मिपा 'अचानक' कट्टा - भाजे लेणी - २२ जानेवारी २०२३

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in जनातलं, मनातलं
23 Jan 2023 - 2:59 pm

p {text-align:justify;}
संदीप उवाचः
तर सुजाण मिपाकरहो, धाग्याचं नाव वाचून एका अचानक घडलेल्या मिपाकट्ट्याचा वृत्तांत वाचायला मिळणार हे तुम्ही ओळखलच असेल. पण हा अचानक ठरलेला कट्टा सुमारे दोन दिवाळी अंक पाहिलेला आहे. म्हणजे सर्वांची तारीख आणि ठिकाण हे काही केल्या ठरत नव्हते. ते एकदाचे ठरले आणि कट्टा यशस्वीरित्या अगदी मजेत पार पडला. कट्ट्याला प्रचेतस (पूर्वाश्रमीचे वल्ली), प्रशांत (सरपंच), टर्मिनेटर, ज्ञानोबाचे पैजार (पैजारबुवा), तुषार काळभोर (पूर्वाश्रमीचे पैलवान) आणि मी व माझी कन्या मानसी इत्यादी हजर होतो. कट्टा मॅप्रो गार्डन, लोणावळा व भाजे लेणी अशा ठिकाणी घडला. याहून आधिक माहितीपर न लिहिता वृत्तांताला सुरूवात करतो.

सकाळी सव्वासातला घर सोडले. बरोबर आठ वाजता ठरलेल्या ठिकाणी पोचण्याचा विचार आमच्या कन्या रत्नाने रस्त्यात तीन वेळा वॅक वॅक वॅक साठी गाडी थांबवायला सांगून हाणून पाडला. शेवटी पावणे नवाच्या ठोक्याला पोचलो तर पाच शिलेदार घोळका करून थांबलेले. वल्ली आणि प्रशांत यांना आधी भेटलो असल्याने अडचण आली नाही. पैलवान आणि टर्मिनेटर यांनाही आधी पाहिलेले फोटोमध्ये. पैजारबुवांना मी प्रथमच पाहत होतो, तेही साक्षात! आधी तर दंडवतच घालणार होतो पण तेवढ्यात तिथे झाडू मारायचा बाकी आहे असे समजल्यावर तो विचार पुढे ढकलला तो कायमचाच. पैजारबुवाको मात्र मैने जैसा सोचा था वैसाही पाया. फक्त त्यांचे पुढचे दात अजून पडलेले नाहीत आणि अगदीच "जख्ख" वगैरे म्हणण्याइतके ते म्हातारेही झालेले नाहीत. असा थोडासाच माझा अंदाज चुकल्यामुळे मला बरे वाटले.

मॅप्रो गार्डन, लोणावळा, हे ठिकाण सुचवल्याने सर्वचजण तुकांच्या निवडीचं कौतुक न करतील तर ते मिपाकर कसले? पंधराएक मिनीटे (की जास्त?) त्यांच्या कौतुकाचा कार्यक्रम पार पडला. टर्मिनेटर तर इतके खूष झालेले की त्यांनी तुकांच्या सत्कारासाठी कालच हार आणून ठेवलेला म्हणे, पण त्यातली फुले आज सकाळी सुकल्याने त्यांनी तो हार वाटेतच टाकला. खरेखोटे तो हारच जाणे. असो, नंतर मग जशा टुरिस्टांच्या एकेक गाड्या येऊन पार्क होऊन ते आत जाऊ लागल्या तसे सर्वानुमते आपणही आत जावे असे ठरले.

माझी मुलगी मात्र मॅप्रो गार्डन पाहून खूपच खूष झालेली! आपल्या वॅक वॅक वॅक चे कष्ट कसे वर्थ होते ह्यावर तिला स्वतःचेच कौतुक वाटत होते.

2

साधारणपणे सकाळी नाष्ट्याला, पोहे, उपमा, इडली, मेदूवडा सांबर, लोणीस्पंज डोसा(बेन्नेचा) झालंच तर मिसळपाव, साबुदाणा खिचडी नाहीतर ऑफिसच्या दुपारच्या डब्यासाठी असलेली भाजी आणि चपाती, चहा-चपाती, चहा बिस्कीट, चहा-खारी, चहा-टोस्ट, चहा-क्रीमरोल किंवा नुसताच चहा यातलं काहीतरी खाण्याची/पिण्याची पद्धत असते. पण आज सासंचा स्पेशल कट्टा असल्याने आज आम्ही पिझ्झा खाल्ला. तोही चुलीवरचा! चूल पाश्चिमात्य होती खरी. नंतर तोंडी लावायला म्हणून सॅन्डवीच.

5

6

नंतर चहा किंवा कॉफी बाहेर घ्यावी असे ठरले तसेच भाजे लेणीलाही भेट द्यावी असा एक प्रस्ताव आला आणि लगेचच पासही झाला. एव्हाना बरीच पुण्या-मुंबईची गर्दी तिथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असलेली दिसली. त्यांच्यातून वाट काढीत बाहेर निघताना मॅप्रोच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासणी करावी म्हणून मी, वल्ली आणि तुका आत शिरलो. आणि टेस्टर काऊंटर वर जाऊन मोहितो वगैरे ट्राय केले. गुणवत्ता आवडल्याने सरपंच आणि बुवांनी थोडी खरेदी केली.

7

पुढे जाताना बुवांचा एक खांदा थोडासा झुकलेला दिसला. पार्कींगजवळ आल्यावर दोन गाड्या भाजे लेण्यांकडे निघाल्या.

भाजे इथे पोचल्यावर प्रथेप्रमाणे मैं इधर, तुम किधर असे झाले. दोन मिनीटांनी पुन्हा भेटाभेटी झाली. वर चढायला सुरूवात केली तसा माझ्यातला ट्रेकर जागा झाला आणि असा तरातरा वर गेलो की बाकीच्यांना यायला तब्बल पाऊणतास लागला. तेवढ्या वेळात मी तिथल्या सुरक्षारक्षकांबरोबर, हल्लीचे पर्यटक आणि आधीचे पर्यटक यावर विस्तृत चर्चा केली. त्यांना कोपऱ्या कोपऱ्यात नीट लक्ष ठेवणे कसे गरजेचे आहे यावर मार्गदर्शनही केले. तेवढ्यात बाकीचे हाश्शहुश्श करीत वर आले. बहुतेक सगळ्यांची वयं झालीत. सरपंच तर रोज इतकी सायकल चालवून फोटो वगैरे सोशल मिडियावर टाकताना दिसतात परंतु इथे ते चक्क वल्लींच्या आधाराने वर चढत येताना दिसले. तुका उलटे होऊन चालत होते. म्हणजे वर पाय असे नव्हे तर पाठमोरे होऊन. काय तर म्हणे, उतरल्या सारखे वाटते. काय एकेक तऱ्हा! हौस तर मोठी लेण्या चढायची! असो, सर्वजण वर आल्यानंतर वल्लींनी एक सीक्रेट लेणी जी कुलुपबंद होती तिची चावी मिळवली व ती पाहण्यासाठी आम्ही निघालो.

