Thrills on Wheels दुसरा टप्पा

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
12 Feb 2023 - 9:37 am

Thrills on wheels
( Thane - Statue of Unity - Thane)
दुसरा टप्पा
सकाळी ५ वाजता उठून तयार होऊन सायकल खाली घेवून आलो नि बॅग सायकलला जोडल्या. माझी मैत्रीण कांचनचा नवरा सूरज सायकलिस्ट आहे. तो आम्हाला ठाण्याहून अहमदाबाद हाय वे पर्यंत सोबत करणार होता. बरोबर ६ वाजता तो हजर झाला.ठाण्याचे एक एक रस्ते पार करत घोडबंदरच्या चढाला लागलो. सुदैवाने अजिबात ट्रॅफिक नसल्याने आणि सकाळच्या फ्रेश मूड मध्ये चढ चढून उतार एकदम मस्त उतरलो. काशिमीरा जंक्शन ला उजवीकडे वळून अहमदाबाद हाय वे ला लागलो.
साधारण ३० किमी झाले होते. एके ठिकाणी चहा प्यायला आणि फोटो काढून सूरज आम्हाला बाय करून पाठी फिरला. आता फक्त आम्ही दोघी एकमेकांसाठी. रस्त्याला रहदारी होती. त्यामुळे एकटं पडण्याचा प्रश्न नव्हता. तसाही हा रस्ता कायम रहदारी वालाच आहे. त्यात शनिवार त्यामुळे गुजरातकडे निघालेल्या सगळ्या गाड्या झूम करून पुढे जात होत्या. आमचा पुढचा टप्पा होता वापी. टोटल १५० किमी वर. वसईचा चढ झाल्यावर नंतर चारोटिचा चढ चढून वर आलो आणि मग दुसऱ्या बाजूने सुसाट वेगाने उतरलो. आम्ही उतरलो आणि अश्विनी विचारते, " चारोटीचा चढ अजून किती लांब आहे?" मला हसायलाच आल. " अग आता उतरलो तो चारोटी चाच घाट होता. "अश्विनीला एकदम आनंद झाला. खरं तर तो चढ आमच्या कामथे घाटा एवढा जेमतेम आहे. तिला वाटलं मोठा वळणावळणाचा चढ असेल. नकळत चढ संपल्याने ती जामच खुश झाली.
साधारण १२ वाजयच्या दरम्यान जेवणासाठी सुरू झालेला आमचा हॉटेलचा शोध दोन वाजता १०६ किमी ला हॉटेल अहुराला संपला. हे हॉटेल परिचयाचं होत. याआधी आम्ही 400 BRM ला इथेच चेक पॉइंट ला थांबलो असल्याने आणखी कुठे काही शोधायची गरजच पडली नाही. तिथे मस्त बाजरे का रोटला आणि गट्टे की सब्जी असं चविष्ट जेवण मिळालं. बराच वेळ उन्हातून आल्याने आणि आता फक्त 50 किमी उरल्याने आम्ही इथे जरा आरामात जेवत वेळ काढला. तीन वाजता निघालो. आता 6 च्या आत वापी च हॉटेल गाठायच म्हणजे 3 तासात 50 किमी अस टार्गेट होत. भरभर सायकल चालवत वापीला पोहोचलो. आता गुगल वर हॉटेलच exact location शोधत होतो. वापीला आम्हाला 3 flyover लागले. हॉटेल विरूध्द दिशेला असल्याने आणि थोडा गुगल वर अविश्वास दाखवल्याने प्रत्येक flyover च्या खालून जात कुठे नक्की हॉटेल आहे ते शोधण्यात आमचा वेळ गेला. मजा अशी होती की आम्ही दोघी सायकलिंगच्या वेशात, बरोबर सामान असलेल्या सायकल त्यामुळे कुठेही जा, सगळे लोक अमाच्यकडे कुतूहलाने बघत. बरं विचारायची ईच्छा होईना कुणाला. का उगीच कुणाला आधीपासून विचारा आणि जाहिरात करा की आम्ही दोन मुली अमक्या हॉटेल मध्ये बुकिंग केलंय. हो नाही करता शेवटी तिसऱ्या flyover च्या खालून गेल्यावर पलीकडे हॉटेल सापडलं.
