माझी आवडती पुस्तके भाग: १

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
13 Mar 2023 - 5:17 pm

नमस्कार, परवा एका प्रश्न आणि उत्तर साईटवर तुमचे सर्वात आवडते पुस्तक कोणते? असा प्रश्न विचारला होता. त्यानिमित्ताने मी हा लेख लिहला होता. त्यामध्ये थोडेफार बदल करून तो मिपावर पोस्ट करतोय.

तशी मी भरपूर पुस्तकं वाचली नाहीयेत पण फारच कमी वाचलीयेत असं पण नाही (अजुन बरीच पुस्तके वाचायची आहेत त्यामुळे मला स्वतःला नेहमी वाटत असतं की माझं वाचन अजुन खूपच कमी आहे.) आता त्या सगळ्या पुस्तकांमधून माझं सर्वात आवडत एकच पुस्तक निवडणं खूपच अवघड काम आहे.. खेळण्याच्या दुकानात सगळी आवडती खेळणी समोर पाहिल्यावर एखाद्या लहान मुलाची जी मनःस्थिती होते अगदी तशीच मनःस्थिती सर्वात आवडतं पुस्तक निवडताना माझीही होते. त्यामुळेच कोणतंही एक पुस्तक न निवडता आत्तापर्यंत सर्वाधिक आवडलेल्या १० पुस्तकांची यादी मी बनवली. त्यापैकी ५ पुस्तकांबद्दल, ती का आवडली याबद्दल लिहिणार आहे. ती बनवताना काही निकष लावले जसे की पुस्तकाची भाषा, मनाला भावलेली व अगदी जवळची वाटणारी (relatable) कथा, त्या पुस्तकामुळे मिळालेला नवीन दृष्टीकोन, लेखकाची शैली ई.

माझी सर्वात आवडती ५ पुस्तके

१. ही वाट एकटीची:

या पुस्तकाची कथा मला खूप आवडली. या कथेच्या नायिकेला काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटेवरून एकटीने प्रवास करत असताना खुप काही सहन करावं लागतं, समाजातील ठराविक लोकांसोबतच काही जवळचे नातेवाईक सुद्धा तिचे शत्रू बनतात, पण तेजस्वी, करारी व आत्मविश्वासाने भरलेली नायिका या सगळ्याला निर्भीडपणे, धैयाने सामोरी जाते. या पुस्तकाने मला आयुष्यातील छोट्या मोठ्या संघर्षात लढण्याची, मन स्थिर ठेवण्याची ताकद दिली. माझ्यातला आत्मविश्वास पुन्हा जागृत करण्याची ताकद दिली.
दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे वपुंची लेखनशैली. साधीसरळ शब्दरचना व जीवनातील तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याची कला यामुळे पुस्तक आणि लेखकाच्या प्रेमात पडतो आपण.
मागे एकदा मिपावर या पुस्तकाचा सविस्तर परिचय लिहला होता. त्या लेखाचा दुवा खाली देत आहे.
हि वाट एकटीची
२. ययाति:

ययातिबद्दल एका शब्दात किंवा वाक्यात सांगायचं झालं तर, ययाति म्हणजे मराठी साहित्यातील कोहिनूर..!!

मराठी माणसाच्या मनात घर करून बसलेल्या, भारतातल्या विविध भाषांत भाषांतरित झालेल्या व आजवर सर्वाधिक चर्चा झालेल्या या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कादंबरीबद्दल लिहावं, बोलावं तितकं कमीच आहे..
आपल्या जीवनात प्रेम, द्वेष, मोह, माया, मत्सर, वासना अश्या विविध भावनांना विशिष्ट महत्व आहे. या सर्व भावनांमुळेच जीवन आहे. पण या भावनांचा अतिरेक वाईटच.. हे या कथेतून शिकायला मिळतं. मानवी जीवनात भुरळ पाडणाऱ्या कित्येक प्रसंगांना आपण कसं सामोरं जावं हे पुस्तक वाचताना समजतं. वि. स. खांडेकरांनी या पुस्तकात वापरलेल्या भाषेच्या विविध रसांमुळे, अलंकारांमुळे कादंबरी वाचताना कंटाळा येत नाही व ती आपल्याला मोहात पाडते. खांडेकरांनी या कादंबरीत मांडेलेले विचार आपल्याला अगदी खोलात जाऊन चिंतन करायला भाग पाडतात.
S
पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच अमेझॉन वर ऑर्डर करून मी हे पुस्तक वाचलं होतं. निवांत वेळ मिळाला की अजून एकदा वाचनार आहे.

शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. भाग दोन लवकरच पोस्ट करतोय.

kathaaलेखअनुभव