8
9

बाकी इथे लेण्यांविषयी जास्त काही लिहित नाही. वल्लींचे त्याविषयीचे पूर्वीचे धागे वाचून काढावेत. माझा हा वल्लींसोबत पहिलाच लेण्यानुभव असल्याने त्यांच्या तोंडून शिलाहार, सातवाहन, मौर्य, यादव वगैरे एखाद्या लहान मुलाला आईसक्रीम, चॉकलेट, कॅन्डी असे ऐकताना कशी गंमत वाटत असेल अगदी तस्संच झालेलं.
10
11

वेळ कमीच पडला असे नंतर राहून राहून वाटत होते. मग तिथे माफक फोटोसेशन करून आम्ही खाली निघालो व वाटेत पायऱ्यांवर अगदीच काही नाही तर लिंबू सरबत तरी! असे म्हणून ते गपगुमान प्राशन केले. पुढे टर्मिनेटर यांना परत घरी जाण्यासाठी कुठे सोडावे यासाठी मळवली रेल्वे स्टेशनच्या जरासे पुढे एक चर्चासत्र घडले. आम्हां पाचही जणांची प्रायव्हेट विमाने नेमकी आजच इतर मित्रांनी नेल्यामुळे टर्मीनेटर यांना बसने जाणे क्रमप्राप्त होते त्यानुसार बुवांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली व पारही पाडली. कार्ला फाट्यावर काही काळ ट्रॅफिक जाम करवून आमच्या दोन गाड्या दोन दिशेला वळाल्या. पुढे मी तुकांना निगडी बस स्थानकावर सोडले ते पुढल्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनानंतर भेटण्याचे प्रॉमिस घेऊनच.

इतिवार्ता:
(चांदणे संदिप)

तुका उवाचः

तर...
यह बहुत दिन पहले की बात है...
1
( फोटो काढताना फोटोग्राफर शिंकला बहुतेक!!)
मिपाचा दिवाळी अंक सालाबादप्रमाणे प्रकाशित झाला. ६ नोव्हेंबरला प्रशांत यांनी पुणे आणि मुंबईतील दिवाळी अंक समितीतील सदस्यांचा कट्टा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. नीलकांत आणि प्रशांत, घाटाखालून टर्मिनेटर आणि नुलकरकाका, घाटावरचे पैजारबुवा, संदीप चांदणे, प्रचेतस आणि मी असे कट्टेकरी होतो.
पण, पुणे कट्टा असल्याने प्रथेप्रमाणे या शनिवारी हा नाही, त्या रविवारी तो नाही असे करत वर्ष संपत आलं. डिसेंबरमध्ये पहिल्या विकांतला मी नव्हतो, तर उत्तरार्धात पैजारबुवा नव्हते. नवं वर्ष सुरू झालं. विषयाने परत उचल खाल्ली. तर टर्मिनेटर नव्हते. मग प्रशांत यांनी सांगितलं की ते फेब्रुवारीमध्ये मोठ्ठ्या सायकलदौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या रविवारी काही करून कट्टा करायचाच, हे ठरलं.
परवा रात्री लोणावळा येथे मॅप्रो गार्डन हे ठिकाण ठरले. वेळ ठरली रविवारी सकाळी आठ वाजता.
काल संध्याकाळी नूलकर काकांनी कार्यव्यस्तते मुळे यायला जमणार नसल्याचे कळवले. त्यामुळे घाटाखालून टर्मिनेटर एकटेच येणार होते. बुवांनी प्रशांत, प्रचेतस आणि मला घेऊन जाण्याची व्यवस्था केली (प्रशांत आणि बुवांनी सायकलवर लोणावळा गाठायची तयारी केली होती, पण मला डब्बल सीट न्यावे लागेल म्हणून तो बेत बारगळला). तर संदीपरावांनी ते थेट पोचतील असे कळवले.
आणि नौबत झडली, दुदुंभी निनादल्या.. आणि आज सकाळी तो दिवस उजाडला!
.
.
.
ऍक्चुअली, दिवसाची सुरुवात उजाडायाच्या आधीच झाली. मी पाचच्या गजरला उठून स्नुझ करतच होतो, की बुवांचा सुप्रभात मेसेज आला. मग स्नुझ न करता उठलो, आवरून ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी, म्हणजे साडेसहाला, पोचलो. दोनच मिनिटात बुवा आले. गाडीत बसल्यावर जरा उबदार वाटले. पुढच्या वीस मिनिटात भूमकर चौकात प्रशांत आणि प्रचेतस यांना उचलले आणि पुढे प्रस्थान ठेवले. बुवांनी सात वाजून अठ्ठावन मिनिटे वाजत असताना लोणावळ्यात मॅप्रो गार्डन गाठले. पण अजून तर त्यांचे गेटसुद्धा उघडले नव्हते. मग प्रशांत यांनी जवळच्याच मन:शक्ती केंद्रात अल्पोपहारासाठी जायचे सुचवले. अल्पोपहार होईपर्यंत टर्मिनेटर मॅप्रोमध्ये पोचले सुद्धा. मग आम्ही पुन्हा तिकडे कूच केले. टर्मिनेटर यांची गळाभेट घेईपर्यंत संदीपराव फोटोग्राफरला घेऊन पोचले. मग तिथेच पार्किंगमध्ये अर्धा एक तास मस्त कोवळ्या उन्हात गप्पा मारत बसलो.
1

प्रचेतस, टर्मिनेटर, पैजारबुवा, प्रशांत, संदीप, तुषार

मग तिथे आलेले पहिले कुटुंब परतीलादेखील लागल्याचे कुणीतरी लक्षात आणून दिले, आणि आम्ही मोर्चा आत वळवला.
3

3
...
फोटोग्राफरच्या कौशल्याची झलक :-
4

...
निवांत गप्पा सुरू झाल्या. तोपर्यंत औपचारिकपणा गळून पडला होता. खाद्यपदार्थ आले होते.
5

6
गप्पा जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हेलकावे घेत होत्या. रंग चढत होता.
0
तीन तास मॅप्रो मध्येच कसे गेले ते कळलेच नाही.
मग तिथेच असलेल्या त्यांच्या दुकानात खरेदीला गेलो. सरबत, कॉकटेल्स अन मॉकटेल बनवण्यासाठी उपयुक्त सरबते, आणि इतर साहित्य होते.
तिथून आल्यावर कार्ले लेणी पाहायचा विचार झाला पण आज रविवार असल्याने तिथे प्रचंड गर्दी असेल, असे सांगून प्रचेतस यांनी भाजे लेण्यांचा पर्याय सुचवला. मोर्चा तिकडे वळवला.
...
प्रचेतस यांच्या सहवासात लेणी पाहणे, हा अनुभवण्याचा क्षण असतो, याची प्रचिती आली. या वल्ली माणसाकडे असलेले माहिती आणि ज्ञानाचे भांडार, आणि त्याला लाभलेली शोधक दृष्टी हे त्यांच्या लेखांतून दिसतंच. पण प्रत्यक्षात ते जेव्हा सांगतात, त्यावेळी एकच ठिकाणी असलेल्या दोन वृक्षातील एक सामान्य वृक्ष आणि एक कल्पवृक्ष का, हे कळते आणि आपण त्यांच्या सान्निध्यात काही वेळ व्यतीत केल्याचे समाधान मिळते. उदा. खालील चित्रात 'पोडि' हा शब्द तत्कालीन प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत आहे, ज्याचा आताच्या मराठीत उच्चार 'पोई' असा होतो, म्हणजे हा लेख 'ही पाण पोई 'क्ष्क्ष्क्ष' याने दिलेल्या दानातून बांधलेली आहे' असा काहीसा आहे.
5

भाजे लेणी या विषयावर स्वतः प्रचेतस यांनी अतिशय माहितीपूर्ण लेख लिहिलेला आहेच. त्यातील फोटोही अतिशय देखणे आहेत.

