एक भयानक (गंमतीशीर नसलेला) अनुभव

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
31 Jul 2023 - 3:41 pm

आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांवरुन आपल्याला आलेले अनुभव दुसर्‍यांच्याही उपयोगी पडु शकतात हे लक्षात आले म्हणुन हा अजुन एक अनुभव वाचकांपुढे मांडतोय.

पहील्यापासुन वाटेल तेव्हा ,वाटेल तिथे दर्‍या खोर्‍यात, रानावनात भटकण्याची सवय्/आवड आणि देवळात्,गुहात्,नदीकाठी, खिंडीमध्ये अशा अतरंगी ठिकाणी मुक्कामाची सवय असल्याने (अर्थात ट्रेकिंग ग्रुपबरोबर) मला कधी अंधाराची, एकटेपणाची,किर्रर्र जंगलाची,उंचीची,खोल पाण्याची वगैरे भीती वाटली नाही.त्यामुळे अपघात,लुटालूट ,चोरीमारी वगैरे गोष्टी नेहमी दुसऱयांसोबत होतात असा माझा गोड गैरसमज होता. शिवाय "अपनी गली मी कुत्ता शेर" या न्यायाने इये मराठीचिये नगरी आपल्याला कोण हात लावणार? असाही माज होताच.

असाच एकदा २०१८ च्या जूनमध्ये ऑफिसच्या एका पार्टीनंतर रात्री १२.३० च्या सुमारास घरी परतत होतो. पार्टी अचानकच ठरली होती, त्यामुळे कार नेली नव्हती, बाईकवरून गेलो होतो. गप्पा टप्पा झाल्या ,सगळे गुड बॉय असल्याने पार्टीमध्ये सॉफ्ट ड्रिंकच होती. पार्टी संपली आणि बाईकला किक मारून निघालो. निघाल्यापासूनच पोटात जरा दुखत होते, लघवीची भावना होत होती. पण घरी लवकर जायच्या नादात दुर्लक्ष केले आणि बाईक हाणली. हिंजेवाडीतून बाहेर पडून हायवेला लागलो आणि ती भावना बळावू लागली. कुठे आडोसा मिळतोय का ते बघत मी तसाच बाईक दामटत होतो. पण सगळीकडे लख्ख उजेड होता. पुढे पुढे येत सुस रोडच्या पुलापर्यंत पोचलो आणि एक आडोसा आणि अंधारा कोपरा दिसला. जे रोज या रस्त्याने येत जात असतील त्यांना २०१८ मधील ३-३ लेनचा सुस रोडचा पूल आणि आजचा रुंदावलेला पूल यातला फरक माहित असेल. त्यावेळीही तिथे १-२ पंक्चर वाल्यांची दुकाने होती पण ती यावेळी बंद झालेली होती.

तर मी बाईक कडेला लावली आणि कार्यभाग उरकायला खाली उतरलो.जेमतेम काम झाले असेल नसेल तोच रॉंग साईडने एक बाईक आली. त्या वर ३ जण बसले होते. त्यांच्यात काहीतरी बोलणे झालेले अस्पष्ट ऐकायला आले आणि बाईक माझ्यापुढे साधारण १० फूट जाऊन थांबली. सर्वात मागे बसलेला माणूस पटकन उडी मारून माझ्याकडे आला आणि काय रे? इथे काय करतो? कुठून आला?कुठे चालला? वगैरे फालतू चौकशा करू लागला. तोवर दुसरा माणूसही उतरून माझ्याकडे येऊ लागला. रात्रीचा पाऊण वाजलेला. मला एकूण प्रसंगाचा अंदाज आलाच आणि मी एकदम रस्त्याच्या मध्ये जाऊन येणाऱ्या गाडयांना हात दाखवू लागलो जेणेकरून कोणीतरी मदतीला थांबेल. पण विचार करा , रात्री १ वाजता रस्त्यात ३-४ जण हुज्जत घालत असतील तर आपण तरी तिथे गाडी थांबवू का? तरीही मी एक प्रयत्न करून पाहिला. अर्थातच कोणीही थांबले नाही, परंतु माझ्या अनपेक्षित पवित्र्याने ते लोक जरा दूर झाले. मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन मी पटकन बाईकवर टांग टाकली आणि धडधडत्या छातीने बाईक सुरु करून निघालो. म्हटले थोडक्यात वाचलो, आता पळा.

