ्यावीत असे वाटल्याने हा चर्चा प्रस्ताव मांडत आहे.

समाज कार्य म्हणजे अनेकदा समाजाचा भौतीक विकास करण्यासाठी प्रयत्न असे वाटत असते. तर दुसरा एक पैलू म्हणजे मानसिक-भावनिक-शारिरीक पातळीवरची मदत. समुपदेशन, वैद्यकीयसेवा, स्वच्छता वगैरे साठी प्रबोधन इत्यादी. या सेवा समाजातल्या व्यक्तींना सरळ दिसतात आणि त्या नोंद करण्याजोग्या सुद्धा असतात. काही संतांचे काम साहित्यसंपदा निर्माण करणे, कथा कीर्तनातून प्रबोधन करणे यांत दिसू शकते.

अनेकदा असे दिसते की अध्यात्मात उन्नत अश्या एखाद्या व्यक्तीने (अध्यात्मात उन्नती म्हणजे काय ते मला माहित नाही !) आपल्याला दिसेल असे काही केलेले नसते पण त्याला अनेक भक्त मंडळी चिकटून असतात. तो संत भक्तांसाठी व्यक्तिगत पातळीवर काही करत असेल असे गृहित धरता येते.

कुणी असे म्हणते की संबंधात आलेल्या माणसाचे मन विषाल करणे हेच संताचे खरे काम. असे मानले तर सत्पुरुष असे काही करतात असे वाटते का?
उद्या जर कुणी म्हणाले की मी ज्या बुवांना पुजतो त्यांनी त्यांच्या संबंधात आलेल्या शेकडो लोकांना ते ज्या मानसिक-अध्यात्मिक स्तरावर होते त्या पेक्षा थोडे का होईना उन्नत केले. तर हे म्हणणे तुम्हाला कसे वाटेल.

संत, सत्पुरुष यांचे कार्य मोजण्याचा, आजमावण्याचा आपला निकष काय?

आपली मते जाणून घ्यायला उत्सुक आहे.
(कुणा संताचे नाव घेऊन त्याची टिंगल, उपमर्द झाल्याने इतरांची मने दुखावू शकतात हे आपण नक्कीच जाणता. त्यामुळे आपल्या लेखनातून असे काही होणार नाही असा विश्वास आहे.)

आपलाच,
--लिखाळ.

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

19 Dec 2008 - 12:19 am | मुक्तसुनीत

गाडगेबाबा हे माझ्या दृष्टीने संतत्वाचे एक आदर्श उदाहरण. समुपदेशन, वैद्यकीयसेवा, स्वच्छता , भावनिक-शारिरीक पातळीवरची मदत हे सर्व त्यांनी साधले. असे करताना समाजातल्या देवभक्तीचा आधार घेतला पण त्याच बरोबर बकरे कापणार्‍या अंधश्रद्धाळू समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजनही घातले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे , ते जिवंत असताना किंवा ते गेल्यावर त्यांची कुठे देवळे निर्माण होऊन, त्यांच्या नावावर दलालांनी उखळ पांढरे करावे हे घडले नाही . आणि हे घडले नाही याचे कारण त्यांची दृष्टी , त्यांची वागणूक , त्यांनी कटाक्षाने टाळलेले देवत्त्व हीच होत.

कुसुमाग्रजांनी बाबा आमटे यांचाही उल्लेख "आधुनिक संत" या अर्थाने केला होता असे स्मरते.

विसोबा खेचर's picture

19 Dec 2008 - 10:32 am | विसोबा खेचर

मुक्तरावांशी पूर्णत: सहमत...!

तात्या.

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 4:01 pm | लिखाळ

छान. असेच काही मत हवे होते.

प्रत्येकाला काय महत्वाचे वाटते तेच जाणून घ्यायचे आहे.
-- लिखाळ.

आजानुकर्ण's picture

19 Dec 2008 - 9:41 pm | आजानुकर्ण

गाडगेबाबांनी बाबासाहेबांना मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याऐवजी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिलेला सल्ला ही मला फार चांगली घटना वाटते.

