बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
बदामी किल्ला उतरुन संग्रहालय पाहिले, हे संग्रहालय अगदी न चुकवण्याजोगेच आहे. ते पाहून आता अगस्ती तलावाच्या काठाने भूतनाथ मंदिर पाहायला निघालो. आपल्या डाव्या बाजूला बदामी किल्ला आणि उजव्या बाजूस अगस्ती तलाव, आणि त्याच्या पलीकडे बदामीच्या लेण्या असे सुरेख दृश्य येथून बघायला मिळते. संग्रहालयाच्या पुढेच एक भग्न मंदिर आहे आणि त्याच्या पुढून एक वाट डावीकडे वळते. त्या वाटेने सरळ गेल्यास थोडक्या अंतरावर कड्यात एक शिलालेख आहे तो म्हणजे कप्पे अरभट्टाचा लेख.
कप्पे अरभट्ट शिलालेख
बदामी किल्लयावरुन अंजनेय गुहामंदिरावरुन किल्ल्याला वळसा घालूनही हा शिलालेख पाहता येतो किंवा वर सांगितल्याप्रमाणे भूतनाथ मंदिराकडे जाताना डावीकडे वळूनही हा शिलालेख बघता येतो. ही जी डावीकडची वाट दिसते ती बदामीच्या डोंगरातून थेट जाते महाकूट मंदिर समूहाला. येथून महाकूट समूह आहे जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर मात्र ही फक्त पायवाट आहे. भरपूर वेळ असल्यास येथून चालत जाऊन महाकूट मंदिर समूह बघता येतो, अन्यथा गाडीवाटेने दहा/बारा किमी फिरुन महाकूटला जाता येते. महाकूट आपण नंतर बघणार आहोतच त्यामुळे त्याविषयी अधिक आता लिहित नाही. तर ह्या डाव्या वाटेने वळलो, उजवीकडे एक वस्ती आहे आणि डावीकडे बदामीचा कडा, येथून साधारण दिडशे मीटर अंतरावर कड्यात आहे इसवी सन ७०० मधील कप्पे अरभट्ट शिलालेख. कप्पे अरभट्ट हा एक योद्धा आणि कवी. हा शिलालेख आहे एक कन्नड काव्य. दहा ओळीत असलेल्या ह्या कन्नड लेखात ५ कडवी आहेत पैकी तिसरी आणि चौथी ओळ मिळून एक संस्कृत श्लोक आहे तर इतर ही कन्न्डमध्ये आहेत. पहिली ओळ सोडली तर इतर सर्व त्रिपदीत आहेत. हा लेख म्हणजे प्राचीन कन्नड काव्याचा एक नमुनाच. काही जण ह्याला पहिले कन्नड काव्य असेही मानतात. शिलालेखाच्या शेवटी एक चक्र आणि त्याच्या मध्ये आणि खालच्या बाजूस नक्षीकामही केलेले आढळते.
कप्पे अरभट्ट शिलालेख (जिथे कुंपण संपतं तिथेच वरील बाजूस आहे)
कप्पे अरभट्ट लेख पाहून परत मागे येऊन अगस्ती तलावाच्या काठाने भूतनाथ मंदिराकडे निघालो. वाटेतच एक सुंदर मंदिरसमूह आहे तो म्हणजे मल्लिकार्जुन समूह.
मल्लिकार्जुन मंदिर
बदामी, ऐहोळे, पट्टदकल मधील मंदिरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणपणे येथील मंदिरे सहसा समूह रूपात दृष्टीस पडतात, म्हणजे एक मुख्य मंदिर आणि त्याच्या आजूबाजूने लहान लहान अशी काही मंदिरे, रूढार्थाने ह्याला पंचायतन असेही म्हणता येत नाही कारण मंदिरांची संख्या कमीअधिक आढळते तसेच ही बरेचदा ही उपमंदिरे इतर देवतांसाठी नसून त्यात शिवपिंडीच आढळतात. मल्लिकार्जुन मंदिरही हे असेच. तारकाकृती तळखड्यावर इसवीसनाच्या ११ व्या शतकात हे मंदिर बांधले ते उत्तर चालुक्यांनी (कल्याणीचे चालुक्य). एकावर एक थर असलेली मंदिरबांधणीची फांसना शैली हे उत्तर चालुक्यांचे वैशिष्ट्य. हे मंदिर याच शैलीत आहे.
उतरत्या छपरांचा मुखमंडप, त्यापुढे आयताकार बंदिस्त सभामंडप आणि त्यापुढे गर्भगृह आणि त्यावर फांसना पद्धतीचे शिखर अशी याची रचना. ह्या मंदिरात मूर्तीकाम नाही मात्र फांसना पद्धती समजण्यासाठी हे मंदिर आवर्जुन बघावे असेच.