पण इतक्यात भागणार नव्हते. सावज हातातून निसटल्याचे बघून ते लोक पटापट बाईकवर स्वार झाले आणि बाईकने माझा पाठलाग करू लागले. मला अर्थातच याची कल्पना नव्हती. थोडेच अंतर गेलो असेन आणि पाषाण तलावाजवळ त्यांनी मला पुन्हा गाठले.यावेळी त्यांनी बाईक मला आडवीच घातल्याने माझी बाईक रस्ता सोडून खाली उतरली. मागचा माणूस पुन्हा उतरला आणि शिव्या देत त्याने माझ्या डोक्यात काहीतरी हाणले, अंधारात काय होते ते कळायला मार्ग नव्हता पण हेल्मेट होते त्यामुळे वाचलो. त्यांचा एकूण आवेश बघता यावेळी काही मी वाचणे शक्य वाटत नव्हते, पण जमेची बाजू म्हणजे यावेळी बाईकचे इंजिन चालू होते, काहीतरी बोलाचाली होत असतानाच मी अजून एक संधी साधली आणि त्यांना कट मारून बाईक पुढे काढली. यावेळी मात्र मी अजिबात रिस्क न घेता बाईक जोरात हाणली . इतकी जोरात बाईक मी त्या आधी आणि नंतर कधीच चालवली नसेल. पण आता जीवाचा प्रश्न होता.पावसामुळे रस्ता अर्धवट ओला झाला होता, त्यामुळे मला एकच भीती होती, की जर का बाईक घसरली तर मात्र मी आयताच तावडीत सापडलो असतो. सुदैवाने तसे काही झाले नाही. १५ मिनिटे बाईक हाणल्यावर मी चांदणी चौकातून खाली उतरलो, सहसा रात्री उशिरा इथे आय टी पार्क जवळ बॅरिकेड्स लावून पोलीस नाकाबंदीला असतात, पण नेमके त्यावेळी तिथे पोलीस दिसत नव्हते. मी बाईक तशीच पुढे हाणली आणि सरळ कोथरूड पोलीस स्टेशनला नेऊन उभी केली. आता कुठे मला जरा हायसे वाटले. आत गेलो आणि ड्युटीवरच्या पोलिसांना सगळी कथा ऐकवली. त्यावर ड्युटीवर असलेल्या बुवाने हा भाग आमच्या अखत्यारीत येत नसून हिंजवडी किंवा बाणेर पोलीस स्टेशनकडे येत असल्याने तिथे तक्रार दयावी असा सल्ला दिला तर दुसऱ्या बाईने "शी बाई, आजकाल हे प्रकार फारच व्हायला लागलेत" अशी जनरल प्रतिक्रिया दिली. एकुणात मला तिथे मदत मिळण्याची शक्यता दिसत नव्हती त्यामुळे ५ मिनिटे थांबून पणी पिउन मी तिथून निघालो. आता नेहमीचा रस्ता असूनही मी चारी बाजूला बघत चाललो होतो, प्रत्येक अंधारा कोपरा किंवा फूटपाथवर दिसणारा माणूस मला संशयास्पद वाटत होता. कसाबसा घरी पोचलो.

दुसऱ्या दिवशी हिंजेवाडी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. त्या नंतर अनेक दिवस याच प्रकारच्या बऱ्याच बातम्या पेपरमध्ये वाचत होतो. महात्मा सोसायटीच्या रस्त्यावरून रात्री १.३० वाजता घरी चाललेल्या मुंबईच्या बँक मॅनेजरला लुटले, बालेवाडी स्टेडियमजवळ पेट्रोल संपल्याने थांबलेल्या कार वाल्याला रात्री लुटले, डुक्कर खिंडीत एकाला लुटले, वारजे टेकडीवर पहाटे फिरायला गेलेल्या महिलांचे दागिने चोरले वगैरे. त्यावर कितपत कारवाई झाली माहित नाही, पण आजकाल अशा बातम्या दिसत नाहीत.

थोडक्यात काय? "अखंड सावधान असावे, कदा दुश्चित्त नसावे" हेच खरे.
a

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

विविध प्रकारे लुबाडणाऱ्या असंख्य गँग्ज उगवल्या आहेत प्रत्येक शहरात आणि आसपास.

तुमच्या कारचा धक्का लागल्याने काही अंतर अलीकडे कोणीतरी दुचाकीस्वार जखमी झाला आहे, आणि आता तुमच्यावर हे प्रकरण शेकणार. किंवा मलाच तुम्ही धक्का दिलाय. तुमच्या खिडकीतून काहीतरी खाली पडलं आहे. कारच्या फ्रंट ग्रिलमधून स्पार्क येताहेत असे काहीही सांगून व्यक्तीस काच खाली करण्यास अथवा कार थांबवण्यास भाग पाडणे आणि मग सात आठ वेगवेगळ्या प्रकारे लुटणे असे सर्व राजरोस आहे. ठक ठक गँग हा तर अगदी रुळलेला प्रकार. आता असे काही घडले की आश्चर्य वाटू नये इतके सामान्य झालेय. पण कारमधे एका लेव्हलची सुरक्षितता असते ती बाईकस्वाराला नसते. त्यामुळे त्यांची केस अधिक डेंजरस.