आपला,
(तथागत) आजानुकर्ण

मुक्तसुनीत's picture

20 Dec 2008 - 3:56 am | मुक्तसुनीत

आजानुकर्ण ,
आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यातल्या संवादाबद्दल थोडे अजून सांगितले तर आवडेल. असा सल्ला खरोखरच दिला गेला होता काय ? आणि आंबेडकरांच्या धर्मांतरावर त्याचा परिणाम झालेला असल्याचा काही पुरावा आहे काय ?

गणा मास्तर's picture

20 Dec 2008 - 6:13 am | गणा मास्तर

गोनीदा लिखित गाडगेबाबांच्या चरित्रात याचा उल्लेख आहे. पुस्तकाचे नाव नक्की आठवत नाही बहुतेक 'देवकीनंदन गोपाला' असावे.
गोनीदा स्वतः गाडगेबाबांच्या मेळाव्यात काही वर्ष सामील होते.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Dec 2008 - 4:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या माहितीत त्या पुस्तकाचं नाव "संत गाडगे महाराज" किंवा असंच काहिसं आहे. आणि त्यात असा उल्लेख आहेच.
जिवंतपणी स्वतःचे पुतळे उभे करणारे राजकारणी पाहिले की गाडगेबाबांची, त्यांच्या विचारांची किती गरज आहे ते जाणवतं.

आजानुकर्ण's picture

27 Dec 2008 - 2:43 am | आजानुकर्ण

मी ह्या संदर्भात वाचलेले फार पुसटसे आठवत आहे. हिंदूधर्माला दिलेल्या इशाऱ्यानंतरही (१९३९?) २० वर्षांपर्यंत काहीही कृती होत नाही हे पाहून बाबासाहेबांनी धर्मबदलाचा (१९५६?) निर्णय घेतला. गाडगेबाबा हे त्यांचे अध्यात्मिक गुरू होते. त्यांच्या संवादांचा उल्लेख कुठे वाचला आहे हे आता आठवत नाही

आपला
(बौद्ध) आजानुकर्ण

विकास's picture

27 Dec 2008 - 4:02 am | विकास

हिंदूधर्माला दिलेल्या इशाऱ्यानंतरही (१९३९?) २० वर्षांपर्यंत काहीही कृती होत नाही हे पाहून बाबासाहेबांनी धर्मबदलाचा (१९५६?) निर्णय घेतला.

पुणे करारातून जाणवलेला फोलपणा (१९३२) आणि चवदार तळे सत्याग्रह (१९२७) या दोन गोष्टींनी आंबेडकरांचा त्रागा झाला होता. त्यांच्या एका लेखात त्यांनी चवदार तळ्यासंदर्भात लिहीले होते, की आम्हाला तळे वापरण्यासाठी विरोध झाला याचे आश्चर्य वाटले नाही. एकदम समाज बदलत नसतो. मात्र त्यानंतर तळ्याची जी शुद्धी केली गेली त्यामुळे नैराश्य/त्रागा आले/आला. गुराढोरांनी पाणी प्यायले तर चालते पण माणसासारख्या माणसाने पाणी प्यायले तर चालत नाही हा कसला धर्म....

आंबेडकरांना १९३२ साली पुणे करारात फसवणूक झाल्यासारखे वाटले. कारण त्यात झालेल्या वाटपानंतर आंबेडकरांसहीत सर्व काँग्रेसेतर "दलीत" निवडणूका हरले. (या संदर्भात जाणकार माहीती देऊ शकतील).

त्या दोन गोष्टींनंतर त्यांनी १९३५ मधे जाहीर केले की हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आंबेडकर जसे गाडगेमहारांजांना भेटले तसेच त्यांनी गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, यांना तसेच सावरकरांनापण भेटले होते हे वाचल्याचे आठवते. आचार्य अत्र्यांनी आंबेडकर आणि गाडगेमहाराजांची गाठ घालून दिल्याचे वाचल्याचे आठवते आहे. ते गाडगेमहारांजांना अध्यात्मिक गुरू मानायचे असे कधी वाचल्याचे/ऐकल्याचे आठवत नाही. गाडगेमहाराज कुणालाच स्वतःला गुरू मानून देत नसत. गोनिदांच्या पुस्तकात त्यांनी साधा नमस्कार केला म्हणून पण फटका दिल्याचे वाचलेले आठवते.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Dec 2008 - 3:15 am | llपुण्याचे पेशवेll