भाजे येथील मुख्य चैत्यगृहात प्रचेतस आणि इतर मिपाकर :
0

आमच्या सोबत सावलीसारखी वावरणारी आणि जिच्यामुळे सेल्फी न घेता सर्वांचे एकत्र फोटो आले ती बाल छायाचित्रकार - संदीपरावांचे 'टिपूर चांदणे' :) -
3

इतिवार्ता:
...

हे ठिकाण

प्रतिक्रिया

लैच वाट बघायला लावलीत राव! आता आधी वाचतो मग 'संजय उवाचं' प्रतिसादात टंकतो 😀

Bhakti's picture

23 Jan 2023 - 3:28 pm | Bhakti

मिपाचे शिलेदार!
खुसखुशीत वृत्तांत!

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jan 2023 - 3:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त झाला कट्टा!! वृत्तांतही खुसखुशीत.

पुढच्या वेळी आम्हालाही आवडेल यायला.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2023 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा

मज्जा आली आहे वाचुन !

--------------------------------
function at() { [native code] }function at() { [native code] }अता मी त्यात नाही , हे वाटुन खिन्न झालेला आत्मा!
सगळ्याण्ना ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

चित्रगुप्त's picture

23 Jan 2023 - 5:14 pm | चित्रगुप्त

वर्णन आणि फोटो बहारीचे आहे. कट्टा जोरदार झालेला दिसतोय. सहभाग्यांपैकी फकस्त प्रशांत आणि वल्ली यांचीच प्रत्यक्ष झालेली असल्याने बाकीचे कोण आहे कोण - व्हो इस व्हो - समजले नाही, तरी विदितावे ही विनंती.

टर्मीनेटर's picture

23 Jan 2023 - 5:31 pm | टर्मीनेटर

.

डावीकडून: प्रचेतस, तुषार काळभोर, टर्मीनेटर, ज्ञानोबाचे पैजार, चांदणे संदीप आणि प्रशांत.

तुषार काळभोर's picture

24 Jan 2023 - 7:37 am | तुषार काळभोर

जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत गप्पा हेलकावे घेत होत्या, त्यावेळी तुमची आठवण आलीच. प्रशांत यांनी मागे तुमच्या भेटीविषयी लिहिलं होतं, ते सविस्तर ऐकताना गंमत वाटली. युरोपच्या कुठल्याशा कोपऱ्यात दोन मराठी माणसे एकमेकांना केवळ योगायोगाने अवचित भेटतात, त्यात एक मिपाकर आणि एक मिपाधर. आणि त्यानिमित्ताने ऋणानुबंध तयार होतात... एकदम कल्पनेपलीकडे!

सौंदाळा's picture

23 Jan 2023 - 5:23 pm | सौंदाळा

सकाळी टर्मिनेटर यांचा एक प्रतिसाद वाचून कट्टा झाल्याचे समजले होतेच.
सुंदर दिवाळी अंकासाठी अपार कष्ट घेतल्याने हा श्रमपरिहार करणे हे संपादक चमूसाठी क्रमप्राप्तच होते.
मस्त झालेला दिसतोय कट्टा आणि छान वृत्त्तांत.
संदीप आणि तुका यांचे आभार

चौथा कोनाडा's picture

23 Jan 2023 - 5:37 pm | चौथा कोनाडा

भारी कट्टा, जबरी वृतांत !

💖

झकास वर्णन, फर्मास प्रचि !

आपण दोघे नाही. :-(

कर्नलतपस्वी's picture

23 Jan 2023 - 6:17 pm | कर्नलतपस्वी

फोटो वर्णन मस्त.
उगाच तोंड देखलं(लेख वाचलं) म्हणत नाही "पिझ्झा न बर्गर घेऊं द्या की रं,अन् मला बी भाज्याला येउ द्या की".कारण आमच्या डाॅक्टरांचे बी पी मशीन खराब झाल्यामुळे घरीच " बसायला" सांगीतलयं.

प्रशांत व प्रचेतस यानां आगोदर भेटल्यामुळे त्यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. वर दोघांनी मागील पुणे कट्ट्यावर घातलेले अनुक्रमे काळा टी शर्ट व निळा साईड कटवाल बुशशर्ट पुन्हा घातले असल्यामुळेच यांना ओळखण्यास मदतच झाली. या दोघांची थोडी उंची वाढल्या सारखी वाटते! मिपा शप्पथ खरं सांगतोय, जुना पुणे कट्टा यावरचा पाभे याचा लेख बघू शकता.

टर्मिनेटर भौ, यांना १२ जानेवारीला सकाळीच नऊ त दोन वाजेपर्यंत व्हाट्स अपवर पिडले होते व ते आता यादीत समाविष्ट असल्याने त्यांनाही ओळखण्यास वेळ लागला नाही.

बाकी तिघांचा अंदाज, कदाचित चुकीचाही ठरेल.
@संदीप भौ यांनी निळ्या रेघांचा पाढंरा शर्ट सैलसर आता खोचलेला,थोडासा बाहेर. पट्टा धारण केलेला. साधारण काही कवी असा पोशाखात दिसतात.

तुषार काळभोर भौ, निळा टी शर्ट, पैलवानी सोडल्यावर बाहेर डोकावणारे हलकेसे.... आणी पैलवान ट्रेडमार्क म्हणजे राणा दा इश्टाईल (पाठक बाईंचे दिवाणे) वाढवलेली दाढी, वरचष्मा (डोळ्यावर चष्मा असे वाचावे, मराठी भाषा लवचिक आहे. वेगळा अर्थ काढून त्याचा किस पाडू नये म्हणून स्पष्टीकरण. )

अर्थात उरलेले पैजारबुवा. हे वेगळे सांगणे नको.
मानसी खुपच खुश दिसतेय.

लेखकास विनंती जरूर याचा खुलासा करावा.यावरून आस्मादिकांची स्मरणशक्ती व रिझनिंग क्षमता या वयातही शाबूत आहे का नाही ते अंम्हास कळेल.

बाकी तुम्ही सर्व एकाच शिणेचे, म्हातार्‍या चे काय काम. पण कधीमधी जमल्यास येईल.

