महाराष्ट्र शाहीरः नोंदी

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जनातलं, मनातलं
5 May 2023 - 5:21 pm

"महाराष्ट्र शाहीर" पाहिला.

चित्रपटाची चित्रपट म्हणून मला चिकित्सा करण्याची अधून मधून उबळ येते, त्या अर्थाने हा रसास्वादही नाही, परीक्षणही नाही, समीक्षा तर नाहीच नाही. चित्रपट किंवा कुठलीही कलाकृती, निरपेक्ष नीरक्षीरविवेक मांडून तपासायचे माझ्याकडून हळू हळू कमी होत आहे. एरवी स्मरणकातरतेचे मला वावडे आहे. मराठीला ग्रासलेल्या स्मरणकातरतेची उबग येते. विशेषतः मराठी चित्रपटांना एखादा हिट फॉर्म्युला सापडला की दळ दळ दळण दळतात. नॉस्टॅल्जियाचे म्हणालतर खूप मोठे मार्केट आहे. मराठी चित्रपटांना ते सतत खुणावत असतं. त्याची जाणीव ठेवूनच हा चित्रपट पाहायला घेतला. क्वचित असं होतं - अनेक भावभावना मनात एकाच वेळेस दाटून येतात, त्यात स्मृतीही मिसळतात, विचारांची क्लिष्ट सघनता नष्ट होते. मनावर समाधानाचा तवंग पसरतो. आपल्या आत अजूनही ओल आहे याची जाणीव होते, डोळे भरून येतात. आठवणी आहेत म्हणून याला स्मरणकातरता म्हणत नाही, कारण हा भावनासमुच्चय त्याहून जास्त खोल आहे.

मला एकदम टोकदार अस्मिता आहेत याची पावती पदोपदी मिळत असते. परमुलुखात असल्याने तर माझी 'मराठी' ही अस्मिता अलिकडे खूपदा उफाळून येते. मग मी उगाच "बहु असोत सुंदर", अमीन मोमीन यांचे कोल्हापुरी कीर्तन, अजय अतुलची गाणी, भावगीतं अगदी शाळकरी देशभक्तीपर गीतं, भजनं, लावण्या, 'व्ह्टाचं डाळिंब' असलं काहीतरी लखलखीत लिहिणारे खेबुडकर; असं वाट्टेल ते अस्मितेच्या अंगानं लूपवर ऐकत असतो. मध्यंतरी मला सकाळी भूपाळ्या ऐकल्याशिवाय चैनच पडत नसे. नाट्यसंगीत जरी फारसं ऐकलं नाही तरी जयमाला शिलेदार, रामदास कामत अशी मंडळी शफलवर अचानक कुठून तरी येतातच. आपण मराठी आहोत म्हणजे नक्की काय आहोत हे तपासत राहण्याची कायम खोड जडलेली असते. त्यात मी कम्यूट करताना शेजारून सर्बियन, पंजाबी, कुर्दिश, फारसी अशी कुठलीही भाषा कानावर पडते. लोक अजूनही फोनवर, एकमेकांशी मोठ्याने बोलतात हीच किती आश्वासक गोष्ट आहे. मन लगेच भाषा विषयाशी लगट करायला सुरु करते.

इयत्ता चौथी मध्ये एकदा वर्गात खापरे बाईंनी सांगितलं की जिल्ह्याच्या ठिकाणी एएम रेडिओ स्टेशनवर "गर्जा महाराष्ट्र माझा" हे समूह गीत गायला जायचे आहे. पाच मुला-मुलींची निवड होईल. माझी लै इच्छा होती आपली निवड व्हावी म्हणून. निवड काही झाली नाही. का कुणास ठाऊक! तिल्याळकर नावाचा माझा तेव्हाचा "बेस्ट फ्रेंड" निवडला गेला. निवड झालेला ग्रुप रोज पंधरा दिवस वर्गात मधल्या सुट्टीनंतर ह्या गीताचा रियाज/तालीम करत असे. तीन चारदा ऐकून मला गीत पाठ झाले तरी बिचारा तिल्याळकर सारखं फम्बल मारे. शेवटी शेवटी त्याला जमू लागलं.

