थ्री कप्स ऑफ टी : ग्रेग मॉर्टिन्सन आणि डेविड रेलीन : पुस्तक परिचय

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
27 May 2023 - 6:35 pm

थ्री कप्स ऑफ टी. : ग्रेग मॉर्टिन्सन आणि डेविड रेलीन.
या पुस्तकाच्या नावात बरेच काही दडलेले आहे.गिलगिट बाल्टीस्तानमधे एक म्हण आहे. की जेंव्हा बाल्टीस्तान मधले लोक तुम्हाला एक पहिला चहाचा कप देऊ करतात त्यावेळेस ते अतिथी चे स्वागत करायचा शिष्टाचार म्हणून असते. तुम्ही त्यांच्यासाठी आगांतुक असता.
ते जेंव्हा तुम्हाला चहाचा दुसरा कप देऊ करतात तेंव्हा त्यानी तुम्हाला त्यांचे पाहुणे म्हणून स्वीकारलेले असते. आणि सन्मानार्थ चहाचा दुसरा कप पुढे केलेला आहे.
ते जेंव्हा तुमच्या सोबत चहाचा तिसरा कप पितात तेंव्हा नक्की समजा की त्यानी तुम्हाला आता त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आपले मानलेले आहे.

"`आम्ही कोणाही व्यक्तीसमवेत काम करण्याचे ठरविल्यास, त्या व्यक्तीबरोबर चहाचे तीन कप पिण्याची आमची परंपरा आहे. चहाचा पहिला कप घेताना तुम्ही आमच्यासाठी अनोळखी व्यक्ती असता. चहाच्या दुसऱ्या कपाबरोबर आमचे तुमच्याशी मित्रत्वाचे नाते जुळते. तिसऱ्या कपाबरोबर आम्ही तुमचे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून स्वागत करतो आणि वेळप्रसंगी कुटुंबासाठी आत्मबलिदान करण्यास आम्ही मागे पुढे बघत नाही.’ – हाजी अली."