मल्लिकार्जुन मंदिर मुखमंडप
मुखमंडप, सभामंडप आणि फांसना शिखर रचना
स्तंभयुक्त सभामंडप आणि गर्भगृहातील शिवलिंग
उपमंदिरे
मल्लिकार्जुन मंदिर पाहून झाल्यावर आम्ही निघालो ते येथील एका सुंदर मंदिराकडे अर्थात भूतनाथ मंदिराकडे
भूतनाथ मंदिर
हे बदामीतील सर्वांगसुंदर मंदिर. अगस्ती तलावाच्या ऐन काठावर वसलेले हे मंदिर पुढ्यातील विशाल तलावामुळे अधिकच खुलून दिसते. मंदिराच्या मागेच असलेला बदामीचा लालगुलाबी पहाड अगदी उठून दिसतो. भूतनाथ मंदिर देखील येथील इतर मंदिरांप्रमाणेच एकूटवाणे नसून एका समूहाच्या स्वरुपात आहे. मुख्य मंदिराची रचना काहीशी संमिश्र आहे. अंतराळ आणि गर्भगृहाचे शिखर हे द्राविड शैलीत असून ते बदामीच्या चालुक्यांनी बांधलेले आहे, तर उतरत्या छपरांचा सभामंडप हा कल्याणी चालुक्यांनी वाढवला. सभामंडप हा विविध स्तंभांवर तोललेला असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर शैव द्वारपालांची अपूर्ण राहिलेली शिल्पे आहेत तर त्यांच्या खालील बाजूस मकरवाहिनी गंगा आणि कूर्मवाहिनी यमुना अशी सरिताशिल्पे आहेत. तलावाच्या अगदी काठावर असूनही पुढ्यातील अगस्ती तलाव संपूर्ण भरला तरीही भूतनाथ मंदिरात पाणी शिरत नाही याचे कारण म्हणजे तलावाचा लेणीकडील बाजूस अतिरिक्त पाणी वाहून नेण्यासाठी एक वाट निर्माण केली आहे. मुख्य मंदिराची भोवती काही उपमंदिरे असून एकात लकुलिश शिवाची एक मूर्ती आहे.
भूतनाथ मंदिर
भूतनाथ मंदिर
गर्भगृहाच्या बाहेर नंदी असून आतमध्ये शिवलिंग आहे.
द्राविड पद्धतीचे शिखर असलेले भूतनाथ मंदिर व त्याच्या बाजूस असलेली उपमंदिरे
भूतनाथ मंदिर समूहाच्या मागेच असलेल्या एका विशाल प्रस्तरावर आहे विष्णूगुडी अर्थात विष्णूचे मंदिर.
विष्णूगुडी
मागच्याच प्रचंड खडकावर फांसना शैलीतले एक लहानसे मंदिर आहे, हौशी लोक त्या खडकावर जाऊन तलावात उड्या मारत असल्याने तेथे जायची वाट पुरातत्त्व खात्याने बंद केली आहे तरी हे लहानसे मंदिर विलक्षण सुंदर दिसते.
खडकावरील लहानसे मंदिर
ह्या प्रस्तराजवळ गेलो असता खडकातच उंचावर विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. जणू मूर्ती कशी खोदावी ह्याचा सराव करण्यासाठीच ह्या कोरण्यात आल्या असाव्यात. ह्या मूर्तींमधे आहेत वराह, गणेश, ब्रह्मा, विष्णू, महेश, महिषासुरमर्दिनी आणि हिरण्यकश्यपूचे विदारण करणारा उग्र नृसिंह.
उग्रनृसिंहाच्या बाजूलाच द्राविड पद्धतीचे एक मंदिर कोरलेले दिसते.
ब्रह्मा, विष्णू, महेश
डाव्या बाजूस प्रस्तरावर जाणारी वाट आहे जी सध्या बंद केलेली आहे.
हे बघून परत मागे न फिरता प्रस्तराला उजव्या बाजूने वळसा घालून थोडक्या पायर्या उतरल्यावर दिसते एक अनंतशयनी विष्णूचे मंदिर अर्थात विष्णूगुडी. अर्धे बांधीव आणि अर्धे खडकात कोरलेले शिखरविहिन असे हे मंदिर अगदी न चुकवण्याजोगेच. ह्या मंदिरात अनेक आश्रर्ये दडून बसलेली आहेत.
अनंतशयनी विष्णू मंदिर
मंदिरात समोरच अनंतशयनी अर्थात शेषावर शयन करणारी मूर्ती आहे मात्र ती बघण्याआधी आपण ह्या मूर्तीच्या डाव्या बाजूस असलेली त्रिमूर्ती मूर्ती बघू. ही त्रिमूर्ती विराजमान झाली आहे ती द्राविड पद्धतीने कोरलेल्या मंदिरात. विष्णू, शिव आणि ब्रह्मा अशा ह्या मूर्तींचा क्रम. विष्णूच्या खाली गरुड पूर्णपणे कोरला आहे तर शिवाच्या आणि ब्रह्माच्या मूर्तीखाली अनुक्रमे नंदी आणि हंसाची फक्त बाह्यरेषा कोरलेली आहे. हे काम अर्धवटच राहिलेले दिसते.
त्रिमूर्ती
ह्या मूर्तीच्या समोर आणि अनंतशयनी विष्णूच्या उजव्या बाजूस आहेत नमन करणारे साधक आणि त्यांच्या बाजूस एक गाय आणि तिचे दुग्धप्राशन करणारे वासरु.
आता मुख्य अनंतशयनी विष्णूची मूर्ती पाहूयात.
