सुचलेले विषय पण हुकलेले लेखन

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Feb 2023 - 4:04 pm

नियमित लेखनाचा छंद लागला की कालांतराने एक समस्या जाणवू लागते - लेखनासाठी नित्य नवे विषय सुचणे. आपल्या वाचन, मनन आणि निरीक्षणातून मनात अनेक ठिणग्या पडतात आणि त्यातून अनेक विषय मनात रुंजी घालतात. पण त्यातला लेखनासाठी कुठला विषय गांभीर्याने निवडावा यावर मनात बरेच दिवस द्वन्द्व होते. अशी संभ्रमावस्था बराच काळ चालते आणि मग अचानक एखादा विषय मनात विस्तारू लागतो. तो विषय आळसावर मात करून नेटाने पुढे रेटला तरच त्याचा लेख होतो. लेखकाच्या मनात घोळत असलेल्या अनेक विषयांपैकी किती विषयांचे लेखन पूर्ण होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे. माझ्या बाबतीत अगदी टक्केवारीत सांगायचे झाल्यास, सुचलेल्या विषयांपैकी जेमतेम पाच टक्के विषय लेखनपूर्णत्वाला पोचतात. मग उरलेल्या 95% चे होते तरी काय ?

त्यापैकी बहुसंख्य विषय हे ठिणगी अवस्थेतच विझून जातात. उरलेले जे काही धुगधुगी धरून ठेवतात त्यातलेही पुढे निम्म्याहून अधिक माझ्याकडूनच नाकारले जातात - यात काही दम नाही असे वाटल्यामुळे. या सगळ्या चाळणीतून जे काही थोडे उरतात त्यांची मात्र मनात व कागदावर नोंद करून ठेवावी लागते. कालांतराने त्यातलाच एखादा विषय जोरदार पुढे सरकतो आणि मग लेखणीतून उतरतो.

मित्रहो
,
आजवर मी जे काही लिहिलंय ते इथे तुमच्यासमोर आहे. परंतु या लेखाचा विषय अगदी या उलट आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात मला अनेक विषय सुचले होते परंतु निरनिराळ्या कारणांमुळे ते त्यांच्या गर्भावस्थेतच मरून गेले. त्यांच्यावर काही लिहावे अशी एकेकाळी जोरदार उर्मी होती व अजूनही थोडीफार असते. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. अशा काही लेखनातून हुकलेल्या सामाजिक विषयांसंबंधी आज थोडे लिहितो. या कथनासाठी मनात दडून राहिलेले काही निवडक विषय घेतोय. प्रत्येक विषय कधी आणि कुठे सुचला, त्यावर मनात तयारी कितपत झाली आणि अखेरीस तो का बारगळला याचा हा लेखाजोखा.

ok

पहिला विषय आहे माझ्या कॉलेज जीवनातला. आमच्या वर्गात एक ‘खास’ मुलगा होता. त्याचे एक वैशिष्ट्य होते. त्या वयातील सर्वसाधारण मुलांच्या काही आवडीनिवडी समान असायच्या; तारुण्यसुलभ विषयांवर तर नक्कीच ! गप्पा मारताना ठराविक विषयांवर बहुतेकांचे एकमत व्हायचे, पण याचे मात्र कायम वेगळेच. एक उदाहरण देतो. जानेवारी महिन्यातील कडाक्याच्या थंडीतली सकाळ आहे. आम्ही मित्रमंडळी कॅन्टीनमध्ये छान वाफाळता गरम चहा पितोय. आम्हाला पाहून तो आमच्यात येऊन बसतो आणि मग वेटरकडे लांबवर नजर टाकून आणि अंगठा उंचवून “एक थम्सअप” अशी मोठ्या आवाजात ऑर्डर देतो. झालं ! आता याची ही वेगळी पसंती पाहून तो लगेच चर्चेचा विषय व्हायचाच. तो त्याला मनातनं हवाही असायचा. असे अनेक बाबतीत झाल्यानंतर शेवटी मित्रपरिवाराने त्याचे नावच तिरपागड्या ठेवले होते. ते त्यालाही कळले होते आणि त्याने ते कुरकुरत स्वीकारलेही होते. आमच्याशी तुलना करता, तो श्रीमंत घरातून आलेला आणि एका हुच्च तत्ववादी शाळेतून शिकलेला होता. आपण या सगळ्यांपेक्षा काहीतरी ‘वरचे’ आहोत असा त्याला अहंगंड होता आणि तो ते वारंवार जाणवून देई.