पुण्यातील बाह्य रस्ते, अनेक शहरांचे बायपास, अगदी गर्दीचा चौक अशी अनेक ठिकाणांची रेंज यासाठी वापरली जाते. वाढत्या बेरोजगारीशी हा ग्राफ मिळता जुळता असू शकतो.

भयानक अनुभव, काहीही होऊ शकले असते अशा वेळी, वाचलात. तसा मी बरेचवेळा रात्री इतरत्र भटकत असतो पण शक्यतो कात्रज बायपास टाळतोच. मात्र बाईक कुठेही मध्ये न थांबवणे आणि दिवसाउजेडीही अगदी कुणालाही कितीही गरजू वाटत असला तरी लिफ्ट देऊ नये ही पथ्ये कायम पाळतो.

दिवसाउजेडीही अगदी कुणालाही कितीही गरजू वाटत असला तरी लिफ्ट देऊ नये
अगदी १५-२० वर्षांपूर्वी कोणीही हात दाखवला तर बाईकवर लिफ्ट देत असे. पण नंतर एक बातमी वाचली डांगे चौकात एका बाईकवाल्याला धरले आणि त्याने ज्याला लिफ्ट दिली तो गावठी दारु घेऊन जात होता. बाईकस्वाराला केवळ लिफ्ट दिल्यामुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागला. नंतर या लुटालुटीच्या बातम्या पण यायला लागल्या. आता कोणीही असले (ओळखीचे सोडून) तर बिलकूल लिफ्ट देत नाही.
रच्याकने आम्ही मात्र शाळेत असताना पण खूपदा लिफ्ट घेऊन यायचो, कधीकधी तर बैलगाडीतून पण. पण आता मात्र दिवस बदलले आहेत.

कर्नलतपस्वी's picture

31 Jul 2023 - 5:50 pm | कर्नलतपस्वी

मानलं तुम्हाला.

प्रसंगावधान व उगाच हिरोपंती करण्यापेक्षा माघार केव्हांही चांगला निर्णय.

हे ऑफिसात सांगितल्यावर ऑफिसवाल्यांनी आता रात्रीच्या पार्ट्या करणे बंद केले असेल अशी (निष्फळ) आशा करतो.
दिल्लीतील माझ्या परिचयातल्या काहीजणांनी (यात दिल्ली पोलीसचा एक एसीपी पण आहे) कितीही जवळचे असले तरी रात्रीच्या पार्ट्यांना जायचेच नाही, असा स्वतःवर निर्बंध घालून घेतलेला आहे आणि तो ते पाळतातही. समजा कुणी याप्रकारे पार्टीत सहभागी होत नसेल, तर जास्तीत जास्त काय नुकसान होईल ? किंवा गेल्याने नेमका लाभ काय होतो ?
-- (पार्ट्यातून गुप्त होणारा) चित्रगुप्त.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Aug 2023 - 7:01 am | राजेंद्र मेहेंदळे

कोविड मध्ये रात्रीच्या पार्ट्या बंदच होत्या, आता तुरळक चालु झाल्यात (मी एकालाही गेलो नाही). पण माझ्यावर मुख्य बंधन (घरुन) म्हणजे बाईकने ऑफिसला गेलो तर ७-८ वाजता घरी यायचे, उशीर झाल्यास सरळ ओला करायची.

पार्टीत गेल्याने होणारे लाभ--सहसा न भेटणारे (सिनियर) लोक्स भेटतात आणि हॅहॅ हूहू करताना ओळखी पाळखी वाढतात.

भागो's picture

3 Aug 2023 - 10:33 am | भागो

हा लेख मी कसा मिसला बर? आता वाचला.
मला वाटत पोलिसांनी अश्या रस्त्यांवर रात्रीची गस्त घालावी. थोडातरी आळा बसेल.
कठीण आहे.

चौथा कोनाडा's picture

3 Aug 2023 - 5:59 pm | चौथा कोनाडा

भयानक अनुभव ! नशीबाने वाचलात !

अश्या कित्येक घटना रोज वृत्तपत्रात वाचण्यात येतात.
इझी मनी आणि बेरोजगारी / विषमता, गुंड प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
योग्य काळजी घेणे गरजेचं !

आपल्याच शहरांत आपल्याला घाबरून राहावं लागतं म्हणजे चोरामोरांना धाक राहिला नाही.

नचिकेत जवखेडकर's picture

7 Aug 2023 - 12:29 pm | नचिकेत जवखेडकर

बाप रे! जपून तरी किती राहायचं हा प्रश्न पडतो असं काही झालं की.