प्रथमदर्शनी येथील मूर्ती ओबडथोबड दिसेल आणि संगमरवरात कोरल्यासारखी वाटेल पण ती तशी नसून आतल्या खडकात ती कोरलेली असल्याने खडकांमधील रेषा मूर्तीवरही आलेल्या दिसतात.
शेषावर पहुडलेला विष्णू अतिशय देखणा असून विष्णूच्या उशापाशी एक सेवक आहे तर लक्ष्मी त्याचे पाय चुरत आहे. लक्ष्मीच्या शेजारी गरुड नमस्कारमुद्रेत उभा आहे. विष्णूच्या नाभीतून कमळ उमललेले आहे. कमळाचा देठ हा विष्णूच्या हातामागून मोठ्या खुबीने कोरलेला आहे. विष्णू हा आराम करत असल्याने शंख, चक्र, गदा ही त्याच्या बाजूस ठेवलेली असून त्याने फक्त पद्म धारण केले आहे. विष्णूच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत.
अनंतशयनी विष्णू
मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, त्याच्या बाजूला नाभीकमलाच्या वरील बाजूस असलेला ब्रह्मा त्याच्या शेजारी परशुराम, वामन, राम, कृष्ण, बुद्ध आणि सर्वात शेवटी घोड्यावर आरुढ कल्की देखील आहे.
दशावतार
बदामीस आलात तर हे मंदिर अजिबात चुकवू नये असेच.
इथे यावे आणि तलावाच्या पाण्यात पाय सोडून तासनतास बसावे.
साधारण दिड दोन वाजत आले होते आणि प्रचंड भूकही लागली होती म्हणून आम्ही येथून बदामी गावात जेवायलो गेलो आणि आता पुढचे पडाव होता तो सिदलाफडीत, तिथली प्रागैतिहासिक गुहाचित्रे पाहण्यासाठी.
सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
खरं तर सिदलाफडीच्या प्रागैतिहासिक गुहेबद्द्ल, तिथल्या चित्रांबद्द्ल माहिती असूनही तिथे जाणे आमच्या मूळच्या योजनेत नव्हतं. एकतर वेळेच्या नियोजनात ते नीट बसत नव्हतं. शिवाय त्यासाठी भरपूर तंगडतोड आवश्यक होती. आणि कालच्या ऐहोळे-पट्टदकलला (ह्याबद्द्ल पुढे लिहिणार आहेच) सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत चालणं झालं होतं त्यामुळे आजच्या दिवशी बदामी किल्ला, भूतनाथ मंदिर समूह आणि दुपारनंतर महाकूट आणि बनशंकरी पाहायचे असे ठरवले होते. मात्र ऐहोळे आणि बदामीच्या दोन्ही संग्रहालयात सिडलाफडीची छायाचित्रे पाहून तिथे जायची उर्मी जागृत झाली आणि आत्ता नाही तर कधीच नाही म्हणून जेवल्यानंतर लगेचच महाकूट आणि सिदलाफडीला जाण्याचे ठरवले. आधी सिदलाफडी की आधी महाकूट असे ठरवताना महाकूटला संध्याकाळ झाली तरी चालण्यासारखे होते मात्र सिदलाफडीचा रस्ता अगदी निर्जन असल्याने ते आधी करण्याचे ठरवले आणि सिदलाफडीला निघालो. बदामीपासून बदामी रेल्वे स्टेशन्/ऐहोळे जाण्याच्या वळणाआधीच हॉटेल पॅराडाइझच्या बाजूलाच सिदलाफडीला जाणारा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूला एक उद्यान आणि एक कमान आहे. ह्या कमानीतूनच पुढे सिदलाफडीला पोहोचता येते. मात्र हा रस्ता पूर्ण चढणीचा आणि कच्चा आहे. येथून फक्त ट्रॅक्टरसारखीच वाहने जाऊ शकतात. कार अजिबात जाऊ शकत नाही. कमानीजवळच असलेल्या उद्यानापाशी गाडी लावली आणि पुढे निघालो.
सिदलाफडीला जाणारा हा रस्ता जवळपास चार किलोमीटर अंतराचा आहे. जवळपास निम्मा टप्पा चढणीचा आहे आणि उरलेला निम्मा सपाटीचा आहे. खुरट्या झुडपांतून जाणार्या ह्या रस्त्यावर कुठेही सावली नाही, त्यामुळे उन्हाळ्यात भरदुपारी येथे येताना भरपूर पाणी आणि इथल्या तीव्र उन्हातून चालण्याची मानसिक तयारी आवश्यक. इथून जाताना सुरुवातीचा चढ चढून गेल्यावर एक रेडियो/टीव्ही टॉवर लांबवर आपल्या डाव्या हातास दिसतो. रस्ता चांगलाच रूंद आणि मळलेला आहे. आपण सरळ ह्या टॉवरच्या दिशेने चालू पडायचे. सुरुवातीच्या चढाईने छातीचे झालेले भाते आता एका लयीत आलेले असतात आणि आपण वेगाने टॉवरपाशी आलेलो असतो. आपण बदामीच्या डोंगराच्या माथ्यावर आलेलो असतो आणि आता आपली पुढची चाल समपातळीवरुन होणारी असते.