चांदणे संदीप's picture

23 Jan 2023 - 6:30 pm | चांदणे संदीप

बाकी तिघांचा अंदाज, कदाचित चुकीचाही ठरेल.

अंदाज चुकलेला आहेच, पण मुळात तो करण्याची गरजच नव्हती. लेखातच एका फोटोखाली ओळख परेड झालेली आहे तसेच टर्मिनेटर यांनीही आपल्या एका प्रतिसादात सर्वांची नावे लिहीलेली आहेत. ते तुम्ही मिसला बहुतेक. :)

बाकी तुम्ही सर्व एकाच शिणेचे, म्हातार्‍या चे काय काम. पण कधीमधी जमल्यास येईल.

मिपाकट्टे हे नेहमी सर्व मिपाकरांसाठी (लेखक्/वाचक) असतात. आपण कोणत्याही कट्ट्याला शक्य असल्यास येऊ शकता. हा कट्टा सासंच्या कायप्पा ग्रूपवरून सासंसाठी ठरला होता इतकेच.

पाताळेश्वर कट्ट्याला आपण होतात. मी त्यावेळीही यायचा प्रयत्न केला पण पुण्यनगरीचे आणि आमचे पूर्वजन्मीचे काहीतरी वाकडे असावे त्यामुळे पुण्यनगरीतल्या एकाही कट्ट्याला उपस्थित राहू शकलो नाहीये. पुढे कधीतरी बघूया, किंवा पुढच्या वेळी पिंचीत कट्टा ठरला तर तिकडे या.

सं - दी - प

कर्नलतपस्वी's picture

23 Jan 2023 - 6:44 pm | कर्नलतपस्वी

अती घाई संकटात नेई.

कर्नलतपस्वी's picture

23 Jan 2023 - 6:30 pm | कर्नलतपस्वी

समदचं मुसळ केरात,दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.

वर दिलेली नामावली नंतर बघितल्याने आता पुन्हा शुद्धीपत्र देत नाही.

कुमार१'s picture

23 Jan 2023 - 7:16 pm | कुमार१

मस्त झाला कट्टा!! वृत्तांतही खुसखुशीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2023 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कट्टा वर्णन खुसखुशीत. छायाचित्र माहितीपूर्ण. चक्क, प्रशांत यांना कट्याला बघुन डोले भरून आले. पैजारबुवा, तुषारशेठ यांना बघून आनंद जाहला. छोटूली गोड. संदीपशेठ यांना भेटलो आहे. प्रशांत आणि वल्ली यांनाही पाहिल्यासारखे वाटते कुठेतरी...;)

-दिलीप बिरुटे

पैजारबुवा उवाच:- अर्थात आम्ही टिपलेल्या विषेश गोष्टी आणि (वाचकांच्या विशेष सोयी साठी) धाग्यातील दोन वाक्यांमधील वाक्ये

१. आमच्या जन्म जन्मांतरीच्या प्रवासातला हा पहिलाच मिपा कट्टा होता. पण तरी सुध्दा सगळे कट्टेकरी साधारण पहिल्या तीन मिनिटे आणि साडे सव्वीस सेकंदात आपलेसे वाटायला लागले.

२. सगळ्या कट्टेकर्‍यांचे फोटो आधि अनेक वेळा पाहिले असल्याने चेहरे ओळखणे अवघड गेले नाही. पण आता कोविड नंतर मात्र सगळ्यांच्या आकारमानात फरक पडला आहे.

३. वल्ली मागच्या सीटवर बसले की कारच्या मधल्या आरशात मागची वहातूक दिसत नाही त्यामुळे इतर दोन आरशांवर भरोसा ठेवत गाडी चालवावी लागली

४. सोमाटणे का अशाच कोणत्या तरी क्रॉसिंग वर एक गुंठामंत्री कारचालक आम्हास केवळ अर्धा इंचांने चुकवून गेला तरी सुध्दा गाडीतले मिपाकर स्थितप्रज्ञ होते व चालू चर्चेचा मूळ विषय त्यांनी बदलला नाही.

५. म्याप्रो मुख्य फाटक उघडायच्या आधीच आम्ही तिकडे हजर होतो. मुख्य फाटक उघडणारा मनुष्य फाटकाच्या विरुद्ध बाजूने बाईक वरुन आला आणि फाटक उघडून तसाच बाईक वरून मागे गेला या वरुन आतला परिसर फारच भव्य असावा अशी आमची कल्पना झाली. पण प्रतेक्ष प्रवेश केल्यावर ४५ सेकंदातच ती कल्पना चुकीची आहे याची सर्वांना जाणीव झाली.

६. मन:शक्ती मध्ये खाण्यामध्ये संयमाची गरज आणि मनाची शक्ती यावर साबुदाणा वडा, उपमा आणि मेदुवडा सांबार खाता खाता एक उद्बोधक परिसंवाद झाला ज्याचे अध्यक्षपद अर्थातच प्रशांत यांच्या कडे होते. आम्ही ते (अध्यक्षपद) हिसकावून घ्यायचा क्षीण प्रयत्न केला पण तो त्यांनी मोठ्या शिताफीने हाणून पाडला आणि मग आम्हाला मुकाट श्रोत्याच्या भूमिकेत जावे लागले.

७. त्या नंतर तेथून बाहेर पडताना मन:शक्ती मधले खाण्या पिण्याच्या पदार्थांचे दर कसे वाढले आहेत याचा तुलनात्मक अभ्यास झाला. अध्यक्ष अर्थातच...

८. म्याप्रो च्या पार्किंग मध्ये गाडी लावणारे आम्ही पहिलेच होतो.

९. श्री टर्मिनेटर आमच्या आधी येउन कोपर्यातल्या एका दगडावर स्थानापन्न होऊन पक्षी निरीक्षण करत बसले होते.

१०. तिकडेच कोवळ्या उन्हात मिपाचे व्यसन आणि त्याचे फायदे तोटे या विषयावर एक उद्बोधक परिसंवाद झाला अध्यक्षपदावर..... (नाय नाय आता अध्यक्ष बदलले) श्री टर्मिनेटर होते.

११. हाच परिसंवाद मग डू आयडी कडे वळाला आणि मग कोण कोणते मिपाकर एक्सेल फायली वापरतात याची एका यादीच पेश करण्यात आली.

१२. मधून मधून श्री वल्ली जुन्या जुन्या मिपाकरांच्या आठवणी सांगता होते. काही नावे घेतल्यावर ते सद्गदित झाले होते. तांब्याधिपतींचे नाव निघताच त्यांनी हळूच डोळे देखील टिपले. (पुराव्या दाखला गरजुंना फोटो दाखवण्यात येईल) (नव्या वाचकांसाठी :- या प्रतिसादावर जे "दुदु" असा प्रतिसाद देतिल तेच आमचे परममित्र “तांब्याधिपती” आहेत याची क्रुपया नोंद घ्यावी.)