या प्रकारच्या प्रवृत्तीवर एक व्यक्तिचित्र रेखाटावे असे तेव्हा मला प्रकर्षाने वाटे. तेव्हा मी लेखनात नवखा होतो. मनातल्या मनात मुद्द्यांची जुळवाजुळव करत होतो. ‘त्या’ला समोर ठेवून तर लिहायचे परंतु लेखनातून अगदी जसाच्या तसा
अगदी जसाच्या तसा ‘तो’च उमटता कामा नये याची पण काळजी घ्यावी लागणार होती. याची दोन-चार पाने खरडूनही झाली होती. मग शांतपणे विचार केला. समजा, आपण हा लेख पूर्ण केलाच तर तेव्हा तो प्रकाशित करण्यासाठी आपला जास्तीत जास्त आधार म्हणजे कॉलेजचे वार्षिक. तिथं जर तो स्वीकारला गेला तर संपूर्ण वर्गाला तो त्याच्यावरच लिहिलेला आहे हे कळणे अवघड नव्हते. त्यातूनच मनात द्वंद्व झाले आणि अखेर तो विषय बारगळला. आपल्या नित्य संपर्कातील व्यक्तिबदल लिहायचे आणि पुढे त्याचे जे काही बरेवाईट परिणाम होतील त्यांना तोंड देण्याचा निर्भीडपणा तेव्हा अंगात नव्हता हे खरे.

साधारण याच काळात एक थरकाप उडवणारा विषय मनावर बिंबलेला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमात काही विद्यार्थी वार्षिक परीक्षांमध्ये वारंवार नापास व्हायचे. त्यांच्याबरोबर प्रवेश घेतलेल्या मुलांच्या तुलनेत त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करायला दुप्पट कालावधी लागायचा. त्यांना ‘chronic’ म्हणून ओळखले जाई. त्यातले काहीजण शेवटच्या वर्षाला अनेक वेळा बसूनही अपयशी ठरायचे. अखेर यातल्याच काही जणांनी पुढे आत्महत्या केल्या होत्या. या विषयाच्या मुळाशी गेल्यास बरेच काही विचार करण्याजोगे असते.

कित्येक मुलांच्या बाबतीत त्यांचा कल आणि त्यांची क्षमता लक्षात न घेता केवळ पालकांच्या अतीव इच्छेमुळे त्यांना वैद्यकीय शाखेत घातले जाते. पुढे पहिल्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेत ती मुले अनेकदा आपटी खात असलेली पाहून सुद्धा त्यांना अभ्यासक्रमातून काढण्याचा विचार केला जात नाही. अशापैकी काही जण दीर्घकाळ शिक्षण करून मारून मुटकून डॉक्टर व्हायचे देखील, परंतु काहींच्या बाबतीत मात्र आत्महत्येने दुर्दैवी अंत व्हायचा. मग या घटना विद्यार्थीवर्गात दीर्घकाळ घबराट पसरवत असत.
खरे तर मनावर खोलवर परिणाम केलेला हा विषय होता. परंतु त्याच्या दुःखद बाजूमुळे तो लेखणीतून सविस्तर काही उतरू शकला नाही. एकदा मात्र राहवले नाही तेव्हा त्यावर एक वृत्तपत्रीय स्फुट तेवढे लिहिले होते.

1980 च्या दशकात माझा एका जोडप्याशी अगदी जवळून परिचय झाला होता. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली होती आणि त्यांना मूलबाळ होत नव्हते. एखादे तरी मूल असावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या दृष्टीने त्याकाळी जे काही वैद्यकीय उपाय करता येणे शक्य होते ते त्यांनी सर्व केलेले होते परंतु त्याला यश आले नव्हते. दत्तक मुलाचा विचार त्यांना मंजूर नव्हता. सारखा हाच विचार करून त्यांची एकंदरीत घुसमट व्हायची आणि तसे त्यांच्या बोलण्यात येई. आज आपल्या अवतीभवती जाणीवपूर्वक अपत्यहीन राहिलेली अनेक जोडपी आहेत. किंबहुना शहरी जीवनात या मुद्द्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. निदान कुठल्याही व्यक्तीला प्रथमदर्शनीच याबद्दलचा प्रश्न विचारू नये हे भान काही जणांना तरी आहे. परंतु तो काळ तसा नव्हता. एकंदरीतच मूल नसलेल्या जोडप्याकडे आणि विशेषता त्यातल्या स्त्रीकडे पाहण्याचा आजूबाजूच्या लोकांचा दृष्टिकोन तसा मागासच होता. बऱ्याचदा त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याबद्दल बोलताना लोक त्या जोडप्याची ओळख सांगताना, “ते नाही का, ते मूलबाळ नसलेले” असा अवमानकारक उल्लेख करून देताना मी ऐकले होते. हा अत्यंत चुकीचा दृष्टिकोन होता. परंतु आपल्या आसपासच्या कुजबुज समाजाच्या तोंडावर बोट कोण ठेवणार ?

त्या जोडप्याकडे पाहून या विषयावरील काही लेखन करावे असे खूप मनात येई. मूल नसणे हा काही गुन्हा नाही परंतु आजूबाजूच्या लोकांची त्यावरील कुजबुज हा तिडीक आणणारा विषय. या अनुषंगाने अशा कुजबुजी लोकांवर कोरडे ओढणारे काही लेखन करण्याची बऱ्याचदा इच्छा झाली. तसेच त्या जोडप्याची कुचंबणा हा देखील लेखनपोषक मुद्दा होता. पण का कोण जाणे, तोही विषय लेखणीत काही उतरला नाही. तसं पाहिलं तर हा विषय सनातन आहे. तो अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक व चित्रपट यासारख्या अनेक माध्यमांतून दाखवला गेला आहे. त्यामुळे त्यावर नव्याने आपण तरी काय वेगळे लिहिणार असे वाटल्याने तो बेत स्थगित झाला.