सिदलाफडीला जाणारा रस्ता
इथपर्यंत तीव्र चढण आहे. एकच लक्षात ठेवायचे की आपल्याला ह्या टॉवरपाशी जायचे आहे, आणि ठळक रस्ता आपल्याला तिथेच घेऊन जातो.
चुकण्याचा संभव ह्या टॉवरपाशीच आहे. सरळ जाणारा रूंद रस्ता पुढे खालच्या बाजूस असलेल्या एका लहानशा वस्तीपाशी जातो. आणि डाव्या बाजूस वळलेली एक वाट शंभरएक मीटरवर खडकाळ मार्गामुळे हरवून गेलेली दिसते. मात्र टॉवरपाशीच आपण पोहोचायचे हे अवश्य लक्षात असू द्यावे.
टॉवरपाशी परत आपल्याला एक रूंद वाट लागते जी पोहोचवते सिदला फडीला. वाटेत निसर्गाची अनेक भूरुपे दिसू लागतात. माथ्यावरच्या वार्यांमुळे, पावसामुळे येथील वालुकाश्मांचे विदारण होऊन अनेक लहान लहान टेकड्यांसदृश खडक येथे दिसू लागतात.
टॉवरच्या पुढची पायवाट
विविध प्रकारची भूरुपे
टॉवर आता मागे पडला होता
सिदला फडीला जाणारा हा रस्ता पूर्णपणे निर्जन आहे. मात्र येथे जनावरांची तशी भिती नाही, मात्र वाटेत आम्हाला केसांचा समावेश असलेल्या वन्यप्राण्यांच्या काही विष्ठा दिसल्या त्यावरुन येथे बिबट्या, तरस, अगदीच कुणी नसले तरी खोकड, कोल्हे असावेत असे वाटते. अजूनही मात्र गुहेचे दर्शन होत नसल्याने पुढे जाताना आपण चुकल्याचे जाणवत राहते पण प्रत्यक्षात तसे नाही. खाली रस्त्यानजीक गाडी लावल्यापासून सुमारे चार किमीची दमदार वाटचाल करुन आपण सिदलाफडी नजीक पोहोचलेलो असतो. अचानक एका वळणापुढून समोर एक कातळ दृगोच्चर होतो, तिच ही सिदलाफडी.
सिदलाफडीचे प्रथम दर्शन
थोडे पुढे जाताच सिदलाफडीची नैसर्गिक कमान दृष्टीपथास येते.
येथून कमानीत जाताना किंचीत खालच्या पातळीवर उतरावे लागते आणि आता सिदलाफडी तिच्या पूर्ण रुपासह आपल्याला सामोरी आलेली असते.
सिदलाफडीचा शब्दशः अर्थ म्हणजे विजेचा खडक. अर्थात येथील कमानीवर वीज पडून येथील छिद्रे तयार झाली आहेत अशी समजूत. दुरुन लहान दिसणारी ही नैसर्गिक कमान प्रत्यक्षात मात्र बरीच रूंद आहे आणि जवळपास तीन पुरुष उंचीची आहे. कमानीत वरच्या बाजूस छिद्रे असल्याने आतमध्ये पुरेसा प्रकाश आहे. आदिमानवांना ही निवार्यासाठी ही आदर्श जागा वाटल्यास त्यात काहीच नवल नाही. खालच्या पातळीवर असल्याने ऊन वार्यांपासून नैसर्गिक संरक्षण मिळते. आपल्या फावल्या वेळात आदिमनावांनी करमणूक म्हणून येथे सफेद रंगात चित्रे रंगवलेली आहेत. आजमितीस ह्या चित्रांचे स्वरुप बरेचसे अस्पष्ट आहे. येथील वालुकाश्म हा ठिसूळ असल्याने आतील भिंतीची झिरपणार्या पाण्याने बरीच हानी झालेली आहे त्यामुळे ह्या चित्रांबद्द्ल तर्कच लढवावे लागतात. संशोधकांनी ह्या चित्रांचा कालावधी कमीतकमी ३००० वर्षे जुना असा मानला आहे. गुहेच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर काही स्पष्ट तर काही अस्पष्ट अशी चित्रे नजरेस पडतात.
सिदलाफडीचा नैसर्गिक निवारा आतील बाजूने
गुहेच्या वरच्या भागातील छिद्रे जी वीजेमुळे पडली आहेत असे मानले जाते.
आता काही चित्रे पाहूयात.
हे एका लहान मुलीचे चित्र दिसते
इथले सर्वात सुस्पष्ट आणि चटकन ओळखू येणारे असे चित्र म्हणजे बैलाचे
हे पक्ष्याचे चित्र दिसतेय. त्याची चोच, मस्तक, शरीर, पाय नीट दिसतात. बाजूला त्याची पिल्ले किंवा इतर काहीतरी पायांसारखी चित्रे आहेत
हा बहुधा विंचू किंवा चार पायांवर चालणारा कुणीतरी प्राणी
हे चित्र नीटसे ओळखू येत नाही, कुणीतरी प्राणी असावा. ही चित्रे खूपच अस्पष्ट असल्याने आपल्याला येथे ती ओळखण्यासाठी आपल्या कल्पनांना पूर्ण वाव आहे.