रेडियो वर हे गीत ऐकलं. थोड्या अढीने. आता विचार करताना ग्रुपमधल्या मित्रांची/मैत्रिणींची आडनावं, त्यांच्या कुटुंबाची सामाजिक पत तपासण्याचा मोह होतो. ताकाला जाऊन भांडं न लपवता स्पष्ट सांगू इच्छितो की त्यात मला जातीय आणि वर्गीय बायस आता दिसतो. खरंतर आता त्याचेही फार काही वाटत नाही. सांस्कृतिक गोष्टींमध्ये कितीतरी सूक्ष्म पातळ्यांवर असे शहरी, पांढरपेशा वर्गाचे प्राध्यान्यक्रम नांदत असतातच. ते मी स्वीकारले आहे. मी हा अनुभव का सांगत आहे असं विचाराल तर त्याचे उत्तर "महाराष्ट्र शाह्रीर" या चित्रपटातसुद्धा दडलेले आहे.

आपला सांस्कृतिक वरचष्मा कायम राहावा यासाठी प्रचंड धडपडणार्‍या वर्गात माणुसकीचे झरे जिवंत होतेच. सेवाभावी वृत्तीचे कित्येक आत्मे सुबत्ता, आर्थिक स्थैर्य नाकारून, द्रारिद्र्याच्या उन्हात शिजण्यासाठी खेडोपाडी पसरले. सगळेच निढळाच्या घामात भिजले नाहीत तरीदेखील विशेषतः शिक्षणासारख्या मुलभूत क्षेत्रात त्यांनी हाडं झिजवली. काहीजणांनी स्वतः गवंडीकामं करून शाळा बांधल्या. डॉ. श्रीपाद जोशी हे आमच्या शाळेचे हेडमास्तर. साने गुरुजींच्या धडपडणार्‍या मुलांपैकी एक.
गुरुजींची प्रॉक्सीच आहे हा थोर माणूस.

मी साने गुरुजींचा फॅन आहे. "श्यामची आई" पूर्णपणे न वाचता. मी दोन्ही कळपांत नाही. ब्राह्मणी मध्यमवर्गीय संस्कारांचे गाईडबुक म्हणून मी त्या पुस्तकाची पूजा करत नाही, हेटाळणीदेखील करत नाही. कधीतरी मी "श्यामच्या आई"ची चेष्टा केली असेल. हांइंडसाईटमधून श्यामच्या आईचे, श्यामच्या कुटुंबाचे मूल्यमापन केले असेल परंतु साने गुरुजींबद्दल मला खूप आदर आहे. कारण मला आमच्या जोशी सरांबद्दल प्रचंड आत्मीयता आहे. माझे पेंटिंग्ज पाहून मला कुशीत घेऊन ज्यांच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहिले त्या आमच्या सरांच्या जिव्हाळ्याचा झरा मला साने गुरुजींच्या हृदयात उगम पावताना जाणवतो. गुरुजींची 'खरा तो एकचि धर्म' प्रार्थना मी दहा वर्षे रोज म्हंटलेली आहे. आज त्या प्रार्थनेचा शब्द न शब्द किती महत्त्वाचा आहे हे कळतं. अगदी आतून कळतं.

महाराष्ट्र शाहीर मधले गुरुजी ज्याने साकारले आहेत त्याला खरंच धन्यवाद, कास्टिंग डिरेक्टरलाही धन्यवाद. अगदी असेच असतील गुरुजी.

महाराष्ट्र शाहीर साने गुरुजींची परंपरा सांगतो. गाडगे बाबांची परंपरा सांगतो. नाना पाटलांची, कर्मवीरांची परंपरा सांगतो. अगदी व्यवस्थित. कुठलीही सांस्कृतिक लाज न बाळगता, त्या परंपरेवर इस्त्री न फिरवता. आज लोकांनी गाडगे महाराजांना उभा चिरला असता. "स्त्रीला चपलेची जागा द्यावी, मुलीला जाता येता थोबाडावे" असे मौलिक विचार सांगणारं कॉमेडी कीर्तन बहुजनांना सहजगत्या आवडून जातं, त्यात काहीही वावगं वाटत नाही. कुणी चिकना चोपडा धामाधीश अंधश्रद्धेच्या बागा इसवीसन २०२३ मध्ये फुलवतो. लाखो लोक त्याचा आदेश शिरोधार्य मानतात. आणि शाहीरांची, तिच्या मऊसुत अस्सल अहिराणीत गाडगेबाबांना 'माय' म्हणणारी आजी पाऊणशे वर्षांपूर्वी खेडेगावात जगून गेलेली असते.