१३. या सगळ्या संवादात असे लक्षात आले की आपल्या नंतर आलेली अनेक एक कुटुंब त्यांचा अल्पोपहार उरकून हाटेलातूनबाहेर आली सुध्दा. मग आम्ही म्याप्रोच्या मूळ वास्तूत प्रवेशकर्ते झालो आणि मग सगळी इस्टेट आपल्याच तीर्थरूपांची असल्याच्या थाटात परिसराची पहाणी केली.

१४. बसण्याची जागा निवडण्या करता साडेचौदा जागा फायानाल झाल्या होत्या. शेवटी वल्ली १५व्या जागेवर जाऊनच बसले त्यामुळे बाकीच्यांकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही.

१५. मंटू अत्यंत हुशार, दयाळू आणि धोरणी मुलगी आहे. तिने तिच्या बाबांना फिंगर चिप्स घ्यायला लावल्या (हुशारी) व उदारपणे प्रत्येकी एक एक तुकडा प्रत्येक काकाला दिला (दयाळू) . मी जास्तच लोचट पणा करतो आहे असे समजल्यावर तिने अजून एका तुकडा मला वाढला आणि बाबांजवळ जाऊन बसली (धोरणी)

१६. या जागेवर परिसंवाद करताना कोणत्याही आयडीचे नाव घ्यायचे नाही कारण तो आयडी किंवा त्याचे नातेवाइक जरा आजूबाजूला असतील तर पंचाईत होईल असे सर्वानुमते ठरले आणि पहिल्याच किस्याला हा नियम सपशेल मोडला गेला आणि नंतर कधीही पाळला गेला नाही.

१७. बोलताना आमचा आवाज इतका टिपेला पोचला होता की आमची ऑर्डर तयार आहे हे सांगायला म्याप्रोच्या कर्मचाऱ्यांना लाउडस्पीकर वरुन कमीत कमी आठ ते दहा अनाउंसमेट कराव्या लागल्या आणि आम्ही सोडून इतर ग्राहकांना ती ऑर्डर आमचीच आहे हे समजले.

१८. परिसंवाद संपायची चिन्हे दिसेना तेव्हा प्रशांत यांनी भाजे लेण्यांचा हुकमी प्रस्ताव बाहेर काढला आणि वल्ली लगेच जागेवरुन उठले. मग बाकीच्यांना नाईलाजाने उठावे लागले.

१९. जलपान करताना तिकडचे ग्लास पाहून श्री टर्मिनेटर यांचा जीव हळहळत होता. “अरे या ग्लासातून पाणी प्यायचे का” से ते कमीत कमी साडेआठ वेळा म्हणाले आणि इतरांनी (मंटू सोडून) त्यांना तेवढ्या वेळा कोरडी सहानुभूती दाखवली.

२०. शेवटीं ही लागलेली तहान आम्ही श्याम्पाल काउंटर वरची रंगीत द्रव्ये पिउन भागवली

२१. गाडीत बसताना वल्ली अर्थातच सर्वात पुढे होते. त्यांना शक्य असते तर म्याप्रो मधून भाज्याला ते उडत उडत गेले असते. गाडीत ते शरीराने आमच्या बरोबर होते पण मनाने भाजे लेण्यात त्यांचा विहार कधीच सुरु झाला होता.

२२. भाजे गावात प्रवेश करताना कर वसूल करण्या करता एका महिला अधिकारी नियुक्त केलेली होती. मग पुरुष कर्मचारी असले की टोलनाक्यांवर कशी अशांतता माजते या विषयावर एक परिसंवाद झाला अध्यक्ष अर्थातच..... आपले नेहमीचेच.

२३. भाजे लेणी चढताना वल्ली सोडून सगळ्यांची खरी वये उघड झाली. मंटू, मी वल्ली, प्रशांत, श्री टर्मिनेटर अशा क्रमाने लेण्यांना पोचलो. पैलवान आणि चांदणे पैलवान यांनी संयुक्तपणे शेवटचा नंबर भूषवला. (हेच खरे व्हर्जन आहे याची वाचकांनी क्रूपया नोंध घ्यावी) (खोटे असेल तर देवा माझे मिपावरचे (हा सोडुन) सगळे आयडी उडव)

२४. चांदणे पैलवान यांनी दमलेल्या बाबाची कहाणी भाग २ तिकडेच लिहून काढला.

२५. पुढचा सगळा वेळ आम्ही व्याल, त्रिरत्न, कल्पवृक्ष, गजपृष्ठ, भारवाहक इत्यादी शब्द ऐकत होतो. सांगणारा भरभरून सांगत होता. ऐकताना आम्हीच कमी पडत होतो. मधेच मी काहीतरी वेडगळ शंका विचारात होतो पण लहान बालकाला समजावून सांगावे तितक्या मृदू भाषेत मला त्याची उत्तरे मिळत होती.

२६. लेणी उतरताना “चढणे सोपे उतरणे अवघड” या विषयावर एक जबरदस्त परिसंवाद झाला. (सारखे सारखे अध्यक्ष कोण सांगणार नाही बर का, ओळखून घ्या कोण असेल ते), त्याला कंटाळून वल्लीनी सर्वांना लिंबूपाणी पाजले, पण तरी शेवटची पायरी उतारे पर्यंत परिसंवादाचा आवेग काही कमी झाला नाही,

२७. या सगळ्याच्या मध्ये “धूप दीप नैवेद्य असा हा सादुपचार चालला” ह्या गाण्याची प्रात्याक्षिके चाललेली होती.

२८. मग पुढचा साधारण अर्धातास श्री टर्मिनेटर यांना लोकल मध्ये बसवायचे का ट्रेन मध्ये बसवायचे का बसने पाठवायचे यावर उद्बोधक चर्चा झाली. एकदा तर त्यांना टेंपोत बसावावे असाही प्रस्ताव आला होता. पण अध्यक्षांनी तो व्हेटो वापरून तो फेटाळला व एकदांचे कसे जायचे हे ठरले.

२९. “दोन ओंडक्यांची होते सागरात भेट” हे गाणे म्हणत आमच्या दोन गाड्या गाडी रस्त्याच्या मधोमध उभ्या राहिल्या आणि मागच्या बोंबलणाऱ्या लोकांची पर्वा न करता निरोप समारंभ झाला.

३०. माझा सकाळचा गाडी चालवण्याचा भयाकारी अनुभव लक्षात घेता पैलवान यांनी मोठ्या चतुराईने चांदणे पैलावानां सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे “या म्हाताऱ्या बोरिंग बुवा पासून सुटलो” हे भाव काही लपत नव्हते.

३१. श्री टर्मिनेटर यांना इच्छित स्थळी पोचवले तेव्हा त्यांचे डोळे अक्षरश: भरून आले होते. मग घसा ओला करण्याचे राहिलेले कार्य लवकरच सिद्धीस नेण्याच्या आणाभाका झाल्या आणि आम्ही निग्रहाने श्री टर्मिनेटर यांच्या कडे पाठ फिरवली.