हे बहुधा शिकार्याचे चित्र असावे
येथे अजूनही काही चित्रे दिसत राहतात, त्यात हल्लीच्या नवकलाकारांची कलाकारीही दिसते. प्राचीन वास्तूंची हानी होण्याचा शाप ह्या स्थळालाही मिळाला आहेच.
खरे तर येथील चित्रे सरकारने संरक्षित करणे आवश्यक आहे अन्यथा मनुष्यांच्या वावराने येथील चित्रांचा लवकरच नाश होईल. सिदलाफडीबाबत मात्र एक सांगणे अगत्याचे वाटते ते असे की येथे भीमबेटकासारखी अद्भुतरम्य चित्रे, अत्यंत सुस्पष्ट चित्रे असतील, संख्येने भरपूर चित्रे असतील अशी कल्पना करुन अजिबात येऊ नये. येथील चित्रे अगदी साधी, चुन्याने रंगवलेली अशी पांढर्या रंगाचीच आहे. मात्र येथे येणारी सुरेख वाट, सुरेख कमान आणि आपण हंटर - गॅदरर्सच्या जगातील प्रागैतिहास असं काही अद्भूतरम्य पाहतो आहोत जे आपण पूर्वी कधीही पाहिलेले, अनुभवलेले नाही असे वाटणार्यांनी येथे हमखास आणि अवश्य यावे. बदामीस येऊन हे ठिकाण न चुकवण्याजोगेच.
आता जवळपास चार वाजत आलेले होते. पुढचे महाकूट करायचे असल्याने आम्ही येथून निघालो. टॉवर पार करुन आता पुढे उतार असल्याने झपझप चालत गाडीपाशी आलो आणि तेथून महाकूटला निघालो. मात्र महाकूटवर लिहिण्याआधी आदल्या दिवशी केलेल्या ऐहोळे आणि पट्टदकलचा वृत्तांत अजून लिहायचा असल्याने आधी ऐहोळे आणि पट्टदकलविषयी लिहून नंतरच महाकूटवर लिहिन.
आता पुढच्या भागात ऐहोळे.
क्रमशः
प्रतिक्रिया
11 Jan 2023 - 6:01 am | कंजूस
इथे दोन वेळा येऊनही लेखातली ठिकाणं आणि शिल्प वर्णनातून लक्षात आले की बरेच बघायचे राहून गेले आहे. शिल्पट समजण्यासाठी पौराणीक कथा माहीत असायला हव्यात. एकाच ठिकाणी वेगवेगळे देव आणि वाहनं आहेत.
तो शिलालेख मुख्य गुहांपासून दूर का लिहिला यांचे कारण त्यांच्या कालखंडात आणि करवणाऱ्या व्यक्तींचे राजकारणातले स्थान वेगळे असणार. राजा,मंत्री,सेनापती,नगरातील महाजन ,श्रेष्ठी वगैरे.
अनंतशयनाच्या बाजूलाच अगस्ती गुहा आहे ती पाहायला विसरलात. पण इकडे पाट्या लावलेल्या नाहीत आणि सांगायला,विचारायला कुणी दिसत नाही. तिथे राखलेल्या बागेसारख्या आवारातून तर्क केला की इथे काही असावे. आणि पुढे गेल्यावर एक दोनफुटी उंच फाटक खडकाखाली दिसले. त्यास कुलुप नव्हते. मग ते उघडून वाकून घसरत आत गेल्यावर गुहा सापडली. पंधरा फुटी उंच आहे आणि शिल्पं आहेत. इथे जर का पर्यटक आणि शालेय सहली आल्या तर झुंबड उडेल. म्हणून मुख्य बदामी गुहा दाखवणारे गाईड इकडे "काही नाही" सांगतात. हा भाग वर्ज्य आहे. आपण जाऊ शकतो.
सिदलाफडी खरंच आवडलं. जायला हवं.
मालिका रंगत चालली आहे.
हल्ली बदामी,हंपीच्या सहली आयोजित करणारे आहेत. पण खरा आस्वाद घ्यायचा असेल तर एक दोघांनीच स्वतंत्रपणे जावे.
11 Jan 2023 - 7:39 pm | टर्मीनेटर
कंकाका अगस्ती गुहेची पुरक माहीती आवडली!
12 Jan 2023 - 8:49 am | प्रचेतस
धन्यवाद काका,
तुम्ही खरं तर जायच्या आधी अगस्ती गुहेबद्द्ल सांगितलं होतंच पण ते बघायचं राहून गेलं ते राहून गेलंच.
बदामीत असंख्य शिलालेख आहेत जिकडे पाहावे तिकडे कन्नड लिपीतले लेख दिसतातच. अगदी किल्ल्याच्या वाटेवरील कातळ भिंतीत देखील बरेच लेख दिसतात. पुलकेशीचा एक शिलालेख तर कड्यात सुमारे १३५ फूट उंचीवर आहे. तो पाहायचा म्हणलं तर रोप क्लाईंब करुन किंवा रॅपलिंगनेच पाहाता येतो.
11 Jan 2023 - 6:21 am | गवि
हाही भाग अत्यंत रोचक आणि त्या ठिकाणाबद्दल अधिकाधिक उत्सुकता वाढवणारा.
