शशक | तीर

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जनातलं, मनातलं
11 Mar 2023 - 3:21 am

भावकीने मोठ्या भावाचा झोपेतच गळा घोटल्यावर बिथरलेला तो मृगजिनधारक साधूवेषात उत्तरेकडे पळत होता. ज्यांच्या वैभवासाठी त्याने आयुष्य दिले, तिसऱ्या पिढीतच ते परस्परांच्या उरावर उठलेले. एका नदीकाठी झाडाखाली थकून पहुडल्यावर त्याचा लगेचच डोळा लागला. जिवलग मित्रासोबत केलेले धमाल अग्निकांड स्वप्नात आले. गोमांस-घृताने परिपुष्ट हजारेक आर्यपुत्र घेऊन; अनार्य असंस्कृत मातृसत्ताक वनवास्यांना जिवंत जाळत केलेला धर्मसंस्थापनेचा थरार! सोळा संस्कार झुगारणाऱ्या, मनमर्जीने आवडीच्या पुरुषाशी रत होणाऱ्या नागस्त्रियांच्या, त्यांच्या कोवळ्या मुलींच्या जळताना किंकाळ्या! अगदी ताजे आर्यसत्र परवाच घडल्यासारखे.

इतक्यात कचकन तळपायातून वेदनेची अतितीव्र रक्तिम सणक त्याच्या शरीरभर झणाणली.

महाजनयादवांनी बायको लुटता प्रतिकार करताना एका डोळ्याने अधू झालेला गावकुसाबाहेरचा जारपारधी संतापदग्ध वेडापिसा होऊन जंगलात उपाशी घुमत होता. नदीकाठी झाडाखालच्या हरणाच्या दिशेने त्याने तीर सोडला होता.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

शशक आवडली. दोनदा वाचल्यावर शेवटल्या वाक्यातून, ही कथा कुणाबद्दल आहे याचा खुलासा झाला.
जंगलात उपाशी 'घुमत' होता म्हणजे फिरत, भटकत होता असे म्हणायचे आहे का? की अंगात आलेल्या बायका 'घुमतात' तसे? तसेच 'जारपारधी' शब्द समजला नाही. तशी काही विशिष्ट जमात होती का? 'जार' शब्दाचा विशिष्ट अर्थ इथे अभिप्रेत नसावा असे वाटते.
समुद्राकाठी घडलेल्या 'यादवी' तून घडून आलेला यादवांचा वंशच्छेद, अर्जुनाचा अभीरांनी केलेला पराभव वगैरे घटना असलेली माझी 'सुभद्रा : महाभारताची हेलन आफ ट्रॉय' ही लेखमाला आठवली.
बाकी उत्तम जमली आहे कथा.

जारपारधी- त्या पारध्याचे नाव जरा. अर्थात जरा म्हणजे वृद्धत्वाने आलेल्या विकलतेचे प्रतिक आहे.

कर्नलतपस्वी's picture

11 Mar 2023 - 8:55 am | कर्नलतपस्वी

महाभारतात कृष्ण,अर्जुन यांना योग विद्येने कुठेही बसून काहीही बघता यायचे. पुढे ती विद्या अश्वत्थाम्याला व्यासांनी कलियुगात शिकवली असे वाचले आहे.

तुम्हाला पण येत असावी असे वाटले.

छान लिहिलयं

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2023 - 1:01 pm | चौथा कोनाडा

शशक शब्दबंबाळ वाटली.
ज्यांना हे संदर्भ माहित नाहीत त्यांना ही शशक कळणार नाही.

माझ्या मते यातील संदर्भ सगळ्यांना माहीत असतात पण ते अगदी वेगळ्या भूमिकेतून मांडलेले असल्याने इथे एकदम लक्षात येत नाहीत. देवत्व पावलेल्या व्यक्तींच्या बाबतीत असे काही लिहीलेले अनेकांना रुचतही नाही.

तुषार काळभोर's picture

12 Mar 2023 - 5:10 pm | तुषार काळभोर

वर्षानुवर्षे माहिती असलेल्या गोष्टीकडे विरुद्ध बाजूने आणि विरुद्ध दृष्टिकोनातून पाहणारी कथा आवडली.