परगावी जाण्याच्या निरनिराळ्या प्रवास-साधनांमध्ये माझे सर्वात आवडते साधन म्हणजे रेल्वे. बसच्या प्रवासात मळमळ होण्याचा त्रास असल्यामुळे शक्यतो तो टाळला जातो. रेल्वे प्रवासाची अन्य सुद्धा बरीच सुखे आहेत. खरंतर बस आणि विमानाशी तुलना करता बर्थवाल्या गाडीमध्ये दिवसा समोरासमोर बसून उत्तम गप्पा मारता येतात. त्या संदर्भात ‘प्रवास आणि संवाद’ हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मनात घोळतो आहे. स्वतःच्या विद्यार्थीदशेतील जीवनापासून ते आजपर्यंतच्या माझ्या रेल्वे प्रवासावर एक नजर टाकतो. विद्यार्थीदशेत आणि पुढे आयुष्यातील झगडण्याच्या काळात एक्सप्रेसचे जनरल तिकीट आणि पॅसेंजरचा प्रवास या गोष्टी केल्यात. पुढे जसजशी आर्थिक स्थिती सुधारत गेली तसे तसे वातानुकूलित वर्गांची चढती श्रेणी, शताब्दी, राजधानी वगैरे असे सगळे प्रवासही बऱ्यापैकी केले. प्रवासातील संवादाबाबत दोन कारणांमुळे झालेला फरक मला अगदी प्रकर्षाने जाणवतो. 30-40 वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये अतिशय मोजके तरुण जवळ वॉकमन बाळगत आणि मग त्याच्या इअरफोन्सने गाणी ऐकत. त्याकाळी स्लीपरचे साधे डबे अधिक आणि (काही गाड्यांनाच) वातानुकूलितचे अगदी मोजके असायचे. तेव्हा अनोळखी प्रवाशांच्याही गप्पा भरपूर व्हायच्या.

जसे वातानुकूलित डब्यांचे प्रमाण वाढत गेले आणि आलिशान प्रकारच्या गाड्या धावू लागल्या तसे या संवादाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होत गेलेले जाणवते. ट्रेनच्या आरक्षित तिकीट-वर्गाची चढती श्रेणी आणि तिथल्या गप्पाटप्पांचे प्रमाण या दोन गोष्टी अगदी गणिताप्रमाणे व्यस्त प्रमाणात दिसतात. (इथे डब्यातील प्रवासीसंख्येचे प्रमाण हा मुद्दाही बाजूला काढून वरील विधान रास्त वाटते. संख्येपेक्षा ‘प्रवृत्ती’ वरचढ ठरते; अपवाद सोडून देऊ).

दुसरा मुद्दा - जेव्हापासून मोबाईल आणि पुढे इंटरनेटसह स्मार्टफोन्स मुबलक झाले तसा हा संवाद झपाट्याने कमी झालेला दिसतो, अगदी एकत्र प्रवास करणाऱ्या कुटुंबा- अंतर्गत देखील. सध्याच्या प्रवासावर एक नजर टाकली तर असे दिसेल, की साधारणपणे बहुतेक तरुण व मध्यमवयीन लोक प्रवासाचा बहुसंख्या वेळ स्वतःच्या मोबाईलवरील करमणुकीत रमून गेलेले दिसतात. त्यासाठी इअरफोन्सचा वापर करणारे अल्पसंख्य हे सुजाणच म्हणायचे. बाकीचे बहुसंख्य भारतीय, जे खुशाल मोठ्या आवाजात मोबाईल लावतात ते तर भयंकर कटकटीचे. एकूणच प्रवासातला हा अत्यंत त्रासदायक विषय ! गप्पा मारण्यास उत्सुक असलेल्या एखाद्याने मोबाईलमग्न व्यक्तीशी संवादाचा प्रयत्न केल्यास त्याला थंड किंवा तुटक प्रतिसाद मिळतो.

समाजाची सुधारती आर्थिक स्थिती आणि करमणुकीच्या विविध इ-उपकरणांची सहज उपलब्धता यांचा सहज (प्रवास) संवादावर झालेला परिणाम या विषयाने मनात अनेक वर्षे धुमाकूळ घातलेला आहे. पण अद्याप तरी तो विषय डोक्यातच राहिला आहे. कालौघात समाजाच्या आचारविचारांमध्ये बदल होणारच. मग ते स्वीकारण्याऐवजी, उगाचच पूर्वी कसे होते आणि आता कसे आहे, हे दळण दळायला नको म्हणून एक मन या विषयाला बाद करून टाकतेय !