३२. मग रिकाम्या झालेल्या पुढच्या सीटवर कोणी बसायचे यावरून तुंबळ हाणामारी झाली ज्यात वल्ली जिंकले आणि प्रशांत यांना निमूट पणे माझ्या शेजारी येऊन बसावे लागले.

३३. मधल्या आरशातली वल्ली मूर्ती डोळ्यात साठवत मी गाडी हाकायला सुरवात केली आणि कधी पुण्यात पोचलो हे समजलेच नाही.

३४. उतरल्यावर प्रशांत यांनी गाडीच्या डिकीतले त्यांचे सामान काढून घेतले. (इथे घाईघाईनी हा शब्द वापरला नाही याची क्रूपया नोंद घेतली जावी)

३५. वल्ली आणि प्रशांत यांनी हळूच डोळे टिपत माझा निरोप घेतला (असे मला वाटले). मी ही मग डोळ्यात कचरा गेल्याचे निमित्त करून डोळे पुसूतो आहे असे त्यांना वाटावे अशी अ‍ॅक्टिंगकरत, घराकडे गाडी हाकायला लागलो.

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

23 Jan 2023 - 8:31 pm | चांदणे संदीप

पैलवान आणि चांदणे पैलवान यांनी संयुक्तपणे शेवटचा नंबर भूषवला. (हेच खरे व्हर्जन आहे याची वाचकांनी क्रूपया नोंध घ्यावी)

ये जो आपने मेरा पितळ उघडा पाडा हय वो चांगला नही किया हय. कधीतरी भविष्य में मेरेको भी चानस मिळेगा एवढा ध्यान में रखो फक्त! ;)

सं - दी - प

चांदणे संदीप's picture

23 Jan 2023 - 8:36 pm | चांदणे संदीप

श्री टर्मिनेटर, श्री वल्ली असे लिहिलेले पाहून प्रतिसादक बुवाच आहेत का हे पुन्हा एकदा पाहून घेतले. ;)

आणि...

पैलवान आणि चांदणे पैलवान यांनी संयुक्तपणे शेवटचा नंबर भूषवला. (हेच खरे व्हर्जन आहे याची वाचकांनी क्रूपया नोंध घ्यावी)

ये जो आपने मेरा पितळ उघडा पाडा हय वो चांगला नही किया हय. कधीतरी भविष्य में मेरेको भी चानस मिळेगा एवढा ध्यान में रखो फक्त! ;)

सं - दी - प

पैलवान आणि चांदणे पैलवान यांनी संयुक्तपणे शेवटचा नंबर भूषवला. (हेच खरे व्हर्जन आहे याची वाचकांनी क्रूपया नोंध घ्यावी)

तुम्हा दोघांना बघुन दोस्ती सिनेमातल्या गाण्यातील खालिल दृष्य सर्वांना आठवले होते (मी चुकीचे गाणे सांगितले होते हा भाग वेगळा पण अचूक गाणे कुठले हे तुम्हीच सांगितले होतेत 😂)
.

ये जो आपने मेरा पितळ उघडा पाडा हय वो चांगला नही किया हय.

थोडा वेळ थांबा... मी पण "संजय उवाचः" मधुन आणखिन थोडे पितळ उघडे पाडणार आहे 😀 😂

ये जो आपने मेरा पितळ उघडा पाडा हय वो चांगला नही किया हय.

थोडा वेळ थांबा... मी पण "संजय उवाचः" मधुन आणखिन थोडे पितळ उघडे पाडणार आहे

सध्याचे एखादे मराठी ताजे रोजचे वृत्तपत्र सकाळी सकाळी वाचल्याचा भास झाला.

मेरा तो पितळ भी नही था आणि उघडा भी नही था!!
फिरभी मेरे को उघडा किया..

चांदणे संदीप's picture

23 Jan 2023 - 10:11 pm | चांदणे संदीप

भारीच! यालाच म्हणतात असंगासी संग बुवांशी गाठ! ;)

सं - दी - प

११. हाच परिसंवाद मग डू आयडी कडे वळाला

ही चर्चा खरोखर रोचक होती, काही (नवीन) मुखवट्या मागचे (जुने) चेहरे त्यातून मला समजले 😀

१९. जलपान करताना तिकडचे ग्लास पाहून श्री टर्मिनेटर यांचा जीव हळहळत होता. “अरे या ग्लासातून पाणी प्यायचे का”

तर काय...
वॉटर कुलरला स्टेनलेस स्टीलचे पेले स्टेनलेस स्टीलच्या साखळ्यांनी बांधायचे सोडून व्यवस्थापनाने इतके सुंदर वाईन ग्लासेस पाणी पिण्यासाठी ठेवलेले बघून जीव हळहळेल नाही तर काय होईल 😂

बाकीच्या पॉइंट्सवर पण सवडीने भाष्य करिनच 😀

जोरदार मस्त अप्रतिम कट्टा आणि वृत्तांत पण.. चला आता परत कट्टा करूयात लवकर ..

टर्मीनेटर's picture

23 Jan 2023 - 10:04 pm | टर्मीनेटर

संजय उवाचः

"हा अचानक ठरलेला कट्टा सुमारे दोन दिवाळी अंक पाहिलेला आहे."

हे सुरुवातीला संदीप चांदणे ह्यांनी लिहिलेलंच आहे.
तर गेली दोन वर्षे केवळ चर्चेचा विषय राहिलेला आणि आता केवळ प्रशांत ह्यांच्या कल्पनेपुरताच मर्यादित रहातो की काय अशी शंका येऊ लागलेला एक 'कट्टा' फायनली काल यशस्वीरीत्या पार पडला.

'कविराज' चांदणे संदीप आणि 'पैलवान' तुषार काळभोर ह्या दोघांनी कट्टावृत्तांत सुरेख लिहिला आहे ह्यात दुमत नाही, परंतु काही खुलासे करण्यासाठी, निरीक्षणे नोंदवण्यासाठी आणि गमतीजमती सांगण्यासाठी हा प्रतिसाद प्रपंच!

प्रत्यक्ष कट्ट्याला साडे सहा मिपाकर उपस्थित असले तरी आधी झालेल्या चर्चेत आणखीनही काही नावे होती! नीलकांत आणि चिनार हे कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू शकत नसल्याची अधिकृत माहिती मिळाली असली तरी प्रत्यक्षात कट्टे आयोजनात दरवेळी पुणे किंवा पुणे परिसराला दिले जाणारे झुकते माप आणि पर्यायाने त्यातून विदर्भावर वारंवार होणाऱ्या अन्यायाचा 'निषेध' हे कारण असल्याची कुणकुण लागली आहे 😂

पुणेकर वस्ताद/दिशाभूल करण्यात एक्स्पर्ट असतात हे मला ऐकून माहिती असले तरी प्रत्यक्ष तसा अनुभव नव्हता. नूलकर काकांनी ह्याआधी 'तसा' अनुभव घेतलेला असल्याने ऐनवेळी पांढरे निशाण फडकवत कट्ट्याला उपस्थित रहाणे टाळले असावे अशी दाट शंका आता स्वानुभव आल्यावर मला येऊ लागली आहे. काही उदाहरणे देतो त्यावरून मला असे का वाटते हे स्पष्ट होईल 😀