सायकल लावायला खाली जागा मिळाली. रूम मध्ये गेल्यावर खूप बरं वाटलं. चहा पिऊन मस्त गरम पाण्याने अंघोळ करून हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये जेवलो नि दुसऱ्या दिवशीचे गजर लावून झोपलो.
तलासरीला महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आणि थोड्याच वेळात रस्त्याला आपल्या उलट्या बाजूने येणाऱ्या वाहनांची रांगच लागली. हा अनुभव आम्हाला जवळपास सगळया गुजरात भागात आला. आधी वाटलं फक्त दुचाकी स्वार असे उलटे येतात. पण नंतर तर रिक्षा, डंपर आणि शेवटी मोठा जेसीबी सुध्धा रस्त्याने आपल्या अंगावर चालून येताना दिसला आणि धन्य झालो.
आजचा दिवस कोणतीही अडचण न येता छान पार पडला. आता उद्या नवीन प्रदेश नवीन आव्हानं नवीन अनुभव घ्यायला आम्ही सिध्द झालो.
दुसऱ्या दिवशी पण आधीसारखच लवकर उठून 6 ला हॉटेल सोडलं. आज परत 150 किमी वर अंकलेश्र्वर गाठायच होत. तिथेही हॉटेल आधी बुक करून ठेवलं होत त्यामुळे शोधाशोध नव्हती. सकाळच्या गार वेळात होईल तेव्हढे अंतर कापायच यावर भर होता. या पट्ट्यात भरपूर शाकाहारी हॉटेल्स असल्याने जेवणाचा प्रश्न आला नाही. सकाळी सकाळी उबाडियो चे स्टॉल लागलेले दिसले. एका स्टॉल वर थांबलो. उबडीयो सांगितला. उबडीयो म्हणजे आपला मोंगा. फक्त आपला मोंगा प्लेन असतो तर उबडीयो मध्ये थोडा मसाला लावलेला असतो. बटाटे, रताळी, रतळू आणि पावट्याच्या शेंगा मस्त माठात भाजलेल्या. चविष्ट असा नाश्ता त्या दिवशी झाला.
आज Crosswinds खूप होते. सायकल चालवताना चांगलाच जोर लावयला लागत होता. जरा ऊन वर आल्यावर सुरू झालेला वारा संध्याकाळी मुक्कामी पोहोचलो तरी थांबला नव्हता. आज थंडी पण चांगलीच होती. त्यात वारा त्यामुळे त्रास होत होता. कधी कधी ऊन पाऊस परवडला पण वारा नको अशी परिस्थिती होते. आजही हीच अवस्था झाली. संध्याकाळी मुक्कामी पोहोचलो तेव्हा प्रचंड दमलो होतो. फ्रेश होऊन जेवून केव्हाच झोपलो.
आज तिसरा दिवस. काल दोन दिवसाच्या मानाने आज अंतर कमी होत. 100 किमी नि आम्ही स्टेच्यू ऑफ युनिटी च्या परिसरात पोहोचणार होतो. सकाळी नेहमीप्रमाणे सूरवात केली. अंकलेश्र्वर हून हाय वे सोडून केवडिया च्या फाट्याला आत वळलो आणि उंब्रजहून पाटण रस्त्याला आल्याची आठवण झाली. साधारण 10/15 किमी चा रस्ता फारच खराब होता. काम चालू असलेले ठिकठिकाणी दिसत होत. साडे सात वाजता एक छानशी टपरी टाईप हॉटेल दिसलं. गरम चहा करणं चालू होतं. आम्हाला ती जागा एवढी आवडली