गेली अनेक वर्षे मी आमच्या परिसरातील एका एकत्र कुटुंबाला ओळखतोय. यांच्या घरात तीन पिढ्या नांदतात. एकंदरीत गुण्यागोविंदाने राहणारी माणसं आहेत परंतु जेष्ठ पिढीचा कर्मठपणा अगदी डोळ्यात भरण्यासारखा आहे. इथे कर्मकांडाचा तर अतिरेक आहेच आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या विटाळाच्या कल्पना त्यांच्या हाडीमासी खिळल्यात. एकविसाव्या शतकात जगताना विचारसरणी मात्र अठराव्या शतकातली, असा काहीसा तो प्रकार आहे. असे वैशिष्ट्य असणारे ते आमच्या आसपासचे एकमेव घर आहे. मी त्या कुटुंबातल्या मधल्या आणि तरुण पिढीचे बारकाईने निरीक्षण करत असतो. त्यांच्यातल्या तरुणींनी आता विशी ओलांडली आहे. त्यांना घरात चालणाऱ्या वरीलपैकी कित्येक गोष्टी पटत नाहीत. एवढेच नाही तर त्यांची त्यावरून खूप चिडचिड होते. मग येऊन जाऊन त्या मधल्या पिढीकडे त्यांचा निषेध नोंदवत राहतात. त्यांच्या मित्रपरिवारात या विषयांवरून वारंवार टिंगलबाजी होते. मधल्या पिढीची तर अजूनच गोची. घरात ज्येष्ठ पिढीचे वर्चस्व असल्याने मधल्यांना त्यांचे गुमान ऐकावे लागते आणि त्याचबरोबर आपल्याच मुलांच्या पिढीकडून सतत टोमणे ऐकावे लागतात. या दोन पिढ्यांची होणारी घुसमट आणि चिडचिड मला लेखनासाठी अधूनमधून आकर्षित करते. यानिमित्ताने कुटुंब व्यवस्थांबाबत काहीतरी अधिकउणे लिहावे असे अगदी राहून राहून वाटते. पण अजून तरी ते मंथन फक्त विचारांमध्येच अडकून पडलेले आहे.

सरतेशेवटी या लेखाच्या शीर्षकाला एक पुस्ती जोडतो –
सुचलेला विषय, केलेले लेखन पण हरवलेले हस्तलिखित !
ही घटना आहे 15 वर्षांपूर्वीची. तेव्हा परदेशात वास्तव्य होते. साप्ताहिक सुट्टीच्या एका सकाळी सलग अडीच तास बसून मनात घोळत असलेल्या एका विषयावर एकटाकी हस्तलेखन केले होते. तो विषय म्हणजे,

माझे शिक्षक - असेही आणि तसेही !”

या लेखनापूर्वी काही दिवस मनात माझ्या अनेक शिक्षकांच्या आठवणींची उजळणी करत होतो. बालवाडीपासून ते अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्या शिक्षकांचा मला लाभ झाला त्यातले काहीजण त्यांच्या वैशिष्ट्यामुळे कायमचे लक्षात राहिले. यामध्ये जसे उत्तम शिकवणारे शिक्षक होते तसेच गमतीजमती आणि वेळप्रसंगी आचरटपणा करणारेही शिक्षक होते. मग या दोन प्रकारांपैकी प्रत्येकी चार शिक्षक निवडले आणि झपाटल्यासारखे ते हस्तलेखन केले (तेव्हा मी संगणकावर मराठी दीर्घलेखन करत नव्हतो आणि त्या सुविधाही बाल्यावस्थेत होत्या). तेव्हा असा विचार केला की हा लेख सप्टेंबरमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी प्रकाशित करणे उचित होईल. मग तो तसाच कुठेतरी ठेवून दिला. दरम्यान त्यावर्षी काही कारणामुळे त्या लेखाकडे पुन्हा फिरकायला जमलेच नाही. पुढच्या वर्षी माझा परदेशातील मुक्काम संपवून मी भारतात यायला निघालो.

भारतात पोचल्यानंतर काही दिवसांनी त्या लेखाची आठवण झाली. तेव्हा मात्र आणलेल्या सामानात तो काही जाम सापडत नव्हता. जंग-जंग पछाडले परंतु आजपर्यंत तो लेख मिळालेला नाही. आता मनाची गंमत कशी असते पहा. हस्तलिखित जरी हरवलेले असले तरी लेखाचा साचा तेव्हा डोक्यात चांगल्यापैकी बसलेला होता. मनात आणले असते तर पुन्हा एकदा लेखनाला बसायला काही हरकत नव्हती. परंतु मन काही मानेना. आपण एकदा भरपूर कष्ट घेऊन ते लेखन केले आहे ना, मग आता पुन्हा लिहिणे नाही बुवा ! कदाचित त्या उर्मीत झालेले लेखन आता पुन्हा होईल का नाही याची शंका वाटली आणि ती प्रबळ होत गेली. एखाद्या आळशी शालेय विद्यार्थ्याप्रमाणे मी तो विषय अक्षरशः दाबून टाकलेला आहे. असे हे प्रकाशनातून हुकलेले माझे तयार लेखन.
.....

