फ्लेमिंगो पक्षी बघणे.
फ्लेमिंगो पक्ष्यांनी मुंबईत येण्याची सुरुवात होऊन आता पंचवीस वर्षे तरी झाली असतील. अधुनमधून दरवर्षी ते पाहायला जात असतो. या आठवड्यात गेलो होतो त्याची थोडक्यात माहिती देत आहे. ते पक्षी डिसेंबरच्या सुरुवातीला कच्छ (गुजरात) आणि इतर ठिकाणांहून येऊ लागतात आणि मे महिन्यात परत जातात. मुंबईत ते ठाणे खाडीच्या कांदळवन किनाऱ्यावर येतात. दिवसा पाण्यातले शेवाळ खातात आणि रात्री जवळपासच्या चेंबूर,देवनार,तुर्भे इत्यादी ठिकाणी असलेल्या उंच कांदळवनांचा आश्रय घेतात.
आहे त्या परिस्थितीत आपली जागा आणि खाणं शोधून थव्याने राहणारा सुंदर पक्षी म्हणजे फ्लेमिंगो/रोहित पक्षी असं वर्णन करता येईल.
त्यांना पाहण्यासाठी
१)शिवडी,
२)ऐरोली नवी मुंबई/ठाणे खाडी
३)भांडूप पंपिंग स्टेशन
या तीन विशेष जागा आहेत.
जावे कसे
शिवडी हे मुंबई हार्बर लाईन रेल्वेवरील एक स्टेशन आहे. इथे रेल्वे क्रॉसिंग फाटकही आहे. शिवडी पूर्व भागात आल्यावर कोळीवाडा रस्त्याने दहा मिनीटे चालत गेल्यावर ( इतके जवळ आहे) एक दर्गा प्रवेश कमान लागते. इथे उजवीकडे वळून पाच मिनिटांत आपण जेट्टीवर येतो. २०१८मध्ये इथे आलो होतो पक्षी बघायला तेव्हाच कळले की इथूनच 'कोस्टल रोड' समुद्रातून रेवस/मांडवाकडे जाणार आहे आणि तुम्हाला चार पाच वर्षे येता येणार नाही. तसेच झाले. मोठा पूल बांधत आहेत आणि जेट्टीवर जाऊन देत नाहीत. तर ही जागा आता बंद झाली.
अगोदरच्या वळणावरच्या दर्ग्याच्या कमानीच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर शिवडी किल्लेदाराचा वाडा दिसेल.यालाच चिकटून डावीकडे दर्गा आहे आणि त्यालाच चिकटून डावीकडे शिवडी किल्ला आहे. तशी शिवडी किल्ल्यात जाण्यासाठी एक स्वतंत्र दगडी पायऱ्यांची वाटही आहेच. (३-४-५ मार्च २०२३ला दर्ग्यात उरुस उत्सव आहे. तेव्हा जाऊ नका.) हा किल्ला कुणी कशाला बांधला वगैरे नेटवर भरपूर माहिती आहेच ती इथे देत नाही.
फोटो १
शिवडी स्टेशन ते किल्ला, जेटी फेरी रूट नकाशा
विडिओ १
शिवडीचा किल्ला.Sewri Fort.
Sewri, Mumbai.
Recorded on 2023_02_27
https://youtu.be/SpSSu8t-ux8
_____________________
विडिओ २
शिवडी किल्लेदाराचा वाडा.
House of chief of Sewri fort
https://youtu.be/X7HKVCLf58M
विडिओ पाहिल्यावर कोठार कोणते याची कल्पना येईलच. किल्लेदारासाठीचा वाडा आता बराचसा पडलेला दिसतो आहे. पण पाच वर्षांपूर्वी उजव्या कोपऱ्यातला प्रशस्त लाकडी जिना, वरच्या मजल्यावरच्या खोल्या,छप्पर हे सुस्थितीत होते आणि मी वरती जाऊनही आलो होतो. विटा ,चुना आणि लाकूड वापरले आहे. लाकूड कुजल्यामुळे वाडा पडला. किल्ला मात्र चूना, वाळू आणि दगडी बांधकामाचा असल्याने भक्कम आहे. तर फ्लेमिंगोसाठी जाताना हा किल्ला अनायसे पाहून होतो.