व्यवसायाने मेल नर्स असलेला ग्रेग मॉर्टिन्सन हा एक गिर्यारोहक पाकिस्तान मधील के२ या हिमालयीन शिखरावर गिर्यारोहण करण्यासाठी जातो.
के २ हे हिमालायातील काराकोरम पर्वतरांगामधील जगातील दुसर्‍या क्रमांचे उंच पर्वत शिखर. चढाई साठी एवरेस्ट्प्रमाणेच अत्यंत अवघड. ही जागा म्हणजे पाकिस्तान आणि चीन मधल्या भौगोलीक सरहद्दीवरचा प्रदेश.
आपल्या बहीणीच्या आठवणी साठी मॉर्टिन्सन ने या चढाईची मोहीम हाती घेतली. अत्यंत कठीण हवामान आणि चढण या मुळे ग्रेग चा शारीरीक आणि मानसीक कस लागतो. चढाई अयशस्वी होते.भरीत भर म्हणून ग्रेग वाट चुकतो आणि अस्कोले गावातल्या बेस कँपच्या ऐवजी कोर्फे गावात येतो . ग्रेगचा जगापासूनचा संपर्कही तुटतो.ग्रेग अत्यंत थकवा आणि हवामानामुळे येणारी भ्रमिष्टता या अवस्थेत तो पर्वताच्या तळाच्या कोर्फे गावात येतो आणि बेशुद्ध पडतो.
हिमालयातल्या एका दरीतले हे गाव इथे ग्रेगला गावचा सरपंच हाजी अली ग्रेगला घरी घेऊन येतो.
अनोळखी असूनही गावातले लोक त्याची काळजी घेतात. त्याची शुश्रुषा करतात. ग्रेगची भाषा देखील गावातल्या लोकांना समजत नसते. पण ग्रेगच्या हे लक्ष्यात येते की या गावात कसल्याच वैद्यकीय सुवीधा नाहीत की मुलांसाठी शैक्षणीक सुवीधादेखील नाहीत.
गावचा सरपंच हाजी आली ची इच्छा आहे की गावातल्या मुलींना शिक्षण मिळावे. गावाच्या अतीदूर असल्यामुळे हाजी आलीला इच्छा असूनही शिकायला मिळाले नव्हते.
आजारातून बरा झालेला ग्रेग गावकर्‍याना आश्वासन देतो की मी परत येईन आणि तुमच्या आदरातिथ्याची आणि उपकाराची परत फेड म्हणून गावासाठी एक शाळा बांधून देईन. हे एक अवघड आश्वासन आहे. अवघड अशासाठी की ग्रेगजवळ स्वतःसाठी रहायचे घरही नाही.
अमेरीकेत गेल्यावर ग्रेग ने अनेक देणगीदारांशी संपर्क केला. अक्षरशः हजारो लोकांना भेटला . सिलीकॉन व्हॅली मधल्या जीन होर्नी या ने ग्रेगवर विश्वास ठेवून त्याला पैसे देऊ केले.
ग्रेग कोर्फेला पुन्हा येतो आणि त्या दुर्गम भागात गावकर्‍यांच्या मदतीने शाळा बांधून देतो. ग्रेगचे काम इथे संपत नाही. हा भाग इतका दूर्गम आहे की तेथून दुसर्‍या गावाला जायचे असेल तर हिमालयातील उसळत वहाणारी नदी ओलांडून जावे लागते. नदीवर पूल नाही आणि नदीच्या प्रवाहांमुळे नाव वगैरे शक्यच नाहे. नदी ओलांडताना वाहून जाणे , अपघात होणे हे नित्याचे. थोडक्यात नदी ओलाम्डायची ती अक्षरश; जिवाची जोखीम घेऊनच.
अतीदुर्गम भागातले खेडे आणि कट्टर विचारसरणी या मुळे लोक मुलींना शाळेत पाठवत नाहीत. त्यांची समजूत घालणे, मुलींना शिकवणे अशा अनेक अडचणीतून ग्रेग गेला. पण त्याने आपले काम जिद्दीने चालवले.
जग ज्या वेळेस दहशवादाचा सामना करत होते त्याच वेळेस ग्रेग मुलींसाठी शाळा बांधत होता तेही कट्टरवाद्यांचा स्वर्ग असलेल्या प्रदेशात. नदीवर दोरीचा पूलही बांधत होता.
ग्रेग च्या प्रयत्नाना सरपंच हाजी आली ची साथ आहे. ग्रेग ने इथल्या मुलींना नुसतेच प्राथमीक शिक्षण दिले नाही तर तर त्यांच्यात पुढे शिकण्याची जिद्दही जागवली. पुस्तकात एक प्रसंग येतो ज्या वेळेस गावातील पंचांची सभा बोलावलेली असते तेथे स्त्रीयांना प्रवेश नाही. शाळेतील मुली या पंचसभेत जातात आणि तेथे स्वतःची बाजू मांडतात. जवळच्या गावातल्या शाळेत जाउ देण्यासाठी पंचांना परवानगी देण्यासाठी भाग पाडतात.
हे सगळे करत असताना ग्रेग ला इमाम आणि मौलवींकडून फतवे धमक्या वगैरे नेहमीच मिळत होत्या. ग्रेग वर पाश्च्चात्य शिक्षण देऊन मुलींना बिघडवतो वगैरे आरोपही केले गेले.
इतके सगळे असूनही ग्रेग ने इथल्या मुलींना शिकवले. सरपंच हाजी आली च्या मदतीने गावातील लोकांची कट्टर विचारसरणी बदलली. मुलगी शिकली प्रगती झाली हे त्यांना पटवले. गावात प्राथमीक का होईना वैद्यकीय सोयी सुरू केल्या.
ग्रेग मॉर्टिन्सन ने स्थापन केलेल्या सेंट्रल अशिया इन्स्टिट्यूटने इथल्या भागात" इशान्य पाकिस्तान, पी ओ के , अफगाणीस्तान मधे ५० पेक्षा अधीक शाळा सुरू केल्या. आणि इथल्या मुलींना शिक्षणाची दारे उघडून दिली. इथल्या गावकर्‍यांचं जगणे सुसह्य केले आहे. या शाळा पुढेही चालू रहातील याची ही ग्रेग ने सोय केली.
हे सगळे करत असताना ग्रेग लिहितो की त्या वेळेस कारगील युद्ध चालू होते. आकाशातून पाऊस पडावा तसा गोळ्यांचा आणि ग्रेनेड्स्चा वर्षाव होत होता. आणि आम्ही त्या पासून मुलांना आणि स्वतःला वाचवत शिकवत होतो.
सरपंच हाजी आली यानी लहानपणी शिकायला दुसर्‍या गावी जाण्यासाठी त्यानी केलेला आटापिटा अक्षरशः थक्क करणारा आहे. काठ्यांच्या मोळीला स्वतःला बांधून घेतले आणि नदीत उडी मारली. काठ्यांची मोळी वहात जाऊन दुसर्‍या किनार्‍याला लागली. आणि मग तेथे राहून थोडेफार शिक्षण घेतले.
पुस्तक वाचताना बरेचदा सावित्री बाई आणि ज्योतिबा फुल्यांची , धोम्डो केशव कर्व्यांची आठवण येते.