पाहिले म्हणजे तो शिलालेख. इतक्या जुन्या काळी कोणीतरी लिहून ठेवलेलं वाचणे हे थरारक असणार. तेही अशा दूर जागी पत्थरात खोदून ठेवलेले. कवितेचा डिटेल अर्थ वाचणे अधिक रोचक ठरेल.
सर्वात जुने माहीत असलेले लिखित काव्य म्हणावे. काव्य ही प्रवृत्ती भाषेच्या प्रथम दिनापासून असणार.
बाकी इतर ठिकाणे देखील भारीच आहेत. काही मानवनिर्मित तर काही नैसर्गिक आश्चर्ये.
जिथे कोरीवकाम केलेय त्या दगडाची क्वालिटी झूम करून पाहता आपल्या वेरूळ सारखी सच्छिद्र आणि ओबडधोबड दिसते आहे. काम मात्र निगुतीने केलेय.
ती चित्रे (पक्षी वगळता) डोळे फाडफाडूनही ओळखता आली नाहीत. पण पुन्हा एकदा काहीतरी आदिम गूढ पाहात असल्याचे जाणवले. तिथे सुस्पष्ट चित्रे नाहीत हेच अधिक नैसर्गिक आणि वास्तव वाटते.
लेखमालेबद्दल पुन्हा एकदा कौतुक आणि धन्यवाद .
12 Jan 2023 - 8:52 am | प्रचेतस
हे मुद्दामून लिहिले नाही कारण शिलालेखापेक्षाही ते त्रिपदीत असणारे काव्य आहे हेच सांगण्याचा उद्देश होता. शिवाय विकीपेडीया वगळतात त्याचा इंग्रजी तर्जुमा इतरत्र कुठे मिळाला नाही, त्यामुळे केवळ विकिपीडीयावरुन त्याचा अर्थ येथे देणे प्रशस्त वाटले नाह.
हे तर अगदी खरेच. असेच म्हणायचे होते.
11 Jan 2023 - 8:14 am | पॉइंट ब्लँक
खूपच माहितीपूर्ण लेख. फोटोही मस्तच.
11 Jan 2023 - 10:17 am | आंद्रे वडापाव
शिलालेखात अश्या "अर्थाचे" कोरलेले आहे का ?
कप्पे अरभट्ट हा, पब्लिकच्यासाठी मायबापाहून कृपाळु, दयाळु आहे,
परंतु शत्रुच्यासाठी अतिक्रूर आहे ... (हूँ यारों का मैं यार, दुश्मनों का दुश्मन)... (जो नडला त्याला फोडला .. )
ह्या कलियुगात एक माधव (विष्णु) चा अपवाद वगळता, कप्पे अरभट्ट जैसा कोई हार्डइच नै है ...
12 Jan 2023 - 8:52 am | प्रचेतस
होय. अशाच अर्थाचा श्लोक आहे.
11 Jan 2023 - 11:11 am | चित्रगुप्त
माहिती आणि फोटो खूपच छान.
काही ठिकाणी, विशेषतः मोठे खडक आणि शिल्पे यांच्या फोटोतून त्यांच्या आकाराची कल्पना येत नाही. फोटो काढताना कोपर्यात कुठेतरी एक फुटाची लाकडी स्केल पट्टी ठेऊन जर फोटो काढले तर त्यांचा आकार समजण्यास मदत होईल. काहीसा रसभंग होईल खरा, पण एक - दोन फोटोत असे केले तरी भव्यतेची कल्पना येईल.
12 Jan 2023 - 8:56 am | प्रचेतस
फोटो नेहमी द्विमितीय असल्याने त्यांमधून मूळच्याआकारमानाची कल्पना येत नाही हे खरेच.
पण सिदलाफडीच्या भव्यतेची कल्पना येण्यासाठी एक छायाचित्र इथे देतो.
12 Jan 2023 - 11:13 am | चित्रगुप्त
बापरे. खूपच भव्य आहे शैलाश्रय. या फोटोतल्या मनुष्याकृतीमुळे भव्यतेची कल्पना येते आहे. हेच मला म्हणायचे होते. द्विमितीपेक्षाही तुलना करायला फोटोत काहीतरी असले, तरच आकारमानाची कल्पना येते.
मी जेंव्हा संग्रहालयांमधे खूप मोठ्या आकाराची- म्हणजे चाळीस-पन्नास फूट लांबी आणि पंधरा-वीस फूट उंचीची - चित्रे बघतो, तेंव्हा त्यासमोर उभा राहून कुणाला तरी फोटो काढायला सांगतो. तरिही चित्र आणि मी, यांच्यामधल्या तीन फूट अंतरामुळेसुद्धा चित्र आहे त्यापेक्षा जरा लहान वाटते.