गाडगेबाबा कोणाला शिष्य मानीत नसत. पण त्याना गुरू मानणारे लोक असण्याची शक्यता आहे. गाडगेबाबांनी त्यांचे जे मृत्यूपत्र लिहीले होते त्यात असे म्हटले होते की "माझा कोणी नातेवाईक नाही किंवा शिष्यही नाही . कारण मी कधी कोणाला माझा शिष्य बनविलेच नाही. म्हणून माझी सारी मालमत्ता(म्हणजे त्यानी बांधलेली आणि चालविलेली धर्मशाळा आणि रुग्णसेवा केंद्रे) गरीबांच्या सेवेसाठी सरकारजमा व्हावीत."
माझ्या मते गोनीदांनी लिहीलेल्या बाबांच्या चरित्रात या मूळ मृत्यूपत्राचे छायाचित्र आहे. त्यातील अक्षरे व्यवस्थित वाचता येतात.
(गाडगेबाबा बहुतेक निरक्षर होते. त्यामुळं त्यांनी हे दुसर्‍या कोणाकडून लिहवून घेतले की काय माहीत नाही. गोनीदांचे ते पुस्तकही मी वाचलेले नाही. पण ते पुस्तक चाळताना हा फोटो दृष्टीस पडला होता)
पुण्याचे पेशवे
Since 1984

लिखाळ's picture

31 Dec 2008 - 5:05 pm | लिखाळ

माहितीबद्दल आभार. कुणी गाडगेबाबांच्या कामाची ओळख करुन देणारा लेख लिहिला तर चांगले होईल असे वाटते.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

लिखाळ's picture

26 Dec 2008 - 3:58 pm | लिखाळ

सहमत आहे. गाडगेबाबांबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'मी परवाच हे कुणाला तरी म्हणालो.' असली वाक्ये आपल्या 'दूरदृष्टीची' बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Dec 2008 - 9:51 am | प्रकाश घाटपांडे

संत, सत्पुरुष यांचे कार्य मोजण्याचा, आजमावण्याचा आपला निकष काय?

लिखाळ साहेब हे वाचल्यावर आमाल हे आठवल पघा.

प्रकाश घाटपांडे

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 4:01 pm | लिखाळ

:)
वाचतो लवकरच.
-- लिखाळ.

पिवळा डांबिस's picture

19 Dec 2008 - 10:05 am | पिवळा डांबिस

संत, सत्पुरुष यांचे कार्य मोजण्याचा, आजमावण्याचा आपला निकष काय?

या तुमच्या प्रश्नामध्ये अध्यारूत गृहीतक (एझम्शन) असे आहे की संत, सत्पुरूष यांचे कार्य मोजायची आपली (सामान्य जनांची) योग्यता आहे....
टॉल ऑर्डर, इजंट इट?
:)

अवलिया's picture

19 Dec 2008 - 2:44 pm | अवलिया

पुन्हा एकदा पिंडाकाकाशी सहमत.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 3:59 pm | लिखाळ

या तुमच्या प्रश्नामध्ये अध्यारूत गृहीतक (एझम्शन) असे आहे की संत, सत्पुरूष यांचे कार्य मोजायची आपली (सामान्य जनांची) योग्यता आहे....
टॉल ऑर्डर, इजंट इट?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

जे कोणी संत-सत्पुरुष आपल्या मते आहेत, ते श्रेष्ठ आहेत हे आपल्याला मान्य आहे. ते श्रेष्ठ आहेत, त्यांचे कार्य मोजायला आपण थिटे आहोत असे आपले मत बनायचे कारण काय? हेच विचारायला चर्चा प्रस्ताव.

-- लिखाळ.

