अलीकडचेच प्रचेतस यांचे बदामी , ऐहोळे लेणी वरील माहितीपूर्ण लेख आणि राजेंद्र मेहंदळे यांचा लोहगड, भाजे लेणी लेणीवरील अगदी ताजा असा सुंदर लेख वाचला आणि मलाही नुकत्याच केलेल्या एका छोट्याश्या उन्हाळी भटकंतीतील लेण्यांबद्दल सांगावेसे वाटायला लागले.
मुंबई परिसरात प्रसिद्ध कान्हेरी व एलिफंटा या गुफांव्यतिरिक्त आणखीही काही गुफा आहेत त्या म्हणजे जोगेश्वरीची गुफा, अंधेरी येथील महाकाली गुफा तसेच दहिसरची मंडपेश्वर गुफा. यापैकी दोन गुफा पाहण्यासाठी कुटुंबातीलच आम्ही सहा जण लोकलने सकाळी दहा वाजता जोगेश्वरी स्टस्टेशनला पोहचलो.
आंबोली लेणी किंवा जोगेश्वरी लेणी
लेणी सहाव्या शतकातील असून पूर्वी आंबोली लेणी म्हणून ओळखली जात असे. एका छोट्या टेकडीचा सम्पूर्ण भाग आतून कोरलेले हे मुंबई परिसरातील (कदाचित भारतातील) सर्वात मोठे हिंदू गुफा मंदिर आहे असे मानले जाते.
जोगेश्वरी स्टेशन पूर्व येथून गुफांसाठी शेअर रिक्षा मिळतात. १०-१५ मिनिटात रु.१२/- माणशी भाडे देऊन गुफांना पोहचलो.
रिक्षातून उतरल्यावर रस्त्यालगतच टेकडीचा खडक कोरून लेण्यात जाणारा रस्ता नजरेस पडतो .
लेणीची माहिती सांगणारा, भारतीय पुरातत्व खात्यातर्फे लावलेला फलक
प्रवेश द्वारापाशी पोहचल्यावर दोन्ही बाजूस एक याप्रमाणे मूर्तीचे भग्न अवशेष असलेल्या खोल्या आहेत. लेणीला दोन प्रवेशद्वारे असून सध्या पश्चिम दिशेला असलेलले हे मुख्य प्रवेशद्वार आहे. पूर्वीचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेला असावे त्यामुळे सोयीच्या दृष्टीने आपण पूर्व द्वाराकडून माहिती घेऊ.
टेकडीवरून काही पायऱ्या उतरत पूर्वद्वाराकडून आपण अग्र मंडपात येतो.
दोन्ही बाजूला एक याप्रमाणे चार स्तंभ व दोन अर्धस्तंभ असलेल्या खोल्या आहेत. उजव्या बाजूस भव्य व सुंदर अशी गणेश प्रतिमा आहे.
डावीकडील बाजूस सप्त मातृकांचे अवशेष आहेत असे वाचले आहे पण मी निरखून पहिले नसावे किंवा अंधार असल्याने नजरेस पडले नसावे.
अग्रमंडपातून आपण एका मोकळ्या प्रांगणात येतो
येथून वरच्या मजल्यावर एक खोली दिसते ते सध्याचे दत्त मंदिर. गुहेतून येथे जाण्यासाठी पायऱ्या नाहीत. गुफेच्या बाहेर येऊन छताकडून येथे उतरावे लागते.
दत्त मंदिर
प्रांगणातून आपण मुखमंडपात येतो . मुखमंडपाच्या दोन्ही बाजूस चार स्तंभ व दोन अर्धस्तंभ असलेल्या खोल्या आहेत. मुखमंडपातून मुख्य सभागृहात जाणाऱ्या दरवाजाच्या बाजूस व वर सुदर कोरीव काम आहे दरवाज्याच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आपल्या सेवकासहित दिसतात.
वरच्या बाजूस मध्यभागी लकुलीश आपल्या शिष्यांसहित दिसतो.
लकुलीषबद्दल माहिती येथे वाचावयास मिळेल
डाव्या बाजूस 'कल्याणसुंदर शिव ' मूर्ती आहे.