अनेक वर्षांपूर्वी हंपीत मी पाच दिवस राहिलो होतो. मुक्काम खुद्द हंपीतल्या पुरातत्व विभागाच्या उत्खननाच्या जागेजवळील मोठ्या झोपडीत होता. तिथला खानसामा भाजी-पोळी बनवून द्यायचा ते बरोबर घेऊन दिवसभर फिरायचो. रात्री तो गावातल्या घरी जायचा त्यामुळे मी त्या संपूर्ण जागेत एकटाच असायचो. त्याकाळी भिती वाटली नाही, याचे आता आश्चर्य वाटते. (आता भिती वाटण्याचीच भिती वाटते)
तर तेंव्हा ३६ फोटोवाले दहा-पंधरा रोल खर्चून काढलेल्या ३बाय४ इंचांच्या त्या फोटोंमधे तिथली भव्यता अजिबात कळत नाही. मोठमोठे खडक पाच फूट उंचीचे आहेत की पन्नास, हे कळतच नाही. (पुढे त्यावरून आपण चित्रे रंगवू म्हणून काढलेल्या शेकडो फोटोंपैकी अद्याप एकावरूनही चित्र केलेले नाही, त्यापेक्षा भरपूर कौटुंबिक फोटो काढले असते तर आता तीस-चाळीस वर्षांनंतर किती बरे वाटले असते, असा विचार येतो. दगड-धोड्यांचे हजारो फोटो आणि मुलांचे लहानपणीचे पाच - दहा असला खुळेपणा झाला. असो. अवांतर खूपच झाले.
11 Jan 2023 - 11:35 am | श्वेता२४
हा भागही नेहमीप्रमाणेच अतीशय नव्या व विस्तृत माहितीसह छान झाला आहे. मंदीरबांधणीची फांसना शैली विस्तृतपणे तुमच्यामुळे कळली. सिदलाफडी ला नक्की जाणार. तेथे कसे जायचे याचे मार्गदर्शन केले हे बरे झाले. रस्ता चुकण्याची शक्यता अधीक दिसते. भूतनाथ मंदीराची छायाचित्रे ड्रोनने काढली का? कारण जिथून फोटो काढले आङेत, तीथे पाण्याचा भाग असेल असे वाटत आहे. सर्वच छायाचित्रे सुरेख. शिल्पकला समजवून सांगण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे. पुढील भाग प्रतिक्षेत.
12 Jan 2023 - 9:31 am | प्रचेतस
नाही, रस्ता चुकण्याची शक्यता इथे जवळपास शून्य आहे. टॉवरच्या इथेच वळायचे हे लक्षात ठेवायचे तुम्ही थेट सिदलाफडीपाशीच पोहोचता मग.
नाही, सर्व छायाचित्रे मोबाईल केमेर्याने काढलेली आहेत. मात्र कमी अधिक उंचीवरुन काढलेली असल्याने तसा भास होतोय.
11 Jan 2023 - 12:20 pm | कर्नलतपस्वी
तुमचे लेख म्हणजे डोक्याला खुराक.
बरोबर आलो असतो तर.....
एक फांसना या शब्दाने किती माहीती दिली ते व्यनि करतो.
भोपाळपासुन पंचेचाळीस किमीवर भिमबेटका नावाचे स्थान आहे तीथे सुद्धा अशाच गुफा आहेत. त्या एका मराठी नादखुळ्याने शोधून काढल्यात. १९९९ मधे भोपाळला असताना बघितल्या पण आपल्या सारखा गुरू बरोबर नसल्याने फार काही विशेष वाटले नाही. खालील माहीती अंतरजालावरून.
श्रीधर विष्णू वाकणकर ह्या मराठी पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या गुहांचा शोध लावला. इ.स. १९५७ मध्ये वाकणकर आगगाडीने दिल्लीहून भोपाळला जात असताना त्यांना डोंगरात काही खोदलेले दिसले. स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत आणि आत जनावरे असतात असे कळले. जवळच्याच स्थानकावर रेल्वेगाडीचा वेग कमी झाला असता वाकणकरांनी बाहेर उडी मारली आणि त्या गुहांच्या शोधार्थ ते निघाले. एकटेच काटयाकुटयांमधून वर डोंगरावर चालत गेल्यावर त्यांना या गुहांचा शोध लागला.
त्यानंतर ते सतत तिथे जात राहिले आणि त्यांनी या चित्रांचा सखोल अभ्यास केला. सोबत बटाटे घेऊन जायचे आणि तिथे वाळूत ते पुरायचे. दुपारी ते बटाटे उकडलेले असत, तेच जेवण म्हणून जेवायचे असे व्रतस्थ राहून त्यांनी गुहांचा अभ्यास केला. भीमबेटकामध्ये विविध प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीची दृश्ये अशी आदिमानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली दिसतात. कित्येक हजार वर्षांपूर्वी चितारलेली ही नैसर्गिक रंगातली चित्रे बघण्यासारखी आहेत. २००३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांमध्ये भीमबेटकाचा समावेश केला.
11 Jan 2023 - 7:42 pm | टर्मीनेटर
कर्नलसाहेब 'भिमबेटका' विषयीची माहीती रोचक आहे!
12 Jan 2023 - 9:32 am | प्रचेतस
भीमबेटका जाण्याच्या यादीत आहेच. विदिशी, उदयगिरी, सांचीची एक सहल करायची आहे तेव्हा हे पाहणार आहेच.
11 Jan 2023 - 1:15 pm | अनिंद्य
खूप छान.
लिहितांना कच्चा मसुदा करावा तसे मूर्तिकलेसाठी केल्याचे आणि ते 'रफ पेज' अजून सुस्थितीत असल्याचे पहिल्यांदाच बघितले.