पिवळा डांबिस's picture

19 Dec 2008 - 9:32 pm | पिवळा डांबिस

ते श्रेष्ठ आहेत, त्यांचे कार्य मोजायला आपण थिटे आहोत असे आपले मत बनायचे कारण काय?
आमचे मत बनायचे कारण असे की आम्हाला आमच्या बुद्धीची झेप, तिची मर्यादा आणि एकूणच वकूब माहिती आहे.:)
अर्थात, हे आमच्यापुरतं....
इतर आत्मविश्वासू मंडळींनी संतांच्या कार्याची लांबी-रुंदी-उंची-खोली मोजण्यास आमची काही हरकत नाही...
(कदाचित त्यातूनच विनोदी साहित्य निर्माण होईल! आणि आम्हाला विनोदी साहित्य जाम आवडतं!!!)
:)

त्याची 'लांबी रुंदी खोली उंची' मोजण्याचा डोळस प्रयत्न करणे ह्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.
प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो त्यामुळे एकाच गोष्टीचे वेगवेगळे रुप त्याच्या त्याच्या नजरेप्रमाणे दिसते.
शेवटी आपल्यातही सामान्याबरोबरच असामान्यत्वही असतंच ते दृश्यमान व्हायला अशा प्रयत्नांची गरज असते असं मला वाटतं.
मार्क ट्वेननं म्हटलंय Really great people make you feel that you, too, can become great.

अभ्यासाशिवाय, तोकड्या माहितीवर, कोणतेही निष्कर्ष काढू नयेत हे बरोबर पण 'असामान्यत्वाला हातच लावू नका, ते मोजूच नका' असा संदेश गेला की त्या ठिकाणी व्यक्तिपूजा सुरु व्हायची भीती मला वाटते.
(विनोदी साहित्य हे तसेही आम्हा लहानांकडून निर्माण होतेच की, विडंबने त्यासाठी पुरेशी आहेत, थोरांची कार्येच कशाला हवीत! ;))

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

19 Dec 2008 - 11:00 pm | पिवळा डांबिस

आमच्या प्रतिसादातील
इतर आत्मविश्वासू मंडळींनी संतांच्या कार्याची लांबी-रुंदी-उंची-खोली मोजण्यास आमची काही हरकत नाही...
जर हे वाक्य वाचले, तर
'असामान्यत्वाला हातच लावू नका, ते मोजूच नका' असा संदेश गेला
या वाक्याचा संदर्भ कळत नाही...
उलट कुठेतरी निष्कारण वाद सुरु करण्याचा प्रयत्न केलेला वाटतो....

चतुरंग's picture

20 Dec 2008 - 3:47 am | चतुरंग

वाद सुरु करायचा नव्हता आणि नाही. फक्त काय वाटले ते लिहिले.

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

20 Dec 2008 - 8:27 am | पिवळा डांबिस

माझं चुकलं.
नो ऑफेन्स टेकन बिटवीन द फ्रेंडस्!!!
:)

लिखाळ's picture

26 Dec 2008 - 4:03 pm | लिखाळ

लांबी रुंदी जास्त आहे हे जाणवते तेव्हाचा आपला ते मोजण्याचा वकुब नाही हे कळते. चतुरंगांशी सहमत आहे.
प्रत्येक मनुष्यच काही विचाराने कुणाला तरी आपल्या पेक्षा मोठा समजतो. सत्पुरुषंबद्दल ते विचार काय ते जाणुन घ्यायचे आहेत.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'मी परवाच कुणातरी हे म्हणालो होतो.' असली वाक्ये आपल्या 'दूरदृष्टीची' बतावणी करायला उपयोगी पडतात.

मुक्तसुनीत's picture

19 Dec 2008 - 8:29 pm | मुक्तसुनीत

व्यक्तिगत पातळीवर कुठल्याही गोष्टीचे मर्म जाणून घेणे , एकूणच ज्ञान संपादन करणे या संदर्भात आपल्यातल्या बहुतेकांची अवस्था "मुंग्यांनी मेरुपर्वत गिळणे" या सारखीच असते. पण म्हणून हा प्रयत्न करूच नये काय ? किंबहुना , कुठल्याही एका व्यक्तीला अनेक ऍंगल्स दिसत नाहीत म्हणून तर मिसळपाव/उपक्रम/मनोगत यांच्यासारखी व्यासपीठे !