मनात असलेल्या परंतु मनापासून मी लेखन करू न शकलेल्या काही विषयांची ही होती झलक. रोजच्या जीवनात असे अनेक विषय अगदी समुद्राच्या लाटांसारखे मनात उचंबळून येतात परंतु तितक्याच वेगाने ते विरूनही जातात. कालांतराने त्यातले काही पुन्हा डोके वर काढू शकतात आणि मनात चलबिचल चालू राहते. विषय आणि आपले विचार यांच्यात एक प्रकारे शिवाशिवीचा खेळ चालतो. त्यात खूपसे विषय निसटूनच जातात. जे मोजकेच हाती लागतात त्यांच्यावर पुढे कधीतरी शिक्कामोर्तब होते.

सुचलेल्या विषयावर एखादे लेखन पूर्णत्वाला न जाण्याच्या संदर्भात अनेक लेखकांची विविध कारणे असतील. मला जी कारणे सर्वसाधारण वाटतात ती सारांशरूपाने लिहितो:
१. आळस
२. सुचलेला (किंवा सुचवलेला) विषय आकर्षक किंवा महत्त्वाचा, पण तो लेखकाच्या क्षमतेबाहेरचा असणे.

३. तो विषय वर्षानुवर्षे अनेक माध्यमांमधून भरपूर चघळून व चावून झालेला असणे.
४. ज्या ठराविक माध्यमात लेखन करायचे आहे तिथे नुकतेच काहींनी त्या विषयावरील लेखन केलेले असणे.

५. सुचणे आणि लिहिणे या दोन प्रक्रियांमधला कालावधी जेवढा जास्त असेल तेवढा चांगला असे म्हणतात. लेखकाला एखादा विषय सुचल्यानंतर तो वर्षानुवर्षे मनात मुरवत ठेवणे, हे सुद्धा ‘हुकलेल्या’ लेखनामागचे महत्त्वाचे कारण असेल काय?

इथल्या लेखकांचे मनोगत जाणून घेण्यास उत्सुक !
…………………………………………………………

समाजलेख

प्रतिक्रिया

गवि's picture

1 Feb 2023 - 5:05 pm | गवि

उत्तम लेख.

तुम्हाला सुचलेले विषय आणि लिखाण पाहता साधारण डॉ अनिल अवचट यांच्या पत्रकारिता वगळता अन्य व्यक्तिगत ललित लिखाणाची आठवण येते.

बाकी मोबाईलमुळे रेल्वेत, घरात, वगैरे संवाद तुटला याच्याशी किंचित असहमत.

संवाद आहेच. But now everyone has got a choice whom to communicate with. Advantage of technology. :-))

कुमार१'s picture

1 Feb 2023 - 5:37 pm | कुमार१

उद्घाटनपर प्रतिसाद आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
तुमच्या किंचित असहमतीशी मी किंचित सहमत आहे !

त्या विषयावर मला कुठल्याही परिस्थितीत एकांगी ओरड करणारे लिहायचे नाही आणि म्हणूनच मी अद्याप तो विषय विचारांच्या कप्प्यातच ठेवून दिलेला आहे.

समतोल लिहिताना आपल्याला आपली नक्की भूमिका फार काळजीपूर्वक ठरवावी लागते.

स्मिताके's picture

1 Feb 2023 - 7:46 pm | स्मिताके

आपले सुस्पष्ट, मुद्देसूद आणि माहितीपूर्ण लिखाण नेहमीच वाचनीय असते.
पूर्वी हुकलेले आणि आता आठवलेले विषयसुध्दा नव्याने जरूर लिहा ही विनंती.

चांदणे संदीप's picture

2 Feb 2023 - 11:21 am | चांदणे संदीप

+१११

सं - दी - प

श्वेता व्यास's picture

2 Feb 2023 - 11:26 am | श्वेता व्यास

छान लेख आहे, हुकलेल्या विषयांचाही लिहिण्यासाठी विचार करावा ही विनंती.

कर्नलतपस्वी's picture

2 Feb 2023 - 11:31 am | कर्नलतपस्वी

१०१%

कुमार१'s picture

2 Feb 2023 - 11:53 am | कुमार१

आस्थेने प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद
देतो.
बघूया, भविष्यात कसं जमतंय ते...

विवेकपटाईत's picture

2 Feb 2023 - 12:02 pm | विवेकपटाईत

आळसपणा माझा आवडता छंद. मोबाइल मुळे आभासी मित्र वाढले. काही जुने मित्र हरवलेले मित्र ही भेटले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Feb 2023 - 12:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

इथल्या लेखकांचे मनोगत जाणून घेण्यास उत्सुक !

लेखाचा विषय जरा वेगळाच आहे, पण मनाला पटणारा आहे. लेखन, चित्रकला, संगीत हे सगळे माणसाचे व्यक्त होण्याचे प्रकार आहेत. ते ज्याने त्याने करत रहावेत, लोकांना आवडो किवा नावडो. कंटेंट क्रिएशन हे चालतच राहणार. (असे मला कालपर्यंत वाटत होते, पण आता चॅट जी पी टी ने त्याला थोडा धक्का बसलाय)

माझ्या बाबत तरी आळस हे एक मोठे कारण आणि उत्स्फुर्तता विरुद्ध सातत्य(spontaneity vs consistency) हे दुसरे. म्हणजे मनाला एखादा विषय सुचला की झरझर लिहिला जातो. पण कधी रोज एक सुचेल तर कधी महिन्यात काही नाही. असो. तुम्ही लिहिते रहा. आम्ही वाचनमात्र आणि प्रतिसादमात्रे राहु.