की आम्ही चहा पिण्यासाठी तिथे वेळ काढला. गवताने शकारकेल्या झोपडी सारखी मस्त रचना केलेली होती. झाडाच्या खोडाची बाकडी, टेबल होती. एकूणच छान वातावरण होत. कालचा वारा अजूनही थांबला नव्हता. चांगलीच थंडी होती. तिथे त्यांच्या चुलीवर लगेच आम्ही जरा हात शेकून घेतले. त्यांच्याकडे सामोसा तयार होता. मग समोसा आणि चहा असा नाश्ता झाला. आणि आम्ही निघालो. आज नाही म्हटलं तरी अंतर कमी असल्याने जरा निवांत होतो. मध्येच छोटे छोटे स्टॉल लागलेले दिसले आणि पोंक लिहिलेलं वाचता आल. चित्र बघितलं तर हुरडा दिसला. एके ठिकाणी थांबून तेही चाखून बघितलं. वाळूवर भाजलेला हुरडा शेव मिक्स करून एकदम मस्त लागत होता. रमत गमत राजपिपला गावात पोहोचलो. जेवून निघालो. आता स्टेच्यु ऑफ युनिटी अगदीच 20 किमी वर आला होता. आम्हाला उत्साह आला. जे ठिकाण ठरवलं होत ते अक्षरशः हाकेच्या अंतरावर होत. पुढचे सगळे रस्ते चकाचक होते. थोड्याच वेळात आम्ही त्या परिसरात पोहोचलो. शुलपाणेश्वर मंदिर परिसरात छान नर्मदेकडे जाणारा घाट बांधला आहे शिवाय वरती पण छान बांधलेला प्रशस्त भाग आहे. आम्ही सहज म्हणून तिथे गेलो तर तिथून आम्हाला लांबवर स्टेच्यू दिसला. खूप आनंद झाला. लगेचच भराभर पेडल मारत नर्मदा नदीच्या ब्रीज वर पोहोचलो.
आज सोमवार असल्याने ब्रीज वर अजिबात गर्दी नव्हती. तिथूनच एकता मूर्ती दिसते अश्या ठिकाणाहून सायकल आणि आमचे फोटो काढून घेतले. पण वातावरण फारच धूसर असल्याने फार स्पष्ट फोटो आले नाहीत. बाकी फोटो नंतर काढू अस म्हणून आम्ही हॉटेलकडे वळलो. तिथून अवघ्या अडीच तीन किमी वर हॉटेल होत. चला, मुक्कामी पोहोचलो होतो. खूप आनंद झाला होता. आता दोन दिवस विश्रांती. कल्पनेनेच बरं वाटलं. निदान दोन दिवस तरी उद्या उठून पुढे जायचयं वगैरे टेन्शन नव्हतं.इथला आजूबाजूचा सगळा परिसर हिंडून काढायचा होता. इतर दिवसांपेक्षा आजचा उत्साह जरा जास्तच होता. सुखरूप पोहोचल्याचे समाधान चेहऱ्यावर दिसत होत. आजपर्यंत तरी वाटेत कुठे काही अडचण आली नव्हती. सायकलने उत्तम साथ दिली होती. त्यामुळे आम्हीपण खुश होतो.
- धनश्रीनिवास

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Feb 2023 - 11:21 am | राजेंद्र मेहेंदळे

सायकलवरुन रमत गमत अंतर पार करणे म्हणजे "आपलाची वाद आपणासी" असा अनुभव असतो कधी कधी. अर्थात काही काळाने ईतके कष्ट होतात की वाद घालायचेही श्रम नको वाटतात :) तरीही चालणे,धावणे या तुलनेत सायकल कमी श्रमात दिवसाला १०० कि.मी. पेक्षा जास्त अंतर सहज कापते. पुभाप्र

जमल्यास फोटो पण येउद्या.

कपिलमुनी's picture

21 Feb 2023 - 10:05 am | कपिलमुनी

तुमचा प्रवास आणि लेखमाला उत्तम