अवांतर : कुठेतरी मागे वाचल्याचे स्मरते : कोट्यावधी योजने दूर पसरलेल्या नक्षत्रांनी खच्चून भरलेल्या आभाळाखाली उभे राहिलो असता , मला माझे क्षुद्रपण पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवतेच ; पण माझ्या सारख्या एका यःकश्चिताने याबद्दल विचार करायची , या अंतराळाला आपल्या विचारांच्या कक्षेत सामावण्याची आकांक्षा धरावी याबद्दल अभिमानही वाटतो :-)

गाडगेबाबाच...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

26 Dec 2008 - 1:30 pm | राघव

छान चर्चा सुरू केल्याबद्दल अभिनंदन!
बाकी मी तो पामर काय बोलणार यावर. मला शब्दांत नीट मांडता आले नाही तर उगाच त्या थोर व्यक्तींचा उपमर्द व्हायचा.
इतरांचे वाचतो आहे. ज्ञानात भर पडेलच. :)
मुमुक्षु

लिखाळ's picture

26 Dec 2008 - 4:14 pm | लिखाळ

बाकी मी तो पामर काय बोलणार यावर. मला शब्दांत नीट मांडता आले नाही तर उगाच त्या थोर व्यक्तींचा उपमर्द व्हायचा.
इतरांचे वाचतो आहे. ज्ञानात भर पडेलच.

या चर्चेतून माहितीत भर पडेल. जसे आजानुकर्णाने वरच्या प्रतिसादात गाडगेबाबांचा उल्लेख केला आहे.

तसेच संतांच्या आध्यात्मिक कार्याने भाराऊन जाउनच अनेक लोक त्यांना मानत असलेले आपण पाहतो. पण त्याबद्दल नक्की काय आणि कसे बोलावे असा प्रश्न पडत असावा. एकतर तो वैयक्तिक अनुभव असतो अथवा 'श्रद्धेच्या'परिघात येत असल्याने इतर लोक त्याबद्दल उलटेपालटे प्रस्न विचारुन भंडाऊन सोडतील असे वाटत असावे.
अश्या वेळी इतर विचारवंतांनी या बद्दल काय म्हटले आहे (जे आपल्याला पटलेले असेल) ते मांडले तर जास्त बरे होईल.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

राघव's picture

29 Dec 2008 - 12:16 pm | राघव

खरे आहे तुम्ही म्हणता ते.
प्रत्येकजण स्वतःच्या अनुभवांनी विचार/मत बनवत असतो. त्यामुळे मतभेद होणारच. (अर्थात् संतांनीच सांगून ठेवलेले आहे की बुद्धीभेद होईल असा वाद न घालणेच चांगले! ;) ह. घ्या.) पण आपल्या चुकीमुळे/ नीट मत मांडू न शकल्यामुळे उगाच त्या थोर व्यक्तींचा उपमर्द होऊ नये असे वाटते.

अश्या वेळी इतर विचारवंतांनी या बद्दल काय म्हटले आहे (जे आपल्याला पटलेले असेल) ते मांडले तर जास्त बरे होईल.
या विषयासंदर्भात प. पू. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातले काही उल्लेख येथे द्यावे म्हणतो. आज-उद्या कडे टाकेन.

मुमुक्षु

दवबिन्दु's picture

26 Dec 2008 - 9:12 pm | दवबिन्दु

प.पु. नरेंन्द्र महाराजानी शिवाजीमहाराजांचे उदाहरन डोळ्यापुढं ठेवुन ५५,००० जनान्ना हिंदु धरमात परत आनलं. हे पन चांगलं काम आहे.

आजानुकर्ण's picture

26 Dec 2008 - 9:46 pm | आजानुकर्ण

पपु. नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी पुणे विमानतळावर सुरक्षा रक्षकांशी घातलेला धिंगाणा आठवतो का. त्याबाबत नरेंद्र महाराजांनी काही नाराजी व्यक्त केल्याचे वाचले नाही.

आपला
(नरेंद्र महाराज व शिवाजीमहाराज यांना एकाच उदाहरणात गोवण्यापूर्वी शंभर वेळा विचार करुन ते उदाहरण न देणारा) आजानुकर्ण

अवलिया's picture

26 Dec 2008 - 10:31 pm | अवलिया

काही काही जण वेगवेगळ्या धाग्यांवर धिंगाणा घालतात, ते कुणाचे शिष्य हो? ;)
की तेच पुढेमागे गुरु बनुन शिष्यांना दिक्षा देतात :P

(महागुरु) अवलिया
अवलियाची अनुदिनी

आजानुकर्ण's picture

27 Dec 2008 - 2:36 am | आजानुकर्ण

हसू का ?