शिवडीची फ्लेमिंगोसाठीची जागा निरीक्षणाखाली उत्तम, आणि विनाशुल्क होती ती आता तरी बाद झाली.
क्रमांक (२) आणि (३) या जागा एकाच खाडीचे दोन किनारे आहेत. तिथे पोहोचून बोट घ्यावी लागते. खर्चिक आहेच. पण आपल्याकडे चांगल्या दुर्बिणी, झूम कॅम्रे हवेत. बोट (लॉन्च) आवाज करत जाते आणि पक्षी उडून दूर जाऊन बसतात. या ठिकाणाचे बरेच चांगले विडिओ यूट्यूबवर पाहून समाधान मानू शकतो.
मी ऐरोली किनाऱ्यावरच्या सरकारी केंद्रावर जाऊन आलो.
नवी मुंबईतील राहणाऱ्यांनी कोणत्याही वाहनाने ऐरोली सेक्टर १० बस स्टॉप (ऐरोली - मुलुंड लिंक पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे) येथे यावे. तिथून फक्त पाचशे मिटरांवर हे केंद्र आहे.
मुंबई मध्यरेल्वे लाईनवरच्या नाहूर स्टेशनवरून बसेस आहेत. त्या ऐरोली सेक्टर १० ला जातात. वाटेत अगोदरच्या भांडूप पंपिंग स्टेशनवरूनही किनाऱ्यावर जाण्याचा पर्याय आहेच.
काही बसेस पश्चिम उपनगरांतून ऐरोलीला जातात त्याने थेट ऐरोली सेक्टर १० गाठता येते.
Nahur to Airoli sector 10
1) Nahur station WEST TO Airoli sector 10
बस नं
522, 523, 512,
नाहूर पश्चिमेला थोडे चालावे लागते. तिथे स्टॉप आहे पण तीन बसेस मिळतात.
___________________
2) Nahur station EAST TO Airoli sector 10
545
नाहूर पूर्वेच्या स्टॉप अगदी स्टेशनला चिकटून आहे पण इथून फक्त एकच बस जाते.
दोन्हीकडून फक्त पंधरा मिनिटे लागतात आणि बस तिकिट फक्त पाच रु आहे.
बस मार्ग आहेतच पण स्वतःचे वाहन,ओटो, टॅक्सीचे पर्यायही गोरेगाव,अंधेरी,मुलुंड,नाहूर इथून घेता येईल.
_________________
फोटो २
नाहूर स्टेशन ते ऐरोली सेक्टर १० लिंक रोडचा बस स्टॉप बस मार्ग नकाशा
फोटो ३
ऐरोली सेक्टर १० बस स्टॉप ते 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' सेंटर' एन्ट्री गेट (चालत पाचशे मिटर) नकाशा
फोटो ४
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' सेंटर, ऐरोली, दरपत्रक १
फोटो ५
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' सेंटर, ऐरोली, दरपत्रक २
फोटो ६
म्युझियम .. आतमध्ये दोन आहेत.
फोटो ७
पाट्या
_________
जावे केव्हा
पाणपक्षी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. समुद्र अथवा खाडीत भरती ओहोटी असेल त्याप्रमाणे किनारा पाण्याने भरतो अथवा रिकामा दिवसातून दोनदा होतो. फ्लेमिंगो किंवा इतर काही पक्षी हे ओहोटी लागल्यावर किनार्याला जे उथळ पाणी राहते त्यातून अन्न मिळवतात. त्यांच्या पायांच्या उंचीप्रमाणे खोल पाण्यात जातात . जेव्हा भरती संपून ओहोटी सुरू होते म्हणजे पाणी मागे गेल्याने किनारा उघडा पडू लागतो तेव्हा लगेच त्यातले जीव चिखल,वाळूत आसरा शोधायची घाई करतात तेव्हा त्यांना पकडता येते. फ्लेमिंगो पक्षी मात्र इतरांच्या अन्नात फारसे भागीदार नसतात.ते पाण्यातले शेवाळ गाळून खातात. तरीही ते ओहोटीच्या मागे जाणाऱ्या पाण्याबरोबर मागे सरकत राहतात. या भरती ओहोटीची वेळ जाणून घेण्यासाठी साधा ढोबळ नियम म्हणजे भरतीच्या वेळेनंतर दोन तासांनी पक्षी बघायला जावे. चंद्राची रोजची तिथी हे दाखवते. अष्टमीला सकाळी आठ नंतर, नवमीला नऊ नंतर, दशमीला दहानंतर . . . पौर्णिमेला/(किंवा अमावस्येला ) दुपारी अडीच नंतर योग्य.