कल्याणसुंदर बद्दल माहिती येथे वाचू शकता
उजव्या बाजूस शिवपार्वती सारीपाट खेळताना दिसतात.
मुखमंडपातून प्रवेश झाल्यावर आपण वीस स्तंभांवर आधारित भव्य सभामंडपात येतो.
मंडपाच्या मध्यभागी जोगेश्वरी (योगेश्वरी) देवीचे मंदिर आहे. यावरूनच लेणीला तसेच उपनगराला जोगेश्वरी नाव पडले.
सभामंडपाच्या पश्चिमेला सध्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे जेथून आपण सुरुवातीला प्रवेश केला होता.
सभामंडपाच्या दक्षिणेला तीन दारे व दोन खिडक्या आहेत ज्या एका मोठ्या व्हरांड्यात उघडतात. सध्या एकच दार उघडे असते.
दार
खिडकी
सभागृहाच्या दक्षिणेकडील दरवाजातून बाहेर पडले कि एक लांबलचक व्हरांडा आहे. व्हरांडा १०० फुटाहूनही अधिक लांबअसून त्यास दहा स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत.
व्हरांड्यात सुरु असलेले धार्मिक विधी.
लेणीच्या वरून घेतलेला फोटो
व्हरांड्याच्या पुढे प्रांगण असून एका बाजूस महादेव मंदिर आहे.
येथील एक खडक व त्यातील कोरीव शिल्प
शेवटच्या कोपऱ्यात हनुमान मंदिर आहे.
या बाजूच्या कोपऱ्यात सांडपाण्याची दुर्गंधी जाणवते. गुफेच्या वरील व आजूबाजूचे अनधिकृत बांधकाम यास कारणीभूत असावे.
सध्या तरी गुफेवरील काही बांधकामे तोडल्याचे नजरेस पडते.
साधारण दीड तास गुफेत फिरून पश्चिम दरवाजाने परत मुख्य रस्त्याला आलो. आता पुढे महाकाली गूंफाना जायचे होते. येथून बहुतेक सर्व रिक्षा (शेअर) जोगेश्वरी स्टेशनला जाणाऱ्याच होत्या. कोणीही महाकाली गुफांकडे यायला तयार होत नाही.गुफांच्या दिशेने चालत निघालो. थोडे अंतर गेल्यावर मात्र दोन रिक्षा मिळाल्या, दोन्ही वेगवेगळ्या रस्त्याने गेल्या. एकीचे भाडे झाले रु.३८/- तर दुसरीचे रु ४८/- . जास्त भाड्याची रिक्षा मात्र अंतर जास्त असूनही रस्ता चांगला व कमी रहदारीचा असल्याने कमी वेळात पोहचली.
कोंडिविते लेणी किंवा महाकाली गुफा लेणी
पूर्वीच्या कोंडीविते गावालगत असल्याने या लेणीस कोंडीविता लेणी असे ओळखले जाते. नंतर या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या देवी कालीमातेच्या मंदिरामुळे ही लेणी महाकाली गुफा म्हणून ओळखली जाऊ लागली.
लेणी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० पर्यंत पाहता येते.
बेसाल्ट खडकात कोरलेली १९ लेणी येथे आहेत. लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व २ रे शतक ते इसवी सन 6 व्या शतक सांगितला जातो.
लेणीसाठी तिकीट लोगो स्कॅन करून काढावे लागते. एक तिकिट जास्तीत जास्त पाच जणां मिळून काढता येते. आम्ही सहा जण असल्याने एकासाठी वेगळे तिकीट काढावे लागले. (नांव , ई-मेल देणे , ऑनलाईन पेमेंट करणे वयस्क किंवा काही लोकांसाठी कंटाळवाणे ठरते). प्रवेश फी रु.२०/- प्रत्येकी.
आवारात प्रवेश करतो त्या बाजूने पुढे गेल्यावर लांबट टेकडीच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला १५ लेणी आहेत
टेकडीच्या मागील बाजूस म्हणजे या वायव्येस (उत्तर-पश्चिम) बाजूने चौथ्या ते पाचव्या शतकातील 4 लेणी.
या फलकावर प्रत्येक गुफेबद्दल माहिती दिली आहे.