आपला,
(प्रश्नार्थक) आजानुकर्ण

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2008 - 2:20 pm | बिपिन कार्यकर्ते

ह्या धाग्यावर बर्‍याच दिवसापासून लिहायचे होते. आज जमले.

खरं तर सत्पुरुषांच्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती असेल तरच मूल्यमापन करता येईल. आणि मुख्य म्हणजे 'इट टेक्स अ थिफ टू नो अ थिफ' ह्याच्या प्रत्यासाने असे म्हणता येईल की संत ओळखायला (आणि मग नंतर त्याच्या कार्याचे मूल्यमापन वगैरे) आधी आपण स्वतः थोडेसे तसे व्हायला पाहिजे. आपण आजूबाजूला बरेच संत बघतो. आजकाल 'संत' ह्या पदवीत बरेच उपप्रकार आहेत. त्यात स्वयंघोषित 'जगद्गुरू', विहिंप प्रमाणित संत, सकाळी सकाळी 'आस्था' वगैरे चॅनल्सवर मार्गदर्शन करणारे इ. पासून शांतपणे आपापले निहित कार्य करणारे, प्रसिध्दीपासून दूर राहून खूप मोठे कार्य करणारे वगैरे सगळेच आले. इथे सोयी साठी मी 'संत' ह्या शब्दात जे अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत आहेत आणि इतरांच्या साठी काही करत आहेत त्यांच्याच समावेश करेन.

संतांचे कार्य हे दोन अतिशय भिन्न पातळ्यांवर चालत असते. त्यापैकी एक म्हणजे, ज्याला अध्यात्मिक परिभाषेत 'लौकिक' असे म्हणतात. ह्यामधे संतांनी केलेली लोकोपयोगी कामे, जनजागृति वगैरे कामे येतात. श्रीगाडगेबाबांसारख्या महापुरुषाने केलेली कामं तर सर्वांना माहितच आहेत. १९व्या शतकात होऊन गेलेल्या महान विभूतिंपैकी श्रीब्रह्मचैतन्य (गोंदवलेकर) ह्यांनी पण त्या वेळी जे भीषण दुष्काळ पडले होते तेव्हा (आजच्या रोजगार हमी योजने प्रमाणे) दुष्काळी कामे काढून अक्षरशः हजारो लोकांना अन्न पाणी मिळेल ह्याची तरतूद केली होती. कोणत्याही संताच्या (ज्याने लोकसंग्रह केला असेल) चरित्रात डोकावले तर हे एक समान सूत्र दिसते. कोणत्याही माणसाच्या 'लौकिक' गरजा भागवल्याशिवाय आणि त्यात त्याला एका पातळीपर्यंत समाधान दिल्याशिवाय त्याचे मन 'पारलौकिक' सुखाकडे वळवता येत नाही (ह्या बाबतीत स्वामी विवेकानंदांचे वाक्य प्रसिद्ध आहेच) हे ओळखून त्यांचे वागणे तसे असते.

पण एवढ्यावरच त्यांचे काम थांबते का? तर नाही. गांजलेला माणूस थोडा स्थिर झाला की मग त्याच्यातील सत्प्रवृत्ति (नसल्या तर जाग्या करून) वाढवणे, त्याला योग्य तो अध्यात्मिक उपदेश / आधार देऊन त्याची प्रगति करून देणे आणि शाश्वत / चिरंतन सत्याप्रत त्याला सुखरूप नेणे हे त्यांचे खरे उद्दिष्ट्य असते. श्रीगाडगेबाबा नुसते स्वच्छता करून थांबले का? अनिष्ट चाली रितींवर प्रहार करून थांबले का? नाही. ते करून मग त्यांनी पुढे 'देवकीनंदन गोपाला' असेच सांगितले.

आता मूळ प्रश्न. सत्पुरूषांचे कार्य मोजण्याचा आपला निकष काय? मी माझ्यापुरते बोलेन. मला स्वतःला असे वाटते की एखाद्या संताची अध्यात्मिक पातळी काय आहे हे प्रत्येकाने स्वतःला आलेल्या अनुभवावरून / प्रचितीवरून ठरवावे. त्याचे मूल्यमापन असे निकषांद्वारे करता येणार नाही. पण लौकिक दृष्ट्या मात्र त्याने / तिने किती लोकांना सत्प्रवृत्त केले, किती लोकांना ऍक्टिव्ह केले ह्यावरून साधारण मूल्यमापन करता यावे. पण शेवटी संतांचे खरे कार्य मात्र 'पारलौकिक' प्रकारचेच आहे हे मात्र लक्षात ठेवावे.