  • कधी नाही ती आमच्या इथे गुलाबी वगैरे म्हणतात तशी थंडी पडली असताना कट्ट्यासाठी लोणावळ्याला (मॅप्रो गार्डन सकाळी ९ वाजता उघडत असूनही) भल्या सकाळी आठ वाजता भेटण्याची वेळ ठरून आमचे निद्रासुख हिरावून घेणे.
  • नूलकर काका येणार असतील तर मी गाडी काढणार होतो आणि एकटाच असलो तर रेल्वे/ शिवनेरी/शिवशाही अशा मिळेल त्या मार्गाने जायचे ठरवले होते आणि तशी चर्चाही झाली होती. असे असतानाही 'प्रशांत' आणि 'पैजारबुवांनी' ऐनवेळी सर्वांनी सायकलने कट्ट्याला यावे असा फतवा काढण्यामागे त्यांचा नक्की काय हेतू असावा? कट्ट्याला फक्त पुणेकरांनीच उपस्थित राहावे आणि मी व नूलकर काका असे पुण्याबाहेरचे लोक कट्ट्यापासून वंचित राहावेत असा काही कुटील डाव तर नसेल? तरी बरं तुका पैलवानांनी त्यांना डबलसीट न्यावे लागेल असा पेच टाकल्याने हा डाव (असल्यास) उधळला गेला.
  • मी आठ वाजून पाच मिनिटांनी मॅप्रो गार्डनला पोचत असल्याचे कळवणारा मेसेज पाठवूनही सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तिथे पोचलेल्या चौकडीने केवळ सात मिनिटे तिथे वाट पाहात न थांबता 'मनःशक्ती' कडे प्रयाण करून मला किमान २० मिनिटे दगडावर बसून जबरदस्तीने 'पक्षी निरीक्षण' करण्यास भाग पाडले.
  • मॅप्रो गार्डन मधून निघून पुढे 'कार्ले' लेणी पाहायला जायचे असा विचार पुढे आला होता. तिथे आधीही अनेकदा जाणे झाले असल्याने वरपर्यंत गाडी जाते त्यामुळे तंगडतोड करावी लागत नाही हे पक्के ठाऊक असल्याने मी आनंदाने त्याला अनुमोदन दिले परंतु आज रविवार असल्याने तिथे प्रचंड गर्दी असेल असे कारण पुढे करून त्यापेक्षा 'भाजे' लेणी बघायला जाऊयात असा ठराव १ विरुद्ध ५ अशा बहुमताने पुणेकरांनी पास केला (अर्धे मत तटस्थ राहिले होते).
    तिथे किती चालावे/चढावे लागेल ह्या माझ्या प्रश्नाला वल्ली शेठ प्रामाणिक उत्तर देत होते पण बाकीच्यांनी त्यांना बोलू न देता "छे... छे... विशेष काही नाही थोडयाशा पायऱ्या, मग थोडा रस्ता, मग पुन्हा काहीशा पायऱ्या आहेत " असे गोलमटोल उत्तर देत माझी दिशाभूल केली. (त्याची शिक्षा अर्थातच त्या सर्वांना पुढे लगेचच मिळाली)

माझ्या शंकेला पुष्टी देणारे अजूनही अनेक मुद्दे आहेत पण तूर्तास इतकेच सांगून थांबतो आणि 'संदीप उवाचः' कडे वळतो.
वर आलेल्या पैजारवुवांच्या 'पैजारबुवा उवाच:- अर्थात आम्ही टिपलेल्या विषेश गोष्टी' ह्या प्रतिसादात कालच्या दिवसभरात अनेक परिसंवाद घडल्याचा उल्लेख आलेला आहे! तर भाजे लेणी बघून खाली उतरताना वाटेत एकेठिकाणी वल्ली शेठनी सर्वांना लिंबूपाणी पाजले त्या ठिकाणी ह्या कट्ट्याचा वृत्तांत कोणी लिहायचा ह्या विषयावरही एक परिसंवाद झाला! सुरुवातीला त्यात फक्त साडेचार सदस्यच हजर होते. प्रचेतस, प्रशांत आणि मी अशा तिघांनी मोठ्या अपेक्षेने ते कार्य अध्यक्षस्थानी असलेल्या पैजारबुवांनी पार पडावे असे सुचवून पाहिले पण "हा अधिकृत मिपा कट्टा नाही, ह्या कट्ट्याचे जाहीर आवाहन मिपावर प्रकाशित झालेले नाही" वगैरे वगैरे तांत्रिक मुद्दे उपस्थित करून ती जवाबदारी झटकून टाकण्याचा मुत्सद्दीपणा दाखवला. मी कोकण मालिका पूर्ण होईपर्यंत नवीन काही न लिहिण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रचेतस ह्यांनी बदामी-ऐहोळे मालिकेचे कारण पुढे केले तर प्रशांतनी सध्या नूलकर काका अतिशय व्यस्त असल्याचे (आम्हा सर्वांना माहित असलेलेच) कारण सांगून स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवले. आता प्रश्न असा पडेल कि नूलकर काका व्यस्त आहेत म्हणून प्रशांत ह्यांनी वृत्तांत लिहिणे टाळणे ह्याचा काय संबंध आहे? तर मंडळी, प्रशांत ह्यांनी लिहावे, त्या लेखनावर नूलकर काकांनी मुद्रितशोधनाचे संस्कार करावे आणि मग ते लेखन प्रकाशित करावे असा एक अलिखित नियम आहे, हे त्या प्रश्नाचे उत्तर 😂

चढतानासारखेच उतरतानाही असंख्य थांबे घेत मागे राहिलेली जोडगोळी त्याठिकाणी पोचली व कोरम पूर्ण झाल्यावर नव्याने त्या विषयावर चर्चा झाली आणि 'कविराज' आणि 'पैलवान' ह्यांनी संयुक्तपणे वृत्तांतलेखनाचे शिवधनुष्य पेलावे ह्यावर शिक्कामोर्तब झाले आणि आज हा कट्टावृत्तांत आपल्या सर्वांसमोर आला!

चांदणे संदीप हे हाडाचे कवी आहेत ह्याची कल्पना त्यांच्या मिपावावरातून आली होतीच पण त्यांच्या गाडीच्या मागच्या काचेवर लिहिलेल्या स्वरचित 'काव्यपंक्ती' आणि 'संदीप उवाचः' वाचल्यावर त्याची पूर्णपणे खात्रीच पटली! "जे न देखे रवी... ते देखे कवी" हे त्यांच्या बाबतीत पूर्णपणे लागू पडते. काल आमच्या चर्मचक्षूंना न दिसलेल्या अनेक गोष्टी कुठल्याशा वेगळ्याच पातळीवरून त्यांना दिसल्या किंवा त्यांनी अनुभवल्या 😀

त्यांनी लिहिलंय कि,

"वर चढायला सुरूवात केली तसा माझ्यातला ट्रेकर जागा झाला आणि असा तरातरा वर गेलो की बाकीच्यांना यायला तब्बल पाऊणतास लागला. तेवढ्या वेळात मी तिथल्या सुरक्षारक्षकांबरोबर, हल्लीचे पर्यटक आणि आधीचे पर्यटक यावर विस्तृत चर्चा केली. त्यांना कोपऱ्या कोपऱ्यात नीट लक्ष ठेवणे कसे गरजेचे आहे यावर मार्गदर्शनही केले."