_______________
इतर माहिती लिंकस
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य- कांदळवन कक्ष, महाराष्ट्र शासन
https://mangroves.maharashtra.gov.in/Site/1094/Thane-Creek-Flamingo-Sanc...
Thane Creek Flamingo Sanctuary
https://flamingosanctuary.com/
_____________________
काल (2023_03_12) ऐरोली इथल्या केंद्रावर रविवारी एक फेरी मारली तेव्हा मोबाईलवर काही फोटो घेता आले. बोटफेरीच्या धक्क्याजवळच फ्लेमिंगो दिसले . भरती ओहोटीच्या नियमाप्रमाणे ओहोटीचे पाणी ओसरले की पक्षी गर्दी करतात. धक्क्याजवळूनच पक्षी पाहता येतात. पण . . .या वेळी बोटी चिखलात असतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. ओहोटीचे पाणी आत जाते त्या रेषेपर्यंत वाट/धक्का बांधलेला नाही. काही लोक येत होते परंतू बोट जाणार नाही म्हटल्यावर नाराजीने परत जात होते. विशेषतः लहान मुलांना बोटीमध्ये बसण्याचीच हौस होती, जवळून पक्षी पाहण्याची नव्हती. बोटीचे नावाडी सांगत होते की इथूनच दिसतात हेच पाहा ना. बोटीने गेल्यावर पक्षी दूर कुठे किनाऱ्यावर दिसतात त्यापेक्षा हेच बरे आहे. पण ऐकतो कोण.
बोटीमध्ये सीट {ओनलाइन/ ओफलाईन} बुक करणे व त्यांचे दर पाहिल्यावर ते खर्चिक आहे हे दिसेल. पण ओहोटीची योग्य वेळ धरून धक्क्यावर गेल्यास पक्षी पाहता येतात. त्या एन्ट्रीचे तिकीट फक्त ५०/- रु आहे. बाकी तिथली व्यवस्था,पार्कींग,सुरक्षा,स्वच्छता ,विस्तृत जागा,कर्मचारी इत्यादी पाहिल्यावर तिकीट वसूल आहे.
बोटी एकूण पाच दिसत होत्या. लाईफ जाकेट्स सीटांना बांधली होती. २४ सीटर आणि ८ सीटर अशा दोन प्रकारच्या बोटी असून त्यास दोन प्रापेलर एंजिने आहेत.
फोटो 2023_03_12_(1)
एका रांगेत
फोटो 2023_03_12_(2)
लहान थवा
फोटो 2023_03_12_(3)
हा चिखलातून खाणं शोधणारा एक पक्षी ( पाण टिळवा, black-tailed godwit) त्याची लांब चोच खुपसून जीव शोधत होता
फोटो 2023_03_12_(4)
Board walk. खारफुटी वनातून जाण्यासाठी
इथे दिसणारे छोटे गुलाबी फ्लेमिंगो (lesser flemingos) आहेत. मोठे उंच पक्षी(greater flemingos) नव्हते.
___________________
सूचना आणि दुरुस्तीचे स्वागत. आपले अनुभवही मांडा.
प्रतिक्रिया
1 Mar 2023 - 4:20 pm | टर्मीनेटर
लेख आवडला! फ्लेमिंगो पक्षी पाहणे हा एक नेत्रसुखद अनुभव असतो!
त्या पक्षांच्या थव्याचा एखादा फोटो टाकला असतात तर बहार आली असती.