बिपिन कार्यकर्ते

राघव's picture

29 Dec 2008 - 12:17 pm | राघव

छान लिहिलेत. तुमच्या प्रतिसादाची वाटच बघत होतो. :)
मुमुक्षु

लिखाळ's picture

30 Dec 2008 - 6:28 pm | लिखाळ

पण एवढ्यावरच त्यांचे काम थांबते का? तर नाही. गांजलेला माणूस थोडा स्थिर झाला की मग त्याच्यातील सत्प्रवृत्ति (नसल्या तर जाग्या करून) वाढवणे, त्याला योग्य तो अध्यात्मिक उपदेश / आधार देऊन त्याची प्रगति करून देणे आणि शाश्वत / चिरंतन सत्याप्रत त्याला सुखरूप नेणे हे त्यांचे खरे उद्दिष्ट्य असते.

बरोबर. सहमत आहे.

पण शेवटी संतांचे खरे कार्य मात्र 'पारलौकिक' प्रकारचेच आहे हे मात्र लक्षात ठेवावे.

बरोबर.
अनेकदा चर्चांमध्ये संतांचे काम काय असे विचारता त्यांच्या लौकिक कामाचा उल्लेख होतो पण त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात जे काम केले असेल किंवा लोकांना दिशा-गती दिली असेल त्या बाबत उल्लेख दिसत नाही.

योगी अरविंदांनी परमत्त्व विद्यमान समाजमनाच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला होता असे वाचले. त्यांचे हे सु़क्ष्मातले कार्य नक्की काय होते आणि त्यांनी नक्की काय केले ते जाणून घ्यावेसे वाटते.

-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

राघव's picture

30 Dec 2008 - 5:32 pm | राघव

श्रीरामकृष्ण म्हणतात- साधूस दिवसा पहावे, रात्रीही पहावे!

श्रीमहाराज म्हणतात -
"..जो आपल्याला पाहिजे ते देत नाही तरीही हवासा वाटतो तो संत असला पाहिजे. संतांच्या अंगी इतके समाधान असते की त्यांच्या सहवासाने आपल्याला समाधान लाभते. संतांच्या सहवासात अकारण प्रसन्नता येते. जेथे सगुणाची अखंड उपासना चालते, आल्या-गेल्यास प्रेमाने अन्न दिले जाते आणि मनापासून नाम घेतले जाते तेथे संत जागृत आहे असे खास समजावे."

"..माझ्याकडे येणार्‍या लोकांत चार प्रकार दिसतात. पहिला प्रकार म्हणजे अतिशय स्वार्थी - स्वत:च्या स्वार्थासाठी जगाचा उपयोग करणारे, दुसरा प्रकार म्हणजे व्यवहारीक स्वार्थी - स्वत:सोबत दुसर्‍याचाही स्वार्थ साधण्यास मदत करणारे, तिसरा प्रकार म्हणजे नि:स्वार्थी - स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवून दुसर्‍यांना मदत करणारे आणि चौथा प्रकार म्हणजे भगवदर्थी - भगवंत या जगाचा मालक आहे व जग त्याचे आहे या भावनेने जगच्या कल्याणासाठी देह झिजवणारे. व्यक्ती ज्या पातळीवर असेल त्याहून वरच्या पातळीत जाण्यास त्याला मदत व्हावी असे माझे धोरण असते."

"..बाहेर वावरतांना काम-क्रोध आवरून धरण्याची सगळ्यांना सवय असते. पण घरात, विशेषत: बायकोजवळ, हे उफाळून येतात. त्यामुळे ज्याची बायको ज्याला साधू म्हणते तो खरा साधू असला पाहिजे."

पतितांना सुधारणे / परमार्थाकडे वळवणे हेच खरे संतांचे कार्य
--------------------------------
"कोणीही येथे आला तरी आपण त्याला थारा देता आणि साधकाने वृत्ती सुधारण्यासाठी संगत चांगली ठेवावी असेही सांगता. मग या वाईट लोकांच्या संगतीने चांगले लोक बिघडणार नाहीत काय?"