माझी पणजी मला म्हणत असे - 'एका सप्त्याला गाडगेम्हाराज आल्यालं. पाच दिस हितं बसून मी तेंचं कीर्तन ऐकलं. पाच दिस आमच्या हातची भाकर खाल्ली त्येंनी. हातानंच खाल्ली. सकाळ व्ह्यायच्या आतच समदी सत्रीबाग झाडून टाकायचे. हट्ट घरणार.' तिला आठवेल तसं ती सांगायची. डोक्यावर खापर होतं हेही तिनं बरोबर सांगितलं. तिचं अप्रूप तसंच ताजं होतं. सहावी सातवीला या डेबूजीचा धडा होता. त्यामुळं आम्हालाही पणजीच्या या किश्श्याचं अप्रूप. हळू हळू हा परटाचा डेबुजी बेदखल केला जाईल. लोकांच्या आचारातून तो तर गेलाच आहे, पाठ्यपुस्तकांमधूनही तो त्वरेने घालवला जाईल. डार्विन सारख्या जग बदलवणार्‍या माणसाला बेदखल केला तर या डेबुजीची काय बिशाद आहे?

कोल्हापुरात आमच्या आयुष्यात प्रा. आनंद गिरी आले. ते आले आणि महाराष्ट्रात (अधिक स्पेसिफिक पश्चिम महाराष्ट्रात) असलेली, वैविध्याने थक्क करून टाकणारी लोकसंस्कृती तिच्या विपन्नावस्थेत का होईना आली. अत्यंत अवघड, वैचारिक अशी आध्यात्मिक कुटं एकमेकांना घालून त्यांच्या सुगम फोडी करून रात्र रात्र रंगवणारे कलगी तुरेवाले आले. प्राणप्रिय 'शिवशंभूराजा' हृदयात ठेऊन बाया बापड्यांना परंपरेकडे तसेच आधुनिकतेकडे, शिक्षणाकडे, आरोग्याकडेही नेणारे लोकशाहीर आले. त्यांची आडनावे तुम्हाला झी मराठीच्या सिरीयलांच्या नावप्रभावळीत आजही अवपादाने दिसतील. दळवी, कोळी, महापुरे, माळी, शिंदे, बारे, भांगरे, बोटांगळे, पोवार, बुक, हिलगे, म्हादवे, वसेकर, वारगे,भोसले, कांबळे, भुपेकर, वांद्रे, आवटी, जंगम, रेडेकर, शिंदे, मालगुंडे, सुर्यवंशी, भुयेकर, पेरीडकर, गायकवाड अशा असंख्य आडनावांचे हे कलावंत. कसलाही नॉस्टॅल्जिक रोमँटिकपणा न करता परंपरा वाहणारे पाईक. हाही महाराष्ट्रच आहे, हे भान मात्र मराठी चित्रपटांना जवळ जवळ नव्हतेच. अगदी नटरंग मध्येही हा तमाशाचा बेगडीपणा पुरेपूर भरला आहे.

एका मित्राच्या लग्नाला मी गारगोटीला गेलो होतो. आजकाल लग्नांत "संगीत" वगैरे ठेवायची फॅशन आहे. त्या निमित्ताने वर्‍हाडींसाठी करमणूक म्हणून एका लोकल म्युझिकल नाईट छाप ग्रुपाला आवतण होतं. अशा कृतक कार्यक्रमाचा शेवट एका गायकाने "माझी मैना गावाकडं र्‍हायली" या गाण्याने केला. ग्रुप बहुतेक निपाणी भागातला असावा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे तुकडे चुकार उल्केसारखे असे कुठून कुठून आदळतात. निपाणी म्हंटलं की महादेव मोर्‍यांचीही आठवण येते. गाण्याशी, साहित्याशी स्वतःला जोडून नवा महाराष्ट्र घडवणारा हा सगळा असा विविधरंगी समाज, तळागाळातली लोकं आज उघड उघड कर्मवीरांसारख्यांना शिव्या देणार्‍या वर्गाच्या भजनी कसा काय लागलाय?