1 Mar 2023 - 6:43 pm | कंजूस
चांगले कॅम्रे वापरून काढलेले फोटो, विडिओ यूट्यूबवर भरपूर आहेत तिथे आमच्या पिटुकल्या मोबल्यातून काय उजेड पाडणार? आमची आवडती जागा शिवडी जेटी. बघू कधी उघडतात.
2 Mar 2023 - 11:50 am | टर्मीनेटर
ते काही नाही, फ्लेमिंगो पक्षांबद्दलच्या लेखात त्यांचा साधा एक फोटो पण न टाकणे हा घोर अपराध आहे! त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला आता सोन्याचा फ्लेमिंगो पक्षी बनवून तो दान करावा लागेल 😂 😂 😂
2 Mar 2023 - 2:08 pm | कंजूस
लवकर दान करा.
पूर्वी फोटो काढले होते पण मोबाइल कॅम्राचे फारच केविलवाणे येतात. त्यामुळे माझे फोटो न टाकता कसे,केव्हा जावे,जागा ,तिकिटे यावरच भर दिला.
13 Mar 2023 - 11:49 am | कंजूस
काल (2023_03_12) रविवारी एक फेरी मारली तेव्हा मोबाईलवर काही फोटो घेता आले. बोटफेरीच्या धक्क्याजवळच फ्लेमिंगो दिसले . भरती ओहोटीच्या नियमाप्रमाणे ओहोटीचे पाणी ओसरले की पक्षी गर्दी करतात. धक्क्याजवळूनच पक्षी पाहता येतात. पण . . .या वेळी बोटी चिखलात असतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. ओहोटीचे पाणी आत जाते त्या रेषेपर्यंत वाट/धक्का बांधलेला नाही. काही लोक येत होते परंतू बोट जाणार नाही म्हटल्यावर नाराजीने परत जात होते. विशेषतः लहान मुलांना बोटीमध्ये बसण्याचीच हौस होती, जवळून पक्षी पाहण्याची नव्हती. बोटीचे नावाडी सांगत होते की इथूनच दिसतात हेच पाहा ना. बोटीने गेल्यावर पक्षी दूर कुठे किनाऱ्यावर दिसतात त्यापेक्षा हेच बरे आहे. पण ऐकतो कोण.
फोटो 2023_03_12_(1)

एका रांगेत
फोटो 2023_03_12_(2)

लहान थवा
फोटो 2023_03_12_(3)

हा चिखलातून खाणं शोधणारा एक पक्षी ( पाण टिळवा, black-tailed godwit) त्याची लांब चोच खुपसून जीव शोधत होता
फोटो 2023_03_12_(4)

Board walk. खारफुटी वनातून जाण्यासाठी
इथे दिसणारे छोटे गुलाबी फ्लेमिंगो (lesser flemingos) आहेत. मोठे उंच पक्षी(greater flemingos) नव्हते.
1 Mar 2023 - 7:43 pm | कर्नलतपस्वी
हा नुसताच विरंगुळा नाही तर त्याच्याबद्दल माहीती गोळा करत असताना कितीतरी विविध प्रकारची माहीती मिळते व ज्ञानवर्धन सुद्धा होते
माॅर्निग वाॅक मधे मी माहीती व फोटो गोळा करतो.
नुकतीच तारर्कर्ली भटकंती झाली. सामान्यतः समुद्र किनारी विविध पक्षी दिसतात पण इथे फक्त आणी फक्त कावळे,बगळे आणी घारी दिसल्या. कारण शोधत असताना कळाले इथे दिवस रात्र रापण चालू असते व यांना भरपुर मासे खायला मिळतात. दिवस भरात छोट्या पक्षांची शिकार करतात.
लेख आवडला.
2 Mar 2023 - 4:58 am | कंजूस
१) Birds of Mumbai - Sanjoy Monga
ISBN 8175083913
ISBN 9788175083912
हे छोटे खिशात राहणारे पुस्तक जवळ बाळगता येईल. नावात मुंबई असले तरी पालघर ते मुरूड आणि इगतपूरी ते लोणावळा भागात आढळणारे पक्षी मुख्य विशेष वर्णन चित्रांसह आहेत. अमेझोनवरची किंमत १०००रु दिली असली तरी रस्त्यावर शंभर रुपयांत मिळते.