या प्रश्नावर श्रीमहाराज म्हणतात -
"अहो, जातीवंत कुत्री कुणीही पाळील. पण लूत भरलेली कुत्री पाळू त्यांना बरे करून शिकारी बनवण्यातच खरा पुरुषार्थ आहे. असे न केल्यास ही कुत्री पुढे पिसाळतात व समाजाला धोकादायक ठरतात. तेव्हा सुधारणेसाठी हे काम कुणीतरी करायला पाहीजेच ना! माझ्या गुरुंच्या आज्ञेने मी ते काम करत आहे. येथील दुर्वर्तनी माणसांपासून इतर माणसे बिघडणार नाहीत असा बंदोबस्त करूनच मी हे कार्य करत असतो."

"..संत भगवंताशी तद्रूप असतात हे खरे. पण एकच गोष्ट त्यांच्या हातून घडणार नाही अशी आहे. त्यांच्याशी कोणी कसेही वागो, ते त्याचे अनहित करणार नाहीत. कोणाचे अनहित करावे असा विचार देखील संतांच्या मनाला शिवत नाही. सर्व भूतमात्रांचे कल्याण व्हावे ही एकच पवित्र प्रेरणा त्यांच्या जीवनात उरल्याकारणाने सुष्ट व दुष्ट जीवांबद्दल त्यांच्या अंत:करणात अपार करूणा असते. तिच्यापायी ते कुणाचाही अव्हेर करत नाहीत."

वरील वाक्यांत काही चूक आढळल्यास ती सर्वस्वी माझी आहे याची खात्री बाळगावी. :)
मुमु़क्षु

संदर्भः
श्रीरामकृष्ण लीलाप्रसंग.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी.

लिखाळ's picture

30 Dec 2008 - 6:30 pm | लिखाळ

संतांचे कार्य काय असते यावर आपण दोन संतांची वचनेच इथे दिलीत याबद्दल आभारी आहे. अध्यात्मिक संतांचे काम हे अध्यात्मक्षेत्रात जास्त असते असे वाटते.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

विकास's picture

30 Dec 2008 - 7:02 pm | विकास

श्रीरामकृष्ण म्हणतात- साधूस दिवसा पहावे, रात्रीही पहावे!

साधूस कसे पहावे प्रमाणे साधू (बैरागी अर्थाने नाही) कसा असतो या अर्थी गीतेतील एक श्लोक आठवला -
"सर्व भूतांस जी रात्र जागतो संयमी तिथे, सर्व भूते जिथे जागी, ज्ञानी योग्यास रात्र ती"

याचा अर्थ "ज्ञानी योगी" रात्रपाळीवर असतो असा नाही, हे सुज्ञास सांगणे न लगे! तर पुढे होणार्‍या घटनांचा मनाशी अचूक अंदाज बांधत त्याला अनुसरून समाजाला दिशा देण्याचे काम अगदी तरलतेने (सटली) करतो आणि तसे करत असताना आत्ता ज्या मधे समाज गुंतून आनंद उपभोगतो आहे (चांगल्या पेक्षा दुरगामी हानीकारक) त्या पासून मनाने अलीप्त रहातो.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Dec 2008 - 3:14 am | llपुण्याचे पेशवेll

हा गीतेतल्या श्लोकाचा अनुवाद आहे का? का गीताई मधला श्लोक आहे.

(गीताईचा चाहता)
पुण्याचे पेशवे
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Dec 2008 - 10:52 pm | बिपिन कार्यकर्ते

उ त्कृ ष्ट !!!

बिपिन कार्यकर्ते

राघव's picture

30 Dec 2008 - 6:32 pm | राघव

अध्यात्मिक संतांचे काम हे अध्यात्मक्षेत्रात जास्त असते असे वाटते.
संतांचेही प्रकार असतात? :)

मुमुक्षु

लिखाळ's picture

30 Dec 2008 - 6:35 pm | लिखाळ

:)
नसतात.
(चर्चा प्रस्तावकाचे मात्र चांगला-बरा-वाईट असे असतात ;))
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

राघव's picture

30 Dec 2008 - 6:36 pm | राघव

मग ठीके. चालू द्या!
मुमुक्षु