जाता जाता--डोक्यात असलेले टायपुन ठेवत जा कुठेतरी. प्रकाशित करायचे की नाही, कुठे करायचे, काय वगळायचे हे सगळे नंतर ठरवता येईल.

हेच लिहिणार होते.जे सुचले ते लिहावे,त्यावर संस्कार करावेत.प्रकाशित करायचे की नाही ते निवांत ठरवावे.बाकी पहिल्यांदाच लिहिण्याचा कंटाळा केला की काही दिवसांनी योग्या भाव हरवतात, विषयातलं नाविन्य,उत्साह संपतो.मग औपाचारिक लेख वाटतो.
जे सुचलं ते लिहित रहा.

कुमार१'s picture

3 Feb 2023 - 6:32 am | कुमार१

*"पहिल्यांदाच लिहिण्याचा कंटाळा केला की काही दिवसांनी योग्या भाव हरवतात, >>>
बरोबर. चांगला मुद्दा

जेब्बात!

पहिल्यांदाच लिहिण्याचा कंटाळा केला की काही दिवसांनी योग्या भाव हरवतात, विषयातलं नाविन्य,उत्साह संपतो.मग औपाचारिक लेख वाटतो.

सौ बात कि एक बात...

कुमार१'s picture

2 Feb 2023 - 12:22 pm | कुमार१

१.

आळसपणा माझा आवडता छंद

>>>
मग मी पण तुमचा बंधू आहे असे समजा. कामापेक्षा विश्रांतीचे तास अधिक मिळावेत असा माझा प्रयत्न असतोच !

२.

डोक्यात असलेले टायपुन ठेवत जा कुठेतरी

>>>
होय, चांगली सूचना.

अलीकडे मी सुचलेल्या विषयाचे नाव पटकन गुगल डॉक्स मध्ये लिहून ठेवत असतो. इथल्या सभासदारांनी सुचवलेल्या आरोग्य विषयांची यादी आता डझनभर होऊन राहिली आहे.

कुमार१'s picture

2 Feb 2023 - 12:24 pm | कुमार१

सभासदारांनी
>>>
सभासदांनी असे वाचावे

कुमारजी रोचक विषय .. आपण पुढे वेळ मिळाल्यावर हुकलेल्या विषयवार लिहाल आणि त्याला प्रसिद्धी मिळेल अशी आशा करतो

या बाबतीतही एक त्रोटक अनुभव ..
- सातत्य ठेवण्याचे दडपण हा हि एक मुद्दा असू शकतो

काही वर्षांपूर्वी भारत सोडल्यावर छोटे छोटे स्फुट लेख लिहयलाला लागलो आणि त्याला महाराष्ट्रातील वर्तमानपत्र किंवा मासिकातून प्रसिद्धी पण मिळाली त्यामुळे हुरूप आला होता पण पुढे त्यात सातत्य टिकवणे अवघड होते असे दिसले... जरी त्यातून पैसे मिळवणे हा काही हेतू नवहता पण तरीही
- आता यु ट्यूब च्या जमान्यात "प्रवास आणि खाणे" यावर हि यु ट्यूबर बनावे असे वाटते कधी पण परत सातत्य ठेवण्याचे दडपण येते

असो जाता जाता .. असे म्हणतात कि लेखनासारखि/ गीत लेखनाची कला जोपासताना , विषय कधीही सुचू शकतो हे खरे आहे ... पण मला मात्र एक विचित्र अनुभव येतो तो म्हणजे सर्वात जास्त विषय कधी सुचतात आणि आळसाने विरून जातात तर ते या दोन गोष्टी जुळूनआल्या तर १) माफक मद्य + २) ३५,००० फुटावर ना पॉट ढवळणारा विमान प्रवास +३ ) पोट साफ असणे + झोप झालेली असणे आणि साधारण संध्याकाळची विमानाची वेळ
का कोण जाणे ( यातील मद्यामुळे भवन तरल होतात हे जरी सर्वश्रुत असले तरी इतर गोष्टी

कुमार१'s picture

3 Feb 2023 - 6:34 am | कुमार१

**सातत्य ठेवण्याचे दडपण येते
>>>>+१२३.

**मद्यामुळे भवन तरल होतात>>
रंजक मुद्दा !

टर्मीनेटर's picture

3 Feb 2023 - 8:22 pm | टर्मीनेटर

"प्रवास आणि खाणे" यावर हि यु ट्यूबर बनावे असे वाटते कधी पण परत सातत्य ठेवण्याचे दडपण येते

स्वान्तसुखाय व्हिडीओ करा हो, दडपण वगैरे अजिबात घेऊ नका... आम्ही आवडीने बघू!

आनन्दा's picture

3 Feb 2023 - 11:03 am | आनन्दा

हा विषय कधी आणि कसा सुचला?