गुगल लेन्स वापरून फलकावरील माहिती जशीच्या तशी :
मुंबई उपनगराच्या पश्चिम विभागातील अंधेरी येथील कोंडीविटे लेणी इ.स.पूर्व २ ते ६ व्या शतकात कोरल्या गेलेल्या मानवनिर्मित एकुण 19 बौद्ध लेण्यांचा समावेश असलेले दोन गट असुन १४ पाण्याच्या टाक्या व १ शिलालेखाचे संशोधन आहे. कालौघात लुप्त झालेल्या या लेणीची सर्वप्रथम नोंद १९ व्या शतकात ब्रिटिश सेक्रेटरी श्री एंथोवेन यांच्या निदर्शनाखाली १९०९ मध्ये मुंबई किल्ला (Bombay Castle ) येथे क्र. ५२२७ सर्वे नं ३ मध्ये नोंद करण्यात आली. यात १५ लेण्या पुर्वाभिमुख व ४ लेण्या पश्चिमाभिमुख आहेत येथील खडक ज्वालामुखीय जाळीदार ब्रेशिया प्रकारातील असुन सखल टेकडीवर स्थित आहे.
लेणी क्र. १ ओसरीसहीत लहान विहार आहे. लेणी क्र. २ मध्ये अर्ध उठावदार स्तुपाचे शिल्प असुन ते आता ठिसूळ अवस्थेत आहे. लेणी क्रमांक ३ हे बौद्ध भिक्खू विश्रामस्थान असुन लेणी क्र. ४ मोठी पाठशाला आहे. या लेणीच्या उजव्या बाजुला सप्तमस्तकी फणाधारी नागाचे शिल्प जे बुद्ध धम्माचे प्रमुख प्रचारक उपासक असलेल्या नाग वंशाशी संबंधित आहे. समोरच ४ फुट उंचीचे एक खंडीत स्तूपाची शिला आढळते. लेणी क्र. ५,६,७,८. लहान मोठी विहारे आहेत. लेणी क्र.९ हे मुख्य चैत्यगृह असुन आयाताकार सभागृहस्थीत बंदीस्त चैत्यशैलीत व दर्शनी भाग हा गोलाकार भिंत, मध्यभागी दार व दोन्ही बाजूस जाळीदार खिडक्या आहेत. उजव्या खिडकीच्यावर पाली प्राकृत भाषेत व धम्मलिपितील २ ओळीतील दानवर्णीत शिलालेख आहे.
सभागृहाच्या उजव्या भिंतीवर मुखभग्न तथागत गौतम बुद्धांच्या धम्मचक्कपवत्तन मुद्रेतील पद्मप्रलंबीत (आसनावर बसुन पाय कामळपुष्पावर ठेवलेले) आसनस्थ शिल्प आहे. वरील बाजुस उडते २ गंधर्व (विद्याधर) आहे. वरील चौकटित तथागत गौतम बुद्धांच्या मुखभग्न पद्मासनातील धम्मचक्कपवत्तन मुद्रास्थीत कमळावरील आसनस्थ १२ शिल्पापैकी सध्या १० शिल्पे पाहता येतात. खालच्या बाजुस सप्तमस्तकी फणधारी २ नाग वंशातील उपासकांनी कामळाच्या देठाला तोलुन धरलेत सोबत स्त्रीया व चवरीधरी सेवक आहेत. तथागत गौतम बुद्धांच्या उजव्या व डाव्या बाजुस कमळ पुष्पावर उभे असलेले पद्मपाणी बोधीसत्व व वज्रपाणी बोधीसत्व शिल्प कोरलेले आहे. लेणी क्र. १० विहार असुन उजवीकडे दुसरे सप्तमस्तकी नागाचे शिल्प पुर्ण झिजलेल्या अवस्थेत आहे. लेणी क्र. ११,१२,१४,१५ ही लहान मोठी विहारे आहेत. लेणी क्र.१२ भिक्खु निवास असुन भिक्खूच्या आरामाकरीता / झोपण्याकरीता शैलमंचक (दगडी बाक) कोरण्यात आले आहे. लेणी क्र. १३ मोठा मंडप विहार असुन ४ भव्य नक्षीदार आधारस्तंभ आहे. यात ८ लहान शुन्यागार खोल्या व शैलमंचक आहेत. पश्चिमेकडील लेणी क्र. १६ दाराजवळ विशिष्ट पाण्याची टाकी पाहता येते पावसाचे पाणी टाक्यात जमा होण्यासाठी वरुन खालपर्यंत एक लांब चरसुद्धा खोदण्यात आली आहे. ४ लेण्यापैकी २ विहारात ६ फुट ला लांबीचे भिंतीमध्ये कोरलेले शैलमंचक आहे. लेणी क्र. १७ व १८च्या ठिकाणी सर्वात मोठे पाण्याचे टाके असुन १८ च्या दर्शनी भागात अर्धउठावातील २ फुट स्तुपाची प्रतीकृती कोरण्यात आली आहे.
भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण खात्यातर्फे या लेणी गॅझेट नोटिफिकेशन क्र. २७०४-ए दिनांक २६-०५-१९०९ नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षीत केल्या आहेत.
पाली -: पश्चिकामाथे वाथवस बमणस गोतम गोतस पितुलस देयधमं विहारोस भातुकाय*
मराठी -: पथिकामा येथे राहणार्या गोतम गोत्राच्या, पितुल नावाचा बमणाने आपल्या त्याचा भावाबरोबर विहार (लेण्याचे) धम्मदान दिलेले आहे
तुटून पडलेला एक अवशेष.
एका खडकावर विसावलेल्या दोन म्हाताऱ्या.
नाग शिल्प
नऊ नंबरचे मुख्य लेणे / चैत्यगृह
अजून काही लेण्यांचे फोटो
समोरच्या बाजूच्या गुफा बघून झाल्या. खूप भूक लागली होती. प्रवेश करतानाच आतमध्ये जेवता येत का अशी विचारणा केली होती. लेणीत बसून खाऊ नका. बागेत बसून खायला काही हरकत नाही असे सांगण्यात आले आहोत. सोबत आणलेल्या गोड दशम्या, शेंगदाण्याच्या कुटाची चटणी व इतर पदार्थ असे मस्त सहभोजन झाले. पिण्याच्या पाण्यासाठी असलेले कूलर बंद पडले आहेत पण एक नळ सुरु होता त्यामुळे पाण्यासाठी अडचण आली नाही.
जेवण झाल्यावर मागील बाजूच्या गुफा पाहिल्या व लेण्यांच्या वरील टेडीवर फेरफटका मारला.
लेण्यांच्या वरून दिसणारा दोन्ही बाजूंचा नजारा
लेणी पाहून बाहेर पडलो. अगदी प्रवेश द्वाराजवळून अंधेरी (पूर्व) स्टेशनकरिता बेस्टच्या बस सुटतात. तिकीट दर रु.५/- मात्र. येथून चौघे जण परत फिरले.
आम्ही दोघेच उरलो. कोंडीविते लेणीला महाकाली नाव कसे पडले ते जाणून घेण्याची उत्सुकता होती. लेणीच्या बाहेर पडतांना येथील कर्मचाऱयांकडे चौकशी केली. त्यातील एकाने माहिती दिली. पूर्वी मागील बाजूस टेकडीवरून उतरण्यासाठी एक रस्ता होता. पायथ्याशी कालीमातेचे मंदिर आहे त्यावरून लेणीस हे नाव पडले. आता रस्ता नाही. तुम्हाला जायचे झाल्यास बाहेर पडून टेकडीला वळसा घालून गेल्यास मंदिर सापडेल. अंतर जास्त आहे त्यामुळे रिक्षा करून गेल्यास बरे पडेल.
बाहेर येऊन १०-१२ रिक्षावाल्यांकडे विचारणा केली. कोणालाही हे ठिकाण माहित नव्हते. शेवटी एक रिक्षावाला भेटला. त्यालाही मंदिर माहित नव्हते पण त्याने येण्याची तयारी दाखवली. टेकडीच्या मागे सिप्स भागातून विचारात विचारत निघालो. छोट्या रस्त्याहून जात जात एका ठिकाणी रस्ताच संपला. पुढे पायी जाण्यासाठी घरांच्या दोन रांगांमधून फरश्या बसवलेली वाट होती. मंदिर याच रांगेत शेवटी आहे असे समजले. रिक्षा तेथेच थांबवून आम्ही पायी निघालो. (लेणी पासून जवळपास ४-५ किमीचा फेरा पडला होता)
जवळ आल्यावर 'जुना महाकाली मंदिर' असा बोर्ड असलेले मंदिर मिळाले. बांधकाम अलीकडच्या काळातले वाटत होते आणि दरवाजाही बंद होता.
