रुग्णालय व्यवस्थापन: ३ - अग्निकुंड

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in काथ्याकूट
15 Jul 2023 - 4:18 pm
गाभा: 

रुग्णालय व्यवस्थापन: १ - समुद्र
रुग्णालय व्यवस्थापन: २ - महामेरु

५ बेड ते १०० बेड चे खाजगी रुग्णालय स्थापने किंवा सुरु करणे खूप अवघड नसते. काही डॉक्टरांचे कागदपत्र, जमीन किंवा इमारत, सोबत भरपूर पैसे असले कि रुग्णालय उभं करता येतं. खरी गोम आहे ते रुग्णालय चालवण्यात. रुग्णालयात खाटा, OPD Setup, IPD Setup, ऑपरेशन थिएटर चा सेटअप, केल्यास ICU, ई. ई. ह्यावर खूप खर्च होतो, शिवाय आपत्कालीन ते अतिदक्षता विभागात लागणारी महागडी उपकरणे व त्यांचे देखभालीचे खर्च. रुग्णालयाची रनिंग कॉस्टच इतकी जास्त असते कि बरीच रुग्णालये नफा बघायच्या आधीच होरपळून निघतात.
एखादे रुग्णालय तोट्यात जाण्याचे, रनिंग कॉस्ट हे केवळ एकमेव कारण नसले तरी महत्वाचे नक्कीच असते. रनिंग कॉस्ट चा बोजा कमी मात्र नक्कीच करता येतो. कमी स्टाफ किंवा स्वस्त स्टाफ घेऊन रुग्णालये रनिंग कॉस्ट वाचवण्याचा प्रयत्न काही हॉस्पिटल करतात जे कि तेवढे प्रभावी ठरत नाही. कॉस्ट कमी कशी करावी, रुग्ण संख्या कशी वाढवावी, आलेल्या रुग्णांना कोण कोणत्या सेवा दिल्या जाव्यात, सेवांचा दर्जा काय असावा, त्यावर किती खर्च करावा, नेमके कोणत्या आर्थिक स्थरातील रुग्ण आपल्या कडे जास्त येतात, रुग्णालया भोवतीचा परिसर आर्थिक दृष्ट्या कसा आहे, एक ना अनेक आयाम असतात रुग्णालय नीट चालण्यासाठी.
रुग्णालये केवळ डॉक्टर च्या नावावर चालतात असे म्हणण्याचा काळ कधीच मागे पडलाय. रुग्णालयात रुग्ण येण्याचे ३ मार्ग असतात. एक तर Infrastructure, दुसरे म्हणजे नावाजलेले डॉक्टर/तज्ञ आणि तिसरे म्हणजे तुमच्याकडे रुग्णाची आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या किती योजना किंवा पर्याय आहेत ते.
Infrastructure कडे बघून येणारा वर्ग हा खूपच अस्थिर असतो. त्याला जर सुविधा, सेवा पसंत नाही पडल्या तर तो दुसरीकडे जातो, पण हाच वर्ग सर्वात जास्त पैसे मोजणारा असतो. हा वर्ग पैसे खर्च करताना मागे पुढे बघत नाही. यांची जी हुजुरी करण्यासाठी रुग्णालये अमाप खर्च करतात. लसीचे सरकारी दर जगजाहीर असताना एका बड्या रुग्णालयात तीच लस अति (म्हणजे अतीच) आरामदायी वातावरणात लस टोचण्याचे दसपट पैसे मोजणारे काही माझ्या माहितीतले आहेत.
खास डॉक्टरांसाठी येणारा वर्ग ते डॉक्टर कोणत्याही रुग्णालयात असले तरीही केवळ त्यांच्याकरिता येत असल्याने अशा डॉक्टरांना सांभाळावे लागते. रुग्णालयाने कोणत्या डॉक्टर ला किती किंमत द्यावी हे व्यक्तिपरत्वे ठरते. अशा डॉक्टरांनी रुग्णालय सोडले कि त्यांच्या रुग्णांची संख्या कमी होते.
तिसरा वर्ग जो आहे तो एखाद्या रुग्णालयासाठी सर्वात मोठा वर्ग असतो, जो तुमच्याकडे रुग्णाची आर्थिक बाजू सांभाळून घेणाऱ्या योजनांकरिता येतो. कॅशलेस सुविधा, आरोग्य विमा, सरकारी कॅशलेस योजना अशा विविध संस्थांच्या पॅनल वर तुमचे रुग्णालय अंगीकृत असायला हवे. या वर्गाला चॉईस नसतो, विम्याच्या नियमानुसार रूम कॅटेगरी व इतर सुविधा त्यांना मिळतात ज्या त्यांनी निमूटपणे स्वीकारायच्या असतात. ह्या वर्गाकडून येणाऱ्या मोबदल्यात काही प्रमाणात नफ्याचे टक्के जरी कमी असले(अजिबात नसतात, तरीही) तरी प्रचंड मोठी लोकसंख्या या वर्गात मोडत असल्याने यांच्याकडून येणारा बिजिनेस रुग्णालयासाठी सर्वात मोठा असतो.
या सर्व सेवा, सुविधा रुग्णालयात आणणे आणि त्या अविरत पुरवत राहणे प्रचंड खर्चिक असते.

क्रमशः

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

16 Jul 2023 - 6:57 pm | कर्नलतपस्वी

एक चॅलेंज. येणारे अनुभव, मानवी नमुने ,हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना व कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकलात तर लेख मालिका रोचक होऊ शकेल.

म्हया बिलंदर's picture

18 Jul 2023 - 9:21 am | म्हया बिलंदर

प्रतिसाद व सूचनेसाठी धन्यवाद. हे लिहीत असताना रोचक, रंजक करणे हेतू नसल्याने तसे असेल. या मालिकेचा पूर्ण ड्राफ्ट तयार असल्याने यात तर नाही पण भविष्यात सर्व सूचनांचा नक्कीच उपयोग होईल. भरपूर शिकायचं राहिलंय.

विवेकपटाईत's picture

18 Jul 2023 - 6:33 am | विवेकपटाईत

२०० बेड हॉस्पिटल मध्ये २००० स्टाफ आहे ही माहीत. बहुतेक टार्गेट अचीव करणे सुरू होण्याचे हेच कारण.

विजुभाऊ's picture

19 Jul 2023 - 2:25 pm | विजुभाऊ

आपल्याकडे रुग्णसेवेचे दर प्रचन्ड असतात.
काही हॉस्पिटल्स मधे दिवसातून एकदाच होणार्‍या डॉक्टरच्या व्हिजीट चे सहाशे ते हजार रुपये फी लावलेली असते.
यात हे डॉक्टरसाहेब केवळ एकदाच येवून रुग्णाची विचारपूस करतात. तीही घाऊक स्वरूपात. ( म्हणजे वॉर्डात जर तीस रुग्ण असतील तर ते सर्वांनाच त्या वेळेस एक ते दीड मिनीट भेटतात. ( म्हणजे त्या एका तासाचे सहाशे * तीस असे १८००० असे बील केले जाते .)
रुग्णाच्या इतर खर्चात नर्सिंग , स्टे वगैरे चार्जेस असतातच.
रुग्णालयाच्या खर्चात सर्वात मोठा खर्च हा प्रीमायसेस . आणि अवजारे/ मशिनरी यांवर होतो.
त्याचे स्वतंत्र बील आकारलेले असते. तसे गरज नसतानाही तपासण्या करायला लावतात ते वेगळेच.
हा सर्व खर्च रुग्णाच्या माथीच मारला जातो