वरती पोचण्याचा योग्य क्रम वर पैजारबुवांच्या ' 'पैजारबुवा उवाच:- ' मध्ये वाचता येईल.
"तिथल्या सुरक्षारक्षकांबरोबर, हल्लीचे पर्यटक आणि आधीचे पर्यटक यावर विस्तृत चर्चा केली" हे देखील १००% सत्य आहे, फक्त इतका वेळ झाला तरी दोन जण अजून का पोचले नाही हे बघण्यासाठी तिकीट काउंटर पर्यंत पुन्हा खाली उतरून यावे लागले तेव्हा समजले. "विस्तृत चर्चा केली" असे लिहिण्यातून त्यांच्या विनयशील स्वभावाचे दर्शन घडते पण वास्तवीक ती चर्चा नसून "इतके चढावे लागते तर अजून तुम्ही इथे रोप-वे का सुरु केला नाही" ह्या मुद्द्यावर ते त्या सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घालत होते. पण बाकी काहीही असले तरी त्या हुज्जतीत त्यांनी केलेल्या "पन्नासच्या वर पायऱ्या असतील अशा सर्व डोंगर/टेकडीवरील पर्यटनस्थळी रोप-वे झालेच पाहिजेत" ह्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यासाठी त्यांनी एखादी चळवळ वगैरे सुरु करण्यात पुढाकार घेतल्यास मी त्यात तन-मन आणि धनाने सहभागी होईन ह्याची जाहीर ग्वाही ह्याठिकाणी देतो.

"सर्वजण वर आल्यानंतर वल्लींनी एक सीक्रेट लेणी जी कुलुपबंद होती तिची चावी मिळवली व ती पाहण्यासाठी आम्ही निघालो."

ही गम्मत भारीच होती....
वल्लींनी त्या चाव्यांच्या जुडग्यातील सर्व चाव्या लावून बघितल्यावरही जेव्हा ते 'नाठाळ' कुलूप उघडायचे नाव घेत नव्हते तेव्हा पैजार बुवांनी सूत्रे.. सॉरी तो चाव्यांचा जुडगा आपल्या हातात घेऊन एकदा त्या कुलुपाचे आणि जुडग्यातील चाव्यांचे सराईतपणे निरीक्षण करून त्यातल्या निवडक दोन चाव्या वेगळ्या करत दुसऱ्या प्रयत्नात 'खाट्कन' ते कुलूप उघडले होते तेव्हा प्रशांत हळूच माझ्या कानात कुजबुजले होते कि "घरफोडी हा बुवांचा जोडधंदा असावा काय?"

चाव्या देताना त्या मनुष्याने एका वेळी दोनच जणांनी त्या लेण्यांमध्ये प्रवेश करावा अशी सूचना दिली होती पण जेव्हा आपण दार उघडले तेव्हा एकाच वेळी पंचवीस-तीस लोकांनी घुसखोरी करून ती २० नंबरची लेणी बघण्याचा आनंद लुटला 😀

च्यामारी माझा प्रतिसाद फारच लांबत चाललाय तेव्हा आता आवरते घेतो.
तुम्ही दोघांनी छान वृत्तांत लिहिला आहेत, आणि बुवांनी त्यांच्या प्रतिसादातून चांगलीच टोलेबाजी केली आहे. त्या सर्वातली अतिशयोक्ती, तिरकसपणा चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलाच असेल तरी वाचकांसाठी थोडे स्पष्टीकरण देतो कि, मंडळी अशा प्रकारे 'एक दुसरेकी टांग खिचना' आमच्यासाठी नित्यनेमाची बाब झाली आहे, गेली काही वर्षे आम्ही सर्वजण मिपासाठी एकत्र काम करत असलो, व्हॉटट्सऍप ग्रुपवर जवळपास रोज किंवा दिवसाआड आम्ही संपर्कात असलो तरी ह्या सर्वांशी प्रत्यक्ष भेट होण्याची माझीही हि पहिलीच वेळ होती.
कालचा कट्टा एकदम झकास झाला. प्रचेतस ह्यांच्या सोबत लेणी पाहणे हा खरोखर मस्त अनुभव होता. सिनिअर केजीत असलेल्या लहानग्या 'मंटूने' (मानसी) अजिबात न कंटाळता कट्टा एन्जॉय केला त्याबद्दल आणि तिच्या फोटोग्राफीच्या कौशल्याबद्दल तिचे प्रचंड कौतुक वाटले. निघताना पुढचा कट्टा लवकरच करण्याच्या आणा भाका तर सर्वांनी घेतल्या आहेत पण हा कट्टा प्रत्यक्षात होण्यास दोन वर्षे लागली तसे पुढच्या कट्ट्याच्या बाबतीत होऊ नये हि ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

चांदणे संदीप's picture

23 Jan 2023 - 10:23 pm | चांदणे संदीप

छानच लिहिलंय!

पुढला कट्ट्यासाठी मोशीला संधी द्यावी अशी विनंती करून आता खाली बसतो. :)

सं - दी - प

उत्तम कट्टा झालेला दिसतोय. असेच कट्टे वरचेवर होत राहावेत.

श्वेता व्यास's picture

24 Jan 2023 - 11:10 am | श्वेता व्यास

माननीय सासंना फोटोत भेटून आनंद झाला.
वृत्तांत वाचायला मजा आली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jan 2023 - 2:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

लोक फोटोत गेले की आनंद होतोच
पैजारबुवा,

श्वेता व्यास's picture

24 Jan 2023 - 2:59 pm | श्वेता व्यास

:D
ते माहितीतले लोक हो, आपण सर्व माझ्यासाठी फक्त लेखनातून परिचित आहात. :)

कट्टा लै म्हणजे लैच भारी झाला. सासं नसतानाही या कट्ट्याला यायला मिळालं हे तर भाग्यच. कट्ट्याच्या निमित्ताने प्रथमच तुकाशेठ आणि टर्मिनेटर यांना भेटता आलं. मंटू तर एकदम गोड.

सर्वांचे वृत्तांत,उपवृत्तांत एकदम भारी आणि खुसखुशीत, ऑफिसकामातून थोडा मोकळा झाल्यावर मीही अधिक काही लिहीन.

चांदणे संदीप's picture

25 Jan 2023 - 12:51 pm | चांदणे संदीप

लवकर लिहा. वाट बघतोय.

सं - दी - प

टर्मीनेटर's picture

25 Jan 2023 - 1:07 pm | टर्मीनेटर

+१

अथांग आकाश's picture

26 Jan 2023 - 1:23 pm | अथांग आकाश

मस्त कट्टा! जबरदस्त वृत्तांत!!
1