तेव्हड्यात कुंपणाच्या आत एक महिला दिसली. तिच्याकडून मंदिर दु.१२ ते ४ बंद असते असे कळले. तुम्ही कोण, कुठून आलात अशी विचारणा केल्यावर तिने दरवाजा उघडला. देवीची मूर्ती असलेले मंदिरही पडदे टाकून बंद केलेले होते.
त्या हिंदी भाषिक बाईशी अजून थोड्या गप्पा झाल्या. सुमारे १५० वर्षांपूर्वी त्यांच्या कुर्ला येथील पूर्वजांच्या स्वप्नात दैवी आली होती व या टेकडीच्या पायथ्याशी माझा शोध घ्या असे तिने सांगितले होते. त्यानुसार शोध घेतला असता ही स्वयंभू मूर्ती सापडून तिची स्थापना केल्या गेली होती. आता त्यांची पाचवी पिढी देवीची सेवा करीत आहे असे कळले. देवीच्या नावावरूनच मरोळ व आजूबाजूचा भाग महाकालीच्या नावाने ओळखला जाऊ लागला.
नंतर तिने मंदिराचे पडदे बाजूला सारले, दिवे लावले व आम्हास देवीचे दर्शन घडविले.
जाणत्या लोकांनी हेच ते जुने महाकाली मंदिर आहे का यावर जरूर प्रकाश टाकावा .
(सध्या महाकाली केव्ह्स रोडला कुठेतरी एक नवीन महाकाली मंदिरही झाल्याचे कळते.)
थोडा वेळ थांबून आम्हीही परतीच्या प्रवासास सुरुवात केली.
प्रतिक्रिया
9 May 2023 - 2:54 pm | गोरगावलेकर
जोगेश्वरी लेणीच्या माहितीबद्दलचा हा एक फोटो
9 May 2023 - 3:11 pm | टर्मीनेटर
लेख आणि फोटोज छान 👍
फार पूर्वी कधीतरी, मला वाटतं शालेय सहलीत पाहिलेली हि लेणी आता विस्मृतीत गेली होती. मुंबईत तशी जवळच्या अंतरावर असली तरी पुन्हा कधी तिथे जाणेही झाले नाही!
9 May 2023 - 3:56 pm | गोरगावलेकर
प्रतिसादाबद्दलआणि लेख तत्परतेने भटकंती विभागात हलविल्याने संपादित करून वरील फोटो मला लेखात टाकता आला याबद्दल धन्यवाद
9 May 2023 - 9:32 pm | कंजूस
सविस्तर वृतांत आवडला.
फोटो आवडले.
फेसबुकवर एक ग्रूप काढून लोकांना रविवारी बोलवून लेण्यांची माहिती देऊ शकता. तुमच्याकडे हौशी टीम घरचीच आहे.
मुंबईत बागांची माहिती देणारा एक Facebook ग्रूप आहे त्यात मी कधीकधी जातो.
"Tree Appreciation Walks Mumbai"
महिन्यातून एक रविवारी एका बागेत असतो.
तर अशी माहिती मराठीत देणारा ग्रूप असावा.
पुन्हा एकदा आभार. काय, कुठे ,जावे कसे ,किती वेळ लागतो,काय पाहावे सर्वच देत आहात. छान.
10 May 2023 - 9:08 am | गोरगावलेकर
उत्साहवर्धक प्रतिसाद. फेसबुक ग्रुपबद्दलची सूचना चांगली असली तरी ते शक्य नाही. मुळातच अभ्यास कमी त्यात लोकांशी समोरा समोर संवाद साधणे यात खूपच मागे पडते. मिपाकर सांभाळून घेतात हेच खूप. सुचनेबद्दल आभार.