फोटो सुंदर, नेहेमीप्रमाणे.
जय हो !
11 Jan 2023 - 7:36 pm | टर्मीनेटर
अप्रतिम!
ती कमान प्रचंड आवडली. कोरिवकामाच्या सरावासाठीचा खडकही खासच आहे.
कप्पे अरभट्ट लेखाच्या खाली जे वर्तुळाकृती कोरिवकाम आहे ती राजमुद्रा टाईप काही आहे का?
12 Jan 2023 - 9:35 am | प्रचेतस
ती राजमुद्रा नाही, चालुक्यांच्या राजमुद्रेत, सूर्य, शंख, चक्र आणि वराह सामावलेले आहेत. कप्पे अरभट्ट लेखात फक्त नक्षीदार चक्र आहे.
11 Jan 2023 - 8:25 pm | Bhakti
अनंतशयनी विष्णु मूर्ती खुपचं बारकाईने खोदली आहे.अगस्ती तलाव,काठावरचे मंदिर सुंदर आहेत.सिदलाफडी गुहा आणि भित्तीचित्रे संवर्धित करायला पाहिजे.
12 Jan 2023 - 2:33 pm | चांदणे संदीप
हंपी आणि बदामी खूप आधी निवांतपणे फिरल्यामुळे अगदी उजळणी झाल्यासारखे वाटले.
सिदलाफडीबाबत आधी माहित नव्हते नाहीतर तेही बघितले असते. आता परत जायलाच पाहिजे.
इस्के वास्ते मय जायेंगाच.
सं - दी - प
15 Jan 2023 - 11:56 am | प्रशांत
वल्लीसेठ, फोटो व लेख एकदम मस्त .!
15 Jan 2023 - 12:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्लीशेठ, हाही अतिशय सुंदर भाग. लेखनशैली सुंदर. चलचित्र बघतोय असे वाटावे इतके सुरेख. खरं तर, कौतुक करावे तितके कमी. भूतनाथ मंदिर लैच आवडले. फांसना शैलीबद्दल अजून माहिती हवी होती. ही शैली नेमकी कशी आहे, वगैरे. ही शैली वाचक म्हणून आमच्यासाठी नवीन. शिलालेख, ती कातळं, भूरुपे, सिदलाफडीतली चित्र तर खूप आवडली. खरं तर संरक्षण व्हायला पाहिजे. किमान तिथे खडू, कोळशांनी चित्र काढणा-यांना आवरले पाहिजे. प्रशस्तरावरील, गणेश, ब्रह्मा, विष्णू, महेश, महिषासुरमर्दिनी आणि हिरण्यकश्यपूची मूर्ती लैच भारी. अनंतशयनी विष्णूची मूर्ती अ तिशय सुंदर, खरं तर ही जीवंत मूर्ती आहे पण मला ती मूर्ती पाहून अजिंठ्यातील गौतमबुद्धाची महानिर्वाण मूर्तीची आठवण झाली. दोन्हीही मूर्तीत फरक आहे पण तरीही. बाकी, ’इथे यावे आणि तलावाच्या पाण्यात पाय सोडून तासनतास बसावे’ मी तर, मैत्रीणीबरोबर तिथे पाण्यात पाय सोडून गप्पा मारत बसलोय अशी कल्पना करुन झाली. एकदा तिथे गेले पाहिजे. सगळे लेखन कायम उपयोगी, याचं पुस्तक करा आता. पुलेशु.
-दिलीप बिरुटे
15 Jan 2023 - 12:43 pm | गवि
चालू द्या. निवांत होऊ द्या. सुसरी, पाणसर्प वगैरे पासून जपा म्हणजे झाले.
15 Jan 2023 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो, काल्पनिक आहे सगळं. साधं कल्पना करुन लिहिण्याचंही
सुख नै राहिलं कुठं. :(
अवांतर गप्पाबद्दल धागालेखकाची क्षमा मागतो.
- दिलीप बिरुटे
15 Jan 2023 - 3:49 pm | सस्नेह
बदामीला बरेचदा जाऊन आलेपण हे असले काही पाहिले नाही.
आता जरा सवडीने गेल्यावर बघून घेईन....
शिल्पे हो :)
16 Jan 2023 - 11:34 am | गोरगावलेकर
बदामी सहल राहून गेल्याची खंत होती पण आपला लेख वाचून झाले ते चांगलेच झाले असे वाटायला लागले. आता जेव्हा कधीही इकडे जाणे होईल तेव्हा निवांत वेळ काढून आणि आपल्या लेखाची प्रत सोबत घेऊनच जायचे हे निश्चित.
21 Jan 2023 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा
पौर्णिमेच्या रात्रि भूतनाथाचे मन्दिरि, काय काय अद्भूत घडेल? माझ्या आत्म्याच्या अन्तरि ?
जैसे लिहिले बेडसे लेणी काव्य ,तैसाची प्रकटॅल येथे मनीचा भाव
भूतनाथाचा परिसर प्रचंड सुन्दर ,अद्भुत, विलक्षण आहे . किमान तिन् दिवस रात्रि येथे व्यतीत केल्यावाचुन समाधान होणाअर नाहि.