कुमार१'s picture

3 Feb 2023 - 11:17 am | कुमार१

प्रश्न आवडला !
खरंतर हा विषय अनेक वर्षे डोक्यात घोळतो आहे. या लेखात हुकलेले विषय दिले आहेत. त्यांच्यावर लेखन होऊ न शकल्याने ते डोक्यात अधूनमधून पिंगा घालत असतातच.
आयुष्याच्या चढत्या टप्प्यांवर त्याबद्दल लिहिता न आल्याने त्याची खंत मनात राहतेच.

म्हणून आता म्हटले, की या लेखाच्या निमित्ताने त्यांची एक यादीच सादर करावी :)

टर्मीनेटर's picture

3 Feb 2023 - 7:58 pm | टर्मीनेटर

रोचक लेखन विषय!
अगदी खरं आहे, कित्येक विषय अचानक सुचतात पण त्यावर लेखन करणे बऱ्याचदा जमत नाही. पंधराएक दिवसांपूर्वी आपलया फोनवर गप्पा चालू असताना 'फूड डिलेव्हरी वॅले' बद्दलचा एक किस्सा तुम्हाला सांगितला होता, त्यावर मी लेख लिहावा असे तुम्ही सुचवलेही होते! विषय नक्कीच रोचक आहे पण त्यावर लिहिणे अद्याप तरी शक्य झाले नाहीये 😀

मग तेव्हा काय करत होतो?
छंद.
भटकंतीचे बरेच लेखन डायरीत आहे. पण फोटो नसल्याने सादर करणे मजा येणार नाही. कारण ते ललित अजिबात नाही. लोकांना उगाच पिडण्यात अर्थ नाही.

लिहित राहावे, तुमच्या शैलीतले माहितीपूर्ण लेख वाचायला आवडत असतात.

कुमार१'s picture

3 Feb 2023 - 9:08 pm | कुमार१

मनमोकळे प्रतिसाद येत आहेत आनंद वाटला.

१.

'फूड डिलेव्हरी वॅले' बद्दलचा एक किस्सा

>>>
अरे हो !तो विषय खरंच सुंदर व प्रेरणादायी आ. हे पाहिजे तर मुरू द्या मनात पण लिहाच सवडीने.
.....
२.

लोकांना उगाच पिडण्यात अर्थ नाही

>> असं काही नाही हो !
लिवा बिनधास्त...

सरिता बांदेकर's picture

3 Feb 2023 - 9:30 pm | सरिता बांदेकर

खरंच खूप छान रंगतेय चर्चा.
मी लिहायला सुरूवात केली की लॅाकडाऊनमध्ये.
मी आता प्रतिसाद लिहायला सुरूवात केली पण खूप मोठा होतोय.
कुणाची हरकत नसेल तर मी स्वतंत्र धागा काढते.
कारण यावर्षीच्या वसूधा दिवाळी अंकातली कथा वाचून मला फोन आणि पत्रं येतातयत वाचकांची.
त्यामुळे माझ्या कथा कशा सुचल्या आणि मी त्या पूर्णत्वाला कशा नेल्या हे सांगावंसं वाटतंय.
या माझ्या लेखनाच्या प्रवासात मला काही लोकांनी खूप मोलाची मदत केली.
त्यामुळे कथा सुचली पण पूर्णत्वास आली नाही असं माझ्या बाबतीत तरी नाही झालंय.

कुमार१'s picture

4 Feb 2023 - 6:10 am | कुमार१

जरुर धागा काढा.
वाचायला आवडेल.

कुमार१'s picture

4 Feb 2023 - 6:10 am | कुमार१

जरुर धागा काढा.
वाचायला आवडेल.

कुणाची हरकत नसेल तर मी स्वतंत्र धागा काढते.

जरुर नविन धागा काढा, त्यात कोणाला हरकत असण्याचे काही कारणच नाही! उलट तुमचे अनुभव वाचायला आवडेल...

कुमार१'s picture

4 Feb 2023 - 11:36 am | कुमार१

चांगली चर्चा. सर्वांना धन्यवाद !

एकंदरीत लेखन प्रक्रियेबद्दल मान्यवर लेखक काय म्हणतात त्याची ही झलक:

द. र. कवठेकर:
लेखकाचा हात सतत लिहिता राहिला पाहिजे.

भानू काळे:
आपल्या लेखनातून जणू आपले निवडक आयुष्यच लेखक पुन्हा जगत असतो.

रा चिं. ढेरे
लेखकाच्या डोक्यात जे असतं त्यापैकी फक्त एक टक्का कागदावर उतरतं.

व पु काळे
कोणते लेखन श्रेष्ठ असा प्रश्न विचारला, तर जे वाचल्याबरोबर हे आपल्याला का नाही सुचलं ? असं वाटायला लावणारं कुणाचंही लेखन.

Somerset Maugham:
A writer must write and record and describe and express constantly.

तर जे वाचल्याबरोबर हे आपल्याला का नाही सुचलं ? -;व.पु.
बरोबर.
शोधांबद्दलही कोणी म्हणून गेलाय की सुमद्रकिनारी एखाद्याला सापडलेला नवा शंख . मग मी रोज जातो पण मला कसा सापडला नाही असा शंख?

चित्रगुप्त's picture

5 Feb 2023 - 11:55 pm | चित्रगुप्त

खूप छान लिहीले आहे. लेखातले सगळे मुद्दे कुणीही सहमत व्हावे असेच आहेत.
मला गेली अनेक वर्षे पहाटे तीनच्या सुमारास जाग येऊन काही ना काही नवीन कल्पना (आणि कित्येकदा वाक्येच्या वाक्ये) सुचत असते. ती त्याच वेळी उठून लिहून न ठेवता पुन्हा झोपलो, तर सकाळी उठल्यावर त्यातले काहीही आठवत नाही. माझे बरेचसे लिखाण हे अशा पहाटे सुचलेल्या कल्पनेवरूनच घडून आलेले आहे.

बहुसंख्य विषय हे ठिणगी अवस्थेतच विझून जातात. उरलेले जे काही धुगधुगी धरून ठेवतात त्यातलेही पुढे निम्म्याहून अधिक माझ्याकडूनच नाकारले जातात - यात काही दम नाही असे वाटल्यामुळे.

-- माझेही अगदी असेच होते. कित्येकदा संपूर्ण लिहिलेली कविता वगैरे सुद्धा प्रकाशित करण्याच्या लायकीची नाही असे वाटून ती तशीच रद्दीत जाते.( माझे बरेचसे लिखाण हाताने लिहीलेले असते - १९६७ - २०१० या काळातील रोजनिश्या आणि काहीतरी सुचल्यावर ते लिहीलेले अनेक कागद सांभाळून ठेवले आहेत, पण 'आता' त्यांचे काय करायचे, हा प्रश्न भेडसावतो आहे)

खूप वर्षांपूर्वी (अंदाजे १९८८-९०) मी कलकत्त्यातील 'मलिक बाडी' (मार्बल पॅलेस) हे अद्भुत ठिकाण बघून बाहेरच्या उद्यानात बसलेलो असताना एका दीर्घकथेची कल्पना सुचली. लगेच तिथेच बसून काही लिखाण केले. यात तीन पिढ्यांच्या तीन भारतीय चित्रकारांचे जीवन, त्या त्या वेळची भारतीय चित्रकला आणि तिचा पाश्चात्त्य कलेशी असणारा संबंध असा विषय होता. माझ्या डोळ्यासमोर ते तीन चित्रकार म्हणजे इंदौर आणि ग्वाल्हेरच्या कला शाळांचे संस्थापक कै. दत्तात्रय दामोदर देवळालीकर, माझे गुरु कै. चन्द्रेश सक्सेना आणि त्या तिघांपैकी शेवटला मी स्वतः होतो. पुढली अनेक वर्षे अधून मधून लिखाण करत गेलो आणि वाढत्या वयाप्रमाणे त्यात बदलही करत गेलो. ते सगळे बाड - अनेक सुट्टे कागद, काही वह्या वगैरे एकत्र करून ठेवलेले असले, तरी ते पूर्ण झाले नाही, कारण त्यासाठी आवश्यक तो अभ्यास करण्याचा कंटाळा. कथा काल्पनिक असली तरी चित्रकलेबद्दलचे संदर्भ अचूक असले पाहिजेत, त्यासाठी वाचन करण्याचा तर आता कंटाळाच आलेला आहे.
तीच गोष्ट 'मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा' या दीर्घकथेची. आक्टोबर २०१८ मधे चौथा भाग प्रकाशित केल्यावर हा विषय जो मागे पडला तो पडलाच. पुढे लिहीण्यासाठी आवश्यक अभ्यास करण्याचा कंटाळा (यासाठी इंग्रजी लेख हुडकून वाचावे आणि बरेचसे विडियो वगैरे बघावे लागतील, ती चिकाटी सध्यातरी नाही)
असो. या सुंदर लेखाबद्दल अनेक आभार.

कुमार१'s picture

6 Feb 2023 - 7:52 am | कुमार१

छानच !
तुमचा अनुभवसंपन्न प्रतिसाद आवडला. लेखनाच्या बाबतीत अजून एक मुद्दा सांगतो. कित्येकदा संपूर्ण लेख लिहायला जो काही कालावधी लागलेला आहे त्याहीपेक्षा अधिक वेळ चांगले शीर्षक सुचण्यासाठी जातो.

कित्येकदा एखादे शीर्षक भल्या पहाटे किंवा स्वच्छतागृहात असताना सुचते. मग तातडीने त्याची कागदावर किंवा मोबाईलवर नोंद केलेली बरी असते. अन्यथा काही तासांनी ते मनातून हुकण्याचा धोका असतो.

एखाद्या वेळेस एखाद्या महत्त्वाच्या विषयावर माझे लेखन आठवडाभर चालू असेल, तर मी बायकोला सांगून ठेवतो,
“रात्री अपरात्री एकटा उठून जर मी शेजारच्या खोलीत गेलो तर काहीतरी लेखनाचा आठवलेला मुद्दा नोंदण्यासाठी गेलो आहे असे समज, घाबरू नकोस !”