10 May 2023 - 10:17 am | राजेंद्र मेहेंदळे
मस्त भटकंती
शंभर वेळा महाकाली केव्हज रोड किवा कोंडिविटा येथुन आलो गेलो असेन. पण कधीच ईथे असे काही असेल असे वाटलेच नाही. वेळ काढुन जायला हवे एकदा. (तसे तर मी एलिफंटा आणि कान्हेरी सुद्धा बघितलेले नाही. येउंद्या एक लेख त्यावरही.)
10 May 2023 - 10:28 am | Bhakti
छान भटकंती! शिवकल्याण छान आहे.
10 May 2023 - 10:37 am | कर्नलतपस्वी
लेख वाचताना संपूर्ण लेण्यां स्वतः फिरून बघितल्या सारख्या वाटल्या.
खरोखर एखाद्या प्रशिक्षित पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शका प्रमाणे ओघवते वर्णन आहे.
10 May 2023 - 10:55 am | प्रचेतस
तपशीलवार आणि सुरेख वर्णन.
जोगेश्वरी लेणीतील स्तंभ घारापुरी, आणि वेरुळ येथील धुमार लेणीतील स्तंभ शैलीशी मिळते जुळते आहेत. कोंकण मौर्यांनी बहुधा ही लेणी कोरली असावीत. दत्तमंदिरातील दत्त प्रतिमा ही बहुधा घारापुरी किंवा वेरुळ येथील सदाशिवाच्या सारखी (त्रिमुखी शिव) असावी. येथील शेंदूर काढून मूळ रूप तपासले जायला हवे.
महाकालीच्या बौद्ध लेण्या आवडल्या. कान्हेरीतील शैलीशी खूपच साम्य आहे. येथील कातळरचनाही साधारण तशीच दिसतेय. येथील शिलालेखाचे वाचन मला माहीत नव्हते. मात्र ब्राह्मणाने दिलेले बौद्ध धर्मदाय हे रोचक आहे.
आपण महाकाली नावाचा तपास घेऊन मूळ महाकाली मंदिर पाहिले हे फार आवडले. सहसा अशी ठिकाणे लोक बघत नाहीत. आपण ते आवर्जून पाहिले आणि येथे त्याबद्द्ल माहिती दिलीत हे उत्तम.
10 May 2023 - 6:01 pm | कंजूस
एक तर नातेवाईकांकडे गेल्याने वेळ काढला जात नसे. पण आज समारंभातून नाश्ता झाल्यावर हळूच सटकलो. किल्ल्यात {रायवळ} आंब्याची झाडे खूप आहेत. पडलेले आंबे गोळा केले.
वसई स्टेशन पश्चिम येथून दर दहा मिनिटांस नपाची 'किल्लाबंदर' बस थेट किल्ल्यात नेते. शाळेत असताना ट्रीपला येथे जायच्या (वज्रेश्वरी गरम पाण्याची कुंडे अधिक वसई किल्ला.)
11 May 2023 - 10:10 am | गोरगावलेकर
@राजेंद्र मेहेंदळे: या भागात जाणे येणे असेल तर सहज बघता येतील लेणी. कान्हेरी आणि घारापुरी दोन्ही लेण्या पाहिल्या आहेत. फोटोंच्या निमित्ताने परत भटकंती करायला हवी
@भक्ती: प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@कर्नलतपस्वी: लेखातून आपल्यालाही भटकंतीचा आनंद मिळाला हे वाचून छान वाटले. खरोखर एखाद्या प्रशिक्षित पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शका प्रमाणे ओघवते वर्णन आहे. हे म्हणजे आपल्या मनाचा मोठेपणा आहे.
@प्रचेतस: आपल्या प्रतिसादातूनही नवीन नवीन माहिती मिळत राहते. धन्यवाद.
12 May 2023 - 3:05 am | पर्णिका
सुरेख आहे ही लेणी... सविस्तर माहिती आणि फोटोंमुळे तर मजा आली.
बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे !
लेखातील लिंक्स वीकएंडला आरामात वाचेन.
या बाजूच्या कोपऱ्यात सांडपाण्याची दुर्गंधी जाणवते. गुफेच्या वरील व आजूबाजूचे अनधिकृत बांधकाम यास कारणीभूत असावे.
फार वाईट वाटले हे वाचून...गुफेवरील काही बांधकामे तोडल्याचे नजरेस पडते.