अजय-अतुल यांना लोकसंगीताची चांगली समज आहे असं त्यांच्या प्रयोगांतून जाणवतं. परंतु ही लोकधारेची समृद्धी चित्रपटातून जरा विस्तृतपणे यायला हवी होती, संगीताच्या अंगाने आणि कथेच्या अंगानेही. एकसाची तमाशापटांनी खूप नुकसान केलं आहे. यशवंतरावांसमोरचा प्रसंग थोडा अतिरंजित वाटला, केदारशिंदेकन्येचा अभिनय बालहट्टी प्राथमिक वाटला. गाणी सुपरिचित असूनही अंगावर रोमांच आले. "गर्जा महाराष्ट्र माझा" उस्फुर्तपणे ओठी आले. उणिवा खूप आहेत, तरीही मला हा चित्रपट आवडला.

हा चित्रपट केदार शिंदेने केला म्हणून त्याचे आभार. त्याच्याकडून काही खूप मोठ्या कामाची अपेक्षा नव्हती. यावेळेस मात्र त्याने प्रामाणिकपणाला वाव ठेवला आहे, "पिंजरा बनाया सोने का" सारख्या शब्दांना जागा दिली नाही हे ही नसे थोडके. अंकुश चौधरी चांगला नट आहे हे त्याने परत सिद्ध केले. त्याचा मेकअपही एकदम चपखल वाटला. नेहमीप्रमाणे वेशभूषा कृतक आहे. काही फॅक्च्युअल चुका आहेत ( झेंडा, नथी) त्याही लवकर लक्षात आल्या असत्या तर बरं झालं असतं.

भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजून झाले आहे. पुनरेकवार दिल्लीचे तख्त फोडतो का महाराष्ट्र ते पाहू.

एकंदरीत हे असं आहे.

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 May 2023 - 7:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

चित्रपट परीक्षण आणि त्या निमित्ताने आलेला नॉस्टॅल्जिया(बापरे-किती मेहेनत हा शब्द टायपायला) आवडला. तूनळीवर वगैरे बरेच प्रमोशन केले आहे. गाउ नको किस्ना आणि मधुमास गाणी महिना भर आधीच लोक प्रिय झाली आहेत.

मी तिकिटे काढली होती, पण चित्रपट काही कारणाने बघता आला नाही. आता नक्की पाहणार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...

आमची प्रेरणा

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 May 2023 - 7:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

कलाकाराची एखादी अप्रतिम कला अनेक पिढ्यांना मार्गदर्शन,प्रेरक असते हे खरं आहे,यांचा अनुभव १ मे महाराष्ट्र दिनी घेतला.लेकीला 'जय जय महाराष्ट्र माझा' गाणं तूनळीवर ऐकवलं तिने ते ऐकलं समजून घेतलं तिला इतकं आवडलं की ती दिवसभर ते गुणगुणत होती.
कलाकार कसा घडला हे जाणून घेणं तर अजून छान आहे.

कर्नलतपस्वी's picture

6 May 2023 - 5:50 pm | कर्नलतपस्वी

मस्त. बघीतला पाहीजे.

कर्नलतपस्वी's picture

6 May 2023 - 5:51 pm | कर्नलतपस्वी

मस्त. बघीतला पाहीजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2023 - 9:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्र शाहीरच्या निमित्ताने वेगवेगळ्या आठवणी उत्तमच लिहिल्या आहेत. आवडल्या. काल चित्रपटाला सुरुवात केली आणि मग कंटाळा आला, बघूया पुन्हा प्रयत्न करतो. आणि पोच देतो. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे