४) भारतीय विचार - सुधारक (progressive) विचार आणि भारतीय अध्यात्म

Primary tabs

अभिजीत's picture
अभिजीत in काथ्याकूट
16 Jan 2023 - 6:45 pm
गाभा: 

सुधारक (progressive) विचार आणि भारतीय अध्यात्म यात मूळ दोन मुद्दे आहेत. हे मुद्दे मांडण्यासाठी थोडी पार्श्वभूमी गरजेची आहे. युरोपियन रेनेसां (वैचारिक क्रांती) मुळं ‘Age of reasoning’ आणि ‘Enlightenment’ मधून मनुष्य समाजात मूलभूत बदल झाले. त्याचा परिपाक पुढे औद्योगिक क्रांती होण्यात झाला. यातून व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्य, समता, लोकशाही ही मुल्ये विकसीत झाली. या आधुनिकतेनं (Modernity) मानवी जीवनात न-भूतो असे बदल केले. कोट्यवधि लोकांचे दारिद्र्य यातून कमी झाले, सुबत्ता आली आणि ज्या मुक्तीची मानव अपेक्षा करीत होता ती मुक्ती देण्याची क्षमता केवळ आधुनिकतेत (Modernity) आहे हाच विचार दृढ होत आहे आणि त्यात काही चुकीचं नाही. आपण सगळेच या बदलाला साक्षी आहोत आणि हे अनुभवत आहोत. युरोपियन आधुनिकतेच्या विचारात मानवी विवेक बुद्धीची उत्क्रांती कशी होत गेली आणि मॉडर्न जग हेच मनुष्याच्या विवेक बुद्धीचे सर्वात परिष्कृत गंतव्य स्थान आहे अशा ऐतिहासिकरणाची (historicization) प्रक्रिया सुरू झाली. इथेच हेही नमूद करून ठेवतो की वेदांतातला विवेक आणि आधुनिक विचारातला विवेक यात काही मूलभूत फरक आहेत. कांट-हेगेल-मार्क्स प्रभूतींनी शब्द प्रामाण्याचा (revelations) उच्छेद केला. अर्थात तो ख्रिश्चन धर्माच्या आणि बायबल संदर्भात होता. या पार्श्वभूमीवर भारतावर फ्रेंच-इंग्रज वसाहतवादाचं आणि जर्मन विचाराचं प्राबल्य निर्माण झालं. परकीय आक्रमणं भारतावर झाली आणि त्या पाठोपाठ औद्योगिक क्रांतिमुळे उत्पादनाचे-वितरणाचे नवे प्रकार अस्तित्वात आले. नवी अर्थव्यवस्था निर्माण झाली, पारंपरिक भारतीय समाज व्यवस्था हादरून गेली आणि तत्कालीन भारत एका नव्या प्रकारच्या आर्थिक पारतंत्र्यात गेला. धर्म-अर्थ-काम-मोक्ष ही पुरूषार्थ सांगणारा भारतीय विचार पूर्णपणे झाकोळला गेला. पुढे मार्क्स च्या विचाराने भारतात जाती-व्यवस्थेमध्ये जे दोष निर्माण झाले होते त्यांना ‘स्वातंत्र्य आणि समता’ यामुळे नवी परिभाषा व परिप्रेक्ष मिळाले. वर्ग व्यवस्था हा एकच मापदंड वापरून सर्व प्रचलित व्यवस्थांचा विचार सुरू झाला. भारतीय विचारवंतांनी ‘आपण का हरलो’ याचा विचार साहजिकच सुरू केला आणि युरोपियन नवविचारवादाचा भारतीय प्रवाह सुरू झाला. यालाच आपण भारतात आधुनिकतेचं युग सुरू झालं असं म्हणतो. आधुनिकता आणि ऐतिहासिकरण (modernity & historicization) यामुळे आपल्या दृष्टीत एक मूलभूत बदल झाला आहे आणि तो म्हणजे, ‘जो कोणी शब्द प्रामाण्य (revelations) हेही ज्ञानाचे साधन मानतो तो मनुष्य मागासलेल्या विचारांचा आहे.’ याची अर्थापत्ति (corollary) म्हणजे ‘असे शब्दप्रामाण्यवादी सर्व विचार टाकावू आहेत आणि ते सोडून दिले तरच मनुष्याचं अंतिम साध्य शक्य आहे.’ याचाच साधा अर्थ म्हणजे आधुनिक बनणे.
या आधुनिकतेच्या विचारालाच आपण वैज्ञानिक विचार म्हणतो. ‘देवाचे अस्तित्व आहे का? (Does God exist?’), ‘धर्म विरुद्ध शास्त्र (religion vs science)’, ‘आस्तिक-नास्तिक’, ‘पुरोगामी-सनातनी’ हे वाद याचीच काही प्रातिनिधिक उदाहरणे! या वादात सहसा कुणी दर्शन शास्त्रांच्या संदर्भात विचार करीत नाही. बहुतेक सनातनी म्हणवणाऱ्यांचा राग पुरोगामी वर्गांकडून कर्म-कांडाला होणार विरोध याला असतो. पुरोगामी वर्ग हा वर्गव्यवस्था मानणारा असल्याने त्यांना सगळीकडे ‘शोषित-शोषणकर्ते-शोषण’ हेच दिसतात. त्यात आधुनिक विवेक म्हणजे शब्द प्रामाण्य नाकारणे हे प्रमुख असल्याने वैचारिक असणे म्हणजे वेद-शास्त्र-पुराणे थोतांड आहेत अशी एका टोकाची किंवा वेद-शास्त्र-पुराणे सध्याच्या आधुनिक काळात आता अप्रस्तुत (irrelevant) आहेत अशी मवाळ भूमिका घेणे. भारतीय दर्शन शास्त्रांचा उगम आणि विकास झालाय आणि अजूनही होतोय त्याच्या मुळाशी असलेला मूळ प्रश्न हा ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ति आणि शाश्वत सुख प्राप्ती साठी योग्य मार्ग कोणता?’ हा आहे. आधुनिक वैचारिक बैठक असणाऱ्या लोकांनी याचा अभ्यास केला पाहिजे.
भारतीय विचारात जीवनाचा समग्र विचार करताना व्यक्तीचा आणि समाजाचा अग्रक्रम ‘धर्म-अर्थ-काम-मोक्ष’ असा ठरवला आहे. म्हणजे अर्थ आणि काम ही पुरुषार्थ धर्म आणि मोक्ष यांच्या कक्षेत असावे लागतात. आता आधुनिक विचारात हा अग्रक्रम कसं बदलला ते पाहू. अब्राहम मास्लोनं ‘मानवी गरजांची उतरंड (Maslow's hierarchy of needs) बनवली. प्रथम मनुष्याला मूलभूत गरजा (अन्न, पाणी, निवारा आणि बॅंडविड्थ) पूर्ण कराव्या लागतात, मग मानसिक गरजा (प्रेम, यश, प्रसिद्धी वगैरे) आणि शेवटी आत्मभान येण्याची गरज भासते. या मांडणीचा सर्व जगभर पुरस्कार झालेला आहे आणि मानवी आयुष्यावर खोलवर परिणाम झाला आहे. Upward mobility हेच आधुनिक मानवाचे ध्येय बनले आहे. भारतीय विचारातून मासलोच्या hierarchy of needs चा बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की इथं पुरुषार्थाचा अग्रक्रम बदललाय, तो अग्रक्रम आता आहे – ‘अर्थ-काम-धर्म-मोक्ष’. म्हणजे धर्म आणि मोक्ष यांचा विचार अर्थ आणि काम साध्य झाल्यानंतर करायचं आहे. अर्थ आणि काम हे कधीच पूर्ण साध्य होत नाहीत, अपूर्णता तशीच राहते व आधुनिक मनुष्य धर्म आणि मोक्ष यापासून दूरच राहतो. साध्या मराठीत सांगायचं तर – ‘आधी पोटोबा आणि मग विठोबा!’. या बदललेल्या अग्रक्रमामुळे माणूस विरुद्ध निसर्ग ही दुफळी निर्माण झाली आहे. वातावरण बदल आणि शाश्वत विकास याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज त्यातूनच निर्माण झाली आहे.
दोन-तीनशे वर्षांपूर्वीचा समाज आणि सध्याचा समाज यांची तुलना करता साहजिकच हे लक्षात येते की वैज्ञानिक दृष्टीची प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे, लौकिकार्थाने सुबत्ता वाढत आहे आणि अर्थातच काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. समाजाला ‘शहाणं’ करण्यासाठी सुरू झालेल्या सुधारक चळवळींची शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची उद्दिष्टे बरीचशी साध्य झाली आहेत. तथापि ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ हा प्रश्न जसा शेकडो वर्षे त्या-त्या पिढीसमोर होता तसाच तो सध्याही आहे आणि तो प्रश्न पुढच्या काळातही तसाच असणार आहे. आजच्या काळात सुसंगत विचार करून जीवनात अपेक्षित असलेले सुख प्राप्त करता यावे यासाठी हिंदू दर्शनांचा अभ्यास ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन (Scientific temperament) आहे, अशा सर्वांनी करावा व परंपरेने आलेली विवेकबुद्धी आचरणात आणावी.

प्रतिक्रिया

हा भाग लहानसा आणि समजायला सोपा आहे. 'धर्म-अर्थ-काम-मोक्ष' या चार शब्दांची अधिक फोड करून सांगावी. विशेषतः 'धर्म' आणि 'काम' या शब्दांचा नेमका कोणता अर्थ धागाकर्त्यास अभिप्रेत आहे ते विशद करावे.
दुसरे म्हणजे:

भारतीय दर्शन शास्त्रांचा उगम आणि विकास झालाय आणि अजूनही होतोय त्याच्या मुळाशी असलेला मूळ प्रश्न हा ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ति आणि शाश्वत सुख प्राप्ती साठी योग्य मार्ग कोणता?’ हा आहे.

असे ठामपणे सांगणारी, भारतीय दर्शनातील कोणत्या ग्रंथांमधील नेमकी कोणकोणती वाक्ये आहेत, हे विशद करावे म्हणजे हे सगळे नीटपणे समजून घेता येईल/पुढे चर्चा करता येईल. 'सुधारक' आणि 'प्रगतीशील' यापैकी कोणता शब्द इथे अधिक चपखल आहे ?
प्रतिसाद कमी मिळत असूनही चिकाटीने आपल्या विषयाची मांडणी करत असल्याबद्दल अनेक आभार.

'धर्म-अर्थ-काम-मोक्ष' पुरुषार्थ
या भौतिक जगात सुरक्षितता आणि मैथुन या गरजा सर्व प्राण्यांमध्ये असतात. मनुष्यामध्ये अनुकंपा (दुसऱ्याच्या सुख-दु:खाचा विचार करण्याची क्षमता) असते जी प्राण्यांमध्ये तितकीशी विकसीत नसते. या अनुकंपेतूनच मनुष्यात विवेक म्हणजे योग्य-अयोग्य यांचा विचार करण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. स्वत:च्या सुखदु:खाचा शोध घेताना दुसऱ्याच्या सुख-द:खाचा विचार मनुष्य करतो. यातूनच वैयक्तिक जीवन कसे जगावे व समाज कसे जगावे म्हणून काही बंधने घालून घ्यायला मनुष्य प्रेरित झाला. ‘मी कोण आहे’, ‘या जगात माझे काय स्थान आहे’, आणि ‘मला मन:शांती कशी मिळेल’ याचा विचार मनुष्य सतत करत असतो. याचे उत्तर वैयक्तिक समाज, स्थळ-कालानुसार आणि ज्या समाजात मनुष्य आहे यानुसार जरी बदलत असले तरी मूलभूत प्रश्न हे सर्वत्र सारखेच असतात. मनुष्याच्या या सर्व गरजांना भारतीय विचारात ‘पुरुषार्थ’ म्हटले आहे.

अर्थ पुरुषार्थ - सुरक्षितता मिळवणे हा अर्थ पुरुषार्थ होय. मानसिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता मनुष्यात संपत्ती द्वारे निर्माण करता येते. म्हणून अर्थ पुरुषार्थ म्हणजे पैसा, संपत्ती मिळवणे असा अर्थ रूढ झाला आहे.

काम पुरुषार्थ – मैथुन हा केवळ शारीर असावा असं इथं अपेक्षित नाही. ज्या ज्या कृतीमध्ये मनुष्याला आनंद मिळतो त्या प्रत्येक क्रियेला ‘काम’ म्हणतात. सुरक्षितता साधल्यावर प्रत्येक प्राणी स्वानंदासाठी धडपडत असतो. मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये मैथुन एका ठराविक प्रकारेच साधला जातो. मनुष्य बुद्धी स्वेच्छेने (Free Will) चालते त्यामुळे मनुष्याच्या ‘काम प्रेरणा’ अनंत आहेत आणि त्यात सतत बदलही होत असतो.

धर्म पुरुषार्थ – मनुष्य सोडून इतर प्राण्यांना नैतिकतेची गरज नसते. प्राण्यांचे अर्थ आणि काम एका ठराविक चाकोरीत असतात पण मनुष्याचे अर्थ आणि काम पुरुषार्थ प्रत्येक व्यक्ती परत्वे बदलतात. म्हणून मनुष्य समाजाला नैतिकतेची गरज असते. भारतीय विचार धर्माचा अतिशय सखोल विचार करतो. ‘अहिंसा परमो धर्म’ ही धर्माची व्याख्या माझ्या मते अतिशय व्यापक आहे. ‘अहिंसा’ याचा शब्दश: अर्थ कोणतीच हिंसा न करणे (non-violence) अशी करणे हे चुकीचे आहे. युद्धभूमीवर कृष्णाने गीता सांगितली, आणि त्यात कृष्ण म्हणतो – ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌। धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे’. अर्थात जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. महाभारत युद्धात जर ‘अहिंसा’ म्हणून अर्जुनाने शस्त्रं ठेवली असती तर दुर्योधनाचा अधर्म अधिक माजला असता आणि त्यातून अधिक हिंसा निर्माण झाली असती. त्यामुळे अर्जुनाने हिंसा करणे म्हणजे युद्ध करणे हे त्याचे कर्तव्यच होते. त्यासाठीच कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. त्यामुळे ‘अहिंसा परमो धर्म’ याचा अर्थ ‘धर्म म्हणजे कमीतकमी हिंसेचा मार्ग निवडणे’ असा होतो. प्रत्येक मनुष्यापुढे निर्णय कसं घ्यावा हा प्रश्न असतो. विवेकबुद्धीचा वापर करून ज्यातून कमीतकमी हिंसा होईल हा मार्ग निवडणे आणि त्यावर मार्गक्रमण करणे हा मनुष्य धर्म आहे असा भारतीय विचार सांगतो. धर्म पुरुषार्थ म्हणजे ‘अहिंसा परमो धर्म’.

मोक्ष पुरुषार्थ – धर्म, अर्थ आणि काम पुरुषार्थ साधत असताना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेळ येते जिथं या तिन्ही पुरुषार्थ जीवनाला पूर्णता देवू शकत नाहीत ही लक्षात येतं. थोडक्यात कितीही पैसा मिळवला आणि भोग भोगले तरी शाश्वत आनंद निर्माण होणार नाही हे लक्षात येतं. पण फारच थोड्यांना यातून पूर्णत्व प्राप्त व्हावे किंवा सर्व कामनामुक्त व्हावे याची ओढ लागते. हाच मोक्ष पुरुषार्थ होय.

अभिजीत's picture

22 Jan 2023 - 10:01 am | अभिजीत

भारतीय दर्शनातील कोणत्या ग्रंथांमधील नेमकी कोणकोणती वाक्ये आहेत, हे विशद करावे - हा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. खालील शक्य तितक्या सोप्या भाषेत मांडायचा प्रयत्न केला आहे.

आत्यंतिक दु:ख निवृत्ति आणि शाश्वत सुख
चार्वाक
यांचे मूळ ग्रंथ उपलब्ध नाहीत. इतर दर्शनांचे प्रवर्तक ऋषि व आचार्य यांनी त्यांचे ग्रंथ लिहिताना चार्वाक विचारावर टीका करताना चार्वाकांचे विचार उद्धृत केले आहेत त्यावरून चार्वाक दर्शनाचा अभ्यास कला जातो. (मराठीत डॉ. आ. ह. साळुंखे सरांनी चार्वाकावर अतिशय मौलिक संशोधन केलं आहे. त्यांच्या भाषणांचे, व्याख्यानांचे आणि विविध चर्चांचे YouTube चॅनल आहे. जिज्ञासूंनी ते पहावे.) पंचेंद्रियांनी ज्या गोष्टींचे ज्ञान होते तेच खरे ज्ञान असा चार्वाकांचा विचार आहे. चार्वाक कोणतेही अनुमान अथवा शब्द प्रमाण मानत नाहीत. अर्थ आणि काम हेच परुषार्थ चार्वाक मानतात. पण मनुष्य समाजाला नैतिकतेची गरज असते आणि मानवी जीवन अपूर्ण आहे (‘कभी खुशी, कभी गम’) यांची जाणीव समाजातील सामान्य मनुष्यासही असते. त्यामुळे चार्वाक हा विचार म्हणून मान्य असला तरी समाज त्याचा स्वीकार करू शकत नाही. पाश्चात्य विचारात एक hedonism असा विचार आहे. चार्वाकांचे हे आधुनिक रूप! (आस्तिक-नास्तिक चर्चेत बऱ्याचदा चार्वाकांचा समावेश नास्तिक म्हणून केला जातो तो तितकासा योग्य नाही.)

जैन
जैन दर्शनात चोवीस तीर्थंकरांचा इतिहास व महावीरांचा संदेश यातून मानवी जीवनात दु:खनिवृत्ती याअर्थी मुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे. पंच महाव्रत (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह), अनंत चतुष्ट्य (अनंत ज्ञान, अनंत श्रद्धा, अनंत सुख, अनंत वीर्य), अनेकांतवाद, स्याद्वाद यातून मानवी जीवनाचा विचार केला आहे. मानवी जीवनात दु:खनिवृत्ती याअर्थी मुक्तीचा मार्ग म्हणजे मनुष्याला सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चरित्र यांची प्राप्ती होणे.

बौद्ध – भगवान बुद्धाने चार आर्य सत्ये मांडली. ‘मानवी आयुष्यात दु:ख भरलेले आहे’, ‘या दु:खायला कारण आहे’, ‘दु:खाचा निरोध करणे शक्य आहे’, आणि ‘दु:खनिरोध करण्याचा मार्ग आहे.’ दु;ख आहे इथपासून सुरू होवून भगवान बुद्ध अष्टांग मार्ग शिकवतात. मनुष्य जर भगवान बुद्धाच्या शिवकणीनुसार गेला तर मानवी जीवनात दु:खनिवृत्ती याअर्थी मुक्ती शक्य आहे.

न्याय-वैशेषिक
गौतम आणि कणाद या ऋषिंनी न्याय व वैशेषिक दर्शने निर्माण केली. कणाद ऋषि रचित वैशेषिक सूत्रातील काही सूत्रे –
अथातो धर्मं व्याख्यास्यामः ।वैशेषिक-१,१.१। - आता धर्माची व्याख्या पाहू (१.१.१)

यतो ऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः ।वैशेषिक-१,१.१। - ज्यातून अभ्युदय म्हणजे काय आणि तो कसं साध्य करावा ही समजते, त्याला धर्म म्हणतात (१.१.२)

आत्मेन्द्रियमनोर्ऽथसन्निकर्षात् सुख दुःखे । वैशेषिक-५,२.१५ । - सुख आणि दु:खाची जाणीव इंद्रिये, मन आणि आत्मा यांच्या संयोगातून होते.

तदनारम्भ आत्मस्थे मनसि शरीरस्य दुःखाभावः संयोगः । वैशेषिक-५,२.१६ । - जेंव्हा मन आत्म्यात स्थिर होते, तेंव्हा मनाला शरीरातून उत्पन्न होणाऱ्या दु:खाचा अभाव जाणवतो. (दु:खनिवृत्ती होते.) (५.२.१६) (आता मन आत्म्यात कसे स्थिर करावे यावर या ग्रंथात मार्गदर्शन नाही. त्यासाठी योग्य गुरु आणि अधिक सखोल अभ्यासाची गरज आहे.)

अपसर्पणमुपसर्पणमशित पीतसंयोगाः कार्यान्तर संयोगाश्चेत्यदृष्टकारितानि । वैशेषिक-५,२.१७ । - मनुष्य शरीरात प्राण येण्याची व जाण्याची विविध कारणे अदृश्य असतात. (मनुष्याचा जन्म-मृत्यू होण्या मागची सर्वच कारणे दृश्य असत नाहीत.) (५.२.१७)

तदभावे संयोगाभावो ऽप्रादुर्भावश्च मोक्षः । वैशेषिक-५,२.१८ । (असे असले तारे) जेंव्हा मनुष्याला जन्म-मृत्यू पासून सुटका मिळते तोच मोक्ष. (५.२.१८)

न्याय-वैशेषिक हे मृत्यूनंतरचा मोक्ष सांगतात.

सांख्य दर्शन -
ईश्वरकृष्ण रचित ‘सांख्य कारिका’ हा ग्रंथ सांख्य दर्शनाचा पाया मानला जातो.
दुःखत्रयाऽभिघाताज्जिज्ञासा तदभिघातके हेतौ।
दुष्टे साऽपार्था चेन्नैकान्तात्यन्ततोऽभावात ॥ (सांख्य कारिका १)
मनुष्य या जगात त्रिविध तापांनी त्रस्त असतो आणि त्यातून दु:खाची निर्मिती होते. मनुष्याला ही त्रिविध ताप कसे नष्ट करावेत ही जाणण्याची इच्छा निर्माण होते. दृश्य उपायांनी ही जिज्ञासा शमेल? नाही. दृश्य उपायांनी आत्यंतिक दु:ख निवृत्ती निश्चितच होत नाही. (सांख्य कारिका १)
(तीन प्रकारचे ताप – १. आधिभौतिक – स्थावर आणि जंगम गोष्टीं मुळे निर्माण होणारे विघ्न (एकमेकांची होणारी भांडणे वगैरे) २. आधिदैविक – नैसर्गिक शक्तीं मुळे निर्माण होणारे विघ्न (पुर, भूकंप वगैरे), ३. आध्यात्मिक – वैयक्तिक कर्मामुळे निर्माण होणारे दु:ख. नेहमी आपण जी ‘ॐ शांती शांती शांती’ म्हणतो ते ‘तीन प्रकारच्या तापांची शांती असो’ या प्रार्थनेचे छोटे स्वरूप आहे.)
पुढे सांख्य कारिका, प्रकृती-पुरुष, त्रिगुण (सत्व, रज, तम), त्रिशरीरे (स्थूल, सूक्ष्म, कारण) वगैरे संकल्पना मांडते. यातून मानवी जीव, जग आणि आत्मा यांचे एक प्रारूप (model) स्पष्ट होते.

एवं तत्वाभ्यास्यान्नास्मि न मे नाहमित्यपरिशेषम् ।
अविपर्ययाद्विशुद्धं केवलमुत्पद्यते ज्ञानम् ॥ ६४ ॥
अशा प्रकारे (पंचवीस) तत्वांचा अभ्यास करून मनुष्याला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते. हे पूर्ण ज्ञान म्हणजे – ‘न अस्मि, न मे, न अहं’. (६४) यालाच निष्काम कर्म करण्याची मनाची अवस्था असे म्हणता येईल. अशा प्रकारे आयुष्य व्यतीत करणाऱ्या मनुष्याच्या पूर्वायुष्यातील अपूर्णता संपून जाते व दु:ख निवृत्ती होते. हाच जिवंतपणीचा मोक्ष. ‘नेति नेति न ये अनुमना’ हे दत्तगुरूंच्या आरतीतलं पद. त्यातलं ‘नेति नेति’ चा अर्थ हा जवळपास ‘न अस्मि, न मे, न अहं’ सारखाच आहे.

प्राप्ते शरीरभेदे चरितार्थत्वात् प्रधानविनिवृतौ ।
ऐकान्तिकमात्यन्तिकमुभयं कैवल्यमाप्नोति ॥ ६८ ॥
अशा प्रकारे आयुष्य व्यतीत करून मानुष्याचा मृत्यू होतो त्यानंतर कोणतेही कर्म करण्याची गरज नाहीशी होते. यालाच ‘कैवल्य’ मुक्ती मिळते.
योग दर्शन
पतंजलिकृत योग सूत्र हा ग्रंथ योग दर्शनाचा मूलभूत ग्रंथ आहे. यातील ‘योगश्चित्तवृत्तिनिरोधः॥१.२॥‘ ही सूत्र योग दर्शनाचे मर्म सांगते. योग अवस्थेत मनातील सर्व वृत्तींचा (विचार जे सुख आणि दु:ख निर्माण करतात) निरोध होतो.

पुरुषार्थशून्यानां गुणानांप्रतिप्रसवः कैवल्यं स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति ॥४.३४॥
(योगसाधनेच्या बळावर) त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यानंतर मनुष्य स्वत:च्या कैवल्य स्वरूपात मग्न होतो. (४.३४) कैवल्य अवस्था हीच दु:खांपासून मुक्ती होय.

अद्वैत दर्शन -
तैतरिय उपनिषदातील ब्रह्मवल्ली या दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात होते ती खालीलप्रमाणे-
ब्रह्मविदाप्नोति परम् । तदेषाऽभ्युक्ता । सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म । यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन् । सोऽश्नुते सर्वान् कामान् सह । ब्रह्मणा विपश्चिता ॥
जो मनुष्य ब्रह्म जाणतो तो त्याच निरतिशय ब्रह्माला प्राप्त होतो. ब्रह्म ही सत्य, ज्ञान आणि अनंत असे आहे. ज्याच्या बुदधिरूपी गुहेमध्ये ब्रह्म स्थापित झालेले असते असा मनुष्य सर्व कामांना-भोगांना एकाच वेळी भोगतो. अर्थात जीवनमुक्त होवून ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख प्राप्ती’ या अवस्थेत आपले आयुष्य पूर्णत्वाने जगतो.

कॉमी's picture

16 Jan 2023 - 11:11 pm | कॉमी

लेख आवडला.
पण, एक मायनर असहमती आहे.
धर्म - अर्थ - काम - मोक्ष अशी काही साचेबद्ध उद्दिष्ट उतरंड होती आणि आज ती अमुक - तमुक - तमुक - अमुक झाली आहे हे संपूर्ण अमान्य आहे. मला नाही वाटत अशी साचेबद्ध उद्दिष्ट उतरंड कधी अस्तित्वात होती किंवा आहे किंवा यापुढेही असेल.

अभिजीत's picture

22 Jan 2023 - 10:13 am | अभिजीत

धर्म - अर्थ - काम - मोक्ष अशी काही साचेबद्ध उद्दिष्ट उतरंड होती
- माझ्या लिखाणातून धर्म - अर्थ - काम - मोक्ष ही उतरंड होती असा अर्थ निघत असेल तर तो माझा लेखनदोष आहे. धर्म - अर्थ - काम - मोक्ष ही उतरंड नसून अर्थ आणि काम ही धर्म आणि मोक्ष यांच्या कक्षेत असले पाहिजेत असा भारतीय विचार आहे. आधुनिकतेचा आग्रह प्रथम अर्थ मग काम आणि नंतर धर्म व शेवटी मुक्ती असा आहे. उतरंड आधुनिकतेत आहे. भारतीय विचारात नाही.
हजारो/शेकडो वर्षांपासून असलेल्या हिंदू ग्रंथांमध्ये धर्म - अर्थ - काम - मोक्ष असाच आग्रह धरलेला दिसून येतो. या विचारांच्या सातत्यामुळे 'धर्म आणि मोक्ष यांच्या कक्षेत अर्थ आणि काम' असले पाहिजे याला आधार मिळतो. sustainability, climate change, hyper individualism वगैरे मुद्दे पाहता, याला उत्तर भारतीय विचारातून मिळेल असे मला वाटते.

Bhakti's picture

17 Jan 2023 - 8:17 am | Bhakti

सहमत!
साध्या मराठीत सांगायचं तर – ‘आधी पोटोबा आणि मग विठोबा!’. या बदललेल्या अग्रक्रमामुळे माणूस विरुद्ध निसर्ग ही दुफळी निर्माण झाली आहे. वातावरण बदल आणि शाश्वत विकास याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज त्यातूनच निर्माण झाली आहे.

अभिजीत's picture

22 Jan 2023 - 10:28 am | अभिजीत

धन्यवाद

साहना's picture

17 Jan 2023 - 12:43 pm | साहना

Enlightenment हा युरोपिअन प्रदेशांतील कदाचित सर्वांत महत्वाचा काळ होता. ख्रिस्ती धर्मप्रभावाने आपल्यावर जो वाईट परिणाम झाला आहे त्याची जाणीव थोडक्यांत लोकांना झाली आणि त्यातून लोके, जों रॉसू, थॉमस पेन, नंतर आदाम स्मिथ, ह्यूम इत्यादी लोकांनी वैचारिक क्रांती घडवली. अनेक लोकांना वाटते ख्रिस्ती धर्माची कबर खोदणे म्हणजे कदाचित हि मंडळी "progressive" होती. पण प्रत्यक्षांत बहुतेक विचारवंतांनी रोमन आणि ग्रीक समाजांचा अभ्यास केला होता आणि त्यांच्या मते ती जुनी व्यवस्था जास्त चांगली होती. म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य, लोकशाही, धर्म आणि सरकार वेगळे ठेवणे, व्यक्तिगत स्वातंत्र्य, खुली चर्चा इत्यादी.

> धर्म-अर्थ-काम-मोक्ष ही पुरूषार्थ सांगणारा भारतीय विचार पूर्णपणे झाकोळला गेला.

भारतीय तत्वज्ञानांचा ऱ्हास युरोपिअन आक्रमणाने झाला नाही तर साधारण १२व्या शतकांतच त्याचा ऱ्हास सुरु झाला होता. माझ्या मते सततची इस्लामिक आक्रमणे आणि त्यामुळे समाजाची संपूर्ण शक्ती निव्वळ ह्या नराधमांना रोखून ठेवण्यात जात होती. त्यामुळे काव्य शास्त्र विनोद कला इत्यादी सतत नष्ट होत जात होते.
भारताची प्रमुख विद्यापीठे ब्रिटिश लोकांच्या आगमनाच्या आधीच नष्ट झाली होती. महत्वाची मंदिरे सुद्धा त्याच्या आधीच नष्ट केली गेली होती.

आपल्या मताशी काही प्रमाणात सहमत आहे. परकीय आक्रमणं -
- इस्लाम आठव्या/नवव्या शतकापासून पण बाराव्या शतकापासून जास्त प्रमाणात
- युरोपियन वसाहातवादी पंधराव्या शतकापासून
इतकी जोरदार आक्रमणं झाली त्यात भारतीय विचार पूर्णपणे मोडकळीस येण्याची परिस्थितीही खूप वेळी आलेली होती हेही इतिहासात दिसते. पण तरीही सेल्फ-करेक्शन ची प्रक्रिया भारतात सुरूच राहिली आणि त्याचे पर्यवसान १९४७ साली भारत स्वतंत्र होण्यात झाली असे मला वाटते. त्यानंतरची ७५ वर्षे ही प्रक्रिया सुरूच आहे. सेल्फ-करेक्शन करण्याच्या या अंगभूत गुणधर्मामुळे भारतीय विचार सनातन - नित्यनूतन याअर्थी - आहे. सनातनी म्हणजे रुढीपरंपरावादी हा जो अर्थ चिकटला आहे तो बदलण्याची आवश्यकता आहे.