हे पुस्तक खरेतर ग्रेग मॉर्टिन्सन आणि डेव्हिड रेलीन या दोघांच्या नावावर आहे. पण ही कहाणी आहे ग्रेग ची डेव्हिड रेलीनच्या नजरेतून मांडलेली आहे.
मेहता प्रकाशनाने या पुस्तकाचा सिंधू जोशीनी केलेला अनुवाद प्रकाशित केलेला आहे.

वाङ्मयविरंगुळा

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

28 May 2023 - 7:32 am | शेखरमोघे

विजुभाऊ, सुन्दर परिक्षण.
ही कुठल्या काळातली घटना आहे, काही कल्पना?

ग्रेग ने १९९३ मधे के२ चढाईचा प्रयत्न केला होता.
पण त्या नंतर जवळजवळ तो तीन वर्षानी पुन्हा तेथे गेला आणि राहीला.
मूळ इंग्रजी पुस्तक हे २००६ मधे प्रकाशित झाले.
त्यानी स्थापन केलेल्या सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूट ने त्या भागात १७२ शाळा उभ्या केल्या त्यामधून ६४००० मुलांना शिक्षण दिले ( यात ५४००० मुली आहेत).

गोरगावलेकर's picture

28 May 2023 - 10:55 am | गोरगावलेकर

मराठी अनुवाद असेल तर वाचायला आवडेल.
कारगिलचा उल्लेख असल्याने सन १९९९ च्या आसपासचा काळ असावा

गोरगावलेकर's picture

28 May 2023 - 11:17 am | गोरगावलेकर

१९९९ ला आम्ही काश्मीर सहलीवर असतांनाच कारगिल युद्ध सुरु झाले त्यामुळे कारगिल डोक्यात अगदी पक्के बसले आहे.

प्रचेतस's picture

28 May 2023 - 12:58 pm | प्रचेतस

मराठी अनुवाद उपलब्ध आहे. बुकगंगावर मिळेल

गोरगावलेकर's picture

28 May 2023 - 1:37 pm | गोरगावलेकर

आधी कुठे वाचनालयात मिळाले तर बघते

Bhakti's picture

28 May 2023 - 1:54 pm | Bhakti

ऋण परतफेड करण्याची छान‌ कथा आहे.

कर्नलतपस्वी's picture

28 May 2023 - 2:49 pm | कर्नलतपस्वी

परिचय.

टर्मीनेटर's picture

28 May 2023 - 4:44 pm | टर्मीनेटर

मस्त! पुस्तक परिचय आवडला 👍
ध्येयवेड्या ग्रेग मॉर्टिन्सनला दंडवत 🙏