२)The book of Indian Birds -Salim Ali
ISBN 0195665236
हे जाडजुड संदर्भ ग्रंथ आहे. भारत, पाकिस्तान,मायनामार,श्रीलंका ,नेपाळ या भागातले पक्षी,वर्णन,चित्रं ( फोटो नव्हे)आहेत. दुकानात ४५० ते ५००रु ला मिळते.
ही दोन पुस्तकं कामाची.
अजून दोन
३)Birds of the Indian Subcontinent - Grimmett and Inskipp.
ISBN 1408127636, 9781408127636
हे पण चांगले आहे.
[ क्रमांक २ आणि ३ पुस्तके बघून घ्यावीत. काही प्रतींमध्ये चित्रांचे रंग,छपाई धुरकट अस्पष्ट असते.]
४) Birds of Maharashtra - Dr.Pande,Deshpande,Sant.
568 photos.
हेसुद्धा पाहायला चांगले.
2 Mar 2023 - 4:11 pm | गोरगावलेकर
सोन्याचा फ्लेमिंगो बनवून दान करण्यापेक्षा खालील फोटोवर समाधान मानता आले तर बघा म्हणावं टर्मिनेटर भाऊंना
ठिकाण: सी वूड, नवी मुंबई
2 Mar 2023 - 4:24 pm | टर्मीनेटर
वाह, सुंदर आहे फोटो 👍
हा फोटो बघून माझे समाधान नक्कीच झाले आहे पण कंजूस काकांनी केलेल्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून त्यांना सोन्याचा फ्लेमिंगो बनवून तो दान करावाच लागेल...
चुकीला माफी नाही 😂 😂 😂
2 Mar 2023 - 4:33 pm | सर टोबी
विल्स नेव्ही कट या सिगरेटच्या जाहिरातीमध्ये फ्लेमिंगो पक्षाची स्लो मोशन मधली दृश्य वापरली होती. विमानासारखेच हवेत अदबशीर झेप घेणं आणि सावकाश पाय मागे दुमडून घेणं तसेच पाण्यावर उतरतांना पंखांनी वेग कमी करणं आणि अलगद पाय लांब करून उतरणं असं पाहिल्याचं आठवतंय.
पुढे एकूणच धूम्रपानाच्या विरुद्धची चळवळ सुरु झाली आणि जाहिरातीच्या माध्यमातून उच्च्भ्रू जीवन पद्धती म्हणजे धूम्रपान अशा प्रकारच्या जाहिराती बंद झाल्या. सहज आठवले म्हणून हे लिहिले.
2 Mar 2023 - 6:48 pm | कंजूस
400/600 mm zoom आणि कॅनन/निकॉन कॅम्राचे फोटो, ड्रोनचे शूटींग पाहिल्यावर मी तिकडे जाऊन खिशातून मोबाईल बाहेर काढलासुद्धा नाही. लिंक पुलावरून मी पाच किमी भांडूप पंपिंग स्टॉपला चालतही आलो. पुलावरून खालीही खूप फ्लेमिंगो बसलेले दिसत होते. म्हणजे ड्रोनही नको.
पण गोरगावलेकरांनी छान फोटो दिलाय.
अजून दोन महिने आहेत तर कुणाला जायचे झाल्यास संधी सोडू नये.
2 Mar 2023 - 9:05 pm | प्रचेतस
एकदम मस्त.
तपशीलवार वर्णन आणि नकाशांमुळे मजा आली. रोहित पक्षांचा फोटो मात्र हवाच होता. इथे उजनी धरणावर हल्ली कमी आलेत असे ऐकलं, पाणी अजूनही बऱ्यापैकी असल्याने संख्या कमी असावी.
3 Mar 2023 - 4:07 pm | कुमार१
लेख आवडला!
9 Mar 2023 - 3:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
वा मस्तच
10 Mar 2023 - 12:35 pm | चौथा कोनाडा
सुंदर लेख आणि त्या सोबत डिट्टेल माहिती भारीच ..
फ्लेमिंगो निरिक्षक नसलो तरी नुस्तं हिंडायला पण जावे असं वाटायला लावणारी माहिती !
धन्यू कंजूसजी !